पुलंची अनेक पुस्तके अनेकांनी वाचली असतील आणि त्यातील बरेच उतारे कैकांच्या लक्षात असतील. पण टिपिकल 'पु.ल. कॅनन' मध्ये 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' या छोटेखानी परंतु अप्रतीम पुस्तकाचा समावेश होत नाही. तुलनेने या पुस्तकाचे वाचक कमी आहेत असे चर्चेवरून लक्षात आले. मिपाकरांपैकी बर्याच जणांना हे पुस्तक नक्की माहिती असेल यात शंका नाहीच, पण सामान्यतः या पुस्तकाबद्दल व्हावी तितकी चर्चा होताना दिसत नाही हेही तितकेच खरे. तस्मात हा धागा या पुस्तकाबद्दल चर्चा करण्यासाठी काढलेला आहे. या पुस्तकातील आवडते उतारे, याची प्रेरणास्थाने, इ.इ. सर्व प्रकारची चर्चा होणे इथे अपेक्षित आहे. चर्चाच फक्त नको, आवडते उतारे टंकले तरी चालेल. इन फ्याक्ट, मी सुरुवातही तिथूनच करणार आहे.
थोडी पार्श्वभूमी:
हे पुस्तक म्हणजे कै. वि.ल. भावे यांच्या 'महाराष्ट्र सारस्वत' नामक अप्रतिम ठोकळ्याचे तितकेच जबराट विडंबन आहे. वरिजिनल पुस्तक इथे वाचायला मिळेल. माझे स्मरण बरोबर असेल तर हे पुस्तक अरविंद कोल्हटकर यांनी अपलोड केलेले आहे. याची प्रथमावृत्ती १९१०-१५ च्या आसपासची आहे.
https://archive.org/details/MaharashtraSaraswatBhaveWithSupplementFull
मुकुंदराज-महानुभाव इ. पासून ते पार रामजोश्यांपर्यंत मराठी वाङ्मयाची आठ शतके या पुस्तकात विवेचिली आहेत. जुन्या मराठी वाङ्मयाचा लोकांना अजून उत्तम तर्हेने परिचय होण्यास कारणीभूत ठरलेली पुस्तके दोन- एक म्हणजे उपरोल्लेखित महाराष्ट्र सारस्वत, तर दुसरे म्हणजे परशुरामतात्या गोडबोले यांनी 'मेजर क्यांडी' च्या हुकुमावरून संपादिलेले महाराष्ट्र कवींच्या वेच्यांचे पुस्तक- नवनीत. इंग्रजीत जशी फ्रान्सिस टर्नर पाल्ग्रेव्हची गोल्डन ट्रेजरी आहे तसे मराठीसाठी नवनीत आहे. यद्यपि पाल्ग्रेव्हमध्ये शेक्सपीअरपूर्व कवी फारसे नाहीत, बेवुल्फ तर नाहीच नाही. पण नवनीतात ज्ञानेश्वरपूर्व कवी उदा. मुकुंदराज हेही आहेत.
https://archive.org/details/navanitorselecti025346mbp
नवनीताची प्रथमावृत्ती १८५४ च्या आसपासची आहे. एक नवी आवृत्ती १९९८ साली आली, परंतु त्यानंतर हे पुस्तक पुनरेकवार औटॉफ प्रिंट गेलेले आहे. १९९८ सालच्या आवृत्तीस शांता शेळक्यांची छान प्रस्तावना आहे.
मला स्वत:ला वैयक्तिक ही दोन पुस्तके प्रचंड आवडतात. ब्रिटिशपूर्व आणि खर्या अर्थाने 'जुन्या' मराठी कवितेचा इतका विनासायास आणि तोही साकल्याने परिचय नवनीत करून देते, तर सारस्वतात चरित्रात्मक माहिती, कवीच्या काव्यगुणाची चर्चा, थोडीशी तुलना, काही बाबतींत 'मॉडर्न' कवितांमधील आशय आणि जुन्या कवितांमधील आशय यांची तुलना करून 'आमच्याकडेही मैत्री, इ. सारखे विषय काव्यांत चर्चिले जातात याची एतद्देशीय विद्वानांस खात्री पटून त्यांची लज्जा थोडी तरी रक्षण होईल' अशी टंगिनचीक टिप्पणीही केलेली आहे.
ऐतिहासिक जाणिवेबरोबरच साहित्यिक आत्मभान प्रदान करण्यात या दोन पुस्तकांचे योगदान अतिशय प्रचंड आहे. इतःपर हे वाङ्मय त्या त्या क्षेत्रातील अभ्यासक सोडून कोणी वाचतील याची शक्यता नगण्य आहे. तरी संतवाङ्मय अजूनही जिवंत आहे. पंतकाव्य आणि तंतकाव्य मात्र झपाट्याने विस्मृतीच्या वाटेला लागलेले आहे.
