शुभेच्छा संदेशांच्या विश्वात...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
13 Jun 2014 - 1:48 pm

आजचा किस्सा तेंडुलकरचा... किंवा त्याच्याच मुळे आवडू लागलेल्या क्रिकेटचा... खरं तर एका शुभेच्छा पत्राचा...
जाऊ दे. वाचा आणि तुम्हीच ठरवा...
मराठी शुभेच्छा पत्रांच्या बहराचा तो काळ. मी एका कंपनीसाठी इनहाऊस रायटर म्हणून काम करत होते. या कामात तेव्हा फ्री लान्सिंगमध्ये उत्तम पैसे आणि बऱ्यापैकी नाव मिळत असलं, तरी मला त्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी व्हायला मनापासून आवडायचं. इनहाऊस रायटर म्हणून काम करतानाच ते शक्य व्हायचं. अर्थात पैसे त्यातही चांगले मिळायचे. दोन्हीतला फरक सांगू का? शुभेच्छा पत्रं कशी तयार होतात किंवा होत, ते आधी समजून घेऊ.
फ्रिलान्सिंग करताना तुम्हाला विषय दिले जातात, बहुतेक शुभेच्छापत्रं (तेव्हा) फ्लोरल अर्थात फुलांची अथवा निसर्गातील छायाचित्रं असणारी असायची. विषय म्हणजे - ५ - वाढदिवस, ६ - नात्यांचे वाढदिवस ( आई, बाबा, भाऊ, बहीण इ.), ४ - मैत्री, ५ - प्रेम वगैरे...वगैरे. तर विषयाला अनुरूप आणि चित्रांना (उपलब्ध असल्यास) साजेसा मजकूर लिहायचा आणि तो कंपनीकडे सोपवायचा. या प्रकारात वाईट गोष्ट अशी की आपण मारे एखादी उपमा किंवा विचार किंवा सुभाषित घेऊन शुभेच्छा संदेश लिहिलेला असो, त्यावर काम करणारी व्यक्ती किंवा मालक किंवा मार्केटिंगवाला अमराठी असला किंवा त्याला मजकुराची जाण नसली तर, मराठी में/बर्थडे में फ्लोरल चलता है, असं म्हणून कोणताही मजकूर फुलांच्या खाली छापला जायचा. कॉपी सोपवल्यानंतर, पैसे घेतल्यानंतर आणि नवं काम हाती घेतल्यानंतर तो मजकूर काहीसा विस्मरणात जातो न जातो, तोच आपल्या दुर्दैवाने एखाद्या दुकानात आपणच लिहिलेला मजकूर देखण्या चित्रांचं बोट धरून अचानक समोर यायचा. मजकूर आणि चित्र यांचा अजिबात ताळमेळ नसलेलं ते शुभेच्छापत्र केविलवाण्या नजरेने आपल्याकडे पाहताना दिसायचं.
इनहाऊस रायटर म्हणून काम करताना मात्र हे टाळता यायचं. अशा प्रकारे काम करण्यातली मला आवडणारी बाब म्हणजे संपूर्ण निर्मितीचा प्रत्येक टप्पा आपल्या नजरेसमोर उलगडत जातो. बरेचदा मजकुराला कोणती चित्र/दृश्य/प्रतिमा साजेशी ठरतील ते लेखक सुचवतात, त्यानुसार कलाकार चित्र आणि सुलेखन करून देतात, मग बॅकग्राउंडसाटी वापरायची डिझाईन्स, रंगसंगती, त्याबाबतची चर्चा आणि आकाराला येणारं ते शुभेच्छापत्र... खरंच... खूप छान अनुभव असतो तो...
