गेल्या काही दिवसांपासून स्वत:साठी घर शोधण्याची मोहीम सुरु आहे. आजकाल घराला 'Flat' असे म्हणतात. पुण्यासारख्या शहरात जर Flat बुक केला असेल तरच त्या माणसाने आयुष्यात काहीतरी मिळवलय असे मानले जाते. कारण भेटणारा प्रत्येक दुसरा माणुस तुम्हाला ' काय, कसे सुरु आहे? ' हे विचारून झाल्यावर 'काय Flat वगैरे बूक केला कि नाही अजुन? 'असा प्रश्न विचारून जातोच.आणि त्याचे उत्तर जर 'हो' असेल तर पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला काहीही अर्थ उरत नाही. Flat घेतल्यावर माणसाचे 'बरं चाललंय ' हे उत्तर खरं असुच शकत नाही. तो बिचारा ईएमआय आणि डाउन पेमेण्ट या 2 शब्दान्नी पुरता मेटाकुटीला आलेला असतो. जवळपास 20 वर्षांच्या कालावधीनंतर भेटलेल्या एका नातेवाईकाने मला वरील प्रश्न विचारला, त्यावर 'नाही' असे उत्तर ऐकल्यावर ते म्हणाले , "अरे काय अजून किती दिवस भाड्याच्या घरात रहाणार? करा काहीतरी ! " त्यांची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्या डोक्यात आलेला सगळ्यात पहिला विचार म्हणजे," मी म्हशीच्या गोठ्यात जरी राहीलो तरी ह्याच्या बापाचं काय जाते? " ते गृहस्थ अजूनही गावात वडिलोपार्जित वाड्यात रहात असल्याचं मला नंतर कळलं !
असो. तर लोकाग्रहास्तव म्हणा किंवा स्वत: ची गरज म्हणा पण आम्ही Flat शोधण्याची मोहीम सुरु केली. थोडीबहुत चौकशी केल्यावर कळलं की साधारण चार माणसांचा महिन्याचा किराणा आणि पेट्रोल च्या खर्चात एक स्क़्वेअर फूट जागा मिळते . ती सुद्धा किराणा, पेट्रोल ज्या ठिकाणी मिळते तिथून ८-१० किलोमीटर दूर !! जसं जसं जवळ येऊ तशी तशी किंमत वाढेल. मग हळुहळु आम्ही बिल्डर्सच्या ऑफिसेस मध्ये जाऊ लागलो. सुरुवातीला काही मोठ्या बिल्डर्स चे ऑफिस बाहेरूनच बघून आत जावं की नाही अशी भीती वाटायची. पण नंतर आम्ही सरावलो. आत गेल्यावर एखादी आकर्षक रिसेप्शनिस्ट मुलगी आपलं स्वागत करते. थोडसं 'हाय - हेलो' करून हळुच आपलं बजेट किती वगैरे ही माहिती काढून घेते. आपल्या बजेट चा आकडा जर कमी असेल (बहुधा असतोच!) तर तिच्या चेहऱ्यावरचे भाव आपोआप बदलतात (मग आपल्याला बसायला सांगून ती निघून जाते. आणि नेमके त्याच दिवशी तिचे सर इतके बिझी असतात की आपल्याला भेटू शकत नाही. मग ती आपल्याला 'प्रोजेक्ट प्लान ' आणि 'कोस्टिंग शीट' देऊन आपली बोळवण करते.). पण चुकून जर आपल्या बजेटचा आकडा तिच्या अपेक्षेप्रमाणे असेल तर लगेच ती सरांना भेटायला आतल्या केबिन मध्ये घेऊन जाते. मग सर बोलायला सुरु करतात.
" सर आमचा हा प्रोजेक्ट इतक्या इतक्या एकरांवर पसरलेला आहे. आसपास असं असं निसर्गसौंदर्य आहे. आम्ही अमुक अमुक फेजेस बांधतो आहे .....वगैरे वगैरे "
खरं म्हणजे आपल्याला दोनचं गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. घराचा एरिया किती ? भाव किती? पण या गोष्टी सर आपल्याला सगळ्यात शेवटी सांगतात. आणि दोघांचा गुणाकार ऐकू आपण तिथुन निघून जातो.
पण काहीही असो , यांच्या सोसायट्यांचे नाव मात्र ऐकण्यासारखे असतात. 'नेस्टोरीया', ,ओनेलीया', 'ग्रेसिया', 'रोझ व्हिला', 'प्रिस्टिन गार्डन' !! नाव ऐकल्यावरच आपण साहेबाच्या देशात आल्यासारखे वाटते. पण मला सांगा नेस्टोरीया धनकवडी ,ओनेलीया हांडेवाडी , ग्रेसिया तळेगाव ढमढेरे , रोझ व्हिला कोंढवा बुद्रुक असे पत्ते साहेबाच्या देशात असतील का हो ? असो. दुसरी ऐकण्यासारखी गोष्ट म्हणजे साइट लोकेशन . ते लोकेशन शहरापासून कितीही लांब असो तरीसुद्धा ते एकतर 'मोस्ट डेव्ह्लप्ड' तरी असतं किंवा 'नेक्स्ट डेस्टीनेशन' तरी असतं. आसपास सगळीकडे जंगल जरी असलं तरी तिथे लवकरच ‘Shopping Mall” किंवा ‘IT Park’ होणार असतो. शिवाय समोर ओसाड पडलेल्या जागेवर एक साठ मीटर रुंद रस्ता मंजूर झालेला असतो. जो एकीकडे विमानतळ आणि दुसरीकडे डायरेक्ट हिंजेवाडीला जाऊन मिळणार असतो. तो रस्ता कोणी मंजूर केला ? कोण बांधणार आहे? कधी बांधणार आहे ? असले मुर्खासारखे प्रश्न विचारायचे नसतात.
एक साइट लोकेशन बघायला गेलो असताना मी तिथल्या माणसाला जास्त किमतीचे कारण विचारले. तो म्हणाला ," साहेब इथून हायवे एकदम जवळ आहे ". आता हायवे आणि ते लोकेशन याच्या मधात साधारण तीन डोंगर होते. आणि कच्च्या रस्त्याने हायवे पर्यन्त जायला वीस मिनिटे लागत होती !! बरं समजा लोकेशन हायवे टच जरी असलं तरी त्याचा दैनंदिन जीवनात काय उपयोग असतो ? आपल्या मुलांना जर क्रिकेट खेळायचं असेल तर ते हायवेवर जातील का ? हायवेवरच्या वाहनांचा आवाज आणि उडणारी धूळ यांचा काय उपयोग ? जास्त पैशे नक्के मोजायचे कशासाठी ?
सोसायट्यान्मध्ये मिळणाऱ्या ‘Ammenities’ ही आणखी एक मजेदार बाब आहे. प्रत्येकी बारा मजल्यांच्या बावीस इमारती असलेल्या एका लोकेशनवर मी गेलो होतो. तिथे स्विमिंग पूल, जौग्गिंग रुट, गार्डन, जीम इ. सगळ्या ammenities होत्या. मी नं राहवून एक प्रश्न विचारला ," बावीस इमारती बांधल्यावर सुर्य दिसेल का हो ? की त्यासाठी वेगळा ammenity charge द्यावा लागेल ?
याशिवाय आपल्या लोकेशन पासून सगळ्याच गोष्टी किती जवळ आहे याचा हिशोब अंतरात नाही तर मिनिटात दिला जातो. दिलेला वेळ हा बहुतेक विमानप्रवासाचा असावा असं माझा अंदाज आहे. उदा. खराडी बायपास ते पुणे स्टेशन हे साधारण १० किमी अंतर १७ मिनिटे असं दाखवलं असते. दिवसातल्या कोणत्याही वेळी हे अंतर १७ मिनिटात पार करता येत नाही. विमानाने बहुधा शक्य असावं.
जागेचे दर वाढवण्याचे कारणं तर अनाकलनीय असतात. अक्षरश: "खूप दिवसात भाव वाढवलाच नव्हता म्हणून वाढवला" अशी कारणं सुद्धा सांगण्यात येतात. प्रस्तावित विमानतळ, मेट्रो, आयटी पार्क ह्याच्या नावाखाली भाव वाढवले जातात. आपल्या नातवाच्या लग्नापर्यन्त ते विमानतळ बांधून होत नाही. आणि बांधून झालंच तर नातू विमानात बसून परदेशात स्थायिक व्हायला जातो. मग आयुष्यभर आपण उडणारी विमानं बघायची !
असो. तर घर शोधण्याचं कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सगळी गणितं जमून आली तर घर नक्के होईल. मग उरलेलं आयुष्य ईएमआयरुपी गणितं सोडवायची आहेतच !!!
