एका निरोप-समारंभाचे आउटसोअर्सिंग

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
16 Jun 2014 - 3:24 pm

स्थळ हापिसच्या पाठीमागचा जनरल हॉल. वेळ संध्याकाळी साडेपाच. प्रसंग धायगुडेसाहेबांचा सेवानिवृत्ती निरोपसमारंभ.
हॉलच्या एका टोकाला दोन टेबले एकमेकांना जोडून त्यावर चादर घातली होती . त्यामागे सहासात खुर्च्या मांडून व्यासपीठ बनवले होते. टेबलावर दोन बिसलेरी आणि एक फुलदाणी. फुलदाणीत फुलांऐवजी हापिसच्या पुढच्या बागेतील चार शोभेच्या झाडांच्या हिरव्याजांभळ्या फांद्यांचे शेंडे खुडून घालून ठेवले होते. कुणीतरी त्यात, सत्कारासाठी आणलेल्या हारातली दोन शेवंतीची पिवळी फुले मधेच खोचली होती. त्या हिरव्या जांभळ्या पानांमध्ये ती फुले, चुकून बारमध्ये शिरलेल्या अन भांबावलेल्या दोन शाळकरी पोरांप्रमाणे दिसत होती.
हॉलच्या दुसऱ्या भागात पन्नासेक खुर्च्या मांडल्या होत्या. त्यांच्यापुढे, टेबलासमोर महिलावर्गासाठी खाली सतरंजी अंथरली होती. दोन-तीन महिला कर्मचारी सतरंजीच्या टोकाला 'बस गं घुमा, कश्शी मी बसू ?' अशा ष्टाइलमध्ये उभ्या होत्या. खुर्च्या रिकाम्याच होत्या अन त्यांच्या अवती भवती असलेल्या रिकाम्या जागेत हापिसचे काही कर्मचारी टोळकी करून उभे होते.
संयोजक (हे एच्चारचे चीफ आहेत ) एका हातात कागद घेऊन व्यासपीठावर डावीकडून उजवीकडे अन उजवीकडून डावीकडे अशा निरंतर फेऱ्या मारत होते अन त्याचवेळी तोंडाने बाजूला उभ्या असलेल्या ज्युनिअर्सना कार्यक्रमासंबंधी सूचना देत होते. 'हार इथे ठेवा', 'गुच्छ आणा', 'ती खुर्ची मध्ये घ्या' , 'माळीसाहेबांना फोन लावा' इ. इ. त्या सूचना सर्व ज्युनिअर्स तत्परतेने तिथे पळापळ करीत असलेया एकुलत्या एक शिपायाकडे पासॉन करत होते.
सर्व मांडणी मनासारखी झाल्यावर संयोजकांनी विचारले,
' साहेब यायची वेळ झाली. कुठाहेत सगळे ? पळाले तर नाहीत ना ? का हो घोडके ?'
घोडके तत्परतेने पुढे होऊन म्हणाले,
'नाही साहेब . ऑफिस सुटायच्या टायमाला पप्पूला पुढच्या अन कुंभारमावशींना मागच्या दाराशी उभे केले आहे ना ! ते सगळ्यांना पुढे घालून इकडेच घेऊन येताहेत.'
'माईक कुठे आहे ? टेस्ट केला आहे का ?'
लगेच ज्युनिअर्सपैकी एकजण माईक हातात घेऊन 'हॅलो हॅलो' करू लागला. त्याचा मूळचा अमीन सयानीसारखा मृदूमधुर आवाज (असे त्याचे मत होते ) माईकपासून स्पीकरपर्यंत जाता जाता , स्पीकरचा गळा भेदून, पेकाटात लाथ बसलेल्या कुत्र्यासारखा केकाटू लागला. त्याच्या (माईकच्या ) खरखरीने कानठळ्या बसून सतरंजीजवळ घुटमळणाऱ्या महिलावर्गाने सामुदायिकरीत्या कानावर हात ठेवले.
माईकच्या टिपेच्या घरघरीचा फायदा म्हणजे हापिसात व हॉलच्या बाहेर इतस्तत: विखुरलेल्या हापिसकरांनी लगबगीने हॉलमध्ये प्रवेश केला. आता खुर्च्या भरून गेल्या . महिलावर्ग नजरेत भरण्याइतक्या संख्येने जमा होऊन सतरंजीवर स्थानापन्न झाला.
संयोजकांच्या चेहेऱ्यावर प्रेक्षकसंख्या पाहून समाधान विलसू लागले.
'साहेब आले, साहेब आले...'
दरवाज्याकडून पुकारा झाला.
