किस्से लाईव्ह चे...१

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
5 Jun 2014 - 5:45 pm

हा किस्सा रेडियोवरच्या प्रसारणातला. खरं तर प्रसारण, मग ते थेट असो की मुद्रित, दोन्ही प्रकारांमध्ये सतत नवनवे किस्से घडतंच असतात. असाच एक किस्सा...
नेहमीप्रमाणे थेट बातमीपत्रासाठी बातम्या काढणं, तयार करणं, टाईप झालेल्या बातम्या वाचून दुरूस्त करून घेणं अशी लगबग सुरू होती. बातमीपत्र तयार झालं आणि नेहमीप्रमाणे वरीष्ठांना सांगुन मी स्टुडियोमध्ये जायला निघाले. प्रसारणाच्या साधारण पाच मिनिटं आधी मी स्टुडियोमध्ये पोहोचले. सिग्नेचर ट्यून (बातम्या सुरू होण्यापूर्वीचं संगीत), माईक तपासणी असे नित्य सोपस्कार पार पडले आणि मी शांतपणे प्रसारणाच्या वेळेची वाट पाहू लागले.
अचानक... मला उचकी लागली. एक...दोन... तीन...चार... बापरे... आता? नियमाप्रमाणे स्टुडियोमध्ये पाणी नेता येत नाही. मी उठून कार्यकक्षात गेले, चटकन पाणी प्यायले, पण उचक्या सुरूच... प्रसारणाला तीन मिनिटं शिल्लक. बातमीपत्र पाच मिनिटाचं असलं, तरी मला प्रत्येक दुसऱ्या शब्दानंतर उचकी लागत होती.
अगदी खरंच सांगतेय, हसू नका. मी चक्क वाचूनही पाहिलं. खरंच प्रत्येक दुसऱ्या शब्दानंतर उचकी लागत होती. आता माझ्या बरोबरीने कार्यकक्षातल्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरही ताण दिसू लागला. मी चटकन वृत्त कक्षात फोन लावला. एका नवख्या मुलीने तो घेतला. आमचा संवाद साधारण असा झाला...
मी - अगं, चटकन --- मॅडमना फोन दे. (उचक्या सुरूच)
ती (निवांतपणे) - अगं, तू तर बातम्या द्यायला गेलीस ना...
मी - (तातडीच्या स्वरात) - आधी मॅडमना फोन दे, लगेच. (उचक्या सुरूच आणि अख्खं मिनिट संपलं इथे, बातम्या सुरू व्हायला दोन मिनिटं शिल्लक)
ती (तरी निवांतच) - तुला उचकी लागलीय का...
मी - (आता थोडी काकुळतीला येत) - हो, तू आधी मॅडमना फोन दे, आपण नंतर बोलू... (उचक्या सुरूच)
ती (तरी निवांतच) - अगं, मॅडम मिटींगमध्ये आहेत,मी कशी आत जाऊ?
मी (आता थोडी काकुळतीला येत, थोडी चिडून) - मी वर आल्यावर काय ते स्पष्टीकरण देते. आत्ता... आधी... लगेच मॅडमना फोन ट्रान्सफर कर.....
ती (दचकून) - बरं, हो, हो...
मॅडम (माझ्याशी) - काय गं...
मी - मॅडम, उचकी लागलीय...
बस्स... इतकं म्हटलं मी आणि पलीकडून फोन खाली ठेवल्याचा आवाज.
वरच्या मजल्यावरून अर्ध्या मिनीटात त्या खाली आल्या, बातमीपत्र घेतलं आणि स्टुडियोत पोहोचल्या. साधारण चाळीस सेकंद मिळाली त्यांना श्वास नियंत्रणात आणायला. त्यानंतर बातमीपत्र वाचून बाहेर आल्या आणि आम्ही दोघी सोबत वर, वृत्त कक्षात पोहोचलो. तेवढ्या वेळात मी त्यांना घटनाक्रम (अर्थात उचक्या देत) सांगितला. तिथे सगळेच सदस्य, नेमकं काय झालं, ते न कळल्यामुळे आमची वाटच बघत होते.
मॅडमनी सगळा प्रसंग सांगितला आणि सगळेच खो-खो हसू लागले, अर्थात मी सुद्धा उचक्या देत हसत होतेच. ती नवी मुलगी बावरून एका बाजूला उभी होती. तिला त्या सगळ्याचा अर्थ सांगावा म्हणून मी पुढे झाले, तितक्यात मॅडमनीच तिला जवळ बोलावून घेतलं. तिला म्हणाल्या, तू नवीन आहेस ना इथे. यापुढे नेहमी लक्षात ठेवायचं. बातम्या वाचण्यासाठी खाली गेलेल्या निवेदकाचा फोन येणं, ही SOS (SOS is the commonly used description for the international Morse code distress signal) परिस्थिती असते. अशा वेळी मिटींग सुरू असताना निरोप द्यावा लागला, तरी तो तातडीने द्यायचा. समजलं का...
बातमीपत्रं मी खाली न्यायच्या आधी मॅडमनी नजरेखालून घातलं होतं, त्यामुळे आणि एकंदर अनेक वर्षांच्या अनुभवामुळे बातम्या वाचताना त्यांना फारशी अडचण आली नाही. मी मात्र त्यानंतरही पुढची दहा मिनिटं उचक्या देत आणि त्या थांबवण्यासाठी वेगवेगळ्या उपचारांना तोंड देत बसले होते...

