असे का होते मला..??
लिहु की नको . असा बराच वेळ विचार केला. पण शेवटी मनात आले की कोणी हसले तर हसू देत पण ह्या प्रॉब्लेम वर काहीतरी उपाय काढलाच पाहिजे म्हणून लिहायला घेतले.
तर या प्रॉब्लेम ची सुरवात झाली गेल्या काही 8-10 महिने किंवा गेल्या वर्षभरापासून पाहीले तर मला स्वतः मध्ये काहीतरी बदल जाणवतोय.. तो म्हणजे कोणत्याही अनामिक गोष्टी बद्दल भीती वाटत राहणे आणि सतत निगेटीव विचार येत राहणे.
अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर आजचीच गोष्ट. माझे मोबाइल चे सिम कार्ड हरवले. त्यामुळे मी नवीन सिम कार्ड घेतले त्याच नंबर चे. पण आता मनात गोंधळ चालू आहे की कदाचित जे हरवलेले सिम आहे ते पण चालू अससेल तर..??? समजा मला आत्ता एखादा कॉल आला तर माझे बोलणे जुने सिम कार्ड सापडले असणार्या व्यक्तीला पण ऐकू गेले तर...????
मला हे माहीत आहे की असे काही होणे कदापि शक्य नाहीए. पण तरीही माझे डोके सतत हाच विचार करत राहिलेय.
सतत आजारी आहे असे वाटत राहिल्याची भावना.. किंवा आर्धा किलो वजन जरी कमी झाले तरी चिंता. किंवा सतत आपणाला काही मोठा आजार झाला आहे किंवा होईल जसे की कॅन्सर..
ऑफीस मध्ये देखील अश्या बर्याच गोष्टी आहेत की मला सतत निगेटीव विचार येत राहतात.. की काहीतरी कारणामुळे मला प्रमोशन मिळणार नाही, किंवा नोकरी जाण्याची भीती....
तीच गोष्ट घरातील माणसांबद्दल. सतत घरी काहीतरी वाईट होईल असे विचार (जसे की कोणाचा तरी आपघात , आग किंवा आकस्मीत मृत्यु)
सकाळी ऑफीस साठी घरातून बाहेर पडले की लगेच टेन्शन.. आपण गॅस, लाइट, गिझर ची बटने बंद केली की नाही.... आता हे सगळे काम मी करूनच घरातून बाहेर पडलेलो असतो. पण तरीही सारखी भीती वाटत राहते.
आणि हे सगळे एवढ्यावर थांबत नाही तर असे काहीतरी वाईट झाले तर आपले काय होईल किंवा त्यावेळी आपली स्थिती काय आसेल हे जणू काही डोळ्यासमोर दिसू लागते....
असे हे भीती चे आणि नकारात्मक विचार नेहमीच येतात असे नाही. पण याचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहेत. कळत नाही हे विचार मनातून कसे घालववेत.? मुक्त आणि स्वछन्दि लाइफ कसे जगावे काहीच कळत नाहीए.....
प्रतिक्रिया
9 May 2014 - 12:23 am | तुमचा अभिषेक
मला नेहमी स्वताहूनच काहीतरी घाणेरडे, वाईट, अपघात, घातपात, मृत्यु वगैरे घडलेय असे इमॅजिन करून पुढे काय काय संकटे येतील आपल्यावर वा आपली काय हालत होईल असे स्वप्नरंजन करायची सवय आहे.
उदाहरण द्यायचे झाल्यास, ट्रेनने पूलावरून जाताना हि ट्रेन खाडीत कोसळली तर, मला पोहताही येत नाही, काय हालत होईल माझी... बिछान्यावर झोपले असताना वाटते की वरचा पंखा गरगरत माझ्या अंगावर कोसळला तर, पायाला किती जोराचा फटका बसेल, वा भूकंप होऊन बिल्डींगच पत्त्याप्रमाणे कोसळली तर, मी कायमचा अधू झालो तर मी उर्वरीत आयुष्य कसा जगेन, मला नोकरीधंद्यासाठी काय किती कष्ट घ्यावे लागतील, जर का मी उद्या अचानक आंधळा झालो तर ते आयुष्य मला जमेल का, घरात सशस्त्र दरोडेखोर घुसले आणि त्यांचा सामना मला करायची वेळ आली तर वगैरे वगैरे बरेच काही आणि सतत हे असले विचार चालूच असतात..
वरवर पाहता हे तुमच्यासारखेच आहे असे वाटेल, मात्र मी या कल्पना करताना त्यात छानपैकी गुंततो, ना मला कसले टेंशन येत ना छातीतील धडधड वाढते. जसे एके काळी आवडणार्या मुलीला गुंफुन मनातल्या मनात एखादी कथा रचली जायची तसे अगदी सहज घडते. विचारमालिका खंडीत झाल्यावर मात्र तेवढे वाटते, शी काय हे आपण अभद्र विचार करत होतो..
पण ठिक आहे, मला तरी हा काही आजार नाहीये, विचार चांगले संतुलितच करतो मी. बायकोच्या मते प्रचंड समजूतदार व्यक्तीमत्व.
9 May 2014 - 2:40 pm | आत्मशून्य
स्वप्नाळु.
10 May 2014 - 1:45 am | तुमचा अभिषेक
हो खरेच स्वप्नाळू, (किंवा आपल्याच तंद्रीत असणारा म्हणू शकता.)
म्हणजे ध्येय अचीव करायची महत्वाकांक्षी स्वप्ने नाहीत, तर ही अशी वेळ चांगला वाईट घालवणारी..