त्यातही तंतकाव्य हे लावणीरूपाने काही अंशी का होईना, तगून आहे-यद्यपि पोवाडे इ.इ. बद्दल नवे प्रयोग फारसे कधी ऐकले नाहीत. पण पंतकाव्य मात्र संपलेच जवळपास. वामन-रघुनाथ-मयूर हे पंतत्रय आज अतिशय मरतझुरत कुठेतरी दिसते. ल.रा. पांगारकरांनी मोरोपंतांचे ६०० पानी चरित्र १९०७ साली लिहिले, तो चरित्रलेखनात साकल्याच्या दृष्टीने पाहिला तर मराठीत तरी वस्तुपाठ ठरावा- विशेषतः बिगरराजकीय आणि ब्रिटिशपूर्व व्यक्तीबद्दल.
इतिहास, वारसा, इ. बद्दल आपली व्यवछेदक अनास्था पाहिली तर काव्येतिहासकार, इ. बाकी लोकांचे ऋण मान्य करूनही मी म्हणेन की सारस्वतकार आणि नवनीतकारांचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत. वि.ल. भाव्यांचा मिठागराचा व्यवसाय होता, त्यानिमित्ताने ते जिथे जात तिथे जुनी हस्तलिखिते, इ. चा संग्रह करीत, दंतकथा इ. टिपून ठेवत. महानुभाव पंथीयांची शिक्रेट लिपी उलगडून दाखवण्यासाठी तत्रस्थ मठाधिपती महंतांना कन्व्हिन्स करणे गरजेचे होते. भाव्यांचे महानुभाव महंतांशी चांगले संबंध असल्याने महानुभाव ग्रंथ प्रकाशित करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतलेला होता.
या लोकांनी जितके टिपून ठेवले त्यापलीकडे 'कच्चा माल' मिळण्याची शक्यता आज तरी खूपच कमी आहे. हस्तलिखिते मिळतील, परंतु त्या जुन्या परंपरेतली काही नवी मौखिक माहिती मिळणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे 'प्राचीन मराठी साहित्येतिहासकार कॅनन' मधली ही दोन अत्यावश्यक पुस्तके आहेत. झाडून सगळे कवी इथे भेटतात, टेक्स्टबुकांमधील लेखकपरिचयाच्या प्यारेग्राफभर माहितीपलीकडची माहिती मिळते आणि पुनःप्रत्ययाचा आनंद होतो. रघुनाथपंडितांच्या नलदमयंतीस्वयंवराख्यानामधील चूर्णिका असो, किंवा नरहरीच्या गंगारत्नमालेतील तो कटाव म्हटल्यावर पहिल्यांदा डोळ्यांसमोर येणारा कटाव असो (ईव्हन अॅट द कॉस्ट ऑफ अमृतराय कटाव) नैतर पंतांची समासाने लगडलेली आर्या असो, शेवटी सगळे तिकडेच मिळते. दासोपंतांबद्दलच्या विविध आख्यायिका, वामनपंडितांच्या पोथ्यापुस्तकांचे ओझे वाहणारा उंट आणि त्यांचे खरोखरीच 'स्वयं'पाक करवणारे कट्टर वैष्णव सोवळे, रामजोश्यांचे प्रत्युत्पन्नमतित्व, पंतांची ऋजुता, रामदासांच्या काव्यातले ओज, सगळे तिथे चवीपुरते मिळते अन मूळ ग्रंथ वाचायची तात्पुरती का होईना, प्रेरणा मिळते.
================================================================================
इतका समृद्ध कच्चा माल, आणि त्यातून पुलंसारखे विनोदसम्राट! मग गाळीव इतिहासाला बहर येणार हे काय वेगळे सांगायला पाहिजे? तस्मात उतार्यांना सुरुवात करतो. खरेतर अख्खे पुस्तकच टंकावे लागेल, पण ठीके.
"ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या देशात ज्याला आपण मराठी म्हणतो ती भाषा बोलतात. आता इथली भाषा मराठी असण्याचे कारण म्हणजे इथल्या लोकांना ही एकच भाषा येते हे होय! मुसलमानांनी उर्दू शिकवायचा प्रयत्न केला व तोबा तोबा म्हणत परत गेले. विशेषतः मिरज आणि सावंतवाडी येथील मुसलमानांचे उर्दू ऐकून औरंगजेबाने हाय खाल्ली आणि बर्हाणपुरी प्राण सोडला. पुढे पेशवाई आल्यावर वकीलसाहेब दरबारात, आणि वकिलीणबाई करोलबागेत उर्दू बोलावयाला लागल्यावर 'हल्ला चालेल, पण उर्दू आवरा' अशा मागण्या आल्या. शिवकालीन मराठ्यांनीही तत्कालीन शिव्यांची मराठी-उर्दू अपशब्दकोशातील उर्दू रूपे उच्चारून यवनांस हैराण केले. तात्पर्य, येथील लोकांस अन्य भाषा येत नसल्यामुळे इथली भाषा मराठी आहे. पुढे इंग्रजाने एक आपली भाषा शिकवायचा निकराने प्रयत्न केला. पण दीडशे वर्षांच्या अव्याहत परिश्रमांनंतरही ब्याट, ब्यांक, ब्याडमिंटन, गूड ह्याबिट्स यांड ब्याड ह्याबिट्स वगैरे ऐकून स्वतःचे इंग्रजी सुधारावयाला तो मायदेशी परतला."
