९० डिग्री साऊथ - ९

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in भटकंती
11 May 2014 - 6:27 pm

९० डिग्री साऊथ - ८

अ‍ॅटकिन्सनच्या तुकडीने एक टन डेपो गाठला होता. वाटेतील प्रत्येक डेपोवर त्यांना मेयर्सकडून हालअपेष्टांचं वर्णन करणारे संदेश मिळत होते. परतीच्या वाटेवर मेयर्सला हिमवादळाने गाठलं होतं. त्याचा अन्नसाठाही मर्यादीतच होता. परत येणा-या तुकड्यांना आवश्यक साधनसामग्रीची केप इव्हान्सहून एक टन डेपोमध्ये आणण्याची कामगिरी स्कॉटने त्याच्यावर सोपवली होती, परंतु मेयर्सला ते अशक्यंच होतं !

मेयर्सची ही परिस्थिती असूनही एक टन डेपोवर साधनसामग्रीची रेलचेल पाहून अ‍ॅटकिन्सनला सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता ! चेरी-गॅराड म्हणतो,

" एक टन डेपोवर साधनसामग्री पूर्ण भरलेली पाहून आम्ही चकीतच झालो ! हूपरच्या चिठीवरुन त्याचा उलगडा झाला. २१ डिसेंबरला केप इव्हान्सला पोहोचलेल्या डे आणि हूपरकडून मेयर्सला परतण्यास उशीर होणार असल्याचं सिम्प्सनच्या ध्यानात आलं होतं. २६ डिसेंबरला डे, हूपर, नेल्सन आणि क्लिसॉल्ड यांनी केप इव्हान्सहून एक टन डेपोच्या दिशेने साधनसामग्री घेऊन प्रस्थान केलं होतं !"

१६ जानेवारीला फ्रामहेममध्ये असलेल्या थॉर्वल्ड निल्सनला व्हेल्सच्या उपसागरात आलेलं आणखीन एक जहाज दृष्टीस पडलं !

काईमान मारू !

जहाजावर जपानचा झेंडा फडकत होता. नोबू शिरासच्या जपानी अंटार्क्टीक मोहीमेची तुकडी त्या जहाजावर होती. फेब्रुवारीमध्ये आपल्या पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरल्यावर त्यांनी ऑस्ट्रेलियाहून पुन्हा अंटार्क्टीका गाठलं होतं.

KaimanMaru
काईमान मारुवरील जपानी दर्यावर्दी - व्हेल्सच्या उपसागरात

निल्सन आणि प्रेस्टर्डने काईमान मारूला भेट दिली. जपानी मोहीमेत एकूण २७ माणसांचा समावेश होता. त्याखेरीज जहाजावर २६ कुत्रेही होते. निल्सन म्हणतो,

" त्यांच्या जहाजावर अनेक गोष्टी अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. स्वच्छता नावालाही नव्हती. त्यांचं लक्ष्यं दक्षिण धृवावर पोहोचणं हे नसून किंग एडवर्ड ७ लँड हे होतं. त्यांच्या मोडक्या-तोडक्या इंग्लीशमुळे जास्तं संवाद साधणं शक्यं नव्हतं !"

काईमान मारुने दुस-या दिवशी व्हेल्सच्या उपसागरातून दक्षिणेकडे प्रस्थान केलं. २६ जानेवारीला त्यांनी किंग एडवर्ड ७ लँडवर उतरण्यात यश मिळवलं. डिस्कव्हरी ( १९०२ ), निम्रॉड ( १९०८ ) आणि टेरा नोव्हा मोहीमेने तिथे उतरण्याचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते.

अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने ८२ अंश दक्षिण अक्षवृत्तावरील आपला डेपो गाठला होता ! अन्नसामग्रीची रेलचेल असल्याने त्यांनी जोरदार पार्टी केली ! स्लेजवरील वजन कमी करण्यासाठी अ‍ॅमंडसेनने कुत्र्यांचा आहार दुप्पट केला होता ! फ्रामहेममध्ये पोहोचण्याची त्याला घाई झाली होती ! स्कॉट अद्यापही दक्षिण धृवावर न पोहोचल्याची अ‍ॅमंडसेनला काहीच कल्पना नव्हती !

बिअर्डमूर ग्लेशीयरच्या वरच्या डेपोवरुन दोन दिवसांपूर्वी निघालेल्या लॅशी, क्रेन आणि इव्हान्सला आपला मार्ग थोडासा चुकल्याची शंका येत होती. मिडल ग्लेशीयर डेपोवर पोहोचल्यावर त्यांना अन्नसामग्री मिळू शकणार होती. मात्रं हवामान अद्याप पूर्णपणे अनुकूल नव्हतं !

८९'३७'' दक्षिण अक्षवृत्तावरुन निघालेल्या स्कॉटची तुकडी अतिशय उत्साहात होती. दुस-या दिवशी आपण दक्षिण धृवावर पोहोचणार याची त्यांना खात्री होती. दुपारी त्यांनी ८९'४२'' दक्षिण अक्षवृत्त गाठलं.

आघाडीवर असलेल्या बॉवर्सच्या तीक्ष्ण नजरेने दूरवर असलेला एक मार्कर टिपला होता. मात्रं तो मार्कर आहे हे मानण्यास त्याच्या मनाची तयारी नव्हती ! तो बर्फाच्या लाटेचा मध्येच आलेला उंचवटा असावा अशी त्याने स्वतःची समजूत करुन घेतली.

आणखीन अर्ध्या तासाने एक गडद काळा ठिपका बॉवर्सच्या दृष्टीस पडला !

झेंडा !

काही वेळातच स्कॉट आणि इतर सर्वजण त्या झेंड्यापाशी पोहोचले ! स्लेजच्या एका भागाला तो झेंडा लावण्यात आला होता. स्लेजच्या कित्येक खुणा आणि बर्फात अद्यापही टिकून असलेले कुत्र्याच्या पंजांचे ठसे त्यांना आढळून आले ! हा अ‍ॅमंडसेनचा १४ डिसेंबरचा कँप होता !

स्कॉटला वाटणारी भीती दुर्दैवाने खरी ठरली होती !
अ‍ॅमंडसेनने त्यांना चकवलं होतं !
नॉर्वेजियनांनी त्यांच्यापूर्वी दक्षिण धृव गाठला होता !

स्कॉटच्या तुकडीने तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांना प्रचंड निराशेने ग्रासलं होतं.

