धरणीकंप!!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
30 Jul 2008 - 9:37 am

आज लॉस एंजेलिस परिसरात सकाळी ११.४० च्या सुमाराला धरणीकंप झाला....

आम्ही आपले रोजच्याप्रमाणे ८.३० ला ऑफिसात आलो होतो.....

पुढ्यातल्या कामाचा आढावा घेतला......

त्यातील किती हाताखालच्या लोकांवर सोपवता येतील ती सोपवली.....

अगदी स्वतःलाच करावी लागणारी कामं उरकून मिसळ्पाव उघडला.......

जरा कुठे इस्ट्-कोस्ट वाल्यांचा मिपा कट्टा वाचून त्यावर एक खट्याळ प्रतिक्रिया लिहून एन्टर करतोय न करतोय तोच.......

सगळी केबिन थरथरायला लागली......

प्रथम वाटलं की बिल्डींगमध्ये काहीतरी ड्रिलींगचं काम वगैरे चालू असेल.........

पण मग माझी चाकं असलेली खुर्ची कंप्यूटरपासून लांब-लांब जाऊ लागली......

आम्ही नेहमी बूट काढून आणि मांडी घालून आमच्या खुर्चीवर बसतो! प्राथमिक शाळेची सवय, दुसरं काय!!!:)

लांब जाणारी खुर्ची सावरण्यासाठी म्हणून पाय झटकन खाली घेऊन जमिनीला टेकवले......

तोच.........

एक विलक्षण ताकदीची थरथरणारी लहर पायाखालून गेली.......

धाड, धाड, धाड!! जोराचा आवाज झाला.......

अरे हा तर धरणीकंप!! कॅलिफोर्नियात इतकी वर्षे राहिल्यामुळे लगेच अनुमान केलं......

हा धाड-धाड आवाज लिफ्टसचा!!

जेंव्हा धरणीकंप होतो तेंव्हा लिफ्टस कधीकधी आपल्या पोकळीतून निसटून बाजूच्या भीतींवर आदळतात!! त्यांचा मोठा आवाज होतो........

ऑफिसातली प्रत्येक वस्तू भरतनाट्यम केल्यासारखी थरथर नाचत होती.......

लगेच धावत जाऊन बाजूच्या प्रयोगशाळेत जाऊन बघितलं........

प्रत्येक काचेची वस्तू, म्हणजे ९०% लॅब किणकिण आवाज करत थरथरत होती........

काही वस्तू जमिनीवर पडत होत्या, आपटुन फुटत होत्या.......

माझ्या सहकार्‍यांनी तेव्हढ्यात चातुर्याने गॅस, इलेक्ट्रीसिटी हीटींग वगैरे बंद केलं होतं.....

पण अगोदरच उकळत असलेल्या द्रव्यापासून स्वतःचं संरक्षण करीत ते दूर उभे होते.......

तेव्हढ्यात इमर्जन्सी मॉनिटरवर घॉषणा झाली......

"ही इमर्जन्सी आहे, हे ड्रील नाही! कॄपया बिल्डिंगमधून बाहेर पडा व बाहेर आपापल्या अगोदरच निर्देशित केलेल्या जागेवर जाऊन उभे रहा......."

या घोषणेचा हजर असलेल्या लोकांवर दोन प्रकारचा परिणाम झाला......

जे नवीनच कॅलिफोर्नियात आले होते ते तडक बिल्डिंगच्या बाहेर पडले.......

जे आमच्यासारखे इथे बरीच वर्षे राहिले होते त्यांची प्रतिक्रिया वेगळी होती.......

मी माझ्या ऑफिसात आलो....

स्क्रीनवर मिपा अजून चालूच होतं......

बघतो तर भाग्यश्रीचा मेसेज आला होता धरणीकंपासंबंधी......

म्हटलं ही पोर नवीनच इथे आलीय लगीन करून, जरा हिचं टेन्शन कमी करूया......

तिला जरा विनोदी रिप्लाय पाठवला......

"गमन" केलं, मिपा बंद केलं.......

