निळसर छटा अपरिहार्य...

मेघना भुस्कुटे's picture
मेघना भुस्कुटे in जनातलं, मनातलं
3 Aug 2008 - 9:25 pm

कित्येकदा आपल्या आयुष्यातल्या अभावांची आपल्याला जाणच नसते. दुखऱ्या नसेला स्पर्श होईस्तोवर आपल्याला इथंही दुखतं आहे, हे समजतच नसतं. त्या दुखण्याला आपल्या असण्यात सामावून घेत निमूट विनातक्रार वाट चालत असतो आपण. एखादं वळण मात्र असं येतं, की सगळ्या सगळ्या गाळलेल्या जागा चरचरून समोर उभ्या ठाकतात. वाट अडवतात. प्रश्न विचारतात. तिथून पुढचं आयुष्य साधं-सोपं-सरधोपट उरत नाही मग. वाट तर उरतेच, पण सोबत दरेक पावलापाशी एक लख्ख बोचही उरते. दुखावते. सुखावतेही.

या जागांचं ऋणी असावं की शाप द्यावेत त्यांना? हा ज्याच्या त्याचा निर्णय. आपापल्या वकुबानं आणि जबाबदारीनं घेण्याचा.

अशाच एका वळणाची गोष्ट सांगतो ’मिस्टर ऍण्ड मिसेस अय्यर’.म्हटलं तर ती एक सरळसोट प्रेमकथा आहे - जाहिरातीत म्हटलं आहे तशी विध्वंसाच्या इत्यादी पार्श्वभूमीवरची. आणि तुम्हांला दिसलंच, तर असं एक वळण - जे आपल्यापैकी कुणालाही गाफील गाठू शकतंच.

एखाच्या शांत-निवांत तळ्यासारखं सावलीला पहुडलेलं सुखी आयुष्य तिचं. सुसंस्कृत तमिळ ब्राह्मणाचं धार्मिक कुटुंब, उच्चशिक्षण, स्वजातीत लग्न, काळजी घेणारं सासर, ल्हानगं लेकरू - सगळं कसं चित्रासारखं. कुठे कसला उणिवेचा डाग नाही. माहेरच्या एका मुक्कामानंतर लेकाला घेऊन सासरी निघालेली ती. एकटीच. लांबचा प्रवास. आईबापांनी कुण्या एका फोटोग्राफरची तोंडओळख काढून त्याला तिला जुजबी मदत करायची विनंती केलेली. अर्धा प्रवास तसं सगळं योजल्यासारखं नीट पार पडतंही. तसंच होतं, तर तिला तिच्या त्या सहप्रवाश्याचं नावही कळतं ना. आयुष्य तसंच विनाओरखड्याचं निवांत चालू राहतं. कसल्याही खळबळीविना. पण तसं व्हायचं नसलेलं.

मधेच बस थांबते आणि गावात दंगली पेटल्याचं कळतं. रस्ता बंद. कर्फ्यू लागलेला. माथेफिरूंच्या झुंडी मोकाट सुटलेल्या. बसमधून बाहेर पडणंही धोक्याचं. अशात तिचा सहप्रवासी तिला सांगतो - 'मला जावं लागेल. मी - मी मुस्लिम आहे.' अरे देवा! मी पाणी प्यायले त्याच्या हातचं. आता? बुडाला की माझा धर्म... ही तिची पहिली प्रतिक्रिया. त्याच्यापासून तिरस्कारानं दूर सरकण्यात झालेली. पण बसमधल्या एका म्हाताऱ्या मुस्लिम जोडप्याला ओढून नेताना पाहून ती हबकते, की सोबतीच्या आशेनं का होईना - तिच्यातली माणुसकी डोकं वर काढते कुणाला ठाऊक. 'नाव काय तुमचं?' या एका हिंदू माथेफिरूनं दरडावून विचारलेल्या प्रश्नाला तिच्या तोंडून अभावित उत्तर जातं - 'अय्यर. मिस्टर ऍण्ड मिसेस अय्यर.'

आता सगळेच संदर्भ बदललेले.

इथवर अपर्णा सेननं आपल्याला बसमधल्या इतर अनेक प्रवाश्यांची ओझरती ओळख करून दिलेली. काही उत्साही तरुण मंडळी. रोमॆण्टिक. काही बाटल्या आणि पत्ते घेऊन मजा करणारे सद्गृहस्थ. काही फाळणीत पोळून निघालेले शीख व्यापारी. काही हनीमूनर्स. आणि ते मुस्लिम आजी-आजोबांचं जोडपंही. सगळीच माणसं. थोडी काळी. थोडी पांढरी. तुमच्याआमच्यासारखीच. ती तशी नसती, तर त्या ज्यू तरुणानं 'ते - ते मुस्लिम आहेत' असं म्हणून त्या म्हाताऱ्या जोडप्याचा बळी का चढवला असता? पण त्यालाही स्वत:च्या जिवाची चिंता आहेच. त्याबद्दल त्याला दोषी ठरवणारे आपण कोण? आपल्यावर अशी वेळ आली, तर आपण नक्की कसे वागू हे छातीठोकपणे सांगता यायचं नाहीच आपल्याला...

असे अनेक संमिश्र संदर्भ पेरले गेलेले. असल्या विद्वेषी हिंस्रपणाला आपल्या रुटीनचा एक भाग बनवून टाकणारे वृत्तपत्रीय मथळे या ना त्या निमित्तानं दाखवत राहते अपर्णा सेन. कुठे मासिकाचं एखादं पान, कुठे चिक्कीला गुंडाळून आलेला बातमीचा तुकडा. बसबाहेर सापडलेली त्या मुस्लिम म्हाताऱ्याची कवळी. मुद्दाम पाहिले नाहीत, तर लक्षातही येऊ नयेत, पण असावेत सगळीकडेच...

