पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिन मध्ये बसतो ती एका मोठ्या हाल मध्ये आहे. मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूला साडेतीन फूट उन्च पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४-२५ स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्या बरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते. हालचा दरवाजा उघडा असेल तर माझ्या समोरच्या केबिनचा काही भाग दरवाजाच्या मागे झाकला जातो, तिथे एक ३ फुट उंचीची अलमारी आहे. सहजासहजी कुणाला दिसत नसल्यामुळे, तिथला स्टाफ त्यांचे रिकामे चहाचे कप इत्यादी त्या अलमारीवर ठेवतो.
त्या दिवशी दुपारचे साडेतीन झाले असतील, नुकतच सर्वांचा चहा झाला होता, अचानक दरवाजा उघडून हाल एक कर्मचारी आत आला, कापऱ्या पण सर्वाना ऐकू येईल अश्या आवाजात म्हणाला, पंतप्रधान इकडेच येत आहेत. मी चमकलोच, गेल्या १७ वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात कार्य करतो आहे, या आधी पंतप्रधान तर सोडा कुणा वरिष्ठतम अधिकार्याने सामान्य कर्मचार्यांच्या केबिन मध्ये डोकावल्याचे मला आठवत नाही. कदाचित त्यांना त्याची गरज भासली नसेल. म्हणतात ना देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावे लागते, देव क्वचितच भक्तांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरी येतो. सर्वांनीच लगबगीने आपला पसारा व्यवस्थित करणे सुरु गेले. पण कुणालाच वेळ मिळाला नाही. त्या कर्मचारीच्या पाठोपाठच पंतप्रधान नरेंद्र मोदी आत आले. साहजिकच होते, पहिलेच केबिन असल्या मुळे त्यांची प्रथम दृष्टी माझ्यावर गेली. त्यांनी कामाबाबत जुजबी माहिती विचारली. नंतर प्रत्येक केबिन समोर उभे राहून त्यांनी कर्मचार्यांची विचारपूस केली. सर्वात शेवटी, अर्थात माझ्या केबिनच्या समोरच्या केबिन मध्ये बसणाऱ्या स्टाफ ची ही विचारपूस केली. त्यांची दृष्टी अलमारीवर ठेवलेल्या ७-८ चहाच्या रिकामच्या कपांवर ही गेली. त्यांनी मिस्कीलपणे, विचारले बहुत चाय पितो हो आप लोग. स्टाफ मधल्या एका कर्मचार्याने उत्तर दिले, सर, सारे कप हमारे नाही है और लोग भी यहाँ अपने खाली कप यहाँ रख देते है. पंतप्रधान हसले आणि म्हणाले दोस्तों, आपने अकबर बीरबल की कहानी सुनी है. आम्ही सर्व टक लाऊन त्यांच्या कडे बघू लागलो, पंतप्रधान काय म्हणतात ते ऐकायला कान टवकारले.
त्यांनी अकबर बीरबलची कहाणी सांगायला सुरवात केली. (पुढची गोष्ट मला जितपत कळली मराठीत).
एकदा अकबर बादशाह, बीरबलच्या घरी गेले, पाहतात काय, बीरबल आपल्या बेगम बरोबर एका मंचकावर बसून आंबे खात होता. आत येताच अकबर बादशाहचे लक्ष आंबे खाऊन जमिनीवर टाकलेल्या आंब्यांच्या कोयींवर गेले. अकबर बादशाहने मनात विचार केला बीरबल स्वत:ला शहाणा समजतो, आज चांगला मौका आहे. बीरबलला दाखवायला पाहिजे कि बादशाह ही किती बुद्धिमान आहे. अकबर बादशाहने त्या कोयी मोजल्या. अकबर बादशाह म्हणाला, बीरबल मी सांगू शकतो, माझ्या इथे येण्या अगोदर तुम्ही किती आंबे खाल्ले आहेत ते. अकबर बादशाहने मोजलेल्या कोयींच्या आधारावर खालेल्या आंब्यांची संख्या सांगितली. आपणास सर्वांना माहित आहे. बीरबल हा अत्यंत बुद्धिमान होता. बादशाहच्या मनात काय आहे, बीरबलने सहज ओळखले. तो मिस्कीलपणे म्हणाला, जहाँपनाह, आपण चुकत आहात, या खाली टाकलेल्या कोयी, मी खालेल्या आंब्यांच्या आहेत. माझी बेगम तर कोयीं समेत आंबे खाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी क्षणभर थांबले, आणि सर्वांकडे बघितले. त्यांचा बोलण्याचा आशय कळला. आम्ही ही मुक्तपणे हसलो. (कहाणीचा अर्थ मला जो अर्थ कळला- बीरबलले आपल्या चातुर्याने बेशक बादशाहला मूर्ख बनविले असेल, पण मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, उगाच दुसर्यांचे नाव कशाला घेता हा सर्व चहा, तुम्हीच गटकला आहे). पंतप्रधान निघून गेले. पण कर्मचार्यां सोबत अश्यारितीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर बीरबलची कहाणी सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल.