हो! जर बिल्डींग कोसळली तर नंतर उगीच सिक्युरिटीने नको पाहायला आमचं काय काय चाललं होतं ते......

घड्याळाकडे पाहिलं.....

पावणेबारा वाजल्येत!! म्हणजे ऑलमोस्ट लंच टाईम झालाच की..........

मी खाली आलो.......

तोवर धरणीकंप थांबला होता.........

:)

आता प्रथम काम आपले फॅमिली मेंबर्स कसे आहेत ते पहाणे.......

सेलफोनवरनं कॉल्स केले......

सगळे सुखरूप होते......

नेक्स्ट काम आपल्या घराला काही नुकसान पोहोचलेय का ते पहाणं.......

हो! इथे हॉलिवूडच्या परिसरात तुमचं घर सगळ्यात मौल्यवान!! बाकी दागिने वगैरे काही नाही!! दागिने काय, पुन्हा करता येतात!!!

मी आणि काकू घरी आलो. हो, ती ही तिथेच काम करत्ये!!!!

घरात आतून बाहेरून तपासणी केली....

सर्व ठीक-ठाक होतं.....

तपासणी करता करता माझ्या गॅस मीटरवर आलो......

इथे जळणाचा गॅस पाइपलाइनमधून येतो.....

गॅसचा वास येत होता......

माझ्या गॅस मीटरवर मी ऑटोमॅटिक स्क्रॅबलर बसवलेला आहे......

तो पॄर, धरणीकंप, वादळ असे काही झाले की ऑटोमॅटिक स्वीच ऑफ होतो.....

बघतो तो तो स्वीच ऑफ झालेला होता. मग हा वास कुठून येतोय?

बघतो तर माझ्या शेजारच्याच्या गॅस पाईपलाईनमधून लीक होत होतं!!!

भडवा! चिक्कू जर्मन साला!!

स्क्रॅम्बलर बसवायला काय झालं होतं रांडिच्याला!!

गॅस त्याच्या लाईनमधून लीक होतोय हे खरं, पण तो जास्त लीक झाला आणि ठिणगी पडली तर ती त्याच्या घराबरोबर माझंही घर भस्मसात करणार!!

काय करावं? त्याला कॉल करावा की आपणच मॅन्युअली त्याचा सेफ्टीव्हॉल्व बंद करावा.....

मोठा स्पॅनर (अमेरिकेत "रेंच") घेऊन येण्यासाठी माझ्या घरात आलो तर लॅपटॉपवर मुक्तसुनीताचा मेसेज.....

"भूकंप झाला असं कळलं, काय ती खुशाली कळावावी.......

त्याला कसाबसा रिप्लाय पाठवला, "बाबारे जरा थांब! सर्व खुशाल आहेत पण जरा तुला नंतर सविस्तर मेसेज पाठवतो....."

माझ्या घरातला सर्वांत मोठा रेंच घेऊन मी माझ्या शेजार्‍याच्या गॅस लाईनपाशी आलो.....

आता हा वर्षानुवर्ष न वापरलेला, गंजलेला व्हॉल्व्ह कसा बंद करायचा याच्या चिंतेत मी....

तेव्हढ्यात देवदूत यावा तर फायरब्रिगेडचा ट्रक आला......

त्यातून फायर मार्शल उतरला.....

आमच्या भागातील सगळ्याच घरांची पहाणी करत चालले होते म्हणे ते.....

मी परिस्थिती निवेदन करताच त्याने त्याच्या ट्रकमधून एक भला थोरला रेंच काढला आणि तो गॅस व्हॉल्व्ह बंद केला......

सेफ्टी स्क्रँबलर न लावल्याबद्द्ल माझ्या शेजार्‍याच्या आईच्या पातिव्रत्याबद्दल काही अपशब्द काढुन आणि माझ्या शेजारधर्माला जागण्याबद्द्ल कौतुक करून फायरमार्शल निघून गेला......

हुश्यऽऽऽ........

सर्व डेंजर आता संपलं होतं......

खरा प्रकार झाला तो असा,,,,,

लॉस अँजेलिसच्या चिनो हिल्य्स या उपनगराच्या खाली ८ मैल खोलीवर ५.४ रेक्टर स्केलचा धरणीकंप झाला.....

