कहां गये वो लोग?--मंग्या

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
4 Jul 2014 - 5:26 pm

हां गये वो लोग?--बाबूकाका

कहां गये वो लोग?--आजीबाई

कहां गये वो लोग?--नाथा

दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती.डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे उतरले होते.आणि वर्षभर पुस्तकात घातलेल्या माना वर झाल्या होत्या.सुट्टीत कोण कोण कुठे कुठे जाणार ह्याचे बेत ठरत होते.एकीकडे उन्हाळा वाढत चालला होता आणि अंगातुन घामाच्या धारा वाहात होत्या.
एकदा असाच दुपारचा चहा पीत गॅलरीत बसलो असताना गल्लीतला एक मित्र रस्त्यावरुन जाताना दिसला.त्याच्या पाठीवर कसलीतरी पिशवी होती.त्याला हटकले आणि आमच्या गप्पा सुरु..म्हणजे तो रस्त्यावर उभा आणि मी गॅलरीत.

मी-"काय राव?आत्ता चांदण्याचा कुठे निघालास?"
मित्र-"पोहायला..खाडीवर"
मी-"आँ? तू कधी शिकला बे पोहायला?बुडुन मरशील ना लेका?"
मित्र-"नाय बे,शिकवायला लोक आहेत ना? भरपुर मुले असतात..येतोस का?"

मला माझे या आधीचे पोहायला शिकायचे असफल प्रयत्न डोळ्यासमोरुन तरळुन गेले.ते नाकातोंडात पाणी जाणे,श्वास गुदमरणे आणि माझ्यापेक्षा लहान मुलांनी माझ्यासमोर छानपैकी पोहून लाज आणणे..नकोच ते.
दुसरीकडे मित्र खाली उभा राहुन घाई करत होता. "ओ पेशवे..लवकर चला नायतर मला तरी सोडा...आयचा लाजतोय पोरींसारखा" शेवटी काय होईल ते होवो..खाडीवर तर जाऊ ,मग ठरवु काय ते.असा विचार करुन मी चहा संपवला आणि पिशवीत एक टॉवेल टाकुन निघालो.

खाडीवर पोचलो तर ५ चा सुमार होता.उन्हाची तिरीप पाण्यावरुन चांगलीच जाणवत होती.पण वारा मस्त सुटला होता. भरती होती त्यामुळे खार्‍या पाण्याचा वास हवेत भरुन राहीला होता.मित्र लगेच पाण्यात उतरला अणि हातपाय मारु लागला.काही सराइत पोहणारे ३-४ जणांचे ग्रुप करुन पलीकडच्या किनार्‍याला पोहत निघाले तर काहीजण काठावरुन १०-१५ फूट आतवर नांगरलेल्या होड्यांवर जाउन उड्या मारत होते.मी आपला हाफ चड्डी घालुन पाण्यात पाय सोडुन वाळुवर बसलो. भरतीचे पाणी बघुन मला काय पाण्यात जाण्याचा धीर होईना.तेव्हढ्यात मागुन एक आवाज आला.."अ‍ॅप्रेंटीस काय?" मला समजले नाही की तो प्रश्न मला होता.थोड्या वेळाने एक खुरटी दाढी वाढलेला तिशी-पस्तिशीचा शिडशिडीत माणुस पोहायच्या कॉस्चुममध्ये जवळ आला आणि पुन्हा तोच प्रश्न "अ‍ॅप्रेंटीस काय?"
"आँ?म्हणजे" तेवढ्यात मित्र पाण्यातुनच ओरडला "हो हो अ‍ॅप्रेंटीस..घ्या त्याला"

पुढच्या संकटाची जाणीव होउन मी दुर पळू लागणार तोवर त्या माणसाने मला धरले आणि सरळ पाण्यात ढकलुन दिले.बुड बुड करत मी हात पाय झाडत उभा राहुन त्याच्याकडे रागारागाने बघायला लागलो. हा बाबा मात्र खदाखदा हसत माझ्याकडे बघत होता..."अरे रागावतोस काय? १०-२० डुबक्या खाल्ल्यास की शिकशील आपोआप पोहायला.आता मी सांगतो तसे कर. हात वाळूत टेकव आणि पाय मारायची प्रॅक्टीस कर." असे म्हणुन त्याने मला प्रात्यक्षिक करुन दाखविले आणि स्वतः खाडी पार करायला पलीकडल्या काठावर निघुन गेला.मित्राला विचारले "हा अत्रंग कोण?" तर मित्र म्हणे "मंग्या..अरे हाच शिकवेल तुला पोहायला."