एका वयात, म्हणजे अगदी कालपरवापर्यंत लग्न व्हायच्या आधीपर्यंत जी कोणी मुलगी आवडत असायची तिच्या विचारांत रात्र रात्र मजेत जागवायचो, किंबहुना त्याच साठी म्हणून मी सतत कोणत्या ना कोणत्या मुलीच्या प्रेमात पडलेलोच असायचो.
घरी मात्र रोज खूप शिव्या खाव्या लागतात या तंद्री लागण्यामुळे. कारण ती २४ गुणिले ७ लागलेलीच असते. आजवर मी एकदाही मला मारलेल्या हाकेला पहिल्याच प्रयत्नात ओ दिला नाही. एखादा प्रश्न मला चारवेळा विचारून झाल्यावर पाचव्यांदा समोरून कोणी ओरडून विचारतो तेव्हाच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो. मला बहिरा म्हणतात घरी. आमचे आडनाव नाईक म्हणून मामाकडचे बहिर्जी नाईक चिडवतात. बायको सुद्धा त्रागा करते, कधी हसते तर कधी हताश होऊन हात टेकते.. पण मी माझ्या तंद्रीतच असतो. तिला मी यावर एक उपाय सांगितला आहे, काहीही मला सांगायच्या आधी मला हाक मारून माझे लक्ष वेधून घे, मी तुझे ऐकतोय हे कन्फर्म कर आणि मग काय ते सांगायला घे, म्हणजे रिपीट करायचा त्रास कमी होईल. अर्थात हे कसे नेहमीच शक्य होणार. पण बस्स चाललाय संसाराचा गाडा, आणि या एकाच सवयीपोटी `मीच ती म्हणून तुला झेलतेय' हे दिवसभरातून सतर्यांदा ऐकावे लागतेय. :(
10 May 2014 - 11:30 pm | आत्मशून्य
ही मुलींची तंद्री फार मस्त असते नाही ? भयानक टाइमपास होतो. पण पोरगी पटल्यावर मात्र बरेचदा आपल्या रोम्यांटीसीजमच्या पातळीवर ती पोचु शकली नाही तर मात्र प्रचंड मुड ऑफ होतो... :(
11 May 2014 - 1:43 am | तुमचा अभिषेक
खरेच भयानक टाईमपास होतो. तसेही हल्ली टाईमपास म्हणत मोबाईलचे अॅडिक्शन लागलेल्या लोकांपेक्षा हे लाख गुणा बेटर. बाकी मूड ऑफ म्हणाल तर ज्या मुलींच्या मी खरोखरच प्रेमात असायचो त्या कधीच पटल्या नाहीत हे दुर्दैव. आणि माझा प्रेमविवाह झाला ते कोणीतरी मला पटवल्याने ;)
बाकी खात्रीने म्हणालात म्हणजे आपलेही अनुभव आहेत तर याबाबत :)
11 May 2014 - 2:15 am | आत्मशून्य
अर्थातच. अन्यथा मूड ऑफ होत होत अरेंज मेरेजच झाले असते ;)
काय करु सन्मुन सैन दोन्ही कर्क :)
9 May 2014 - 9:10 pm | जातवेद
हि कन्या राशिची लक्षणे असतात असे म्हणतात *smile*
10 May 2014 - 1:46 am | तुमचा अभिषेक
पण माझी कर्क आहे, आणि हि राशी देखील स्वभावगुणानुसार बरीच सूट होते मला ..
10 May 2014 - 11:23 pm | आत्मशून्य
आपली रास कर्क व नक्षत्र पुष्य वाटते. स्वप्नाळुपणा व स्वतःच्या धुंदीत जगणे. कुटुंबावर अतिशय प्रेम असणे, भावनाप्रधान, हुशार, कलासक्त, विश्वासु (जो पर्यंत ठेच लागत नाही) वगैरे वगैरे वगैरे...!
11 May 2014 - 1:39 am | तुमचा अभिषेक
हो, सारेच वगैरे वगैरे अगदी खरे
पेपरातली रास कधी आजवर वाचली ना मानली, मात्र कर्क राशीच्या लोकांचे जे स्वभावगुण आहेत ते चांगलेच जुळतात माझ्याशी. तसेच हि कर्क रास मुलांपेक्षा मुलींना जास्त शोभते असेही ऐकलेय लहानपणी. असो, विषय राशींचा नसल्याने फारसा विषयांतर नको..
9 May 2014 - 9:26 am | पैसा
हे लिखाण खरेच गंभीरपणे लिहिलंय का तुम्ही? "सल्ला" मधे लिहिलंय म्हणून एकदम कसंतरीच झालं. जर खरंच असा काही प्रॉब्लेम असेल तर हे काही कारणाने आलेले नैराश्य (डिप्रेशन) किंवा इतर काही मानसिक आजार असू शकेल. ताबडतोब एखाद्या कौन्सेलर किंवा सायकिअॅट्रिस्टला भेटा. मनाचा आजार ही काही काही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही. डॉक्टरचा सल्ला/औषधोपचार घ्या. लवकर बरे वाटेल. तुम्हाला मनापासून शुभेच्छा!
9 May 2014 - 5:38 pm | बाप्पू
हो ज्योती ताई. एकदम गंभीरपणे हे लिखाण केले आहे मी.
हे काही नेहमीच होते असे नाही. पण मी जेव्हा जेव्हा कामातून फ्री आसतो तेव्हा येणारे विचार हे नेहमी नेगटीव च असतात.
जेव्हा मी एखाद्या कामात गुंतलेलो असतो तेव्हा हे विचार फार कमी होतात किंवा निघून देखील जातात.
सायकिअॅट्रिस्टला भेटलो होतो एका. पण तो बहुतेक नवशिका असावा. किंवा असेच कोणता तरी क्रॅश कोर्स केलेला असावा. कारण काहीच फरक नाही पडला.