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

5 Jun 2014 - 6:08 pm | कवितानागेश

:)

आदूबाळ's picture

5 Jun 2014 - 6:13 pm | आदूबाळ

जबरी किस्सा!

बातम्या देताना एखादा शब्द चुकून वेगळा वाचला गेला तर ते कसं मॅनेज करतात याबद्दलही कुतूहल आहे. एक मित्र पाठ केलेला पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपती मधला शिवजन्माचा (स्फूर्तिदायक वगैरे वगैरे) उतारा शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत म्हणत होता. त्यात "चवताळलेल्या महाकालिकेची क्षुधा" याऐवजी तो चुकून "चवताळलेल्या महापालिकेची क्षुधा" असं बोलून गेला. ठोठो हसलं पब्लिक. बिचार्‍याच्या भाषणाचा विचका झाला.

सुबोध खरे's picture

6 Jun 2014 - 9:45 am | सुबोध खरे

श्री श्रीकांत मोघे यांनी सांगितलेला किस्सा --
ते एकदा ऐतिहासिक नाटकाची रंगीत तालीम करीत होते त्यात सिंहगडावर चढाई करण्यापूर्वी तानाजी शिवाजी महाराजांना म्हणत असे कि महाराज तुम्हीच असा "धीर" सोडू लागलात तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहायचे
या ऐवजी तानाजीचे पात्र चुकून म्हणाले कि महाराज तुम्हीच असा "धूर" सोडू लागलात तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहायचे.
यावर तेथे इतका हशा पिकला कि रंगीत तालीम गुंडाळायची पाळी आली होती

योगी९००'s picture

6 Jun 2014 - 1:15 pm | योगी९००

जबरी किस्सा!

वरील आदूबाळ आणि खरे साहेबांचे किस्से ही मस्तच..

असाच एका आतरजालिय दिवाळी अंकात एकाचा लहानपणीच्या नाटकाचा अनुभव वाचला होता. तानाजीच्या "गड आला पण सिंह गेला" यावर हे नाटक आधारीत होते. त्यात शेलारमामाची भुमिका करणार्‍या मुलाने तानाजी पडल्यावर पळणार्‍या सेनेला "पळताय काय भ्याडांनो ? मी केव्हाच दोर कापून टाकलेत".. याऐवजी "पळताय काय भाड्यांनो" अशी सुरूवात करून पब्लिकला हसवून हसवून लोळवले होते.