या संदर्भांच्या पार्श्वभूमीवर एका प्रवासापुरते एकत्र आलेले ते दोघं. कर्फ्यू. धुमसती दंगल. प्रवास अशक्यच. हातात लहान मूल. राहायला जागा नाही कुठेच. त्याची सोबत-मदत तर हवी आहे, थोडी त्याच्या जिवाचीही चिंता आहे. पण तो मुस्लिम आहे म्हणून होणारी अभावित चिडचिडही. कुठून यात येऊन पडलो, असा थोडा बालिश वैतागही. तो मात्र शांत. आतून संतापानं-असुरक्षिततेनं धुमसणारा. पण तिच्या मूलपणाची जाणीव असणारा. बिनबोलता तिला जपणारा. त्याच्यातला कलावंत एकीकडे या सगळ्यातलं वाहतं जीवन टिपतो आहे. अस्वस्थ होतो आहे. बसमधे काढलेल्या त्या रात्रीनंतर तो कॅमेरा घेऊन बाहेर पडतो, तेव्हा त्यानं टिपलेल्या फ्रेम्स आयुष्याचं हे संमिश्र रुपडं अबोलपणे दाखवत राहतात. नदीच्या पाण्यातली म्हाताऱ्याच्या चष्म्याची तुटकी केस. थकून चाकावर डोकं टेकून झोपलेला ट्रक ड्रायव्हर. गाडीच्या आरश्यात पाहून मिशी कातरणारे कुणी एक सद्‌गृहस्थ. खोळंबलेली रहदारी. वाहतं पाणी. कोवळं ऊन. अव्याहत.

आता मिस्टर अय्यर यांना नाव निभावणं भाग आहे. औटघटकेच्या या लेकराची नि बायकोची जबाबदारीही.

आता त्यांच्यात घडतं ते काहीसं कवितेच्या प्रदेशातलं.

फॉरेस्ट बंगलोमधली ताजीतवानी संध्याकाळ. भोवताली पसरलेलं जंगल. उन्हातलं जंगल टिपणारा तो आणि त्याच्यावर विश्वासून मोकळी-ढाकळी झालेली ती. त्याच्या कॅमेऱ्याला डोळे लावून ऊन निरखणारी तिची एक निरागस मुद्रा त्यानं टिपलेली. आणि मग अशा अनेक मुद्रा तिच्या. हसऱ्या. संकोची. लटक्या रागातल्या... त्याच्या कॅमेऱ्यात बंद.
दिवसा गावात परतून तिनं सुखरूप असल्याचा घरी केलेला फोन आणि बसमॅनेजर म्हणून फोनवर अभिनय करायची त्याला केलेली विनंती.
'आम्हांला सांगा नं कसं जमलं तुमचं लग्न...' या कोवळ्या पोरींच्या उत्सुक प्रश्नावर त्यांच्यात पसरलेली अवघडलेली शांतता. आणि ओठांवर लाजवट स्मित खेळवत तिनं दिलेलं उत्तर. चकित तो. पण तिचं उत्तर निभावत किर्र जंगलातल्या मधुचंद्राचे तुटक तपशील देणारा.
ठिबकत्या दवाचा आवाज ऐकत संध्याकाळी बंगलोच्या व्हरांड्यात त्या दोघांनी मारलेल्या गप्पा. दंगलीच्या त्याच्या भयचकित आठवणी आणि हिंदू स्त्रियांच्या भालप्रदेशावरच्या रक्तबिंदूचं त्याला असलेलं अनाकलनीय आकर्षणही.
दोघांनी मिळून कॅमेऱ्यात पकडलेली स्वप्नील हरणं. आणि त्याच कॅमेऱ्याच्या भिंगातून हतबलपणे निरखलेला कुण्या अभागी दंगलग्रस्ताचा जाता जीवही.
रक्ताच्या त्या चिळकांडीनं आणि माणसाच्या इतक्या सहजस्वस्त मरणानं मुळापासून ढवळून निघालेली ती. त्याच्या मिठीत विसावलेली. त्याचा हात घट्ट धरून झोपी जाणारी.

त्या रात्री अपर्णा सेनचा कॅमेरा त्या दोघांच्या निरागस जवळिकीचे तपशील चितारतो. ती फक्त एक भ्यालेली लहानशी मुलगी आहे. आणि तो तिचा सखा. बस. रात्र सरते. उमलत्या सकाळीसोबत तिला जाग येते आणि कॅमेरा हलकेच मागे येतो. क्लोज अप्स पुसले जातात आणि आपल्याला एक दूरस्थ चित्र दिसत जातं. आता पदरा-कुंकवाचं भान असलेली एक विवाहित स्त्री आहे ती. आरश्यापाशी जाऊन केस नीटनेटके करताना हलकेच टिकली आरश्याला चिकटवून थोडी सैलावते ती फक्त. लहानसं दृश हे, पण किती किती संदर्भ जागे करून जाणारं... तिच्या चौकटीतल्या विवाहित आयुष्याचे आणि त्याला मोहवणाऱ्या त्या कुंकवाच्या आकर्षणांचे...

