माझं सिंगल पॅरेंटिंग

सावत्या's picture
सावत्या in जनातलं, मनातलं
28 May 2014 - 3:31 pm

इथे अबुधाबीला सीबीएसइ बोर्डच्या शाळांना मार्चच्या दुसया आठवड्यात सुट्टी पडून मुलीच केजि १ पूर्ण झालं. बायको आणि मुलगी सुट्टीसाठी मुंबईला रवाना झाल्या. एकाकीपणा मला खायला उठला. रोज रात्री ८ वाजता घरी आल्यावर पप्पाssssss …. म्हणून मुलगी गळ्यात पडायची आणि रात्री झोपेपर्यंत तिची चिवचिव चालू असायची. मित्रांचे फोन येऊ लागले, विकांताचे बेत ठरू लागले पण या वेळी मला कशातच इंटरेस्ट नव्हता. बायको आणि मुलगी कधी एकदा परत येतात अस झालं होत. पण काही कारणाने त्याचं मुंबईतल वास्तव्य वाढलं. इथे शाळा सुरु होऊन २ आठवडे लोटले तरी त्याचं येण होईना. मी तर पार कंटाळून गेलो. रोज सकाळी ८ ते रात्री ७ ऑफिस. मग घरी आल्यावर जेवण बनवण, मग मुंबईला फोन करण, दुसर्या दिवशीची तयारी, दिवस कसा निघून गेला समजायचं पण नाही. मुलीची शाळा बुडू लागली आणि शाळेन वॉर्निंग दिली लवकरात लवकर मुलीला शाळेत हजर करा नाहीतर मेडीकल सर्टिफिकेट द्या अन्यथा नाव कमी करण्यात येइल. मुलीच्या क्लास टीचरचा फोन आला " शी इज ऑलरेडी मिसिंग सिलाबस" … मला काहीच सुचेना, काही कामानिम्मित बायकोच मुंबईत राहण आवश्यक होत तितकीच मुलीची शाळा पण महत्वाची होती. खोट मेडीकल सर्टिफिकेट देन मला पटत नव्हत. अबू धाबीला तुम्ही ऐकवेळ जॉब चेंज करू शकता पण स्कूल एडमिशन मिळण जाम मुश्किल. माझ्या मित्रांनी त्याच्या मुलांना एडमिशन न मिळाल्यामुळे फॅमिलीज परत भारतात पाठवल्या होत्या. त्यामुळे एडमिशन कॅन्सल होऊ देण रिस्की होत. मुलीने परत येण भाग होत. मग बायकोशी पर्याय डिस्कस करायला सुरवात केली आणि एकच पर्याय निघाला मी मुलीला घेऊन इथे रहायचं आणि बायकोने काम होईपर्यंत मुंबईत. २-३ आठवडे एडजस्ट करण भाग होत. २-३ आठवडे सुट्टी घेऊन घरी बसन मला शक्य नव्हत. मुलीला एकतर डे केअर मध्ये ठेवायचं नाहीतर जवळच्या व्यक्तीपाशी ठेवायचं असे दोनच पर्याय समोर होते. सुदैवाने माझा जवळचा मित्र आमच्याच अपार्टमेंट मध्ये राहतो. त्याची बायको आणि माझी बायको मैत्रिणी. त्याची मुलगी माझ्या मुलीहून १ वर्षाने मोठी, आमच एकमेकांकडे उठण बसन होत. मग त्यांना विचारलं. त्यांना काहीच प्रोब्लेम नव्हता. कारण सकाळची शाळा असल्याने मी मुलीला स्कूलबस मध्ये बसवून ऑफिसला जाणार होतो आणि मित्राची बायको दुपारी तिला कलेक्ट करून घरी नेणार होती. मग मी रात्री ऑफिसवरून आल्यावर मुलीला घरी घेऊन जाणार अस ठरल. हे सर्व पेपरवर सहज शक्य दिसत होत तेवढ सोप्प नव्हत. माझी मुलगी तशी आईशिवाय माझ्याबरोबर रहायलि होती पण तेंव्हा माझे आई वडील आणि भावाची मुलगी पण होती आणि मी पण दिवसभर घरी असायचो. पण इथे तर सकाळची शाळा होती आणि मी तर रात्री ८ ला येणार होतो. म्हणजे दिवसभर पप्पा बरोबर नव्हता. मग बायकोने मुंबईत पार्श्वभूमी तयार करायला सुरवात केली.

" बेटा तू पप्पाबरोबर एकटी अबुधाबीला राहशील का ? तिथे मम्मा नसणार पण थोडेच दिवस ….…
पप्पा सकाळी तुला स्कूलला सोडेल मग काकी तुला दुपारी घरी घेऊन जाईल. तिथे तुझी फ्रेंड पण असणार … मग तिच्याबरोबर खेळायचं… मग रात्री पप्पा तुला घेऊन घरी जाईल. तुला मम्माची आठवण नाही न येणार …"
" मी अबुधाबीला जाणार…… मी पप्पाबरोबर राहणार …" माझ्या मुलीने शेजार्यांना पण सांगून टाकल.
मग प्लान केला बायकोने इथे २-३ दिवस रहायचं आणि मुलीच्या स्कूलच्या पहिल्या दिवशी तिला सोडून मुंबईला परत जायचं. मग मी बुक तिकीट करायला घेतलं. पण विमानाचं तिकीट बघून डोळेच दिपले. मुंबईतल्या शाळांची सुट्टी आणि आयपीअल अबू धाबीत भरवण यामुळे तिकिटाचे दर काहीच्या काहीच महाग झाले होते. बर्याच साईटवर तर नॉट अवैलेबल किंवा सोल्ड आउट दिसत होत. पण परत एकदा एअर इंडियाचा महाराजा धावून आला आणि आमच विमान सुखरूप अबू धाबीला येत झाल. एअरपोर्टला मुलगी कुशीत शिरली ती घरी आल्यावर खाली उतरली. तिचा पप्पा तिला बर्याच दिवसांनी भेटला होता ना.