आनन्दिता's picture

7 Jun 2014 - 12:01 am | आनन्दिता

देवा =))

चिगो's picture

7 Jun 2014 - 12:13 pm | चिगो

अरारारा.. =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2014 - 2:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

:) =))

धन्या's picture

5 Jun 2014 - 6:15 pm | धन्या

भारी किस्सा. :)

एस's picture

5 Jun 2014 - 6:21 pm | एस

हहपुवा झाली. बाकी "उचक्या थांबवण्यासाठी वेगवेगळ्या उपचारां" बद्दलपण लिहा. ;-)

रेवती's picture

5 Jun 2014 - 6:24 pm | रेवती

भारी.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jun 2014 - 6:24 pm | अत्रुप्त आत्मा

रंजक!

आतिवास's picture

5 Jun 2014 - 6:31 pm | आतिवास

+१

पैसा's picture

5 Jun 2014 - 6:53 pm | पैसा

मस्त किस्सा!

मुक्त विहारि's picture

5 Jun 2014 - 7:11 pm | मुक्त विहारि

आवडला...

असे किस्से अजून असतील तर जरूर लिहा.

इनिगोय's picture

5 Jun 2014 - 9:14 pm | इनिगोय

+१
येऊदेत.

शैलेन्द्र's picture

5 Jun 2014 - 7:19 pm | शैलेन्द्र

मस्त.. आवडला

रामपुरी's picture

5 Jun 2014 - 7:49 pm | रामपुरी

मस्त किस्सा. असं काही होऊ शकतं अशी कधी कल्पनासुद्धा केली नव्हती

रामपुरी's picture

5 Jun 2014 - 7:52 pm | रामपुरी

बातम्या वाचता वाचता उचकी लागली, ती सुद्धा दहा मिनिटांच्या बातमीपत्रात पहिल्या मिनीटाला, तर काय होईल अशी एक विघ्नसंतोषी कल्पना मनात तरळून गेली.

प्रभाकर पेठकर's picture

5 Jun 2014 - 7:56 pm | प्रभाकर पेठकर

रोमहर्षक वगैरे म्हणावा असा प्रसंग. पण मिनिट आणि सेकंदाच्या चिमटीत त्वरेने निर्णय घेऊन अमलात आणणे खरेच, कौतुकास पात्र आहे.

शरद गोरडे's picture

5 Jun 2014 - 8:58 pm | शरद गोरडे

खर तर माधुरी जी ह्या अशा प्रसंगा मुळे तुम्हाला कधीही तुमचे काम कंटाळवाने वाटणार
नाहि
चिल मारा
आणि हे क्षण enjoy करा

अजया's picture

5 Jun 2014 - 9:19 pm | अजया

मस्तच किस्सा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 10:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त किस्सा ! आता हसतोय पण त्यावेळेस तुमची काय अवस्था झाली असेल ! !

पिवळा डांबिस's picture

5 Jun 2014 - 10:26 pm | पिवळा डांबिस

किस्सा आवडला, अजून असेच किस्से वाचायला आवडतील....
मागे दोन-तीन महिन्यांपूर्वी लॉस अँजेलिसमध्ये एका टीव्ही स्टेशनवर बातम्या सुरू असतांना अचानक भूकंप झाला. त्या भूकंपाने तो बातम्या देणारा निवेदक इतका घाबरला की आपण बातम्या देतोय हे विसरून, त्यांचं ते स्टडीड कंपोजर सोडून, समोरच्या टेबलाखाली जाऊन दडला. अर्थात कॅमेरा समोर चालूच होता!!! :)
त्याचं असं अचानक झालेल्या भूकंपाने घाबरून जाणं जरी नॅचरल असलं तरी त्याची एकंदर भूकंप होण्याआधीची आणि नंतरची रिअ‍ॅक्शन इतकी विसंवादी आणि विनोदी होती की बाकीच्या सगळ्या प्रतिस्पर्धी टीव्ही स्टेशन्सनी ती पुन्हा पुन्हा दाखवली!!! आणि नंतर आठवडाभर देशभरातल्या स्टॅन्ड अप कॉमेडियन्सनी त्याला बकरा बनवला!!!
त्यापेक्षा 'आपण त्या भूकंपात जमिनीत गडप का नाही झालो?' असं नंतर वाटलं असणार बिचार्‍याला!!! :)

तुळशीचे पान तोंडात ठेवल्यास उचकी थांबते असे ऐकून आहे.