प्रतिक्रिया
19 Jul 2014 - 2:24 pm | प्रचेतस
जबरी रे.
'पुलकित' लेखन आवडत नसल्याने हे पुस्तक वाचलेले नव्हते. आता मात्र वेगळ्या विषयामुळे हे वाचावे लागणार असे दिसत आहे.
हे मुकुंदराज कवी बहुधा देवगिरीच्या यादवांचे दरबारी होते ना? सिंघण का कृष्णदेव यादव?
19 Jul 2014 - 2:45 pm | मृगनयनी
मस्त!!.. बॅटमन... थॅंन्क्स...
काही गोष्टींच्या आपण शोधात असतो.. नन्तर विसरूनही जातो.. पण "अश्या" अचानक त्या समोर येतात... आणि आनन्द होतो... :)
शेवटचा टाकलेला 'पॅरा' 'लय भारी'!!... :) .. :)
19 Jul 2014 - 4:37 pm | टवाळ कार्टा
एका अप्रतिम गोष्टीला मुकणार :(
19 Jul 2014 - 5:53 pm | प्रचेतस
जौद्या हो. चालायचंच.
आवड आपली आपली.
19 Jul 2014 - 3:09 pm | आतिवास
माझं आवडतं पुस्तक.
विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक!
हल्लीच्या अस्मिता नाजूक झालेल्या काळात पुल असं पुस्तक लिहू शकले नसते, त्यांना कदाचित हे पुस्तक मागे घ्यावं लागलं असतं ही जाणीव दु:खद आहे खरी.
त्यातला माझी आवडती वाक्यं: 'दासबोध' हा समर्थांचा फार प्रसिद्ध ग्रंथ. व्याख्यानाच्या पूर्वतयारीला ह्या ग्रंथासारखा ग्रंथ नाही. 'यत्न तो देव जाणावा', 'सामर्थ्य आहे चळवळीचे', 'धटासी असावे धट' असे खूप तुकडे श्रोत्यांवर फेकण्यासाठी मिळण्याची इथे सोय आहे. ह्या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर लेखक समासाची जागा कोरी सोडतात; दासबोधात समास लिहून इतर जागा कोरी सोडली आहे. म्हणून दासबोधातील समास म्हणजे लिहिलेला भाग. पुष्कळ लोक दासबोध वाचून कोरे राहतात ह्याचे हेही कारण असेल.
19 Jul 2014 - 4:35 pm | संजय क्षीरसागर
दासबोधातली मूर्खाची इतकी लक्षणं वाचल्यावर, नक्की शहाणा कुणाला म्हणायचं हा प्रश्न पडतो!
19 Jul 2014 - 4:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रामाणिकपणे मागे वळून पाहिले तर प्रत्येकाला या जगात सर्वकाळ / सर्ववेळ शहाणा असा कोणीच नाही हेच दिसेल... ;)
19 Jul 2014 - 7:27 pm | संजय क्षीरसागर
गर्भित अर्थ वेगळा आहे.
19 Jul 2014 - 9:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
वरचं मत माझं स्वतःचं आहे :)
आणि "मागे वळून पाहताना" म्हणजे "स्वतःच्या भूतकाळाकडे प्रामाणिकपणे पाहताना" असा साधा सरळ अर्थ आहे... काहीही गर्भित नाही. :D
21 Jul 2014 - 5:10 pm | धन्या
लोक ऊठता बसता "दासबोधाच्या अमक्या दशकाच्या तमक्या समासात असं असं म्हटले आहे" असं का म्हणतात याचे कारण आता कळले.
घरी असलेली दासबोधाची प्रत अधून मधून वाचायला हवी.
19 Jul 2014 - 3:15 pm | स्वाती दिनेश
विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक!
असेच म्हणते,
स्वाती
19 Jul 2014 - 3:17 pm | साती
लेखाबद्दल आणि लिंकबद्दल धन्यवाद!
19 Jul 2014 - 4:13 pm | टवाळ कार्टा
मी वाचले आहे...हटके पु.ल.
