९० डिग्री साऊथ - १३ (अंतिम)

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in भटकंती
15 May 2014 - 5:27 am

http://www.misalpav.com/node/27879
http://www.misalpav.com/node/27873
http://www.misalpav.com/node/27868
http://www.misalpav.com/node/27860
http://www.misalpav.com/node/27855
http://www.misalpav.com/node/27840
http://www.misalpav.com/node/27825
http://www.misalpav.com/node/27813
http://www.misalpav.com/node/27804
http://www.misalpav.com/node/27784
http://www.misalpav.com/node/27774
http://www.misalpav.com/node/27767
http://www.misalpav.com/node/27751

________________________________________________________________________________

९० डिग्री साऊथ - १२

९० डिग्री साऊथ ही लेखमालीका आज संपली. ही मालिका प्रकाशित करु दिल्याबद्दल मिसळपाव प्रशासनाचा मी मनापासून आभारी आहे.

दक्षिण धृवाच्या इतिहासावर आणि या दोन गाजलेल्या मोहीमांवर लेखमालिका लिहीण्याची माझी अनेक दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली. माझ्या संग्रहात असलेल्या आणि नसलेल्याही अनेक पुस्तकांच्या वाचनाचा या मालिकेच्या निमित्ताने योग आला. ही मालिका आपल्या सर्वांना कशी वाटली हे जरुर कळवा

****************************************************************

स्कॉट आणि त्याच्या सहका-यांच्या मृत्यूच्या बातमीने इंग्लंड शोकसागरात बुडालं. स्कॉट दक्षिण धृवावर पोहोचण्यात यशस्वी झाला हीच त्या दु:खाला सुखद किनार होती. ब्रिटीश जनतेच्या दृष्टीने स्कॉट हाच खरा हिरो होता ! अ‍ॅमंडसेन सर्वप्रथम दक्षिण धृवावर पोहोचला असला तरी स्कॉटच्या मृत्यूने त्याचं यश झाकोळलं गेलं होतं. इंग्लीश वृत्तपत्रांनी तर दक्षिण धृवावर धारातिर्थी पडलेला हुतात्मा असंच स्कॉटचं चित्रं रंगवलं.

इंग्लंडमध्ये एक मिथक लगेच निर्माण झालं. इंग्लीश वृत्तपत्रांच्या मते स्कॉटने आपली मोहीम प्रामाणिकपणे आणि नियोजनपूर्ण राबवली होती ! अ‍ॅमंडसेन दक्षिण धृवावर आधी पोहोचला याचं एकमेव कारण म्हणजे त्याने आपलं सामान वाहून नेण्यासाठी कुत्र्यांच्या स्लेजचा वापर केला होता. त्या कुत्र्यांचा अन्नासाठी वापर करण्यासही त्याने मागेपुढे पाहीलं नाही ! उलट स्कॉट पारंपारीक ब्रिटीश पध्दतीने चालत दक्षिण धृवावर पोहोचला होता. त्यातच अ‍ॅमंडसेन व्यावसायिक संशोधक होता. उच्चभ्रू ब्रिटीश समाजधुरीणांच्या मते 'व्यावसायिक ( प्रोफेशनल )' असलेल्या अ‍ॅमंडसेनने मिळवलेल्या कोणत्याही यशाची शाही नौदलातील अधिका-यापुढे शून्य किंमत होती ! टेरा नोव्हा मोहीमेतील स्कॉटची डायरी आणि विशेषतः ब्रिटीश जनतेच्या नावाने त्याचा संदेश प्रसिध्द झाल्यावर तर याला आणखीनच खतपाणी मिळालं. स्कॉटच्या निर्विवाद लेखनकौशल्याचा हा विजय होता ! कोणत्याही टीकेच्या पार गेलेला ' ट्रॅजीक हिरो ' अशी स्कॉटची असलेली प्रतिमा ब्रिटीश जनतेच्या मनात वर्षानुवर्षे दृढ होत गेली.

दर्यावर्दी संशोधकांच्या वर्तुळात मात्रं अ‍ॅमंडसेनचं नाव पूर्वीइतक्याच आदराने घेतलं जात होतं. एर्नेस्ट शॅकल्टनने अ‍ॅमंडसेनचा ' धृवीय प्रदेशातील सर्वोत्कृष्ट संशोधक ' म्हणून नावाजलं होतं. फ्रिट्झॉफ नॅनन्सने अ‍ॅमंडसेननवर टीका करणा-यांना खरमरीत पत्रं लिहून झापलं होतं !

दक्षिण धृवाच्या मोहीमेवरुन नॉर्वेला परतल्यावर उत्तर धृवाच्या मोहीमेवर जाण्याची अ‍ॅमंडसेनची योजना होती. मात्रं १९१४ मध्ये पहिल्या महायुध्दाला सुरवात झाल्याने त्याला आपला हा बेत पुढे ढकलावा लागला.

पहिलं महायुध्द संपल्यावर, १९१८ मध्ये ' मॉड ' या जहाजातून अ‍ॅमंडसेन उत्तर धृवाच्या मोहीमेवर निघाला. अलास्कातून निघून बेरींगच्या सामुद्रधुनीमार्गे उत्तर धृव ओलांडण्याचा त्याचा बेत होता. दक्षिण धृवावर पोहोचलेल्या आपल्या सहका-यांना त्याने या मोहीमेसाठीही आमंत्रित केलं होतं. जालांड आणि हॅसलने त्याला नकार दिला. हॅन्सन आणि विस्टींग मॉडवर दाखल झाले ! १९२३ मध्ये अ‍ॅमंडसेन मोहीमेतून परतल्यावर त्यांनी मोहीमेचं नेतृत्व सांभाळलं होतं !

११ मे१९२६ ला अ‍ॅमंडसेन, विस्टींग आणि इतर पंधरा जणांनी अम्बर्टो नोबाईलच्या नॉर्ज या विमानातून स्पिट्सबर्जेनहून उड्डाण केलं. दोन दिवसांनी उत्तर धृव ओलांडून ते अलास्कामध्ये पोहोचले ! अ‍ॅमंडसेन आणि ऑस्कर विस्टींग दोन्ही धृवांवर पोहोचलेले पहिले दर्यावर्दी संशोधक होते !

( उत्तर धृव, दक्षिण धृव आणि 'तिसरा धृव' म्हणजे माऊंट एव्हरेस्ट हे तीनही पादाक्रांत करणारा पहिला वीर अर्थातच एडमंड हिलरी ! )

१९२८ मध्ये उत्तर धृवाच्या मोहीमेवर असताना नोबाईलचं ' इटालिया ' हे विमान बर्फात कोसळलं होतं. त्यांची सुटका करण्याच्या हेतूने १८ जून १९२८ ला अ‍ॅमंडसेन आणि इतर पाच जणांनी लॅथम ४७ जातीच्या विमानातून उत्तर धृवाच्या दिशेने उड्डाण केलं, मात्रं नोबाईलपाशी पोहोचण्यात ते अपयशी ठरले. नॉर्वेला परतण्यासही त्यांना यश आलं नाही ! त्यांच्याकडून कोणताही संदेश आला नाही !

नॉर्थवेस्ट पॅसेजमधून सर्वप्रथम यशस्वी प्रवास केलेल्या, दक्षिण धृवावर सर्वप्रथम पोहोचलेल्या, आणि दोन्ही धृव पादाक्रांत करणारा पहिला मानव असलेल्या रोनाल्ड अ‍ॅमंडसेनच्या विमानाचा शोध लागलाच नाही ! आपल्या पाचही सहका-यांसह अ‍ॅमंडसेन उत्तर धृवीय प्रदेशात कायमचा अदृष्य झाला ! बेरेंट्स समुद्रात अ‍ॅमंडसेननचं विमान कोसळलं असावं असा अंदाज आहे.

धृवीय प्रदेशातच अ‍ॅमंडसेनच्या अंत व्हावा हा काव्यगत न्याय !