-- चिनार
प्रतिक्रिया
5 Jan 2015 - 12:24 pm | प्रसाद१९७१
एक अंगठ्याचा नियम :
तुम्ही सध्या ज्या फ्लॅट मधे भाड्यानी रहात आहात, त्याचे भाडे जेव्हा तोच फ्लॅट विकत घेतलात तर पडणार्या EMI च्या अर्ध्यापेक्षा जास्त होइल तेंव्हाच फ्लॅट विकत घेण्याचा विचार करावा.
नाहीतर तेच पैसे चांगल्याप्रकारे गुंतवुन ( छोट्या शहरात प्लॉट्,फ्लॅट किंवा शेअर्स ) मजेत रहावे.
वाटले तर मार्केट रेट पेक्षा जास्त भाडे देवुन ५ वर्षाचा करार करुन घ्यावा म्हणजे सारखी जागा बदलावी लागणार नाही.
5 Jan 2015 - 7:41 pm | आदूबाळ
या अंगठ्याच्या नियमामागे काय लॉजिक आहे?
(कृ. खवचटपणे विचारतो आहे असं समजू नका. खरोखर उत्सुकता वाटली म्हणून विचारतो आहे.)
7 Jan 2015 - 1:42 pm | प्रसाद१९७१
जर भाडे EMI च्या अर्ध्या पेक्षा कमी असेल तर उरलेले पैसे दुसरीकडे गुंतवुन लाँगटर्म मधे जास्त NAV होते.
तसे ही मालकीच्या फ्लॅट चे मेंटेनन्स आणी सोसायटीचे पैसे हल्ली खुप झाले आहेत.
7 Jan 2015 - 4:10 pm | जिन्क्स
आहो पण घर हे एक स्थावर माल्मत्ता नसती का? तुम्ही नाही पण उद्या तुमच्या मुलान्नी घर विकायला काढले तर मिळणारी किम्मत ही कोणत्याही गुंतवनुकी पेक्शा जास्तच असणार नाही का?
7 Jan 2015 - 4:29 pm | काळा पहाड
आहे आहे, बिल्डर लोकान्ला अजूनही भवितव्य आहे.
7 Jan 2015 - 7:53 pm | आदूबाळ
तर
IF HouseRent less than 0.5*EMI
THEN NAV[(0.5*EMI)-HouseRent] > NAVHouseValue
at n=(say) 10 years
बरोबर आहे का एक्स्प्रेशन? एंपिरिकली तरी सिद्ध करता येतंय का पहातो.
8 Jan 2015 - 4:49 pm | प्रसाद१९७१
मला फार काही कळले नाही, पण हा प्रॉब्लेम वाटतोय
[(0.5*EMI)-HouseRent] च्या ऐवजी [(EMI)-HouseRent] पाहीजे होते.
डाव्या बाजुला डाउन पेमेंट पण धरायला पाहीजे.
जे पैसे वाचत आहेत (EMI-HouseRent) आणि डाउन पेमेंट वर कमीत कमी एफ्डी इतके तरी व्याज पकडायला पाहीजे.
8 Jan 2015 - 4:50 pm | प्रसाद१९७१
NAVHouseValue काढाल तेंव्हा शिल्लक राहीलेले कर्ज पण घराच्या कीमतीतुन वजा करा.
8 Jan 2015 - 4:53 pm | आदूबाळ
ओके. धन्यवाद!
8 Jan 2015 - 5:03 pm | टवाळ कार्टा
हे काय आहे ते कोणी सांगेल काय
5 Jan 2015 - 12:34 pm | विटेकर
सुरेख लिहिलयं, तुमची मलमळ समजली. हल्ली पुण्यात घर घेणे अतिशय जिकिरिचे झाले आहे. ज्या आय टी वाळ्यांनी पुणे महाग केले त्यांनाच ते आता परवडनासे झाले आहे.
मला नेहमी प्रश्न पडतो. शिक्षक, कंडक्टर, पोलिस, कारकून हे उभ्या आयुष्यात घर घेऊ शकतील का ? ते कसे जगत अस्तील पुण्यात ?
5 Jan 2015 - 12:57 pm | मुक्त विहारि
पुण्यातच नाही तर, इतर शहरांत पण वेगळी परीस्थिती नसावी.
5 Jan 2015 - 1:38 pm | कपिलमुनी
यांचे कारनामे माहित नाहीत का ?
5 Jan 2015 - 5:11 pm | नगरीनिरंजन
शिवाय शिक्षकांनाही कमी समजू नका. सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर अनेकांनी "गुंतवणूक" केली आहे. शिवाय बर्याच जणांच्या खाजगी शिकवण्या चालू असतात म्हणे.
5 Jan 2015 - 5:18 pm | नाखु
शिक्षक, कंडक्टर, पोलिस, कारकून हे उभ्या आयुष्यात घर घेऊ शकतील का ?
शिक्षक, कंडक्टर, हेच दोन "उभे" आयुष्य वाले आहेत.कंडक्टर अजून नोकरीतच कायम नसल्याने (पीएम्पीएल) कायमवाले घर कसे घेणार.
7 Jan 2015 - 10:59 am | बोका-ए-आझम
तुम्ही जे सहावा वेतन आयोग लागू झालेले शिक्षक म्हणताय ते अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांत अनुदानित विभागांमध्ये शिकवतात. त्यांची संख्या पूर्ण मुंबईत जेमतेम १०,००० असेल. बाकी बहुसंख्य शिक्षक हे कंत्राटी किंवा तासाच्या हिशोबाने आहेत. त्यांना कितीच्या व्हाऊचरवर सही करावी लागते आणि हातात किती मिळतात हे तुम्हाला माहीत आहे का? अभ्यास वाढवा जरा. उगाचच मतांच्या पिंका टाकू नका. शिवाय शिक्षकांना मिळाले चांगले पगार, तर बिघडलं कुठे? जर चांगले पगार मिळतील तरच चांगले लोक या क्षेत्रात येतील. If you pay peanuts, you will get only monkeys.
7 Jan 2015 - 1:46 pm | काळा पहाड
नगं. आधीच तिथं गाळ भरलाय. या तथाकथित शिक्षकांना साधे बँकेचे फॉर्म भरता येत नाहीत. साध्या साध्या संकल्पना माहीत नाहीत आणि त्या चांगल्या प्रकारे समजावता येणं तर दूरच. बहुतांशी शिक्षक हे पोपटपंची करून पास झालेले आहेत आणि त्यांना जगात कशा प्रकारे शिकवलं जातं याचा गंध सुद्धा नाहीये. साधं उदाहरण देतो. गणितामधलं लिमिट म्हणजे काय, ते का आस्तित्वात आलं, त्याचा उपयोग कुठे होतो, निसर्गात त्याची कोणती कोणती उदाहरणे आहेत हे किती गणिताच्या शिक्षकांना माहीत आहे? सरळ फॉर्म्युले सांगायचे आणि ते घालून गणितं सोडवायला सुरवात करायची. बाकी या शिक्षकांना किती पगार मिळतो आणि किती मिळत नाही ते ते आणि त्यांना पगार देणार घेणारे बघून घेतीलच. समाजाचा संबंध फक्त चांगलं शिक्षण घेण्याशी आहे. ते तर यांना देता येत नाहीए. समाजाची जबाबदारी आहे का या पढतमूर्खांना पोसण्याची? त्यांना चांगले पगार मिळाले तर त्यांची संशोधन वगैरे करण्याची मानसिकता होणार आहे का? कारण अनुदानित विभागांमध्य काम करणारे शिक्षक पण त्याच क्वालिटीचे आहेत.
सध्यातरी एक करता येईल. कॅट, आयाआयटी मध्ये मुलं ज्या प्रमाणात पास होतील, त्या प्रमाणात यांचा पगार ठरवता येईल. मुलांना जितके जास्त मार्क तितका जास्त बोनस. एकही मुलगा पास झाला नाही तर पगार नाही, जावून भीक मागणे.
(संपादित)
7 Jan 2015 - 2:10 pm | बोका-ए-आझम
या तथाकथित शिक्षकांना - असे किती शिक्षक पाहिलेत आपण? किती शिक्षकांना बँकांचे फाॅर्म भरता येत नाहीत? नक्की संख्या कळेल का? अनुदानित विभागात काम करणा-या शिक्षकांचा दर्जा - कुठले निकष वापरून हा दर्जा ठरवलात आपण?
दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक या व्यवसायाबद्दल तुमच्या मनात प्रचंड तुच्छता भरली आहे असं दिसतं. पण तुम्ही इथे जे तारे तोडत आहात - त्यासाठीची किमान अक्षरओळख आणि शब्दांची ओळख ही त्याच शिक्षकांनी करुन दिलेली आहे हे लक्षात ठेवा आणि त्याबद्दल कृतज्ञ राहा. जर ते नसते तर तुम्हाला-आम्हाला भीकच मागावी लागली असती. तेव्हा उगाचच मनाला येईल ते काहीतरी बोलून वादाची पातळी घसरवू नका.
