मायमराठीतले (आणि सावत्रमाय विंग्रजीतले) काही शब्द आपल्यामागे एक एक इमेज घेऊन वावरत असतात. मंत्री (मराठीत मिनिष्टर ) म्हटल्यावर डोक्यावरची गांधी टोपी सावरत कडक इस्त्रीच्या खादी जाकिटाची बटणे कुरवाळत फर्डे भाषण करणारा बगळासदृश्य मनुष्य डोळ्यासमोर येतो. वकील हा सहसा घाऱ्या कावेबाज डोळ्यांचा धूर्त इसम असतो. आणि डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक सौम्य धीरगंभीर, सौहार्द आणि कणवपूर्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते.
खारकर डॉक्टर हे याला शंभर टक्के अपवाद होते. होते म्हणायला कारण आता ते नाहीत. गेल्या आठवड्यात वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजता त्यांना अटॅक आला तेव्हा त्यांच्या उशाशी असलेल्या अॅश ट्रेमध्ये सिगारेटची किमान पंचवीस थोटके आढळली.
त्यांचे डोळे कायम लालसर अन तारवटलेले असत. काही लोक म्हणत ते झोपेच्या गोळ्या खातात. बरेच जण म्हणत की ते कायम ड्रिंक्स घेऊन येतात. काही लोक तर हळूच कुजबुजत, गर्दसुद्धा असेल...
त्यांची प्रॅक्टिस यथातथाच . बायकोपण डॉक्टर अन तिची प्रॅक्टिस जोरात म्हणून त्यांची हाय स्टँडर्ड राहणी टिकून राहिली. घर हॉस्पिटलच्या मागेच असल्यामुळे चोवीस तास खारकर डॉक्टर अव्हेलेबल. प्रॅक्टिसच्या वेळा सोडून इतर वेळेत कधीही कुणी डोकावले तर डॉक्टर कमरेला फक्त एक टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत दिसत. नाईटची माया नर्स दुपारच्या वेळी थांबत असे. एरव्ही अवेळी आलेल्या पेशंटचे स्वागत (!) टॉवेलधारी डॉक्टरच करत. खरं तर वेळीअवेळी डोकावणारे पेशंट हे गायनॅक असलेल्या मॅडमचे असत. पण आलेला पेशंट आपलाच या समजुतीने डॉक्टर लगबगीने त्याला आपल्या केबिनचा रस्ता दाखवत. आलेला माणूस नम्रपणे आपण मॅडमना भेटायला आल्याचे सांगे. मग ते टॉवेलसहित आत अंतर्धान पावत.
तसे ते मेडिसिनमध्ये हुशार . पण त्यांच्या वैद्यकीय कौशल्यापेक्षा त्यांच्या विक्षिप्तपणाचेच किस्से जास्त ऐकायला मिळत.
मारुती स्विफ्ट कार घेऊन ते बाहेर जाऊन आले की गल्लीतली पोरेठोरे त्यांचे कार पार्किंग बघायला दारात जमा होत. रस्ता अरुंद. दवाखान्यात पार्किंगला जागा नाही. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटाराच्या कडेपासून गाडीची एका बाजूची दोन्ही चाके प्रत्येकी बरोब्बर तीन इंचावर येईपर्यंत त्यांचा पार्किंग कार्यक्रम चाले.
प्रथम गटाराच्या कडेला जास्तीतजास्त करेक्ट पोझिशनमध्ये कार लावून ते खाली उतरत. मग, मावळ्याने गडाची तिन्ही बाजूंनी टेहेळणी करावी, तशी गाडीच्या तिन्ही बाजूंनी सावकाश फेरी मारत. गटारीच्या बाजूने अर्थात फेरी मारता येत नसे. मग पुन्हा चक्रासनावर स्वार होऊन कार जरा मागे. पुन्हा पुढे घेऊन तीन इंचवाले स्थान गाठायचा प्रयत्न. अशा रीतीने सुमारे अर्धा तास अन अर्धा लिटर पेट्रोल खर्च झाल्यावर डॉक्टरसाहेबांच्या मनासारखे पार्किंग होई. ‘हुश्श’ म्हणून पाहणारे घरात अन डॉक्टर दवाखान्यात जात. म्हणजे, ‘हुश्श’ असे पाहणारे म्हणत, डॉक्टर नव्हे.