19 Jul 2014 - 4:21 pm | स्पा
मस्त रे खाटुक म्याना
19 Jul 2014 - 4:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेख आणि दुव्यांसाठी धन्यवाद !
मराठीचा अभिमान असणार्यांकडूनही कळत नकळत मराठीकडे दुर्लक्ष होत असते हे या लेखावरून अधोरेखित होते हे नक्की. मात्र मराठीला केवळ राजभाषा (राज्यापुरती) म्हणून नव्हे तर अर्थकारणाची (भाषेच्या वापराने / अभ्यासाने बर्यापैकी सुखसमाधानाने राहण्याइतपत तरी अर्थार्जन होऊ शकेल अशी) भाषा म्हणून महत्व आल्याशिवाय तिच्यावर पुरेसे लक्ष केंद्रित होणार नाही हेही तितकेच नक्की. असो.
"मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास" कुठे मिळू शकेल का ?
19 Jul 2014 - 5:53 pm | प्रचेतस
हे पुस्तक अप्पा बळवंत चौकातील दुकानांत, कुठल्याही मराठी पुस्तक प्रदर्शनात किंवा बुकगंगावर मिळू शकेल.
19 Jul 2014 - 6:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
19 Jul 2014 - 6:21 pm | मनीषा
तुम्ही पुण्यात असाल तर , अत्रे हॉल जवळ 'अक्षरधारा' , किंवा डेक्कन जिमखन्यावर 'पॉप्युलर' इथे मिळू शकेल कदाचित
19 Jul 2014 - 4:55 pm | वाडीचे सावंत
मी वाचलंय हे पुस्तक... एकदम भन्नाट आहे... तुमचा लेख पण तसाच भन्नाट...
19 Jul 2014 - 5:39 pm | मनीषा
गाळीव इतिहास वाचलेलं आहेच .
त्या काळात असलेली सांस्कृतिक आणि साहित्यिक सहिष्णुता हल्ली कमी झाली आहे असे वाटते.
तुम्ही दिलेल्या दुव्यांबद्दल आभार .
@ आतिवास
विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक!
+१
19 Jul 2014 - 6:13 pm | प्यारे१
वाचलंय. मुखपृष्ठावर वसंत सरवटेंचं चित्र आहे. पुलंचा सशाचे दात दाखवणारा मोठा चेहरा नि मागे बरीच पुस्तकं... असं काही! नीटसं आठवत नाही.
नामदेव महाराजांच्या फॅमिलीबद्दल पण एक लेख आहे मोस्टलि.
पुलंचं एक छान पुस्तक.
19 Jul 2014 - 7:41 pm | अत्रुप्त आत्मा
पुलंच्या सुप्परडुप्पर खेळीतली ही एक खेळी आहे. हा (खास पु.ल.श्टाइल) विडंबनाचा फॉर्मॅट इतका जब्बरदस्त आहे..की मूळ ग्रंथ वाचलेले नसतांन्नाही विडंबनातील प्रभावी उपहास आणि त्यातून पु.ल.काळातल्या साहित्य विश्वाला मारलेले मर्मभेदक बाण.. अशक्य कोट्या.. यामुळे आपण हसून हसून घायाळ होतो.(कै कै जणांची तर अत्यंत खतरनाक खांडोळी केलेली आहे! =)) ) माझ्यामते गद्य विडंबनातलं,हे एक श्रेष्ठतम स्वरुपाचं विडंबन आहे. माझ्यादृष्टीनी यातली उदाहरण/वेचे देणं, हा प्रकार ग्रंथाची ओळख सांगण्यासाठी ठीक.पण ओळख होण्यासाठी ते पुस्तक वाचण्याशिवाय दुसरा तरणोपायच नाही.त्याचा दुसरा भाग(क्रमशः र्हायलेला..! :( ) मला वाटतं-पुरचुंडी किंवा उरलं-सुरलं या पुस्तकात आलेला आहे. तो ही तेव्हढाच परिणाम कारक! पुलंचे साथिदार-वसंत सरवटे यांनी मुखपृष्ठावर काढलेलं व्यंगचित्र म्हणजे तर अशक्य..अफाट आहे! आत काय आणि कसल्या कडक दर्जाचं वाचायला मिळणार आहे,याचा ट्रेलरच आहे तो!
![http://www.bookganga.com/eBooks/Content/images/books/02ed3e7c227b4804a0697c4ffefc9848.jpg](http://www.bookganga.com/eBooks/Content/images/books/02ed3e7c227b4804a0697c4ffefc9848.jpg)
चित्र फोटो:- बुकगंगा..साभार!
19 Jul 2014 - 9:29 pm | विजुभाऊ
या पुस्तकातले " कुमारी ळ " चे चित्र लैच भारी आहे
19 Jul 2014 - 10:42 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
" कुमारी ळ " आणि ग्रंथभार!. =))
20 Jul 2014 - 12:31 am | चलत मुसाफिर
१.
लीळाचरित्राबद्दल लिहिताना पु. ल. म्हणतातः "सध्या विद्यापीठांत पी एच डी मिळवण्यासाठी चालणाय्रा लीळांच्या तुलनेत या चरित्रातील लीळा सपक आहेत."
---
२.
एलिचपूरच्या एका पोथीत ब्राह्मण-नापित संवाद आहे.