त्याच्या प्रभाव लास वेगास (नेव्हाडा) पर्यंत जाणवला.....

आमच्या इथल्या बिल्डिंग्ज थरथरा हलल्या.....

पत्त्याचे बंगले थरथराव्या अश्या.....

शेल्फवर ठेवलेल्या वस्तू खाली पडल्या पण मनुष्यहानी झालेली नाही....

कॅलिफोर्नियातील बहुतेक नव्या इमारती भूकंपाला रेजिस्टंट अशा बांधलेल्या आहेत त्यामुळे इमारत कोसळ्ल्याची अजून तरी बातमी नाही......

डांबिसकाका आणि त्याची फॅमिली सुखरूप आहे........

भाग्यश्रीही सुखरूप असावी........

सगळ्यात सांगण्याची गोष्ट ही.........

की भूकंप होताक्षणी आणि ती बातमी फार पसरण्याआधी.....

आणि भारतातल्या आमच्या फॅमिली मेंबर्सचे फोन चालू व्हायच्या आधी.........

मिपावरच्या आमच्या मित्रांच्या पृच्छा आधी सुरू झाल्या........

भाग्यश्री, मुक्तसुनीत, हे आम्ही कधीही विसरणार नाही........

आमच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यापेक्षा आधी तुम्ही चौकशी सुरू केलीत......

कुठे फेडणार आम्ही हे ॠण.......

आपला,
डांबिसकाका

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

30 Jul 2008 - 9:42 am | भडकमकर मास्तर

सुखरूप आहात वाचून आनंद झाला...
काळजी घ्या ,बरं...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

30 Jul 2008 - 7:18 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. तुमची खुशाली ऐकली ; खूप बरे वाटले...

यशोधरा's picture

30 Jul 2008 - 9:42 am | यशोधरा

अरे बापरे! काळजी घ्या हो काका...

विसोबा खेचर's picture

30 Jul 2008 - 9:48 am | विसोबा खेचर

चला, सगळे सुखरूप आहेत हे वाचून बरं वाटलं रे डांबिसा....

कुणाला काही अपाय न होवो व सगळे सुखरूप व आनंदात राहोत हीच नियतीचरणी प्रार्थना..!

सगळ्यात सांगण्याची गोष्ट ही.........
की भूकंप होताक्षणी आणि ती बातमी फार पसरण्याआधी.....
आणि भारतातल्या आमच्या फॅमिली मेंबर्सचे फोन चालू व्हायच्या आधी.........
मिपावरच्या आमच्या मित्रांच्या पृच्छा आधी सुरू झाल्या........
भाग्यश्री, मुक्तसुनीत, हे आम्ही कधीही विसरणार नाही........
आमच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यापेक्षा आधी तुम्ही चौकशी सुरू केलीत......
कुठे फेडणार आम्ही हे ॠण.......

क्या बात है डांबिसा, हे बाकी फार सुरेख लिहिलं आहेस! भडवा आणि रांडिच्या हे शब्ददेखील मनाला आनंद देऊन गेले! :)
( शुद्धलेखनाच्या पुस्तकात रांडिच्या या शब्दाचं र्‍हस्व-दीर्घ तपासलं पाहिजे एकदा! :) )

तात्या.

पिवळा डांबिस's picture

30 Jul 2008 - 10:25 am | पिवळा डांबिस

भडवा आणि रांडिच्या हे शब्ददेखील मनाला आनंद देऊन गेले!
घटना घडल्यापासून आणि ती वर्णन केल्यापासून फारतर काही तासच लोटले आहेत.....
जे मनात आलं ते खरंखरं लिहिलं.....
अपशब्दांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर जनात क्षमस्व!!
(मनातः गेले तेल लावत!!!! इथे भोगतोय आम्ही! यांच्या भावनांची कदर करायला टाईम आणि जाणीव आहे कुणाला!!)

विसोबा खेचर's picture

30 Jul 2008 - 10:32 am | विसोबा खेचर

जे मनात आलं ते खरंखरं लिहिलं.....