एकदा बाब्याचा पाय गटारीत गेला अन लचकला. रात्री पाय टम्म सुजला अन कळा येऊ लागल्या.
जवळात जवळचा दवाखाना म्हणून डॉक्टर खामकरांकडे त्याला नेले.
डॉक्टर टॉवेल लावूनच आले.
बाब्या विव्हळत होता. आल्या आल्या त्यांनी पायाचे सुमारे तीन मिनिटे निरीक्षण केले. मग एकदम त्याचा गुडघा पकडला अन खच्चून आवळला !
...बाब्याच्या किंकाळीने दवाखान्याचे छप्पर उडाले ! अर्धवट गुंगीतले पेशंट दचकून जागे झाले अन ओपीडीत डोकावले.
डॉक्टर थंडपणे म्हणाले ‘दुखतंय काय ?’
सगळे गार !
मग डॉक्टर बोलले, ‘फ्रॅक्चरची केस आहे, ऑर्थो कडे न्या..’
अन टॉवेलसकट वळून तरातरा आत अदृश्य झाले.
आणखी एकदा असेच ते नाईट राउंड मारीत होते. प्रत्येक पेशंटचे केसपेपर काळजीपूर्वक पाहून त्यावर लिहिलेले औषध घेतले गेले कि नाही, याची ते काटेकोर शहानिशा करीत.
तीन नंबरमध्ये पाच खाटा होत्या. त्यापैकी तेरा वर्षाच्या मुलाला तपासून झाल्यावर ते दुसऱ्या खाटेकडे वळले. त्यावरच इसम घोरत होता. त्यांनी केसपेपर पहिले. मग इकडे तिकडे पहिले. पेशंटचे नातेवाईक कुणी दिसत नव्हते. माया नर्सचाही पत्ता नव्हता.
डॉक्टरनी पेशंटला हाक मारली. चार हाका मारल्या तरी तो उठेना. मग त्याला गदागदा हलवले. तरीही तो घोरासुराच्या साम्राज्यातून बाहेर येईना. बहुधा मायाने त्याला झोपेची गोळी दिली असावी. आता पर्यंत आजुबाजूचे पेशंट जागे होऊन किलकिल्या नजरेने समोरचा प्रकार न्याहाळू लागले. अखेर डॉक्टरनी त्याल कुशीवरून वळवून उताणे केले अन खांद्याला गच्चपैकी हिसडा दिला. त्यासरशी त्याने डोळे किलकिले केले अन जड नजरेने डॉक्टरांकडे पाहिले.
मग भुवया उंचावून नजरेनेच ‘काय ?’ असे विचारले.
डॉक्टर शांतपणे म्हणाले, ‘ गोळी खाल्ली का झोपेची ? झोप लागते ना आता ?’
एकदा डॉक्टरमहाशय गाडी घेऊन बाहेर गेले असता पेशंटला पाहायला आलेल्या एकाने गाडी डॉक्टरसाहेबांच्या गाडीच्या जागी लावली. आत ड्रायव्हर होता. काही वेळाने डॉक्टर आले. आपल्या जागेत दुसरी गाडी पाहून त्यांनी हॉर्न दिला. ड्रायव्हरने एकदा मागे पाहिले. मग पुन्हा सिगारेटचे झुरके मारण्यात दंग झाला. हॉर्न पुन्हा वाजला. ड्रायव्हर एक नाही अन दोन नाही. काही वेळ हॉर्न वाजवून झाल्यावर डॉक्टर उतरले. त्यांनी शांतपणे त्या गाडीचे दार उघडले अन म्हटले, ‘बाहेर ये.’