उत्सवमूर्ती धायगुडेसाहेब, वरिष्ठ अधिकारी सुळेसाहेब अन सत्कारसमारंभाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी जिल्ह्याच्या गावाहून आलेले देशमुखसाहेब यांनी आपल्या लवाजम्यासहित हॉलमध्ये प्रवेश केला. प्रेक्षक उठून उभे राहीपर्यंत ते व्यासपीठावरील खुर्च्यांवर जाऊन बसलेसुद्धा . खुर्चीवर बसता बसता देशमुखसाहेबांनी हातातल्या स्विस घड्याळाकडे कटाक्ष टाकला. चारपाच मोबाईल क्यामेऱ्यानी लखलखाट केला.
उत्सवमूर्ती धायगुडेसाहेबांनी, दोन-चार उंदीर अन पावशेर लोणी खाऊन तृप्त झालेल्या बोक्याप्रमाणे जमलेल्या गर्दीवरून समाधानाने नजर फिरवली. गेले पंधरा दिवस निवृत्तीपूर्व 'हिशेब' सेटल करण्यात त्यांचा बराचसा बहुमूल्य वेळ गेल्यामुळे कार्यक्रमासाठी जनसंपर्क साधायला त्यांना वेळ झालेला नव्हता. तरीही, जनसंख्या बऱ्यापैकी दिसल्याने त्यांना समाधान वाटले. आणि, युनियन लीडर्स व कंत्राटदारांच्या हातात भेटवस्तूंची पार्सले अन पाकिटे दिसल्यावर त्यांचे समाधान आणखीनच लांबरुंद झाले.
संयोजकांनी माईकचा ताबा घेऊन सत्कार समारंभ सुरु झाल्याचे रीतसर जाहीर केले. रिवाजाप्रमाणे देशमुखसाहेबांना अध्यक्षस्थान भूषवण्याची विनंती करण्यात आली व त्यांनी मान डोलावून ती स्वीकारल्यावर टाळ्या वाजवण्यात आल्या.
संयोजकांनी एका ज्युनिअरला खूण केली. तो लगबगीने शाल, श्रीफळ, हार, गुच्छ इ. सामग्रीने भरलेले तबक घेऊन आला. धायगुडेसाहेबांना फेटा नेसवला गेला. खात्यातर्फे दिलेले प्रशस्तीपत्र संयोजकांनी वाचून दाखवले. ते आदरपूर्वक धायगुडेसाहेबांना दिले गेले. शाल, श्रीफळ, हार , सौ. धायगुडेना साडी इ. सोपस्कार क्यामेरयांच्या लखलखाटात पार पडल्यानंतर ग्रॅ च्युइटीचा चेक दिला गेला. जिज्ञासूंच्या नजरा पाहून धायगुडेसाहेबांनी प्रसन्नपणे त्यावरचा आकडा स्वत:च वाचून दाखवला.
'तीस लाख तेराहजार सातशे छप्पन...'
प्रेक्षकवर्गात थोडा हेवायुक्त हशा. बऱ्याचजणांच्या मनातल्या कंसात काही वास्तववादी प्रतिक्रिया उमटल्या.
( ही तर पानसुपारी, वरकमाईचा आकडा वाच की लेका किती ते ?)
आता भाषणांना सुरुवात झाली.
श्री धायगुडे यांच्या सद्गुणवर्णनाची अहमहमिका सुरु झाली. खरं तर अधिकारीपद मिळाल्यापासून धायगुडेंनी कारकुनापासून कंत्राटदारापर्यंत सर्वांना भरपूर छळले होते. आता ते निवृत्त होणार या आनंदापोटी सगळे त्यांची जरा जास्तच स्तुती करू लागले.
'आज, कॉलेजमधून बाहेर पडल्यापासून ते आजपर्यंतच्या आपल्या बत्तीस वर्षांच्या सेवेनंतर धायगुडेसाहेब नोकरीतून निवृत्त होत आहेत. '
कंसातल्या प्रेक्षकांचा मनात पंचनामा सुरु झाला.
(चार वर्षांची डिग्री घ्यायला आठ वर्षे लागली म्हणून बरं, नायतर छत्तीस वर्षं आमच्या बोकांडी बसला असता ! )
'श्री धायगुडेसाहेब यांच्या कणखर प्रशासनाचा आपण साऱ्यांनी अनुभव घेतला आहे...'
( साला येताजाता सगळ्यांना धारेवर धरायचा. सुटलो बुवा याच्या तावडीतून ! )
'खंबीर धोरण हा त्यांचा विशेष गुण होता...'
( सदा हम करेसो कायदा.....कधी आमची बाजू समजून घेतली होती का ?)
'कामासाठी आलेल्या व्यक्तीला त्यांनी कधी रिकाम्या हाताने पाठवलं नाही..'
( हं, याचे रिकामे हात भरल्यावर काम का होणार नाही ? )
'कितीही तणतणत आलेला ग्राहक यांच्यासमोर आला की चूप बसत असे...'
(साहेबांनी फायलीत तोंड खुपसल्यावर तो काय भिंतीवर तणतण करेल ?)
