कवितेचे रसग्रहण..... एक आनंदोत्सव

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
7 Dec 2014 - 4:55 pm

कवितेचे रसग्रहण.. एक आनंदोत्सव

संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे
अपूर्व:कोsपि कोषोsयं विद्यते तव भारती !
व्ययतो वृद्धीमायाति क्षयमायाति संचयात् !
विद्या वाटल्याने वाढते व स्वत:पाशीच साठवून ठेवली तर कमी होते. पण विद्याच कां ? आनंदाचेही तसेच आहे. एखादी कविता वाचल्यावर मला जर आनंद झाला तर मला वाटते हा आनंद माझ्या मित्रांनाही मिळाला पाहिजे. कवितेतून मला आनंद कसा मिळाला ते सांगावयास कविता व तिचे रसग्रहण.

मिपावर कविता-रसग्रहणाला चांगले दिवस येत आहेत असे दिसते. श्री.आदित यांनी पहिल्यांदीच लिहून चांगली सुरवात केली. असेच आणखी लेखक मिळाले तर हे दालन समृद्ध होईल. याचा फायदा असा की निरनिराळ्या रसिकांच्या वेगवेगळ्या काळातील आवडीच्या कविता आपणासमोर येतील. दोघा-चौघांनी लिहण्यापेक्षा दहांनी लिहणे चांगलेच कीं. प्रत्येकाची कवितेकडे बघावयाची दृष्टी अलगअलग असणार आपल्या सगळ्यांचा आनंद वाढेल. मी "भावकविता" वा "संत-कविता" यांवर लिहतो कारण तो माझा आवडीचा विषय आहे. पण कोणी "औदंबर" वर लिहले तर मी त्याचाही आनंद लुटेन. आतापर्यंत कोणी गेल्या दहा वर्षांतील सिनेसंगीतावर (हिंदी/मराठी) लिहलेले नाही, सुरू होऊ द्या. श्री. आदित यांच्या लेखावरून सुचलेले या विषयावरील माझे विचार देत आहे. संपूर्णत: वैयक्तिक. असेच पाहिजे कां ? अजिबात नाही. पण एक दिशा म्हणून विचार करावयास हरकत नाही. मी शक्यतो कारणेही देतो.

(१) कविता संपूर्ण द्या. तुमची आवडती कविता तुम्हाला पाठही असेल. पण सगळ्यांना माहीत असेलच असे नाही. कित्येकदा अचूक शब्द माहीत नसतात. तुमचे रसग्रहण तुकड्या तुकड्यांनी होणार असले तरी एकसंघ कविता समोर असणे जरुरीचे आहे. कवीचे नाव, कवितेखाली पाहिजे. शक्य असेल तर कवितासंग्रहाचे नाव व प्रसिद्धीचे वर्ष द्या. कविता लिहली तेव्हाचा काळ त्यामुळे लक्षात येतो.
संपूर्ण कविता देण्याचा एक फायदा म्हणजे बर्‍याच वेळी जेव्हा कवितेचे "गाणे" होते तेव्हा संगीतकार कडवी गाळून टाकतो. आणि हे मोडके गाणे म्हणजेच कविता असा श्रोत्यांचा गैरसमज होतो. .एकसंध कविता हवीच.
कविता उर्दूत असेल वा जुन्या काळातील असेल तर कठीण, अप्रचलित शब्दांचे अर्थ लगेच द्या. याने काय होते वाचकाला कवितेचा ढोबळ अर्थ कळावयास मदत होते. तो स्वत: मनात रसग्रहण करावयास, त्यातले सौंदर्य शोधावयास लागतो. तुमचे पुढचे लेखन वाचावयास लागल्यावर तो म्हणतो, "अरेच्चा, हे आपल्या लक्षात आलेच नव्हते कीं " किंवा " अरे, माझे विचार जास्त चांगले आहेत." बिघडत नाही, तो कवितेत गुंततो आहे, त्याचा आनंद वाढत आहे, आणि या करिता तर तुम्ही लिहण्याचे कष्ट घेतले आहेत. कवितेचे "गाणे" झाले असेल तर शब्द, अर्थ कळल्याने तो संगिताचाही आस्वाद जाणीवपूर्वक घेईल.
.
(२) एक प्रास्ताविक अवष्य द्यावे. जर वाचकाने कविता आपलिशी करावी असे तुम्हाला वाटत असेल तर प्रथम ती तुम्हाला का आपलिशी करावी वाटली ते सांगा. श्री..आदित यांना " चाफा बोलेना " कवितेवर लिहावेसे वाटले कारण त्यांना चाफा व कवीची प्रतिभा यातील एकरूपता ध्यानात आली व कवीने स्वत: व प्रतिभा यांच्यातील नाते कसे सुरेख रीतीने या रूपक कवितेत गुंफले आहे हे पाहिल्यावर त्यांना जो आनंद मिळाला तो तुम्हा आम्हाला, सगळ्यांना मिळावा म्हणून.. "रसग्रहण" रसग्रहण व्ययतो वृद्धीमायत" या न्यायाने रस वाटून आनंद वाढवण्याकरिता असते.

(3) रसग्रहणाची भाषा सोपी हवीच. तुमची विद्वत्ता दाखविण्याची ही जागा नव्हे. तुमच्या विद्वत्तेपेक्षा रसिकता महत्वाची. तुमची भुमिका कवीची विदग्धता व वाचकाची रसिकता यांची गाठ घालून देणार्‍या मध्यस्थाची आहे. रसग्रहण म्हणजे दोन मित्रांमधील गुजगोष्ट आहे. वक्तृत्वसभेतील भाषण नव्हे.