आपल्याला जर एखादे चांगले डॉक्टर माहीत असतील तर सांगा.
तुमच्या प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद.
9 May 2014 - 6:28 pm | पैसा
तुम्ही कुठे रहाता ते सांगितलंत तर लोक माहिती देतील. मला मुंबई-पुण्याच्या डॉक्टर्सची माहिती नाही. पण हल्लीच आलेल्या शुचीच्या धाग्यावर काहीजणांनी मुंबई पुण्यातील काही सायकिअॅट्रिस्टची नावे दिली होती.
9 May 2014 - 9:37 pm | बाप्पू
आम्ही पुणेकर आहोत हो ज्योती ताई.
11 May 2014 - 2:02 am | विजुभाऊ
बाप्पू याचा अर्थ तुम्ही खरे पुणेकर नाही आहात. कशाचा तरी जाज्वल्य अभिमान वाळगा आपोआप जमेल मग सगळे.
( किमानपक्षी तुमच्या घराजवळच्या चौकात सकाळी डबे घेऊन उभे असणार्या पोहेवाल्याचा तरी अभिमान बाळगा ).
10 May 2014 - 1:11 am | रेवती
अरेवा! तुम्ही आमच्यासारखेच दिसता. फरक पडला तो तुम्हाला नसून त्या सायकियाट्रिस्टला! मी पोहायला शिकाण्यासाठी गेले पण मला येणं राहू देत, इंस्ट्रक्टर पोहणे विसरला अशी वदंता होती.
गंभीर लिखाण नका हो करत जाऊ.
9 May 2014 - 10:18 am | प्रमोद देर्देकर
ऑ हा प्रश्न तुम्हाला कसा काय पडला बुवा. कारण तुमचा पहिल्या धाग्यात तुम्ही जो संभाजी राजे यांच्यावर ऊहापोह केला आहे त्याने तुमचे वाचन आवड दांडगी आहे हे दर्शवते. असो
सर्व प्रथम त्या कोषातुन बाहेर येण्यासाठी चांगली पुस्तके वाचा. मनात विचार यायला लागला की मन या पुस्तकांच्या वाचनात की किंवा गाणी ऐकणे, यांत गुंतवुन ठेवा.
पुस्तकांच्या यादीसाठी मि.पावर आशु जोग यांचा धागा आहे किंवा मिपाचे जुने लेख/धागे वाचायला सुरवात करा.
आणि आता तुम्हाला सल्ला हवाच असेल तर मि.पावर मा. माहितगार, मा. कंजुस, मा. मुक्त विहारी, या मा. गवि साहेब आणि बरेच जण आहेत यांना व्यनि करा. जे तुम्हाला नक्किच मार्गदर्शन करतील.
तुम्हाला पुढिल आयुष्यासाठी शुभेच्छा! *good*
धन्स
9 May 2014 - 5:40 pm | बाप्पू
हो आजकाल वाचन काढावले आहे. तसेच आंतरजालवर देखील काही ना काही सकारात्मक वाचत आसतो.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
9 May 2014 - 11:00 am | मदनबाण
ताण/तणाव हे आता कॉमन प्रॉब्लेम झाले आहेत... त्यामुळे त्यापासुन घाबरुन जाण्यात कोणताच फायदा होत नाही, तोटा मात्र नक्कीच होउ शकतो.त्यामुळे मनावर आणि शरीरावर परिणाम होउ शकतो/ होते. मग काय करावे ? आपल्या पेक्षा हालाखीचे आयुष्य जगणार्यांकडे पहावे,त्यांच्या आयुष्याकडे पहावे... मग स्वतःलाच विचारावे की यांच्या पेक्षा मी नक्कीच जास्त सुखी नाही का ? कोणाला अपंगत्व असते कोणाला जगायला आधार नसतो तरी सुद्धा ते सरव्हाइव्ह करत नसतात का ? करतात ना ? मग आपण धडधाकट असताना येणार्या परिस्थीतीशी का लढु नये ?समोर येणार्या प्रत्येक परिस्थीला मी सामोरे जाइन... लढीन मग भलेही परिणाम काही असो !
मनात टोकाचे निगेटिव्ह येउ शकतात हे मान्य, पण जर निगेटिव्ह विचार येउ शकतात तर मग पॉसिटिव्ह विचार का येउ शकत नाही ? हा प्रश्न सुद्धा आपण आपल्यालाच विचारावा.तुमच्या आयुष्यातल्या मागच्या भागाचा थोडा विचार करा आणि पहा की त्या परिस्थीती पेक्षा आता तुम्ही आहात त्या परिस्थीत फरक पडला आहे ना ? मग येणार्या काळात सुद्धा परिस्थीतीत बदल घडेलच. स्वतःवर विश्वास ठेवा, आणि स्वतःला कधीही इतरांपेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न सुद्धा करु नका.
The whole secret of existence is to have no fear. Never fear what will become of you, depend on no one. Only the moment you reject all help are you freed.
Swami Vivekananda
9 May 2014 - 5:44 pm | बाप्पू
खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती आहे. तुम्ही सांगितलेले विचार नक्कीच आचरणात आनेल.
9 May 2014 - 12:23 pm | संजय क्षीरसागर
मनाची विक्षिप्तता तीन प्रकारे आपल्यावर ताबा मिळवू शकते. भीती, श्वासाचा कोंडमारा आणि वर्तमानाशी नातं तोडणं.
एकदा मनाची ही कार्यप्रणाली समजली की पुढे सगळं सोपं आहे.