AmundsenFlag
अ‍ॅमंडसेनचा झेंडा

" आम्ही अत्यंत निराश मनस्थितीत आहोत !" ओएट्सने आपल्या डायरीत नोंद केली, " स्कॉट अत्यंत निराश झाला असला तरी आपला पराभव त्याने मानाने स्वीकारला आहे ! अ‍ॅमंडसेन…. त्याचं डोकं फोडावं असा संताप आला आहे !"

" स्लेजच्या खुणा आणि कुत्र्यांच्या पंजांचे ठसे किती जुने आहेत याची काही कल्पना येत नाही !" विल्सन म्हणतो, " दोन-तीन आठवडे.... कदाचित त्यापेक्षाही जुन्या !"

" मला स्कॉटबद्दल फार वाईट वाटतं आहे !" बॉवर्स म्हणतो, " आपला पराभव त्याने खिलाडूपणाने स्वीकारला अहे !"

" ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती, दुर्दैवाने अखेरच्या क्षणी ती खरी ठरली !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " आमच्या आधी नॉर्वेजियन्स इथे येऊन गेले आहेत ! मला इथवर साथ देणा-या माझ्या सहका-यांविषयी मला वाईट वाटत आहे ! आता उद्या धृवावर पोहोचून लवकरात लवकर परत फिरणं एवढंच आमच्या हाती उरलं आहे ! परतीच्या वाटेवर आमची चांगलीच दमछाक होणार आहे ! अ‍ॅमंडसेनला नक्कीच कोणती तरी सोपी वाट सापडली असावी !"

दुस-या दिवशी स्कॉटने धृवाचा मार्ग प़कडला. अ‍ॅमंडसेनच्या स्लेजच्या खुणांच्या अनुरोधाने ते पुढे जात होते. स्लेजच्या खुणांवरून दोनच माणसं असावीत असा स्कॉटचा अंदाज होता. तीन मैलांवर अ‍ॅमंडसेनचा मार्ग पश्चिमेच्या दिशेने जातो आहे असा त्यांनी निष्कर्ष काढला.

१७ जानेवारी १९१२ संध्याकाळी ६.०० वाजता कॅप्टन रॉबर्ट फॅल्कन स्कॉट दक्षिण धृवावर पोहोचला.

" दिवसभर अतिशय ढगाळ वातावरण होतं." विल्सन म्हणतो, " आम्हाला तिथे कोणताही मार्कर अथवा झेंडा आढळून आला नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे अ‍ॅमंडसेन धृवापासून तीन मैल दूरच असावा ! मात्रं दक्षिण धृवावर सर्वात प्रथम पोहोचल्याचा दावा तो निश्चितपणे करू शकतो यावर आमचं एकमत झालं ! त्याने या सगळ्या प्रकाराला शर्यतीचं स्वरुप आणलं आणि त्यात आम्हाला हरवलं ! परंतु आम्ही आमच्या मोहीमेचं लक्ष्यं गाठण्यात यशस्वी झालो आहोत !"

" या ठिकाणी पोहोचण्यासाठी घेतलेली मेहनत फळाला आली असली तरी नॉर्वेजियनांनी आमच्यावर मात केल्याचं शल्यं कायम राहील !" बॉवर्स म्हणतो, " पण आम्ही पारंपारीक ब्रिटीश पध्दतीने कोणत्याही प्राण्याच्या मदतीशिवाय स्वत:च्या पायांवर इथे पोहोचलो आहोत याचा मला अभिमान आहे !"

' गिरे तो भी टांग उपर !' या ब्रिटीश मानसिकतेपुढे काय बोलणार ?

स्कॉटने मात्रं आपला पराभव प्रांजळपणे मान्य केला.
" दक्षिण धृव !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली. " गेल्या काही दिवसांतील खडतर प्रवासानंतरही सर्वप्रथम धृवावर पोहोचल्याचं श्रेय मिळू नये हे निराशाजनक होतं ! आता शक्य तितक्या लवकर परत जाऊन दक्षिण धृवावर पोहोचल्याची बातमी प्रथम सर्वांना देणं हेच आमच्या हाती शिल्लक आहे ! मात्रं त्यात कितपत यश येईल याची शंकाच आहे !"

अ‍ॅमंडसेन महिन्याभरापूर्वीच धृवावरुन परत फिरल्याची आणि झपाट्याने व्हेल्सच्या उपसागरात फ्रामहेमकडे जात असल्याची स्कॉटला कल्पना नव्हती.

१८ जानेवारीला सकाळी स्कॉटच्या तुकडीला आपण दक्षिण धृव पार करुन सुमारे तीन मैल पुढे आल्याचं ध्यानात आलं. त्यांनी इशान्येची वाट पकडली.

दोन मैल अंतरावर बॉवर्सच्या तीक्ष्ण नजरेला अ‍ॅमंडसेनचा तंबू दृष्टीस पडला !

पोलहेम !

तंबूत ठेवलेल्या कागदावरुन अ‍ॅमंडसेनच्या तुकडीतील पाचजणांची नावं स्कॉटला कळून आली.

रोनाल्ड अ‍ॅमंडसेन
ओलाव्ह ओलाव्हसन जालांड
हेल्मर हॅन्सन
स्वेर हॅसल
ऑस्कर विस्टींग
- १५ डिसेंबर १९११

Poleheim
पोलहेम इथे स्कॉट आणि इतर - १८ जानेवारी १९१२

अ‍ॅमंडसेनने दक्षिण धृवाच्या आपल्या प्रवासातील सर्व नोंदी फ्रामच्या बे ऑफ व्हेल्स इथल्या वास्तव्याला धरुन केल्या होत्या. त्याच्या कॅलेंडरनुसार तो १५ डिसेंबरला दक्षिण धृवावर पोलहेममध्ये पोहोचला असला, तरीही दक्षिण धृवाजवळ त्याने आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा ओलांडली होती. त्यामुळे स्कॉटच्या कॅलेंडरप्रमाणे अ‍ॅमंडसेन १६ डिसेंबरला दक्षिण धृवावर पोहोचला होता. आपल्या कॅलेंडरची त्याने तशी स्पष्ट नोंद करुन ठेवली होती.

" अ‍ॅमंडसेनचा तंबू उत्तम स्थितीत होता !" स्कॉटने आपलं मत नोंदवलं. " केवळ एकाच बांबूचा त्याला आधार आहे. वर नॉर्वेचा राष्ट्रध्वज फडकतो आहे !"

