आज ३ नोव्हेंबर, सायंकाळी ८ वाजता कॉम्पुटर चालू केला, सहज लक्ष गेल ब्लॉगला वाचक संख्या एक लक्षाच्या वर गेलेली होती. जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती, आपला ब्लॉग कुणी वाचेल याची कल्पना ही केली नव्हती.
चिरंजीवाना शिक्षणात मदत होईल या हेतूने कॉम्पुटर (लेपटाॅप) घरात आला. अर्थातच मला ही तो वापरायला मिळालाच. उत्सुकता म्हणून कुठे मराठी वाचायला मिळेल या उद्देश्याने अंतर्जालावर शोध घेऊ लागलो. सर्व प्रथम मराठी सृष्टी ही वेबसाईट दिसली. वेबसाईट वर मराठीत लिहा, आपल्यातील लेखकाला जागवा. असे आव्हान होते. रोज मराठी सृष्टी ही वेबसाईट उघडायचो आणि आपल्यातील दडलेल्या लेखकाला कसं जागे करावे याचा विचार करायचो. मनातील दडलेल्या लेखकाला जागवल तरी अनेक समस्या होत्या. पहिली समस्या होती, मराठी टंकन येत नव्हते. दुसरी समस्या मी मराठीत लिहू शकतो का, हा मोठा प्रश्न होता? स्वत:च्या मराठी बाबत म्हणाल तर दिल्लीत मराठी शाळेत ५ वी पर्यंत मराठी हा विषय होता. ही गोष्ट वेगळी मराठीच्या क्लास मध्ये आम्ही चक्क कंचे खेळायचो. कारण मराठीचे मार्क्स जोडल्या जात नव्हते. ११वी पर्यंत हिंदी हा विषय होता. नंतर तो ही सुटला. आंग्ल भाषेत शॉर्टहंड शिकून, सरकारी नौकरीत रुजू झालो. त्यानंतर मराठी तर सोडा कधी हिंदीत ही लिहिले नसेत किंवा टंकले नसेल. पुस्तके वाचण्याचा छंद होता, सरकारी वाचनालयात जाऊन भरपूर हिंदी /मराठी पुस्तके वाचत असे, एवढाच काय तो मराठीचा संबंध. सौ. ही दिल्लीचीच असल्यामुळे घरी कुणालाही मराठी वाचण्याची, लिहिण्याची आवड नव्हती. (आता मराठी मालिकांमुळे मुलांना थोडी तरी मराठी समजू लागली आहे). तिसरी समस्या वय ५०सीच्या जवळ झाले होते आणि डोळ्यांना चष्मा ही लागलेला होता. तरी ही आपल्या मायबोलीत मराठीतच लिहिण्याच्या निश्चय केला. जिथे मराठी धड बोलता येत नाही तिथे मराठीत लिहायचा निश्चय करणे म्हणजे एखाद्या पर्वतावर चढण्या सारखे कार्य.
पहिली समस्या चिरंजीवानी दूर केली, आंग्ल भाषेत टंकून करून ही आपण मराठीत लिहू शकतो, हे कळले. मराठीत लिहिण्याचा प्रयत्न सुरु केला. काही कविता मराठी सृष्टी कडे पाठविल्या, त्या सहजपणे तिथे प्रकाशित झाल्या. उत्साह वाढला. आपल्या तुटक्या-फुटक्या मराठीला सुद्धा अंतर्जालावर वाव आहे हे कळले.
एकदा आमच्या चिरंजीवाने बाबा तुम्ही स्वत:चा ब्लॉग लिहा, हा सल्ला दिला. कॉम्पुटर बसून ब्लॉग ही बनवून दिला, त्या वेळी ब्लॉगचे काय नाव द्यायचे हे सुचले नाही म्हणून स्वतचेच नाव ब्लॉगला दिले आणि लिहायला सुरुवात गेली. ब्लॉग वर पहिली कविता कवितेचा कीड़ा/ डोक्यात शिरल्यावर काय होते ते ( लिहिली. पण उत्साह काही दिवसांतच मावळला. कारण ब्लॉग कुणीच वाचत नव्हते.
कुणी तरी सांगितले चांगले लिहिण्यासाठी, चांगले वाचणे गरजेचे, नियमित पणे ब्लॉग वाचणे सुरु केले, ब्लॉग्स वाचत असताना, अनेक मराठी संकेत स्थळांबाबत माहित मिळाली. आपला ब्लॉग ही 'मराठी ब्लॉगर्स', मराठी ब्लॉग विश्व' आणि 'मराठी कॉर्नर' या संकेत स्थळांशी दोन तीन वर्षांच्या कालखंडात जोडला. अनेक मराठी वेबसाईट 'मिसळपाव, ऐसी अक्षरे' यांची माहिती मिळाली. तिथे हात आजमावला. हळू हळू कळू लागले, आपली मराठी धड नाही, लिहिताना अनेक चुका होतात. तरी ही चुका सुधारत-सुधारत लिहिणे सुरु ठेवण्याचा निश्चय केला.