१) मन सक्रीय होण्यासाठी श्वासाची आवश्यकता आहे. एकदा आपलं श्वासावर नियंत्रण आलं की मन ताब्यात येतं. ज्या क्षणी नेगटीव विचार सुरु होतील त्या क्षणी जाणीवपूर्वक उत्छ्वास बाहेर सोडा. जितका जाणीवपूर्वक श्वास तुम्ही बाहेर सोडाल तितक्याच वेगानं श्वास पुन्हा आत येईल, तो एकाग्रतेनं भरुन घ्या. त्या एनर्जीनं पुन्हा उत्छ्वास बाहेर सोडा म्हणजे जोमदार श्वास आत येईल. मूळ अवधान श्वास जाणीवपूर्वक बाहेर सोडण्यावर ठेवा म्हणजे संपूर्ण श्वास-प्रश्वासावर तुमचं नियंत्रण येईल. ही क्रिया कुठेही आणि केव्हाही करता येईल. जमेल तोपर्यंत ही क्रिया चालू ठेवा.
एकदा सराव झाला की नेगटीव विचार सुरु होता क्षणी, तुमची जाणीवपूर्वक श्वासाची क्रिया चालू होईल आणि नेगटिवीटी तुम्हाला घेरू शकणार नाही.
नित्यनियम म्हणून, सकाळी जाग आल्यावर ही प्रक्रिया सुरु करा आणि रात्री निजण्यापूर्वी पुन्हा एकदा लक्षात ठेवून श्वास-प्रश्वास करा. सकाळी नेगटीविटी तुमचा ताबा घेऊ शकणार नाही आणि रात्री शांत झोप लागेल.
उत्छ्वास जाणीवपूर्वक बाहेर सोडणं हे क्रियेचं गमक आहे. बाकी सगळं आपोआप होईल.
२) अशा प्रकारे श्वास मोकळा झाला की मन तुम्हाला कॉर्नर करु शकणार नाही (तुमचा कोंडमारा होऊ शकणार नाही). यामुळे हळूहळू तुमची भीती दूर होईल. तुमच्या लक्षात येईल की मनाची पॉवर केवळ नेगटीव विचार निर्माण करुन भय निर्माण करण्यात आहे. श्वास कोंडला की भीती वाटायला सुरुवात होते आणि भयानं अधिकाधिक भेदक विचार सुरु होतात. एकदा श्वास ताब्यात आला की भय टेकोव्हर करु शकत नाही.
३) वरच्या दोन्ही गोष्टी साधल्या की एक नवीन उलगडा, तुम्हाला आपसूक होईल. आपण वर्तमानात आहोत!
हे वर्तमानात असणं; वर्तमानाशी संलग्न असणं, परम स्वास्थ आहे. मनाचं अस्वास्थ्य म्हणजे आपण वर्तमानापासून अलग होणं.
मग एखाद्या निवांत क्षणी तुम्हाला जे. कृष्णमूर्तींच्या या अद्भूत वक्तव्याचा अर्थ उलगडेल :
Present is the ultimate security! वर्तमान ही परम सुरक्षितता आहे.
सध्या या वाक्यावर विचार करु नका. ती शेवटची स्टेप आहे. ते विधान वैचारिक उहापोह करायची गोष्ट नाही, अनुभवाची गोष्ट आहे.
जस्ट वेट अँड फॉलो द प्रसिजर आय हॅव टोल्ड, रिझल्ट विल फॉलो.
9 May 2014 - 5:46 pm | बाप्पू
खूप खूप धन्यवाद. नक्कीच प्रयत्न करेल.
9 May 2014 - 2:37 pm | आत्मशून्य
माझ्याकडे ऑथोरिटी नाही म्हणुन म्हणुन क्याटेगोराइज करणार नाही पण आत्मसन्मानाचा आभाव आणि अनेक अपुर्या इच्छा (and counting) याच्या मिश्रणातुन हे रसायन निर्माण झाले आहे.
जे मांडले आहे तेव्हडाच त्रास असेल तर सकृत दर्शनी विशीष्ट औषधानी त्वरित गुण येइल. साय्केट्रिक्ट गाठावा. अतिशय निर्व्यसनी व्यक्ति समोर हे छोटे छोटे त्रास विक्राळ स्वरूपात उभे राहतात. ते कारण असेल तरी व्यसनी व्हा असे सुचवणार नाही.
जमल्यास 10 + दिवसाचा विपश्यना कोर्स अवश्य व मनापासून करा 1000000% सुधारणा होइल.
10 May 2014 - 1:50 am | तुमचा अभिषेक
जमल्यास 10 + दिवसाचा विपश्यना कोर्स अवश्य व मनापासून करा 1000000% सुधारणा होइल.
जेवढे मी याबद्दल ऐकून आहे मलाही वाटते की या केस मध्ये नक्कीच विपश्यना काम करून जाईल. कारण यातील मनापासून करणे हि अट तुमच्याकडून आपसूकच पाळली जाईल.
करा आणि (किंवा केलाच तर) आपला अनुभव देखील इथे लिहा. :)
9 May 2014 - 6:08 pm | शिद
आमचे ह्या बाबतीत अगदी उलटे आहे... *smile*
साहेब, बायको-पोरांबरोबर (अर्थात लग्न झाले असेल तर...) किंवा मित्र / मैत्रिणींबरोबर बाहेर फेरफटका मारायला जात जा. मस्त खा, प्या आणि मज्जा करा. *dance4*
उगाच विचार करत बसलं की मुंग्याच्या वारुळातुन जसं एक-एक करुन मुंग्याची रांग बाहेर पडते तसं मनात भलतेसलते निगेटिव विचारांची रांग लागते आणि मग डोके भंजाळते. *crazy*
9 May 2014 - 7:00 pm | arunjoshi123
बहुतेक हंबल सुरुवात होऊन नंतर माणसाला सगळे काही मिळाले कि असे विचार येतात. अशा मनांच्या मोकांना संपत्ती असून चिंता न करता आयुष्यभर आरामात राहायची सवय नसते म्हणून.