‘येत नाही’ ड्रायव्हर म्हणाला. दोन मिनिटे वाट पाहून डॉक्टरनी एखाद्या बाहुल्याला धरावे तशी त्याची गचांडी धरून त्याला बाहेर काढले, गाडीच्या टपावर ठेवले अन म्हणाले, माझ्या दवाखान्यासमोर पुन्हा जर गाडी लावलीस तर गाडीसकट तुला काडी लावीन, समजलास ?’
इतक्यात हा गोंधळ ऐकून गाडीचा मालक पळत पळत बाहेर आला अन त्याने डॉक्टरांची माफी मागून गाडी काढून घेतली.
प्रॅक्टिस मधून भरपूर वेळ मिळत असल्यानं तो वेळ शेवटी शेवटी डॉक्टर आपल्या दोन वर्षाच्या नातीशी खेळण्यात घालवत. तिची आई, डॉक्टरांची सून वर्षा अतिशय मृदू अन सालस स्वभावाची, गड्यांनासुद्धा अरे-तुरे करणार नाही.
एकदा ती दोन वर्षाच्या सईला दूध पिण्याचा आग्रह करीत होती.
‘बघ हां दुध नाही प्यालीस तर पोलीसमामा धरून नेतील...’
‘एके छप्पनची गोळी घालीन त्याला...’ सई चे बंदुकीच्या गोळीसारखे उत्तर ऐकून वर्षा दचकली.
‘असे बोलू नये, पोलिसांची पलटण असते बरं...’
‘येउदे, त्यांच्यावर बॉम्ब टाकीन’ ‘त्यांच्याकडे मोठ्ठ्या गाड्यापण असतात. ‘
‘मी त्यांनाच किडनॅप करीन अन उलटं टांगून खालून मिरचीची धुरी देईन’
लेकीची मुक्ताफळे ऐकून गर्भगळित झालेल्या वर्षानं विचारलं,
‘अगं, कुणी शिकवलं हे असलं बोलायला तुला ?’
‘कुणी म्हणजे ? आजोबांनी. ते म्हणतात, तुला कुणी किडनॅप करू लागलं, तर हे सगळं करायचं....’
वर्षानं कपाळाला हात लावला !
तसे डॉक्टर फार वक्तशीर होते. पण काही काही वेळा हे अतीच व्हायचे.
मॅडमकडे रात्रंदिवस डिलीव्हरीची सोय असल्याने बरेचदा गावाकडचे ‘अडलेले’ पेशंट रात्रीअपरात्री दाखल व्हायचे. एकदा एका मुलीची रात्री एक वाजता डिलिव्हरी झाली. नंतर चार दिवस गावाकडच्या पाहुण्यांनी दवाखाना भरून गेला. आया, बाया, साळकाया अन माळकाया यांनी बाळंतिणीला घेरून टाकले. रूमला मासळीबाजाराचे स्वरूप आले. त्यात ते बाळ दिवसभर झोपे अन बरोबर रात्री अकराला जे रडायला सुरु करी, ते पहटे पाचलाच शांत होई.
पाचव्या दिवशी रात्री बारा वाजता पाव्हण्यामधल्या एका म्हातारीने वैतागून बाळाला जराशी अफू चाटवली. झालं, ते गपगार झोपलं.
अन एक वाजता डॉक्टर माया नर्सबरोबर लगबगीनं बाळंतिणीच्या खोलीत शिरले. वाटेत आडव्या तिडव्या झोपलेल्या आया-बायांना बाजूला सारून ते थेट बाळाच्या पाळण्यापाशी गेले. चेहेरा गंभीर !
त्यांनी मायाला सांगून बाळाला पाळण्यातून खाली काढले. कॉटवर ठेवले. सहसा बाईंचे पेशंट ते तपासत नसत. पेशंटचे नातेवाईक साशंक होऊन एकमेकांकडे पाहू लागले.
‘याचे सगळे कपडे काढा !’ डॉक्टर धारदार स्वरात बोलले.
आया-बायांचे धाबे दणाणले. ज्या म्हातारीने अफू चाटवले होते, तिची तर दातखिळीच बसली.