स्कॉटला नॉर्वेचा राजा ७ वा हकून याच्या नावाने लिहीलेलं अ‍ॅमंडसेनचं पत्रं मिळालं. स्कॉटला लिहीलेल्या चिठीत अ‍ॅमंडसेनने लिहीलं होतं,

" डियर कॅप्टन स्कॉट,

आमच्यानंतर सर्वप्रथम तुम्हीच इथे येऊन पोहोचाल अशी मला खात्री आहे. राजे हकून ७ वे यांच्या नावाने मी ठेवलेलं पत्रं त्यांना पोहोचवण्याची कृपया व्यवस्था करावी ! तंबूत ठेवलेल्या कोणत्याही सामग्रीचा तुम्हांला उपयोग असेल तर अवश्य करावा ! परतीच्या सुखरुप प्रवासासाठी शुभेच्छा !

रोनाल्ड अ‍ॅमंडसेन. "

विल्सनने तंबूतील सामग्रीची नोंद केली.
" अ‍ॅमंडसेनने ब-याच गोष्टी मागे ठेवल्या होत्या. रेनडीयरच्या कातड्यापासून बनवलेल्या स्लीपींग बॅग्ज आणि कपडे, मोजे, सेक्स्टंट, कृत्रीम क्षितीज, हिप्सोमीटर ( मी त्याचा स्पिरीटचा लँप घेतला आहे ) आणि इतर सामन !"

बॉवर्सने त्यातील रेनडीयरच्या कातड्यापासून बनवलेल मोजे उचलले. स्कॉटने आपण तिथे येऊन गेल्याची एका कागदावर नोंद करुन ठेवली.

कॅप्टन रॉबर्ट फॅल्कन स्कॉट
लेफ्टनंट लॉरेन्स ओएट्स
लेफ्टनंट हेनरी रॉबर्टसन बॉवर्स
एडवर्ड विल्सन
एडगर इव्हान्स
- १८ जानेवारी १९१२

सहा मैलांवर स्कॉटने एका बर्फाच्या उंचवट्यावर बांबूच्या आधाराने युनियन जॅक उभारला. बॉवर्सने अनेक फोटो काढले. कॅमे-याचं शटर रिलीज करण्यासाठी दोरीचा वापर करुन त्याने सर्वांचे एकत्रीत फोटो काढण्यात यश मिळवलं !

काही अंतरावर त्यांना अ‍ॅमंडसेनचा आणखीन एक झेंडा आढळला. सोबतच्या चिठीत नोंद होती,
" नॉर्वेजियन पोलहेम ८९'५९'' अंश दक्षिण अक्षवृत्तावर आहे - १५ डिसेंबर १९११, रोनाल्ड अ‍ॅमंडसेन. "

स्कॉटला आढळलेला तो झेंडा अ‍ॅमंडसेनने दक्षिण धृवाच्या चारही दिशांनी रोवलेल्या खुणेच्या झेंड्यांपैकी एक होता.

अ‍ॅमंडसेन महिनाभर आधी दक्षिण धृव गाठून परत फिरल्याची कल्पना आल्यावर स्कॉटची उरलीसुरली आशा धुळीस मिळाली.

ScottPole1
विल्सन, बॉवर्स, इव्हान्स आणि स्कॉट, ऑएट्स ( खाली बसलेले ) - दक्षिण धृव - १८ जानेवारी १९१२

" नॉर्वेजियनांनी अतिशय पध्दतशीरपणे धृवावर मार्कींग केलं आहे !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " माझ्य अंदाजाप्रमाणे समुद्रसपाटीपासून दक्षिण धृव सुमारे ९५०० फूट उंचीवर आहे. नॉर्वेजियन १५ डिसेंबरला इथे पोहोचले असावे आणि १७ तारखेला परतले असावे. २२ डिसेंबर ही दक्षिण धृवावर पोहोचण्याची योग्य तारीख आहे असं मी मागेच लंडनमध्ये जाहीर केलं होतं. अ‍ॅमंडसेन त्यापूर्वीच इथून परतलेला आहे ! त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगलं हवामान मिळालं असावं असा माझा कयास आहे. आम्ही आता इथून परत निघत आहोत !"

ScottPole2
विल्सन, स्कॉट, इव्हान्स, ओएट्स, बॉवर्स - दक्षिण धृव - १८ जानेवरी १९१२

केप इव्हान्सला पोहोचण्यासाठी स्कॉटच्या तुकडीला ८०० मैलांची पायपीट करावी लागणार होती. त्यात ते कितपत यशस्वी होणार होते ?

स्कॉट दक्षिण धृवावर पोहोचला असताना अ‍ॅमंडसेन ८१'३०'' अक्षवृत्त गाठलं होतं. दिवसाला ३५ मैलांच्या वेगाने तो झपाट्याने फ्रामहेमकडे धाव घेत होता. अंटार्क्टीका सोडण्याची आणि दक्षिण धृवावरील विजयाची बातमी सर्वप्रथम जाहीर करण्याची त्याला घाई झाली होती. त्या मानसिक अवस्थेत आपल्या सहका-यांशी क्षुल्लक कारणावरुन त्याचे खटके उडत होते. काही कारणावरुन त्याने हॅन्सनशी अबोला धरला होता !

फ्रामहेम सोडण्यापूर्वी प्रेस्टर्डने दक्षिण धृवावर पोहोचणं महत्वाचं आहे मात्रं अ‍ॅमंडसेन किंवा स्कॉट दोघांपैकी प्रथम कोण पोहोचतं याला फारसं महत्वं नाही असं विधान केलं होतं. खवळलेल्या अ‍ॅमंडसेनने त्याची चांगली हजामत केली होती. हॅसल म्हणतो,

" कोणत्याही परिस्थितीत आपल्या पूर्वी स्कॉट दक्षिण धृवावर पोहोचणं अ‍ॅमंडसेनला सहन झालं नसतं ! त्याच्यासाठी तो प्रतिष्ठेचा प्रश्न होता !"

१९ जानेवारीला स्कॉटने परतीची वाट धरली. अ‍ॅमंडसेनने राजा हकून ७ वा याच्या नावाने लिहीलेलं पत्रं आणि आपल्या नावे लिहीलेली चिठी त्याने बरोबर घेतली होती. ३ दिवसांपूर्वी दिसलेल्या अ‍ॅमंडसेनचा खुणेचा झेंडा त्यांनी ओलांडला.