पहिले वाटत होते, विचार केला कि डोक्यात कल्पना सहज येतात, पण हे काही खरे नव्हे. डोक्यात आलेले विचार टंकणे ही काही सहज कार्य नाही, हे ही जाणले. त्या मुळे कधी कधी महिन्याभरात ही एखाद कविता किंवा क्षणिका लिहिणे कसे बसे जमत असे. शेवटी निश्चय केला 'स्वत: अनुभवलेले, दिसलेले आणि समजलेले समाजातले सत्य लोकांसमोर मांडावे'. त्या दृष्टीने विचार सुरु केला. एकदा सुट्टीच्या दिवशी सकाळी फिरायला जनकपुरीच्या डीस्ट्रीक्ट पार्क मध्ये जात होतो. तिथे काही म्हातारे दिवसभर रमी खेळायचे त्यांना पाहून मला सारखे वाटायचे, यांच्या जीवनात आता काही राहिलेले नाही, फक्त मृत्यूची वाट पाहत हे जिवंत राहण्याचे नाटक करीत आहेत. (वाट मृत्युची). ययाति कादंबरी वाचताना जाणीव झाली कि आपण ही आज ययाति सारखेच वागतो आहे, आपली भोगलिप्सा वाढतच चालली आहे, आपण सृष्टीतल्या सर्व जीवांना संपवतो आहे, असे सुरु राहिले तर माणूस एक दिवस स्वत:ला ही संपवणार आणि यातून ययाति-- ययातिच्या मनातिल द्वंद्व या कवितेचा जन्म झाला. काही वर्षांपूर्वी बाणभट्टची 'कादंबरी' वाचली होती. तरीही प्रेम म्हणजे काय, हे समजले नाही. असेच एकदा एका आजीला हा प्रश्न विचारला (हिम्मत करून) आणि प्रेम म्हणजे काय? हा लेख खरडला. एक विचित्र अनुभव वाट्याला आला. हा लेख आधी मराठी सृष्टी वर प्रकशित केला होता. नंतर काही महिन्यांनी ब्लॉग वर टाकला. काही काळानंतर ऐसी अक्षरे वर टाकला. त्या साईट वर मिळालेल्या प्रतिसाद वाचताना कळले, काहींनी हा लेख चक्क चोरून आपल्या नावानी ब्लॉग वर टाकला. ब्लॉग वर ही साहित्य चोरी होते आणि प्रामाणिक मराठी माणूस ही अश्या प्रकारची चोरी करतो, हे ही कळले. (अर्थातच त्यांचे ईमेल शोधून त्यांना जाब विचारला व त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरी ही साईट वर प्रतिसादात दिली, तेंव्हा कुठे मनाला चैन मिळाले ). पण एक मात्र खरं, पहिल्यांदा वाटले आपण काही तरी निश्चित चांगले लिहित आहोत. ही घटना उत्साह वाढविणारी नक्की होती. दिल्लीत राहत असल्यामुळे किंवा सत्तेच्या केंद्रस्थानी कार्यरत असल्यामुळे राजनीती वर ही काही वात्रटिका, क्षणिका आणि रूपक लिहिले. सचिवालयात लागलेल्या आगीच्या आधारावर हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद हा लेख लिहला. एकदा सकाळी बगीच्यात एका बेंच वर बसलो होतो आणि सूर्याचे कोवळे सोनेरी किरणे अंगावर पडत होती, मस्त वाटत होते, ईशान उपनिषदातला श्लोक आठवला, मनातल्या मनात गुणगुणू लागलो: हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं...पण थोड्यावेळाने तीच सूर्य किरणे बोचू लागली. त्यातून या लेखाचा जन्म झाला -सुवर्ण आवरणात झाकलेल सत्य.
अश्या रीतीने लेखनाची गाडी सुरु झाली. तरी ही अनेक शंका होत्याच. आपला ब्लॉग लोक वाचतील का? आपल्या मोडक्या- तोडक्या मराठीला ही लोक स्वीकारतील का? पण ब्लॉग वाचकांनी माझ्या मराठीला सहजपणे स्वीकार केले त्या बाबत पुन्हा त्यांचे अभिनंदन करायला हवे तेवढे कमीच. या शिवाय माझ्यातील दडलेल्या लेखकाला जाग केल त्या मराठी सृष्टी या वेबसाईटचा ही मी ऋणी राहिलं. आपल्या अनुभव वरून आजच्या दिवशी मला एकच म्हणायचे आहे, प्रत्येक माणूस जो विचार करतो, तो लिहू शकतो. फक्त लिहिण्याची सुरुवात करायची गरज आहे.