डॉक्टरणी बाळाला तपासले. चांगले उलथे पालथे करून तपासले. ते बेटे काहीच हालचाल करत नव्हते. अफूची मात्रा चांगलीच लागू पडलेली !
‘डोळे उघडत नाही का ?’ डॉक्टरणी त्याच्या डोळ्यांच्या खालच्या पापण्या बोटाने जरा ताणल्या. बाळ एक नाही अन दोन नाही.
इकडे नातेवाईक अन आया-बायांची घाबरून पाचावर धारण बसलेली.
अखेर दहा मिनिटे चांगली कसून तपासणी केल्यावर डॉक्टरनी मान हलवली अन ‘बाळाला ठेवा’ अशी हातानेच मायाला खून केली.
मग ते बाळंतीणीकडे वळले. मायाच्या हातातला चार्ट त्यांनी आपल्या हातात घेतला अन गरजले,
‘नाव सांग’
‘ग.. ग .. गजरा’ ती चाचरत म्हणाली , ‘काय झालंय बाळाला ?’
‘पूर्ण नाव ...सासरचं ..’ डॉक्टर
‘गजरा तुकाराम नवाथे’
‘वय ?’
‘सव्वीस’
‘पत्ता ?’
‘मंगळवार पेठ, खणीच्या मागं, शिरदवाड’
पंचनामा लिहावा तसं डॉक्टरणी चार्टवर काही बाही लिहिले अन मग गर्रकन वळून ते चार्ट घेऊन बाहेर पडले.
त्यांची पाठ वळताच आया-बायांनी एकच कालवा केला अन त्या हंबरडा फोडून रडू लागल्या. त्यांना वाटलं, बाळ गेलं ! तशी माया परतून माघारी आली अन तिनं विचारलं, ‘काय झालं गं मावशांनो ?’
‘मुलाला काय झालं ?’
‘कुठं काय ? झोपलंय नव्हं ? ‘
‘मग डॉक्टर सायेब का आल्तं ?’
‘मुलाचा जलम रिपोर्ट ल्ह्यायचा ऱ्हायला होता. बाई गावाला गेल्यात म्हणून डॉक्टर आले होते. उद्या सकाळी नगरपालिकेचा माणूस यायचाय ना ! त्याला द्यावा लागतो.’
‘आन मग इक्तं उलटंपालटं का करीत हुतं बाळाला ?’
‘जलम खूण आन डोळ्याचा रंग लिहावा लागतो ना रिपोर्टात !’
अन माया निघून गेली.
तसे ते दयाळूही होते. कित्येक गरिबांना मोफत उपचार करीत . महाद्याचा वर्षानुवर्षे बारा न होणारा जुनाट दमा मात्र त्यांच्या अवघ्या एका इंजेक्शनने बरा झाला. अन त्या इंजेक्शनचे पैसेही घेतले नाहीत त्यांनी.
....असा हा डॉक्टर निव्वळ व्यसनांपायी अकाली गेला.
प्रतिक्रिया
22 Aug 2014 - 1:14 pm | एस
तुमच्या शैलीतून उतरलेला अजून एक खुमासदार लेख!
22 Aug 2014 - 1:46 pm | वेल्लाभट
गच्चपैकी हिसडा देऊन संपवलंत की हो व्यक्तीचित्रण....
अजून किस्से वाचायला मजा आली असती. अर्थात, ते गेले त्याबद्दल खेदच आहे. परंतु, आणखी उलगडली असती त्यांची व्यक्तिरेखा तुम्ही तर अजून कळले असते ते.
असो. लिखाण उत्तम ! आवडलं नेहमीप्रमाणेच.
22 Aug 2014 - 2:04 pm | तिमा
खारकर आणि खामकर यांत घोटाळा झालाय जरा.
बाकी हीच गोष्ट जीमो स्टाईलनी वाचायला किती मजा येईल !