'आपल्या चपखल युक्तिवादाने समोरच्याला ते निरुत्तर करत असत...'
(यांच्या सरबत्तीपुढे त्या बिचाऱ्याला उत्तर द्यायला उसंत मिळेल तर ना ? )
'कर्मचाऱ्यांमधील त्यांचा दरारा अन हुकुमत पाहून आम्ही थक्क होत असू'
( गेला बॉ एकदाचा हुकुमशहा ! लै पिडायचा..)
'अभ्यासू वृत्ती हा त्यांचा आणखी एक गुण. कोणताही कागद बारकाईने वाचल्याशिवाय ते सही करीत नसत.'
(त्याशिवाय कुठे कुणाला कचाट्यात पकडता येतंय ते कसं समजणार ?)
'खरं तर आपलं हे शहर राजकारण्यांचा अड्डा. पक्षीय राजकारणात सरकारी अधिकाऱ्याचं काम अवघड. पण धायगुडेसाहेबांची खुबी अशी की सर्व राजकीय पक्षांना ते आपलेच वाटत असत....'
(वाटेल नाहीतर काय ? याचं नेहमी, खोबरं तिकडं चांगभलं ! )
अशा धर्तीवर एकावर एक वक्ते बोलत राहिले अन कंसात प्रतिक्रिया उमटत राहिल्या.
खुद्द धायगुडेसाहेबांना आपली इतकी भलावण होईल याची अपेक्षाच नव्हती. कारण आपण लोकांना कशी वागणूक दिलीय हे ते पुरेपूर ओळखून होते. त्यामुळे ते सुरुवातीला जरा दबकले. पण जसे एकावर एक वक्ते स्तुतिसुमने उधळू लागले, तसे तेही हळूहळू फुगू लागले.
अखेर सत्कारमूर्तींना मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली गेली. धायगुडेसाहेब उत्फुल्ल चेहऱ्याने उठून उभे राहिले.
'माझे सहकारी मित्रहो, मी सेवेत असताना मोठमोठी कामे केली. लोकांना संतोष दिला . सर्वांचे समाधान केले. शक्य त्यांचे कल्याण केले...'
( सर्वात जास्त स्वत:चे !)
'मी आजारी असल्याशिवाय कधी रजाही घेतली नाही...'
( उत्पन्न बुडाले असते ना !)
'आज या शहरातल्या कोणत्याही ग्राहकाला विचारा, माझ्याबद्दल कुणी तक्रार करताना दिसणार नाही. मी सदैव कंपनीचे अन लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून सेवा दिली..'
आपण सेवानिवृत्ती समारंभाऐवजी एखाद्या राजकीय प्रचारसभेला तर आलो नाही ना, असे प्रेक्षकांना वाटू लागले.
बराच वेळ मी-मी ची टिमकी मिरवून झाल्यावर धायगुडेसाहेब खाली बसले.
एव्हाना चहा वगैरे झाल्यामुळे बरीच प्रेक्षकमंडळी पांगायच्या नादाला लागलेली होती. दहा एक खुर्च्या रिकाम्या झालेल्या होत्या.
अध्यक्षाना मार्गदर्शनपर चार शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली.
देशमुखसाहेब घड्याळात पुन्हा एकदा कटाक्ष टाकून अध्यक्षीय भाषण करायला उठले.
'उपस्थित कर्मचारी बंधू-भगिनी हो, सत्कारमूर्ती धायगुडेसाहेब यांचे इतके सगळे कौतुक आतापर्यंत आपणा सर्वांनी केल्यानंतर मी वेगळे काय बोलणार ?
इतका सद्गुणी अन कार्यक्षम अधिकारी आजवर माझ्या हाताखाली काम करीत होता याचा मला आजवर पत्ता नव्हता ! त्यांचे गुण जाणून घेऊन मी सद्गदित झालो आहे..!
एकच जाहीर करतो. गेल्या आठवड्यात रिक्त पदांवर आउटसोर्सिंग करण्याबद्दल सर्क्युलर आले आहे. तरी धायगुडे सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर दुसऱ्या कोणाची नेमणूक होईपर्यंत मी या गुणी अधिकाऱ्याची पुन्हा एकदा आउटसोर्सिंग स्त्रोतामधून नेमणूक करीत आहे...!'
प्रेक्षकांमधून आता टाळ्या आल्या नाहीत. कारण सर्वांच्याच गोट्या कपाळात गेल्या होत्या अन काही जण तर बेशुद्ध व्हायच्या बेतात आले
...इन्क्ल्युडिंग धायगुडेसाहेब !

