नाम्या आज निवांत बसला होता.
काही दिवसांपूर्वी त्याची उठल्यापासूनच धावपळ चालू व्हावयाची. केव्हा सर्व आवरतो व देवळात विठूला भेटावयास जातो असे व्हावयाचे. त्याला डोळे भरून पहात बसावयाचे, त्याच्याशी घटकाघटका गुज बोलत बसावयाचे, वेळ कसा जायचा, कळतच नसे. घरची थोडी चरफड करावयाची, पण त्याची आता सवय झाली होती. देवळांत येणार्या लहानथोर भक्त मंडळीत वट वाढला होता. हा तर "देवाशी प्रत्यक्ष बोलणारा," मग येणारा जाणारा पायी लागत होता. मनातून सुखावत नाम्या त्यांना आशिर्वाद देत होता. एक दिवस आळंदीहून चार भावंडे आली. भावांनी चरणस्पर्श करून नमस्कार केला. "हे योग्यच, देवळात माझी वस्ती, बाहेरच्यांनी नमन केलेच पाहिजे !" नाम्याच्या मनात हा विचार आला न आला तोच जणु तो फळ्यावर लिहला आहे असे वाचत धाकटी कडाडली "मी नाही नमस्कार करणार. हा दांभिक ! हा... हा भक्तांचे नमस्कार घेतो ? छी, कोण लागून गेला ?" मोठ्याने समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला " मुक्ते, हा विठ्ठलाचा सखाशेजारी, मोठा भाग्यवान, कर बेटा नमस्कार." पण मुक्ता हटूनच बसली. म्हणाली "म्हणे विठूशी बोलतो, अरे, हा तर निगुरा, अजून गुरू भेटला नाही. याची पाटी तर कोरीच आहे. गुरूविण संतपण आहे कोठे? याला कां मोक्ष भेटणार आहे ?" सगळे मुकाट होऊन एकामेकाकडे बघत बसले. शेवटी ठरले आळंदीला संतमेळावा घेऊन तेथेच ज्येष्ठ गोरोबा काकांनी खरेखोटे ठरवून निर्णय द्यावा. विठोबाची संमत्ती घेऊन सर्वजण आळंदीला आले.
सर्वांना गोलाकर बसवून गोरोबांनी हातात मडकी तपासयाचे लाकडी थोपाटणे. प्रथम निवृत्तीच्या डोक्यात हाणले. तो गप्प बसला. "पक्के"! मग ज्ञानोबाच्या डोक्यात हाणळे , तोही गप्प."पक्के"! सोपान झाला, मुक्ताबाई झाली, सर्व शांत. गोरोबांनी आता नाम्याच्या डोक्यावर थोपाटणे हाणले. डोकेच फुटल्यावर नाम्या बोंब मारत रडू लागला. गोरोबा म्हणाले, "मुक्ताबाई, हा कोरा, अजिबात भाजलेला नाही." मुक्ता म्हणाली
चैतन्याचा केर ब्रह्म अग्नीवर चेतवावा.!
अंतर बाहेर भाजू आम्ही कुंभ !
भरूं निरालंब सगळेची !
अहं सोहं दोन्ही ऊर्ध्व लावू फुंकणी !
नवद्वारे फुंकोनी जाळ करूं!
जीवित्व काढूनि शिव घडूं अंगा !
प्रिय पांडुरंगा आवडेल !"
नाम्या सर्वांची नजर चुकवून धावत धावत पंढरीला पोचला. गेला तो तडक देवळातच गेला. विठोबाचे पाय धरून म्हणाला "देवा, हे कसले तुझे भक्त ? पाहुणा म्हणून त्यांच्याकडे गेलो तर भाजून जीव घ्यावयासच निघाले. घरात कवडी नाही आणि बाता केव्हड्या ! या लहानग्या मुक्ताईने सगळ्य़ा संतांना देशोधडीस लावले, ब्रह्मांड काखेस घेतात म्हणे; मला तर सर्व पाखंड दिसते. आता मागोमाग येतील आणि म्हणतील द्या या नाम्याला. त्यावेळी बेइमान होऊन त्यांना देऊ नकोस. तुझ्या पतीतपावन नामाला लांच्छन लावू नकोस." पांडुरंग हळहळत म्हणाला " काय संधी दवडलीस रे मुर्खा. सज्जनांच्या गोष्टी तुला कडू लागल्या. अरे, अजून दीनांचा अतिदीन होऊन सद्गुरूला शरण जा.. "मग माझा सर्वत्र प्रकाश". गोंधळून नाम्या म्हणाला " गुरूला शरण जावयाचे ते तुला पावावयास पण तू तर मला रोकडाच मिळाला आहेस, आता गुरूची काय गरज ? हातात फळ असातांना झाडावर चढावयाचे कशाला ?" पांडुरंग म्हणाला " मी तुझ्यावरील प्रेमाने लटिका खेळतो खरा, पण गुरूच्या आज्ञे वाचून हे स्वप्नीचे धन समज.