बायको म्हणाली "अरे मुलगी एकटीच नाही आली मी पण आलेय. " मी हसत हसत म्हटलं "तू नंतर......."

दुसर्या दिवशी सकाळी बायकोने एक लिस्ट काढली त्यात तिने मुंबईला गेल्यावर माझ इथलं श्येडूल लिहून काढलं होत. त्यात मी सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या कामांची जंत्रीच होती. सगळ्यात महत्वाच होत मुलीला सकाळी साडेसहाला स्कूलसाठी तयार करणं. कारण माझी मुलगी सकाळी उठण्यात कुंभकर्णला पण लाजवेल अशी झोपायची बर तिला जबरदस्ती उठवण म्हणजे १ तास भोकाड पसरणं होत. मग सगळंच अवघड झाल असत. शाळा तर सोडाच माझ ऑफिसला जाण मुश्किल झाल असत. मी म्हटलं मी बघतो तिला कसं उठवायचं ते. दुसरा प्रश्न होता डबा काय द्यायचा. इथे इडली डोसाच पीठ रेडीमेड मिळत मग दोन दिवस इडली एक दिवस पोहे एक दिवस उपमा आणि एक दिवस ब्रेड सान्डविच द्यायचं ठरलं. कोणत्या दिवशी काय फ्रुट द्यायचं, कोणत्या दिवशी कोणता युनिफॉर्म सगळे रीमाइंडअर्स मोबाईल मध्ये सेट केले. हे सगळ झाल्यावर स्कूल बसच्या कोओर्डीनेटरला फोन केला तर तो म्हणाला बस तुमच्या बिल्डीन्गजवळ ७ वाजता येते. मी तर उडालोच अरे वा साडेसहाला नाही तर... मी जाम खुश झालो मला अर्धा तास जास्त मिळणार होता काम उरकण्यासाठी आणि मुलीलापण झोपण्यासाठी..... मग संध्याकाळी जाऊन सगळ सामान आणल. दोन दिवस भूर्क्कन उडाले.

संध्याकाळी बायकोने परत ऐकदा मुलीची उजळणी घेतली " बेटा सकाळी लवकर उठायचं... रडायचं नाही... पप्पाला त्रास द्यायचा नाही.... जेवण स्वतः हाताने जेवायचं... पप्पाला भरवायला सांगायचं नाही... दुपारी काकी तुला स्कूल बसमधून तिच्या घरी घेऊन येईल... काकीकडे हट्ट करायचा नाही.. तुझ्या फ्रेंडशी भांडायचं नाही …" आणि असच अजून काही .. मुलगी बायको जे जे सांगते त्याला मान डोलवत होती. मी मनातल्या मनात हसत होतो.(का रडत होतो) मला माहित होत माझी मुलगी या सगळ्या गोष्टीना फाट्यावर मारणार होती.
रविवार उजाडला. आम्ही दोघ सकाळी साडेपाचला उठलो. मी माझ्या स्टाइलने मुलीला उठवायचं ठरवलं. जरासं हलवून म्हटलं " बेटा उठते ना आज स्कूल आहे चल उठ बघू"
मुलगी ढिम्म.. मग जरा गोंजारून बघितलं तरी उठेना.
बायको किचनमधून ओरडली " अरे सरळ उचल तिला आणि बाथरूममध्ये कमोडवर बसवं.. सकाळी उठताना ती असंच करते. तू अस करत बसलास तर तू आणि ती दोघ पण घरीच बसाल " बहुधा मुलीनेपण ऐकल असावं तिचा चेहरा झोपेतपण रडवेला झाला.
" तू तुझं काम कर, मी बघतो काय करायचं ते " मी तणतणलो.
हा तर माझ्यासाठी अघोरी प्रकार होता. माझी छोटी परी साखर झोपेत असताना तिला अस उठवायचं मला पटेना.
मी मुलीला म्हटलं " बेटा थोड्यावेळाने उठशील.. "
मुलगी म्हणाली “ पप्पा फाईव्ह मिनिटस ओनली …"

