कष्ट होताती जीवासी (ज्ञानेश्वर)

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
24 Aug 2014 - 5:44 pm

कष्ट होताती जीवासी (ज्ञानेश्वर)

संत साहित्याशी आवड तशी जरा लवकरच लागली म्हणावयास हरकत नाही. कॉलेजात असतांना एक मित्र गुणगुणत होता "उड उड रे काऊ. तुझे सोन्याने मढवीन पाऊ " मी खुश होऊन विचारले ’कोण कवी रे ?" तो म्हणाला "ज्ञानेश्वर" मी म्ह्टले " काय थापा मारतोस ! संत असे कधी लिहितील काय ?" तो म्हणाला, "खरेच ". मी लायब्ररीत जाऊन कविता (हो, कविताच, अभंग नाही ) शोधून काढली व असा प्रथम वाचनातच प्रेमात पडलो. तो पर्यंत वसंत बापट. मंगेश व विंदा, बोरकर यांच्याबरोबर म.वा. धोंड (मराथी लावंणी) हेच आमच्या वाचनात व पाठांतरात होते. इथेही थोडी गोची होती बापट-मंगेश कसे ४-५ रुपयांत संग्रह मिळायाचे.एखाद दुसर्‍या सिनेमाला दांडी मारून मित्रांमध्ये मिळून विकत घेणे जमत होते. संत साहित्य तसे आवाक्याबाहेरच म्हणावयास हवे. नोकरी लागल्यावर मोठ्या हौसेने ज्ञानेश्वरी विकत घेतली काही कळेना, मग सार्थ ज्ञानेश्वरी घेतली पण परत तिथेच. मग सकल संथ गाथा दोन्ही भाग घेतले व जन्मगांठच पडली म्हणावयास हरकत नाही. यथावकाश अमृतानुभव, दासबोध, इ. (कबुल करावयास हरकत नाही, एकनाथी भागवत सुद्धा, अजून संपूर्ण वाचून व्हावयाचे आहे !) आणि त्यावरील करंदीकर, पेंडसे, कुलकर्णी वगैरे टीकाकारांचे ग्रंथही गोळा केले.मोठ्या निष्ठेने वाचनास सुरवात केली. इतकी वर्षे परत परत वाचतो आहे तेंव्हा अभ्यास करतो असेही म्हणावयास हरकत नाही. काय पदरांत पडले ? दुसरा कोणी काही बोलावयास लागला तर "असे नाही गड्या, असे असावे," अशी पोपटपंची करता येईल एवढेच. मनाला ग्वाही करून बोलायाचे तर हे ग्रंथ आपल्याकरिता नव्हेत हे कळले.अजूनही वाचतो, पण "तुझी यत्ता कंची " ह्याचे उत्तर माहीत असल्याने आता दोन तासांनंतर फार कळले नाही तर त्रास तरी होत नाही. आपल्यासारख्या अडाण्यासाठी सकल संत गाथा आहे हा दिलासा पुरे आहे. जर सोयराबाई ९००० ओवींच्या ज्ञानेश्वरीतील सार चार सोप्या ओळीत सागत असेल तर आणखी काय पाहिजे !

या अभंगातही काही खास आपले वाटतात. उदा. विराण्या. विराणी म्हणजे विरहणीची आर्त आळवणी. प्रियकर जवळ नाही, तो भेटावा या करिता केलेली विनवणी. सगळ्या प्रकारच्या काव्यात विराणी आढळते, मराठी भावकवितेत "माझिया प्रीयाला प्रीत कळेना. " ; हिंदी सिनेसंगीतात "मोहे भूल गये सांवरिया", गझलेत " रोया करेंगे आपभी पहरो इसी तरह " तर ठुंबरीत "याद पियाकी की आये " मला वाटते आपल्याला जीवाभावाच्या वाटणार्‍या काव्यातील भावना याच्या आसपासच रुंजी घालत असतात..सर्व संतांनी ईश्वराला आपला प्रियकर मानून विराण्या लिहल्या आहेत.