Barents
बेरेंट्स समुद्र

स्कॉटची ट्रॅजिक हिरो ही प्रतिमा कित्येक दशके ब्रिटीश जनमानसात पक्की रुजली होती. त्याच्याविरुध्द कधीही कोणत्याही टिकेचा एक शब्दही उच्चारला गेला नाही.

१९७९ मध्ये रोलांड हंटफोर्डच्या 'स्कॉट अ‍ॅन्ड अ‍ॅमंडसेन' ( १९८३ मध्ये 'द लास्ट प्लेस ऑन अर्थ' या नावाने पुनःप्रकाशन ) या पुस्तकाने या प्रतिमेला जोरदार धक्का दिला. स्कॉटची पारंपारीक अधिकारीपध्दत, मोहीम आखण्यात आणि राबवताना घेण्यात आलेले निर्णय आणि वापरण्यात आलेली सामग्री आणि आपल्या सहका-यांची क्षमता ओळखण्यात आलेलं अपयश यावर हंटफोर्डने नेमकं बोट ठेवलं होतं. हंटफोर्डच्या या पुस्तकाने खवळलेल्या रानुल्फ फिनेसने स्कॉटची प्रतिमा सावरण्यासाठी 'कॅप्टन स्कॉट' हे पुस्तक प्रकाशित केलं. सुझन सॉलोमन, कॅरेन मे, डेव्हीड क्रेन यांनीही स्कॉटच्या तुकडीच्या मृत्यूची कारणमीमांसा करताना स्कॉटच्या निर्णयांपेक्षाही हवामानातील झालेला अचानक बदल आणि घसलेलं तापमान याचा शास्त्रीय उहापोह करण्यावरच भर दिला.

अ‍ॅमंडसेन आणि स्कॉट - एक तुलनात्मक दृष्टीक्षेप

अ‍ॅमंडसेनची दक्षिण धृवावरील मोहीम आणि स्कॉटची टेरा नोव्हा मोहीम दोन्ही एकाच वेळेस एकमेकांपासून सुमारे ३५० मैल अंतरावर एकंच लक्ष्यं असलेल्या दक्षिण धृवाच्या दिशेने मार्गक्रमणा करत होत्या. त्यामुळेच या दोन्ही मोहीमांतील सापेक्ष तुलना ही अपरिहार्य ठरते. अ‍ॅमंडसेनची तुकडी यशस्वीपणे फ्रामहेमवर परतली, तर स्कॉटच्या तुकडीतील स्वतः स्कॉट, विल्सन, बॉवर्स, ओएट्स आणि इव्हान्स यांना मृत्यूने गाठलं.

स्कॉट आणि त्याच्या पाठीराख्यांच्या मते टेरा नोव्हा मोहीम ही मुख्यतः शास्त्रीय संशोधन मोहीम होती. मात्रं शास्त्रीय संशोधनाची मोहीम असली, तरीही दक्षिण धृवावर पोहोचणं हे त्याचं मुख्य उद्दीष्टं होतं याची स्कॉटच्या सहका-यांना पूर्ण कल्पना होती. त्या दृष्टीने साधनसामग्रीतील सर्वोत्कृष्ट घोडे, मोटरस्लेज आणि सर्व कुत्रे, महत्वाची उपकरणं आणि जास्तीत जास्त खाद्यपदार्थ दक्षिण धृवाच्या मोहीमेसाठी राखून ठेवण्यात आले होते.

" लोकांच्या दृष्टीने दक्षिण धृवावर पोहोचण्यात आम्ही कितपत यशस्वी होतो या एकमेव निकषावरच मोहीमेतील शास्त्रीय संशोधनाचं महत्वं अवलंबून असेल !" स्कॉटने नमूद केलं होतं.

दक्षिण धृवावर पोहोचण्यात १९११-१२ च्या पहिल्या प्रयत्नात अपयश आलंच तर १९१२-१३ मध्ये दुसरा प्रयत्नं करण्याची स्कॉटची तयारी होती. त्या दृष्टीने स्कॉटने खेचरं मागवली होती. दुर्दैवाने स्कॉट, विल्सन आणि बॉवर्सचे मृतदेह शोधण्याच्या मोहीमेवर या खेचरांचा वापर करण्याची पाळी अ‍ॅटकिन्सनच्या तुकडीवर आली. अनुभवाअंती बर्फात वावरण्याच्या दृष्टीने खेचर हे घोड्यापेक्षाही कमी सक्षम असल्याचं दिसून आलं !

अ‍ॅमंडसेनने मात्रं आपली मोहीम दक्षिण धृव हे एकमेव उद्दीष्टं समोर ठेवूनच आखलेली होती ! त्याच्या मोहीमेतील प्रेस्टर्डच्या तुकडीने किंग एडवर्ड ५ लँडवर शास्त्रीय संशोधनाचं कार्य केलं असलं तरी अ‍ॅमंडसेनच्य दृष्टीने त्याला दुय्यम स्थान होतं !

अ‍ॅमंडसेनने अंटार्क्टीकावरील आपला मुख्य कँप - फ्रामहेम रॉस आईस शेल्फवर व्हेल्सच्या उपसागराच्या किना-यावर उभारला होता. स्कॉट डिस्कव्हरी मोहीमेतील मॅकमुर्डो साऊंडमधील आपल्या पूर्वीच्या बेस कँपवरच उतरुन शॅकल्टनच्या मार्गाने दक्षिण धृव गाठण्याचा प्रयत्न करणार हे उघड होतं. स्कॉटचा तळ ३५० मैल पश्चिमेला मॅकमुर्डो साऊंडमध्ये असलेल्या रॉस बेटावरील केप इव्हान्स इथे होता. व्हेल्सच्या उपसागरातून सुरवात केल्याने अ‍ॅमंडसेनला दक्षिण धृव गाठण्यासाठी स्कॉटच्या तुलनेत ६० मैल अंतर कमी पडणार होतं !

Map
स्कॉट आणि अ‍ॅमंडसेन यांचा दक्षिण धृवावरील मार्ग

ट्रान्स अंटार्क्टीक पर्वतराजी ही वायव्य-ईशान्य अशी जात असल्याने दक्षिण धृवाच्या वाटेवर असताना आपल्याला स्कॉटपेक्षा कमी काळ समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर व्यतित करावा लागेल असा अ‍ॅमंडसेनचा अंदाज होता. हा अंदाज अचूक होता. स्कॉटचा मॅकमुर्डो साऊंड इथला तळ हा शास्त्रीय संशोधनासाठी जास्तं उपयुक्त होता. दक्षिण धृवावर जाणारा हा मार्ग जिकीरीचा असल्याची स्कॉटला पूर्ण कल्पना होती. त्याने शॅकल्टनच्या मोहीमेचा बारकाईने अभ्यास केला होता. रॉस बेटाभोवती बर्फ गोठल्याविना त्याला मोहीमेला सुरवात करता येणार नव्हती. तसंच बेटाभोवती असलेल्या कपारींच्या जाळ्यामुळे त्याला हट पॉईंट गाठण्यासाठीही मोठा वळसा घालून जावं लागत होतं. अर्थातच प्रवासासाठी लागणारा वेळ वाढणार होता.

स्कॉट आणि अ‍ॅमंडसेन यांच्या मोहीमेतील मुख्य फरक होता तो म्हणजे वाहतुकीच्या साधनांचा !

स्कॉटने आपल्या मोहीमेसाठी तीन मोटरस्लेज घेतल्या होत्या. त्याशिवाय घोडे आणि कुत्र्यांचाही त्याच्या मोहीमेत समावेश होता. घोडे आणि कुत्र्यांच्या तुलनेत स्कॉटने मोटरस्लेजवर सात पटीने जास्त पैसे खर्च केले होते ! लेफ्टनंट कमांडर रेजिनाल्ड विल्यम स्केल्टन याने स्कॉटच्या अपेक्षेनुसार मोटरस्लेज तयार करुन नॉर्वेतील बर्फाळ प्रदेशात त्याच्या चाचण्या घेतल्या होत्या. मात्रं टेरा नोव्हा मोहीमेतून स्केल्टनचा पत्ता कट करण्यात आला होता. लेफ्टनंट टेडी इव्हान्सची स्कॉटनंतर दुस-या क्रमांकाचा अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्यावर त्याने आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या स्केल्टनला मोहीमेवर नेण्यासाठी विरोध दर्शवला ! स्कॉटने आपला जुना सहकारी असलेल्या इव्हान्सची मागणी मान्य केली !