मांडणीअनुभव

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

16 Jun 2014 - 3:41 pm | आयुर्हित

कॉमेंट्री जबरदस्त होती.
लेखाला आमच्या अगणित टाळ्या!

विटेकर's picture

16 Jun 2014 - 4:16 pm | विटेकर

उत्तम !

मूकवाचक's picture

17 Jun 2014 - 6:19 pm | मूकवाचक

+१

मनातल्या (म्हणजे कंसातल्या) प्रतिक्रिया मस्त!
अवांतरः 'गोट्या कपाळात गेल्या' टाळता आलं असतं का?

एस's picture

16 Jun 2014 - 4:19 pm | एस

बेक्कार भारी. कडकडाट स्वीकारा. (फक्त ते फेटा 'नेसवला' हे खटकले. बारीक. जाऊदे.)

ग्रामीण भागात 'बांधणे' पेक्षा 'नेसवणे' विशेष मानार्थी वापरतात.

प्रभाकर पेठकर's picture

16 Jun 2014 - 4:29 pm | प्रभाकर पेठकर

खल्लास..! शेवटचे वाक्य सर्वार्थाने कथेचा सुवर्णमुकुट आहे, अभिनंदन.

अजया's picture

16 Jun 2014 - 4:32 pm | अजया

आवडला निरोप समारंभ !!

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Jun 2014 - 4:38 pm | ज्ञानोबाचे पैजार

धायगुडे सायबाण्नी पोग्राम ला यायच्या आदी द्येसमुख सायबा बरोबर सेटींग लावल असणार.

अनुप ढेरे's picture

16 Jun 2014 - 4:41 pm | अनुप ढेरे

मस्तं!

(चार वर्षांची डिग्री घ्यायला आठ वर्षे लागली म्हणून बरं, नायतर छत्तीस वर्षं आमच्या बोकांडी बसला असता ! )

हे भारीच!

आदूबाळ's picture

16 Jun 2014 - 5:01 pm | आदूबाळ

ही ही हॉ हॉ हॉ...

भारीच कथा. एकदम मिरासदारी टच्च!

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2014 - 5:16 pm | टवाळ कार्टा

लय भारी...जरासा टारोबा टच असलेले लिखाण :)

प्रेक्षकांमधून आता टाळ्या आल्या नाहीत.