संतांनी लिहलेल्या विराण्या व लौकिक विराण्या यांतील एक फरक लक्षणीय आहे.विरहणीचा प्रियकर तिच्या माहितीचा असतो. तो गावातच सवतीच्या घरी गेलेला असतो वा परगावी गेलेला असतो व पावसाळा आला तरी परतलेला नसतो. संतांनी आपला प्रियकर पाहिलेलाच नसतो. तो कुठे आहे हे सांगता येत नाही. खरे तर तो आहे कीं नाही हे ही खात्रीने माहीत नसते.. इतर संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवूनच सगळा व्यवहार चाललेला. पण दोघांच्याही हृदयातील तगमग मात्र एकाच जातीची. तर आज आपण ज्ञानेश्वर माऊलींची एक विराणी पहाणार आहोत.

पडिले दूरदेशी मज आठवे मानसी
! नको नको हा वियोग कष्ट होताती जीवासी !
दिन तैसी रजनी झाली हो माये !!
अवस्था लावूनी गेला अजुनी कां न ये माये !!
गरुडवाहना गुणगंभीरा ये ये गा दातारा !
बाप रखुमादेवीवरा श्री विठ्ठला श्री विठ्ठला !!

अवस्था ...स्थिति, दशा, प्रसंग, उत्कंठा, आवड, चिंता, काळजी,
हुरहुर, आशा, छंद, नाद, तन्मयता.

विरहणी म्हणते आहे, "मी दूरदेशी पडिले आहे, टाकली गेली आहे. मी काय स्वेच्छेने येथे आलेली नाही.हा विरह नकोनकोसा झालेला आहे. किती कष्ट होतात, तुला कसे कळणार ? आणि डोळ्याला डोळा लागत नसेल तर रात्र आणि दिवस, एकच की !
पुढील ओळीत माऊली एक सुरेख शब्द वापरतात. अवस्था .. शब्दकोषात त्याचे विविध अर्थ दिले आहेत. प्रत्येकाची छटा निरनिराळी. स्थिति म्हणजे दशा नव्हे, चिंता निराळी काळजी निराळी. हुरहुर वेगळीच भावना. छंद व नाद जवळचे खरे पण एक नव्हेत. असे बघा
माझी अशी दशा झालेली आहे तरी अजूनही कां बरे येत नाहीस ?
मी इतक्या काळजीत पडले आहे " " " " " "
मला इतकी हुरहुर लागली आहे " " " " " "

प्रत्येक भावना वेगवेगळी. समुद्राच्या लाटा सारख्या येतच असतात पण एक दुसरी सारखी नसते. श्रेष्ठ काव्य तुमच्यासमोर अशाच लहरी निर्माण करते.आपण किती आस्वाद घेतो आपल्यावर अवलंबून. आता गरुडवाहना यातली गोडी बघा. त्याला बोलवले आहे, तो लवकरात लवकर यावा असे वाटत आहे, तर मनोवेगा सारखा वेग असलेल्या गरुडावर बसून ये हे सांगावयाला " गरुडवाहना."
मला वाटते गुणगंभीरा व दातारा या बाद्दल मी काय बोलू ? आपण रसीक आहातच.

या अवीट विराणीची खरी मजा घ्यावयाला ती किशोरी ताई व आशाताईंच्या आवाजात ऐका.

https://www.youtube.com/watch?v=L6xh4B_K_Lk

https://www.youtube.com/watch?v=adITgqiCkd8

शरद

.

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

बापु देवकर's picture

24 Aug 2014 - 7:51 pm | बापु देवकर

मस्तच लिहिले आहे. अजून काही असेच येउ द्या .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2014 - 8:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आवडलेच...सर, नुसतं विराण्यावर स्वतंत्र असा लेख तुम्हीच लिहू शकाल. मला विरह ही अवस्थाच लै जड़ वाटते. संत लोकांना विरह चुकला नै तर आपल्या सामान्य जनांची काय गोष्ट म्हणून मी विरह सोसून घेतो.. ;)

-दिलीप बिरुटे
(संत)