ब्राह्मण, अशुद्ध मराठीत - "नापिता, क्षौर करावे एवं ईप्सा"
नापित, शुद्ध मराठीत - "काय म्हंतोस रं बामना"
ब्राह्मण(अभिनये वर्तवीत) - "क्षौर रे, नापिता !"
नापित - "हात्त्याच्या! डुई करायची म्हना की भटजीबुवा, तिच्यायला..." (यापुढील शब्द आपल्याला लागत नाहीत. पण ब्राह्मणाला लागल्याशिवाय राहिले नसतील.)
20 Jul 2014 - 12:40 am | किसन शिंदे
पुलंचे पुस्तक वाचले नाही पण त्यातले काही उतारे वाचल्याचं आठवतंय. नवनीतबद्दल मागे दिड-दोन वर्षांपूर्वी तुझ्याशी बोलण्याच्या ओघात ऎकलं होतं तेव्हाच डाऊनलोड करून वाचलं होतं. अत्यंत सुंदर संग्रह आहे मराठीतल्या आद्यकवींचा.
रच्याकने, हे असलं काही फार छान लिहितो रे तू!
20 Jul 2014 - 12:47 am | अर्धवटराव
अनेक वर्षे झाली हे पुस्तक वाचुन. मराठेशाहिचं श्राद्ध उरकुन मोतिचुराच्या ढिगावर तुटुन पडणारा ब्रह्मवृंद याच पुस्तकातला का ? आता नीट आठवत नाहि.
20 Jul 2014 - 1:19 am | बॅटमॅन
सर्वप्रथम, सर्व गाळीव चाहत्यांना एक 'हाय फाईव्ह'!!! स्पेसिफिकली हे पुस्तक आवडणारे बरेच लोक आहेत हे पाहून लय आनंद झाला लोकहो, बहुत धन्यवाद!
वल्ली-हे एक पुस्तक तरी तू वाचलेच पाहिजेस. नाय हसून फुटलास तर ब्याटपॉड सोडीन. बाकी मुकुंदराज नक्की कुणाच्या पदरी होता हे ठाऊक नाही. पण त्याने ग्रंथरचनेबद्दल प्रेरणा व फंडिंग यासंबंधी उल्लेख केलेला आहे तो म्हणजे - नृसिंहाचा बल्लाळू | तेयाचा कुमरू जयंतपाळू | तेणे करविला हा रोळू | ग्रंथरचनेचा ||.
मॄगनयनी- धन्यवाद!
टवाळ कार्टा, साती, स्पा, प्रशांत आवले, स्वाती दिनेश, वाडीचे सावंत, इस्पीकचा एक्का- धन्यवाद!
आतिवास- अतिशय सहमत. प्रचंड अभ्यास आणि तितकीच बिंदुगामी बुद्धी असल्याशिवाय इतकं अफाट पुस्तक केवळ अशक्य आहे. अलीकडच्या अस्मितागळवी काळात मात्र हे जमणं शक्यच नव्हतं. बरं झालं पुलंनी हे अगोदरच लिहून ठेवलं ते.
मनीषा- अगदी अगदी. तरी बरंय, किमान तेवढं तरी पदरात पडलं ते!
अत्रुप्त आत्मा- खंप्लीट सहमत! सरवट्यांची चित्रे इतकी समर्पक आहेत की चित्रे आणि मजकूर दोन्हीही एकत्रच लक्षात राहतो. मग ती नामदेव कॉटेज इंडस्ट्री असेल नैतर तिसर्या अगर चौथ्या अगर नवव्या शतकातील शिलालेख नैतर मुक्तेश्वर आणि त्यांच्या गुरूंचा सुखसंवाद, त्याला तोड नाही. ब्रजवासी मिष्टान्नभांडारवाले वामनपंडित, घंगाळभर शाई रोज वापरणारे शायर दासोपंत, नुसत्या एका श्लोकाने कुणाचाही बोर्या वाजवणारा कवी भास्करभट्ट बोरीकर, यादवकालीन शुद्ध मराठी, भोपळ्याची 'फोड', अवजड आर्येकडून न होणारी पाकनिष्पत्तन, वामनपंडितांचे यमक फिटिंग, बाल राक्षसी, इ.इ.इ. काउंटलेस उल्लेख डोळ्यांसमोर उभे राहतात. पुलंनी या एका चिंधी पुस्तकात विनोदाचे जे चौकार षट्कार मारलेत त्याला तोड नाही. प्रत्येक बॉलवर सिक्सर आहे. म्याच अन हायलाईट यांत फरकच नाही.
विजुभौ- ते एक चित्र मजेशीर आहे खरं =))
तर आता माझा अजूनेक आवडता उतारा:
बाल राक्षसी च्या पहिल्या भागातला धडा:
काका उठा
जबडा उघडा
हा रामा आला
त्याचा फडशा पाडा
फडशा, नरडे, टांग, गटागटा, इ. शब्द मराठीत राक्षसी भाषेकडून आले असावेत, तर इनाम, मानधन , वशिला, इ. शब्द 'पैशाची' भाषेतून आले असावेत. आज मागधी , शौरसेनी, इ. कुणॉ बोलत नाही, पण पैशाची भाषा मात्र सगळ्यांना समजते.