पण लेख वाचून आमच्या टाळ्या घ्या. *clapping*

मस्त खुशखुशीत लेख.

भाते's picture

16 Jun 2014 - 5:48 pm | भाते

छान. आज बऱ्याच दिवसांनी मिपावर खुसखुशीत लिखाण वाचायला मिळाले.
मनातल्या / कंसातल्या प्रतिक्रिया :)
शेवटचं वाक्य वाचुन बेक्कार हसलो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2014 - 6:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !!!

शेवट तर खासच !

रेवती's picture

16 Jun 2014 - 6:18 pm | रेवती

अरे देवा! म्हणजे हा बुवा पुन्हा काही दिवस लोकांना छाळायला येणार. सूख तात्पुरतं ठरलं. ;)

टिवटिव's picture

16 Jun 2014 - 6:53 pm | टिवटिव

मजा आलि :)

कवितानागेश's picture

16 Jun 2014 - 6:55 pm | कवितानागेश

खुसखुशीत!! :)

स्वाती दिनेश's picture

17 Jun 2014 - 12:28 pm | स्वाती दिनेश

खुसखुशीत आणि खमंग..
स्वाती

बॅटमॅन's picture

16 Jun 2014 - 6:55 pm | बॅटमॅन

हा हा हा, जबरीच =)) =)) =))

धायगुडेला पुन्हा बघून लोकं धाय मोकलून रडली असतील.

एस's picture

16 Jun 2014 - 7:06 pm | एस

धायगुडेला पुन्हा बघून लोकं धाय मोकलून रडली असतील.

परत? *crazy*

बॅटमॅन's picture

17 Jun 2014 - 3:07 pm | बॅटमॅन

मोकलाया धाई(दिश्या)गुडे ;)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jun 2014 - 7:07 pm | अत्रुप्त आत्मा

@लगेच ज्युनिअर्सपैकी एकजण माईक हातात घेऊन 'हॅलो हॅलो' करू लागला. त्याचा मूळचा अमीन सयानीसारखा मृदूमधुर आवाज (असे त्याचे मत होते ) माईकपासून स्पीकरपर्यंत जाता जाता , स्पीकरचा गळा भेदून, पेकाटात लाथ बसलेल्या कुत्र्यासारखा केकाटू लागला>>> =)) अगागागागागा!!! =))
.
.
.
.
अाणि अखंड लेखासाठी जोरदार टाळ्या! *clapping*

मुक्त विहारि's picture

16 Jun 2014 - 7:28 pm | मुक्त विहारि

छान चुरचूरीत लेख.

आवडला.

दिपक.कुवेत's picture

16 Jun 2014 - 7:30 pm | दिपक.कुवेत

कंसातल्या वाक्यांसाठि विशेष टाळ्या!!!

सखी's picture

17 Jun 2014 - 1:07 am | सखी

हेच म्हणते...खुसखुशीत लेख -कंसातल्या वाक्य खासच.

बाबा पाटील's picture

16 Jun 2014 - 8:03 pm | बाबा पाटील

मनमोकळा हसलो बुवा आज. *ROFL* धायगुड्याच्यामारी. यापेक्षा वेगळ्या भाषेत लिहिल असत तर पार पुचाट झाल असत.त्यामुळे भाषेला पैकीच्या पैकी गुण... *clapping*

पैसा's picture

17 Jun 2014 - 12:26 am | पैसा

जबरदस्त लिहिलंय! खरंच मिरासदार आणि श़कर पाटलांच्या कथांची आठवण आली!

यशोधरा's picture

17 Jun 2014 - 7:26 am | यशोधरा

कंसातली काँमेंट्री भारी!

कंजूस's picture

17 Jun 2014 - 8:25 am | कंजूस

मजेदार कंसातले लेखन .
चिं वि जोशी कसे आठवले नाहीत ? हाच निवृत्ती निरोप समारंभ ऑफिसच्या "सौजन्य सप्ताहात" होतो आणि भाषणबाजीत प्रत्येकजण खरे बोलण्याचे सौजन्य दाखवतो .