Day
आपल्या स्लेजसह बर्नार्ड डे

या मोटरस्लेजपैकी एक स्लेज टेरा नोव्हावरुन उतरवतानाच बर्फात पडून समुद्राच्या तळाला गेली होती. उरलेल्या दोन स्लेजमध्ये वारंवार बिघाड उद्भवत होते. केप इव्हान्सपासून पन्नास मैलांच्या आत दोन्ही मोटरस्लेज नादुरुस्त झाल्या होत्या. स्केल्टनचा अनुभव स्कॉटच्या कामी येऊ शकला असता, परंतु टेडी इव्हान्सने आक्षेप घेतल्याने स्केल्टनचा टेरा नोव्हा मोहीमेत समावेशच झाला नव्हता.

डिस्कव्हरी मोहीमेवर ( १९०१-०४ ) स्कॉटने सर्वप्रथम कुत्र्यांचा वापर केला होता. स्कॉट, विल्सन आणि शॅकल्टन यांच्यापैकी कोणालाही बर्फावर कुत्र्यांच्या स्लेजच्या सहाय्याने मार्गक्रमणा करण्याचामागचं तंत्र अवगत नव्हतं. त्यांच्याजवळ स्कीईंगचं साहित्य होतं, पण स्कीईंगचा फारसा अनुभव कोणालाच नव्हता, त्यामुळे कुत्र्यांच्या वेगाशी मेळ घालणं त्यांना अशक्यं झालं होतं. कुत्र्यांचा वेग कमी करण्यासाठी स्कॉटने त्यांच्या पाठीवरचं वजन वाढवण्याचा निर्णय घेतला होता ! त्याने कुत्र्यांना सुकवलेले नॉर्वेजियन मासे खाण्यास घातले होते, परंतु कुत्र्यांना त्यापासून आवश्यक ती प्रोटीन्स न मिळाल्याने ते दिवसेदिवस अशक्तं होत गेले आणि अखेरिस प्राणाला मुकले. या अनुभवामुळे स्कॉटचं कुत्र्यांविषयी प्रतिकूल मत झालं होतं ते कायमचं !

शॅकल्टनच्या निम्रॉड मोहीमेनंतर ( १९०७-०९ ) तर स्कॉटचं हे मत आणखीनच पक्कं झालं होतं. आपल्या मोहीमेत शॅकल्टनने घोड्यांचा वापर केला होता. त्याच्या आधाराने तो दक्षिण धृवापासून १०० मैलांपेक्षा कमी अंतरावर ८८'२३'' दक्षिण अक्षवृत्तापर्यंत जाऊन पोहोचला होता. स्कॉटनेही आपल्या मोहीमेत घोड्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

कुत्र्यांची बर्फावर सफाईने वावरण्याची क्षमता आणि स्लेजसाठीची उपयुक्तता अनेक मोहीमांमध्ये सिध्द झालेली होती. आर्क्टीक आणि अंटार्क्टीक मोहीमेवर असलेला स्कॉटीश संशोधक विल्यम ब्रूस, अ‍ॅमंडसेनची नॉर्थवेस्ट पॅसेजमधील यशस्वी मोहीम, नॅन्सनची ग्रीनलंड मोहीम, रॉब पेरीच्या उत्तर धृवावरील मोहीमा, फ्रेडरीक कूकची उत्तर धृवावरील मोहीम, ऑटो स्वार्ड्रपची एल्समेअर बेटांवरील मोहीम या सर्व मोहीमांमध्ये कुत्र्यांनी यशस्वी आणि प्रभावी कामगिरी बजावली होती.

मोटरस्लेजची चाचणी घेण्यासाठी नॉर्वेत आलेल्या स्कॉटने नॅन्सनशी भेट घेऊन चर्चा केली होती. धृवीय प्रदेशातील सर्वात अनुभवी आणि गाजलेला संशोधक असलेल्या नॅन्सनने त्याला जास्तीत जास्त कुत्रे नेण्याचा सल्ला दिला होता !

स्कॉटने नॅन्सनच्या सल्ल्याकडे दुर्लक्षं केलं !

धृवीय प्रदेशातील सामान वाहतुकीबद्दल इंग्लंडमध्ये असलेली पारंपारीक मानसिकता याला कारणीभूत असावी. रॉयल जॉग्रॉफीक सोसायटीच्या धुरीणांच्या विशेषतः क्लेमंट्स मार्कहॅमच्या मते कुत्र्यांचा अथवा इतर साधनांचा वापर न करता माणसांनी आपलं सामान स्वतः उचलून अथवा स्लेजवर लादून ओढत नेणं हे शौर्याला आणि परंपरेला अनुसरुन होतं ! ब्रिटीशांच्या धृवीय प्रदेशातील सर्वच मोहीमांत याच पध्दतीचा अवलंब करण्यात यावा असा मार्कहॅमचा आग्रह असे ! स्कॉट मार्कहॅमचा पट्टशिष्य असल्याने हे बाळकडू त्याला मिळालं नसलं तरच नवंल !

स्कॉटने बिअर्डमूर ग्लेशीयरच्या पायथ्यापर्यंत घोड्यांचा वापर करण्याची आणि पुढे ब्रिटीश परंपरेप्रमाणे स्लेज ओढत दक्षिण धृव गाठण्याची योजना आखली !

अ‍ॅमंडसेनच्या तुकडीतील हॅन्सनने याचं अत्यंत समर्पक वर्णन केलं होतं.
" स्कॉट आणि त्याच्या सहका-यांनी कुत्र्यांप्रमाणे स्वतःला स्लेजला जुंपलं होतं ! दे वेअर देअर ओन स्लेज डॉग्ज !" हॅन्सन म्हणाला, " भविष्यात कोणीही त्यांचं अनुकरण करेल असं वाटत नाही !"

आपल्या मोहीमेवर स्कॉटने कुत्रे घेतले असले तरीही कुत्र्यांच्या वापराबद्दल तो साशंकच होता. कुत्र्यांच्या वापराबद्दल त्याचे दोन दृष्टीकोन होते. एक म्हणजे सर्वच्या सर्व कुत्र्यांना सुखरुप परत आणणं अथवा त्यांचा प्याद्याप्रमाणे वापर करून उपयुक्तता संपल्यावर बळी देणं ! कुत्र्यांचा बळी जाऊ न देता त्यांना परत आणण्याइतकेच श्रम त्यांच्याकडून करुन घेण्यात येणार असतील, तर पारंपारीक पध्दतीने स्लेज ओढत जाणा-या माणसांपेक्षा ते जास्त प्रभावी ठरणार नाहीत असं त्याचं ठाम मत होतं. दुस-या दृष्टीने उपयुक्तता संपल्यावर कुत्र्यांची हत्या करण्यात येणार असेल तर त्यांच्याकडून जास्तीत जास्तं काम करुन घेणं अत्यावश्यक होतं ! मात्रं मुळात कुत्र्यासारख्या हुशार प्राण्याची हत्या करणं हेच ब्रिटीश मानसिकतेत वाढलेल्या स्कॉटला मंजूर नव्हतं !

स्कॉटच्या दुर्दैवाने स्लेजच्या कुत्र्यांची उपयुक्तता त्याला कधीच कळू शकली नाही. माणसांइतकेच श्रम स्लेजच्या कुत्र्याला करावे लागणार असतील तर त्याला त्याच प्रमाणात योग्यं खाणं आवश्यक आहे हे स्कॉटच्या ध्यानात आलं नव्हतं. अपु-या खाण्यामुळे अर्धवट भुकेलेल्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणं हे अत्यंत कठीण असतं.

