गाडी अड्डा

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
1 Aug 2008 - 10:45 am

सकाळी उठून घराच्या पडवीच्या पायरीवर बसलो होतो.
दोन हातावर जबड्याचा खालचा भाग टेकून,हाताचे कोपर गुढ्घ्या जवळ मांडीचा आधार घेवून, दोन्ही पायाचे तळवे खालच्या पायरीवर ठेवून, विचार करीत बसलो असताना, मारुतीच्या देवळाच्या दिशेने घुंघुराचा मंजूळ आवाज कानावर पडत असताना,
त्या सकाळ्च्या शांत वेळी ते सप्तसूर खूपच श्रवणीय वाटायचे.

नक्कीच बेळगांवहून बैलगाड्या येवू लागल्या असणार,आणि तीस ते चाळीस गाड्यांची एकच ताफा दिसणार,त्या ऊंच ऊंच धिप्पाड पांढऱ्या बैलांच्या जोड्या,सरळ लांबच लांब लाल पिवळी अणकुचीदार त्यांची दोन दोन शिंगे,एक एक शिंगावर ओवलेले छोटे छोटे घुंघरु,प्रत्येक बैलाच्या गळ्यात दुपदरी मोठ्या घुंघरांची लोंबत्या माळा, कधी कधी आंबोली घाटात चिक्कार थंडी पडत असल्याने बैलाना थंडी वाजूनये म्हणून त्याच्या पाठीवर घातलेली रंगीत गोणपाटाची शाल,बैलांच्या मानेवर आधार घेवून T आकाराच्या त्या जूंवमधल्या दांडीवर गाडीला जोडल्या जाणार्‍या टोकावर बैठक मारून बसलेला तो बेळगांवचा घाटी "पावणा (पाहूणा) " पाहून मजा यायची. पावणा गाडीतून खाली उतरला की लांब लचक झब्बा वरून असल्यामुळे कमरेखाली काय घातलं आहे हे पहाण्याची काही जरूरी वाटत नसायची,डोक्याला मुंडासं,आणि खांद्दयावर बैलाला मारण्याचा चाबूक एव्हडाच त्याचा पेहराव.

जरा मोठ्याने ओरडून जणू जुनीच ओळख आहे असा अविर्भाव करून
"काय पावणं गाडीत काय आणलंत?"
असा नेहमीचाच प्रश्न विचारल्यावर नेहमीच मिळणार्‍या उत्तराचे अपेक्षीत शब्द कानावार यायचे
"गुळ आनि ऊंस आनलं बघा! "
नंतर एक दोन पासून तीस चाळीस पर्यंत बैलाच्या गाड्या मोजायच्या.शेवट्च्या गाडीच्या "पावण्याला" तोच प्रश्न विचारल्यावर तेच उत्तर यायचं.
अशी ही रांग सरळ बाजाराच्या दिशेने जात रहायची आणि त्यानंतर गुंडू जोश्यांच्या किंवा टांककारांच्या किंवा बागायतकरांच्या वखारी जवळ येवून थांबायची.
ह्या लोकांचे दलाल, बरोबर तो तो माल त्या त्या वखारीत नेवून उतरायचे. त्यात घाटावरून आणलेल्या गुळाच्या ढेपी,घाटावरचा ऊंस,गुरांसाठी उंसाची चिपाड घालून वैरणमिश्रीत पेंडींचे मोठे मोठे तुकडे,बटाट्याची पोती,घाटावरचा कांदा,शेंगदाण्याची पोती वगैरे,वगैरे. अर्थात एव्हढा माल उतरून घ्यायला बराच वेळ जायचा.मधल्या वेळात आमचे हे घाटावरचे पाहूणे दुपारची वेळ बाजारातल्या तेंडुलकरांच्या "हाटलातून" उसळ पाव,कांद्दयाची भजी आणि चहा घेवून माल उतरून, रिकाम्या झालेल्या गाड्या, द्लाल सांगतील तिथे नेवून, परत कोकणातून घाटावर जाणारा माल भरण्यासाठी नेत असत.माल भरत असताना बैलाना चारा आणि वैरण देवून त्यांची आपल्या सारखी दुपारची पोटपुजा करून घेत.