गोट्या -,फाट्यावर-- ,--फाटली ,-भोकांडी- ,-बसवून- ,-आयला-- इत्यादी बरेच वाकप्रचार खरे वाइट शिव्या आहेत परंतू सर्रास वापरले जातात .

कडक साहेब आउटसॉसिँगच्या फुटपाथवर आल्यावर मात्र भिजलेल्या उंदरासारखे केविलवाणे वागू लागतात .

प्रचेतस's picture

17 Jun 2014 - 8:41 am | प्रचेतस

मस्त खुसखुशित लेख.
मजा आली वाचून.

चाणक्य's picture

17 Jun 2014 - 10:53 am | चाणक्य

स्नेहांकिता = खुसखुशीत लिखाण

समीरसूर's picture

17 Jun 2014 - 10:33 am | समीरसूर

खूप छान! तुमची लिहिण्याची हातोटी ओघवती आणि उत्सुकता निर्माण करणारी आहे. वाचतांना मजा वाटली. :-) अजून येऊ द्या तुमच्या अनुभवांवर आधारित कथा! असे धायगुडेसाहेब अगणित पाहिले आहेत. स्वतःचे खिसे भरण्याखेरीज दुसर्‍या कुठल्याच कार्यासाठी आपला जन्म झालेला नाही अशी यांची धारणा असते. असो.

अवांतरः 'गोट्या कपाळात जाण्या'वरून आठवले. माझ्यासोबत कार्यालयात एक मुलगी होती. ती बिनधास्त 'केएलपीडी', 'व्हाय इज ही फ*ग अराऊंड?', 'माझी सॉल्लीड लागली', 'मॅनेजर ने पुछा की डिझाईन्स हो गये क्या, मेरी तो फट गयी यार' वगैरे बोलायची. दिसायला देखणी होती. डोळे काळेभोर आणि धारदार होते. तिच्या तोंडून हे सगळं ऐकतांना विचित्र वाटायचं खरं पण तिला ते शोभायचंदेखील!! :-) पुरुषांना असं काही सगळ्यांदेखत बोलणं कठीण जातं कारण कुठून कसा हल्ला होईल नेम नसतो. याउलट बायकांना अशी भीती नसते. असो. हळूहळू हे रुळत चाललं आहे. कालांतराने या विशिष्ट अर्थ असलेल्या वाक्यांचा/शब्दांचा 'तो' अर्थ बाद होऊन ही वाक्ये/शब्द ढोबळ अर्थ चटकन सांगणारे वाकप्रचार होतील असे वाटते आहे. उदा. 'परसाकड' म्हणजे शौचास बसण्याची क्रिया असा कित्येक दिवस माझा समज होता. नंतर लक्षात आले की ते 'परसाकडं जाणे' म्हणजे परसात असलेल्या शौचालयात जाणे असे आहे. शौचास जातो असे थेट न सांगता एखादा स्वच्छ शब्द योजण्यासाठी 'परसाकडं' ही शब्दसोय झाली. पण कालौघात याच शब्दाला तो काहीसा अप्रिय अर्थ चिकटला. अर्थाच्या परीसस्पर्शाने परस पावन झाला. म्हणजे अर्थ महत्वाचा! म्हणूनच सध्या अश्लील वाटणारे पण नेहमीच्या सर्रास वापरात असलेले हे वाकप्रचार हळूहळू अर्थाचे बोट पकडून शब्दकोशात मानाचे स्थान पटकावतील असे वाटते. :-)

विटेकर's picture

17 Jun 2014 - 11:11 am | विटेकर

अवांतरः 'गोट्या कपाळात जाण्या'वरून आठवले

तुम्ही ज्या पद्धतीने हे हाताळले त्याबद्दल अभिनंदन ! वरती नुस्ताच काथ्याकूट वाचला , त्यापेक्षा हे अधिक सकारात्मक आणि श्रेयस्कर! वापराने काही शब्द गुळ- गुळीत होत जातात आणि अशी अनेक संक्रमणे भाषेचा अभ्यास करताना आपल्याला दिसतील. अगदी नेहमीचे उदाहरण म्हणजे लग्नासाठी सरळ सरळ शरीर संबंध हा शब्द वापरणे! ( हा शब्द मी लग्नाच्य पत्रिकेत वाचला आहे )
ज्याअर्थी लेखिकेने हा शब्द वापरला आहे त्याअर्थी तो त्यांनी कोठेतरी सभ्य ठिकाणीच तो ऐकला असावा. त्याचा शब्दशः अर्थ न पाहता लक्षांश समजून वापरला , ही एक साधारण क्रिया आहे. त्यात कीस काढण्यासारखे काहीही नाही !त्यामुळे लेखाचा स्वाद घेण्यात काहीही अडचण येत नाही.