प्रतिक्रिया
30 Jun 2014 - 11:30 am | विटेकर
मी प ...
ही कहाणी खरी आहे काय ?
30 Jun 2014 - 12:47 pm | आयुर्हित
नशिबवान आहात आपण!
आणि आपण सारे भारतिय!!!
30 Jun 2014 - 2:05 pm | प्रसाद१९७१
ही कहाणी खरी असेल तर सांगा.
चहाच्या कपाची गोष्ट पेपर मधे वाचली होती. पण नंतर अकबर बिरबला ची गोष्ट सांगीतली हे माहीती नव्हते.
30 Jun 2014 - 5:33 pm | पैसा
सगळ्यांना कामाला लावायची भारी युक्ती आहे!
30 Jun 2014 - 6:35 pm | विकास
पंतप्रधानांनी आल्याआल्या "चाय पे चर्चा" चालू केली वाटतं! *biggrin*
असो, बाकी तुम्ही खरेच पंतप्रधानांच्या कार्यालयात काम करत असलात तर आता मिपावर येण्यास वेळ कसा मिळवता ह्याबद्दल उत्सुकता आहे! *scratch_one-s_head*
30 Jun 2014 - 6:39 pm | सुहास..
असो ....
30 Jun 2014 - 7:07 pm | arunjoshi123
विवेककाका पी एम ओ मधे आहेत. चला मी सर्टीफाय करतो.
30 Jun 2014 - 7:14 pm | पैसा
त्यांना काका म्हटल्याबद्दल तुम्हाला अॅट्रॉसिटी अॅक्ट लावतील ते! *blum3*
1 Jul 2014 - 6:16 pm | विवेकपटाईत
केस पांढरे झालेले आहे, काळजी नसावी.
30 Jun 2014 - 7:13 pm | चित्रगुप्त
वा. असा पाहिजे पुढारी. त्या प्रसंगानंतर आता कसेकाय असते तुमच्या हापिसातले वातावरण ? लोक व्यवस्थित राहू लागले, की पुन्हा ये रे माझ्या मागल्या ?
दिल्लीच्या सरकारी हापिसात दहा वर्षे काम केलेले असल्याने विचारतो आहे.
तुम्हाला नव्या पंतप्रधानांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल जेवढी माहिती देणे शक्य आणि योग्य असेल, ती अवश्य इथे देत रहावी, ही विनंती.
1 Jul 2014 - 6:23 pm | विवेकपटाईत
सध्या तरी सर्व कार्यालयांमध्ये बदल झाला आहे. किती दिवस टिकेल आत्ता सांगणे कठीण.
30 Jun 2014 - 11:00 pm | खटपट्या
विवेक साहेब पिएमओ ऑफिस मध्ये आहेत ?
वळख ठिवा मालक….