7 Jan 2015 - 2:26 pm | काळा पहाड
बोकासाहेब आत्ता जन्माला आलो का मी? दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन, पोस्टग्रॅज्युएशन या सर्व टप्प्यांवर शिक्षक दिसतात की नाही? बाकी हा फॉर्म माझ्या ग्रॅज्युएशनच्या शिक्षकांना भरता येत नसल्याचं याची देही याची डोळा पाहिलेलं आहे. माझ्या एका पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शिक्षकाची मुलींशी जवळीकींमुळे (आणि त्यांना दारू पाजल्यामुळे) बदली झाल्याचंही माहीती आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकवणार्या शिक्षकांना एक वही घेवून येवून त्या नोट्स उतरवून काढण्याचा एकमेव उद्योग विद्यार्थ्यांना देताना पाहिला आहे. काही अपवाद सोडता (उदा: माझे मराठीचे पाटील नावाचे शिक्षक ज्यांनी मराठी हा एक आनंददायक अनुभव बनवला होता) हे असंच होतं.
बाकी किमान अक्षरओळखीबद्दल. एकदा नीट ठरवा की शिक्षण व्यवसाय हा धंदा आहे की सर्व्हिस. जर सर्व्हिस असेल तर लहानग्यांना वर्षाला ३५००० रुपये फी घेण्याचं काय कारण आहे? जर धंदा असेल तर नक्की कोणत्या उपकाराबद्दल बोलतोय आपण?
7 Jan 2015 - 2:59 pm | मुक्त विहारि
ह्या ह्या ह्या...
पालकांकडून पैसे घ्यायचे असतील तर, धंदा
आणि
शासना कडून अनुदान घ्यायचे असेल तर, समाज सेवा....
असे मला वाटते,
माझे मत चुकीचे ठरल्यास, मतपरीवर्तन केल्या जाईल.
आजची स्वाक्षरी : काळानुरुप स्व-बदल हा अत्यावश्यक आहे.
7 Jan 2015 - 3:05 pm | बोका-ए-आझम
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काही शिक्षक तुम्ही म्हणता तसे असतील पण सरसकटपणे सगळ्या शिक्षकांना बोलायची काय गरज आहे? म्हणूनच मी प्रश्न विचारलाय की असे किती शिक्षक पाहिलेत आपण? चांगले आणि वाईट लोक सगळीकडे असतात. त्यामुळे त्या व्यवसायाला बोलण्याचं काही कारण नाही. वर्षाला ₹३५,००० फी घेण्याबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर महागाई सगळीकडे वाढलेली आहेच. जर सरकार शाळांना किंवा महाविद्यालयांना अनुदान देत नसेल तर जो खर्च आहे त्यासाठी पैसे आणायचे कुठून? जे लोक शाळा या ना त्या कारणाने पैसे उकळतात असं म्हणतात त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कंपन्या (मालकीच्या किंवा काम करत असलेल्या) तसं करत नाहीत का हे एकदा तपासून पाहावं. आणि उपकारांबद्दल म्हणालात तर हा प्रत्येकाच्या मनोवृत्तीचा भाग आहे. साधा सरळ हिशोब आहे - जर आज एखादा विद्यार्थी अभियांत्रिकी पदवीच्या जोरावर नोकरी मिळवत असेल तर त्याला ₹३ ते ३.५ लाख एवढा वार्षिक पगार मिळतो. त्याच विद्यार्थ्याला MBA केल्यावर ₹८ ते १० लाख एवढा पगार मिळतो. त्याला त्या पात्रतेपर्यंत पोचवणा-या शिक्षकाला किती मिळतात? जे ज्ञान शिक्षक विद्यार्थ्याला देतात त्या ज्ञानाच्या जोरावर तो विद्यार्थी किती कमावतो आणि त्या शिक्षकाला किती मिळतात याचा हिशोब केलात तर शिक्षकांचं शोषण होतंय असंच म्हणावं लागेल. शेवटी त्याला उपकार म्हणायचं की नाही हा प्रत्येकाच्या मनोवृत्तीचा प्रश्न आहे.
7 Jan 2015 - 3:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
"₹" कसे टायपले ते सांगू शकाल का ?
7 Jan 2015 - 6:42 pm | बोका-ए-आझम
जस्ट मराठी नावाचं एक अॅप आहे. ते डाऊनलोड केल्यावर मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही कीबोर्ड मिळतात. त्यात मिळेल.
7 Jan 2015 - 3:58 pm | काळा पहाड
आणि मी म्हणतोय की बहुतांशी शिक्षक हे पोपटपंची करूनच शिक्षक झाले आहेत. मी तुम्हाला फक्त वानगी दाखल उदाहरणं दिली जे अप्रामाणिक होते. पण जे प्रामाणिकपणे शिकवायचे ते प्रामाणिक पण अकार्यक्षम शिक्षक होते. आणि ज्या गोष्टी मी नंतर शिकलो त्या मला आधी मी पास होवून सुद्धा ठावूकच नव्हत्या. आणि यासाठी मी किती तरी उदाहरणे देवू शकतो. खरं तर असं आहे की शिक्षकांना (आणि बर्याच इतर जणांना सुद्धा) पाट्या टाकायच्या असतात, सेवा केली असं दाखवायचं असतं आणि सातवा वेतन आयोग सुद्धा हवा असतो. ज्ञान, संशोधन वगैरे गेलं तेल लावत.
बाकी तुम्ही आता इतका पगार आणि तितका पगार सांगताय. पगार हा फक्त क्षमतेवर नाही तर क्षमता + जबाबदारीवर दिला जातो. हे जे विद्द्यर्थी आहेत ते त्यांच्या कंपनीसाठी एक ठराविक जबाबदारी उचलणार आहेत. अशी काय जबाबदारी शिक्षक उचलतात हो? सगळे विद्द्यार्थी नापास झाले तरी शिक्षकांना पगार मिळातोच ना? पगार जास्त द्यायला ना नाही पण त्यांनीही सर्व विद्यार्थ्यांना पडणार्या मार्कांची गॅरंटी घ्यावी. ती पण नाही, ज्ञान पण नाही, तास पण जास्त नकोत, घरी शिकवण्या पण करणार, जास्त पैसे मिळत नसल्यामुळं पेपर पण कसे तरी तपासणार आणि वर त्यांचं शोषण होतंय होय?
7 Jan 2015 - 6:32 pm | बोका-ए-आझम
अच्छा! म्हणजे विद्यार्थी परिक्षेत काही का करेना, जाणूनबुजून
किंवा नकळत चूक करणार आणि त्याची जबाबदारी शिक्षकाची? जगातल्या कुठल्या व्यवसायात विक्रेता हा ग्राहकाच्या वागणुकीबद्दल जबाबदार धरला जातो? नशीब तुमच्यासारखे लोक या देशाचं धोरण ठरवत नाहीयेत नाहीतर एखाद्याने वकिली शिकून गुन्हा केला तर काय त्याला कायदा शिकवणा-यांना शिक्षा करणार? आणि विद्यार्थी पास होवो किंवा नापास, ते परीक्षेवर अवलंबून असतं. शिक्षकाला मेहनत तेवढीच घ्यावी लागते. आणि शोषण तर होतं आहेच. विद्यार्थ्याची निवड कंपनी करते कारण त्याने काही एक चांगला
Performance दिलेला आहे. ती सगळी प्रक्रिया शिक्षकच सांभाळतात. जाऊ दे. तुमच्या लक्षात ते येणार नाही. त्यासाठी एक किमान बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलता लागते.
7 Jan 2015 - 7:31 pm | नगरीनिरंजन
सगळे शिक्षक किंवा सगळे सरकारी अधिकारी किंवा सगळे आयटीवाले किंवा सगळे एनाराय सारखे असतात असे कोणाचेच म्हणणे नाही. शिक्षकांबद्दल आकस नाही पण काही गोष्टी पाहिल्यात त्यावर सविस्तर लिहीन लवकरच.
7 Jan 2015 - 7:38 pm | काळा पहाड
माझी बुद्धीमत्ता आणि संवेदनशीलता हा सर्वस्वी माझ्या काळजीचा विषय आहे. मी तुमच्या पर्सनल गोष्टींवर टीका केलेली नाही. तुम्हाला हे संभाषण पर्सनल करण्यात काय रस आहे मला माहिती नाही.