अ‍ॅमंडसेनने सुरवातीपासूनच कुत्र्यांच्या बाबतीत अत्यंत सुस्पष्ट धोरण स्वीकारलं होतं. जे कुत्रे अशक्त झाले असतील त्या कुत्र्यांची हत्या करुन इतर कुत्र्यांना आणि माणसांना अन्न म्हणून त्यांच्या मांसाचा वापर करण्याची त्याची योजना होती. त्याच्या मते कुत्र्यांना कमी खाण्यास देऊन त्यांच्याकडून जास्तं श्रम करुन घेण्यापेक्षा त्यांना भरपूर खाण्यास घालून उपयुक्तता संपल्यावर त्यांना गोळ्या घालणं यात तुलनेने कमी क्रूरपणा होता. स्कॉटप्रमाणेच अ‍ॅमंडसेनच्या तुकडीचंही आपल्या कुत्र्यांवर अतिशय प्रेम होतं. त्यांना त्यांचा खूप लळा लागला होता, परंतु दक्षिण धृव गाठण्यासाठी कोणतीही गोष्ट त्यांना वर्ज्य नव्हती !

ब्रिटीश वृत्तपत्रांनी अ‍ॅमंडसेनच्या या रोकठोक निर्णयावर टीकेची झोड उठवली होती. त्यांच्या मते पारंपारीक पध्दतीने स्लेज ओढत न जाता अ‍ॅमंडसेनने कुत्र्यांचा वापर करुन स्कॉटवर कुरघोडी केली होती. सामान ओढण्यासाठी वापरण्यात आलेल्या कुत्र्यांचा मांसासाठी त्याने केलेला वापर हा तिरस्कारणीय होता.

स्कॉटने तरी सामान वाहून नेण्यासाठी वापरलेल्या घोड्यांबद्दल दुसरं काय केलं होतं ?

नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर स्थानीक लोकांकडून अ‍ॅमंडसेनने कुत्र्यांचा योग्य वापर करण्याचं तंत्र शिकून घेतलं होतं. कुत्र्यांना न दमवता त्यांच्याकडून जास्तीत जास्तं अंतर पार करुन घेणं, त्यांना योग्य खाणंपिणं आणि आराम देणं हे सर्व ज्ञान त्याने आत्मसात केलं होतं.

दक्षिण धृवाच्या मोहीमेवर त्याने त्याचा पुरेपूर वापर करून घेतला. स्कॉटचे घोडे रॉस आईस शेल्फवरुन बिअर्डमूर ग्लेशीयरची चढण चढू श़़कणार नव्हते हे उघड होतं. शॅकल्टनच्या मोहीमेत ते सिध्द झालं होतं. कुत्रे मात्र पर्वतरांग ओलांडून पार दक्षिण धृवापर्यंत जाऊ शकतील असा अ‍ॅमंडसेनने अचूक अंदाज बांधला होता ! आपल्या मोहीमेत त्याने कुत्र्यांच्या स्लेज चालवण्याचा अनुभव असलेल्यांची निवड केली होती. हॅन्सन, हॅसल, विस्टींग हे स्लेज उत्कृष्टपणे चालवू शकत होते.

नॅन्सनच्या सूचनेवरुन स्कॉटने स्कीईंगमध्ये तरबेज असणा-या ट्रेगेव्ह ग्रानची आपल्या मोहीमेवर निवड केली होती. परंतु आपल्या मोहीमेतील सदस्यांना स्कीईंगच्या प्रशिक्षणाची त्याने सक्ती केली नाही. स्कीईंगची खरी उपयुक्तता त्याच्या ध्यानात येईपर्यंत बराच उशीर झाला होता !

अ‍ॅमंडसेनच्या तुकडीतील सर्वांनाच स्कीईंगचं उत्तम ज्ञान होतं. लहानपणापासून नॉर्वेतील बर्फा़ळ प्रदेशात वावरल्याने ते स्कीईंगमध्ये पारंगत होते. त्यामुळे कुत्र्यांच्या वेगाशी मेळ घालणं त्यांना सोपं जात होतं. टेलीमार्कचा रहिवासी असलेला जालांड तर स्कीईंग चँपीयन होता !

स्कॉटचे घोडे टणक बर्फावरुन सफाईदारपणे चालू शकत असले, तरीही भुसभुशीत बर्फात त्यांचे पाय रुतून खोळंबा होत असे. याल प्रतिबंध करण्यासाठी स्कॉटने खास घोड्यांसाठी 'स्नो शूज' बनवून घेतले होते. मात्रं घोड्यांची जबाबदारी असलेल्या ओएट्सचा स्नो शूज वापरण्याला विरोध होता ! बहुतेक सर्व स्नो शूज त्याने हट पॉईंटलाच ठेवून दिले होते !

अत्यंत कमी तापमानामुळे हायपोथर्मिया ( शरिराचं तापमान कमी होणं )पासून बचाव करण्यासाठी घोड्यांच्या अंगावर सतत ब्लँकेट्स घालणं आवश्यक होतं. मात्रं कुत्र्यांच्या बाबतीत अशी खबरदारी घेण्याची आवश्यकता नव्हती ! सर्वात महत्वाचं म्हणजे अंटार्क्टीकामध्ये विपुल प्रमाणात उपलब्धं असलेलं सील आणि पेंग्वीनचं मांस कुत्र्यांना खाण्यासाठी सहज चालू शकत होतं ! सीलचं चरबीयुक्त मांस हे स्लेजच्या कुत्र्यांसाठी अत्यंत पोषक असतं हे पुढे सिध्द झालं. याउलट घोड्यांचं खाद्य पार इंग्लंडपासून आणावं लागत होतं ! स्कॉटच्या तुकडीने दक्षिणेच्या दिशेने वाटचालीस सुरवात केल्यावर इतर सामग्रीबरोबर घोड्यांचं खाणंही वाहून नेण्यास पर्याय नव्हता !

स्कॉटच्या मोहीमेवर आणण्यात आलेल्या १९ घोड्यांपैकी ८ घोडे मोहीमेला सुरवात करण्यापूर्वीच मरण पावले होते. परिणामी दक्षिण धृव गाठण्यासाठी निघालेल्या स्कॉटच्या साधनसामग्री वाहून नेण्याच्या क्षमतेवर मर्यादा आली होती !

स्कॉटची तुकडी दक्षिण धृवावर पोहोचली तेव्हा त्यांना अशक्तपणा जाणवण्यास सुरवात झाली होती. परतीच्या वाटेवरही आपलं वेळापत्रक गाठण्यात अखेर ते अयशस्वी झाले असले, तरी बराच काळ त्यांना अन्नाचा तुटवडा नव्हता. परंतु तरीही स्कॉटच्या सहका-यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली होती.

चेरी-गॅराडच्या मते दक्षिण धृवाच्या शेवटच्या टप्प्यात उपलब्ध खाद्यपदार्थांपासून स्कॉटच्या तुकडीला आवश्यक त्या कॅलरी मिळत नव्हत्या ! स्लेज ओढण्याच्या श्रमांमुळे शरीरातील खर्च पडणा-या कॅलरींच्या तुलनेत त्यांना मिळणा-या कॅलरी ब-याच प्रमाणात कमी होत्या ! मॅक्स जोन्सच्या मते स्लेज ओढण्यासाठी दिवसभरात ६००० कॅलरी खर्च होत असताना त्यांना केवळ ४५०० कॅलरी मिळत होत्या !

" रोज काही प्रमाणात त्यांची उपासमार होत होती !" जोन्स म्हणतो, " याचं पर्यावसन त्यांच्या मृत्यूत झालं !"

केप क्रॉझीयरवर चेरी-गॅराड, बॉवर्स आणि विल्सन यांनी केलेल्या मोहीमेत प्रत्येकाला खाद्यपदार्थांचा वेगळा कोटा ठरवून देण्यात आला होता. या अनुभवांच्या आधाराने स्कॉटने दक्षिण धृवावरील मोहीमेसाठी आवश्यक अन्नपदार्थांचं गणित मांडलं होतं. परंतु तुलनेने जास्त खडतर प्रवास, लागणारा वेळ आणि स्लेज ओढण्यासाठी लागणारे श्रम या गोष्टी स्कॉटने विचारात घेतल्या नव्हत्या.