तर... असे छान-छान अनुभव घेणं सुरू होतं. चित्रकार, सुलेखनकार आणि संगणकावर शुभेच्छापत्राला मूर्त रूप देणारे तज्ञ, अशी आमची सर्वांचीच एकमेकांशी छान गट्टी आणि भट्टी जमली होती. विश्वचषकाचे सामने सुरू होते. आम्ही सगळेच क्रिकेटप्रेमी. भारत- पाकिस्तान सामना सुरू होता. माझ्याकडे तेव्हा वॉकमॅन होता, प्रवासातला सोबती. दुपारी जेवणाच्या सुट्टीत सामन्याचं समालोचन ऐकलं आणि मी अस्वस्थ झाले. तेंडुलकर मस्त खेळत होता. जेवणाची वेळ संपली आणि वॉकमॅन बंद करून मी जागेवर बसले. कामात लक्ष नव्हतंच लागत.
कंपनीचे मालक पंजाबी. साधारण चाळीशीचे. उत्साही. मराठी फारसं कळत नसलं, तरी ही मंडळी उत्तम काम करताहेत, इतकं समजण्याइतके व्यावसायिक नक्कीच होते. त्यामुळे कामात सहसा ढवळाढवळ नसायची. त्यांच्याही एक-दोन फेऱ्या झाल्या. माझी अस्वस्थ चुळबुळ सुरूच होती. वाढदिवसाचा मजकूर - काही वेगळा कन्सेप्ट असणारा, लिहायचा होता. पण मन तर क्रिकेटच्या सामन्यात गुतलेलं. माझं अस्वस्थ असणं मालकांच्या लक्षात आलं. त्यांनी डोळ्यांनीच आमच्या चित्रकार महाशयांना "काय झालं" असं विचारलं. उत्तरादाखल ते फक्त हसले. त्यांच्यातली नेत्रपल्लवी मी पाहिली, पण प्रतिक्रिया मात्र नाही दिली. भलत्याच विचारात होते ना...
चित्रकार महाशय उठले, माझ्या जवळ आले. अगं, तुझा वॉकमॅन दे बघू... मी वैतागले... घ्या. स्कोअर ऐका आणि परत द्या. मला सांगू नका. मला तुकड्या तुकड्यात नाही ऐकायचं... त्यांनी हसत वॉकमॅन घेतला, तो चक्क संगणकाच्या स्पीकरला जोडला आणि समालोचन सुरू केलं. मला धक्काच बसला. पण तो क्षणभरच टिकला. तेंडुलकरच्या खेळाचं वर्णन ऐकणं जास्त महत्वाचं होतं. धक्का बिक्का बाजूला सारून आम्ही सगळेच समालोचन ऐकण्यात गुंग झालो. मध्येच कधीतरी मालकांची आणखी एक फेरी. माझी चुळबुळ थांबलेली आणि रायटिंग पॅडवर काहीतरी लिहित मी समालोचन ऐकण्यात मग्न. सगळ्यांवर एक नजर फिरवत काहिसे हसतच ते त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले. काम करत करत आम्ही सगळ्यांनीच समालोचन ऐकलं. तेंडुलकरचं शतक झालं नाही, पण त्याच्या खेळीमुळे भारतानं तो सामना जिंकला. माझ्यासह सगळेच हवेत. सामना संपला आणि त्याबद्दल चर्चा करत आम्ही पूर्णपणे कामाकडे वळलो.
पाचएक मिनिटांनी चित्रकार महाशय जागेवरून उठले आणि माझ्याकडे आले, माझ्या हातातल्या कागदांमध्ये डोकावले...