थोडक्यात शिक्षक हा विक्रेता आहे आणि विद्यार्थी ग्राहक आहे हे तुम्हाला मान्य आहे. जर विक्रेता चांगली सर्व्हिस देत नसेल तर ग्राहक त्याचे पैसे परत मागू शकतो. जाणूनबुजून स्वतःच नुकसान करण्यात ग्राहकाला रस असेल असं मला वाटत नाही, निदान असा ग्राहक मी तरी पाहिलेला नाही. जर शिक्षकांच्या अकार्यक्षमतेमुळे विद्द्यार्थ्याला पुरेसं ज्ञान मिळत नसेल तर विद्यार्थ्यानं काय करावं? बरं हे इव्हॅल्युएशन दहावीनंतर होत असल्यामुळं पैसे परत घेतले तरी विद्यार्थ्याचं नुकसान झालंच ना? ते पैसे घेवून परत येणार आहे का? मी घेतलेला टीव्ही नीट चालत नसेल तर ती जबाबदारी माझी असते की टीव्ही कंपनीची? अशा वेळी जबाबदारी शिक्षकांनी घ्यायलाच हवी. आणि ती घ्यायची नसेल तर मग त्यांचा पगार सुद्धा कमीच असणार. त्यात विशेष काय आहे?
शिक्षक दिवसाचे किती तास घेतात? ८ तास? नक्कीच नाही. त्यांना १, २ किंवा जास्तीत जास्त ३ तास तेही ४५ मिनिटांचे घ्यावे लागतात. मेहनत जास्त कशी?
जगात हजारो कामगार आहेत. तेही स्किल्ड असतात. त्यांना यापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते आणि त्यांचं पण तथाकथित शोषण होतं. याचं कारण हेच आहे की कामगारांना जबाबदारी नसते. मॅनेजरला ती असते. पगार आणि प्रमोशन या जबाबदारी बरोबर येणार्या गोष्टी आहेत.
फुकट करतात का?
7 Jan 2015 - 8:37 pm | हाडक्या
@काळा पहाड, तुमच्या वरील प्रतिसादास तीव्र आक्षेप.
स्वतःचा मुद्दा खरा करण्यासाठी शिक्षकी पेशाची इतकी लाज काढण्याची काही गरज नाही.काही लोक चुकारपणा करत असतील पण म्हणून त्या व्यवसायास आणि तो करणार्या सगळ्यांनाच तुम्ही जसे तोलता आहात ते काही पटत नाही.
तुम्हाला शिक्षकी पेशाबद्दल किती अगाध माहीती आहे ते कळतंय इथे (जास्त काही बोललं तर परत म्हणाल पर्सनल बोलतोय).
पण असा बहुतेक जनतेचाही दृष्टीकोन असेल तर त्या शाळा आणि तिथल्या पोरांचे देवच भले करो..
7 Jan 2015 - 11:06 pm | काळा पहाड
पेशा कसला? अहो हा धंदा आहे ना? बोकासाहेबांनी तर ते कबूलच केलंय. आपण सरकारी नोकर, बिल्डर, राजकारणी यांची जमेल तिथे लाज काढतोच ना? शिक्षक का वेगळा आहे ते सांगाल?
नसेल कदाचित. तुम्ही सांगा ना किती खपतात आपले शिक्षक ते. कारण मुद्दा इथे असा आहे की शिक्षकांना उच्च वेतन का मिळत नाहिये. आता असा मुद्दा आल्यावर त्याचा प्रतिवाद करायला नको?
जर रिझल्ट्स मिळाले नाही तर बहुतेक जनतेचा असाच दृष्टीकोन असेल हे पक्कं समजा. आम्ही पैसे मोजतो, चिंचोके नाही. त्यानंतरही इथेच ड्रेस विकत घ्या, डोनेशन द्या वगैरे नखरे आहेतच. शहरांमधलं शिक्षण एका मुलासाठी वर्षाला ५०,००० रुपयांच्या घरात गेलंय. जनता हे निमूटपणे सहन करते कारण १. त्यांना पर्याय नाही २. त्यांची एकजूट नाही आणि ३. या शाळा उच्च रिझल्ट्स देतील असं लोकांना वाटतं. तसं जर झालं नाही, तर लोक काय करतील असं वाटतं?
8 Jan 2015 - 4:25 pm | हाडक्या
बोकासाहेब म्हणजे बायबल नव्हे की न्यायमूर्ती की जे म्हणाले म्हणून तुम्हे तुमची विवेक-बुद्धी बाजूला टाकून काहीही बोलावे. दुसरी गोष्ट, जरी डॉक्टर, शिक्षक (मी यापैकी कोणीही नाही) हे व्यवसाय (पेशा/धंदा काहीही म्हणा) आहेत तरी त्यांचा लोकांच्या आयुष्याशी थेट संबंध येत असल्याने त्यांना समाजात एक आदरयुक्त स्थान (तशीच हेटाळणी पण) मिळते.
तेही बाजूला ठेवले तरी तुम्ही जेव्हा "धंदा" असा उल्लेख करताय तो अतिशय वाईट अशा वेगळ्या "context"मध्ये करताय म्हणून निषेध नोंदवला.
तुमच्या असल्या पूर्वग्रहदूषित बोलण्याचं कारण कळालं. यापुढे तुम्हाला काही सांगण्यात अथवा याविषयी चर्चा करण्यात काही हशील नाही हेदेखील समजलं. तेव्हा चालू द्या.
बादवे, रेल्वेच्या समस्यांसाठी नेहमी मोटरमनला धरणारे (आणि मारणारे) पब्लिक पाहीले की यामुळेच आश्चर्य (कीवदेखील) वाटते.
7 Jan 2015 - 9:42 pm | बोका-ए-आझम
काळा पहाड - Wed, 07/01/2015 - 13:28
मलाही असंच वाटत होतं. ते आता कन्फर्म झालं. हीच घाण आता इथे येवून इथल्या लोकांचे शेजारी बनणार आहेत. सरकारी नोकर असलेला माणूस मरत असला तरी त्याला पाणी देवू नये असं पर्सनल मत आहे.
>>>>>
@काळापहाड
तुम्हाला काहीतरी मानसिक प्राॅब्लेम आहे काय? शिक्षकांवर तुमचा राग - का, तर म्हणे पाट्या टाकतात आणि जबाबदारी घेत नाहीत. तुमच्याकडे पगार मागायला येतात का? आणि आता सरकारी नोकरांवर? मान्य आहे, सरकारी नोकर हा कुणाच्या फारशा आदराचा विषय नाही पण अशी भाषा? एवढी नकारात्मक वृत्ती तुमच्यात का आली ते एकदा सांगा म्हणजे आम्ही " अरेरे! बिच्चारा काळापहाड! " म्हणायला मोकळे!
7 Jan 2015 - 9:52 pm | बोका-ए-आझम
जुन्या मिपाकरांना भडकमकर मास्तरांची ' एका छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी ' आठवत असेल. रोल माॅडेल म्हणून कोणाला घेतलं होतं ते समजलं! ;)
7 Jan 2015 - 10:56 pm | काळा पहाड
बोकासाहेब महोदय, पुन्हा एकदा सांगतो की माझा मुद्दा हा एका तर्कावर आधारलेला आहे. त्याला तर्कानं उत्तर द्यायचं सोडून तुम्ही माझ्यावर पर्सनल हल्ले करत आहात. तेव्हा मी कितीही मुद्दे लिहिले तरी त्याला तुम्ही जर अशी गचाळ उत्तरं देणार असाल तर मी मुद्दे मांडण्यात काहीच अर्थ नाही, नाही का?
की मी एखाद्या दुखर्या नसेवर हात ठेवलाय?
अजून नकारात्मक वृत्ती आलिये कुठे? ती आली असती तर मी इथे तुमच्याशी वाद घालत बसलो असतो?
7 Jan 2015 - 11:51 pm | बोका-ए-आझम
तुमचा मुद्दा तर्कावर आधारलेला आहे - हे तुमचं मत आहे. ज्याला तुम्ही तर्क म्हणताय त्यालाच मी तुमची नकारात्मक विचारसरणी म्हणतोय. शिक्षक, सरकारी नोकर यांच्याबद्दल तुमच्या भावना या अत्यंत आक्षेपार्ह आहेत अाणि त्याला तर्क म्हणणं यासारखी दुसरी तर्कदुष्टता नसेल. मला या क्षणी राग नाही, कीव येतेय तुमच्या विचारांबद्दल!
7 Jan 2015 - 2:52 pm | मार्मिक गोडसे
http://www.nydailynews.com/news/world/porn-star-sacked-teacher-appeals-r...
