मानसिक भितीने ग्रासलेला गुरुनाथ

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
4 Aug 2008 - 10:20 am

"बाहेर पडल्यावर वाईट गोष्टीना पण तोंड द्यावं लागतं.पण माझा विश्वास आहे की न जाण्याने याचाही पेक्षा वाईट गोष्टीना सामोरं जावं लागतं"

मी एकदा माझी कार रिपेअर करण्यासाठी एका कारखान्यात टाकली होती.मोटर कारखान्याच्या मालकाने मला एक भली मोठी लिस्ट दिली आणि म्हणाला,
"ह्या लिस्ट मधले पार्टस तुम्ही अमूक अमूक दुकानातून आणा.हे पार्टस स्पेशल आहेत आणि आम्ही ते ठेवत नाही."
ती लिस्ट घेवून मी त्या दुकानाच्या पत्त्यावर दुकानात गेलो.दुकानाच्या कॅबिन मधून आतून येणारा आवाज जरा परिचयाचा वाटला.म्हणून कौन्टरवरच्या त्या माणसाकडे जरा चौकशी केली की ते कोण बोलत आहेत.तो म्हणाला,
"ते आमचे मालक गुरुनाथ आजगावकर"
माझ्या चटकन लक्षात आलं की हा आपला आजगावचा गुरू तर नसेल, म्हणून मी माझं कार्ड देऊन त्या माणसाला सांगितलं की,
" एव्हडं माझं कार्ड देऊन ये तुझ्या मालकाला आणि मला भेटायचं आहे म्हणून सांग."
लगेचंच ते कार्ड वाचून तो मालक बाहेर आला आणि मला बघून त्याने मला ओळखलं.मला त्याच्या कॅबिनमधे हात धरून घेऊन गेला.लंचची वेळ होती मला म्हणाला,
"मस्तपैकी मासे आणि चिकनचं जेवण अनंताश्रमातून मागवतो आपण जेवूया आणि बोलूया."
इकडचे तिकडचे विषय झाल्यावर मी जुन्या आठवणी काढून त्याच्याशी बोलायला सुरवात केली.बरीच वर्ष झाली मी त्याला भेटलो नव्हतो.पण लहानपणाच्या त्याच्या काही विक्षीप्त संवयी मी विसरलो नव्हतो.गुरू बरेच वेळा घराबाहेर पडतच नव्हता.त्याला नेहमी कसली तरी भिती वाटायची.हे लक्षात येऊन मी त्याला म्हणालो,
"तू त्या संवयीतून बाहेर कसा पडलास?"
गुरू पण अगदी अंतःकरणा पासून माझ्याशी बोलू लागला,

"मला नंतर असं वाटू लागलंय,की संधी येण्याची वाट न पहाता ती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत रहावं.
हे शिकायला मिळालं मला माझ्या पुर्वीच्या भित,भित राहण्याच्या वृत्तिने.
मी अगदी लहान असताना सर्व गोष्टीची मला नेहमी भितीच वाटायची.उंच जिन्याच्या वर जाऊन चढून बसणं,छोट्या,छोट्या झुरळांना पहाणं वगैरे.आठ वर्षाचा असताना,मला माझ्या मोठ्या भावाबरोबर सार्वजनीक गणपति पहाण्यासाठी सुद्धा जायला भिती वाटायची.एका वर्षी एका मोठ्या सार्वजनीक गणपतिच्या विसर्जनाच्यावेळी माझा मोठा भाऊ अगदी समुद्रावर गेला होता.पण मी मात्र घरीच बसून होतो. मला भिती वाटायची की मी कदाचित त्या गर्दीत हरवून जाईन,कदाचित दंगा होऊन पोलिसांचा लाठिमार होईल,मलाच पकडतील वगैरे.
विसर्जनाच्या मजेचा आनंद घेण्याऐवजी मी माझा आत्मविश्वास गमवून बसलो होतो.
ह्या भितीमुळे मी सुरक्षित मार्ग जास्त अंगिकारला तो म्हणजे माझं शाळेत जाण्याचा मार्ग,त्यानंतर पुढे टेकनिकल संस्थेमधे पुढचं शिक्षण घेण्याचा मार्ग आणि त्यानंतर एका मोटार तयार करण्याच्या कारखान्यात मिळालेली नोकरी करण्याचा मार्ग हे सर्व मार्ग मला जरा सुरक्षित वाटत.सहा एक वर्ष या व्यवसायात राहून नंतर कंटाळा येऊ लागला.त्यातून माझी एक नविन भिती जन्माला आली. कारखानातल्या इतर कामगारासारखं आपण पण थकलेला,करपलेला आणि वेळेपूर्वीच म्हातरपण आलेला होऊ की काय असं सारखं वाटू लागलं.
मी ह्यातून बाहेर पडायचं ठरवलं.नाहितर पुन्हा जिन्याच्या वर चढून जाण्याच्या भितीची पुन्हा आठवण आणून खालच्याच पायरीवर बसून राहण्याची पाळी आणावी लागेल,गणपतिच्या विसर्जनाला जाण्याची भिती पुन्हा येईल.
त्यासाठी मी एक मोटरपार्टस विकण्याचं दुकान काढायाचं ठरवलं.त्याकरता यशस्वी बिझीनेस कसा करावा यावर पुस्तकं वाचायला सुरवात केली.हे करत असताना मला आयुष्यात कोणत्या अतिदुःखद प्रसंगाला तोंड द्दावं लागलं याचे विचार मनात येऊ लागले.आपल्या अठेठेचाळीस वर्षावर माझी आई अतिदुर्धर आजाराने मला कशी सोडून गेली हा प्रसंग आठवून त्या प्रसंगाची आणि माझ्या नव्या बिझिनेसमधे मी ठोकर खाल्ली तर त्या प्रसंगाची मी तुलना करून किती दुःख होईल याचा विचार करू लागलो.
हजार रुपये खिशात ठेऊन मी एका घाऊक मोटरपार्टस विकणार्‍या दुकानाच्या मालकाला फोन करून पाहिलं.माझं आश्चर्य म्हणजे त्याने मला सहकार्य द्दायचं कबूल केलं.आणि तिथून सुरवात झाली.