पुढे पुढे रोज आमचा हाच उद्योग होउन बसला.मित्र बोलवायला आला की एक टॉवेल घेउन खाडी गाठायची. आज भरती आहे की ओहोटी यावर चर्चा.मग पाण्याचा प्रवाह कुठल्या दिशेने आहे ते बघायचे. आणि मग पट्टीचे पोहणारे खाडी क्रॉसिंगला जायचे तर आमच्यासारखे किनारपट्टीचे पोहणारे अ‍ॅप्रेंटीस मंग्याची वाट पहात पाण्यात हातपाय मारत बसायचे.
मंग्याची पोहायला शिकवायची एक खास पद्धत होती. नवीन आलेल्या मुलाची तो प्रथम सगळ्यांची ओळख करुन द्यायचा. "अ‍ॅप्रेंटीस आला रे" सगळेजण एकदम खुश व्हायचे.कारण नवीन पोराला डुबक्या देणे हा सगळ्यांचा आवडता छंद होता.पोरगा पाण्यात उतरला की सगळे काही ना काही कारण काढुन त्याच्या आजुबाजुला पोहत रहायचे.मिळाली संधी की दे डुबकी असे होउन होउन तो पोरगा रडवेला होई.मग मंग्या त्याला सांगायचा "हे बघ, हे तुला सारखी डुबकी का देतात? कारण तुला पोहायला येत नाही.यावर उपाय २. एक म्हणजे खाडीवर पोहायला येणे बंद कर." पोरगा म्हणे "मी का बंद करु?यांच्या बापाची आहे का खाडी?" मंग्या म्हणे "बरं राह्यलं,मग दुसरा उपाय. तू त्यांना डुबक्या दे" पोरगा म्हणे "अरे पण मला पोहायला येत नाही ना?मग कसा जाउ खोल पाण्यात?"
यावर मंग्या त्याला अजुन एक डुबकी देउन म्हणे "अरे xxxx मग तेच तर सांगतोय ना तुला? पोहायला शिक लवकर"
मग नाईलाजाने ते पोरगं लवकरात लवकर पोहायला शिकायची धडपड करे.आणि बघता बघता शिकुन तयारपण होई.आता नवीन अ‍ॅप्रेंटीस कधी येतो आणि आपण त्याला कधी डुबवतो याची तो वाट बघे.

पोहायला लागुन साधारण १-२ आठवडे गेले.रोज मंग्या काहीतरी नवीन टेक्निक सांगत असे आणि आम्ही मन लावुन ते शिकायचा प्रयत्न करीत असु. शिकणार्‍यांचा पण एक ग्रुप तयार झाला होता.
वाईट गोष्ट म्हणजे सुट्टीमुळे काठावर बरीच गर्दी असे,आणि त्यात काही सुंदर मुलीपण..त्या आमची फजिती पहात असत.कितीही दिखावा केला तरी आम्हाला पोहता येत नाही हे त्यांना माहीती असे.कारण पट्टीचे पोहणारे कशाला किनार्‍याला थांबतील?मग आम्ही रोज घरी येताना एकमेकांशी पैज लावायचो."तू बघच.ही सुट्टी संपेपर्यंत आपण एकदा तरी खाडी क्रॉस करणारच" यावर मंग्या हसुन म्हणे "xxxx धुता तरी येते कारे स्वतःची? खाडी क्रॉस करायला निघालेत.जर खरंच करुन दाखवलीत ना? तर टिळक चौकात जाहीर सत्कार करेन" यावर आम्हीपण चेकाळुन "मंग्या xxxx तयार ठेव हारपेढे..क्रॉस करुन नाही परत आलो तर मढ्यावर वाहायला उपयोगी पडतील आणि आलो तर सत्काराला लागतील" असे म्हणुन खिदळत असु.
बघता बघता मलाही पोहायला येउ लागले आणि मग कसरती सुरु झाल्या.पुलाकडे पाण्याचा फ्लो असेल तेव्हा पुलापर्यंत वहात जाणे आणि त्याच्या दोन खांबांमधील पटरीवर चढुन गप्पा ठोकणे.ग्रुपने खाडी क्रॉसिंगला जाणे.कधी पोहायचा मूड नसेल तर काठावरच्या बोटींवर बसुन किनार्‍यावरच्या मुली न्याहाळणे.