यात 'पैशाची' वरची अप्रतीम कोटी पुलंच करू जाणे.
चलत मुसाफिरः धन्यवाद! यादवकालीन शुद्ध मराठीचे उदा. लैच भन्नाट आहे ;) त्या संवादात पुढचे वाक्य असे-
"च्यायला सरळ बोलायला काय होतं रे *ड*च्या" ;)
किसनः धन्स रे. :) नवनीत वाचलेस हे उत्तम, आता जमेल तसे सारस्वतही वाच बघू.
अर्धवटरावः भन्नाट पुस्तक खरेच. बाकी तो ब्रह्मवृंद यातला नव्हे. अलुपिष्टन साहेबाबद्दल आणि युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकावला त्याबद्दल एकदम औपरोधिक आणि मस्त लिहिले आहे, पण काही लाडू इ. उल्लेख असल्याचं आठवत नाही.
22 Jul 2014 - 11:20 am | प्रचेतस
मुकुंदराजासंबंधी मराठी विश्वकोशातील माहिती रोचक आहे.
बाकी हा नृसिंह बल्लाळ म्हणजे वाररंगळच्या काकतीय रूद्राचा पराक्रमी सेनापती का?
हा काकतीय असेल तर मुकुंदराजाला ह्याने निधी देणे शक्य वाटत नाही.
जैत्रपाळाचा पण उल्लेख आहे मला वाटतं. आता यादवांकडे जैत्रपाळ दोन.
पाचव्या भिल्लमाचा सेनापती जैत्रपाळ हा होयसाळांबरोबरच्या युद्धात मारला गेला तर अजून एक जैत्रपाळ म्हणजे जैतुगी हा यादवसम्राट होता. महापराक्रमी सिंघणदेवाचा हा पिता.
22 Jul 2014 - 12:21 pm | बॅटमॅन
धन्स रे. त्यासंबंधी वादच फार आहेत. अन हा बल्लाळ काकतीयच असेल असेही नाही. दुसराही कोणी असेल. हा कदाचित सेनापतीही असू शकेल.
22 Jul 2014 - 12:25 pm | प्रचेतस
हम्म.
एकंदरीत पुरेसे पुरावे नसल्याने कालनिश्चितीचे लै घोळ आहेत.
22 Jul 2014 - 12:49 pm | बॅटमॅन
येस...
20 Jul 2014 - 1:43 am | यशोधरा
खरंय म्हाराजा!
20 Jul 2014 - 1:44 am | बॅटमॅन
धन्यवाद यशोधरा :)
20 Jul 2014 - 1:50 am | प्रभाकर पेठकर
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पुस्तक संग्रही आहे. आणि वाचलेले ही आहे. पुलंच्या कोट्या, विनोद बुद्धी, अभ्यास, आणि कोपरखळ्या ह्यांचा ठासून भरणा आहे. प्रत्येक पान अन पान वाचनानंद देऊन जाते.
आता पुन्हा ते हुडकुन वाचायला घेतले पाहिजे. पुनर्वाचनानंतर अधिक भर घालू शकेन.
21 Jul 2014 - 3:01 am | पाषाणभेद
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पुस्तक माझ्याही संग्रही आहे. वेळोवेळी त्याचे वाचन केले आहे. प्रत्येक वेळी वाचतांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. पुलंना तोड नाही.
20 Jul 2014 - 12:43 pm | ज्ञानोबाचे पैजार
वर दिलेल्या लिंकवर तर मोठा खजिनाच ठेवलेला आहे.
बरेच उत्खनन करावे लागणार आहे.
या साठी ब्याटम्यान यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
बाकी पु.लं. बद्दल काय लिहावे. प्रचंड बुध्दीमान आणि तेवढाच खट्याळ मनुष्य होता तो.
या धाग्या निमित्त गाळीव इतिहास परत एकदा वाचायला घेतो.
पैजारबुवा,
20 Jul 2014 - 2:54 pm | मुक्त विहारि
आणि
तसेच माहितीपूर्ण प्रतिसाद..
21 Jul 2014 - 1:37 am | खटपट्या
हेच म्हणतो !! फार्फार वर्षापूर्वी वाचले होते. परत वाचावे लागेल. बाकी वसंत सरवटे खास पुलसाठीच तयार झालेत अशी चित्रे आहेत.
20 Jul 2014 - 3:57 pm | चित्रगुप्त
वा ब्याम्याराव. महाराष्ट्र सारस्वत आणि नवनीतचा उत्तम परिचय करून दिलात. हे दोन्ही ग्रंथ अमूल्य आहेत, आणि आता नवीन-जुन्या पिढीने हे पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत. हे आता जालावर उपलब्ध आहेत हे छान झाले. या प्रकारच्या काव्यांवर आणखी कोणते ग्रंथ आहेत?