7 Jan 2015 - 11:00 pm | खटपट्या
आता विषय निघालाच आहे तर मराठी शाळांची आर्थीक परीस्थीती कशी आहे त्याविषयी थोडेसे. ठाण्यातील एका जुन्या मराठी शाळेत मित्राची मुलगी आहे. एका विद्यार्थ्याची फी वर्षाला १००० रू आहे. ही फी वाढवण्यासाठी पालक सभा घेणेत आली होती त्यात बहुसंख्य पालकांअचा फी वाढीस विरोध होता. वाढता विरोध पाहता शाळाचालकांनी वार्षिक जमाखर्चच पालकांसमोर ठेवला तो असा होता. शाळेत एकूण मुले = २०००. प्रत्येक मुलाकडून फी येते रू १००० वर्षिक. एकूण वार्षिक आवक = २० लाख. यात २० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचा पगार, विज बील, पाणी बील. ईतर शैक्षणीक साहीत्याचा खर्च, साफसफाई आणी ईतर खर्च कसे करणार. शाळेत येणारी बहूतेक मुले ही झोपडपट्टीत राहणारी. बहुतेक पालकांचा पगार १५ ते २० हजार. त्यात मराठी शाळेत कमी होत जाणारे प्रवेश. शाळेला अनुदान नाही. नवीन प्रवेश घेताना १०००० रू देणगी मिळते.
शिक्षकांना कमी पगार मिळण्याची बरीच कारणे आहेत.
7 Jan 2015 - 3:27 pm | चिनार
धन्यवाद !!
5 Jan 2015 - 12:50 pm | मनिमौ
हलली आय टी वाल्यांना पण नाही परवडत. सुरूवातीला पगार कमीच असतो 15 _ 25 हजार रुपये. कंपनी बदलली तर जरा जास्त. एकटे राहणे परवडत नाही. भाडे मिनिमम 5000 मे खाणे 3500 होटल, ऑफिस ) मोबाईल बिल आणी बाकी खचॆ यात संपतात.कसे जमणार. का
5 Jan 2015 - 1:13 pm | प्रभो
हिंजेवाडी नाही हो...हिंजवडी :)
5 Jan 2015 - 1:40 pm | कपिलमुनी
सध्या माझी पण अशीच घर घर चालू आहे .
लोका एवढे पैसे आणतात कुठुन हा ( खरोखरच) प्रश्न पडतो !
आजकाल डोणजे पासून शिरवळ आणि पौड ,उरवडे , वाडे बोल्हाई , चिखली , कामशेत , आणि हिंजवडीच्या मागे तर कुठेही डोंगरात प्रोजेक्ट्स चालू आहेत.
5 Jan 2015 - 2:55 pm | चिरोटा
सध्या फ्लॅट्स जास्त खपत नसल्याने बिल्डरांची बूच बसली आहे.वर म्हंटल्याप्रमाणे प्रोजेक्ट्सची नावे मस्त असतात- एकदम युरोपियन्स्टाईल- व्हेनेझिया,गॅलेरिया,नॅपा व्हॅली,एल्डोरा.. किंवा एकदम अस्सल जुनी भारतिय-
<बिल्डरचे नाव> प्राकृती,व्रूण्दावन वगैरे. आजुबाजुला एखादा पडिक तलाव,तळे असेल तर मग <बिल्डरचे नाव> लेक व्यु..
वगैरे.
पूर्वी बेंगळूर्मध्ये एक फ्लॅट बघायला शहराच्या बाहेर गेलो होतो. शहरापासून २५ कि.मी. लांब प्रोजे़क्ट होता.येळहांका येथे. पण भाव मात्र शहराचेच. कारण विचारले- इकडून एयर फोर्स स्टेशन जवळ आहे.शिवाय नविन एयर पोर्ट पण जवळ आहे."मग त्याचा मला काय फायदा? मी पायलट नाही किंवा कुठल्या विमान कंपनीत पण नाही." त्याने मुंबई,दिल्लीची उदाहरणे दिली. जिकडे एयरपोर्ट असतात तेथे कधीना कधी भाव वाढतातच. तेव्हा आता फ्लॅट घेतलात तर तो नंतर जास्त किंमतीने विका.
5 Jan 2015 - 5:33 pm | नगरीनिरंजन
नवे फ्लॅट्स न विकलेले किती आहेत याची आकडेवारी कुठे मिळू शकेल?
5 Jan 2015 - 8:52 pm | चिरोटा
ह्या बातम्या अधून्मधून येत असतात पण पाचव्या किंवा सहाव्या पानावर कोपर्यात!!त्यानंतर लगेच २/३ दिवसांत '७०-८० लाखाचे फ्लॅट्स पण कसे विकले जात आहेत'ह्यावर पहिल्या पानावर बातम्या येतात.त्याला जॉन लॅसल वगैरे मोठ्या एजंटांनी दुजोरा दिलेला असतो..
बेंगळूरमध्ये तरी फ्लॅट्स(५० लाखावरचे) जास्त खपत नाही आहेत.
5 Jan 2015 - 3:52 pm | सिरुसेरि
बिल्डर्स ची ऑफिसेस ,फ्लॅट्च्या प्रोजेक्ट्सची नावे युरोपियन्स्टाईल असतात . तसेच , त्यांच्या जाहीरतींच्या पोस्टर्स , होर्डींगस वरचे लोकही युरोपियन नाहीतर देशी युरोपियन वाटतात. थोडक्यात काय , तर , सर्व सामान्य लोकांसाठी हे प्रोजेक्ट्स नाहीत असेच बिल्डर्सना सुचवायचे असते .
5 Jan 2015 - 4:08 pm | चिरोटा
जाहिरातीचे पेपर्स मस्त असतात.बर्याचश्या चित्रात एक तोकडे कपडे घातलेली सोनेरी केसांची तरूणी कुत्रा घेऊन रस्ता क्रॉस करत असते. तिच्या मागून दोन गोंडस मुले शाळेत जात असतात.थोडे पुढे एक सुटाबुटातला बॅग घेतलेला तरूण बिल्डिंगमध्ये शिरत असतो.
5 Jan 2015 - 3:52 pm | स्वधर्म
तो नविन पेक्षा बराच कमी किमतीत मिळतो आणि ताबाही पटकन. सगळ्या गोष्टी पारखल्या जाऊ शकतात. फक्त एंजंट नामक प्राण्यापासून सावध. अनेक प्रॉपर्टी बाबतची संकेतस्थळे आहेत. स्पॅम मेलचा थोडा त्रास होतो. सकाळ इतर बाबतीत भुक्कड पेपर असला, तरी घरांच्य छोट्या जाहीराती बघा. बिल्डर नावाच्या जमातीशी संपर्क कमीत कमी असावा.
रिसेलचा प्लॅट घेणारा,
- स्वधर्म
5 Jan 2015 - 4:11 pm | सौंदाळा
मित्रांबरोबर पिंपळे सौदागर नामक एरियात ३ वर्षापुर्वी पहिल्यांदा गेलो होतो.
सरः गार्डन व्ह्यु फ्लॅट असेल तर ५० रु / चौ.फुट जास्त होतील. हा ५ बिल्डिंगचा प्लॅन बघा, हि फ्लॅट शिल्लक असलेली शीट बघा आणि सांगा.
मित्राचे बजेट लईच टाईट होते. मग आम्ही प्लॅन निरखुन बघुन गार्डन व्ह्यु नसलेल्या एका फ्लॅट वर बोट ठेवले.
सर : याचे ५० रु / चौ.फुट जास्त होतील, हा गार्डन व्ह्यु आहे.
आम्ही : गार्डन कुठे दिसतय इथुन?
सर : हे काय किचनच्या खिडकीतुन दिसतय की.
आम्ही : ??
परत प्लॅन मधे डोके खुपसले, मित्राने ५ मिन. डोके घालुन अजुन एका फ्लॅट्वर बोट ठेवले. सर म्हणायच्या आधी मीच म्हणालो अरे हा पण गार्डन व्ह्यु आहे.
मित्र (रागाने माझ्याकडे बघत) : कसे काय?
मी : हे काय संडासाच्या खिडकीतुन गार्डन दिसतय की.
मित्र : खी: खी:
सर : ?? खुन्नस
मी मोबाईल कानाला लावुन बाहेर फरार.
टीपः मित्राने शेवटी तोच फ्लॅट (संडासाच्या खिडकीतुन गार्डन व्ह्यु वाला) फायनल करुन विकत घेतला.
5 Jan 2015 - 4:44 pm | कपिलमुनी
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
5 Jan 2015 - 5:03 pm | शिद
*lol*
हं, मात्र बसल्यानंतर गार्डन व्ह्यू होणार नसल्यामूळे त्या फ्लॅटचा ५० रु/चौ.फुट जास्त भाव नसेल कदाचीत. ;)
7 Jan 2015 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
+D
हं, मात्र बसल्यानंतर गार्डन व्ह्यू होणार नसल्यामूळे
त्या व्ह्यूसाठी मिपावरच्या एका प्रस्थापित कवीच्या कविता चाळा... :) ;)7 Jan 2015 - 3:56 pm | हाडक्या
यांना "प्रस्थापित" असे कधीपासून म्हणू लागले वो ? नाय म्हन्जे माहीती असलेलं बरं..
5 Jan 2015 - 4:55 pm | नगरीनिरंजन
फ्लॅट विकत घेणे आवश्यक असते का?