परतीचा प्रवास सुरळीत सुरू. 'आता कुठे जाणार मग?' वरवर सहजपणा दाखवत तिनं त्याला केलेली पृच्छा. आणि त्यानं कुठल्याश्या जंगलाचं नाव सांगितल्यावर 'एकटाच जाणारेस?' हा स्वत:च्याही नकळत तिच्या तोंडून बाहेर पडलेला नाईलाज प्रश्न.
इथवर सगळं स्वप्नील-धूसर. पण तो तिच्या नजरेत नजर गुंतवून थेट उत्तर देतो - 'तू येणार नसलीस, तर एकटाच.'
हसत हसत रेषेपल्याड राखलेले सगळे सगळे बंध एकाएकी कधी नव्हे इतके निकट आलेले.
तिच्या 'मीनाक्षां'चा त्यानं हलकेच बोटांनी गिरवलेला आकार. त्यानं उष्टावलेलं पाणी तिनं सहज पिणं. सोबतीचा जवळ येणारा शेवट जाणवून त्याच्या खांद्यावर विसावणं. अंतरं मिटलेली आहेत आणि नाहीतही...

तिच्याकडे सहज पाठ फिरवून चालता होतो तो.
वळण संपलेलं.
त्यानं कॅमेर्‍यात टिपलेला हा प्रवास मात्र तिच्या मुठीत दिल्यावाचून राहवत नाहीच त्याला.
त्यावर भरल्या नजरेनं तिनं 'मिस्टर अय्यर'ना दिलेला निरोप आणि तिच्या नजरेत धूसरलेली त्याची पाठ.
अपर्णा सेनचा कॅमेरा आता स्थिरावतो तो त्याच्या खऱ्या नावाच्या पाटीवर.
प्रवासापुरतं घेतलेलं नाव संपलं. वळणही संपलं.

त्याचे पडसाद मात्र अभंग उरतील. त्या दोघांच्याच नाही, आपल्याही आयुष्यात. विषाची चव चाखली आहे आता ओठांनी. निळसर छटा अपरिहार्य...

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

रेवती's picture

3 Aug 2008 - 10:13 pm | रेवती

पुन्हा चित्रपट पाहिल्यासारखे वाटले.

रेवती

प्राजु's picture

3 Aug 2008 - 10:18 pm | प्राजु

या सिनेमाविषयी याआधीही वाचलं होतं. पण आपल्या लेखाने संपूर्ण चित्रपटच डोळ्यांसमोर तरळून गेला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

3 Aug 2008 - 11:16 pm | चतुरंग

संपूर्ण चित्रपट महत्त्वाच्या फ्रेम्स घेतघेत पुन्हा एकदा फास्ट फॉर्वर्डमधे बघितल्यासारखा वाटला फारच छान! :)
निळ्सर छटा शीर्षकही समर्पक!!

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

4 Aug 2008 - 2:36 am | भडकमकर मास्तर

निळ्सर छटा शीर्षकही समर्पक!!
मनुष्याच्या अंगातलं माणूसपण धर्मातीत असतं , हे मीनाक्षी अय्यरला उमगणं आणि पर्यायानं प्रेक्षकांना उमगणं...या अनुभवाला विषाची चव म्हणणं म्हणजे एकदम निगेटिव्ह नाही वाटत?
मला नाही कळलं....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

यशोधरा's picture

3 Aug 2008 - 11:47 pm | यशोधरा

सुरेख लिहिलं आहेस परीक्षण. एकदम जमून आलाय लेख. अभिनंदन!

भडकमकर मास्तर's picture

4 Aug 2008 - 1:47 am | भडकमकर मास्तर

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

घाटावरचे भट's picture

4 Aug 2008 - 1:59 am | घाटावरचे भट

मी काही पायरसीचा पुरस्कर्ता नाही, पण जर कोणाला या सिनेमाची डीव्हीडी मिळाली नाही तर हा सिनेमा इथे पाहाता येईल

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरन्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

भडकमकर मास्तर's picture

4 Aug 2008 - 2:26 am | भडकमकर मास्तर

एकदा पुण्यात दुपारचा वेळ काढण्यासाठी सहज असेल तो सिनेमा पहायचा या उद्देशाने विजय टॉकीजला हा सिनेमा पाहिला...
.. हा सिनेमा शांतपणे थिएटरमध्ये पाहणे हा एक सुंदर अनुभव होता..( माझे नशीब थोर )चुकून असे सिनेमे पहायला मिळायला नशीब फिदा हवं...
एका हिंदु मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवरती एक मुस्लिम फोटोग्राफर आणि एक कर्मठ तमिळ ब्राह्मण गृहिणी यांच्यात फुलणारं नातं... अगदी अप्रतिम सिनेमा आहे...
आणि हे सिनेमाइतकंच तरल आणि भिडणारं परीक्षण...
वा ! मजा आली...पुन्हा सिनेमा पाहिल्यासारखं वाटलं...

'आम्हांला सांगा नं कसं जमलं तुमचं लग्न...' या कोवळ्या पोरींच्या उत्सुक प्रश्नावर त्यांच्यात पसरलेली अवघडलेली शांतता. आणि ओठांवर लाजवट स्मित खेळवत तिनं दिलेलं उत्तर. चकित तो. पण तिचं उत्तर निभावत किर्र जंगलातल्या मधुचंद्राचे तुटक तपशील देणारा.