वाढदिवस म्हणजे आयुष्याच्या क्रीझवर नव्या इनिंगची दिमाखदार सुरूवात..


शाबास... वाटलंच मला... चालू देत... इतकंच बोलून पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले.
माझं विचारचक्र सुरूच होतं. मजकूर पाठ केलेला असावा, इतक्या सहजपणे मनातून कागदावर उतरत होता. लिखाण थांबवलं आणि चित्रकार महाशयांच्या हातात सोपवलं. त्यांच्या तोंडून, "अरे वा, मस्त" अशी दाद आली आणि आमच्या सुलेखनकर्तीने कागद हाती घेतला. संपूर्ण कॉपी मोठ्याने वाचून दाखवली तिने आणि सगळ्यांनीच उत्स्फूर्त प्रतिक्रीया देत आपापल्या सूचना सुरू केल्या. साधारण १५-२० मिनिटं चर्चा झाली आणि सगळेच पुन्हा कामाला भिडलो. एक जण कॅरेक्टर, एक जण बॅकग्राऊंड, एक जण सुलेखन, एक जण लेआउट आणि मी... मजकुरावरून दुसरा हात फिरवू लागले.
तो दिवस संपला. दुसरा दिवस सुरू झाला आणि तासाभरात शुभेच्छापत्र आकाराला येऊ लागलं. मालकांनी शिरस्त्याप्रमाणे आमच्याकडे एक फेरी मारली.सुलेखनकर्तीच्या शेजारी उभे राहत त्यांचा प्रश्न, "ये बॅट-बॉल क्युं बना रही है तू?"
पुन्हा एकदा पुढाकार घेत आमच्या चित्रकार काकांनी त्यांना शुभेच्छापत्र ऐकवलं आणि त्याच्या रचनेची कल्पना दिली. ते भरपूरच खुष झाले, "बढिया लिखा है मॅडम. अरे आप तो मॅच सुनते हुए भी काम के बारे में सोचते हो. बहुत बढिया. अब हम ये कॉपी हिंदी में भी बनाएंगे. आपका मराठी कार्ड रेग्युलर होगा, लेकिन हिंदी में हम फोर फोल्ड बनाएंगे. आप जरा हिंदी कॉपी भी देख लिजिए.." एवढं बोलून त्यांनी फोन उचलला, हिंदी लेखकाला बोलावून घेतलं आणि निघून गेले. आम्ही सगळेच पुन्हा कामात , चर्चेत रंगलो. त्याच दिवशी शुभेच्छापत्रं पूर्ण होऊन छपाईला गेलं आणि ताज्या लॉट बरोबर आठवडाभरात मार्केटमध्ये. क्रिकेटचे दिवस होतेच सुरू, त्यामुळे त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. आम्ही सगळे मात्र तोवर पुढच्या शुभेच्छापत्रांच्या तयारीत गुंग झालो होतो.
अरे हो, ते शुभेच्छा पत्र असं तयार झालं...( क्षमस्व - छायाचित्र अपलोड करता येत नाही.)
आणि हो, यथावकाश हिंदी शुभेच्छा पत्रही तयार झालं आणि दोन वेळा रि-प्रिंटही झालं. ( एक प्रिंट - ३००० प्रती)

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

छान अनुभव, नविनच विश्वातला.शुभेच्छा पत्र अशी बनतात तर !

मृत्युन्जय's picture

13 Jun 2014 - 2:37 pm | मृत्युन्जय

मस्तच. वाचायला मजा आली.

मुक्त विहारि's picture

13 Jun 2014 - 2:53 pm | मुक्त विहारि

आवडला...

स्मिता चौगुले's picture

13 Jun 2014 - 3:58 pm | स्मिता चौगुले

खूप छान,ही माहिती नविन आहे आमच्यासाठी
लिहित रहा
पुलेशु *good*

सखी's picture

13 Jun 2014 - 6:06 pm | सखी

अनुभव आवडला, तसेच तुमची वरिष्टांबद्दल (आणि त्यांची इतरांबद्द्ल) असलेली सकारात्मक दृष्टीही आवडली. खूप वेळेस बॉसच्या नावाने लोक खडेच फोडतात असे दिसते, चांगल्यातलं चांगलं घ्यावं हे तुमच्या लेखांमध्ये लख्खपणे जाणवतं.

धन्या's picture

13 Jun 2014 - 7:36 pm | धन्या

प्रामाणिक लेखन आवडले.

रेवती's picture

13 Jun 2014 - 8:10 pm | रेवती

छान अनुभव! लेखन आवडले.

अवांतर पण महत्त्वाचा प्र्श्णः कुठला सामना होता?

तुषार काळभोर's picture

14 Jun 2014 - 10:19 am | तुषार काळभोर

वर्ल्डकप,
तेंडुलकर,
पाकिस्तान,
शतक हुकलं,
सामना जिंकून दिला,
-> -> ->

१ मार्च २००३ सेंच्युरियन, दक्षिण आफिका

तुमचा अभिषेक's picture

14 Jun 2014 - 2:59 pm | तुमचा अभिषेक

दुपारी जेवणाच्या सुट्टीत सामन्याचं समालोचन ऐकलं आणि मी अस्वस्थ झाले. तेंडुलकर मस्त खेळत होता.

आपण वर उल्लेखलेला सामन्यात त्याची (भारताची) फलंदाची संध्याकाळी होती, इथे दुपारचा उल्लेख असल्याने मागचाच २०११ विश्वचषकातील ८५ धावांची खेळी असावी.