टेरा नोव्हा मोहीमेतील उपलब्ध खाद्यसामग्रीत बी आणि सी या व्हिटॅमिन्सची कमतरता होती. दक्षिण धृवाच्या वाटेवर असताना ही विटॅमिन्स मिळवण्याचा त्यांना उपलब्ध असलेला एकमेव मार्ग म्हणजे घोडे अथवा कुत्र्यांचं मांस ! मात्र कुत्र्यांना मारण्यास स्कॉटने ठाम नकार दिला होता आणि घोड्याच्या मांसातून आवश्यक व्हिटॅमिन्स मिळणं अशक्यं होतं. परतीच्या वाटेवर असणा-या स्कॉटची तुकडीत बॉवर्स, विल्सन आणि ओएट्स यांच्यामध्ये स्कर्व्हीची सुरवतातीची लक्षणं असलेल्या पायातील वेदना जाणवण्यास सुरवात झाली होती. टेडी इव्हान्सच्या तर प्राणांवर बेतलं होतं !

कँपबेलच्या उत्तरेला अडकलेल्या तुकडीने खाण्याच्या कमतरतेमुळे सील आणि पेंग्वीनची शिकार करण्याचा मार्ग पत्करला होता. सीलच्या मांसामुळे त्यांना स्कर्व्हीपासून संरक्षण मिळालं होतं ! सीलच्या मांसात सी व्हिटॅमीन भरपूर प्रमाणात असल्याचं पुढे सिध्द झालं होतं !

स्कॉटच्या तुकडीला डिहायड्रेशनचाही त्रास जाणवत असावा अशी शक्यता आहे. परतीच्या वाटेवर स्कॉटकडे इंधनाची कमतरता होती, त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात बर्फ वितळवून पाणी तयार करणं त्याला अशक्यंच होतं. स्लेज ओढण्याच्या अतिरिक्त श्रमांमुळे परिस्थिती अधिकच बिघडणार होती हे उघड होतं.

स्कॉटच्या मूळ योजनेप्रमाणे पोलर पार्टीत चार सदस्यांचा समावेश होता. त्याप्रमाणात सर्व सामग्रीची वाटणी करण्यात आली होती. मात्रं स्कॉटने शेवटच्या क्षणी पोलर पार्टीत बॉवर्सचा समावेश केल्याने या सर्व सामग्रीची पुन्हा नव्याने विभागणी करणं भाग पडलं. तसंच पाच माणसांसाठी जेवण बनवताना दरवेळी अर्धा तास जास्त लागत असे असं स्कॉटने नमूद केलं होतं. यासाठी अर्थाच जास्तीच्या इंधनाची आवश्यकता होती.

परतीच्या वाटेवर असताना स्कॉटला इंधनाच्या कॅन्समध्ये अपेक्षेपेक्षा कमी इंधन असल्याचं आढळलं होतं. या कॅन्सच्या झाकणांना चामड्याचे वॉशर होते. त्यामधून बाष्पीभवनाद्वार इंधनाची काही प्रमाणात गळती होत असे. अंटार्क्टीकावरील अनेक मोहीमांतील दर्यावर्दींना हा अनुभव होता. स्कॉटलाही याची कल्पना होती, परंतु त्याने ही गळती रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता. शेवटच्या क्षणी बॉवर्सचा पोलर पार्टीत समावेश करण्यात आल्याने परतीच्या वाटेवर टेडी इव्हान्सला इंधनाचे कॅन उघडून त्याची पुन्हा वाटणी करून ते बंद करावे लागले होते. स्कॉटची तुकडी परत येईपर्यंत इंधनाचं काही प्रमाणात बाष्पीभवन होणार हे उघड होतं ! अ‍ॅमंडसेनने मात्र इंधनाच्या कॅन्सला वॉशर न वापरता सोल्डरींग करून कॅन बंद करण्याचा मार्ग अवलंबला होता. सोल्डरींग केल्यामुळे इंधनाची गळती होत नसे ! माऊंट बेटीच्या पायथ्याला असलेल्या अ‍ॅमंडसेनच्या कँपवरील इंधनाचे कॅन ५० वर्षांनंतरही पूर्ण भरलेले आढळून आले होते !

दक्षिण धृवावरुन परतीच्या मार्गावर रॉस आईस शेल्फवर स्कॉटच्या मोहीमेला अत्यंत थंड आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला होता. २७ फेब्रुवारी ते १० मार्चच्या काळात १५ वर्षातून एकदा येणा-या अतीथंड हवामानाच्या कचाट्यात स्कॉटची तुकडी सापडली होती ! या थंड हवामानामुळे स्कॉटला प्रतिदिनी अपेक्षीत मजल मारणं कठीण जात होतं . स्कॉटने खराब पृष्ठभागामुळे आणि हवामानामुळे वाटचाल हळू होत असल्याचं अनेकदा आपल्या डायरीत नोंदवलं होतं. हे काही अंशी खरं असलं तरी प्रकृती खालावल्यामुळे आणि अतिश्रमांनी दमल्या-भागल्या अवस्थेत स्कॉटच्या तुकडीला स्लेज ओढण्याचे कष्ट जास्तं प्रकर्षाने जाणवत होते. वाटेतील डेपोंवर पोहोचण्याचं वेळापत्रक गाठणं स्कॉटला त्यामुळे कठीण झालं होतं. रोजच्या कमी प्रगतीमुळे दोन डेपोंच्या दरम्यान अन्नसामग्री आणि इंधनाची कमतरता जाणवत होती. एक टन डेपोपासून ११ मैलांवर येऊन पोहोचलेले असताना त्यांच्याजवळील सामग्री अत्यंत अपुरी होती.

स्कॉटने आपल्या डायरीत स्लेज ओढताना थंड हवामानामुळे मार्गक्रमणा करणं जिकीरीचं झाल्याचं अनेक वेळा नमूद केलं होतं. मात्रं त्याच हवामानात चेरी-गॅराडला कुत्र्यांच्या स्लेजवरुन एक टन डेपोपर्यंत आणि परतीचा ३०० मैलांच्या प्रवासात विशेष अडचणी आल्या नव्हत्या. रॉस आईस शेल्फवर हिमवादळं होत होती, मात्रं जास्तीत जास्तं दोन ते तीन दिवस ! स्कॉटने नमूद केल्याप्रमाणे दहा दिवस एकही हिमवादळ टिकलं नव्हतं !

स्लेज ओढताना स्कॉटच्या तुकडीची दमछाक होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे स्लेजवर असलेले शास्त्रीय नमुने ! विल्सनच्या आग्रहावरुन जमा करण्यात आलेल्या या दगड आणि जीवाष्म नमुन्यांचं वजन सुमारे ३० पौंड ( १४ किलो ) एवढं होतं ! रॉस आईस शेल्फवर प्रतिकूल हवामानातून वाटचाल करताना स्लेजवरील हे जास्तीचं वजन ओढण्यात अर्थातच त्याप्रमाणात शक्ती खर्च पडणार होती. त्या दृष्टीने विचार करता हा सर्व संग्रह एखाद्या कँपवर ठेवून पुढे मार्गक्रमणा करणं जास्तं श्रेयस्कर होतं. मात्रं जीवावर बेतलं असतानाही स्कॉट आणि इतर इमानेइतबारे हे जास्तीचं वजन खेचून आणत होते !

अ‍ॅमंडसेनने आपल्या स्लेजवर सामान वाहून नेण्यासाठी कॅनीस्टर्स ( सिलेंडर्स ) वापरले होते. त्यामुळे रोजच्या मुक्कामासाठी आवश्यक तेवढंच सामान काढून बाकीचं सामान स्लेजवरच ठेवणं त्याला शक्यं झालं होतं. स्कॉटला मात्रं दर मुक्कामाला स्लेजवरचं सर्व सामान काढून परत चढवावं लागत होतं. अर्थात यात श्रम आणि वेळ दोन्हीचा अपव्यय होत होता !