या फिल्ममधला माझा हा सगळ्यात आवडता सीन... काय अप्रतिम संवाद आहेत !!! ...... आदल्याच रात्री गप्पा मारताना तिला त्याच्या वाईल्डलाईफ फोटोग्राफीच्या छंदाबद्दल / व्यवसायाबद्दल कळले आहे , त्यात तो जंगलातल्या अनुभवाबद्दल बोलला आहे.... आणि दुसर्‍या दिवशी यांना नवरा बायको समजणार्‍या बसमधल्या मुली यांना विचारत आहेत की तुम्ही मधुचंद्राला कुठे गेला होता? हा अस्वस्थ होतो की आता काही बोललो तर तिला कसे वाटेल? तेवढ्यात तीच हसत बोलायला सुरू करते की जंगलात गेलो होतो...आणि त्याच्यासारखेच जंगलाचे वर्णन करते, त्याला संवादात सहभागी करून घेते... मग तो तिला जॉइन करतो आणि दोघे मिळून एकमेकांना सावरत सावरत (कधीही न घडलेल्या ) त्या जंगलातल्या मधुचंद्राचे वर्णन करतात.....
...... अफाट प्रकार आहे...
आदल्या दिवशी त्याच्या हातचं पाणी प्यायला लागलं म्हणून हळहळणारी ती आतापर्यंत त्याला एक माणूस म्हणून स्वीकारायला लागली आहे , त्याच्या आवडी-निवडी त्याची स्वप्नं यांच्याकडे एक माणूस म्हणून बघायला लागली आहे, नाईलाजाने त्याच्याबरोबर राहताना वैतागलेली ती आता त्याला किमान एक सखा म्हणून तरी स्वीकारायला लागलेली आहे, हे कुठलीही अवास्तव बडबड न करता बीटवीन द लाईन्स मधून प्रेक्षकांपर्यंत पोचवणारा हा सीन...
..दिग्दर्शक,संवादलेखक , आणि दोघे अभिनेते यांना आपला सलाम.... =D> =D>

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

4 Aug 2008 - 7:29 am | मेघना भुस्कुटे

सिनेमाबद्दल लिहिताना -

१) वस्तुनिष्ठपणे लिहावं असं म्हणतात. पण मला एकतर सिनेमा भयंकर आवडलेला असतो किंवा भयंकर नावडलेला असतो. तेव्हाच लिहिलं जातं. अशा वेळी वस्तुनिष्ठपणे लिहिणं फारच कठीण. आणि अशीही कुठलीही गोष्ट १०० टक्के वस्तुनिष्ठपणे पाहता येते का याबद्दल मला अजूनही खूप शंका आहेत. त्यामुळे माझं लिहिणं समतोल-संयत वगैरे क्वचित असतं.

२) परीक्षण लिहिताना सिनेमाची गोष्ट शक्यतो सांगू नये असं म्हणतात. कारण दिग्दर्शकानं जे दृश्याच्या मदतीनं सांगितलंय ते शब्दांत परत एकदा पकडायचा अट्टाहास करून काहीच साधत नाही. ना संपूर्ण यश, ना रसग्रहण. हे जमलं तर त्यासारखं दुसरं काही नाही, पण हे दर वेळी पाळायला मला जमतंच असं नाही.

३)दिग्दर्शकाला नेमकं काय म्हणायचं आहे आणि त्यानं ते किती परिणामकारकपणे म्हटलं आहे त्यावर म्हणे सिनेमाचं यशापयश ठरतं. पण या दोन्ही प्रश्नांची उत्तर अगदी व्यक्तिसापेक्ष आहेत. मी समोरच्या गोष्टीचा अर्थ माझ्या पूर्वानुभवाप्रमाणे, वकुबाप्रमाणे, दृष्टिकोनाप्रमाणे लावणार आणि मला त्यात तसेच अर्थ दिसणार. इतर कुणाला आणखी कसे... सगळेच आपापल्या जागी बरोबर. अशा वेळी लिहिण्यात काय प्वाइंट?

४) दिग्दर्शकाला काय सांगायचं आहे ते महत्त्वाचं की त्यानं ते किती परिणामकारकपणे सांगितलं आहे ते महत्त्वाचं? उदाहरणार्थ कुणी एखाद्या सनातनी धर्मपरायण बाईची मनोवृत्ती नि कहाणी दाखवणारा सिनेमा काढला, तर निव्वळ विषय मला न पटणारा म्हणून तो वाईट? आणि कुणी आधुनिक स्त्रीच्या प्रश्नांचा वेध घेणारा पण आत्यंतिक कंठाळी-प्रचारकी सिनेमा काढला, तर आशय महान असल्यामुळे सिनेमाही महान? की व्हाइस व्हर्सा? आपल्या आवडीनिवडींबद्दल आणि मतांबद्दल आपण इतके सहिष्णू-समतोल-निष्पक्ष असू शकत असतो कायमच?

५) सिनेमा हे टीमवर्क असतं म्हणे. मग सिनेमा वाईट पण अभिनय / एडिटिंग / नाच-गाणी/संवाद / आणि इतर अनेक गोष्टी चांगल्या - असं असू शकतं? एखादी चांगली गोष्ट त्या सिनेमाच्या ग्रेटनेसला कारणीभूत / आधारभूत नसेल, तर त्या सिनेमाच्या संदर्भात ती चांगली की वाईट? तिचं स्वतंत्रपणे मूल्यमापन कसं करता येईल / करावं का?

या माझ्या गोचीचे पडसाद माझ्या वरच्या लेखात असणार. 'सिनेमा परत पाहिल्यासारखं वाटलं' या प्रतिक्रियेवरून स्वच्छ दिसतंच आहे की प्रकरण गंडलंय. :) तर लेख राहू दे, पण या प्रश्नांवर काही उलटसुलट (चर्चा!) झाली तर मजा येईल.