बहुतेक एनाराय मंडळींनी गुंतवणूक म्हणून दोन-दोन फ्लॅट घेऊन भाड्याने चढवलेले असतात. शिवाय ज्या देशात राहतात तिथेही घर घेतलेले असते. एवढं करुन बाई आणि बाबा दोघेही दिवसभर घराबाहेर. तीन घरं आणि दोन गाड्या परवडाव्या म्हणून कामात गुंग आणि तिन्ही घरांचा उपभोग भलतेच लोक घेताहेत.
बरं, भाव वाढतील म्हणून घेतलेत म्हणावेत तर भाव किती वर्षात किती वाढतील, कधी फ्लॅट विकायचा आणि किती पैसे अपेक्षित आहेत. समजा वीस वर्षांनी विकायचा असेल तर वीस वर्षांनी काय परिस्थिती असेल याचा काहीही विचार नाही. जगात काय चाललंय, पुढे काय वाढून ठेवलंय याचा काहीही अंदाज नाही. फक्त पैसा कमवायचा आणि गुंतवायचा एवढंच या होमो इकॉनॉमिकसना समजतं.
इवान इलिच म्हणतो तसं स्वतःचं घर स्वतः बांधण्यातला आनंद जाऊन निव्वळ एक इन्स्टिट्यूशनल गरज उरली आहे फ्लॅट घेण्याची.
5 Jan 2015 - 5:02 pm | पिंपातला उंदीर
वाक्य थोड भंपक वाटू शकत पण भाड्याच्या २ BHK flat पेक्षा स्वतहाच्या १ HK मध्ये भारी झोप लागते . तस्मात स्वतःचे छप्पर असणे अत्यावश्यक आहे .
5 Jan 2015 - 5:08 pm | असंका
मग नक्की काय? थोडा भंपकपणा अत्यावश्यक आहे असं म्हणायचंय का?
5 Jan 2015 - 5:12 pm | पिंपातला उंदीर
नाय ओ. राहु दे
5 Jan 2015 - 5:12 pm | गवि
झकास अन निखळ हलकाफुलका लेख.
बादवे पुणे जवळ येताच हायवेवर जे प्रचन्ड आकाराचे फलक दिसतात ते पाहून पुण्यात घरे सोडून अन्य काहीही जाहिरातयोग्य अथवा विक्रीयोग्य वस्तू पिकत नाही अशी समजूत होते.
बाकी ग्रीक लॅटिन नावे आणि स्टाईलिश टॅगलाईन्सचा उल्लेख एकदम चपखल.
लैच हुळहुळीत वर्णन असतं.. अन मॉडेल्स सारी विदेशी निळ्या डोळ्यांची कुटुंबे..
5 Jan 2015 - 6:35 pm | कपिलमुनी
या इमारतीमधली लोक्स रोजचे कपडे आणि चादरी कुठे वाळत घालतात *biggrin* असा प्रश्न पडतो ..
बाकी वडाची वाडी मध्ये घर घेतला पेक्षा आम्ही banyan tree county असा सांगण्यात आंग्लालळेल्या लोकांना अभिमान वाटतो.
7 Jul 2015 - 11:02 am | लई भारी
कस्पटे वस्ती ==> कास्प कौंटी (Kaasp County)
7 Jan 2015 - 3:24 pm | चिनार
धन्यवाद !!!
5 Jan 2015 - 5:17 pm | पैसा
एकदम मेट्रो शहरात घर घेण्यापेक्षा मध्यम शहरात, किंवा तुमचं जे मूळ गाव असेल तिथे घर विकत घ्यायला काय हरकत आहे? तिथल्या किंमती वाढत असतातच. बरे नोकरी करणारे लोक नोकरीबरोबर अनेकदा शहरे बदलत असतात. त्यांनी काय प्रत्येक वेळी घरे विकत घेत रहायचे का?
मला जेवढे परवडत होते तेवढ्या पैशात मी आता रहातेय तिथे फ्लॅट विकत घेतला. काही वर्षांनी त्या फ्लॅटची किंमत बर्यापैकी वाढली आहे. मात्र तो मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि मुलांनाही त्या घराबद्दल अटॅचमेंट वाटते. त्यामुळे विकायचा नाही असे ठरले. मात्र गेल्या काही वर्षात सिंगल बेडरूमची ती जागा फारच अपुरी वाटायला लागली. मग फ्लॅट विकून दुसरा मोठा विकत घेण्यापेक्षा आम्ही स्वतःचा फ्लॅट भाड्याने दिला आणि थोडेसेच पैसे जास्त भाडे देऊन मोठी जागा भाड्याने घेतली.
नगरीनिरंजनची मते मला बर्याच बाबतीत बरेचदा पटतात. तेच घराच्या बाबतीतही. बंगले बांधणार्या बर्याच लोकांना उतारवयात मुले जवळ रहात नाहीत आणि बंगला विकून टाकता येत नही म्हणून हताश झालेले पाहिले आहे. किंवा मग ते मुलांना काहीही करून जवळ रहायला भाग तरी पाडतात. तेही चूकच. माझ्या मते आपला पसारा आपल्याला आवरता येईल एवढाच वाढवावा.
5 Jan 2015 - 5:31 pm | गवि
अगो.. आपण शेवटी कोंकणातच देह सोडणार.. तेव्हा मध्यम शहरात बघू म्हणून रत्नान्ग्री मालवणास पाह्यले तर साडेतीन सहस्र रुपडे झालेत गो तिथेही एका चौरस फुटास..
तुझ्या गोंयमधी आहे का एखादी गुंठाभर जागा ? संध्याकाळी आंचमन करुन समुद्राकडे बघत बसावे निवांत रिटायरमेंटनंतर..:)
5 Jan 2015 - 5:33 pm | पैसा
मग अजून पुढे जायचं. राजापूर नायतर वेंगुर्ला! आणि रत्नांग्रीतही आता साडेतीनहजार नाय ओ. त्याच्या बरेच पुढे पोचलेत दर!
गोंयाचे तर नाव काढू नका. फोंड्यातसुद्धा घरासाठी जागा शिल्लक नाहीत. फ्लेटच मिळतील. दर्याकिनारी सगळ्या जागा राजकारणी आणि नट लोकांनी घेऊन टाकल्यात!
5 Jan 2015 - 5:27 pm | विटेकर
आपला पसारा आपल्याला आवरता येईल एवढाच वाढवावा.
हे आयुष्यातील सर्वच बाजूना सदासर्वदा लागू आहे. स्वाक्षरीची पद्धत बंद झाली म्हणून नाहीतर हे वाक्य स्वाक्षरीसाठी क्लेम केले असते.
पै ताई ,
पण बर्याच वेळा पीयर/ नेबर/स्पाउस प्रेशर ही भयंकर असते. त्याला तोंड देणे फार अवघड असते. तिथे एकदम ऑट ऑफ क्राउड व्हायला वाघाचेच काळीज पाहीजे. आणखी एक म्हणजे नोकरीतील प्रचंड अनिश्चितता आणि ती वाढत्या वयाबरोबर वाढतच असते ! दैवयोगाने बाका प्रसंग आलाच तर उपयोगी पडावे म्हणून लोक घरे घेऊन आश्वस्त होण्याचा खुळा प्रयत्न करतात.
- गरज नसताना तळेगांवात घर घेतलेला विटेकर
5 Jan 2015 - 6:37 pm | कपिलमुनी
तळेगावमध्ये आलात का रहायला?
चला , एक फर्मास मिसळ खाउ विकांताला !
5 Jan 2015 - 5:37 pm | अनुप ढेरे
स्वतःचं एक घर असताना गुंतवणूक म्हणून दुसरं घर घेणार्यांना हाणलं पाहिजे. असल्या लोकांमुळे किमती वाढतात.
5 Jan 2015 - 5:48 pm | विटेकर
हाणा ...
हेल्मेट घालायला परवानगी आहे का?
7 Jan 2015 - 2:50 pm | मराठी_माणूस
स्वतःचं एक घर असताना गुंतवणूक म्हणून दुसरं घर घेण्यामुळे किमती वाढतात. ह्या प्रोसेस मध्ये एका सामन्य माणसा कडुन दुसरा सामान्य माणुस अप्रत्यक्ष्रित्या नाडला जातो आणि बिल्डरचा मात्र अतोनात फायदा होतो.
8 Jan 2015 - 8:58 pm | सुबोध खरे
@ अनुप ढेरे
ढेरे साहेब मग या नात्याने ज्याच्याकडे चार प्यान्टी असतील आणि तो पाचवी घेत असेल तर त्याला पण हाणायला पाहिजे कारण त्याने घेतल्यामुळे प्यान्टीचे दर वाढतात ना (किंवा चाळीस पन्नास साड्या असताना सुद्धा दर दिवाळी पाड्व्या संक्रांतीला साड्या घेणाऱ्या बायकांना पण काही तरी शिक्षा द्यायला लागेल.)