मी खडीसाखरेबद्दल असेच ऐकले होते.
किस्सा आवडला, तुमच्या मॅडमचा क्षणभरात निर्णय घेण्याचा गुणही भावला. अजुन किस्से वाचायला आवडतील.

तुमचा अभिषेक's picture

5 Jun 2014 - 11:53 pm | तुमचा अभिषेक

श्वास रोखून धरल्यानेही थांबते, नेहमीच थांबते याची ग्यारंटी नाही, पण मी तरी इमानैतबारे हा उपाय अमलात आणतो.

असो, किस्सा बाकी खरेच धमाल, डोळ्यासमोर आली ती तारांबळ ;)
यातून तरून गेल्यावर मात्र एक छानशी आठवण मिळते.

प्रभाकर पेठकर's picture

6 Jun 2014 - 1:32 am | प्रभाकर पेठकर

ती शेवटची उचकी. अशी रोजच्यातली नाही. *lol*

मिसळपाव's picture

6 Jun 2014 - 2:49 am | मिसळपाव

:-))))

एस's picture

6 Jun 2014 - 12:32 pm | एस

*mosking*

अंतु बर्वा's picture

6 Jun 2014 - 12:10 am | अंतु बर्वा

आवडला किस्सा. कितीतरी वेळा असं होतं ना, आपण ठरवतो जाता जाता एखादी गोष्ट करु जी आपल्या लेखी चुटकीत होणारी असते. जशी एखादी महत्वाची मिटींग असावी, मिटींगला जातानाच प्रींटाउट काढु असा विचार करुन आपण आतापर्यंत मिटिंग मटेरीयलची प्रींट काढलेली नसावी आणी नेमका ऐन वेळी प्रिंटर बंद पडून जीव मुठीत यावा. :-)
नंतर विचार करुन स्वतःचंच हसु येतं खर, पण लेखिकेप्रमाणेचं त्यावेळची अवस्था महभयानक असणार हे नक्की!

संदीप चित्रे's picture

6 Jun 2014 - 1:11 am | संदीप चित्रे

प्रसंगावधान राखून त्या क्षणी कुणावरही आरडाओरडा न करता अडचणीतून वाट काढल्याबद्दल!
बाकी तुम्ही कुठे काम करता वगैरे त्याबद्दलही वाचायला आवडेल.

स्पंदना's picture

6 Jun 2014 - 9:16 am | स्पंदना

भारीच!!

आत्मशून्य's picture

6 Jun 2014 - 10:16 am | आत्मशून्य

ते सांगायचे राहिले का ? ;)

मस्त किस्सा. आपण काय खरे साहेब काय अथवा इतर कोणी असो ऑन ड्यूटी किस्से एकदम रोंक असतात

बिपिन६८'s picture

6 Jun 2014 - 12:56 pm | बिपिन६८

आत्ता वाचताना छान हसू येतेय ,त्या वेळेस काय परिस्थिती झाली असेल तुम्हीच जाणोत

माधुरी विनायक's picture

6 Jun 2014 - 1:13 pm | माधुरी विनायक

सर्व वाचकांचे मनापासून आभार. माध्यमात कार्यरत असताना अनेक मजेदार गोष्टी,किस्से घडतात. मात्र त्यातले सर्वच जाहीर करणं शक्य होत नाही. जमतील तसे किस्से नक्की लिहीत जाईन. खरंच मनापासून आभार.