30 Jun 2014 - 11:09 pm | यसवायजी
:)
1 Jul 2014 - 12:59 am | विकास
मोदी विकेकसाहेबांच्या हापिसात काम करतात? असे म्हणायला हवे नाही का? ;)
1 Jul 2014 - 11:49 am | सुबोध खरे
असाच प्रसंग विक्रांतवर झाला होता. कॅप्टन गणेश ( हे अणु पाणबुडी चक्र चे पहिले कमांडिंग अधिकारी होते तेथून ते सरळ विक्रांतचे कमांडिंग अधिकारी म्हणून आले होते ) विक्रांतची धुरा सांभाळली तेंव्हा त्यांना लक्षात आले कि काही अधिकारी वेळेचे पालन करीत नाहीत त्यावेळी ते जहाजाच्या शिडी शेजारी सकाळी ७. ५० ला उभे राहिले. मी ७.५५ ला आत आलो तर मला म्हणाले डॉक्टर जरा माझ्या शेजारी उभा राहा आणि गम्मत बघ. आम्ही गप्पा मारू लागलो. त्यांनी आपले मनगटी घड्याळ काढून खिशात ठेवले. कार्यालयाची वेळ ८. ०० ची होती. ८ नंतर आलेल्या प्रत्येक अधिकार्याला ते फक्त वेळ विचारत. अधिकारी काही सबब सांगू लागला कि ते फक्त म्हणत मी तुला उशीर का झाला ते विचारलेच नाही तू अधिकारी आहेस म्हणजे काही तरी कामासाठीच तुला उशीर झाला असणार. कारण सांगायची गरजच नाही. असे फक्त दोन दिवस त्यांनी केले पुढे एक वर्ष ते असे पर्यंत कोणाची उशिरा येण्याची हिम्मतही झाली नाही.
1 Jul 2014 - 2:30 pm | जय२७८१
हि सत्य घटना आहे का ?मी हा लेख माझ्या facebook wall वर शेअर करू शकतो का ?
1 Jul 2014 - 6:15 pm | विवेकपटाईत
घटना सत्य आहे. २५-२६ लोकांसमोर घडली आहे.
1 Jul 2014 - 6:33 pm | आतिवास
मोदी साहेबांचं कौतुक करावं का? मला तर दया आली त्यांची.
पटाईत साहेब, पुढचा प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नका ही विनंती.
या लेखातून दुसरीही बाजू कळते (जी मीही अनुभवली आहे) ती म्हणजे मंत्रालयांमध्ये अतिशय घाण असते. बाहेरून सुंदर दिसणा-या इमारतींचा दबदबा आत गेला की कमी होतो. सरकारची फायलिंगची पद्धत अतिशय जुनाट आहे. पहिल्यांदा 'संचार भवन'मध्ये जॉईंट सेक्रेटरीसोबत बोलणं चालू असताना केबिनमधून उंदीर आणि घुशी आरामात हिंडताना पाहून दचकले होते - पुढे त्याची सवय झाली ;-) इतर दोन-तीन मंत्रालयातही हीच परिस्थिती जवळून पाहिली.
एवढ्या शिकल्यासवरल्या प्रौढ माणसांना "चहाचे कप असे इकडेतिकडे टाकू नका " असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगायची वेळ येते - यातच देशाचा कारभार कसा चालतो याची झलक दिसते.
मोदी फार कडक वागले तर हीच नोकरशाही त्यांना गोत्यात आणू शकते - त्यामुळे त्यांनी किती शिस्त लावायला बघावी हा मोठा प्रश्न आहे.
1 Jul 2014 - 6:40 pm | मधुरा देशपांडे
सहमत.
अगदी नेमकं.
1 Jul 2014 - 6:47 pm | बॅटमॅन
लाखमोलाची बात. _/\_
1 Jul 2014 - 6:56 pm | प्रसाद१९७१
देशाच्या कॅबिनेट मिनिस्टर ला मस्टर हातात घेउन बसावे लागले आज. २०० लोकांना सक्तीची सुट्टी टाकावी लागली.
1 Jul 2014 - 7:53 pm | शिद
लेटलतीफ २०० कर्मचारी घरी!
सौजन्यः म.टा.
शक्यता नाकारता येत नाही.