अर्थ शास्त्र इतके साधे सोपे नाही हो.
घरांच्या किमती वाढण्याचे कारण इतके सोपे असते तर त्या कमी करणे पण तितके सोपे झाले असते शिवाय सरकारने बांधकाम क्षेत्राला देणाऱ्या सोयी सवलती दिल्या नसत्या. घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोखंड सिमेंट इ लागते त्यामुळे त्या उद्योगांना चालना मिळते. मुळात बांधकाम उद्योगात फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत ते नष्ट झाले तर सरकारची पाचावर धारण बसेल.
घरांच्या किमती वाढण्याची काही कारणे -- मोठ्या प्रमाणावर राजकारण्यांचा, सिनेसृष्टी आणि गुंड मवाल्यांचा गुंतलेला काळा पैसा, घर बांधण्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांसाठी सरकार दरबारी खाबू लोकांना भरावा लागणारा पैसा, आणि वाढणारी महागाई (मुंबईत बिगार्याला ५०० रुपये रोज द्यावा लागतो.) यात सिमेंट वाळू लोखंड याला लागणारा वाहतूक खर्च हमाली पासून सर्व येते.
शिवाय प्रत्येक बिल्डर हा हरामखोर आहे अशी सरकार दरबारी असणारी धारणा. त्यामुळे एखादा प्रामाणिक व्यवसाय करणार्यालासुद्धा सहज धंदा करणे शक्य नाही.
वि. सु.-- माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकात सुद्धा कोणी बिल्डर नाही.
8 Jan 2015 - 9:34 pm | नगरीनिरंजन
खरे साहेब, तुमचे मत पटले नाही. घरांसाठी मागणी प्रचंड आहे पण घर घेणे लोकांना परवडत नाहीय, याचे कारण बहुतांश घरे वरचा ग्राहक वर्ग डोळ्यासमोर ठेवून बांधली जातात. २-३बीएचके विथ डबल पार्किंग, टेरेस, गार्डन, पूल अशा स्कीम्स काढून महाग किंमतीला विकण्यासाठी बिल्डर लोकांना पुरेपूर इकॉनॉमिक इन्सेन्टीव्ह आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी कमी पैशात घरे बांधण्याची गरज कोणाला वाटते? वरच्या वर्गातले लोक जोवर गुंतवणूक म्हणून घरं घेताहेत तोवर बिल्डरांना काय पडलंय?
घर घेण्याची इच्छा असलेले इतके लोक आहेत की इंडस्ट्री बंद पडणे वा रोजगार कमी होणे शक्य नाही. सरकार मात्र कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी म्हणावे तसे उपाय करत नाहीय.
हाय एन्ड फ्लॅट्सवर भरपूर टॅक्स लावणे आणि छोटे फ्लॅट्स बांधणार्या बिल्डरांना सवलती देणे अशा गोष्टी करु शकते. पण अशा लोकांची लॉबी नसते ना!
मुळात या व्यवसायात इतका काळा पैसा आहे की तो स्वच्छ करण्यातच बराच वेळ जाईल आणि आणखी काळा पैसा येतोच आहे. भ्रष्ट असलेल्या साध्या पोलिस कॉन्स्टेबलचे तीन-चार फ्लॅट्स असतात. बेहिशेबी पैशातून कोणी असे फ्लॅट्स सहज घेऊ शकतो हे आपल्या सरकारचे आणि पर्यायाने एलिट लोकांचे अपयश आहे पण सगळेच स्वतःचं घर भरण्यात मग्न असल्याने "मार्केट आणि इकॉनॉमिच्या" नावाखाली सगळं खपवता येतं.
8 Jan 2015 - 9:45 pm | नगरीनिरंजन
आणि मुंबई-पुण्यात गुंडमवाल्यांचा पैसा गुंतला आहे हे समजू शकतो, पण नगरसारख्या ठिकाणी ३-४००० रुपये चौ.फु.ने फ्लॅट्स आणि २००० रु. चौ.फु. ने प्लॉट्स विकले जाण्याचे काय कारण?
हाती पैसा असलेले लोक अक्षरशः नुसती घेण्या-विकण्याची उलाढाल करत असतात आणि भाव वाढवून ठेवतात.
8 Jan 2015 - 10:04 pm | अनुप ढेरे
कोणी पँट स्वतः न वापरता गुंतवणूक म्हणून घेत असेल असं वाटत नाही. अर्थात माझी माहिती तोकडी असू शकेल. कोणी कोणी घेतही असतील २-४ जीन्स गुंतवणूक म्हणून.
9 Jan 2015 - 10:26 am | सुबोध खरे
न नि साहेब
बांधकामाचा खर्च चौरस फुटाला १५०० रुपये आहे आणि तोच जर उंच इमारत असेल तर २००० रुपये आहे( उद्वाहन आणि त्याच्या सांगाड्या सकट) शिवाय भूखंड जर घ्यायचा असेल तर त्या जमिनीला पंधरा वारस असतात. प्रत्येकाची दाढी धरून त्याची सही मिळवायची हे काम करायचे त्यातून आजकाल भूपुत्र माजलेले आहेत त्यांना वडिलोपार्जित जमीन मिळालेली आहे तेंव्हा तोंडाला येईल ती किंमत ते मागतात.या सर्व गोष्टीनंतर सरकारी लांडगे बसलेले आहेतच. हे सर्व केल्यावर बांधकाम व्यावसायिक काही हरिश्चंद्राचा अवतार नाही त्याला २० टक्के तरी नफा होणार नसेल तर तो कशाला यात हात घालेल?
यास्तव नगर सारख्या ठिकाणी जागेचे भाव ३००० पर्यंत झालेले आहेत. मी टिटवाळ्यासारख्या दूरच्या गावात जागेचा भाव विचारला तर ३५०० रुपये सांगितला. मी हादरलोच. दुसरे घर एक शयन्गृहासाहित मुंबईपासून ६५ किमी वर २७ लाख रुपये अधिक मुद्रांकशुल्क आणि पंजीकरण शुल्क म्हणजे ३० लाख रुपये. तेवढे पैसे असते तर तेच पैसे बँकेत ठेवून व्याजावर जगत येईल का याचा हिशेब करतो आहे.
एक मूळ कारण स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा आपली लोक संख्या ४० कोटी होती( पाकिस्तान आणि बांगला देश धरून) आणि आता ते देश वजा जाता १२५ कोटी आहे म्हणजे तेवढ्याच जमिनीवर चौपट माणसे. कोण जबाबदार आहे. आपणच.
9 Jan 2015 - 10:31 am | सुबोध खरे
जाता जाता
मुंबईच्या सर्व उपनगरात एक बेड रूमचे भरपूर फ्लेट्स आहेत. ( लहान घरे कोणी बांधत का नाहीत याचे उत्तर). मुलुंड मध्ये एक बेडरूमच्या घराची किंमत(४०० चौरस फुट) ६० लाखाच्या आसपास आहे.
याहून लहान घरे सुद्धा आहेत ३०० चौरस फुट (४५ लाखाला) पण ती कोणी घेतनाही कारण लोक त्याच पैश्यात दिवा डोंबिवलीकडे किंवा घोडबंदर रोड ठाणे येथे ४५०/५०० चौरस फुटाचे घर घेणे पसंत करतात.
9 Jan 2015 - 11:07 am | गवि
यात (बांधकाम व्यवसाय) मुख्यत: लेबर आणि अन्य कॅश व्यवहार असल्याने बराच बेहिशेबी पैसा त्यात ओतलेला असतो आणि त्यामुळेच बाजाराचा मागणी-पुरवठा आधारित किमतीचा नियम न पाळणारा हा एकच व्यवसाय आहे.
कारण गि-हाईक आले नाही तरी बराच काळ घरे / फ्लॅट्स पडीक ठेवू शकण्याची होल्डिंग कपॅसिटी या पैशामुळे आलेली आहे. शिवाय तो पेरिशेबल माल नाही. भाड्यानेही देता येतोच.
5 Jan 2015 - 5:38 pm | कंजूस
विटेकर आणि पैसा ++
घरघर खरी आहे आणि या धाग्यावर काही वात्रट बोलेल तो रौरव नरकात -- अत्यंत गंभीर विषय आहे.