भडकमकर मास्तर,
'विषाची चव' हा शब्दप्रयोग तुम्हांला खटकला, काहीसा निगेटिव्ह वाटला. पण मी या सिनेमातल्या धर्मनिरपेक्षतेच्या संदेशाबद्दल बोलत नव्हतेच. मी त्या दोघांच्या नात्याबद्दल बोलत होते. औटघटकेत इतकं जवळचं होऊन जाणारं हे नातं एकदा आयुष्यात येऊन गेल्यावर त्याचा अभाव साहवणार आहे का त्यांना, असा प्रश्न मला पडला, अजूनही पडतो. त्या संदर्भात तो शब्दप्रयोग होता. (हे सुटं करून सांगावं लागलं, यातच माझी गोची आली!) बाकी तुम्ही वरच्या प्रश्नांबद्दल काय म्हणताहात ते ऐकायला आवडेल.

विसोबा खेचर's picture

4 Aug 2008 - 8:34 am | विसोबा खेचर

मेघनाताई,

सुंदर परिक्षण... मला हा शिणेमा आवडला होता. अपर्णा सेन ही क्लासच काम करते..

तात्या.

प्राजु's picture

4 Aug 2008 - 8:42 am | प्राजु

या सिनेमाची स्टार कास्ट राहुल बोस आणि कोंकणा सेन शर्मा.. अशी आहे. ती अपर्णा सेन नाही. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शन केले आहे.
इथे पहा
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

4 Aug 2008 - 1:34 pm | विसोबा खेचर

मी चुकून अपर्णा सेन असं लिहिलं... :)

मराठी_माणूस's picture

4 Aug 2008 - 9:05 am | मराठी_माणूस

औटघटकेत इतकं जवळचं होऊन जाणारं हे नातं .........

भारतिय संस्कृतीचा आणि त्यातहि भारतिय स्त्रि जी स्वतः च्या संसरात सुखि आहे , त्याचा विचार करता असे होउ शकेल का ?

भडकमकर मास्तर's picture

4 Aug 2008 - 10:17 am | भडकमकर मास्तर

अगदी नक्कीच होऊ शकेल...
म्हणून तर ती त्याला निरोप देते ना शेवटी...
नाहीतर त्याच्या बरोबरच निघून गेली असती ना कुठेतरी जंगलात ......
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनस्वी's picture

4 Aug 2008 - 9:58 am | मनस्वी

मस्तच आहे हा चित्रपट.
शांततेतही अनेक संवाद लपलेले. राहुल बोस आणि कोंकणा सेनचा सहज अभिनय अप्रतिम.

मेघना, परिक्षणही सुंदर लिहिलंएस.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

आनंदयात्री's picture

4 Aug 2008 - 10:18 am | आनंदयात्री

मी परिक्षणापेक्षा रसग्रहण म्हणेन ! छान जमलेय यात वादच नाही, पाहिला होता तेव्हा आवडला होता चित्रपट.

मनिष's picture

4 Aug 2008 - 11:09 am | मनिष

आत्ता रसग्रहण खूप आवडले, एवढच म्हणतो, सविस्तर प्रतिसाद नंतर.... :)

बेसनलाडू's picture

4 Aug 2008 - 11:41 am | बेसनलाडू

सुंदर विषय,लेखन. राहुल आणि कोंकणा दोन्ही ताकदीच्या अभिनेत्यांनी यशस्वी केलेली वेगळीच गोष्ट!
(कुमार)बेसनलाडू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2008 - 1:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मेघना,

खूप छान लिहिलं आहेस ... मलाही काहीसं असंच वाटलं होतं हा चित्रपट पाहून! पण शब्दांची ताकद नाही ना माझ्याकडे ... मला गणितच बरं वाटतं अशी वेळ आली की!

यमी/संहिता

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2008 - 1:09 pm | स्वाती दिनेश

वा मेघना,सुंदर परीक्षण! आता हा चित्रपट पहायला हवाच! घाटावरच्या भटांनी दुवाही दिला आहे सिनेमाचा,:)
स्वाती

पद्मश्री चित्रे's picture

4 Aug 2008 - 3:15 pm | पद्मश्री चित्रे

चित्रपट पाहिल्यासारखं वाटलं.
सुन्दर रसग्रहण

>>एखादं वळण मात्र असं येतं, की सगळ्या सगळ्या गाळलेल्या जागा चरचरून समोर उभ्या ठाकतात. वाट अडवतात. प्रश्न विचारतात. तिथून पुढचं आयुष्य साधं-सोपं-सरधोपट उरत नाही मग. वाट तर उरतेच, पण सोबत दरेक पावलापाशी एक लख्ख बोचही उरते. दुखावते. सुखावतेही.
मनापासुन पटलं

धमाल मुलगा's picture

4 Aug 2008 - 3:39 pm | धमाल मुलगा

मान गये उस्ताद!

क्लासच लिहिलं आहेस.
महत्वाच्या फ्रेम-टू-फ्रेम सीन्सना मस्त उलगडवलं आहेस. आवडलं मला.

राहुल बोस आमचा आवडता नट. मस्त कामं करतो बॉ हा माणूस. मग ते मि.& मिसेस अय्यर सारखा गंभीर चित्रपट असो किंवा झंकार बिट्स सारखा हलकाफुलका... दोन्ही भुमिकांमध्ये अगदी फिट्ट बसतो हा!

बाकी, अपर्णा सेनचे कॅमेरा ऍन्गल्स बर्‍याचदा ऑड पण परिणामकारक असतात बुवा.

त्याचे पडसाद मात्र अभंग उरतील. त्या दोघांच्याच नाही, आपल्याही आयुष्यात. विषाची चव चाखली आहे आता ओठांनी. निळसर छटा अपरिहार्य...