अरे तेच खरं! अगदी उत्तम केलंस...! :)

समयोचित आणि प्रसंगानुरूप शिव्या ह्या भाषेचं सौंदर्य वाढवतात असं तात्या वाळंबे म्हणतात! ;)

बाकी तुझं, 'जनातलं-मनातलं' आवडलं! :)

आपला,
(जनमनातला) तात्या वाळंबे!

मदनबाण's picture

30 Jul 2008 - 9:49 am | मदनबाण

काकाश्री काळजी घ्या..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

अमोल केळकर's picture

30 Jul 2008 - 9:50 am | अमोल केळकर

मुंबई सह पश्चिम महाराष्ट्राला मंगळवारी रात्री १२.३० सुमारास ४.२ स्केल चा धक्का बसला
केंद्रबिंदू - कोयना परिसर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विजुभाऊ's picture

30 Jul 2008 - 9:51 am | विजुभाऊ

डाम्बीस काका हा असला प्रसंग संजयाच्या नेत्राने तुम्ही आम्हाला कळवला.
तुमच्या ल्ह्यायच्या ष्टायली बद्दल काय बोलणार . डाम्बीस काका छान लिहितो म्हणणे हे पिवळा पिताम्बर सारखे द्विरुक्ती होते.
असो
काल आमच्याही कोयना भागात असाच एक पण नेहमी प्रमाणे पावसाळ्यात होतात त्या पैकी एक भुकंप झाला.
( कोण म्हण्तो कोकणचा कॅलिफोर्निया झाला नाहिय्ये)
वित्त हानी झाली नाही. कारण त्या भागात रहाणार्‍या लोकांकडे फारसे वित्तच नसते.
जीवित हानी म्हणजे दरड कोसळल्याने काही शेळ्या गुरे आणि पाच सहा माणसे दगावली.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

पिवळा डांबिस's picture

30 Jul 2008 - 10:27 am | पिवळा डांबिस

( कोण म्हण्तो कोकणचा कॅलिफोर्निया झाला नाहिय्ये)
हे मात्र जबरदस्त!!!
:))

सहज's picture

30 Jul 2008 - 9:58 am | सहज

तुम्ही सर्व सुखरुप आहात हे वाचुन बरे वाटले.

त्या प्रसंगाचे वर्णन तर असे की जणू...जाउ दे...

चक्क जर्मन असुन बेजबाबदार?? आता न विसरता त्याला स्क्रॅम्बलर किंवा असेच काहीतरी ख्रिसमस गीफ्ट देणार तर..

पिवळा डांबिस's picture

30 Jul 2008 - 11:04 am | पिवळा डांबिस

चक्क जर्मन असुन बेजबाबदार??
बेजबाबदार असतील नसतील, पण अमेरिकेत रहाणारे मूळचे जर्मन अतिशय चिक्कू असतात हा आमचा अनुभव आहे....
तुम्ही त्याला जरूर काही शेकडो डॉलर्स पडणारा स्क्रँबलर पाठवा....
परतभेटीदाखल तुम्हाला तो २० सेंटस चे चॉकलेट पाठवतो का नाही ते बघा.....
:)

टारझन's picture

30 Jul 2008 - 11:08 am | टारझन

ह.ह.मे. =)) =))
मास्तर लोक फार चिक्कू असतात असा आमचा आन्भव !! ह्यो जर्मन बी त्यातलाच !!!
ड्यांबिस काका ... तुम्ही स्क्रँबलर बसवलाय हे वाचून जिव भांड्यात पडला . बाकी त्या फायरमन ने कोणता शब्द ऊच्चरला याची कल्पना खवीस लोक लग्गेच करू शकत्याल. :)

अवांतर : पुढचा धरणीकंप कधी ?

(सगळं घर हादरवणारा) कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

पिवळा डांबिस's picture

30 Jul 2008 - 11:15 am | पिवळा डांबिस

अवांतर : पुढचा धरणीकंप कधी ?
शुभ बोल रे नार्‍या...
तर म्हणे मांडवाला लागली आग.....