राही's picture

24 Aug 2014 - 8:51 pm | राही

सुंदर लिहिले आहे. विराणी म्हणजे मिलनासाठी तळमळणार्‍या जिवाचे आक्रंदन. आता हे द्वैत सहन होत नाही, अद्वैताची,एकरूपतेची आस लवकर पूर्ण होऊ दे, अशी आळवणी हे अर्थात आपण लिहिले आहेच. 'कान्हो वनमाळी वेगी भेटवा का' ही अशी आणखी एक आर्त विराणी.
पण काही ठिकाणी 'हे अद्वैतच तर आहे, मी आणि तू असे दोघे वेगवेगळे नाहीतच, एकरूपच तर आहोत, एकाच वेळी दोघे वेगवेगळे तरीही एकच आहोत' अशी मोठी मनोज्ञ भावना व्यक्त झाली आहे :
"तूं आकाश, मीं भूमिका | तूं लिंग मीं शाळुंका || तूं समुद्र मीं चंद्रिका | स्वयें दोन्हीं || तूं वृंदावन मीं चिरी| तूं तुळशी मीं मंजिरी|| तूं पांवा मी मोहरी |स्वयें दोन्हीं|| तूं चांद मीं चांदणी| तूं नाग मीं पद्मिणी|| तूं कृष्ण मीं रुक्मिणी| स्वयें दोन्हीं|| तूं नदी मीं थडी| तूं तारूं मीं सांगडी|| तूं धनुष्य मीं भातडी| स्वयें दोन्हीं|| नामा म्हणे पुरुषोत्तमा| स्वयें जडलों तुझिया प्रेमा|| मीं कुडी तूं आत्मा|स्वयें दोन्हीं||

प्यारे१'s picture

24 Aug 2014 - 9:32 pm | प्यारे१

आ हा हा!

भेटी लागी जीवा लागलीसे आस...

विलासराव's picture

25 Aug 2014 - 8:31 am | विलासराव

आवडले.

पण काही ठिकाणी 'हे अद्वैतच तर आहे, मी आणि तू असे दोघे वेगवेगळे नाहीतच, एकरूपच तर आहोत, एकाच वेळी दोघे वेगवेगळे तरीही एकच आहोत' अशी मोठी मनोज्ञ भावना व्यक्त झाली आहे :
"तूं आकाश, मीं भूमिका | तूं लिंग मीं शाळुंका || तूं समुद्र मीं चंद्रिका | स्वयें दोन्हीं || तूं वृंदावन मीं चिरी| तूं तुळशी मीं मंजिरी|| तूं पांवा मी मोहरी |स्वयें दोन्हीं|| तूं चांद मीं चांदणी| तूं नाग मीं पद्मिणी|| तूं कृष्ण मीं रुक्मिणी| स्वयें दोन्हीं|| तूं नदी मीं थडी| तूं तारूं मीं सांगडी|| तूं धनुष्य मीं भातडी| स्वयें दोन्हीं|| नामा म्हणे पुरुषोत्तमा| स्वयें जडलों तुझिया प्रेमा|| मीं कुडी तूं आत्मा|स्वयें दोन्हीं||

हे ही भावले.

अनुप ढेरे's picture

25 Aug 2014 - 12:10 pm | अनुप ढेरे

व्वा... खूप आवडलं रसग्रहण!

ताल लय's picture

25 Aug 2014 - 5:58 pm | ताल लय

आवडले .. खर तर मला बर्याच दिव्सापासुन अभन्गान्चे सार पाहिजे होते ... सुन्दर सुरुवात ...

पैसा's picture

25 Aug 2014 - 8:17 pm | पैसा

किती सुंदर लिहिलंय! अगदी "भेटीलागी जीवा लागलीसे आस" अशी क्षणभर अवस्था झाली वाचताना!

मस्त !! आताची आवडती विरहिणी (?) अरिजित सिंगच्या आवाजातली 'फिर ले आया दिल' !! :)

सुधीर's picture

25 Aug 2014 - 9:26 pm | सुधीर

नेहमीप्रमाणे तुमचा हाही लेख अगदी आतून भावला.

विवेकपटाईत's picture

26 Aug 2014 - 10:38 am | विवेकपटाईत

सुन्दर लेख, आवडला. याहून अधिक प्रतिक्रिया देण्याची क्षमता माझ्या अल्प बुद्धीस नाही.