22 Aug 2014 - 2:24 pm | अनंत छंदी
छानच रंगवलंय व्यक्तिचित्रण तुम्ही! अगदी अस्सा एक डॉक्टर नमुना माझ्या पाहण्यात आहे. :))
22 Aug 2014 - 3:32 pm | प्रसाद१९७१
डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक सौम्य धीरगंभीर, सौहार्द आणि कणवपूर्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते.>>>>>>>> डॉक्टरांमधे व्यसनांचे प्रमाण जास्त च आहे. पूर्वी तर सिगरेट चे व्यसन भरपुर डॉक्टरांना असायचे. बाकी रंगेलपणात पण डॉक्टर विषेशकरुन सर्जन पुढेच असतात.
22 Aug 2014 - 3:57 pm | कपिलमुनी
व्यक्तीचित्र छान आहे !
आमच्या गावामधले एक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आठवले..
त्यांच्या पत्नीच्या व्यभिचारी वागण्याने वैतागून दारुडा झालेला डॉक्टर ! कुठेही पडलेला.. आणि पैसे पहिजे तेव्हा फूटपाथ , स्टेशन , स्टँड वर बसायचा ..कोणितरी वही पेन द्यायचा. बघता बघता २५-३० लोकांची रांग लागायची असा डॉक्टरचा हातगुण .पैसे द्या किंवा नाही.. समोरच्या कापडावर १-२ रू किंवा ५-१० रू टाकायची लोकं..
१-२ दिवसाच्या दारूपुरते जमले की गडी चालू लागायचा..पण माणुस स्वभावाने चांगला ..फार मोठी आणि करूण कहाणी आहे .. तुमच्या लेखाच्या निमित्ताने आठवली
22 Aug 2014 - 6:02 pm | शिद
खारकर की खामकर डॉक्टर?
कारण विरारला एक नामवंत खारकर डॉक्टर आहेत व त्यांच्या पत्नीसुद्धा गायनॅक आहेत. निव्वळ योगायोग देखील असू शकतो हा.
23 Aug 2014 - 10:01 pm | जातवेद
अहो नावं बदलली आहेत, आणि तसेही शिरदवाड आहे का विरार जवळ? ते ईचलकरंजीकडे आहे.
नाही नाही म्हणत थोडे क्लू सुटलेत :) ईचलकरंजीच्या लोकांना तर्क करण्यास वाव आहे ;)
22 Aug 2014 - 7:14 pm | आदूबाळ
मस्त लिहिलंय, पण अवचित संपवलं. :(
22 Aug 2014 - 8:25 pm | रेवती
खास स्नेहाष्टाईल ष्टोरी! आवडली.
22 Aug 2014 - 8:30 pm | प्यारे१
थोडक्यात आटोपल्यासारखी वाटली. और भी आने दो!
22 Aug 2014 - 8:50 pm | सस्नेह
खरंच थोडक्यात आटोपली. अजून किस्से आहेत खारकर यान्चे. पण लेख मोठा होईल म्हणून आटोपता घेतला.
लिहू का आणखी ?
22 Aug 2014 - 9:15 pm | रेवती
लिही की! आणि संपादकांन्ला सांगून याच लेखात अॅडवलेस तर आम्ही पुन्हा एकदा प्रतिक्रिया देऊ, म्हंजे जास्त प्रतिसादही आल्यासारखे होईल. लिही लिही....
23 Aug 2014 - 5:52 am | कवितानागेश
लिही लिही अजून..
23 Aug 2014 - 9:20 am | ज्ञानोबाचे पैजार
+१
22 Aug 2014 - 9:50 pm | पैसा
अजून किस्से लिहून व्यनि कर. यातच अॅड करू.
23 Aug 2014 - 1:19 am | बहुगुणी
आत्ता कुठे मजा यायला लागली होती तर तुम्ही आटोपतं घेतलंत, मस्त व्यक्तिचित्र!
23 Aug 2014 - 1:42 am | खटपट्या
छान व्यक्तीचित्रण !!!