थोड्यावेळाने तिला कुशीत घेऊन सोफ्यावर बसलो आणि कार्टून चैनेल लावलं. कार्टूनचा आवाज कानावर पडल्यावर तिने डोळे जर किलकिले केले आणि न रडता हळूहळू उठली. मी हुश्श केल. म्हणजे तिला सव्वासहाला उठवायचं तर पावणे सहाला फाईव्ह मिनिटस ओनली … झोपायला देऊन सहा वाजता सोफ्यावर आणून बसवायचं होत. मी तिला असंच उठवायचं ठरवलं. बायको म्हणाली " तू जाम लाड करतोस तिचे असं करत बसलास तर तारांबळ उडेल तुझी. मी इथे आज आहे म्हणून ठीक आहे मी नसताना तुला डबापण बनवायचा आहे." आणि ते खरंच होत. मी म्हटलं " बघू"
मग मुलीला ब्रश करून अंघोळ घालून सोफ्यावर आणून ठेवलं आणि युनिफॉर्म घालायला घेतला. हा युनिफॉर्म म्हणजे ऐक दिव्यच होत. शर्ट, स्कर्ट, सस्पेंडर, बो, स्कर्टखाली स्लाक, सॉक्स, शूज असा सगळा सरंजाम होता. मी म्हटलं अरे एवढ्या लहान मुलीला कसला हा युनिफॉर्म.. एक फ्रॉक द्यायचा वरून घातला कि झालं. तो युनिफॉर्म घालण, त्याचे सस्पेंडर लावण, बो लावण मग केस विंचरण, हेअर बॅंड लावण, मुलीला स्कूलबसमध्ये बसवन आणि हे सगळ करून मला ऑफिसला जायचं, १० तास काम मग घरी येउन मित्राकडून मुलीला आणायचं मग जेवण बनवायचं, मुलीला जेवू घालायचं, किचन आवरायचं, दुसर्या दिवशीच्या शाळेची, डब्याची तयारी..... अरे बाsssप रे….. हे सगळ मला करायचं होत ते पण किती दिवसांसाठी ते मला माहित नव्हत. माझी चांगलीच तारांबळ उडणार होती. स्कूलबस मध्ये बसवून मी वर आलो. बायको तयारच होती तिला एअरपोर्टला सोडायला निघालो तर बायको भावूक झाली.
"अरे मी चिमणीशिवाय कधी राहिले नाही रे असं. मी जायलाच हव का... ती राहील का रे.. दुपारी स्कूलमधून आल्यावर रडली तर.."
मी म्हटलं " तू काळजी करू नकोस जर नाही राहिली तर मी सुट्टी घेईन."
बायकोला एअरपोर्टला सोडून घरी आलो. दुपारी मित्राच्या बायकोला फोन करून बिल्डींगच्या खाली यायला सांगितलं. स्कूल बस आली माझी चिमणी बसमधून अंगावर झेपावली. मग क्लिनरला सांगितलं उद्यापासून मित्राची बायको मुलीला कलेक्ट करेल. मुलीला घेऊन घरी आलो. मग तिची बडबड सुरु झाली आज स्कूलला खूप मजाsss आली.. गाणी शिकवली … स्पोर्ट्स होते.. खूप मजाsss आली. पप्पा मी रोज स्कूलला जाणार...." बहुतेक हे सगळ क्षणिक होत. खर काय ते उद्या समजणार होत.
दुसर्या दिवशी सकाळी साडेपाचला उठून इडली बनवली. बायकोने चटणी जातानाच बनवून ठेवली होती. ती भरली. फ्रुट्स भरले डब्यात. माझ्या स्टाईलने मुलीला उठवून तयार केल. मग दुध प्यायला दिलं पण ती पिईना, उलटी होते सांगायला लागली. मला हे बहाणे माहित होते. मला बायकोच सल्ला आठवला.
"तू सकाळी तिला खाण्यासाठी फोर्स करू नकोस तुला महागात पडेल."
मला आठवल मुलगी उपाशी जाते म्हणून बायको पण असंच तिला भरवण्याचा प्रयत्न करायची, मुलगी तोंड फिरवायची मग या प्रयत्नात दुध युनिफॉर्मवर सांडायच नाहीतर बायकोच्या कपड्यांवर. नाहीतर शेवटच्या घोटाला मुलगी उलटी करायची. मग दोघी पण रडायच्या.
" हिला जर पण किंमत नाही आईची "
" पप्पा मला मम्मी जबरदस्ती भरवते मी मम्मीची मुलगी नाही पप्पाची मुलगी फक्त " मुलगी..
मला हे सगळ नको होत. च्यवनप्राष कसबस भरवून स्कूलबसमध्ये बसवून मी वर आलो, माझी तयारी केली आणि ऑफिसला आलो दुपारी रीमाइंडअर् वाजला. मित्राच्या बायकोला मुलीला कलेक्ट करायची आठवण केली. मनात जरा धाकधूक होती मुलगी राहील का तिच्याकडे. दुपारी मित्राच्या घरी फोन केला तर चिमणीने उचलला.
" पप्पा मी आली स्कूलमधून... मी रडली नाही.. टिफिन फिनिश केला.. तू लवकर ये ऑफिसमधून... मी काकीचं ऐकणार..."
रात्री ऑफिसमधून घरी पोहोचलो आणि तसाच मुलीला आणायला गेलो तर येईना. मला खेळायचं.
मित्र म्हणाला “तू जेवण बनवून घे मग मी तिला सोडतो घरी.”
घरी आलो कपडे न काढताच कुकर लावला. पाउण एक तासात जेवण बनवून मुलीला आणायला गेलो तर हि तिकडेच जेवली. माझ्या लक्षात आलं मी रात्री येउन जेवण बनवेपर्यंत मुलगी थांबन शक्य नव्हत. मग मी दुसर्या दिवशी सकाळीच जेवण बनवून घ्यायचं ठरवलं.
रात्री बायकोला मुंबईला फोन करून सांगितलं कि हि आज तर राहिली आहे. खर काय ते उद्या समजेल.