2 Jul 2014 - 12:10 am | डॉ सुहास म्हात्रे
एवढ्या शिकल्यासवरल्या प्रौढ माणसांना "चहाचे कप असे इकडेतिकडे टाकू नका " असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगायची वेळ येते - यातच देशाचा कारभार कसा चालतो याची झलक दिसते.
+१००
2 Jul 2014 - 12:38 pm | मराठी कथालेखक
उच्च न्यायालयातील अनुभव चांगला आहे : उंदीर घूशी दिसत नाहीत. बर्यापैकी स्वच्छता असते. कर्मचारी वेळेचे बंधनही पाळतात.
मंत्रालयांनी प्रशासनात किमान न्यायालयाईतकी शिस्त आणावी.
2 Jul 2014 - 12:06 am | राजेश घासकडवी
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असा कडक शिस्तीचा बडगा बाळगणारा नेता लोकांना मनापासून आवडतो. त्यामुळे 'वेळेवर या' असं ठासून सांगणाराला काही गोत्यात येण्याच्या शक्यतेपेक्षा प्रतिमा सुधारल्याने जनतेकडून मिळणारा फायदा अधिक आहे. यापलिकडे जाऊन सरकारी बाबूंच्या हितसंबंधांवर गदा आणली तर मात्र प्रश्न येईल खरा. पण मला तरी वाटतं की मोदींचा मोट्टो हा 'रिझल्ट्स मिळवा, लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा, आणि मग वाटेल ते करा' असा असेल.
2 Jul 2014 - 8:43 am | प्रदीप
ह्यातील 'आणी मग वाटेल ते करा' हे आपल्यासारख्या सुबद्ध व्यक्तिस वाटले, त्यामागे काही evidence असणारच. तसा तो इथे कृपया दर्शवावा, ही विनंती.
2 Jul 2014 - 10:08 am | पुण्याचे वटवाघूळ
आणि मग वाटेल ते करा हे कोणत्या आधारावर? विदा द्या. की विदाच्या अभ्यासकांना स्वतः विदा द्यायचे बंधन नाही आणि इतरांकडे मात्र विदा मागायचे स्वातंत्र्य असे का?
2 Jul 2014 - 11:56 am | डॉ सुहास म्हात्रे
'रिझल्ट्स मिळवा, लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा, आणि मग वाटेल ते करा'
'रिझल्ट्स मिळवा' हे तर नोकरशाहीचे कामच आहे (अर्थात गेल्या काही दशकातल्या अनुभवाने आपण भारतिय ते पाsssर विसरून गेलो आहोत हेच वरच्या वाक्यात अधोरेखित झाले आहे :( )
'मग वाटेल ते करा' असं करून 'लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवा' हे कसं काय बुवा करता येईल ???
बाकी सगळं जावूंद्या. पण कधी नव्हे ते चांगले काम करण्याची ग्वाही देवून त्याप्रमाणे कामाला लागलेल्या सरकारला एक महिना पुरा झाला न झाला तेव्हाच असा शेरा देण्यामागे समतोल विचार दिसला नाही :( . अर्थात हा गेल्या काही दशकांच्या अनुभवांच्या दणक्यांचा परिपाक असू शकतो. लोकांना त्या निराशावादातून वर यायला अजून बराच वेळ लागेल हेच खरे ;)
2 Jul 2014 - 6:44 am | मदनबाण
आपले प्रतंप्रधान स्वतः निर्णय घेउ शकतात हीच माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे, इतके वर्ष खिचडी सरकार आणि इतरांच्या हातात नाड्या असलेला केविलवाणा प्रतंपधान पाहुन वैताग आणि कंटाळा आला होता...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिमझिम गिरे सावन... :- मंझिल
2 Jul 2014 - 11:10 am | आयुर्हित
सहमत
2 Jul 2014 - 5:49 pm | कलंत्री
शेकडो गोष्टी उपलब्ध असताना अकबर बिरबलची गोष्ट नमोजींनी सांगणे म्हणजे अप्रत्यक्षपणे हिंदु मुस्लिम ऐक्याची गोष्ट असावी असे वाटते.
2 Jul 2014 - 5:50 pm | टवाळ कार्टा
कैच्याकै