खरेतर आता पुन्हा पंत-संत स्टाईलची फ्याशन यायला हवी, म्हणजे मंडळी वाचतील.
'गाळीव इतिहास' फार पूर्वी वाचल्याचे आठवते, पण त्यातले उतारे वगैरे सर्व विसरलो. चिं. वि. जोशी यांचा 'मुशियन वांग्मयाचा परिचय' देखील वाचनीय आहे. (वांन्ग्मय ? वांग्मय ? नेमके कसे टंकायचे कुणी सांगेल का?)
20 Jul 2014 - 4:25 pm | अजया
कोण्कोणते उतारे टंकु? बॅटमॅना, तुझ्यामुळे परत वाचुन काढले !
उतारा आहे ,देवदास ,शिवराम्,जयराम वगैरे कवी
हे कवी वामन पं च्या मागून राहायला आले असावे आणि पोटमाळे' कणग्या साफ करता करता त्यांना वामन पंडित अणि मंडळींने जमवलेले यमकांचे गट्ठे हाती लागले असावे. कारण यातल्या पंडित कवीच्या कवितेतली ओळ अशी आहे: हंसा मुंगसा वासा तरसा रिसा फणसा सिरसा सारसा सरसा अनारसा!( पहा : महाराष्ट्र सारस्वत, पृ ३९३)
20 Jul 2014 - 5:12 pm | अजया
फादर गॅस्पार द मायगेलवर लिहिताना पुलं त्यांच्या ष्टायलीत अक्षरशः सुटले आहेत, तशीच नामदेव कॉटेज इंडस्ट्री !! याचे उतारे देण्यात मजा नाही राव!! ते वाचाच.
20 Jul 2014 - 6:13 pm | बॅटमॅन
पैजारबुवा आणि मुवि- बहुत धन्यवाद!
चित्रगुप्तः या प्रकारचे अजून काही ग्रंथ आहेत, उदा. मोरोपंतांचे एक ६०० पानी चरित्र १९०७ साली लिहिले गेले ते जालावर उपलब्ध आहे, पण त्याची लिंक मिळेना. पाहून सांगतो. बाकी वाङ्मय=vAGmay.
अजया: गास्पार द मायगेलचं नीट आठवेना, जमल्यास एखादा उतारा टंका ना. बाकी वामन पंडित यमके कशी फिट करीत ते सरवट्यांनी काढलेले चित्रही एक नंबर जबराट आहे!
20 Jul 2014 - 8:31 pm | रमताराम
लई झ्याक रे वाल्गुदेया,
20 Jul 2014 - 8:36 pm | अजया
गस्पार द माय्गेल ह्या फादरला कोकणीचा फार अभिमान.त्या ताणात त्याने कोकणीचे व्याकरण लिहिले.त्यामुळे " अँ! हँ कितँ रे " म्हणून बरेचसी गोयकार क्र्स्तांव परत हिंदु झाले.ते पाहून त्याचा वरिष्ठ फादर स्टीफन्स ह्याने गास्पारबाबाची दाढी खेचली.इगर्जीत व्याकरण शिकवतात हे ऐकुन पळापल सुरू झाली. व्याकरणामुळे झालेल्या ख्रिस्ती धर्माच्या नुकसानीची शिक्षा म्हणून फादर गास्पारला पुन्हा त्याच्या मदरकडे पाठवीन ,अशी धमकी दिल्यावर फादर गास्पार शुद्धीवर आला ...
मग त्याने पोर्तुगीज इण्टू कोन्कणी शब्दकोश लिहिला.आकाशवाणीच्या कोकणी कार्यवळीत तोच वापरीत असत. ती सतराव्या शतकातली कोंकणी असल्याने फक्त पोर्तुगीजांना कळत असे. कारण रात्रीचे पावणे नऊ वाजले आणि ट्याँ ट टीट्याँ हे संगीत वाजपी वाजवू लागले की लिस्बनला सालाझार वगैरे कोकणी इण्टू पोर्तूगीज शब्दकोश उघडून बसत.पण हे कोकणी गोंयच्या क्रिस्तावांना आणि हिंदूंना कळत नसे.पोर्तुगीज गेल्यावर नवी कोकणी सुरू झाली,ही मात्र मराठी लोकांनाच कळते!गोयकार क्रिस्ताव्, हिंदू आणि पोर्तुगीज ह्या तिघांनाही कळत नाही....
टीकाकाराला 'फाफडून उडौपी किंवा वैमानिकाला 'उडपी' वगैरे शब्द ऐकुन आमच्या मित्राची हा कार्यक्रम अश्लील असतो अशी समजूत झाली होती.पण कोकणीत ,आजन्म अविवाहित राहाण्याची प्रतिज्ञा करणार्याला "फादर" म्हणतात्,त्यामुळे इथे अश्लीलतेला जागाच उरत नाही ,हे सांगुन त्याला गप्प केले...