(४) तुम्ही रसग्रहण कसे लिहावेत या बद्दल मला काहीच सांगावयाचे नाही. सर्वथ: वैयक्तिक गोष्ट. कविता कां आवडली, तीमधील कोणत्या सौंदर्यस्थळांनी तुम्हाला भुरळ पडली, कवीचे भाषाप्रभुत्व, शैली, लालित्य, जे जे कांही तुम्हाला भावले ते तुमच्या भाषेत मांडा. कवितेचा तुम्हाला लागलेला अर्थ तुम्हाला सांगवयाचा आहे. श्री आदित यांना चाफा बोलेना ही कविता कवी-प्रतिभा यांच्यातील गुंतागुंतीचे नाते सांगणारी वाटली; श्री. संजय यांना ती प्रेमकविता वाटली; मी ती भक्त-ईश्वर यांच्या मधील दीर्घ प्रवासाचे वर्णन करते असे म्हणेन व त्या दृष्टीने उलगडवून दाखवीन. श्रेष्ठ कविता अशी अर्थाची निरनिराळी वलये निर्माण करते. तुम्ही तुम्हाला भावलेले सांगून मोकळे व्हा.

(५) कोणतीहि कविता (सहसा) संपूर्णत: "नवीन" नसते. तिच्या जवळची कविता असतेच. तुमच्या वाचनात जर अशी एखादी असेल व जर तुम्हाला उचित वाटले तर अवष्य नोंद करा. काय साम्य आढळले ते नमुद करावयास विसरू नका."चाफा बोलेना "चे रसग्रहण वाचल्यावर श्री बोका-ए-आझम यांनी "समिधाच सख्या या" आणि "गेले द्यायचे राहूनि" या कविता आठवल्या. एके वेळी कुसुमाग्रज व आरती प्रभू यांच्या कविता जाणीवपूर्वक वाचून, आठवणीत ठेवून, इथे दिल्या; मी तर खुश झालो. दोन भिन्न पठडीतील कवी पण रसिक वाचक त्यांना एकत्र आणतोच. आपणही असा प्रयत्न करा..

(६) एवढे सगळे द्यावयाचे म्हटले तर रसग्रहण बरेच लांबण्याचा धोका संभवतो. मिपावरील लेख फार लांबविण्यात गोडी नाही. गरज वाटली तर दुय्यम गोष्टींना कात्री लावा.

श्री. आदित यांच्या लेखावरून सुचलेले विचार सांगितले. जाता जाता; रसग्रहण फक्त कवितांचेच करावे असे नाही. कलादालनावर असे लेख कां येत नाहीत ?.

शरद

वाङ्मयमत

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Dec 2014 - 2:53 am | मुक्त विहारि

आवडला...

पण इथे फक्त छापीलच कविता चालतील की आंतरजालावरच्या कविता पण चालतील?

मुक्त विहारि's picture

8 Dec 2014 - 3:02 am | मुक्त विहारि

कवितेचे नांव आहे "भूतावळ" कवि : विं.दा.करंदीकर

किर्र रात्री सुन्न रात्री
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !
आली आली भुताबाई;
तीन माणसे रोज खाई

स्मशानामध्ये घालते फेरी
पहाटेपूर्वी करते न्हेरी
न्हेरीसाठी होतात चट्‍ट
दोन पोरे लठ्‍ठ मठ्‍ठ

पण प्रत्येक एकादशीस
रताळ्याचा खाते कीस.
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले ? कोण आले ?
दार आपोआप खोले !

आला आला महासमंध;
त्याची चाल संथ संथ
त्याची उंची दहा फूट
अंगावरती काळा सूट,

डोक्यावरती हँट बीट,
तुम्ही फसाल ! पहा नीट
वळवळणारे गळ्यात काय ?
नागोबाचा लंबा टाय !

किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी ;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?
दार आपोआप खोले !
आले आले थातूमातू ;
खाते सातू जर सातू

नसले घरात तर बसते
नखे खात. रोज रात्री
मांजरावरुन हे येते
जग फिरुन,
हे भूतआहे मुत्रे,
तरी त्याला भितात कुत्रे.

किर्र रानी सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्यांचे हस्तिदंती.
कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !

आले आले अरेतुरे ;
हे भूत काळेबेरे
मध्य रात्री रांगत येते;
दारावरती थाप देते.

जर त्याला घेतले घरात
जीभ काढते तेरा हात.
पण ’कारे’ म्हटले तर,
जाईल सोडून तुमचे घर.

किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी ;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !

आला आला आग्या वेताळ;
त्याच्या डोक्यात असतो जाळ.
कोळसे खातो कराकर;
राकेल पितो डबाभर.

डोक्यावरती कढई धरुन
भुते घेतात स्वैपाक करुन
केसामधून उठतात ज्वाळा,
सगळे न्हावी भितात त्याला.

किर्र रात्री सुन्न रानी;
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !
आला आला पिंपळावरुन
एक मुंजा संध्या करुन.

त्याची पोथी चालत येते;
हळूच त्याच्या हातात जाते.
रक्‍तासारखी पाने लाल,
खुणेसाठी असते पाल.

तीच पोथी ऐकण्यासाठी
भुते आली; झाली दाटी
पाल लागली चुकचुक करु,
पोथीवाचन झाले सुरु;

हेंगाड वेंगाड फेंगाड भेंगाड
फेंगाड भेंगाड हेंगाड वेंगाड’
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
सर्व आले सर्व आले
दार हसले बंद झाले !

ह्या साध्या आणि सोप्या कवितेचे काय रसग्रहण करणार?

कवितानागेश's picture

9 Dec 2014 - 12:41 pm | कवितानागेश

छानच लिहिलय.