+++१
जियो!

धनंजय's picture

4 Aug 2008 - 11:08 pm | धनंजय

मलाही हा सिनेमा आवडला होता.
परीक्षणाने आठवणी उजळल्या.

एकलव्य's picture

5 Aug 2008 - 9:30 am | एकलव्य

लिहिले आहे मेघनाने. हा चित्रपट पाहिला ती रम्य संध्याकाळ आजही आठवते... आठवणी जाग्या केल्याबद्दल आभार.

मेघना, एका वेगळ्याच तरलतेने लिहिले आहेस तू तुला आवडलेल्या चित्रपटाविषयी; तुझ्या दृष्टीकोनातून....तुला जसा अर्थ जाणवला तसा, किंवा तू म्हटल्याप्रमाणे -

दिग्दर्शकाला नेमकं काय म्हणायचं आहे आणि त्यानं ते किती परिणामकारकपणे म्हटलं आहे त्यावर म्हणे सिनेमाचं यशापयश ठरतं. पण या दोन्ही प्रश्नांची उत्तर अगदी व्यक्तिसापेक्ष आहेत. मी समोरच्या गोष्टीचा अर्थ माझ्या पूर्वानुभवाप्रमाणे, वकुबाप्रमाणे, दृष्टिकोनाप्रमाणे लावणार आणि मला त्यात तसेच अर्थ दिसणार. इतर कुणाला आणखी कसे... सगळेच आपापल्या जागी बरोबर.

हे रसग्रहण म्हणजे त्या चित्रपटांच्या फ्रेम्सचे तुकडे घेऊन केलेल एक कोलाज, किंवा कॅलिडोस्कोप मधील एक डिसाईन, जसे तुला दिसले तसे. मी पण काही तुकडे जोडण्याचा प्रयत्न करतो...

तिचे पारंपारिक, रुढीप्रिय, सुरक्षित आणि संकुचित/मर्यादित अनुभवांचे भाबडे आयुष्य. (अशाच प्रकारची पण एक वेगळी कथा नुकत्याच आलेल्या १० कहानियां या चित्रपटात दाखवली आहे - शबाना आणि नसिरुद्दीन ने फारच छान काम केलय). तो मुक्त, धाडसी आणि स्वतंत्र....त्यांच्यातला हा फरक सहजपणे अधोरेखित होतो जेंव्हा तो विचारतो "What are your plans?" आणि ती "What do you mean...?" आणि तिच्या चेहर्‍यावर सहज वाचता येत.. "म्हनजे काय? ती तुझी जवाब्दारी आहे. मला एकटीला सोडून जाणार आहेस का तू आता ह्या लहान मुलाबरोबर? अस कस??? (आणि कदाचित हाच फरक होऊ शकेल conflict चे बीज, ते नाते short-term/temporary मधून long-term/permanent कडे गेले/जाऊ शकले असते तर???)

टिकलीचे दृश्य खरच अफाट...दिग्दर्शिकेला दाद द्यावी असे...आणि ते प्रतिक येते ते पण सहजपणे....सुरेखच!!!

तिच्या मनातले पुर्वग्रह बाजूला ठेवून ती त्याला वाचवते... कारण कदाचित तिचे चांगुलपणाचे कंडिशनिंग हे धार्मिक कंडिशनिंग पेक्षा जास्त जुने, जास्त प्रभावी...त्यानंतर तिचे एक, एक डिफेन्सेस गळून पडतात आणि ती त्याला बघू शकते एक व्यक्ति म्हणून...इतकेच नाही तर त्याच्याबरोबर निर्माण होतो एक तरल बंध...त्याच्यावरच्या विश्वासाने तिचे सैलावत जाणे, विसंबून राहणे...मला मुळात हा प्रवास मीनाक्षी चे अनुभवविश्व विस्तारण्याचा वाटतो, तिच्या जाणिवांच्या कक्षा विस्तारण्याचा वाटतो! चित्रपटाच्या शेवटी तिला होणारी जाणीव...सगळेच खूप संवेदन्शीलतेने टिपलंय अपर्णा सेन हिने (त्याबद्द्ल पटकथेतील काही चुका माफ!!! ;) भारतात बाळाला घेऊन जाणार्‍या एकट्या विवहितेला मदत करणारे कितीतरी भेटतील की...असो!). चित्रपटाचा एकूण इफेक्ट फारच छान होतो!

'निळसर छटा अपरिहार्य' -- ह्यावर खर तर खूप लिहिता येईल, पण इथे ते फारच अवांतर होईल, परत कधीतरी....

मेघना, और भी लिखो! आणि हो, To hell with objectivity! :)

संदीप चित्रे's picture

6 Aug 2008 - 1:05 am | संदीप चित्रे

माझ्या घरी डीव्हीडी आहे पण अजून बघणं झालं नाहीये !! मुख्य कारण म्हणजे जाता-येता सिनेमा पहायचा नाहीये ! 'हजारों ख्वाईशें ऐसी' एकदा रात्री बारा ते पहाटे तीन पर्यंत शांपपणे पाहिला होता तसाच हा सिनेमा पहायचा आहे !

तुमची भाषा खूप तरल आहे. मनापासून आवडलं काही की मनापासूनच लिहावं ... वस्तुनिष्ठ वगैरे काही करण्यात अर्थ नाही :)
पुन्हा एकदा तरल लेखावद्दल अभिनंदन !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

मेघना भुस्कुटे's picture

6 Aug 2008 - 7:07 am | मेघना भुस्कुटे

कौतुकाबद्दल आभार मंडळी.
मनीष, अवांतर तर अवांतर. आपल्याला काय! लिही की. हेल विथ दी ऑब्जेक्टिव्हिटी! :)
मास्तर, प्रश्नांबद्दल लिहिणार होतात ना तुम्ही?