आदूबाळ यांस...
चुकीचा शब्द वाचला गेला, तर 'माफ करा', असे म्हणून चुकीचा शब्द सुधारून पुढे वाचायला सुरूवात केली जाते.

शरद गोरडे यांस...
खरं आहे. या माध्यमात काम करण्याची वेगळी मजा आहे. ताण असतातच, पण रोज नवे प्रसंग. त्यामुळे काम करायला मनापासून आवडतं. सरकारी माध्यम असलं तरी. खरं तर सरकारी माध्यम आहे, म्हणूनच. बातम्यांच्या नावाखाली २४ तास वृत्त वाहिन्यांवर जे दाखवलं जातं (सन्माननीय अपवाद वगळता) ते पाहून आपल्याला असलं काही करावं लागत नाही याचं खरंच समाधान वाटतं. अर्थात आमच्याकडेही सुधारणेला वाव आहेच. पण आम्ही जे दाखवतो, त्यांना बातमी म्हणता येईल, एवढं नक्की.

पिवळा डांबिस यांस...
आमच्याकडे असा किस्सा २६ जानेवारीचा, दूरचित्रवाणीवरचा. गुजरातमधल्या विनाशकारी भूकंपाचा तो दिवस आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. सकाळच्या बातम्या सुरू असताना मुंबईतही भूकंपाचे धक्के जाणवले. चौथ्या मजल्यावर बातम्यांचं थेट प्रसारण सुरू असताना हे धक्के जाणवले. थेट बातम्या देणारी वृत्त निवेदिका सोडली तर सगळे इमारतीबाहेर पळाले होते. अर्थात बातम्या संपायच्या आत परतले म्हणा. पण नंतर त्या वृत्त निवेदिकेचे सार्थ कौतुकही झाले...

रामपुरी यांस...
नका हो नका, असा अभद्र विचार मनात आणू नका...

अवांतर...
उचक्या थांबवण्यासाठी खडीसाखर खाणे, जीभ टाळूला चिकटवणे असे उपाय केले... आणखीही उपाय असतील. पण अनुभवाचे बोल सांगू का, कितीही उपाय करा, उचकी थांबायची तेव्हाच थांबते...

बॅटमॅन's picture

6 Jun 2014 - 3:14 pm | बॅटमॅन

च्यायला..औघडच की.

भाते's picture

6 Jun 2014 - 8:28 pm | भाते

तुमचे रेडिओवरचे आणखी अनुभव (किस्से नाही) वाचायला आवडेल.

प्यारे१'s picture

6 Jun 2014 - 10:45 pm | प्यारे१

पण .... ह्प्प्प... मी काय म्हणतो... हिक्क्क... तुम्ही थो...डं पाणी प्याय... हिक्क्क.. ला काय ह.....हरकत हिक्क्क्क.... आईगं... होती???????

आपलं नि विशेषतः आपल्या मॅडमचं विशेष कौतुक!

स्वाती दिनेश's picture

6 Jun 2014 - 11:52 pm | स्वाती दिनेश

उचकीचा किस्सा आवडला, तुमच्या मॅडमनी त्वरित निर्णय घेऊन वेळ पाळली.. त्यामुळे होणारा त्रास वाचला.. असे अजून वेगवेगळे किस्से वाचायला आवडतील,
स्वाती

मला मी शाळेत असताना साने गुरुंजीच्या 'शामची आई' या आत्मचरित्रावर बसवलेल्या नाटकची आठ्वण आली.
नववी ला असताना गावातल्या एका महाविद्यालयातील सर हे नाटक बसवत होते, त्यात माझी वर्णी लागली. मी शामच्या वडिलांची भुमिका करत होतो. अजुन आमच्य तालमी सुरु होत्या, अचानकपणे एकदा कुठल्यातरी शालेय कार्यक्रमात आम्हाला स्टेजवर पाहुण्यांसमोर नाटक करायला सांगितले गेले.