माझा स्मार्ट फोन घेऊन त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत तूनळी व्हीडेओ बघत बसली. मी म्हटलं बस झाल आता झोप, सकाळी लवकर उठायचं. तर ऐकेना. मी फोन काढून घेतला. मी रागावलो तर माझ्या कुशीतून बेडच्या दुसर्या टोकाला जाऊन झोपली.
" तू वाईट मुलगी आहेस तुझ्या टीचरला सांगतो "
" मी तुझी मुलगी नाही मी फक्त ममाची मुलगी "
" बर.. नाहीतर नाही.." मी १० मिनिट वाट बघितली तरीपण ती येईना, मी झोपायची तयारी केली मला उद्या लवकर उठायचं होत.
" पप्पा मला मम्मा हवी, मला मम्मीची आठवण येते " मुलीने ब्रह्मास्त्र काढलं.
माझी टरकली. " ये रे माझ्या पिल्ला हे घे यु ट्यूब बघ"
असे सोमवार मंगळवार बुधवार गेले. मला ज्याची भीती होती तीच गोष्ट झाली बुधवारी रात्री मुलीला कलेक्ट करायला मित्राच्या घरी गेलो तर लिफ्टमध्ये मुलगी म्हणाली" पप्पा मला थंडी वाजते " मी घरी येउन टेम्परेचर चेक केल तर ताप १०१ होता. मी औषध देऊन छोटीला झोपवलं पण रात्री ताप वाढला मग रात्रभर डोक्यावर पट्टी ठेवली. न ती झोपली ना मी. अर्थातच दुसर्या दिवशी ऑफिसला दांडी झाली. तिला घेऊन डॉक्टरकडे गेलो. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आजारपणात गेले. औषधाचा परिणाम असेपर्यंत ताप जायचा मग परत यायचा. शनिवारी परत डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणाला वायरल इन्फेक्शन आहे. औषध बदलून दिलं. रविवारी पण ऑफिसला दांडी झाली.
तिकडे मुंबईत बायको घायकुतीला आली " अरे ती बरी आहे ना मी येऊ का. मला सारखं वाटत ती मला हाक मारते आहे "
" तू उगाच घाई करू नकोस मी आहे ना. मी ऑफिसला पण जात नाही सुट्टी घेतली आहे. यु डोंट वरी." मी तिची समजूत काढली.
पण या तापात काही मजेशीर गोष्टी घडल्या. नॉर्मली मुल तापात चिडचिडी होतात. हट्टीपणा करतात. एका रात्री मुलगी म्हणाली " पप्पा मला पिक्चर बघायचं"
" बघूया ना बेटा, कोणता"
" चक दे इंडिया " बहुतेक आम्ही गुरुवारीच तो टीव्हीवर अर्धा बघितला होता मी पीसीवर चेक केला पण नेमका नव्हता. मुलगीतर हट्ट धरून बसली तोच पाहिजे, तूनळीवर चेक केल तर तिथेपण नव्हता. मी म्हटलं "बर्फी" बघूया, तो तिचा आवडता होता. आम्ही बर्फी बघत बसलो. मधेच केंव्हातरी मुलगी झोपली. मी पीसी बंद करायला गेलो तर उठली.
" संपला का पप्पा"
" नाही ग तू झोपलीस ना मी बंद केला "
" नाही परत लाव "
" अरे पण तू झोपते ना"
" नाही बंद नाही करायचा… तू पूर्ण बघायचा" मला तिने तो पूर्ण पिक्चर बघायला लावला आणि स्वत झोपली.
रविवारी तिचा ताप उतरला. मी मुलीला म्हटलं " बेटा उद्या स्कूलला जायचं "
"पप्पा पण तू मला दुपारी कलेक्ट करायचं " मला हे अनपेक्षित होत.
" बेटा मी ऑफिसला जाणार ना मग तुला कसं कलेक्ट करणार, काकी येईल न तुला कलेक्ट करायला"
" नाही मला तूच पाहिजे, नाहीतर मी स्कूलला जाणार नाही " मुलीने आक्रमक पवित्रा घेतला.
मी मुलीला कसतरी समजावलं " बेटा पप्पा घरीच होता ना दोन दिवस, आता ऑफिसला जायला हव नाहीतर सर ओरडतील ना"
मुलगी तयार झाली पण आता तिच्यात काहीतरी चेंज झाला होता, एरवी माझ्या मित्राच्या घरून निघण्यासाठी ती तयार नसायची तिला खेळायचं असायचं " पप्पा थोडावेळ अजून " म्हणणारी माझी मुलगी डोअर बेल दाबताच माझे पप्पा आले असणार म्हणून दरवाजाजवळ उभी रहायची आणि मी दिसताच मला येउन बिलगायची. हे सगळ माझ्यासाठी नवीन होत.
" पप्पा तू एक दिवस ये न मला कलेक्ट करायला मला तू पाहिजे असतोस"
आता तिला तिचा पप्पा हवा होता कलेक्ट करायला, तिच्याबरोबर खेळायला. मग रोज रात्री झोपताना तीच रडगाण असायचं.
"पप्पा तू एक दिवस ये न मला कलेक्ट करायला मला तू पाहिजे असतोस"
सकाळी उठल्यावर पण माझ्या कुशीत रडत बसायची " पप्पा मला तू हवास"
मी काहीतरी कारण सांगून तिला शाळेत पाठवायचो. मग दुपारी मित्राकडे फोन केला तर म्हणायची" पप्पा तू मला फसवतोस, खोट बोलतोस तू का नाही येत मला कलेक्ट करायला, मी तुझी वाट बघत असते "
मला हे सगळ समजत होत पण आधीच दोन दिवस दांडी झाली होती. कामाचा ढीग होता समोर. इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाली. मुलगीतर रोज रडायची पण मी पण काहीच करू शकत नव्हतो. मग तिचा हट्टीपणा सुरु झाला. मी काही सांगितलंतर उलट उत्तर सुरु झाली. आता ती माझ एकेनास झाली. मी बायकोला फोन केला तर सांगायचो " अरे हि जाम हट्टी झाली आहे उलट उत्तर देते, खूप त्रास देते मला"
" अरे ती माझ्याबरोबर पण अशीच करते "
" हो पण दहा तास ऑफिस मग घरी आल्यावर मी कंटाळतो, त्यात मी किचनमध्ये गेलो तर हॉलमधून हाक मारत बसते, आता हिला अटेंड करू का जेवण बनवू."
" अरे इतक्या लवकर कंटाळलास तर, मग मी मुंबईत कशी रहायची एकटी हिला घेऊन. तेंव्हा तर हि खूपच लहान होती आणि मी पण ऑफिसला जायची आणि संध्याकाळी येउन मलापण हेच सगळ करायचं असायचं. आतातरी तिला थोडफार समजत "