त्यामुळे काही शब्द पावन होऊन प्राज्ञ मराठीत स्थान पटकावतील या तुमच्या मताशी लै वेळा सहमत.

अस्तु ! लेख उत्तम आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.

सुहास..'s picture

18 Jun 2014 - 9:46 am | सुहास..

+१०००

कुसुमावती's picture

17 Jun 2014 - 10:49 am | कुसुमावती

मस्त जमलिये कथा.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Jun 2014 - 11:04 am | llपुण्याचे पेशवेll

भारीच. विशेषतः कंस हे जास्तंच हास्य-मारक ठरले.

इशा१२३'s picture

17 Jun 2014 - 12:15 pm | इशा१२३

मस्त मजा आली वाचताना..

प्यारे१'s picture

17 Jun 2014 - 4:57 pm | प्यारे१

खुसखुशीत लेखन....

अवांतरः बाकी समीरसूरचा नि इतरही प्रतिसाद योग्य वाटत आहेत. मागे मिपावरच कुणीतरी (बहुधा धम्यानं) अत्यंत भीतीनं बुब्बुळं वरच्या दिशेनं सरकून फक्त पांढरा भाग शिल्लक राहतो म्हणजे डोळे पांढरे होतात म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या बाहुल्या म्हणजे काळ्या गोट्या कपाळात गेल्या असा व्यवस्थित अर्थ कुणीतरी समजावला होता असं सांगितलेलं.
अतिअवांतरः बेडरुम मधलं वागणं हॉल मधे नि रस्त्यावर देखील सुरुच ठेवणं म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल काय?

असो!

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2014 - 9:52 pm | चौथा कोनाडा

खरा अर्थ तुम्ही म्हणता तसाच आहे. काही लोकानी याला "वेगळाच" अर्थ चिटकावून पसरवलाय.

बबन ताम्बे's picture

17 Jun 2014 - 6:46 pm | बबन ताम्बे

धमाल कथा. आवडली.

भाते's picture

17 Jun 2014 - 8:03 pm | भाते

या एकाच वाक्याविषयी धागा भरकटतो आहे!

निर्मळ मनाने धाग्याचा घ्या. फक्त मनातल्या / कंसातल्या प्रतिक्रिया छानच आहेत. तिकडे बघा जरा!
काय त्या एकाच वाक्याला कुरुवाळत बसले आहेत सगळे जण? :(

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2014 - 9:43 pm | चौथा कोनाडा

मस्त ! धमाल ! मजा आली वाचताना !

खमंग थालीपीठ खाल्याचा आनंद मिळाला !

धर्मराजमुटके's picture

17 Jun 2014 - 9:58 pm | धर्मराजमुटके

स्त्री शिक्षणाची आवश्यकता आहे !
स्त्री प्रबोधनाची आवश्यकता आहे !
पुरुषांचे वाक्प्रचार नावाच्या लिखाणाची आवश्यकता आहे.पुरुष वेगवेगळी क्रियापदे कशी चालवितात याची सोदाहरण मांडणी करण्याची आवश्यकता आहे.

पुरुष शिक्षणाची आवश्यकता आहे !
पुरुष प्रबोधनाची आवश्यकता आहे !

स्त्रीयांचे वाक्प्रचार नावाच्या लिखाणाची आवश्यकता आहे.स्त्रीया वेगवेगळी क्रियापदे कशी चालवितात याची सोदाहरण मांडणी करण्याची आवश्यकता आहे.