" नॉर्वेजियनांची ही शेवटची खूण !" काहीशा कडवटपणे स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली.

त्यांच्यापाशी सात दिवस पुरेल इतकी सामग्री होती. वाटेतील कँपमध्ये सामग्रीची तरतूद केलेली होती.
टेडी इव्हान्सला स्नो ब्लाईंडनेसने ग्रासलं होतं. त्यामुळे नॅव्हीगेटरची जबाबदारी लॅशीवर आली होती. बिअर्डमूर ग्लेशीयरवरील मिडल ग्लेशीयर डेपोवरुन ते पुढे निघाले. निघण्यापूर्वी लॅशीने स्कॉटच्या नावाने चिठी लिहून ठेवली. बिअर्डमूर ग्लेशीयरच्या पायथ्याला गेट वे कडे जाणारी वाट त्यांनी पकडली.

परतीच्या मार्गावर स्कॉटच्या तुकडीला हिमवादळाने गाठलं. बिअर्डमूर ग्लेशीयरवरुन दक्षिण धृवाच्या दिशेन उतार असूनही स्लेज ओढणं त्यांना कठीण गेलं होतं. आता चढाच्या वाटेवर ते अधिकच जिकीरीचं होत होतं. बॉवर्सकडे स्कीईंगचं सामान नव्हतं, त्यामुळे पदयात्रा करण्याशिवाय त्याला तरणोपाय नव्हता !

२१ जानेवारीला अ‍ॅमंडसेन ८० अंश दक्षिण अक्षवृत्तावरील आपल्या डेपोमध्ये पोहोचला. त्याला तिथे प्रेस्टर्डने लिहीलेली चिठी मिळाली. प्रेस्टर्ड आणि योहान्सन १३ मार्चला तिथे येऊन फ्रामहेमवर परतले होते. खाद्यपदार्थांचा एवढा साठा तिथे होता, की तो सगळा स्लेजवर लादून परत नेणं त्यांना अशक्यं झालं होतं ! आवश्यक तितकी सामग्री बरोबर घेऊन त्यांनी पुढचा मार्ग पकडला.

स्कॉटने ८९ अंश अक्षवृत्तावरील आपला कँप गाठला !

बिअर्डमूर ग्लेशीयरवरुन खाली उतरत असलेले लॅशी, क्रेन आणि इव्हान्स शेवटच्या उतारावर होते. एक वळण पार केल्यावर दूरवर पसरलेलं रॉस आईस शेल्फ त्यांच्या नजरेस पडलं !

बॅरीयरचं दर्शन होताच क्रेनने जोरदार आरोळी ठोकली. बिअर्डमूर ग्लेशीयर उतरुन ते खाली आले होते. इथून हट पॉईंट ३६० मैलांवर होता ! लॅशी म्हणतो,

" क्रेनने ठोकलेल्या आरोळीने गेट वे जवळ बळी पडलेले घोडेही ताडकन उभे राहतात की काय असं क्षणभर मला वाटून गेलं. बिअर्डमूर ग्लेशीयरवरुन अखेर आम्ही खाली उतरलो होतो !"

टेडी इव्हान्सच्या पायात वेदना जाणवत होती. लॅशीच्या मते ही स्कर्व्हीची सुरवात होती. आपली चिंता त्याने क्रेनपाशी व्यक्त केली. इव्हान्सला पुढे चालणं कठीण जाणार हे उघड होतं.

स्कॉटला एडगर इव्हान्सची काळजी वाटत होती. इव्हान्सच्या बोटांना फ्रॉस्टबाईटची चिन्हं दिसत होती ! त्याला सतत सर्दीचाही त्रास जाणवत होता. त्यालाही कारण नाकाला झालेला फ्रॉस्टबाईटच असावा अशी स्कॉटला शंका येत होती. ऑएट्सच्या पायांत वेदना जाणवत होत्या. विल्सनच्या डोळ्यांनाही त्रास जाणवू लागला होता ! स्कॉट आणि बॉवर्स मात्र अद्यापही सुस्थीतीत होते. हवामान बिघडत चाललं होतं. हिमवादळाला सुरवात झाली होती ! लवकरात लवकर ८७ अंश अक्षवृत्तावरील ३ डिग्री डेपोमध्ये पोहोचण्यासाठी स्कॉटचा आटापिटा चालला होता.

फ्रामहेमच्या मार्गावर असलेल्या अ‍ॅमंडसेनच्या तु़कडीला वाटेत बर्फवृष्टीला तोंड द्यावं लागत होतं. भुसभुशीत बर्फात मध्येच स्लेज रुतत होती. आठ मैल अंतर पार केल्यावर त्यांच्या नजरेला काळ्या रंगाची एक मोठी वस्तू आढळून आली. जवळ जाऊन पाहील्यावर ती आपलीच जुनी स्लेज असल्याचं अ‍ॅमंडसेनच्या ध्यानात आलं.

दक्षिण धृव गाठण्यासाठी ज्या ठिकाणाहून त्यांनी प्रस्थान केलं होतं, त्याच ठिकाणी ते परत येऊन पोहोचले होते !

पहाटे अ‍ॅमंडसेनने फ्रामहेम गाठलं !

स्लेजला बांधलेल्या कुत्र्यांना मोकळं सोडून अजिबात आवाज न करता अ‍ॅमंडसेन, जालांड, विस्टींग, हॅन्सन आणि हॅसलने फ्रामहेमध्ये प्रवेश केला.

" गुड मॉर्नींग लिंडस्ट्रॉम !" अ‍ॅमंडसेन खेळकर आवाजात म्हणाला, " आमच्यासाठी थोडी कॉफी आहे का ?"
" गुड गॉड ! तुम्ही ?" लिंडस्ट्रॉमला आश्चर्याचा धक्का बसला होता !

हाका मारून त्याने सगळ्यांना उठवलं. अ‍ॅमंडसेन आणि इतर सर्वजण परत आलेले पाहून सर्वजण चकीत झाले. ते इतक्या लवकर परत येतील अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.

" तुम्ही धृवावर पोहोचलात ?" कोणीतरी प्रश्न केला.
" हो !" अ‍ॅमंडसेन उत्तरला.