9 May 2014 - 9:36 pm | बाप्पू
म्हणजे काय..?? नक्की कशी सुरवात...???
10 May 2014 - 12:54 am | जेनी...
मनोविकार तज्ञ गाठा .. त्याला हे सगळे सांगा .. तो अऊशध देइल मग तुम्ही बरे व्हाल .
बरे होण्यासाठी अऊशध खा . पण मनोविकार तज्ञ छान दिलासा देतात ..
बस्स पण एकदम विश्वास बसुन जातो त्यांच्यावर ...
इथले सगळे सल्ले वाचा .. आचरणात आणा पण डॉक्टरकडे जाणे टाळु नका ... वेळीच दाखवलात तर ठीक
11 May 2014 - 12:09 am | मुक्त विहारि
आपण मिपावर ज्या क्षणी आलात त्या क्षणापासून, तुमचा आजार तुम्हाला सोडायला लागेल.
आयला, हे मिपा नावाचे भूत फार शक्तीमान आहे.
जमल्यास, भटकंती वाचा,,,
पा.क्रु. वाचा. फावल्या वेळात, एखादा पदार्थ करून बघण्यासारखा उपाय नाही.बिघडला तर बिघडला.निदान तुमचे मन तर गुंतून राहील.
एक साधा आणि सोपा उपाय देतो.
तुम्हाला जी गोष्ट मनापासून आवडते, ती जवळ ठेवा. (ईथे गोष्ट म्हणालो आहे. व्यसने नाही...नाहीतर तुम्ही सिगरेट्,तंबाखू आणि दारु जवळ ठेवाल अन उगाच आम्हाला शिव्या द्याल.)
संगीत ऐका.बाथरूम मध्ये गा. (आय अॅम अ बाथरूम सिंगर.मला मनापासून गायला आवडते.ऐकणार्याने कान बंद करावेत.)ऑफीस मध्ये असाल तर, फावल्या वेळात मित्रांबरोबर चेष्टा-मस्करी करा.२/४ मिनीटे मित्रांबरोबर बोलल्याने, बॉस बोंबलत नाही.
आणि सगळ्यात महत्वाचे सुट्टीच्या दिवशी मस्त मैफील जमवा.
तुमच्या सुदैवाने, तुम्ही पुण्याला राहता, वल्लींना गाठा (वल्लींचे नांव , त्यांना न विचारता घेत आहे, वल्ली साहेब सॉरी.) त्यांच्या बरोबर एखादी पिकनिक करा.अत्रुप्त आत्म्यांच्या बरोबर रविवारी पुण्यातला जुना बाजार बघा.
पुण्यात लई भारी भारी मिपाकर आहेत.त्यांची गाठभेट घ्या.
एक आपला असा मस्त कंपू जमवा.अन करा कट्टा.
(बाद्वे, आमचा यानबूवली तला कट्टा काल सुखरूप पार पडला.व्रुत्तांत लवकरच.)
11 May 2014 - 12:33 am | आत्मशून्य
दुर्दैवाने हे असे घडूनही मनोदशेत फार फरक पडत नसतो.
असो, हे वैयक्तीक मत आहे. वस्तुस्थितीदायक निरीक्षणांती नोंदवले आहे. फार काही यावर बोलण्यासारखे नाही.
11 May 2014 - 12:47 am | मुक्त विहारि
व्यक्ती तितक्या प्रक्रुती....
आम्हाला माणसे प्रिय आणि संगीत त्यातूनही प्रिय...शिवाय वेळ मिळालाच तर खायला करायाला आणि खिलवायला पण आमची ना नसते.फावला वेळ कुणी कसा सत्कारणी लावायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्र्न.
आणि मुळात त्यांनी हीच गोष्ट सांगीतली, की फावल्या वळात त्यांना त्रास होतो.म्हणूनच मी फावल्या वेळा संबंधी लिहीले... आणि तसेही कुणीतरी म्हटले आहेच....
"मन करा रे प्रसन्न, सर्व चित्तीचे साधन."
आम्ही , आम्हाला जे योग्य वाटले ते लिहीले.चुकीचे असेल ही,,,, पण वाईट नक्कीच नाही.
11 May 2014 - 12:49 am | आत्मशून्य
असो. प्रत्येकाचे जग त्याच्या बुध्दीप्रमाणे.
11 May 2014 - 12:51 am | मुक्त विहारि
+१
11 May 2014 - 12:54 am | आत्मशून्य
चांगले वाइट हा विचार करणे त्यांना नक्किच अभिप्रेत नाही. उपयोगी आहे काय ? ते महत्वाचे आहे त्यांना. आणी इथे एका मिपाकराचे असे मी उदाहरण बघीतले असल्याने मी आपला सल्ल्या धुडकावायचा सल्ला दिलाय. कोण मिपाकर हे जाणून घ्ययचे असेल तर व्यनी सुवीधा आहे.
11 May 2014 - 1:08 am | मुक्त विहारि
मग कुठला सल्ला मानावा आणि कुठला नाही,
हे त्यांचे त्यांनाच ठरवू द्या की.
आपण कशाला रक्त आटवायचे?
बर्याच लोकांनी बरेच सल्ले दिले आहेत.मला जे योग्य वाटले ते मी दिले.
आणि तसेही,
मिपा मुळे आयुष्य उध्वस्त झालेला मनुष्य माझ्या पाहण्यात नाही.(किंबहूना माझ्या आखातातील रटाळ दिवसांत मिपा हेच माझे ओअॅसिस आहे.मला जसा मिपाचा फायदा झाला आणि होत आहे, तसाच त्यांना पण होवू शकतो.) संगीतामुळे किंवा भटकंती मुळे किंवा पाककले मुळे पण असे होत नाही.