खटपट्या's picture

14 Jun 2014 - 11:09 am | खटपट्या

ते शुभेच्छा पत्र बघायला मिळाले असते तर मजा आली असती

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2014 - 2:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

तुमचा अभिषेक's picture

14 Jun 2014 - 3:00 pm | तुमचा अभिषेक

क्रिकेट आणि सचिनशी संबंधित असल्याने उत्सुकता जास्तच
अनुभव मात्र छान आणि वेगळी माहीती देणारा

माधुरी विनायक's picture

17 Jun 2014 - 12:44 pm | माधुरी विनायक

धन्यवाद मंडळी.प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.
सखी - खरं आहे. सगळेच वरीष्ठ वाईटच असतात असं नाही. आणि वाईट अनुभव किंवा वाईट वागणुक देणाऱ्या वरीष्ठांमुळे आपण जास्त खंबीर होत जातो, तावून- सुलाखून निघतो, हे ही तितकंच खरं. यातलं कोणीच आयुष्याला पुरत नाही, आठवणींचे ठसे मात्र कायम उरतात...
भृशुंडी - पैलवान यांनी अचूक तपशील दिलेत. धन्यवाद.
तुमचा अभिषेक - पैलवान यांनी तपशील दिलेत, तो सामना. धन्यवाद.
खटपट्या - मी प्रयत्न केला शुभेच्छापत्र अपलोड करायचा, पण जमलं नाही बुवा. आणखीही शुभेच्छापत्रे आणि किस्से आहेत, पुन्हा प्रयत्न नक्की करेन.

सचिन प्रेमींसाठी हा दुवा (उपयुक्त आकडेवारी) http://sachinandcritics.com/

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2014 - 10:29 pm | चौथा कोनाडा

वेगळ्या क्षेत्रातला सुंदर अनुभव ! एका कलाकाराच्या निर्मिती क्षणाचा उत्क्रुष्ट अविष्कार ! छान आहे लिखाण !

चित्रगुप्त's picture

17 Jun 2014 - 11:41 pm | चित्रगुप्त

वेगळ्या विषयावर छान वाचायल मिळाले.

मराठी शुभेच्छा पत्रांच्या बहराचा तो काळ

आता हा बहर ओसरला आहे की काय ? कश्यामुळे ? "बहारे फिर भी आयेगी" असे वाटते का? असा बहर येणे हे कश्यावर अवलंबून असते?

माधुरी विनायक's picture

25 Jun 2014 - 5:02 pm | माधुरी विनायक

चित्रगुप्तजी, बहराचा काळ अशासाठी म्हटलं, कारण तेव्हा मराठी शुभेच्छापत्रं खरेदी करण्यासाठी युवा वर्ग आवर्जुन दुकानात, स्टोअर्समध्ये जात असे. अगदी ग्रुपने मराठी शुभेच्छापत्र खरेदीसाठी जायचंही फॅड होतं. दुकानातच मराठी शुभेच्छापत्रांचं मोठ्याने वाचन सुद्धा व्हायचं.
संपर्कासाठी किंवा शुभेच्छा देण्यासाठी फोन किंवा फार तर ऑर्कुट होतं. मोबाइल तुरळक तर फेसबुक आजच्या इतकं प्रचलित नव्हतं. आजघडीला या सगळ्यात व्हॉट्स ॲप ची भर पडलीय. हल्ली फार तर व्हंलेंटाईन डे ला आवर्जुन शुभेच्छा पत्रांची खरेदी होते.
तो बहर परत येणार असेल तर आनंदच आहे.

एस's picture

25 Jun 2014 - 7:41 pm | एस

ग्रुपने ऑर्चिडमध्ये आवर्जून केली जाणारी शुभेच्छापत्रांची खरेदी ही एक धमाल असे. आता तो जमाना बराच मागे पडू लागला आहे.

तुषार काळभोर's picture

26 Jun 2014 - 5:44 pm | तुषार काळभोर

आर्चिज्?

एस's picture

26 Jun 2014 - 6:07 pm | एस

आर्चिज. च्यामारी, माझी विस्मरणशक्ती बहरू लागलीय वाटतं! ;-) धन्यवाद!

इशा१२३'s picture

18 Jun 2014 - 12:36 pm | इशा१२३

नविन माहिती.लेखन आवडले.

सूड's picture

25 Jun 2014 - 5:15 pm | सूड

मस्तच अनुभव !!

इनिगोय's picture

25 Jun 2014 - 7:41 pm | इनिगोय

वा मस्तच!
तुम्ही छान, ओघवतं लिहिता. लिहित रहा :-)

पैसा's picture

27 Jun 2014 - 7:34 pm | पैसा

मस्त अनुभव! छानच लिहिलंय!