अ‍ॅमंडसेनच्या या उत्तराबरोबर तिथे एकच जल्लोष झाला !

दक्षिण धृव गाठून फ्रामहेमवर परतण्यास अ‍ॅमंडसेनच्या तुकडीला ९९ दिवस लागले होते. मूळ योजनेपेक्षा १० दिवस कमी ! त्याच्याबरोबर गेलेल्या ५२ कुत्र्यांपैकी १२ परत आले होते ! दक्षिण धृव गाठून फ्रामहेमपर्यंतच्या परतीच्या प्रवासात त्यांनी २१५० मैल अंतर पार केलं होतं !

२५ जानेवारी १९१२ - पहाटे ४.०० वाजता रोनाल्ड अ‍ॅमंडसेन फ्रामहेमवर परतला होता !

थॉर्वल्ड निल्सनने उत्तर धृवावर न जाता ऐनवेळी दक्षिण धृवाच्या दिशेने गेल्यामुळे उमटलेल्या कडवट प्रतिक्रियांची अ‍ॅमंडसेनला कल्पना दिली. इंग्लंडमध्ये अ‍ॅमंडसेनवर अतिशय कडवट टीका करण्यात आली होती. ब्रिटीश वृत्तपत्रांनी अ‍ॅमंडसेनने स्कॉटला फसवल्याचा आणि शिष्टाचाराचा भंग केल्याचा सूर लावला होता. नॉर्वेतही अनेक प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नॉर्वेच्या लोकसभेने तर ब्रिटीशांशी वाद टाळण्यासाठी फ्रामला परतीचा हुकूम द्यावा असा बहुमताने ठराव केला होता !

नॉर्वेचा राजा ७ वा हकून याने मात्र अ‍ॅमंडसेनला संपूर्ण पाठींबा जाहीर केला होता ! लोकसभेचा प्रस्ताव त्याने साफ धुडकावला होता. फ्रिट्झॉफ नॅन्सनेही अ‍ॅमंडसेनची पाठराखण केली होती. आपल्यावर थोडीफार टीका होईल हे अ‍ॅमंडसेनने गृहीत धरलं होतं, परंतु नॉर्वेतच इतक्या कडवत प्रतिक्रियांची त्याला अपेक्षा नव्हती. त्याचा भडका उडाला.

" हे लोक मूर्ख आहेत का ?" अ‍ॅमंडसेनने आपल्या डायरीत घुश्श्यात नोंद केली, " दक्षिण धृवावर फक्त स्कॉटचा हक्क आहे अशी यांची समजूत आहे का ?"

राजा हकून बद्दल अ‍ॅमंडसेन लिहीतो,
" दक्षिण धृवाच्या या मोहीमेचं सगळं श्रेय राजेसाहेबांना आहे ! त्यांच्या पाठिंब्याशिवाय ही मोहीम आम्हाला अर्धवट सोडावी लागली असती ! सर्वांनी पाठ फिरवली असताना महाराज आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले. पार्लमेंटचा प्रस्तावही त्यांनी फेटाळून लावला !"

नॅन्सन आणि डॉन पेड्रो क्रिस्तोफर्सनने केलेल्या मदतीबद्दलही त्याने आपल्या डायरीत लिहीलं,
" आमच्यावर चौफेर टीका होत असताना, महाराजांप्रमाणेच या दोघांनीही आम्हाला अमूल्य मदत केली. लोकांच्या मूढपणाविषयी मात्रं काय बोलावं ते समजत नाही !"

फ्रामहेमला पोहोचल्यावरही अ‍ॅमंडसेन समाधानी नव्हता. त्याला आता ऑस्ट्रेलियातील होबार्ट गाठून स्कॉटच्या आधी आपलं यश जाहीर करण्याची घाई झाली होती. फ्रामहेममध्ये ' सेलिब्रेशन डिनर ' आटपल्यावर त्याने लवकरात लवकर तिथून बाहेर पडण्याचा आदेश दिला !

८५ अंश दक्षिण अक्षवृत्तावरुन परत फिरलेले अ‍ॅटकिन्सन, राईट, कोहेन आणि-चेरी गॅराड २६ जानेवारीला हट पॉईंट्ला पोहोचले होते.

स्कॉटची उत्तरेच्या दिशेने आगेकूच सुरू होती. हवामान अद्यापही फारसं अनुकूल नव्हतं. २८ जानेवारीला ते आपल्या डेपो पासून ४३ मैलांवर होते.

रॉस आईस शेल्फवर असलेल्या लॅशी आणि क्रेनने वा-याचा अनुकूल उपयोग करुन घेण्यासाठी स्लेजवर चक्क शीड उभारलं होतं ! मात्रं त्यांच्याबरोबर असलेल्या इव्हान्सचं पोट बिघडल्यामुळे त्यांना वाटेत अनेकवेळा थांबावं लागत होतं !

अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने दोन दिवसांत आपली साधनसामग्री फ्रामवर चढवली होती. दक्षिण धृवापर्यंत जाऊन परतलेल्या १२ कुत्र्यांसह एकून ३९ कुत्रे फ्रामवर होते !

अ‍ॅमंडसेनने फ्रामहेमला शेवटची भेट दिली. लिंडस्ट्रॉमने संपूर्ण फ्रामहेम स्वच्छ केलं होतं. सूर्यप्रकाशात ते चमकत होतं. अ‍ॅमंडसेन म्हणतो,

" फ्रामहेमचा निरोप घेणं मला खूप जड गेलं. भर थंडीत - अंटार्क्टीकावरील थंडीतही आम्हांला उबदार ठेवण्यात फ्रामहेमने कसूर केली नव्हती ! आमच्यानंतर कोणी तिथे आलंच, तर फ्रामहेम व्यवस्थित आणि स्वच्छ असावं अशी आमची इच्छा होती !"

" ज्या कोणाला फ्रामहेम आणि अंटार्क्टीकावरील त्या जागेची मालकी हवी असेल त्याला ती लखलाभ !" जालांड म्हणतो, " फ्रामहेम, आसपासचा बर्फ, आम्ही शिकार केलेले आणि रिचवलेले सील आणि पेंग्वीन आणि दक्षिण धृव यांच्यामुळे आमचं तिथलं वास्तव्यं अपेक्षेपेक्षा सुखदायक झालं होतं !"

२९ जानेवारी १९१२ - व्हेल्सच्या उपसागरावर धुक्याचं आवरण असतानाच फ्रामने होबार्टकडे प्रस्थान केलं !