अ‍ॅमंडसेनने आपले डेपो उभारताना आणि रस्तावर खुणेचे मार्कर लावताना नॉर्वेजीयन स्कीईंग ट्रॅक आखताना वापरल्या जाणा-या पध्दतीचा उपयोग केला होता. फ्रामहेमपासून सुरवातीचे १८० मैल आणि दक्षिण धृवाजवळ शेवटचे १८० मैल अंतरात त्याने या पध्दतीने रस्त्याचं मार्कींग केलं होतं. दर ८ मैलांवर खुणेचा झेंडा होता. त्या दरम्यान दर एक मैलावर काळ्या रंगात रंगवलेले रिकामे कॅन बसवलेले होते. ८२ अंश दक्षिण अक्षवृत्तापासून दर ३ मैलांवर ६ फूट बर्फाचा ढिगारा रचून त्यावर खुणेचा मार्कर बसवला होता. या प्रत्येक मार्करमध्ये मार्करचं नेमक स्थान, पुढील डेपोपासूनचं अंतर आणि पुढील मार्करची दिशा दर्शवणारा कागद ठेवण्यात आला होता. ८२ ते ८५ अंश अक्षवृत्तावर दर अंशाला डेपो उभारण्यात आलेले होते. डेपोवर बांबूंच्या आधाराने झेंडे रोवण्यात आलेले होते. तसंच डेपोच्या दोन्ही बाजूला ५ मैलांपर्यंत दर अर्ध्या मैलावर झेंडे लावण्यास तो विसरला नव्हता ! या सर्व खबरदारीमुळे डेव्हील्स बॉलरूमचा परिसर टाळण्याचा अपवाद वगळता अ‍ॅमंडसेनवर रस्ता चुकण्याची अथवा डेपो न सापडण्याची वेळ आली नाही !

स्कॉटने अ‍ॅमंडसेनप्रमाणेच डेपो उभारण्यावर भर दिला असला, तरी अ‍ॅमंडसेन आणि स्कॉटच्या दोन डेपोतील अंतरात बराच फरक होता. रॉस आईस शेल्फवर ज्या अंतरासाठी अ‍ॅमंडसेनने ७ डेपो उभारले, त्या अंतराकरता स्कॉटने फक्त २ डेपो उभारलेल होते ! डेपोवर एकमेव झेंडा लावण्यात आला होता. रस्ता समजण्यासाठी स्कॉटचा बर्फाचे ढिगारे उभे करण्यावर भर होता. डेपो वगळता मार्गावर एकही झेंडा उभारण्यात आला नाही ! परिणामी स्कॉटला परतीच्या वाटेवर अनेकदा डेपोकडे जाणारा रस्ता शोधताना वाट चुकल्याने जास्तीची पायपीट करावी लागली होती. जोरदार वा-याने त्यांनी उभारलेल्या बर्फाचे ढिगारे जमिनदोस्त होण्याचे प्रकार अनेकदा घडले होते. तसंच कित्येक वेळेस वा-यामुळे दक्षिणेच्या वाटेवर असताना बर्फात उमटलेले त्यांचे माग दिसेनासे झाल्यामुळे वा-याचा जोर कमी होईपर्यंत स्कॉटला थांबून राहवं लागलं होतं ! प्रतिकूल हवामानात आणि बदलत्या मोसमात हा विलंब परवडण्यासासखा नव्हता.

अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने रेनडीअरच्या कातड्यांपासून बनवलेले जाड कपडे वापरले होते. कुत्र्यांच्या वेगाशी मेळ ठेवत स्कीईंग करणं आवश्यक असल्याने त्याला जाड कपड्यांची आवश्यकता होती. उबदार असूनही आत हवा खेळती राहत असल्याने स्कीईंगसारख्या दमछाक करणा-या मोहीमेसाठी योग्यच होते. उलट स्कॉटने स्लेज ओढून नेण्याच्या दृष्टीने जाड लोकरीपासून बनवलेले आणि हवेला विरोध करणारे कपडे वापरलेले होते. अर्थातच स्कॉटच्या तुकडी विशेषतः पाय गारठल्याची समस्या अनेकदा उभी राहत होती ! तसंच स्कॉटच्या सहका-यांपैकी अनेकांना स्नो ब्लाईंडनेसचा त्रास जाणवत होता.

अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने मार्गक्रमणा करण्यासाठी नॅव्हीगेशनचे तयार केलेल तक्ते वापरले होते. तसंच आपलं नेमकं स्थान निश्चीत करण्यासाठी हलक्या असलेल्या सेक्स्टंटचा वापर केला होता. अ‍ॅमंडसेनच्या तुकडीतील जालांड वगळता इतर सर्वजण अनुभवी नॅव्हीगेटर होते ! याउलट स्कॉटच्या मोहीमेत चारजणांच्या प्रत्येक तुकडीत एक नॅव्हीगेटर होता ! स्थाननिश्चीतीसाठी वापरलेलं थिओडोलाईट हे बरंच जड होतं आणि त्याच्या निरीक्षणानंतर बरीच आकडेमोड करावी लागत होती. चेरी-गॅराडने नॅव्हीगेशनचं शिक्षण घेण्याची विनंती केली होती, परंतु स्कॉटने त्याला नकार दिला !

चेरी-गॅराड नॅव्हीगेशन करु शकत असता तर ......

स्कॉटने कुत्र्यांच्या तुकडीबद्दल घातलेला गोंधळ तर निव्वळ अनाकलनीय होता !

दक्षिण धृवाच्या मोहीमेवर निघण्यापूर्वी स्कॉटने मेअर्सच्या नावाने सूचना लिहून ठेवली होती
" फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पोलर पार्टीला ( दक्षिण धृवावर जाणारी तुकडी ) गाठण्याच्या दृष्टीने तू कुत्रे घेऊन केप इव्हान्सहून कूच कर ! अर्थात नेमकं कधी निघावं हे मधून परतणा-या लोकांनी दिलेली माहिती, कुत्र्यांचं एक टन डेपो कँपवर उपलब्धं असलेलं खाणं आणि कुत्र्यांची शारिरीक अवस्था यावर अवलंबून असेल. १ मार्चच्या सुमाराला ८२ किंवा ८२'३०'' दक्षिण अक्षवृत्तावर आम्हांला गाठण्याच्या दृष्टीने तू केप इव्हान्स सोड !"

प्रत्यक्षं मोहीमेत स्कॉटने ज्या ठिकाणाहून कुत्र्यांसह मेअर्स परतणार होता, त्यापेक्षा त्याला १४० मैल दक्षिणेकडे नेलं होतं ! जवळपास सगळी वाहतूक घोड्यांवरुन होत असल्याने स्कॉटच्या या निर्णयाचा मोहीमेला तसा काहीच फायदा झाला नाही. उलट कुत्र्यांना अन्नपुरवठा करण्यासाठी आधी ठरवलेल्या दिवसापूर्वी घोड्यांना गोळ्या घालण्याची वेळ आली. त्याचा परिणाम म्हणजे अपेक्षेपेक्षा कितीतरी आधी मोहीमेच्या सदस्यांवर स्लेज ओढण्याचं काम येऊन पडलं !

२१ डिसेंबर १९११ ला अ‍ॅटकिन्सन, चेरी-गॅराड, राईट आणि कोहेन परत फिरले तेव्हा स्कॉटने अ‍ॅटकिन्सनला सांगीतलं,
" मेअर्सला परत जावं लागण्याची शक्यता आहे. तसं झालं तर कुत्र्यांच्या दोन तुकड्या घेऊन शक्य तितक्या दक्षिणेला येण्याचा प्रयत्न कर ! आम्हांला परत येताना आवश्यंक त्या साधनसामग्रीची तजवीज डेपो मध्ये करुन ठेव. परंतु आम्ही परत येण्यासाठी कुत्र्यांच्या मदतीवर अवलंबून नाही ! पुढच्या वर्षी स्लेजसाठी कुत्र्यांची आवश्यकता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्याबाबतीत जास्तं रिस्क घेऊ नका !"

परतीच्या वाटेवर स्कॉटला कुत्र्यांची गरज नाही असा स्पष्ट निष्कर्ष यातून निघत होता.