सिनेमाबद्दल लिहिताना -
१) वस्तुनिष्ठपणे लिहावं असं म्हणतात.
तथाकथित समतोल म्हणजे पोलिटिकली करेक्ट वगैरे होत जातं... ( विशेषत: हे नाटकवाले / सिनेमावाले पुन्हा भेटणार असतात तेव्हा... ) त्यात काही अर्थ नसतो पण भाषा ही मेसेज पोचवणारी सरळ पण कलाकाराला वैफ़ल्य आणणारी विखारी नको इतकंच...

२) परीक्षण लिहिताना सिनेमाची गोष्ट शक्यतो सांगू नये असं म्हणतात. कारण दिग्दर्शकानं जे दृश्याच्या मदतीनं सांगितलंय ते शब्दांत परत एकदा पकडायचा अट्टाहास करून काहीच साधत नाही. ना संपूर्ण यश, ना रसग्रहण. हे जमलं तर त्यासारखं दुसरं काही नाही, पण हे दर वेळी पाळायला मला जमतंच असं नाही.

प्रत्येक फ़िल्ममेकरची जशी एक पद्धत असते तशीच क्रिटिकचीसुद्धा रिव्ह्यूची एक पद्धत असते.... पण बर्याचदा त्याच त्याच पॆटर्नचा कंटाळा येतो तेव्हा त्यात्या सिनेमाच्या जॊनरप्रमाणे निराळी पद्धत वापरावी असे मला वाटते....उदा. अय्यरसाठी ही तरल भावुक रसग्रहणाची पद्धत छान जमली पण ऎक्शन थ्रिलरसाठी वेगळं काहीतरी तंत्र वापरावं लागेल...

३). मी समोरच्या गोष्टीचा अर्थ माझ्या पूर्वानुभवाप्रमाणे, वकुबाप्रमाणे, दृष्टिकोनाप्रमाणे लावणार आणि मला त्यात तसेच अर्थ दिसणार. इतर कुणाला आणखी कसे... सगळेच आपापल्या जागी बरोबर. अशा वेळी लिहिण्यात काय प्वाइंट?
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे वेगळं काहीतरी दिसणार पण तू जर लिहिलंच नाहीस तर तुला समजलेला एखादा वेगळा अर्थ अजून चार जणांना आवडू शकतो, तो कसा कळणार? त्यामुळे लिहिण्यात पॊइंट आहेच...

४) दिग्दर्शकाला काय सांगायचं आहे ते महत्त्वाचं की त्यानं ते किती परिणामकारकपणे सांगितलं आहे ते महत्त्वाचं? उदाहरणार्थ कुणी एखाद्या सनातनी धर्मपरायण बाईची मनोवृत्ती नि कहाणी दाखवणारा सिनेमा काढला, तर निव्वळ विषय मला न पटणारा म्हणून तो वाईट? आणि कुणी आधुनिक स्त्रीच्या प्रश्नांचा वेध घेणारा पण आत्यंतिक कंठाळी-प्रचारकी सिनेमा काढला, तर आशय महान असल्यामुळे सिनेमाही महान? की व्हाइस व्हर्सा? आपल्या आवडीनिवडींबद्दल आणि मतांबद्दल आपण इतके सहिष्णू-समतोल-निष्पक्ष असू शकत असतो कायमच?

हा मात्र दोन्ही बाजूंनी बोलता येण्यासारखा प्रश्न...दोन्ही चांगलं असल्याशिवाय सिनेमा मला भावू शकत नाही... हे वैयक्तिक झालं... पण वरच्या उदाहरणातले दोन्ही सिनेमे आवडणारे लोक आहेतच... आणि त्यांना ते आवडण्याचा हक्क आहे... आपल्याला कंठाळी प्रचारकी थाटाचे / कर्मठ विचारांना उत्तेजन देणारे सिनेमे आवडत नाहीत , म्हणूनच आपण महान झालो असं वाटून घेतलं नाही म्हणजे झालं... माझ्या आवडी-निवडींबद्दल समतोल राहण्याचा प्रयत्न करतो मी... बर्याचदा जमते.. ( आमच्या ग्रुपमधल्या एका बुजुर्ग व्यक्तिमत्त्वाशी त्यांना "फ़ायनल ड्राफ़्ट " आवडलं नाही म्हणून एक्साईट होऊन भांडल्याचे आठवते )

५) सिनेमा हे टीमवर्क असतं म्हणे. मग सिनेमा वाईट पण अभिनय / एडिटिंग / नाच-गाणी/संवाद / आणि इतर अनेक गोष्टी चांगल्या - असं असू शकतं? एखादी चांगली गोष्ट त्या सिनेमाच्या ग्रेटनेसला कारणीभूत / आधारभूत नसेल, तर त्या सिनेमाच्या संदर्भात ती चांगली की वाईट? तिचं स्वतंत्रपणे मूल्यमापन कसं करता येईल / करावं का?