स्कॉटची तुकडी अद्यापही बिअर्डमूर ग्लेशीयरवरच होती. हवामान आता काहीसं निवळलं होतं, त्यामुळे भराभर मार्ग कापणं त्यांना शक्यं होत होतं. ३१ डिसेंबरला त्यांनी आपला डेपो गाठला. बॉवर्सला हायसं वाटलं. आपली स्कीईंगची सामग्री मिळाल्यामुळे तो भलताच खुश झाला. त्याची ३५० मैलांची पदयात्रा संपुष्टात आली होती !

एडगर इव्हान्सच्या बोटांना झालेल्या फ्रॉस्टबाईटने हळूहळू उग्र स्वरुप धारण करण्यास सुरवात केली होती. त्याच्या उजव्या हाताची दोन नखं मुळापासून निघून बाहेर आली होती ! स्लेजची पुनर्रचना करताना त्याच्या हाताला झालेली जखमही चिघळण्याची लक्षणं दिसत होती ! भरीला विल्सनच्या पायाचा स्नायू दुखावला होता ! तो स्लेजच्या बाजूने अडखळत चालत होता ! ओएट्सचे पायही मधूनच थंडगार पडत होते !

रॉस आईस शेल्फवर लॅशी, क्रेन आणि टेडी इव्हान्सने पुढचा कँप गाठला होता. तिथून निघण्यापूर्वी इंधनाचा एक कॅन लीक होत असल्याचं लॅशीच्या ध्यानात आलं. स्कॉटसाठी ठेवलेल्या संदेशात लॅशीने हे नमूद केलं होतं. आवश्यक सामग्री घेऊन त्यांनी पुढचा मार्ग सुधारला.

स्कॉटने आपल्या तुकडीच्या आहारात आता थोडीशी वाढ केली होती. त्याचा परिणाम ताबडतोब दिसून आला. विल्सनच्या पायाची परिस्थिती बरीच सुधारली. स्वतः स्कॉट मात्रं एका उतारावरुन खाली येताना कोलमडून पडला आणि त्याच्या खांद्याला चांगलाच मार बसला परंतु फार मोठी दुखापत टळली होती. या प्रसंगावरुन धडा घेऊन स्कॉटने स्कीईंगचा आधार घेतला !

रॉस आईस शेल्फवर असलेल्या टेडी इव्हान्सची अवस्था गंभीर झाली होती. त्याला एक पाऊल उचलणंही शक्यं होत नव्हतं. लॅशी आणि क्रेनने स्कीईंगच्या फळ्यांवर त्याचे पाय बांधले आणि त्याला स्लेजबरोबर ओढण्यास सुरवात केली. दोघं त्याला सतत उत्तेजन देत होते, परंतु इव्हान्सला मात्रं आता आपण यातून वाचत नाही अशी शंका येऊ लागली होती ! मात्रं असं असूनही त्याचं दिशादर्शनाचं काम मात्रं अचूकरित्या सुरू होतं !

अपर बिअर्डमूर ग्लेशीयरवरील आपल्या डेपोकडे वाटचाल करत असलेल्या स्कॉटच्या वाटेत अनेक संकटं आडवी येत होती. एकदा स्कॉट आणि इव्हान्स कमरेपर्यंत खोल कपारीत रुतले होते ! पुढे आल्यावर इव्हान्सने पुन्हा एकदा कपारीत गटांगळी खाल्ली ! त्याची अवस्था अगदीच दयनीय झाली होती. हाताच्या बोटांबरोबरच त्याच्या नाकालाही फ्रॉस्टबाईटने ग्रासलं होतं !

५ फेब्रुवारीला टेरा नोव्हा केप इव्हान्सला परतलं ! स्कॉटच्या योजनेनुसार खेचरं आली होती ! सिम्प्सनने आपला पूर्वीचा बेत बदलला आणि अंटार्क्टीका सोडून परतण्याचा निर्णय घेतला. आपलं काम त्याने राईटवर सोपवलं. मेयर्सनेही सिम्प्सनप्रमाणेच परतीचा मार्ग पत्करला.

टेडी इव्हान्सची अवस्था दिवसेदिवस गंभीर होत चालली होती. आधीच दक्षिण धृवावर जाण्याची संधी हुकल्याने तो मनातून खचला होता. त्यातच स्कर्व्हीने ग्रासल्यामुळे आपल्या भवितव्याविषयी त्याला शंका वाटत होती. लॅशी आणि क्रेन त्याला घेऊन शक्य तितक्या घाईत हट पॉईंट गाठण्याच्या प्रयत्नात होते. मात्रं स्कॉटसाठी ठेवलेल्या संदेशात लॅशीने इव्हान्सच्या अवस्थेबद्दल एक शब्दही काढला नव्हता. स्कॉटला काळजीत न टाकण्याचा त्याचा इरादा होता.

स्कॉटची तुकडी आता कपारींनी भरलेल्या प्रदेशात पोहोचली होती ! वाटेत उभ्या राहणा-या कपारींमुळे अनेकदा त्याला आपला मार्ग बदलावा लागत होता. त्यातच वा-याचा जोर हळूहळू वाढत होता. स्कॉट म्हणतो,

" हवामान हळूहळू बिघडत चाललं आहे. आमच्याजवळ आता मोजकेच खाद्यपदार्थ शिल्लक आहेत ! इव्हान्सचं काही खरं वाटत नाही. लवकरच आम्ही अपर बिअर्डमूर ग्लेशीयरवरील डेपो गाठू अशी आशा आहे. गेले अठ्ठेचाळीस दिवस ग्लेशीयरवरील या हवामानाशी आमची झुंज सुरु आहे !"

७ फेब्रुवारीला स्कॉट अपर बिअर्डमूर ग्लेशीयरवरील आपला डेपो गाठला. इथे स्कॉटला टेडी इव्हान्सचा संदेश मिळाला. त्यांचा प्रवास सुखरुप चालू असल्याचं टेडीने कळवलं होतं. अर्थात त्याच्या सद्यस्थितीबद्दल स्कॉटला काहीच कल्पना नव्हती. दुस-या दिवशी स्कॉटने बॉवर्सला माऊंट डार्वीनच्या पायथ्याशी खडकांचे नमुने जमा करण्यासाठी पिटाळलं ! शास्त्रीय संशोधनासाठी हे नमुने जमा करणं आवश्यक होतं असा विल्सनचं ठाम मत होतं !