मात्र ते एखाद्या पुस्तकरुपात किंवा पासवर्ड प्रोटेक्टेड ईबुक स्वरुपात असावे. वर योग्य ते डिस्क्लेमर असावे.
ज्यांची इच्छा असेल त्यांनी वाचावे म्हणजे अशा संस्थळावर एखादा वाक्प्रचार वापरल्यास त्यावर एवढी चर्चा होणार नाही वा नंतर कानकोंडे वाटणार नाही.

यश राज's picture

17 Jun 2014 - 10:25 pm | यश राज

यावरुन आमच्या ऑफीसमधला एक प्रसंग आठवला....

निमित्त : आमच्या अती सिनिअर असलेल्या एस.एंचा निरोप समारंभ..

तर आमचे हे महाशय खुप सिनिअर, जवळ्पास ३५ वर्षे आमच्या ऑफीस मध्ये काम करत होते.पगार प्रचंड पण अगदीच अनप्रॉडक्टीव, पण सिनिअर असल्या कारणाने कोणीच बोलू शकत नसे.
यांचे काम म्हणजे दिवसभर लॅपटॉपवर पत्त्यांचा गेम खेळणे, आम्ही काही शंका विचारली की टाळंटाळ करणे..
आम्ही सर्व अक्षरशः त्यांना कंटाळ्लेलो.

त्यांच्या रिटायमेंटच्या दिवशी आम्ही २०/२५ जणांनी प्रत्येकी ५०० रु. जमा केले. आणि साहेंबांसाठी महागडे मनगटी घड्याळ, टिमचा कोलाज फोटो,सुंदरशी फुलदाणी,बुके आणि बरेच काही आणले.
संध्याकाळी ५:१५ वा. सगळे त्यांच्या निरोपसमारंभासाठी कँटीन मध्ये जमले.सगळ्यांनी अक्षरशः १५ मिनीटांत त्यांच्याविषयीचे कौतुकपुराण संपवले कारण ६ वाजेची कंपनी बस पकडायची होती.

मग हे महाशय बोलायला उठले. भरलेल्या कंठाने त्यांनी त्यांचा कार्यप्रवास उलगडायला सुरुवात केली,
ऑफीस,कर्मचारी,प्रोजेक्ट्स्,परदेशवारी,पुरस्कार.....बरेच काही..
इकडे आमची बस सुटत असल्यामुळे आमची चुळबुळ सुरु पण गडी थांबायलाच तयार नाही.
आमच्या बसेस सुट्ल्या..
शेवटी ६:१५ वा. साहेब थांबले आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोड्तो न सोडतो तोच त्यांनी म्हटले की "जरी मी आज रीटायर झालो असलो तरी उद्यापासुन मी कन्सल्टंट म्हणुन आपले ऑफीस जॉइन करणार आहे त्यामुळे वाइट वाटून घेवु नका"
आमच्या सगळ्यांचे चेहरे पडले,आम्ही अगोदर खुष होतो पण आता आम्हाला खरेच वाइट वाटत होते. कारण ५०० रु गेले,बस ही गेली,रिक्षाचा खर्च लागला आणि वर हे साहेब परत आमच्या गळ्यात पडणार.

मदनबाण's picture

18 Jun 2014 - 6:58 am | मदनबाण

सुरेख लेखन !
आवले बुवांशी सहमत !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यात

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Jun 2014 - 2:07 am | निनाद मुक्काम प...

इन्क्ल्युडिंग धायगुडेसाहेब !
विनोदी खुसखुशीत लेखाचा शेवट बहारदार झाला आहे.
मात्र आता कंजूस म्हणतात तसे साहेब आउट सोर्सिंग म्हणून येणार असतील तर त्यांच्यावर सगळी भडास काढल्या जाईल म्हणूनच ते आपले वर्तन बदलतील असे वाटते,
मिपावर खूप दिवसांनी हसवणारे लेखन वाचायला मिळाले
ग वि ह्यांचा वाडा च्या पुढील भागाच्या प्रतीक्षेत

सविता००१'s picture

20 Jun 2014 - 1:01 pm | सविता००१

सुरेखच लिहितेस गं तू. खूप बहारदार लिखाण. शेवट तर केवळ उच्च!