खविसा, तू काय सूर्यग्रहण असतांना जन्माला आला होतास काय रे!!:)
(ह्.घे)

भडकमकर मास्तर's picture

30 Jul 2008 - 9:56 am | भडकमकर मास्तर

ऑटोमॅटिक स्क्रॅबलर बसवलेला आहे......
तो पॄर, धरणीकंप, वादळ असे काही झाले की ऑटोमॅटिक स्वीच ऑफ होतो.....

मुंबईकरांनो...मुंबईतसुद्धा काही ठिकाणी जे गॅस कनेक्षन पाईपमधून दिले जातात, तिथे असले प्रकार आहेत का हो ? ?...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रमोद देव's picture

30 Jul 2008 - 10:01 am | प्रमोद देव

अतिशय धीरोदात्त वागणूक!
अशा प्रसंगी कसे वागावे ह्याचे मूर्तीमंत उदाहरण!
तुम्हाला मनोमन सलाम!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

शैलेन्द्र's picture

30 Jul 2008 - 10:28 am | शैलेन्द्र

काका, घराला एक लींबु आणी काळी बाहुली (ऊलटी) बांधा, भुकंप झाला कि ति मस्त हलते....

केशवसुमार's picture

30 Jul 2008 - 11:54 am | केशवसुमार

शैलेन्द्रशेठ,
स्वत: काका असून काही फायदा झाल नाही,
उगाच लिंबू कशाला वाया घालवा..
(निवृत्त बाहुली) केशवसुमार

II राजे II's picture

30 Jul 2008 - 5:48 pm | II राजे II (not verified)

स्वत: काका असून काही फायदा झाल नाही,
उगाच लिंबू कशाला वाया घालवा..

=))

:D

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

तुम्ही सर्व सुखरुप आहात हे वाचुन बरे वाटले. असाच इतरंना धीर द्या!!

सेफ्टी स्क्रँबलर न लावल्याबद्द्ल माझ्या शेजार्‍याच्या आईच्या पातिव्रत्याबद्दल काही अपशब्द काढुन आणि माझ्या शेजारधर्माला जागण्याबद्द्ल कौतुक करून फायरमार्शल निघून गेला......

हे वाचून फुटलो....:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2008 - 10:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका,
सगळे सुखरूप आहेत हे सांगितलंत बरं वाटलं.

आणि मनीषच्या वरील प्रतिक्रियेशी सहमत!

सेफ्टी स्क्रँबलर न लावल्याबद्द्ल माझ्या शेजार्‍याच्या आईच्या पातिव्रत्याबद्दल काही अपशब्द काढुन ........
=))

अदिती

मेघना भुस्कुटे's picture

30 Jul 2008 - 9:35 pm | मेघना भुस्कुटे

अगदी अगदी.
मिपा एखाद्या कुटुंबासारखे वाटते ते उगीच नाही..
बाकी ते 'पातिव्रत्य' वाक्य अफलातून धमाल आहे!

II राजे II's picture

30 Jul 2008 - 10:57 am | II राजे II (not verified)

सुखरूप आहात वाचून आनंद झाला...
काळजी घ्या ,बरं...

हेच म्हणतो !!!

दुर देशी आपलेच बांधव आपली काळजी घेत आहेत हे पाहू आनंद झाला !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

नंदन's picture

30 Jul 2008 - 10:57 am | नंदन

छान लिहिलाय अनुभव. इकडेही जाणवले तीन-चार मोठे धक्के.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सखाराम_गटणे™'s picture

30 Jul 2008 - 11:04 am | सखाराम_गटणे™

सगळे सुखरूप आहात वाचून आनंद झाला...

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2008 - 11:23 am | बिपिन कार्यकर्ते

काका, तुम्ही सगळे, सही सलमत आहात हे वाचून बरे वाटले. तुमच्या लिहिण्याच्या ष्टाईल बद्दल काय सांगावे? इतका गंभीर प्रसंग पण तुम्ही काय मस्त लिहिला आहेत.... मान गये उस्ताद.

बिपिन.