मी भूतकाळात गेलो.......
आम्ही दोघ पण जॉब करत असूनदेखील मुंबईत १ बीएचके घर घेण मला परवडत नव्हत. मुंबई म्हणजे कांजुरमार्गपासून ठाण्यापर्यंत. खूप घर बघितली पण हव तसं मिळत नव्हत किंवा बजेटमध्ये बसत नव्हत. ऑइल फिल्डमध्ये असल्यामुळे मिडल इस्टमध्ये नोकरीला जाण्याचा एक पर्याय होता. मग पैसे कमवायचे तर मिडल इस्टमध्ये जाण भाग होत. मी वेड्यासारखे प्रयत्न केले अगदी सौदीला पण जायला तयार झालो. नशिबाने १ चांगली ऑफर आली, अबू धाबीला जॉब करायचा होता.मी लगेच तयार झालो.
बायको म्हणाली "अरे तू इथेच रहा, हि पण लहान आहे. मी एकटी कशी राहणार इथे?हिला कशी सांभाळणार?“
पण मी आता मागे वळणार नव्हतो.
बायकोला म्हटलं "अशी ऑफर मला परत मिळणार नाही बघ. एकदा का हिची शाळा सुरु झाली मग इथून निघता येणार नाही. हि लहान आहे तोपर्यंत हा चान्स घेत येईल तू थोडे दिवस अड्जस्त कर, मी सेटल झालो कि लगेच तुम्हाला बोलावतो " तिला कसबस पटवल.
सगळे सोपस्कार पूर्ण होऊन विसा आणि तिकेट आलं.
बायकोची तगमग सुरु झाली. " अरे आम्हाला जमेल का रे. "
"अग सगळ जमेल बघ आणि आपल्या बाईपण आहेत ना तू ऑफिसमधून येईपर्यंत" मी वेळ मारली.
निघायच्या दिवशी मुलीला कुशीत घेतलं आणि खूप रडलो. तिला तर काहीच समजत नव्हत कि आपला पप्पा का रडतोय ते. बायको आणि मुलीशिवाय मी कधीच एकटा राहिलो नव्हतो.
मी इकडे अबू धाबीला आलो. मग रोज रात्री बायकोला फोन करायचो. मुलगी जेमतेम सव्वा वर्षाची होती. बायको ऑफिसमधून आल्यावर बाई निघून जायच्या मग मुलगी तिला सोडायची नाही. सगळी काम करून मुलीचं करून बायको दमून जायची मग फोनवर रडायची.
"अरे मी घरी आली कि माझे पाय धरून ठेवते, जरापण हलत नाही कि मला काही काम करायला पण देत नाही. मी हिला घेऊन बसू कि काम करू तूच सांग. मी जेवायला बसलेकीच हिला शी ला होत." हि असंच करते तसंच करते.....
ऑफिसमधून दमून घरी आल्यावर बायकोला बसायला पण मिळायचं नाही. जी गत माझी आता होते आहे तीच गत तिची पण होत असणार तेंव्हा. पण मी तेंव्हा फुकटचे सल्ले दयायचो.
" तू सारखी रडत बसू नकोस, सुट्टी घे ना एक दिवस आणि एन्जॉय कर ना तिच्याबरोबर, तिला फिरायला घेऊन जा "
बायको कशी करत असेल सगळ मँनेज तेव्हा. मला ते सगळ आठवलं.

" आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती माणसं बघून पुड्या बांधते " मी भानावर आलो…………………………
बायको मला टोमणा मारत होती.
" हा हा मला माहित आहे तू कामाचं काय ते बोल" मी डाफरलो.
बायको हसली.
भरभर दिवस निघून जाऊ लागले. २ आठवडे झाले. मी कसबस रहाटगाड ढकलत होतो. बायकोचं पण मुंबईतलं काम निपटेना. मुलगीपण आता खूप हट्ट करू लागली.
" मला तुझ काही ऐकायचं नाही…. मला पप्पा पाहिजे म्हणजे पप्पा पाहिजे "
मी रोज काहीतरी कारण देऊन तिला शाळेत पाठवत होतो. मला एकच टेन्शन होत मुलगी जर परत आजारी पडलीतर. सुदैवाने अस काही झालं नाही.
बायकोचं मुंबईतलं काम थोडंस आवाक्यात आलं. तरीपण अजून १ आठवडा जाणार होता. नशिबाने शाळेत आठवडाभर कॅलर्स डे होता.
मी मुलीला म्हटलं " बेटा आता ओनली वन विक, मग मम्मा येणारच आणि स्कूलमध्येपण धमाल असणार. तू छान छान ड्रेस घालून जायचं. "
"पण पप्पा मला स्कूल बसमध्ये सोडायला येताना तू पण सेम कलरच टी शर्ट घालायचं "
मग आठवडाभर रोज सकाळी आम्ही बापलेक बॅंडवाले बनून खाली उभे असायचो.
मग एक दिवस मुलगी हट्टाला पेटली. "पप्पा मला काकी नाही पाहिजे आणायला तूच पाहिजेस, मला खूप वाईट वाटत तू नसतोस तेव्हा "
" बर मी उद्या येईन तुला आणायला " मी जरासा भावूक झालो.
त्याच दिवशी बॉसला म्हटलं " मुझे दो दिन छुट्टी चाहिये"
" पर अभी तो आपने ३ दिन छुट्टी ली"
" साहब मै खुद बिमार होके भी कभी छुट्टी नही लेथा पर वोह बच्ची बिमार थी इसलिये. पर अभी बच्ची रहने के लिये तयार नही, मै रोज उसे प्रॉमिस करता हु के उसे लेने के लिये आ जाऊंगा " मी साहेबाला सगळी सिचुएशन आधीच सांगितली होती.
" वोह ठीक है पर आपका शेड्युल मिस हो रहा है, प्रोजेक्ट डीलीव्हरेबल्स का डेट आगे जा रहा है उसका क्या? " मला सहजासहजी सुट्टी मिळणार नव्हतीतर.
" वोह प्रोजेक्ट शेड्युल, डीलीव्हरेबल्स का डेट सब ठीक है पर मै अपनी बच्चीको रोज डेट प्रॉमिस करता हु उसका क्या? वोह डेट जो रोज मिस हो रहा है उसका क्या ? दोज डेट्स आर मोअर इम्पोर्टअन्ट फॉर मी " माझं टाळक सरकलं. माझ्या वयाइतकाच अनुभव असणारा माझा बॉसपण चपापला. कदाचित असं उत्तर त्याला अपेक्षित नसावं.
" ठीक है "
त्यादिवशी रात्री आणि दुसर्या दिवशी सकाळी परत मुलीचं रडगाण चालू झालं. " पप्पा तू मला रोज फसवतोस, खोट बोलतोस तू येत नाहीस "
“पप्पा बघ हा तू मला प्रॉमिस केलं आहेस, मला तू आणयला यायचं" दुसर्या दिवशी मुलगी बसमध्ये चढताना म्हणाली.
" बर बर मी आज नक्की येणार "
त्यादिवशी दुपारी मित्राच्या बायकोला सांगितलं " मी घरीच आहे पण तुम्ही तिला आणायला जा. मला तिला सरप्राइज द्यायचय." मी जरा आडोश्याला उभा राहीलो. मुलगी बसमधून उतरली तीच पप्पाला शोधत. पण मी दिसत नाही पाहून तिचा चेहरा बारीक झाला.
" काकी आजपण पप्पा नाही आला मला फसवतो मी आता त्याच्याशी बोलणारच नाही. "
इतक्यात मी मागून तिचे डोळे बंद केले."
" पप्पाssssss" माझ्या मुलीने मला ओळखलं होत. मागे वळताच मी तिला उचलून घेतलं तर रडायला लागली. माझी अपेक्षा होती कि पप्पाला पाहताच खुश होईल पण इथे भलतंच घडलं होत. घरी गेली तरी रडायची थांबेना.
" बेटा काय झालं, टीचर ओरडली का? "
काही उत्तर देईना, रडायची पण थांबेना. कडेवरून खाली पण उतरायला तयार नव्हती. थोड्या वेळाने रडायची बंद झाली.
" काय झालं बेटा? "
" पप्पा आय लव्ह यु, पप्पा मला खूप बर वाटलं तू मला न्यायला आलास. पप्पा यु कीप युअर प्रॉमिस!!!!!! आता तू उद्या ऑफिसला जा नाहीतर तुझे सर तुला ओरडतील " आता मी रडायचं बाकी होतो.
आपला पप्पा आपल्याला न्यायला आला याचा तिला इतका आनंद झाला कि तिला रडू कोसळलं. त्यादिवशी मला समजलं कि मुलगी मम्मा नाहीतर पप्पापासून दिवसभर दूर राहते म्हणून मी आणून दिलेली खेळणी, तिला मकडोनाल्ड नाहीतर फनसिटीला नेऊन तिच्या मान्य केलेल्या मागण्या यापेक्षा तिला आपलं कोणीतरी हक्काचं माणूस तिच्याशी बोलायला, खेळायला जवळ पाहिजे होत. मला हे सगळ कळत होत पण वळत नव्हत. मुलीच्या एका उत्तराने मी आतून हललो. त्यादिवशी मी आणि मुलगी तिच्या टेंट हाउसमध्ये बसून खेळलो. एरवी मुलगी जाम हट्ट करायची त्यात बसून खेळण्यासाठी. पण मी ऐकायचो नाही कारण त्यात बसून माझी पाठ दुखायची. पण यावेळी पाठीला रग आली तरी बाहेर पडलो नाही. ते दीड दिवस मी अक्षरश: मुलीहूनपण लहान झालो. वेगवेगळे खेळ एकत्र बसून खेळलो. नशिबाने बायकोचं मुंबईतलं काम पूर्ण झालं. मग त्याचं दिवशीचं तिचं फ्लाईट बुक केलं. मम्मी येणार म्हणून मुलगीपण जाम खुश झाली. माझी १ महिन्याची तप्श्चर्या कामाला आली. १ महिन्याचं "सिंगल पॅरेंटिंग” मला बरंच काही शिकवून गेलं.
या सर्व कालावधीत माझ्या मुलीची स्वतःच्या मुलीइतकीच किंबहुना स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त काळजी घेणारी माझ्या मित्राची बायको, मला मुलीला स्कूल बसमध्ये बसवून कार पुलिंगसाठी उशीर होतो म्हणून स्वतःच्या बायकोलापण ऑफिसला थोड्या उशिराने ड्रॉप करणारा माझा मित्र यांचा मी शतश: ऋणी आहे.

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

आतिवास's picture

28 May 2014 - 3:44 pm | आतिवास

सुंदर लिहिलं आहे.
अगदी जिवंत चित्रण आहे अनुभवाचं.
तुमच्या मुलीला ती मोठी झाल्यावर हे वाचताना एकदम मजा येईल :-)

दिपक.कुवेत's picture

28 May 2014 - 4:13 pm | दिपक.कुवेत

वाचताना अनुभवतोय असाच भास झाला. त्या फाईव्ह मि. ओन्ली शी मात्र एकदेम सहमत. माझा मुलगाहि असचं करतो.

भावना कल्लोळ's picture

28 May 2014 - 4:14 pm | भावना कल्लोळ

खूप सुंदर लिहिले आहे …… आवडले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 May 2014 - 4:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त अनुभव कथन.
लेखनशैलीही झकास आहे.
मुलगी मोठी झाली की तीला जरुर वाचायला द्या.