कोकणातून जाणारा माल म्हणजे केरसुण्या,सुपे, रवळ्या,सुकी मासळी, आंबसोलं, फणस,फुले,काही गाड्यातून जळावू लाकडे,सावंतवाडीहून जाणारे लहान मुलांचे लाकडी खेळ,कोकणातला ऊंस वगैरे माल भरून घ्यायचे. दुपार ऊलगता ऊलगता मासळी बाजारातून संध्याकाळच्या जेवणासाठी "उकडे तांदूळ,मिठमिरची सुकी मिरची आणि मासळी बाजारातून "मांसं" विकत घ्यायला " पावणं " विसरत नसत.दिवस संपता संपता मासळी बाजारात कोळणी कमी किंमतीत उरलेली मांसळी असल्या गिर्‍हाईकाला विकून टाकण्याची संधी दवडत नसत.भरभरलेल्या पिशव्या घेवून आपआपल्या बैलगाडीकडे जाताना कुणी विचारलं
"काय पावणं मासळी बाजारातून काय खरेदी केलीत? "
तर म्हणायचे "बांगडं" मग तो कुठचाही मासा असला तरी "बांगडं घेतलं" म्हणून सांगायचे.

आता हा कोकणातला माल घेवून जाणार्‍या सर्व बैलगाड्या गाडीअड्ड्याच्या दिशेने निघायच्या.
ही गाड्यांची रांग पुढे कोपरावरच्या कॅनरा बॅंकला वळसा घालून तांबळेश्वर मंदीराच्या दिशेने पुढे सरकायच्या आणि आमच्या घराच्या पोरसाच्या मागे गाडी अड्ड्यात येवून विसावायच्या.आंत शिरताना, अड्डा म्युनिसीपालीटीचा असल्याने चौकीवरचा शिपायी प्रत्येक गाडी मागे, पार्कींग चार्ज घ्यायचा.गाडीच्या मागून बाहेर आलेल्या ऊंसाच्या बंडलातून एखादा ऊंस ओढून घेवून चौकीत घरी नेण्यासाठी ठेवायला विसरायचा नाही.
"तळां राखतलो तो पाणी चाखतलोच नाय ?"
असा निर्लज्यासारखा प्रश्न स्वतःलाच पुटपुटायला पण विसरायचा नाही.

आतापर्यंत स्रर्व बैलगाड्या अड्ड्यात मिळेलत्या जागी झाडाखाली उभ्या राहून विसावा घेण्याच्या तयारीला लागायच्या."हो,हो,हो" किंवा "प्यु,प्यु,प्यु " असा पुढच्या दोन ओठांचा चंबू करून बैलाना मानेवरच्या जूं पासून निराळे करण्यात आणि हलकेच बैल बाजुला झाल्यावर सर्व गाडीचा भार जमिनीवर टेकवायचे.गाडी चाकावर पुढे मागे होवू नये म्हणून दोन्ही चाकांच्या मागे आणि पुढे अडती लावायला विसरत नसत.मोकळे झालेल्या बैलाना गाडीलाच बांधून त्यांच्या समोर गवताच्या जुड्या मोकळ्या करून बाजूच्या विहीरीतून पाण्याची बादली भरून आणून ठेवायचे.आणि मग आपल्या संध्याकाळच्या जेवण तयार करण्याच्या तयारीला लागायचे.

वहिवाटीने गाडीअड्ड्यात प्रत्येक झाडाखाली चीर्‍याच्या दगडांच्या तिन दगडांच्या चुली असायच्या त्यात जळावू लाकडांची आग करून एका कळकट ऍलिमिनीयमच्या मोठ्या टोपात उकडे तांदूळ धुवून भात करायला ठेवायचे.बाजूलाच पडलेल्या एखाद्दया गुळगुळीत असलेल्या दगडावर "बांगडं" कोयत्याने कापून साफ करून, तसल्याच पातेलीत ठेवायचे आणि मग येताना आणलेल्या पाट्यावरवंट्यावर बाजारातून आणलेला मिठमसाला आणि सुकी मिरची बारीक वाटून त्याची माश्याच्या आमटी साठी गोळी करून ठेवायचे.तोपर्यंत भात शिजून तयार झाल्यावर, मासे शिजवायला पातेलं चढवायचे." बांगडं " फोडणीला
टाकल्यावर ती आमटी ढवळायला झाडाच्या फांद्दयावरची एखादी लहानशी डहाळी तोडून त्याच्यावरची पानं काढून,धुवून ती डहाळीच आमटी ढवळायला वापरायचे.

साधारण तिन्हीसांजा व्हायला येई पर्यंत गाडीतच वामकुक्षी घ्यायचे.तेव्हडीच त्यांना विश्रांती मिळायची. जाग आल्यानंतर मात्र एकमेकाला उठवून सगळे मिळून एकेठिकाणी बसून भात आणि " बांगडं "आणि त्याची आमटी यावर ताव मारून जेवायचे.लालबुंद तिखट आमटी आणि भात जेवताना नाकातून पाण्याची धार लागायची.मग गाडीत चुकून उरलेला एखादा गुळाचा खडा तोंडात टाकल्यावर बरं वाटायचं.

उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही वेंगुर्ल्याला गेलो की आमच्या पोरसातल्या मागच्या गडग्यावर(मागच्या भिंतीवर) बसून त्यांना जेवताना बघूनच आमचं पोट यथेच्छ भरून घ्यायचो.
"पावणं, एव्हडं तिखट,तिखट जेवण तुम्हाला जेवायला कसं काय जमतं "
असं विचारल्यावर
"कोकनी मिरची,लंय तिखट असते बाबा! पन आम्हाला लंय चांगली वाटते"
असं आपलं प्रामाणिक मत द्दयायचे.

जेवण वगैरे आटोपल्यावर मंद कंदिलाच्या दिव्यावर ह्ळू आवाजात एखादा भजनाचा कार्यक्रम व्हायचा.दुरून येणारा त्यांचा गाण्याचा आवाज आम्हाला घरात ऐकायला यायचा.रात्रीच्या शांत वातावरणात अधून मधून झांझांचा आवाज विलोभनीय वाटायचा. जेवणं आटोपून आम्ही पण झोपी गेल्यावर मध्य रात्री बारा वाजायच्या पूर्वी किंचीत जाग आल्यावर झोपल्या जागीच पुन्हा घुंघुरांचा तोच आवाज स्पष्ट अस्पष्ट कानावर यायचा.आणि शांत झोप यायची.
सकाळी उठून मागच्या पोरसात जावून गाडी अड्ड्याकडे नजर टाकल्यावर सर्व अड्डा रिकामा झालेला दिसायचा.
मध्य रात्रीच हे घाटावरचे " पावणं " पुन्हा परतीच्या मार्गावर बेळगांवच्या दिशेने रात्री बारा वाजताच निघून गेले होते. तो घुंघुरांचा रात्रीचा आवाज त्यांच्या परतीच्या प्रवासाची सप्तसुरात चाहूल देत होता.
आता काय, बैलगाड्या गेल्या आणि ट्रक आले.तिस चाळीस बैलगाड्या ऐवजी सर्व काम, तिन चार ट्रक बेळगांवहून माल आणण्यात पुरं पडायचे.सकाळीच ते ट्रक आल्याची खूण म्हणजे त्यांचा हॉर्नचा कर्कश आवाज आणि पेट्रोल जळल्याची असह्य घाण नाकात शिरून नकोशी व्हायची.
तेंडुलकरांच्या " हाटलात " आता कोण जाणार?
" रामभरोसे लॉजींग आणि बोर्डींग " मधे हे तिन चार बेळगांवचं " पावणं" कोट,टोपी,लेंगा घातलेले " ट्रक डायवर " म्हणून दुपारच्या जेवणाला जायचे.

"काय पावणं गाडीत काय आणलंत?"
असा प्रश्न आता कोणाला विचारणार?
घरासमोरून भर्कन निघून गेलेले ते ट्रक गाडीअड्ड्यात आता कशाला येणार?." रामभरोसे मधे" दुपारचे जेवण आटोपल्यावर परत कोकणातला माल घेवून त्याच संध्याकाळी ते बेळगांवला मुक्कामाला जायचे.

सकाळीच पडवी समोरच्या पायरावर आता बसल्यावर,सकाळच्या शांत वेळीचे ते सप्तसूर आणि ते घुंघुराचे आवाज अजुनही कानांत घुमत असतात.

श्रीकृष्ण सामंत

राहणीलेख

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

1 Aug 2008 - 4:08 pm | लिखाळ

वा ! सामंतकाका,

जेवणं आटोपून आम्ही पण झोपी गेल्यावर मध्य रात्री बारा वाजायच्या पूर्वी किंचीत जाग आल्यावर झोपल्या जागीच पुन्हा घुंघुरांचा तोच आवाज स्पष्ट अस्पष्ट कानावर यायचा.आणि शांत झोप यायची.

लेख फारच आवडला. फार छान नीरिक्षण आणि वर्णन ! मजा आली वाचायला. अजून असे लेख वाचायला नक्कीच आवडतील.

अवांतर : (बरं वाटायचं., भरून घ्यायचो... इत्यादी..) असा सर्व लेख चालू भूतकाळात असताना मध्येच (मध्य रात्रीच हे घाटावरचे " पावणं " पुन्हा परतीच्या मार्गावर बेळगांवच्या दिशेने रात्री बारा वाजताच निघून गेले होते. तो घुंघुरांचा रात्रीचा आवाज त्यांच्या परतीच्या प्रवासाची सप्तसुरात चाहूल देत होता.) ही पूर्ण भूतकाळातील दोन वाक्ये वाचताना अडखळायला झाले.