भाग्यश्री's picture

30 Jul 2008 - 11:34 am | भाग्यश्री

माझा इथलाच काय आयुष्यातला पहीला धरणीकंप.. :) भारतात व्हायचे तेव्हा अस्मादीक झोपलेले असल्यामुळे कधिही कळला नाही.. इथे आज, सकाळी मस्त उशीरा उठून मिपावर टीपी करत बसले होते तर तासाभरात धबधब्धब आवाज्,सोफा,खिडक्या,दारं,झुंबरं, दिवे सगळं काही हलतंय , उठून उभी राहीले तर माझ्यासकट खालची जमीन आख्खं घर हलतयं हा अनुभव अतिशय स्केरी होता!! असा भुकंप मी भारतात नाही अनुभवला.. कदाचित लाकडाची घरं असल्यामुळे असेल, पण सगळं घर लोकल मधे ठेवल्यासारखं हलत होता.. मी थरथर कापत होते लिटरली..प्रचंड सैरभैर झाले.. त्यातुन वरून्,शेजारून लोकं बाहेर येण्यासाठी पळत सुटली होती, त्याचाही आवाज होत होता.. कशी बशी दारा पर्यंत आले, तर तोपर्यंत भुकंप बंद झाला होता.. मग बसले घरातच.. नवर्‍याला फोन करायचा प्रयत्न केला.. पण नेटवर्क ढपलं होतं.. अजुन १०-१५ सेकंद्स जरी चालू राहीला असता भुकंप तर मी रडायला लागले असते फॉर श्युअर.. पण नशिबाने नवरा पण ऑफीसातून लगेच घरी आला.. आणि एकदाचे हुश्श वाटले.. पुढे अर्धा तासतरी मी कापत होते.. आयुष्यात प्रथम मी इतकी घाबरले.. घर कोसळतंय की काय सुद्धा वाटलं.. पण ठीके आता एकदा कळल्यावर नेक्स्ट टाईम नाही काही टेन्शन येणार.. पिडाकाकांसकट सगळ्या कॅलीफॉर्निया-स्थित आप्तेष्टांनी प्रेमानी हेच सांगितलं 'वेल्कम टू कॅलिफॉर्निया'.. त्यावरून हे असं होतंच राहतं असं दिसतं! :) तेव्हा पहील्याप्रथम बाहेर पळीन! आणि आता नाही घाबरणार.. :)

झकासराव's picture

30 Jul 2008 - 9:11 pm | झकासराव

भाग्यश्री,
खरतर तु इतकी घाबरली हे वाचुन मला थोड आश्चर्य वाटलं.
पुढच्या वेळी (खरतर ही वेळ येवुच नये हीच देवाकडे प्रार्थना) घाबरुन न जाता स्वताची काळजी घे. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

केशवसुमार's picture

30 Jul 2008 - 12:01 pm | केशवसुमार

डांबिसशेठ,
अनुभव कथन झकास..(अनुभव झकास नाही)
आमच्या जर्मनीत बॉ काही ही हल्ल नाही.. :B
(वाचक)केशवसुमार
स्वगतः काल पोट बिघडल्यामुळे आम्हाला काही धक्के बसले ते अलाहिदा 8}

प्राजु's picture

30 Jul 2008 - 5:54 pm | प्राजु

डांबिस काका,
तुम्ही सगळे सुखरूप आहात हेच खूप झालं. काळजी घ्या.
अनुभव कथन छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

30 Jul 2008 - 12:02 pm | स्वाती दिनेश

सगळे सुखरुप आहेत हे वाचून बरे वाटले.
स्वाती

शैलेन्द्र's picture

30 Jul 2008 - 12:06 pm | शैलेन्द्र

"शैलेन्द्रशेठ,
स्वत: काका असून काही फायदा झाल नाही,
उगाच लिंबू कशाला वाया घालवा..
(निवृत्त बाहुली) केशवसुमा""

हाहाहा...

अवलिया's picture

30 Jul 2008 - 12:14 pm | अवलिया

काका

काळजी घ्या
येणा-या बिग वन करता तयार आहात ना‍?