प्रतिक्रिया
3 Nov 2014 - 10:19 pm | स्वप्नज
पन्नाशीतला उत्साह वाखाणण्याजोगा आहे. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.....
3 Nov 2014 - 10:20 pm | मुक्त विहारि
"प्रत्येक माणूस जो विचार करतो, तो लिहू शकतो. फक्त लिहिण्याची सुरुवात करायची गरज आहे."
सहमत...
3 Nov 2014 - 11:12 pm | श्रीरंग_जोशी
ब्लॉगलेखन प्रवासातील हा टप्पा ओलांडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
अवांतर - यंदाचे अ. भा. मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान या गावी ३ ते ५ एप्रिल २०१५ दरम्यान होणार आहे. आपण तेथे उपस्थित राहू शकल्यास उत्तर भारतातील इतर मराठी लेखकांशी गाठ पडेल.
3 Nov 2014 - 11:17 pm | राही
आपण अत्यंत चिकाटीने मराठी भाषा आणि मराठी लेखन आत्मसात केलेत. लक्ष वाचक मिळवलेत. अभिनंदन. यापुढेही अशीच प्रगती राहो. आमच्या शुभेच्छा.
4 Nov 2014 - 11:13 am | डॉ सुहास म्हात्रे
+१००
4 Nov 2014 - 12:44 am | अमित खोजे
तुमचा प्रवास वाचुन खुप छान वाट्ले. मराठी भाषेची सेवा आपल्याकडून होते आहे याचा आनंद काही वेगळाच असतो. आपल्याला आलेल्या समस्या व तुम्ही त्यावर केलेले उपाय पाहून स्फूर्ती आली.
पुन्हा एकदा तुमचे हार्दिक अभिनंदन !
4 Nov 2014 - 1:34 am | खटपट्या
अभिनंदन !!
4 Nov 2014 - 6:24 am | कंजूस
अभिनंदन !उत्साह आणि चिकाटी वाखाणण्यासारखी आहे.
ब्लॉगचोरीची गम्मत वाटली आणि चीडही आली. प्रतिसादांशी सहमत.
4 Nov 2014 - 7:38 am | बोका-ए-आझम
अभिनंदन! आपल्या ब्लाॅगची लिंक मिळू शकेल का?
4 Nov 2014 - 8:04 am | श्रीरंग_जोशी
http://vivekpatait.blogspot.in/
4 Nov 2014 - 9:06 am | प्रचेतस
आपले अभिनंदन.
4 Nov 2014 - 10:07 am | नि३सोलपुरकर
काका आपले अभिनंदन आणी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.....
"कुणी तरी सांगितले चांगले लिहिण्यासाठी, चांगले वाचणे गरजेचे" --१०० %
4 Nov 2014 - 11:10 am | समीरसूर
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! :-)
4 Nov 2014 - 11:19 am | मित्रहो
आपल्या ब्लॉगला लक्ष वाचक मिळाल्याबद्दल अभिनंदन
4 Nov 2014 - 11:51 am | मदनबाण
अभिनंदन ! :)
मी स्वतः माझ्या ब्लॉगवर फार कमी लिखाण करतो, बरेच महिने झाले असतील की मी स्वतःच्या ब्लॉगवर गेलेलो नाही. ;)
यातले मुख्य कारण,१} इथे पडिक असणे आणि मोडके-तोडके जमले तसे इथेच व्यक्त करणे. २} स्वतःच्याच ब्लॉगवर जायचा प्रचंड कंटाळा ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
अमरापूरकरांचे जाणे
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक'
मातीत रमणारा अभिनेता!
अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :(
Maharaani :- { Sadak }
4 Nov 2014 - 11:59 am | डॉ सुहास म्हात्रे
अभिनंदन !
आम्हाला आमचा प्रोफेशनल ब्लॉगपण अपडेट करायचा प्रचंड टंकाळा आहे. त्यामुळे वाङ्मयिन ब्लॉग इतक्या चिकाटीने चालविणे हे केवळ अशक्य काम आहे.
4 Nov 2014 - 4:34 pm | वेल्लाभट
लक्षवेधी ब्लॉगबद्दल अभिनंदन !!!!
4 Nov 2014 - 6:03 pm | जेपी
अभिनंदन
एक लक्ष वाचकापैकी एक -जेपी
7 Nov 2014 - 4:01 am | स्पंदना
अभिनंदन हो विवेक साहेब!!