समीरसूर's picture

28 May 2014 - 4:28 pm | समीरसूर

खूप छान लिहिलं आहे. आपल्या लेकीला अनेक शुभेच्छा!!! :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2014 - 4:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

पल्लवी शर्मा's picture

28 May 2014 - 4:52 pm | पल्लवी शर्मा

आवडले.

आदूबाळ's picture

28 May 2014 - 5:05 pm | आदूबाळ

आवडलं!

रायनची आई's picture

28 May 2014 - 5:06 pm | रायनची आई

अत्यंत सुन्दर लिहिलय्..वाचताना अगदि डोळ्यासमोर चित्र उभ रहिल.माझ्या सव्वादोन वर्षाच्या मुलाबरोबरचे अनुभव जवळपास असेच आहेत.

जेपी's picture

28 May 2014 - 5:07 pm | जेपी

आवडल.
काही ठिकाणी वाचताना हळवा झालो.

>>काही ठिकाणी वाचताना हळवा झालो.

असंच म्हणतो.

सखी's picture

28 May 2014 - 6:44 pm | सखी

मस्त लिहीलयं, काही ठिकाणी खरचं हळवं व्हायला झालं. तुमच्या मुलीला खेळणी, मकडोनाल्ड नाही तर तुम्हीच हवे होतात हे तुम्हाला कळलं यातच सगळं आलं. त्याचप्रमाणे बायकोही कशातुन जात होती, ऑफिसातुन आल्यावर कपडेही न बदलता कुकर लावावा लागतो हीपण जाणीव महत्वाची. लेख खुप आवडला, तुमच्या मुलीला आणि तिच्या आईबाबालाही शुभेच्छा!

पिलीयन रायडर's picture

28 May 2014 - 5:46 pm | पिलीयन रायडर

अप्रतिम..!!

एका..फक्त एका शनिवारी मी ऑफिसला गेले.. मुलाला नवर्‍या जवळ सोडुन.. तर १२ वाजता "एक तर मी तरी जिवंत राहीन नाहीतर हा तरी.." असा नवर्‍याचा धमकीचा कॉल आला.. मागे बॅकग्राऊंड म्युझिक म्हणुन पोराचा "आई.. हा मला मारतो.." असा आक्रोश चालु होता..

मग ३ वाजता "अबीरची कृपा" असा मेल आला.. ज्यात पोरानी शी करुन स्वयंपाकघरात रंगपंचमी खेळली होती त्याचे फोटो होते..!!!

तुमच्या लेखामुळे काय काय आठवतय!! फारच सुंदर लिहीलय..!!

माझी टरकली. " ये रे माझ्या पिल्ला हे घे यु ट्यूब बघ"

अगदी अगदी.. स्मार्ट्फोन आणि छोटा भीम असेच कामाला येतात.. "आदर्श पालकत्व जाउ दे खड्ड्यात..पण जर गप रहा" अशी वेळ येतेच माणसावर..

They say.. Humans can learn from other's mistake.. and then we have our own kids..!!

साती's picture

29 May 2014 - 7:48 pm | साती

खरंच अशी वेळ येते.

अश्या वेळी कार्टूनच कामाला येतात.

बारक्या_पहीलवान's picture

28 May 2014 - 6:00 pm | बारक्या_पहीलवान

>>>>मी वेड्यासारखे प्रयत्न केले अगदी सौदीला पण जायला तयार झालो.
लेख खरच छान आहे पन वरिल वाक्यशी सहमत नाही. सौदि ईतके पन खराब नाही. त्रिवार निशेध...

सखी's picture

28 May 2014 - 6:46 pm | सखी

सौदी खराब आहे असेच कदाचित नसेल म्हणायचे धाग्याकर्त्याला पण बायकोला नेले तर त्यांचे कडक नियम अजुन आहेत ना? त्यामुळे रोजच्या राहणीमनात फरक पडतच असेल ना. का आता बदलले आहे, तसे असेल तर तुम्हीच एक लेख लिहा ना सौदीवर :)

रेवती's picture

28 May 2014 - 7:08 pm | रेवती

छान लिहिलेय.

मुक्त विहारि's picture

28 May 2014 - 7:30 pm | मुक्त विहारि

झक्कास...

बाकी, ओन्ली ५ मिनिट्स, असे म्हणून २ तास झोपण्यात जाम सूख असते.

शिद's picture

28 May 2014 - 7:38 pm | शिद

छान लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2014 - 7:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>>पप्पा आय लव्ह यु, पप्पा मला खूप बर वाटलं तू
मला न्यायला आलास. पप्पा यु कीप युअर प्रॉमिस!!
आता तू उद्या ऑफिसला जा नाहीतर तुझे सर
तुला ओरडतील " आता मी रडायचं बाकी होतो.

सालं आम्हाला यापुढची अक्षरं दिसेनाशी झालीत.

-दिलीप बिरुटे

प्राध्यापक साहेब,

माझी अवस्था पण काहीशी अशीच झाली होती. डोळ्यात पाणी तरळलं होत. मला पण अगदी रडावस वाटत होत पण जर का मी रडलो असतो तर मुलगीपण अजून रडली असती आणि मग तिला थोपवण शक्य झाल नसत. साडेचार वर्षाच्या मुलीच्या उत्तराने फ्लॅट, बँक बॅलन्स, गाडी, परदेशवारी या सगळ्यांची धुंदी खाडकन उतरली.

बाबा पाटील's picture

28 May 2014 - 8:09 pm | बाबा पाटील

मागच्याच वर्षी या अनुभवातुन गेलो आहे.बायको डीलेव्हरी करता माहेरी गेली होती. त्या दिड महिन्यात माझ्या ५ वर्षाच्या लेकीने मला आयुष्य जगायला शिकवल.
*yahoo* *yahoo* *yahoo*

दमलेल्या बाबाची कहाणी अतिशय आवडली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.आमच्याकडे दूर देशी गेला बाबा ,गेली कामावर आई ,हा सन्घर्ष !!