केप इव्हासला मेअर्सची वाट पाहत असलेल्या सिम्प्सनला स्कॉटने मेअर्सला आणखीन पुढे नेलं असल्याची काहीच कल्पना नव्हती. डे आणि हूपर परतल्यावर त्यांच्या जोडीला क्लिसॉल्ड आणि नेल्सन यांना सिम्प्सनने एक टन डेपोवर पाठवलं होतं. मात्रं डे आणि हूपरच्या या मोहीमेबरोबर कुत्र्यांसाठी खाद्यंच पाठवलं नव्हतं !

४ जानेवारी १९१२ ला टेडी इव्हान्स, लॅशी आणि क्रेनने परतीची वाट धरली तेव्हा स्कॉटचा मेअर्ससाठीचा संदेश आणखीनच वेगळा होता,
" पूर्वी ठरलेल्या योजनेत थोडासा बदल झालेला आहे ! साधारण फेब्रुवारीच्या मध्यावर ८२ ते ८३ अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान आम्हाला गाठण्याच्या हिशेबाने कुत्र्यांसह तू प्रस्थान ठेव ! परतीच्या वाटेवर केप इव्हान्स गाठण्यासाठी आम्हांला त्यांच्या मदतीची गरज लागण्याची शक्यता आहे !"

दुर्दैवाने टेडी इव्हान्सला झालेल्या स्कर्व्हीमुळे डॉक्टर असल्याने अ‍ॅटकिन्सनला त्याच्यासाठी थांबावं लागलं होतं. त्यामुळे त्याने चेरी-गॅराड आणि डिमीट्रीला एक टन डेपोवर पाठवलं, मात्रं इव्हान्सबरोबर स्कॉटने पाठवलेला संदेश अमलात आला नाही.

परतीच्या वाटेवर स्कॉटला कुत्र्यांच्या मदतीची जरुर नाही असं स्वतः स्कॉटने अ‍ॅटकिन्सनला सांगितलं होतं. तसंच कुत्र्यांच्या बाबतीत रिस्क घेऊ नका असंही बजावलं होतं. स्कॉटची हीच सूचना अ‍ॅटकिन्सनने चेरी-गॅराड आणि डिमीट्रीला दिली होती. एक टन डेपोवर कुत्र्यांसाठी खाणं उपलब्धं नव्हतं आणि पुढे जायचं असल्यास कुत्र्यांची हत्या करुन इतर कुत्र्यांना मांस खाऊ घालण्यास पर्याय नव्हता. नेमकी हीच गोष्ट करु नका म्हणून स्कॉटने बजावलं होतं !

स्कॉटच्या या उलटसुलट संदेशांचा परिणाम असा झाला की अवघ्या ६० मैलांवर असूनही चेरी-गॅराड त्यांच्या दिशेने दक्षिणेला आला नाही ! स्कॉटची वाट पाहून तो हट पॉईंटला परतला !

चेरी-गॅराडची मोहीम ही केवळ एक टन डेपोवर सामग्री पोहोचवण्याची मोहीम आहे असा अ‍ॅटकिन्सनचा ग्रह होता. प्रत्यक्षात चेरी-गॅराडच्या मोहीमेची सुटका पथक ( रेस्क्यू पार्टी ) या दृष्टीने आखणी करणं अत्यावश्यक होतं, परंतु ग्रानने म्हटल्याप्रमाणे अ‍ॅटकिन्सनला स्कॉटच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने चेरी-गॅराड हट पॉईंट्ला पोहोचेपर्यंत त्याने कोणतीही हालचाल केली नाही ! अ‍ॅटकिन्सनने अगदी शेवटी कोहेनसह स्कॉटला शोधण्याचा केलेला प्रयत्नं अर्थातच निष्फळ ठरला.

मेअर्स योग्य वेळी परतला असता आणि कुत्र्यांसाठी एक टन डेपोवर खाद्यं उपलब्धं असतं तर स्कॉट, विल्सन आणि बॉवर्स यांना वाचवणं चेरी-गॅराडला शक्यं झालं असतं !

cherry
अ‍ॅप्सली चेरी-गॅराड

इतक्या सर्व परिस्थितीतही स्कॉट, विल्सन, बॉवर्स आणि कदाचित ओएट्सही वाचू शकले असते .....

जर एक टन डेपो पूर्वी ठरल्याप्रमाणे ८० अंश दक्षिण अक्षवृत्तावर उभारला गेला असता !

१९११ च्या फेब्रुवारीत डेपो उभारण्याच्या मोहीमेवर असताना कॉर्नर कँपवर स्कॉटला हिमवादळामुळे अडकून पडावं लागलं होतं. मात्रं ८० अंश दक्षिण अक्षवृत्तावर पोहोचण्यापूर्वीच घोड्यांचा दम निघाला होता. लॅरी ओएट्सने घोडे मरण पावल्यास त्यांच्या मांसाचा वापर करुन कुत्र्यांसह ८० अंश अक्षवृत्तापर्यंत जाण्याची स्कॉटला आग्रही सूचना दिली होती, परंतु घोड्यांच्या बाबतीत कोणताही धोका पत्करण्यास स्कॉटची तयारी नव्हती.

एक टन डेपो ८० अंश दक्षिण अक्षवृत्तापासून ३० मैल उत्तरेला ७९'२९'' दक्षिण अक्षवृत्तावर उभारण्यात आला !

..... आणि स्कॉट, विल्सन आणि बॉवर्स या डेपोपासून ११ मैलांवर मरण पावले !

मूळ योजनेप्रमाणे ८० अंश अक्षवृतावरील डेपोच्या ठिकाणापासून उत्तरेला १९ मैल !

स्लेजच्या कुत्र्याविषयी असलेले पूर्वग्रह, कुत्र्यांच्या हाताळणीतील आणि सतत बदलणा-या संदेशांतील अक्षम्य गोंधळ, पोषक आहाराचा अभाव, अनेक चुकीचे निर्णय ( एक टन डेपोची उभारणी, शास्त्रीय नमुने वाहून आणणं ) आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रिटीश परंपरांना चिकटून स्लेज ओढत पदयात्रेवर दिलेला भर यामुळे स्कॉटच्या तुकडीची वाताहात झाली !

नॉर्वेजियनांनी त्यांना अवगत असलेलं स्कीईंग आणि कुत्र्याच्या स्लेज चालवण्याचं तंत्रं पूर्णपणे आणि कौशल्याने उपयोगात आणलं !

मायकेल डि ला नॉय म्हणतो,
" स्कॉटची पूर्ण मोहीम हीच मुळात खास ब्रिटीश मानसिकतेतून आलेल्या माणसांनी स्लेज ओढत पायी चालणं हेच श्रेष्ठत्वाचं आणि पौरुषाचं लक्षंण आहे या समजावर आधारीत होती. परिणामी पाच जणांना आपला जीव गमवावा लागला !"

दक्षिण धृव हे एकच लक्ष्यं समोर ठेवून आणि अनुभवसिध्द साधनांचा वापर करुन नवीन मार्ग शोधूनही अ‍ॅमंडसेन दक्षिण धृवावर आधी पोहोचला आणि सुरक्षित परत आला, तर केवळ शेवटच्या शंभर मैलांचा मार्ग अज्ञात असूनही आपल्या पूर्वग्रहांवर आणि पारंपारीक विचारसरणीवर आधारीत निर्णयांमुळे स्कॉटला प्राणाला मुकावं लागलं !

मात्रं अ‍ॅमंडसेन आणि स्कॉट काय किंवा त्यांचे सहकारी काय, हे असामान्य धाडसी वीर होते ! त्या काळी उपलब्धं असलेल्या साधनांनी दक्षिण धृवासारख्या मोहीमेवर जाणं आणि दक्षिण धृवावर पोहोचणं या त्यांच्या साहसाला आणि जिगरबाज वृत्तीला तोड नाही ! रोनाल्ड अ‍ॅमंडसेनने १९११ मध्ये उपलब्धं असलेल्या तत्कालीन साधनांच्या आधारे निश्चीत केलेलं दक्षिण धृवाचं स्थान हे प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनीक साधनांच्या सहाय्याने जे दक्षिण धृवाचं स्थान निश्चीक केलं आहे त्यापासून अवघ्या २५०० मी ( १ १/२ मैल ) अंतरावर आहे !