पण मंग्याचे छंद काही वेगळेच होते. बोटींच्या सुकाणुवरचे खेकडे पकडणे आणि नांग्या मोडुन खाणे त्याला आवडायचे किंवा आमच्यासमोर फुशारकी मारायला तो करत असावा. दुसरे म्हणजे ओहोटी असताना किनार्‍याला असलेला मऊसूत गाळ अंगाला फासणे आणि आयुर्वेदीक साबण म्हणुन खिदळणे. एकदा त्याने सायकलच्या पायडलला मोठे फुगे बांधुन ती पाण्यात उतरवली होती आणि चालवायचा प्रयत्न केला होता.एक ना अनेक.तो एकदा ग्रुपने मुंब्रा खाडीपर्यंत पोहुनसुद्धा आला होता.आम्हाला तर त्यावेळी ते ईंग्लिश खाडी पार केल्यासारखेच वाटले होते.भरती ओहोटीच्या वेळांचे चांगलेच ज्ञान त्याला होते. तिथी कुठली त्याप्रमाणे किती वाजत भरती असेल हे मी त्याच्याकडुन शिकलो.पोहायला उतरतांनाच किती वाजता परत यायचे हे तो ठरवे. भरती संपुन ओहोटी सुरु होताना पाण्यात भोवरे तयार होत.प्रवाह उलट्या बाजुने फिरे. ते त्याने एक दोनदा दाखवले होते.पाण्याच्या रंगावरुनही तो कसलेकसले अंदाज बांधे.एकुणच खाडीच्या विषयी त्याला आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त माहीती होती.आणि तरीही तो सांगे "xxxx पाण्याशी कधी मस्ती करु नका. पट्टीचा पोहणारा बुडुनच मरतो कधी कधी.जिथे जाल तिथे पहीले पाण्याचा अंदाज घ्या..दिसले पाणी की टाकली उडी असे करु नका"

असे उद्योग जुन उजाडेपर्यंत चालले आणि हवा पावसाळी होउ लागली.एक दिवस खाडीवर गेलो असताना मंग्या काठावर बसुन नुसताच पाण्याकडे बघत होता. मी विचारले "काय रे?क्रॉसिंगला जायचे का?" तर त्याने नुसताच पाण्याकडे हात केला.बघतो तर पाणी गढुळ झाले होते.झाडांच्या फांद्या वहात येत होत्या.

"वरती पाउस पडलाय मजबूत..पाणी बघ कसे मातकट झालेय.भोवरे पण दिसतायत."ईती मंग्या."आता पोहणे बंद करावे लागणार"
"अरेरे ...मग आता परत कधी?" मी.
"पुढच्या उन्हाळ्यात"मंग्या...आम्ही दोघे नि:शब्द काठावर बसुन राहीलो.

अशा तर्‍हेने ती सुट्टी संपली.कॉलेज ,क्लास,अभ्यास सुरु झाले.फरक एकच पडला होता.आता मला पाण्याची मुळीच भिती वाटत नव्हती.मंग्याच्या कृपेने मी पोहायला शिकलो होतोच.शिवाय खाडीवर माझे प्रेम बसले होते.आणि पुढच्या मे महीन्याची मी चातकासारखी वाट पहात होतो.

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

व्यक्तिचित्रण छान जमत आहे तुम्हांला.

च्यायला, आम्हाला का नाही 'मंग्या' मिळाला असा? गावाला सगळे चुलत भाऊ मिळून खाडीत पोहायला गेलो की पट्टीचे पोहणारे भाऊ खाडीच्या पैलतीरी ताडगोळे/आंबे खायला जात असत व माझ्यासारखे पोहता न येणारे कमरे एवढ्या खोल पाण्यात थोडेफार हात-पाय मारत बसत. तुमचा हा लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

बाकी, मंग्याचे व्यक्तिचित्रण चांगलं जमलं आहे. और आने दो!

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Jul 2014 - 11:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

यशोधरा आणि शिद!!!

शैलेन्द्र's picture

6 Jul 2014 - 1:32 am | शैलेन्द्र

मस्त जमलयं,

कल्याण ना?

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Jul 2014 - 9:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

म्हणजे कल्याणच की हो?

बाय द वे मंग्याला ओळखता काय? :)

शैलेन्द्र's picture

30 Jul 2014 - 1:09 am | शैलेन्द्र

नाही हो, मी डोंबिवलीचा, आमच्या नशिबात मंग्या नाही :)

मुक्त विहारि's picture

6 Jul 2014 - 9:13 am | मुक्त विहारि

आवडली

अनुप ढेरे's picture

6 Jul 2014 - 10:09 am | अनुप ढेरे

आवडलं व्यक्तिचित्रण!