लेख उत्तमच !
--लिखाळ.

धनंजय's picture

1 Aug 2008 - 5:15 pm | धनंजय

असेच वेगवेगळे अनुभव येऊ देत.

झकासराव's picture

1 Aug 2008 - 6:52 pm | झकासराव

छानच लिहिल आहात. :)
माझ्या घराजवळुन कसबा बावड्याच्या उसाच्या कारखान्याला बैलगाड्या जायच्या.
त्या बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज ऐकताना मस्त वाटायच.
हा आवाज अनेक वर्षे ऐकलाच नव्हता. आणि तो किती मधुर होता हे एका पहाटे कळाले.
पुण्याहुन रात्री निघुन पहाटे ५ च्या आसपास कोल्हापुरात पोहचलो होतो.
स्टॉप वर उतरुन घरी जात असताना वाटेत बैलगाड्यांची रांग लागली. सगळे कारखान्यात उस घालुन परत जात होते.
त्यांचा दिवस सुरु झाला होता. आणि त्यांच्या घुंगरांचा तो अप्रतिम असा आवाज ऐकुन माझा दिवस एकदम फर्मास सुरु झाला.
लेख वाचुन एकदम ती आठव्ण आली :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

श्रीकृष्ण सामंत's picture

2 Aug 2008 - 12:13 am | श्रीकृष्ण सामंत

लिखाळजी,धनंजयजी, झकासराव
आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्राजु's picture

1 Aug 2008 - 8:38 pm | प्राजु

सामंतकाका,
तुमचा हा लेख मला सर्वात जास्ती आवडला. बैलगाड्यांचं आणि त्या "पावनं" लोकांचं निरिक्षण जबरदस्त केलं आहे. संपूर्ण लेख असा आहे की, लिहिलेलं सगळं डोळ्यांपुढे येत आहे...
सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

2 Aug 2008 - 12:21 am | श्रीकृष्ण सामंत

प्राजुजी,
आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.आभार
आपल्या कोल्हापुरकडून सुद्धा खूप गाड्या कोकणात माल घेऊन यायच्या.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अमित खोजे's picture

14 Sep 2016 - 8:21 pm | अमित खोजे

जुने लेख उकरून काढायला अन त्यांचा आस्वाद घ्यायला मजा येते. सुंदर लेख. डोळ्यासमोर चित्र उभे केलेत अगदी!

अभिजीत अवलिया's picture

14 Sep 2016 - 8:55 pm | अभिजीत अवलिया

मस्त सामंत काका. आमच्या कणकवलीतून आता कोकणाचा अंश जवळपास नाहीसा होत आलेला आहे. पण वेंगुर्ला अजूनही कोकणचे रुपडे बाळगून आहे. खूप आवडते ठिकाण आहे माझे वेंगुर्ला.

रेवती's picture

15 Sep 2016 - 7:04 am | रेवती

लेखन आवडलं.

सिरुसेरि's picture

15 Sep 2016 - 1:42 pm | सिरुसेरि

सुंदर आठवणी

यशोधरा's picture

15 Sep 2016 - 1:49 pm | यशोधरा

काय सुरेख लिहिलंय!

श्रीकृष्ण सामंत's picture

17 Sep 2016 - 8:48 am | श्रीकृष्ण सामंत

जुने लेख उकरून काढायला अन त्यांचा आस्वाद घ्यायला मजा येते.
असं अमित खोजे म्हणतात.

मी आतापर्यंत मिपावर ३५०च्यावर लेख लिहिले आहेत.त्यातील काही लेख तुम्हाला खचितच आवडतील.

सुचना-
मिपावर येणारे ताजे लेख वाचून झाल्यावर आणखी एखादा लेख वाचायला एनर्जी असेल तर माझ्या लेखनातला एखादा लेख हुडकून काढून वाचावा.
(लेखावरचे प्रतिसाद,प्रतिप्रतिसाद,प्रोत्साहन,टीका,वगैरे वगैरे वाचायला मजा येईल)

संदीप डांगे's picture

17 Sep 2016 - 11:46 am | संदीप डांगे

खूप सुंदर! वर्णन अगदी एक नंबर, आवडले!

डोळ्यांसमोर चित्र उभं केलंत अगदी!!!

विवेकपटाईत's picture

18 Sep 2016 - 9:36 am | विवेकपटाईत

मस्त आवडले.