यशोधरा's picture

28 May 2014 - 9:17 pm | यशोधरा

सुरेख लिहिलंय.

सस्नेह's picture

28 May 2014 - 10:26 pm | सस्नेह

मुलीचे शैशव जपण्याइतक्या सुट्ट्या मिळाल्याबद्दल अभिनंदन.

खूप सुरेख लिहिलं आहे. खूप छान.

छान लिहिलंय!
पोचलं! पुलेशु

पैसा's picture

29 May 2014 - 11:20 am | पैसा

अगदी हळवं करून गेला हा प्रामाणिक अनुभव.

michmadhura's picture

29 May 2014 - 11:24 am | michmadhura

खूप सुरेख लिहिलं आहे.आवडलं.

आत्मशून्य's picture

29 May 2014 - 1:20 pm | आत्मशून्य

लेख आवडला. मनापासुन आवडला.

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2014 - 1:26 pm | प्रभाकर पेठकर

आमच्या लेकाने आम्हा दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी गाठून स्वतःच्या मागण्या पुर्‍या करून घेतल्या. आमच्या उभी फूट पाडली होती. माझ्याकडे त्याची डाळ शिजायची नाही पण आईला भावनिक आवाहन करून त्याने स्वतःच्या बर्‍याच मागण्या पुर्‍या करून घेतल्या. त्याने आमचे केलेले हे 'सिंगल पॅरेन्टींग'.

तुमचा अभिषेक's picture

29 May 2014 - 2:25 pm | तुमचा अभिषेक

रडवलंत हो लेख वाचताना दोनेक वेळा, बाकी प्रतिसाद द्यायला काही शब्द नाहीत, लेक नशीबवान आहे तुमची :)

उदय के'सागर's picture

29 May 2014 - 6:14 pm | उदय के'सागर

खुप छान अनुभव. किती सुंदर माणसं आहेत तुमच्या आजूबाजूला - कौतूक वाटलं :)

साती's picture

29 May 2014 - 6:38 pm | साती

वाचताना डोळ्यात पाणी आलं.
खरंच कठिण असतं हे सिंगल पॅरेंटींग.
मला फार अनुभव नाही .
पण मी नसताना नवरा मुलांना कसं मॅनेज करेल हे इमॅजिन केलं .

अम्रुता आफले's picture

29 May 2014 - 7:25 pm | अम्रुता आफले

हल्ली हे खूप पाहायला मिलत. आई ला गृहीत धरला जातं , मात्र बाबांना पळवाटा असतात किंवा आसपासची माणस त्याला तू पुरुष आहेस मुलांकडे बघणं आईच काम आहे असं पढवत असतात . त्यातून तुम्ही तुमची जबाबदारी घेतली याचा आनंद झाला

इशा१२३'s picture

29 May 2014 - 10:00 pm | इशा१२३

खूप सुंदर लिहिलय...

माधुरी विनायक's picture

30 May 2014 - 4:34 pm | माधुरी विनायक

मनापासून आवडलं आणि नकळत डोळे पाणावले.सध्या याच अनुभवातून जात आहे. आपल्या माणसांच्या सोबत असण्याचं मोल अशा वेळी कळून येतं...

डॉ. भूषण काळुसकर's picture

30 May 2014 - 7:43 pm | डॉ. भूषण काळुसकर

लेख खूप सुंदर लिहिला आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात असे अनेक हळवे प्रसंग आपली नाती अधिक घट्ट करतात आणि आपल जगणं समृद्ध करतात.....

प्यारे१'s picture

31 May 2014 - 2:57 am | प्यारे१

सरळ नि सच्चं लिखाण! आवडलं नि भिडलंही.

पेट थेरपी's picture

2 Jun 2014 - 5:36 pm | पेट थेरपी

वाचून मला पण अगदी हलून गेल्यासारखे झाले. माझे पती वारले त्याला सात वर्शे झाली. तेव्हापासून मी ही सिंगल पेरेंट. ते पूर्वीचे दिवस आठवले. मी मायबोलीवर एकटे पालक सपोर्ट ग्रूपही चालवला आहे. व परवा मुंबई आकाश वाणीवर सिंगल पेरेंटस वर काही कार्यक्रम होता त्यात त्यांनी माझी प्रति क्रिया रेकॉर्ड करून घेतली होते. प्रक्षेपण कधी झाले माहीत नाही. ह्या विषया चे सर्व पैलू अनुभवले आहेत. त्यामुळे तुमच्या प्रत्येक वाक्याला व भावनेला अगदी अगदी असे वाट्त होते. एक बाबा हा मुला साठी अगदी इन्वॅल्युएबल असतो. तुम्ही जबाबदारी छान पार पाडलीत. त्यात मुलगी म्हणजे आपण अगदी हळवे होउन जातो. मुलग्यांना थोडे तरी दामटता येते.
वहिनी परत आल्या ते वाचून मलाच मस्त वाटले. दोन पालक मुलांना अगदी हवेच अस तात आपण त्यांना महाग काहीही देउ शकतो पण फॅमिली देउ शकत नाही ही अगतिकता पण अनुभवली आहे. आणि ते शतशं: रुणी असणं पण. विशिन्ग यू लॉट्स ऑफ हॅपीनेस टुगेदर.

हरिश_पाटील's picture

2 Jun 2014 - 6:20 pm | हरिश_पाटील

" पप्पा आय लव्ह यु, पप्पा मला खूप बर वाटलं तू मला न्यायला आलास. पप्पा यु कीप युअर प्रॉमिस!!!!!! आता तू उद्या ऑफिसला जा नाहीतर तुझे सर तुला ओरडतील " आता मी रडायचं बाकी होतो.

हे वाचुन पाणी आल डोळ्यात....