मन प्रसन्न करणारे, कुठलेही उपक्रम फायदेशीरच ठरतात.उद्या जर धागाकर्त्याला कुठल्या बाबांच्या किंवा स्वामींच्या दर्शनाने बरे वाटत असेल, तर मला त्यात आनंदच आहे.
11 May 2014 - 1:18 am | आत्मशून्य
हे तुमच्याबाबत नाही.
9 Jun 2014 - 3:45 pm | म्हैस
चांगल्या मनोरोग तज्ञाला दाखवा . तुमची झोप पूर्ण होते का ? अर्धवट झोपेमुळे फार प्रोब्लेम्स निर्माण होतात . पूर्ण झोप घ्या . प्राणायाम करा . डोक्याला आणि फुफुसाला हवेचा योग्य पुरवठा झाला कि फ्रेश आणि उत्साही वाटतं . घरातल वातावरण प्रसन्न ठेवा . सुगंधी धूप, अगरबत्ती जाळून प्रसन्नता निर्माण करता येईल . आपल्या आवडत्या देवाचं स्तोत्र मोठ्याने म्हणा .
9 Jun 2014 - 11:22 pm | मराठे
तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्धल इथे लिहिलं आहेत हीच उपचाराची पहिली पायरी आहे. याचा अर्थ तुम्ही उपचार घेण्याबाबत सिरियस आहात हे स्पष्ट होतं. आता वरती लोकांनी सांगीतल्याप्रमाणे चांगल्या तज्ञाचा सल्ला नक्की घ्याल याची खात्री आहे.
10 Jun 2014 - 2:56 pm | समीरसूर
अनामिक भय हे थोड्या-फार फरकाने सगळ्यांनाच असते. ते एखाद्या झाडाच्या कुजलेल्या अजस्त्र फांदीप्रमाणे कधी कधी खळखळ वाहणार्या निरुंद भागात अडकते आणि आपल्या मनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरते. आणि मग सुरु होतो अनिश्चिततेचा आणि मानसिक आंदोलनांचा खेळ! सगळं तसं पाहिलं तर नियमाप्रमाणे पुढे सरकत असतं पण आपलं मन त्या भयाने जागच्या जागी थांबून राहतं. हे असं भय बहुधा सगळ्यांनाच कधीतरी ग्रासतं. याची कारणे काहीही असू शकतात. नोकरी/धंद्यातली अनिश्चितता, गरीबी, मोठे अपयश, व्यवसायातले नुकसान, घरात कलह-तंटे, व्यसनाधीनता, कुणी जीवाभावाचं एकदम जाणं, जबर नुकसान (आर्थिक, मानसिक), कुठल्यातरी कारणाने आलेली अपराधी भावना, काहीतरी हातून निसटून गेल्याची चूटपूट आणि खंत, कामाच्या ठिकाणी कलह, एखाद्या व्यक्तीच्या (ओळखीची किंवा अनोळखी) विशिष्ट वागणूकीमुळे होणारा मनःस्ताप, अतिविचार करणे, भविष्याची चिंता, एखाद्या जवळच्या व्यक्तीविषयी चिंता, इत्यादी कुठलीही कारणे अशा भयगंडाला कारणीभूत ठरू शकतात. अगदी क्षुल्लक गोष्टी देखील कधी कधी मनाला त्रास देतात. हजारो-लाखो रुपयांचे नुकसान हसत-हसत पचवणारा कधी कधी एका क्षुल्लक पेन्सिलीच्या हरवण्याने कमालीचा अस्वस्थ होतो. प्रत्येक घटनेविषयी, व्यक्तीविषयी, सवयींविषयी, आणि प्रत्येक गोष्टीविषयी आपले स्वतःचे असे खास मजबूत विचारसंच किंवा दृष्टीकोन असतात. त्याला धक्का लागला की मनाची अस्वस्थता वाढते. ती जास्त वाढली की मग भयगंड येतो; आत्मविश्वास, उत्साह उतरणीला लागतात. त्यातून अधिक चिंता वाढते. असे हे दुष्टचक्र असते. बसमध्ये कंडक्टरकडून सुट्टे तीन रुपये घेण्याची आठवण सगळ्या प्रवासात सतत उराशी ठेवणारा प्रवासी दुसर्या दिवशी टपरीवर चहा पितांना एखाद्या गरीब भिकार्याला अगदी सहजपणे दहा-वीस रुपये देऊन टाकतो किंवा त्याला दहा-पंधरा रुपयांचा वडा-पाव आणि चहा विकत घेऊन देतो. आदल्या दिवसाच्या प्रवासात मात्र तो मजेत प्रवासाचा आनंद लुटू शकत नाही कारण सुट्टे तीन रुपये एवढ्याभोवतीच त्याचे जग त्यावेळी फिरत असते. असे होत असते. आणि आयुष्यात असे टप्पे येतच असतात. त्यामुळे घाबरून किंवा गोंधळून न जाता या समस्येवर तोडगा काढणे महत्वाचे. खालील काही उपाय फायद्याचे ठरू शकतील असे वाटते:
१. श्वास - वर सांगीतलेला श्वासाशी संबधित उपाय चांगला आहे. उच्छवासासोबत निराशावादी विचार झटकून टाकणे प्रयत्नांती शक्य होते.