23 Aug 2014 - 2:07 am | सोत्रि
हे व्यक्तीचित्रण आहे की किस्से? नाही बर्याच जणांनी
असे प्रतिसासादिलेत म्हणून ही शंका, बाकी चालू दे.
- (भोचक) सोकाजी
23 Aug 2014 - 9:15 am | गवि
मूळ व्यक्तीच्या खाजगीपणाला जपण्यासाठी तुम्ही नाव बदलले असेल असे समजतो.
असे अवश्य करावे आणि नाव बदलले आहे असा उल्लेख आवर्जून करावा. किंवा मग पूर्ण काल्पनिक असेल तर तसेही स्पष्ट लिहावे. म्हणजे तशाच नावाच्या किंवा वर्णन जुळणा-या (पत्नी गायनॅक, स्विफ्ट गाडी इ) अन्य व्यक्तींशी वाचकांकडून ते जोडले जात नाही.
23 Aug 2014 - 2:34 pm | सस्नेह
मूळ नाव वेगळे आहे.
अनुभवावर आधारित लेखन करताना मी खरी नावे कधीच लिहीत नाही.
धन्यवाद, गवि.
23 Aug 2014 - 3:22 pm | सस्नेह
आणखी काही किस्से लेखात वाढवले आहेत.
23 Aug 2014 - 4:04 pm | नगरीनिरंजन
मस्त! आणखी एक खुमासदार लेख! थोडक्यात आटोपतं घेतलं असं वाटायला लावणार. अजून येऊ द्या बैजवार.
23 Aug 2014 - 4:40 pm | एसमाळी
मस्तच आधीच वाचल होत पण प्रतिसाद दिला नव्हता.आता जास्तीचे किस्से टाकलेत त्यामुळे आवडल.
23 Aug 2014 - 7:29 pm | रेवती
अॅडवलेले लेखन छान झाले आहे. मजा वाटली.
23 Aug 2014 - 7:59 pm | दिपक.कुवेत
मजा आली वाचुन आणि त्यांच्या अश्या अकाली जाण्याने वाईटहि वाटतय.
23 Aug 2014 - 10:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
लई भारी ! शेवटचा (अॅडवलेला) किस्सा भारी आहे :)
23 Aug 2014 - 10:46 pm | मुक्त विहारि
छान..
23 Aug 2014 - 11:04 pm | अन्या दातार
छान मांडलेत किस्से डॉक्टरांचे.
बादवे "अॅूश" हा शब्द कसा लिहिलात? मोजींनाही जमलेला दिसत नाही आजवर ;)
24 Aug 2014 - 7:46 am | सस्नेह
हा हा !गप्राव मेल्या !
मोजीन्च्या गुरुजीन्चा क्लास लावला होता थोडे दिवस !
24 Aug 2014 - 8:27 am | वपाडाव
वाह... उत्तम...
25 Aug 2014 - 8:46 pm | विवेकपटाईत
मजा आली. माया नर्सचे वर्णन थोडे जास्त केले असते तर बरे वाटले असते *man_in_love* *IN%%_%%LOVE* *IN LOVE*
25 Aug 2014 - 9:01 pm | प्रचेतस
खुसखुशित किस्से.
25 Aug 2014 - 9:18 pm | अजया
मस्त किस्से!
25 Aug 2014 - 10:55 pm | चौथा कोनाडा
मस्त खुसखुशीत लेखन ! सुप्पर लाईकड !
26 Aug 2014 - 12:03 am | आयुर्हित
अप्रतीम लेख!
पु.ल.वाचतोय की काय? असेच वाटले.
मनापासुन आवडला.
26 Aug 2014 - 11:16 am | सुहास..
:)
26 Aug 2014 - 11:28 am | बॅटमॅन
हा हा हा, जब्राट किस्से =)) मिरजेतही काही नमुने पाहून आहे असे ;)
26 Aug 2014 - 11:39 am | सविता००१
मस्तच. तू लिहि गं आणखी..
26 Aug 2014 - 3:51 pm | बिपिन कार्यकर्ते
छानच!