21 Jul 2014 - 12:17 pm | एस
जबरदस्त! एकच नंबर. :-)
21 Jul 2014 - 1:01 pm | बॅटमॅन
हा हा हा हा हा हा हा हा =)) =)) =)) =)) =))
लय म्हणजे लयच भारी, धन्यवाद अजया. :)
21 Jul 2014 - 6:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
24 Jul 2014 - 1:42 am | नंदन
=)) =))
21 Jul 2014 - 1:38 pm | आदिजोशी
पुलंच्या माझ्या लिस्ट मधील टॉपच्या कलाकॄतींमधे हे पुस्तक आहे. हे आणि अघळ पघळ ची पारायणं झाली आहेत. दर वेळी तितकीच मजा येते :)
21 Jul 2014 - 3:43 pm | धमाल मुलगा
काय काय म्हणून लिहावं? कायच्या काय सुटलेयत पी.येल. गाळीव इतिहासात. पण मला गाळीव इतिहास म्हणलं की पहिल्यांदा डोळ्यापुढं येतात ती सरवट्यांची अशक्य भारी चित्रं. :) पु.लं.नी लिहावं, आणि सरवट्यांनी त्याला चित्राची खमंग फोडणी द्यावी असा झक्क बेत जमून आलेला आहे. :)
बाकी, तत्कालीन लोक आजच्या काळातल्यासारखे हगल्यापादल्या गोष्टींनी भावना दुखावण्याइतके बेअक्कल नव्हते हे आपलं नशीबच म्हणायचं.
21 Jul 2014 - 4:55 pm | हाडक्या
'हगल्या-मुतल्या' गोष्टींनी असा वाक्प्रचार असताना 'हगल्यापादल्या गोष्टींनी' असे लिहून आमच्या भावना दुखावल्याबद्दल 'विशुद्ध मराठी अस्मिता' संघटनेतर्फे तुमचा सार्वजनिक निषेध!!
21 Jul 2014 - 5:39 pm | धमाल मुलगा
मराठी भाषेतली बोली दर बारा कोसांवर बदलते असं जाणकार सांगतात. तस्मात, सदरहु मुद्दा आणि त्या अनुशंगाने निषेध कोलल्या गेला आहे. ;)
24 Jul 2014 - 12:35 am | विजुभाऊ
त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बारामतीत हा अस्साच निसर्ग क्रम असतो म्हणे...... ;)
तेथे गोष्टी याच क्रमाने येतात म्हणे
30 Aug 2014 - 10:11 am | चित्रगुप्त
तात्कालीन लोक हे सांप्रतकाळच्या लोकांसारखे हग्रेपाद्रे न्हव्ते, हेच खरे. तेंव्हा पिझाबर्गरादि नवते ना.
21 Jul 2014 - 3:57 pm | मदनबाण
वाचायलाच हवे... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा
21 Jul 2014 - 4:00 pm | बॅटमॅन
ररागुर्जी- धन्स!
धमुशेठ- पूर्ण प्रतिसादाशी सहमत, त्यातही शेवटच्या वाक्याशी तर अजूनच जास्ती सहमत! या अस्मितांची टच्च भरलेली गळवे टाचणी लावून फोडली तर बर्राच मोठ्ठा पू वाहून समाजाचे आरोग्य बर्यापैकी जास्ती सुधारेल यात संशय नाही.
मदनबाणः वाचा ओ लौक्करात लौक्कर वाचा. पुलंचे 'सुटणे' म्हणजे काय असते त्याचा सर्वोत्तम नमुना!
21 Jul 2014 - 5:26 pm | अत्रुप्त आत्मा
@ तर बर्राच मोठ्ठा पू वाहून समाजाचे आरोग्य बर्यापैकी जास्ती सुधारेल यात संशय नाही.>>> +++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११
21 Jul 2014 - 4:06 pm | बॅटमॅन
पाभे आणि आदिजोशी- पूर्ण सहमत! :)
22 Jul 2014 - 1:23 pm | कवितानागेश
फीस्ट. :)
22 Jul 2014 - 2:20 pm | विटेकर
त्यातला " आलोडन " हा शब्द लै मन्जे लै च आवडला होता. येथे मिपावर कधीतरी वापरलाही होता.
बाकी ब्याट्मन साहेबानी हे लिखाण हाती घ्यावे हे स्वाभाविकच !
ट्वाळा आवडे विनोद ! दुसरे काय ? ( संक्षी..आली बर का समर्थ ओवी .. खूष का ?)
2 Aug 2014 - 11:22 pm | पैसा
हे पुस्तक कित्तीदा वाचले आहे! मात्र नमुने कोणते द्यावेत आणि कोणते मागे ठेवावेत, हेच समजत नाही!