९ फेब्रुवारीला लॅशी आणि क्रेन टेडी इव्हान्ससह एक टन डेपोमध्ये पोहोचले ! तिथे ताजे खाद्यपदार्थ मिळाल्यावर त्यांना हायसं वाटलं. लॅशीने आपल्या डायरीत नोंद केली,

" एक टन डेपोवर पोहोचल्यावर आम्हांला बरंच सुरक्षीत वाटलं. टेडी इव्हान्सला आता रक्तस्त्राव होतो आहे ! त्याची अवस्था दिवसेदिवस बिघडते आहे. स्लेज ओढण्यासाठी मी आणि क्रेन दोघंच असल्याने आम्हांला जास्त सामान नेणं शक्यं होणार नाही !"

होबार्टच्या वाटेवर असलेल्या फ्रामने अंटार्क्टीक सर्कल ओलांडलं होतं !

आपल्या केबिन मध्ये बसून अ‍ॅमंडसेन होबार्टहून पाठवण्याच्या तारेचा मजकूर लिहून काढण्यात मग्न होता. आपल्या सफरीची सविस्तर हकीकत लिहून काढण्याचं त्याचं कामही सुरु होतं. त्याच्या भावाने वर्तमानपत्राशी करार केला होता ! त्याबरोबरच ऑस्ट्रेलियात लेक्चर टूर करण्याचा दृष्टीनेही त्याची तयारी सुरू होती.

जॅल्मर योहान्सनबद्दल अ‍ॅमंडसेनच्या मनातील राग कधीच गेला नव्हता. फ्रामवर योहान्सनची जवळजवळ वाळीत टाकल्यासारखी अवस्था झाली होती. वास्तवीक योहान्सनच्या प्रसंगावधानामुळे प्रेस्टर्डचा जीव वाचला होता. अ‍ॅमंडसेन आणि इतरांनी त्यांना हिमवादळात सोडून फ्रामहेम गाठलं होतं, परंतु योहान्सनच्या स्पष्टवक्तेपणा अ‍ॅमंडसेनला सहन झाला नव्हता.

आपल्या पत्नीला लिहीलेल्या पत्रात योहान्सनने आपली खंत व्यक्त केली.
" मी दक्षिण धृवावर सहज जाऊ शकलो असतो याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही, परंतु दुर्दैवाने ते माझ्या नशिबात नव्हतं. मला सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही. किंग एडवर्ड ७ लँडवर आम्ही केलेलं शास्त्रीय संशोधनाचं कामही तितकंच महत्वपूर्ण होतं, परंतु लोकांच्या नजरेत दक्षिण धृवावर पोहोचणारेच हिरो ठरणार आहेत यात शंका नाही. अर्थात मला त्याची फारशी पर्वा नाही ! मी स्वतः धृवावर गेलो नसलो, तरी त्यांच्या मोहीमेला माझा हातभार निश्चितच लागला होता !"

अ‍ॅमंडसेनने योहान्सनच्या जा़णीवपूर्वक केलेल्या उपेक्षेला आता कुठे सुरवात झाली होती !

बिअर्डमूर ग्लेशीयरवरुन खालच्या वाटेला लागलेल्या स्कॉटच्या तु़कडीला बर्फातून मार्ग काढणं कठीण जात होतं. अनेकदा खुणेचे मार्कर न आढळल्याने भरकटण्याची पाळी त्यांच्यावर आली. त्यातच आता भुसभुशीत बर्फाचा आणि फसव्या कपारींचा प्रदेश सुरु झाला.

अन्नाचा तुटवडा भासू लागला होता !

" आम्ही वाट चुकून एका वेगळ्याच प्रदेशात पोहोचलो आहोत !" स्कॉट म्हणतो, " कपारींचं इथे जाळं पसरलेलं आहे ! आमच्यापाशी फक्त एका माणसाला एका वेळेस पुरतील इतकेच खाद्यपदार्थ शिल्लक आहेत ! उद्या कोणत्याही परिस्थितीत डेपो गाठणं आम्हाला भाग आहे !"

स्कॉटच्या सुदैवाने दुस-या दिवशी विल्सनला मिडल ग्लेशीयर डेपोचा शोध लागला ! चार दिवस पुरतील इतके खाद्यपदार्थ तिथे होते ! अ‍ॅटकिन्सन आणि टेडी इव्हान्सने तिथे मेसेज ठेवले होते.

आदल्यादिवशीच्या अनुभवाने स्कॉट चांगलाच हादरला होता.
" कालच्यासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही याची आम्हांला काळजी घ्यावी लागेल. असुरक्षिततेची भावना किती भयानक असू शकते याचा पुरेपूर अनुभव काल आम्ही घेतला !"

१३ फेब्रुवारीला अ‍ॅटकिन्सन आणि डिमीट्री यांनी कुत्र्यांच्या दोन तुकड्यांसह केप इव्हान्सहून एक टन डेपोकडे प्रस्थान केलं.
स्कॉटच्या सूचनेनुसार खरंतर अ‍ॅटकिन्सनने १ फेब्रुवारीलाच निघणं आवश्यक होतं, परंतु कुत्र्यांना आवश्यक असलेल्या अन्नाचा एक टन डेपोवर तुटवडा असल्याची त्याला कल्पना होती. त्यामुळे स्कॉटच्या सूचनेनुसार ८२' किंवा ८२'३०'' अंश अक्षवृत्तावर कुत्र्यांसह जाणं त्याला शक्यं होणार नव्हतं ! त्यातस स्वतः स्कॉटने कोणत्याही परिस्थितीत कुत्र्यांबाबत रिस्क घेऊ नको असं अ‍ॅटकिन्सनला बजावलं होतं. टेडी इव्हान्सबरोबर स्कॉटने मेयर्सला पाठवलेला निरोप अद्याप केप इव्हान्सपर्यंत पोहोचला नव्हता !

टेडी इव्हान्सला आता एक पाऊलही चालणं अशक्यं झालेलं होतं !

ही परिस्थिती उद्भवणार याची लॅशी आणि क्रेनला आधीच कल्पना आलेली होती. इव्हान्स दिवसेदिवस अशक्त होत चालला होता. आपण यातून वाचत नाही याची पक्की खात्री त्याला झाली होती.