२. व्यायाम - रोज न चुकता ३०-४० मिनीटे व्यायाम, वेगात चालणे इत्यादी आपल्याला उत्साह प्रदान करते. विचार स्थिर ठेवण्यास याचा निश्चितपणे उपयोग होतो. सतत बसून राहणे, लोळत असणे, नुसताच निरुद्देश टीव्ही बघत राहणे आपल्या मनाला मंद आणि आळशी बनवते. घरात देखील छोटी-छोटी कामे करत राहणे फायदेशीर असते.
३. वाचन - वाचनासारखा छंद नाही. आपल्याला जे आवडते ते वाचावे. वाचनामुळे माहिती प्रोसेस करण्याची कला अवगत होते. प्रसंगी यथोचित व्यक्त होणे आणि विचारांमध्ये प्रगल्भता असणे हे महत्वाचे बदल चांगल्या वाचनाने साध्य होतात. भाषा आणि विचार समृद्ध होतात. सामान्यतः लोकं माहितीलाच ज्ञान समजतात. माहितीला योग्य रीतीने प्रोसेस केल्याने ज्ञान प्राप्त होते. हे कौशल्य वाचनाने टोकदार होत जाते. त्यामुळे प्रत्येकाने वाचन करायलाच हवे.
४. छंद - जीव ओवाळून टाकावा इतक्या प्राणपणाने एखादा छंद जोपासल्यास आयुष्याला नवीन झळाळी येते. आणि मग त्यातून मिळणारा उत्साह, आत्मविश्वास टिकाऊ असतो.
५. शिकणे - आपल्या कामाच्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी शिकणे नवा आत्मविश्वास कमवण्यात उपकारक ठरते.
६. करमणूक - चित्रपट, एखादी चांगली मालिका, मित्रांसोबत अड्डा, कुटुंबातल्या सदस्यांसोबत गप्पांचा फड, सहली, एखाद्या दिवशी कामाला दांडी मारून नुसते भटकणे, पावसात भिजणे, रात्री मस्त जेवण करून तब्येतीत पान जमवून एखादा सुंदर गाण्यांचा कार्यक्रम एंजॉय करणे, भरपूर खेळणे, या गोष्टी अत्यावश्यक आहेत. एक वेगळाच उत्साह देतात या गोष्टी.
७. स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो.
८. विवेकबुद्धी शाबूत ठेवणे - सगळ्यांशी चांगले वागणे आणि आपण काही चुकीचे करत नाही आहोत हा ठाम विश्वास बाळगणे आवश्यक आहे.
९. सौहार्द - सौहार्द, मृदू भाषा, मने जिंकून घेण्याची हातोटी ही कौशल्ये जबरदस्त साथ देतात. स्वत:चे मनःस्वास्थ व्यवस्थित ठेवणे या कौशल्यांमुळे सोपे होते. शिवाय यामुळे नवीन ओळखी पटकन होतात, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे इसका मतलब ये नही की प्रत्येक ठिकाणी पडते घ्यावे. गरज असेल तिथे ठामपणे 'नाही' म्हणणे आणि वेळप्रसंगी बाह्या सरसावणे आपल्या इथे आवश्यक ठरते. समोरची व्यक्ती पंगा घेतांना दहावेळा विचार करेल अशी प्रतिमा केव्हाही फायदेशीर ठरते. अरे ला कारे करता येणे जमले पाहिजे.
१०. जास्त भावनाप्रधान नसणे - अतिभावनाप्रधान असण्याचे असंख्य तोटे असतात. आपण कशाततरी गुंतून पडतो आणि जमाना सुळ्ळकन पुढे निघून जातो. हे कटाक्षाने टाळता यायला हवे. त्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात.
११. ऊर्जेचा योग्य वापर - योग्य ठिकाणी ऊर्जा खर्ची घालणे जास्त फायदेशीर ठरते. जिथे गरज नाही तिथून लक्ष काढून योग्य त्या ठिकाणी फोकस करणे जमले पाहिजे. पुस्तक लिहिणे हे ध्येय असेल तर टीव्ही बघणे, टंगळमंगळ करणे कटाक्षाने टाळता आले पाहिजे. मुख्य कामाला जास्त वेळ ठेऊन दुय्यम कामे चटकन उरकणे श्रेयस्कर ठरते. मुख्य काम कोणते आणि दुय्यम कामे कुठली हे ज्याचे त्याने ठरवायचे.
१२. अतिविचार टाळणे - अतिविचार केल्याने मन पोखरले जाते. कुठला विचार केव्हा आवश्यक आहे हे ओळखता आले पाहिजे. आणि एका ठराविक मर्यादेनंतर विचार सोडून देता आले पाहिजे. 'जो होगा सो देखा जायेगा' ही बेफिकीरी कधी कधी माणसाला तगवते. जिथे आपले नियंत्रण नाही त्याबाबतीत अतिविचार टाळणे आवश्यक आहे.
१३. तुलना टाळणे - त्याच्याकडे होंडा सिटी आहे; माझ्याकडे ऑल्टोच आहे; त्याला माझ्यापेक्षा ५०००० पगार जास्त आहे अशी तुलना सतत करणे टाळता आले पाहिजे. प्रत्येकाचा जीवनाविषयीचा दृष्टीकोन भिन्न असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातली वळणे आणि स्पीडब्रेकर्स निराळी असतात. आपले ध्येय काय आहे आणि आपल्याला ते कसे अचिव्ह करायचे आहे ही माहिती असणे यासारखी दुसरी श्रीमंती नाही. ऑफ कोर्स, एका ठराविक मर्यादेपर्यंत तुलना असणे आवश्यकच असते. त्यामुळे तुमची तहान कायम राहते. पण ही तहान जीवघेणी ठरू न देणे महत्वाचे.