पुर्वीचा स्टेजचा कुठलाही अनुभव नसलेने आम्ही सगळे गार पडलो होतो. सगळेजण घाबरत घाबरत काम करत होते. माझ्या तोंडी एक वाक्य होते 'शाम बाळा ! आपण गरीब असलो तरी मुर्ख नाही' मी ते वाक्य ' शाम बाळा !आपण मुर्ख असलो तरी गरीब नाही' असे बोललो. पाहुण्यांसकट सगळे हसु लागले. मला अजुन आठवते त्या नाटकाची परत कधीही तालीम झाली नाही आणि ते सर ही शालेत परत कधी दिसले नाहित.

आसिफ.

अनुप ढेरे's picture

7 Jun 2014 - 8:01 am | अनुप ढेरे

हाहाहा... मस्तं किस्सा!

चिगो's picture

7 Jun 2014 - 12:17 pm | चिगो

रंजक किस्सा. तुमच्या आणि तुमच्या मॅडमच्या प्रसंगावधानाचे कौतुक..

उचकी साठी रामबाण उपाय ओठ घट्ट मिटून ठेवणे २/३ मिनिटात उचकी गायब होते

टवाळ कार्टा's picture

7 Jun 2014 - 2:57 pm | टवाळ कार्टा

आपणच?? आणि आपलेच??? ;)

असंका's picture

7 Jun 2014 - 3:00 pm | असंका

बहुतेक नाही.

आपणच आपले ओठ मिटून काय उपयोग? ज्याला उचकी लागलीये ना, त्याने! ...काय तुम्ही पण!!

टवाळ कार्टा's picture

7 Jun 2014 - 3:09 pm | टवाळ कार्टा

lips

मुक्त विहारि's picture

7 Jun 2014 - 3:21 pm | मुक्त विहारि

जबरा...

आत्मशून्य's picture

9 Jun 2014 - 12:33 pm | आत्मशून्य

तुफान...!

दिपक.कुवेत's picture

9 Jun 2014 - 12:08 pm | दिपक.कुवेत

आणि उत्तम प्रसंगवधान. मला आमच्या ईथे होणार्‍या नाटकच्या तालमीचे किस्से आठवले. खुप धमाल यायची

Gayatri Muley's picture

18 Oct 2014 - 3:58 pm | Gayatri Muley

माझ्या ही उचकी ने मला एकदा असच गोचित आणलेल आहे, कॉलेज मध्ये असताना एकदा लेक्चर मध्ये मला उचकी लागली.. सर काहीतरी शिकवत आहेत, सगळीकडे एकदम शांतता..!! अन् माझ आपल उचक्या देण सुरुच, सगळे आसपासचे हसत होते.... अन् मी पाणी पिऊन पूर्ण बॉटल संपवली तरी काही फरक नाही, शेवटी लेक्चर संपल आणि मी सुटले एकदाची म्हणून श्वास सोडला..

सुधीर जी's picture

19 Oct 2014 - 5:50 pm | सुधीर जी

कानडाऊ योगेशु's picture

19 Oct 2014 - 8:16 pm | कानडाऊ योगेशु

लालन सारंग ह्यांनी फार पूर्वी दूरदर्शन वर झालेल्या एका मुलाखतीत त्यांच्याबाबतीत घडलेला हा किस्सा ऐकवला होता.

कोणत्यातरी ऐतिहासिक नाटकातला सीन होता व एक राजा मृत झालेला आहे व त्यांची राणी त्यांच्यासोबत सती जाणार आहेत.

लालन बाईंना म्हणायचे होते कि

"जा चंदनाची शेज सजवा व माझी व महाराजांच्या प्रयाणाची तयारी करा"

लालन बाई चुकुन बोलल्या....

"जा चंदनाची शेज सजवा व माझी व महाराजांच्या प्रणयाची तयारी करा"

चूक झाली व हे समजल्यावर लालनबाईंना मेल्याहुन मेल्यासारखे झाले.