" मला इथेच सोडा !" टेडीने लॅशीला हुकूम सोडला ! " तुम्ही दोघे पुढे जा !"

टेडी इव्हान्स लेफ्टनंट होता. लॅशीचा तो वरिष्ठ अधिकारी होता, परंतु लॅशीने त्याचा हुकूम धुडकावून लावला.

" आम्ही त्याला तिथे सोडणं शक्यंच नव्हतं !" लॅशी म्हणतो, " त्याला तिथे सोडणं म्हणजे सरळ-सरळ मृत्यूमुखात ढकलणं होतं ! ते निव्वळ अशक्यं होतं !"

लॅशी आणि क्रेनने एक विलक्षण धाडसी निर्णय घेतला.

आपल्या स्लेजवर अत्यावश्यक असलेल्या स्लीपींग बॅग, अन्न शिजवण्यासाठीचा कुकर, खाद्यपदार्थ इतक्याच गोष्टी ठेवून इतर सर्व सामान त्यांनी आपल्या कँपवर ठेवलं. टेडी इव्हान्सची उचलबांगडी करून त्याला स्लेजवर चढवलं आणि स्लेजवरुन कलंडून पडू नये म्हणून त्याला दोरीने घट्ट बांधून टाकलं ! हे काम आटपल्यावर स्लेज ओढत त्यांनी पुढची वाट पकडली !

रॉस आईस शेल्फच्या दिशेने उतरत असलेल्या स्कॉटच्या तुकडीला अन्नपदार्थांचा तुटवडा भासू लागला होता. साधनसामग्रीचा पुढचा डेपो अद्याप ३० मैलांवर होता. त्यांच्याजवळ केवळ तीन दिवस पुरतील इतकेच खाद्यपदार्थ होते !

" आमच्यापैकी कोणीही ठणठणीत राहीलेला नाही !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " सर्वात वाईट अवस्था आहे ती इव्हान्सची. त्याच्या बोटांबरोबरच नाकाला आणि आता पायालाही फ्रॉस्टबाईटन झाला आहे ! तो लवकरच सुधारेल अशी आशा आहे. विल्सन आणि ओएट्सच्याही पायांच्या तक्रारी सुरू आहेत. आमच्या जवळ पुरेसं अन्नही नाही !"

" इव्हान्सची अवस्था अतिशय गंभीर आहे !" ओएट्सने नोंद घेतली, " केप इव्हान्स अद्याप ४०० मैल दूर आहे. तिथपर्यंत तो कसा पोहोचणार हा प्रश्नच आहे. तो बर्फात जवळपास कोसळलाच होता !"

१७ फेब्रुवारीला सकाळी इव्हान्स बराच सुधारलेला दिसत होता. हा रात्रीच्या गाढ झोपेचा परिणाम असावा असं बॉवर्सला वाटलं. अर्धा तास इतरांच्या जोडीने वाटचाल केल्यावर तो मागे पडू लागला. बर्फात रुतलेली स्लेज ओढत मार्ग काढणं अतिशय कठीण होत चाललं होतं. तासभराच्या वाटचालीनंतर सर्वजण इव्हान्ससाठी थांबले होते. काही वेळाने तो त्यांना येऊन मिळाला. त्याचा बूट निघाल्यामुळे तो मागे पडला होता.

जेमतेम तासाभराच्या वाटचालीनंतर इव्हान्स पुन्हा मागे पडला. यावेळी त्याने बॉवर्सकडून दोर मागून घेतला होता. स्कॉटने त्याला लवकरात लवकर येण्याची सूचना केली आणि ते पुढे निघाले.

काही अंतरावर त्यांनी मागे वळून पाहीलं असता इव्हान्स अद्यापही बराच मागे रेंगाळत असल्याचं त्यांच्या नजरेस पडताच दुपारच्या जेवणासाठी थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मात्रं चहा आणि जेवण आटपलं तरीही इव्हान्स आला नव्हता. अद्यापही तो बराच मागे रेंगाळत होता !

स्कॉटच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली. शक्य तितक्या त्वरेने ते सर्वजण त्याच्यापाशी पोहोचले. मात्रं त्याचा अवतार पाहून त्यांना जबरदस्त हादरा बसला होता.

इव्हान्स गुडघ्यांवर बर्फात कोसळला होता. त्याचे कपडे अस्ताव्यस्त झालेले होते. फ्रॉस्टबाईटमुळे हात काळे-नि़ळे पडले होते. नजरेत साफ अनोळखी भाव होते. तो बहुधा बेशुध्द झाला असावा अशी स्कॉटला शंका आली.

बॉवर्स आणि ओएट्सच्या आधाराने इव्हान्स उठून उभा राहीला खरा, पण जेमतेम दोन पावलं जाताच तो बर्फात कोसळला. ओएट्सला त्याच्यापाशी ठेवून स्कॉट, विल्सन आणि बॉवर्स स्लेज आणण्यास धावले, परंतु स्लेज घेऊन परत येईपर्यंत इव्हान्स बेशुध्द झाला होता. स्लेजवर घालून त्याला तंबूत आणेपर्यंत तो कोमात गेला !

मध्यरात्री साडेबारा वाजता एडगर इव्हान्सने अखेरचा श्वास घेतला.

पहिली आहुती पडली !

इव्हान्सचा मृत्यू सर्वांनाच हादरवणारा होता.
" आम्ही सुन्न झालो आहोत !" स्कॉट म्हणतो, " बहुतेक आम्ही दक्षिण धृवावर पोहोचण्यापूर्वीच तो अशक्तं झाला असावा. फ्रॉस्टबाईट झाल्यावर तर तो मानसिकरित्या अतिशय खचला होता. त्याचा आत्मविश्वास गमावला होता. आपला एक सहकारी गमावणं हे किती क्लेशदायक असतं ! विल्सनच्या मते तो बर्फात कोसळला तेव्हा त्याच्या मेंदूला दुखापत झाली असावी. मात्रं तटस्थपणे विचार केला तर त्याच्यासह परतणं आम्हाला शक्यंच नव्हतं !"

EdgarEvans
एडगर इव्हान्स

इव्हान्सच्या मृत्यूनंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी पुढचा मार्ग अनुसरला. इव्हान्स गेला होता, परंतु इतरांना पुढे जाणं आवश्यक होतं !

क्रमश :

९० डिग्री साऊथ - १०

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

13 May 2014 - 1:43 pm | कवितानागेश

हम्म..