धंद्याच्या प्रगतीचा जिना चढून जाणं तितकं सोपं नव्हतं.एकदा मी चांगली मोठी ऑर्डर घालवून बसलो.जुनी भिती पुन्हा प्रवेश करू लागली.पण माझ्या आईच्या प्रसंगाची आठवण आणि त्या कारखान्यातल्या नोकरीची आठवण काढून त्या प्रगतीच्या जिनाच्या पायर्‍यावर चढून जाण्याची मनस्थिती आणू शकलो.
काही मिळवून दाखवणं हे काही यश मिळवणं असं नाही.प्रत्येक वेळी मी भितीच्या चकरातून बाहेर पडत असे त्या त्या वेळी जिंको न जिंको मी यशस्वी होत असे.इकडे तिकडे थोडीफर नुकसानी होतही असेल पण म्हणून मी नव्वद वर्षाच्या वृद्धाला शेवटी वाटावं की आपण तसं काहीच आयुष्यात केलं नाही म्हणून त्याने हताश व्हायच्या स्थितीला जावं तसा मी गेलो नाही.
बाहेर पडल्यावर वाईट गोष्टीना पण तोंड द्यावं लागतं.पण माझा विश्वास आहे की न जाण्याने याचाही पेक्षा वाईट गोष्टीना सामोरं जावं लागतं"

हे ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
"मग आता तुझं कसं चाललं आहे?"
ह्या धंद्दावर तुझा चांगलाच जम बसलेला दिसतो मला."
गुरूनाथ म्हणाला,
"आता मी पुर्वीचा राहिलो नाही.माझ्या वाचनात एक पुस्तक आलं,विषय होता,
"माणसाच्या अंगात उपजत कला असतात"
त्या पुस्तकात त्या कला एखाद्दाने कशा वापरायच्या- ज्या त्याला मुळात माहितही नसतील-ह्याची सुंदर माहिती दिली होती.ते पुस्तक वाचून मी माझं स्वतःचं आत्मपरिक्षण केलं.मला स्वतःला खूपच आत्मविश्वास वाढल्या सारखं वाटूं लागलं.आणि नंतर मी मागे वळून कधीच बघीतलं नाही."
मला हवं असलेलं सामान गुरुनाथने त्याच्या नोकराकरवी त्या कारखान्यात अगोदरच पाठवून दिलं होतं.आणि त्यामुळे मला त्याची ही कथा ऐकायला वेळ मिळाला.
त्याच्या दुकानातून बाहेर पडल्यावर माझ्या मनात विचार आला.की एखादी व्यक्ति करियर मधे वर यायला त्याला कोणतं कारण कारणीभूत होईल हे सांगणं कठिण आहे.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

4 Aug 2008 - 11:26 am | मदनबाण

मी माझा आत्मविश्वास गमवून बसलो होतो.
ही सर्वात वाईट स्थिती आहे..
एखादी व्यक्ति करियर मधे वर यायला त्याला कोणतं कारण कारणीभूत होईल हे सांगणं कठिण आहे.
हो आयुष्यात काही घटना अशा घडतात की त्यामुळे त्या व्यक्तीची परिस्थीती पुर्णपणे बदलुन जाउ शकते..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मराठी_माणूस's picture

4 Aug 2008 - 11:35 am | मराठी_माणूस

माझ्या वाचनात एक पुस्तक आलं

ह्या पुस्तका बद्दल अजुन काही माहिती उपलब्ध आहे का?

श्रीकृष्ण सामंत's picture

4 Aug 2008 - 10:08 pm | श्रीकृष्ण सामंत

सॉरी सर,
सध्या तरी माझ्याजवळ नाही.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्राजु's picture

4 Aug 2008 - 10:25 pm | प्राजु

एखादी व्यक्ति करियर मधे वर यायला त्याला कोणतं कारण कारणीभूत होईल हे सांगणं कठिण आहे.

१०० % खरं.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/