नाना

डॉ.प्रसाद दाढे's picture

30 Jul 2008 - 12:31 pm | डॉ.प्रसाद दाढे

सॉलिड अनुभवकथन!

पद्मश्री चित्रे's picture

30 Jul 2008 - 12:54 pm | पद्मश्री चित्रे

अशा प्रसंगाच असं अनुभव कथन प्रथमच वाचलं.
मस्त लिहिल आहे. पण प्रसंग बाकाच होता..
भाग्यश्री,
धक्क्यातुन सावरलीस का?

भाग्यश्री's picture

30 Jul 2008 - 2:06 pm | भाग्यश्री

हो गं, दुपारीच.. :) आता ते घाबरणं आठवून हसतीय.. :)

विजुभाऊ's picture

30 Jul 2008 - 3:02 pm | विजुभाऊ

येणा-या बिग वन करता तयार आहात ना‍?
नाना का घाबरवताय पोराना

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अवलिया's picture

30 Jul 2008 - 3:10 pm | अवलिया

ए बाबा
म्या नाय घाबरवत अन भित बी नाय
त्ये लय मोठे मोठे लोक म्हनु रायले कवाधरन की येनार येणार म्हनुन म्या म्हटल की कुणि येनार हाय तर तयार नगो का रायला?
यात घाबरायचा का मुन रे लेका?

वाच , http://www.msnbc.msn.com/id/7832219/

(शायंटीष्ठ) नाना

वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

येडा अण्णा's picture

30 Jul 2008 - 3:35 pm | येडा अण्णा

आज सकाळी न्यूज मध्ये कळाले की पुण्यामध्ये भूकंपाचा धक्का बसला. बाकी आम्ही नेहमीप्रमाणे झोपेत असल्यामुळे रात्री काहीच कळाले नाही.

छोटा डॉन's picture

30 Jul 2008 - 4:06 pm | छोटा डॉन

डांबिसकाका व त्यांचे कुटुंबिय, त्यांचे आप्तेष्ट व समस्त अमेरिकेतील जनता सुखरुप आहे हे वाचुन बरे वाटले ..

दुर देशी आपलेच बांधव आपली काळजी घेत आहेत हे पाहू आनंद झाला !

आम्हालासुद्धा "बेंगलोरच्या स्फोटावेळी" आपल्या मायबाप मिपाकरांनी असाच धिर दिला.
लोक येथे नुसते टवाळक्यासाठी येत नसुन एकमेकांची काळजी घेतात हे पाहुन बरे वाटले ..

बाकी लिहण्याच्या शैलीबद्दल काही बोलत नाही पण गंभिर प्रसंग अतिशय हलक्या शैलीत लिहल्याचे कौतुक वाटते...

अवांतर : काल रात्री १२.४५ - १.१५ च्या सुमारास "पुणे -मुंबई" भागात पण भुकंप झाला का ?
रात्रीच मित्राचा फोन आला होता. नंतर आमचे नेटकनेक्शन गंडल्याने जास्त चौकशी नाही करता आली.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विकास's picture

30 Jul 2008 - 4:36 pm | विकास

आपण सर्व खुशाल असल्याचे ऐकून आनंद झाला. स्वानुभवकथन मस्तच आहे!

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Jul 2008 - 4:50 pm | ब्रिटिश टिंग्या

आपण सर्व खुशाल असल्याचे ऐकून आनंद झाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2008 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण सर्व खुशाल असल्याचे ऐकून आनंद झाला. स्वानुभवकथन मस्तच आहे!

धनंजय's picture

30 Jul 2008 - 10:08 pm | धनंजय

बरे वाटले.

शिवाय तुमची विनोदबुद्धी त्या परिस्थितीतही तल्लख राहिली!

शितल's picture

30 Jul 2008 - 5:46 pm | शितल

काका तुम्ही धरणीकंपाचे वर्णन ही जबरा करता हो.
कोणतीही जिवीत हानी झाली नाही हे मेन आहे.
त्या भागातील सर्व मिपाकर आणि कुटुंबिय सुखरूप आहेत हे वाचुन आनंद झाला. :)
आणी भाग्यश्रीला तुम्ही धीर दिलात आणि तीचे टेन्शन कमी केलेत हे तर खुप छान.