7 Jan 2015 - 2:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
या धाग्यावर काही वात्रट बोलेल तो रौरव नरकात
हैला, हे संमंच्या वैधानिक इशार्यात टाकण्याइतके वजनी वाक्य आहे. इतकी सोपी आयड्या अगोदर कशी कुणाला सुचली नाय ???7 Jan 2015 - 9:20 pm | अजया
तीव्र सहमती
=))
9 Jan 2015 - 1:49 pm | घाटावरचे भट
किंवा गद्धेगाळावर कोरलेले ते नेहेमीचे वाक्य.... या धाग्यावर काही वात्रट बोलेल त्याच्या.... वगैरे वगैरे वगैरे
5 Jan 2015 - 9:29 pm | पिंपातला उंदीर
२ वर्षांपूर्वी मी पुण्यातल्या एका मोठ्या बांधकाम व्यवसायिक सोबत काम केल होत . त्यानिमित्ताने तिथल्या मार्केटिंग हेड शी बोलण्याचा योग आला . सध्या पुण्यात मोठ्या प्रमाणावर flat खरेदी कोण करत असेल ? त्यांनी सांगितलेलं observation खूप धक्कादायक होत . पुण्यात investment म्हणून flat घेणार्यांमध्ये आघाडीवर आहेत बीड , उस्मानाबाद , नांदेड, सोलापूर अशा छोट्या शहरांमधले वकील - डॉक्टर असे खोऱ्याने पैसे कमावणारे व्यवसायिक तसेच पाचवा वेतन आयोग च्या हिशोबाने पगार घेणारे प्राध्यापक आणि मलैदार पदांवर काम करणारे याच छोट्या शहरांमधले सरकारी नौकारदार . पुण्यात स्थायिक असणारी मंडळी कडून सध्या flats ची फारशी मागणी नाहीच . ते लोक investment म्हणून flat घेतात . उद्या मुल शिक्षणासाठी पुण्यात आली तर हा flat कामाला येईल असा हिशोब असतो . तसेच तिथल्या डॉक्टर -वकील , राजकारणी , सरकारी नौकर लोकांकडे अवैध संपत्ती मुबलक असते . त्याचा उपयोग पण flat घेताना होतो . म्हणून पुण्यात flat ची मागणी कमी होत नाही . आता तर पुण्यातल्या सर्व आघाडीच्या real estate कंपन्या या छोट्या शहरांमध्ये आणि semi urban भागात मोठ मोठी जाहिरात मोहिमा राबवत आहेत . त्यांच्या media budget चा एक मोठा हिस्सा या भागातल्या campaign साठी राखून ठेवलेला असतो .
7 Jan 2015 - 1:28 pm | काळा पहाड
मलाही असंच वाटत होतं. ते आता कन्फर्म झालं. हीच घाण आता इथे येवून इथल्या लोकांचे शेजारी बनणार आहेत. सरकारी नोकर असलेला माणूस मरत असला तरी त्याला पाणी देवू नये असं पर्सनल मत आहे.
7 Jan 2015 - 1:29 pm | सुबोध खरे
दुसर्या घराबद्दल मी बोलत नाही
परंतु आपले राहते घर स्वतःच्या मालकीचे असावे याचे कारण डोक्यावरचे छप्पर स्वतःचे असणे हे एक फार मोठी मानसिक गरज आहे आणि मी वयाच्या ४० व्या वर्षी स्वतःचे घर घेतले तेंव्हा मिळणारी मानसिक शांती याची किंमत पैश्यात होणार नाही. त्या अगोदर लष्करी नोकरीत असताना पुण्यासारख्या शहरात ३५ हजार चौरस फुट जमिनीवर असलेला ५५०० चौरस फुटाचा बंगला सुद्धा तेवढे समाधान देऊ शकत नाही हा अनुभव घेतला आहे. गोव्यात असताना १७०० चौरस फुटाचा फ्लाट पुढे मागे अंगण इ चा चार वर्षे उपभोग घेतला पण ज्या दिवशी खाली करावे लागते तेंव्हा इदं न मम म्हणावेच लागते. गेली १० वर्षे मी आजच्या राहत्या घरात आहे पण इथून फुटा असे कोणी म्हणू शकत नाही.
शेवटी मानसिक गरजेची किंमत काय हे कसे ठरवणार?
आपण आपल्या बायकोला भाड्याचे दागिने घेण्याची कल्पना सुचवून पहा. उगाच सोन्यात घालवलेला पैसा आणि लोंकरची धन म्हणून पहा दुपारी थंडा फराळ करावा लागतो कि नाही ते. अहो नुसते बेन्टेक्सचे दागिने म्हणून पहा किंवा साड्यांची लायब्ररी.
7 Jan 2015 - 1:40 pm | प्रसाद१९७१
खरे साहेब - तुमचे म्हणणे बरोबर आहे पण तुम्ही १०-१२ वर्षापूर्वी घेतलेत घर. पण गेल्या ७-८ वर्षात प्रचंड फरक पडला आहे. २००५ च्या आधी, इंजिनियरींग केल्यावर जर बरी जरी नोकरी मिळाली तरी पुण्यात १BHK फ्लॅट घेण्याची ऐपत ३ वर्षाच्या नोकरी वर येत होती. आता १० वर्ष नोकरी करुन सुद्धा येणे अवघड आहे.
7 Jan 2015 - 3:23 pm | चिनार
खरे साहेब - तुमचे म्हणणे बरोबर आहे पण तुम्ही १०-१२ वर्षापूर्वी घेतलेत घर. पण गेल्या ७-८ वर्षात प्रचंड फरक पडला आहे. २००५ च्या आधी, इंजिनियरींग केल्यावर जर बरी जरी नोकरी मिळाली तरी पुण्यात १BHK फ्लॅट घेण्याची ऐपत ३ वर्षाच्या नोकरी वर येत होती. आता १० वर्ष नोकरी करुन सुद्धा येणे अवघड आहे.
१००% मान्य
7 Jan 2015 - 2:00 pm | मनिमौ
डाउन पेमेन्ट ची रक्कम कुठुन आणावी या चिन्तेन्त आहे.७-८ लाख जमा करणे अवघड आहे.
7 Jan 2015 - 2:53 pm | कपिलमुनी
१. (सर्व) सोने विका
२. खासगी बँकेमधून ( सहकारी ) ल्लोन घ्या . बाकी बँकेमधून घेतले तर होम लोन कमी मिळेल.
३. मित्रांकडे / नातेवाईकांकडे मागा
7 Jan 2015 - 3:26 pm | पिलीयन रायडर
आमच्या कामवाल्या मावशींना त्यांचे मेव्हणेच (जे बिल्डर आहेत) धनकवडीमध्ये घर देणारेत.. लाखभर तरी रुपये द्यावे लागतील आधी , मग पतपेढी का कसलेसे कर्ज (मेव्हणेच) मिळवुन देणारेत.. मॅडमनी आधी कुठल्या तरी भिशीत फुकट पैसे गुंतवले होते, त्या आधी pulse नावाची पॉलीसी घेऊन २० हजार तिथे अडकवलेत.. आता १० वेळा सावध केलय पण बहीणीचा नवरा फसवणार नाही अशी त्यांना खात्री आहे..
तर.. एक लाख जमवायला आमच्याकडे ५ हजार मागितले.. दिले.. (समोर आयटी मध्ये खोर्यानी ओढणारे, पुण्यात २-२ घरं असणारे जोडपे रहाते, त्यांना मागितले तर पोस्ट डेटेड चेक द्या म्हणाले..!!)... दागिने विकावेत तर ते ही नाहीत.. एका पत्र्याच्या खोलीत रहातात, गावकडचे जमीन आणी घर भाऊबंदकीत अडकले आहे.. असे कसे त्यांचे १ लाख जमा होणार ह्याचीच काळजी वाटते मला.. (काही माहिती असेल कुणाला तर सांगा ह्या निमीत्ताने..)
7 Jan 2015 - 3:29 pm | प्रसाद१९७१
तुमच्या कामवाली ला सांगा की "बिल्डर मेव्हण्याला नोकरी द्यायला सांगा. तिला आणि तिच्या नवर्याला"
जवळ जवळ नक्की फसवणार मेव्हणा त्या मावशिंचा.
7 Jan 2015 - 3:48 pm | पिलीयन रायडर
मावशी स्वतः पोळ्या, धुणी भांडी वगैरे करुन कमावतात हो.. आणि नवरा इस अॅज युजवल टु प्राऊड टु आस्क!
पण गरीबांना घर घेण्याची काही सोय नाही का मायबाप सरकारकडे?
7 Jan 2015 - 3:38 pm | सस्नेह
आणि वास्तववादी लेख.
सर्व सोने, सर्व शिल्लक इ. घालून गावाकडे एक प्लॉट घेतलाय. आता डाऊनपेमेंट ला काही शिल्लक नसल्याने बांधकामासाठी सेव्हिंग सुरु आहे !
7 Jan 2015 - 6:07 pm | कपिलमुनी
पाहिलेल्या सर्व साईटच्या बाजूने ८० फूट प्रोपोजड रोड्स , बीआर्टी , ईई जाणार असता .
ह्या प्रोपोजड प्लानची माहिती कूठे मिळते ?