सिनेमा वाईट आणि बाकी बर्याच गोष्टी चांगल्या असं असू शकतं... माझ्या मते असंच बर्याचदा असतं... खूप चांगले अभिनेते वाईट सिनेमांमध्ये ( त्यांच्या उपजत सवयीने, कौशल्याने असेल पण ) चांगला अभिनय करतच असतात... तेच नाच गाण्यांचं , एडिटर्सचं... हल्ली तर सिनेमॆटोग्राफी जवळजवळ प्रत्येक सिनेमातच खूप छान असते..... म्हणजे माझ्या मते राहता राहिली कथा ,पटकथा आणि दिग्दर्शन या तीन गोष्टी उत्तम नसल्या तर उरलेले सारे जण कितीही भारी असले तरी एका विशिष्ट पातळीच्या वर काहीही करू शकत नाहीत.... त्यामुळेच मेला या वाईट सिनेमात अमीरने चांगला अभिनय केला असेल किंवा नसेल त्याचं मूल्यमापन करायला मी जाणारच नाही..

या माझ्या गोचीचे पडसाद माझ्या वरच्या लेखात असणार. 'सिनेमा परत पाहिल्यासारखं वाटलं' या प्रतिक्रियेवरून स्वच्छ दिसतंच आहे की प्रकरण गंडलंय.
सिनेमा परत पाहिल्यासारखं वाटलं ही प्रतिक्रिया इतक्या निगेटिव्हली का घेतेस ते मला कळत नाहीये... :)
काही गंडलं वगैरे नाहीये...

'विषाची चव' हा शब्दप्रयोग तुम्हांला खटकला, काहीसा निगेटिव्ह वाटला. पण मी या सिनेमातल्या धर्मनिरपेक्षतेच्या संदेशाबद्दल बोलत नव्हतेच. मी त्या दोघांच्या नात्याबद्दल बोलत होते. औटघटकेत इतकं जवळचं होऊन जाणारं हे नातं एकदा आयुष्यात येऊन गेल्यावर त्याचा अभाव साहवणार आहे का त्यांना, असा प्रश्न मला पडला, अजूनही पडतो. त्या संदर्भात तो शब्दप्रयोग होता. (हे सुटं करून सांगावं लागलं, यातच माझी गोची आली!)
औटघटकेत इतकं जवळचं होऊन जाणारं हे नातं चांगलंच होतं तर त्याला विषाची उपमा का असा एक प्रश्न उरतोच... ( का मग लग्न झाल्यानंतरही तिनं जोडू नये ते नातं जोडायचा प्रयत्न केलाय , म्हणून ते नातं विषाइतकं वाईट?.. आणि त्याची निळसर छटा म्हणजे आठवणी...? हे अजूनच खटकणारं...

.... किंवा समाजाला चांगला सदेश देण्यासाठी तिनं हे धर्मांधतेचं हलाहल पचवलंय वगैरे... हा अर्थ विनोदी असला तरी पॊझिटिव्ह ...) :)

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

6 Aug 2008 - 10:14 am | मेघना भुस्कुटे

मला नेहमी वाटतं, की सिनेमाची गोष्ट पुन्हा एकदा न सांगता सिनेमाबद्दल लिहिता आलं पाहिजे. 'सिनेमा पाहिल्यासारखं वाटलं' या प्रतिक्रियेवरून तसं जमल्याचं दिसलं नाही, म्हणून मी जरा खट्टू झाले इतकंच.
बाकी विषाच्या उल्लेखाबद्दल म्हणाल तर - 'आपल्याला आवडणार्‍या सगळ्या गोष्टी एकतर बेकायदेशीर तरी असतात नाहीतर अपायकारक तरी असतात' या कुठल्याश्या धमाल उद्धृताशी साधर्म्य सांगणारा संदर्भ होता त्या विषाच्या उल्लेखाला. इतका अक्षरश: नका घेऊ त्याचा अर्थ. विषाचे संदर्भ नेहमीच इतके वाईट असतात असंही नाही.
बाकी प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल धन्यवाद. :)

भडकमकर मास्तर's picture

6 Aug 2008 - 10:36 am | भडकमकर मास्तर

विषाचे संदर्भ नेहमीच इतके वाईट असतात असंही नाही._
इतकं स्पष्टीकरण देताना तुझी जाम चिडचिड झाली असेल, समजू शकतो.... :)
... ते निळसर छटेचं जरा लावून धरलं, सूक्ष्म दिलगीरी व्यक्त करतो... ;) असो...
'आपल्याला आवडणार्‍या सगळ्या गोष्टी एकतर बेकायदेशीर तरी असतात नाहीतर अपायकारक तरी असतात' या कुठल्याश्या धमाल उद्धृताशी साधर्म्य सांगणारा संदर्भ होता
हे मस्त....

_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

6 Aug 2008 - 10:41 am | मेघना भुस्कुटे

भावना पोहोचवून घेतल्याबद्दल अंतःकरणपूर्वक आभार. :D

भडकमकर मास्तर's picture

6 Aug 2008 - 10:43 am | भडकमकर मास्तर

स्वतंत्रपणे मूल्यमापन

एक लिहायचं राहिलं...
ते एकांकिका स्पर्धांमध्ये आणि ( फिल्म ऍवॉर्ड फन्क्षनला) बेस्ट फिल्म असते पण बेस्ट दिग्दर्शन नस्तं , हे प्रकार मला झेपत नाहीत.... एकांकिका सांघिक प्रथम असेल तर दिग्दर्शन बिन्धास्त तृतीय असू शकतं...ते कसं काय बुवा??
मला निदान नाटकात तरी बेस्ट नाटक हे बेस्ट दिग्दर्शन असतं असं वाटतं... त्यात डावं उजवं कसं ठरवतात?
... दिग्दर्शन तृतीय असेल तर नाटक पण तृतीयच हवं ना...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

6 Aug 2008 - 10:46 am | मेघना भुस्कुटे

संपूर्ण सहमत तुमच्याशी.