खुशाली समजली आणि जिवाला स्वस्थता आली!
मागे किल्लारीचा मोठा भूकंप मी स्वतः अनुभवला पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.

चतुरंग

झकासराव's picture

30 Jul 2008 - 7:27 pm | झकासराव

खुशाली कळवली त बर केलत. ते करता करता हसवलत भरपुर :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

संजय अभ्यंकर's picture

30 Jul 2008 - 8:45 pm | संजय अभ्यंकर

त्या भागातले आपले मि.पा. कर सुरक्षित आहेत, हे वाचुन जीव भांड्यात पडला.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

भूकंपाचे भाकीत वर्तवता येणे शक्य आहे काय?

हे बघा एस के केळकर काय म्हणत होते.
प्रकाश घाटपांडे

भडकमकर मास्तर's picture

31 Jul 2008 - 12:00 am | भडकमकर मास्तर

भाकीत ...
अनुमान ..
निष्कर्ष...
( स्वगत)... काका इथेही त्यांच्या फेव्हरीट विषयावर पोचले... :) ह. घ्या..
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंद's picture

31 Jul 2008 - 11:09 am | आनंद

ज्या वेळेला CA त भुकंप झाला तेंव्हा थोड्या वेळानी ( २५ ते ३० मि.)कोयना परिसरात भुकंप झाला, प्रुथ्वी गोलावर ते एकमेकाच्या विरुद्ध आहेत. म्हणुन शॉक वेव्ह C.A. ला धड्कुन कोयना परिसराला धडकली असावी का?

चतुरंग's picture

31 Jul 2008 - 7:46 pm | चतुरंग

पृथ्वीचा व्यास बर्‍यापैकी मोठा असल्याने एका बाजूच्या भूकंपाचे धक्के असे जमिनीतून पृथ्वीच्या दुसर्‍या बाजूला जात नाहीत.
हा एक योगायोग होता.

चतुरंग

सर्किट's picture

30 Jul 2008 - 10:31 pm | सर्किट (not verified)

येत्या काही वर्षात कॅलिफोर्निया (विशेषतः उत्तर) मोठा भूकंप घडणार, असे भाकीत आहे. १९८९ मधल्या लोमा प्रियेटा भूकंपानंतर येथे ६ पेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. फ्रीमॉण्ट , मिलपिटास मधून जाणार्‍या हेवर्ड फॉल्ट वर भूकंपाची सर्वाधिक शक्यता आहे, असे म्हणतात. तयारी कितीही केली, तरी शेवटी ऐनवेळी काय घडते, तेच खरे. (भूकंपामुळे घरांच्या किंमती कमी होतील, हा एकमेव आशेचा किरण आम्हाला दिसतो आहे ;-)

ड्यांबीसकाका, अनुभव वर्णन छानच. पण असे प्रसंग आपल्यावर वारंवार न येवो, ही शुभेच्छा.

- सर्किट

भाग्यश्री's picture

30 Jul 2008 - 11:14 pm | भाग्यश्री

आधी ५.८ सांगत होते.. नंतर ५.६, आणी ५.४ सांगितलं.. असं चेंज कसं झालं म्हणे? ५.८ आणि ५.४ जरी फक्त ०.४ चा फरक असला तरी त्याने धक्क्यची तीव्रता एक्स्पोनेन्शिअली वाढते ना? आपल्याकडे भारतात असं ऐकलं नाही बुआ कधी,की आधी इत्का आणि मग नंतर परत बातमी की अजुन कमी मॅग्निट्युडचा धक्का बसला वगैरे..

प्रियाली's picture

30 Jul 2008 - 11:26 pm | प्रियाली

एप्रिलात ५.२ चा भूकंप झाला होता.

नाही म्हटलं सांगून ठेवावं, उगीच कॅलिफोर्नियात मोठ्ठा भूकंप वगैरे आला तर मिडवेस्टात नको परतायला परत. ;)

ह. घ्या.