१४. विश्वास ठेवणे - आयुष्याच्या या मोठ्या खेळात चार-दोन चेंडू वाईड पडतात किंवा काही कॅचेस सुटतात किंवा कधी कधी खेळाडू त्रिफळाचित होतो. आयुष्याच्या या इतक्या मोठ्या प्रवासात या घटना क्षुल्लक ठरतात. दहावी-बारावीमध्ये कमी गुण मिळणे, एखादी परीक्षा अनुत्तीर्ण होणे, नोकरी गमावणे अशा घटना काही काळानंतर विसरल्या जातात. कुठल्याच घटनेने जीवन थांबून राहत नाही हा विश्वास बाळगणे महत्वाचे. काही काही प्रश्न चुटकीसरशी सुटतात. काहीतरी उपाय निघतोच आणि समस्या सुटतात ही खात्री बाळगली की समस्या खरोखर सुटायला सुरुवात होते. या अशा कमालीच्या सकारत्मक विचारांचे परिणाम चमत्काराइतकेच दिव्य असतात. त्यामुळे हा सकारात्मक विश्वास अत्यंत महत्वाचा असतो.
हे उपाय प्राथमिकता देऊन अमलात आणल्यास फायदा होईल. पॉझिटीव्ह अॅटीट्युड मात्र आवश्यक आहे. काही काही माणसे जन्मतःच आनंदी, उत्साही, कमालीची आत्मविश्वासपूर्ण, व्यवस्थित विचार करून योजना आखून आयुष्य जगणारी असतात. मोठे मोठे निर्णय घेणे, ते अमलांत आणणे, कुठेही भावनाप्रधान न होता आपली ध्येये साध्य करणे, स्थिर चित्ताने आपल्या ध्येयाच्या दिशेने आगेकुच करत राहणे, दु:ख आणि संकटकाळातदेखील शांत राहून थंड डोक्याने विचार करणे या गोष्टी अशा माणसांना लीलया जमतात. ज्यांना हे जमत नाही त्यांना मनाची सतत मशागत करत राहणे आवश्यक ठरते. त्यासाठी वरील उपाय कामात येतील असे वाटते.
मानसोपचारतज्ञाची गरज असेल तरच ती मदत घ्यावी. रोजच्या जगण्यातल्या ताणतणावांसाठी आणि छोट्या-मोठ्या कुरबुरींसाठी मानसोपचारतज्ञाची आवश्यकता नाही असे वाटते. त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यता देखील असते. आपण मानसोपचारत्ज्ञाची मदत घेत आहोत म्हणजे आपल्याला खूप मोठा आजार आहे असे वाटायला लागते. बहुतेक मानसोपचारतज्ञ त्यांच्या उपचारपद्धतींमधून तेच ध्वनित करत असतात. शिवाय मानसोपचारतज्ञ आता आपल्याला पूर्ण बरे करेल; म्हणजे आपल्याला काहीच करावे लागणार नाही अशी भावना होते. स्वमदतीशिवाय जगातला कुठलाच मानसोपचारतज्ञ मदत करू शकत नाही. अगदीच स्किझोफ्रेनियासारखे आजार असतील तर औषधोपचार आणि तज्ञांची मदत अपरिहार्य ठरते; परंतु साध्या साध्या समस्यांसाठी आपण स्वत:च मशागत केली तर उपचारांची गरज भासत नाही असे वाटते.
विपश्यनाचा १० दिवसांचा कार्यक्रम मी इगतपुरीला केलेला आहे. अंतर्मुख लोकांसाठी कदाचित या कार्यक्रमाचा उपयोग होत असावा परंतु ज्यांना खूप बोलायला आणि स्वच्छंद आयुष्य जगायला आवडते त्यांच्यासाठी या कार्यक्रमाच्या उपयुक्ततेविषयी माझ्या मनात शंका आहेत. व्यक्तीश: मला या कार्यक्रमाचा शून्य उपयोग झाला. दहा दिवस अजिबात न बोलणे, श्वासावर लक्ष नियंत्रित करणे, नेहमीच अगदी साधे जेवण घेणे, रोज पहाटे ५ वाजता उठून डायरेक्ट ध्यानधारणेत घुसणे वगैरे मला काही झेपले नाही. शेवटी दिवस पर्सिस खंबाटाला बघण्यात कसे बसे घालवले (होय, त्या कार्यक्रमामध्ये त्यावेळेस पर्सिस खंबाटा आलेली होती). कित्येक लोकं या कार्यक्रमात चक्क झोपून जात असत. तिथून सुटल्यावर जीव भांड्यात पडला होता. असो. हा विचार ज्याने त्याने करायचा.
शेवटी आपले सूर, मगदूर, आणि सुरूर महत्वाचे. आपली गाण्याची पट्टी कोणती, आपली झेप घेण्याची कुवत किती, आणि आपल्यामध्ये कौशल्ये, महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती, जिद्द यांचे वादळ आहे की फक्त एक छानशी झुळूक आहे हे तपासणे महत्वाचे. ते एकदा ओळखले की मग सगळे व्यवस्थित होत जाते.
त्यामुळे टेंशन घेऊ नका. सगळे नीट होईल हा विश्वास ठेवा आणि आपल्या परीने मनाची मशागत करत रहा. त्रास खूप वाढला तर मात्र मानसोपचारतज्ञाची मदत अवश्य घ्या.
मी वर लिहिलेले सगळे करतो असे नाही. जे जितके जमते तितके करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे फायदे मी अनुभवले आहेत. सगळे मला जमत नाही. कुवत अपुरी पडते. विचारांची प्रगल्भता कमी पडते. हे सगळे केल्याने नक्कीच फायदा होईल असे वाटते.
10 Jun 2014 - 5:58 pm | पैसा
सर्व बाजूंनी विचार करून लिहिलेला प्रतिसाद. अतिशय आवडला.