अमेरीकन सरकारने आपल्या दक्षिण धृवावरील संशोधन केंदाला अ‍ॅमंडसेन आणि स्कॉट यांचं नाव दिलं आहे. या दोघांचाही हा वीरोचित सन्मान आहे !

Station
अ‍ॅमंडसेन-स्कॉट साऊथ पोलर स्टेशन

****************************************************************

संदर्भ :-

Scott's Last Expedition Volume I Being the journals of Captain R. F. Scott - रॉबर्ट फॅल्कन स्कॉट
The South Pole; an account of the Norwegian Antarctic expedition in the "Fram," 1910-12 - Volume 1 and Volume 2 - रोनाल्ड अ‍ॅमंडसेन आणि आर्थर चार्टर
South with Scott - एडवर्ड ( टेडी ) इव्हान्स
The Worst Journey in the World - अ‍ॅप्सली चेरी-गॅराड
The Voyage of the Fram - थॉर्वाल्ड निल्सन
The Last Place on Earth - रोलांड हंटफोर्ड
Race for the South Pole: The Expedition Diaries of Scott and Amundsen - रोलांड हंटफोर्ड
Roald Amundsen - टॉम बोमनन् लार्सन
Captain Scott - रानुल्फ फिनेस
Tom Crean: Unsung Hero of the Scott and Shackleton Antarctic Expeditions - मायकेल स्मिथ
Cherry : a Life of Apsley Cherry-Garrard - सारा व्हिलर
The Longest Winter - कॅथरीन लॅम्बर्ट
Captain Oates - Soldier and Explorer - स्यू लिम्ब आणि पॅट्रीक कॉर्डींग्ली
Scott Of the Antartic - डेव्हीड क्रेन
Race to The End: Amundsen, Scott, and the Attainment of the South Pole - रॉस मॅकफी
The Coldest March - सुझन सॉलोमन
Return to Antarctica: the Amazing Adventure of Sir Charles Wright on Robert Scott's Journey to the South Pole - अ‍ॅड्रीयन रेसाईड
The Third Man - रॅग्नर क्वाम ज्युनियर

इंटरनेटवरील अनेक आर्टीकल्स, विकीपिडीया आणि इतर अनेक वेबसाईटवरील अमुल्य माहीती.

सर्व फोटो इंटरनेटवरुन साभार

समाप्त

प्रतिक्रिया

जेपी's picture

15 May 2014 - 8:10 am | जेपी

सुंदर लेखमालिका.
इथे लिहील्याबद्दल धन्यवाद .पुर्णलेख वाचले .

आणी

मीच पयला.

एस's picture

15 May 2014 - 11:03 am | एस

तटस्थ आणि खूपच बारकाईने लिहिलेली लेखमालिका. धन्यवाद!
पुमाशु. :-)

प्रचेतस's picture

15 May 2014 - 1:41 pm | प्रचेतस

मालिका प्रचंड आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 May 2014 - 2:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मालिका. खूप आवडली !!

स्मिता.'s picture

15 May 2014 - 3:50 pm | स्मिता.

अतिशय माहितीपूर्ण, तटस्थ भूमिकेतून लिहिलेली लेखमाला अतिशय सुरेख जमली आहे. रोज वाचनमात्र राहून अगदी अधाश्यासारखी वाचून काढत होते आणि आज खास प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगइन केलं :)
अत्यंत सुरेख!!

कवितानागेश's picture

15 May 2014 - 5:36 pm | कवितानागेश

अतिशय सुंदर लेखमालिका. परत परत वाचावी अशी..

ओसु's picture

16 May 2014 - 2:02 am | ओसु

जबरदस्त लेखन मालिका.
भाग ५ नंतर थांबलो होतो. काल शेवटचा भाग पहिला आणि पुन्हा वाचायला सुरुवात केली ते संपेपर्यंत थांबलो नाही.
अजून एखाद्या नवीन विषयाची मेजवानी येऊ द्या

मुक्त विहारि's picture

16 May 2014 - 2:33 am | मुक्त विहारि

ये स्पार्टाकस पागल बनाता हय.

अभी सब भाग एक जगह बांधके रख्खे हय.

आता उद्याची सुट्टी सत्कारणी लावतो....

अब हमरा प्रतिसाद सब भाग वाचनेके बाद...

स्पार्टाकस's picture

16 May 2014 - 10:26 am | स्पार्टाकस

सर्वांचे मनापासून आभार..!!!

एर्नेस्ट शॅकल्टनने १९१४ मध्ये अंटार्क्टीका खंड ओलांडण्याचा प्रयत्नं केला होता. त्या मोहीमेवरील (इंपिरीयल ट्रान्स अंटार्क्टीक) आल्फ्रेड लॅन्सींगचं Endurance: Shackleton's Incredible Voyage हे पुस्तकंही निव्वळ अप्रतिम आहे ! कोणाला इंटरेस्ट असल्यास जरुर वाचा..!!

अजया's picture

16 May 2014 - 9:53 pm | अजया

__/\__

छान लेखमालीका. मराठीत उपल्बध केल्याबद्दल धन्यवाद.

पैसा's picture

21 May 2014 - 10:35 am | पैसा

तुमचं लिखाण थरारक आहेच. पण या सर्व दुर्दैवी प्रकारांबद्दल पूर्वी वाचलं होतं. तेव्हाही घोडे आणि कुत्र्यांशी कोणीही असं वागणं पटलं नव्हतंच. माणूस आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकतो. प्राणी झाला तरी त्याला भावना असतात. माणसाला जीव लावणार्‍या कुत्र्याला आपला मालक आपल्याला मारतो आहे हे कळलं नसेल पण तो सर्वात वाईट विश्वासघाताचा प्रकार वाटतो.

आदिजोशी's picture

21 May 2014 - 6:32 pm | आदिजोशी

लेखमालेल्या सुरुवात झाल्यापासून एकही भाग न वाचता लेखमाला पूर्ण होण्याची वाट बघत होतो. मागच्या २ दिवसात सगळी लेखमाला वाचून काढली. निव्वळ अप्रतिम आहे. ह्या सुंदर लेखमालेबद्दल अत्यंत आभारी आहोत.

अमित खोजे's picture

18 Jun 2014 - 12:58 am | अमित खोजे

संपूर्ण मालिका अगदी दोनदा वाचून काढली. फारच थरारक.
स्कॉटची तशी वाताहातच झाली म्हणायची. काही वेळेला तुमचा नको असलेला अट्टाहास अगदी जीवाशी येतो तो असा! ( कुत्रे आणि सामान स्वतः वाहून नेण्याची कल्पना )
संपूर्ण मालिका वाचत असताना अगदी आंतरजालावरून नकाशे शोधून शोधून मग वाचत होतो. तुम्ही नकाशा अगदी शेवटच्या भागात दिलात. मध्ये मध्ये पण एखादा टाकला असता तर लेख वाचताना संदर्भ लगेच लागत गेले असते. असो.

नकाशे शोधताना हि clip पण मिळाली.
90 Degrees South

रघुपती.राज's picture

24 Jun 2014 - 8:51 pm | रघुपती.राज

फार छान. आणखी लिहा

प्रास's picture

25 Oct 2014 - 7:27 pm | प्रास

स्पार्टाकसराव, एका अत्यंत धाडसी मोहिमेची उत्तम शैलीत माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.

आता इतर स्पार्टाकसी लिखाणाचाही आस्वाद घेईन म्हणतो..... :-)

जयंत कुलकर्णी's picture

26 Oct 2014 - 10:33 am | जयंत कुलकर्णी

मस्तच.....

प्रविन ९'s picture

5 Apr 2018 - 3:39 pm | प्रविन ९

संपूर्ण मालिका फारच थरारक

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Aug 2021 - 6:09 pm | अमरेंद्र बाहुबली

फारच छान