विठोबानेच असे कानफटल्यावर नाम्याला जाग आली. त्याने विचारले "आता सद्गुरू कोठे शोधूं ? मग विठोबाच्याच सांगण्यावरून तो औंढ्या नागनाथला विसोबा खेचरांना भेटावयास गेला. गावात कळले ते तर देवळात॒च भेटतील. तिथे गेला. पहातो तो अचंबितच झाला. एक म्हातारा चक्क पिंडीवरच पाय ठेऊन झोपला होता. देवाला नमस्कार करून तो म्हणाला "भले तर दिसता, मग ही विपरीत करणी कसली ? लिगावरचे पाऊल पहिल्यांदी काढा." "नाम्या, मी म्हातारा झालो आहे, तूच आता पाय उचल आणि देव नाही तेथे ठेव." नाम्याने पाय उचलून दुसरीकडॆ ठेवावयाचा प्रयत्न केला. तर तिथेही पायाखाली दुसरी पिंड. दोन चारदा झाल्यावर नाम्याने चरण धरले व म्हणाला नामा धरी चरण अगाध तुमचे ज्ञान !
आपले नाम कोण सांगा स्वामी !!
येरू म्हणे खेचर विसा पै जाण !
"लौकिकी मिरविणे अरे नाम्या !!
नाम आणि रूप दोन्ही जया नाही !
तोची पाषाणु !देव पाही येर मिथ्या !!
जळ स्थळ आणि काष्ट हे
पिंड ब्रह्मांड व्यापून अणुरेणु !! ....
जरी म्हणसी देव देखिला !
तरी हा बोल भला नव्हे नाम्या !!
जोंवरी मी माझे न तुटे !
तव आत्माराम कैसेनी भेटे !!+
चराचरात ईश्वरच भरला आहे हे सत्य कळल्यावर व मला देव भेटतो या अहंकारातला फोलपणा लक्षात आल्यावर गुरूकृपेने नाम्याची मोक्षवाट खुली झाली. विसोबांचा निरोप घेऊन तो पंढरपूराला परतला. नाम्याची परिक्षा घ्यावयाचे विठोबाने ठरवले. काय झाले ते नाम्याच्या शब्दातच पहा.
नामा स्वयंपाक करोनी बैसला ! केशव श्वानरुपें आला !
रोटी घेऊनि पळाला ! सर्वांभूतीं केशव !!
हाती घेऊनि तुपाची वाटी ! नामा लागला श्वानापाठी !
तूप घे गा जगजेठी ! कोरडी रोती कां खाशी !!
तंव श्वान हांसोनी बोलिले ! नामया तुज कैसे कळलें !
येरू म्हणे खेचरें उपदेशिले ! सर्वांभूती विठ्ठल !!
मनातील संदेह आता फिटला होता. आंतरिक शांती समाधान लाभल्यावर आता देवळात जायलाच पाहिजे असेही फारसे उरले नव्हते. उन्हे उतरल्यावर मनात गोविंदाचे स्मरण करत नाम्या घराबाहेर पडला होता व आता निवांतपणे एका झाडाखाली बसला होता पावसाळ्याचे दिवस होते. दूरवर चंद्रभागेचे पात्र दिसत होते. एखादे दुसरे चुकार जनावर सोडले तर आजुबाजूला कोणीच नव्हते.आणि नाम्याच्या अंगावर एक थेंब पडला. नाम्याने वर पाहिले तर काळे ढग जमत होते व बघता बघता त्यांनी सगळे आकाश व्यापून टाकले. वीजेचा कडकडात ऐकू आला व पावसाचा जोर अचानकपणे वाढला. हां हां म्हणता सुखद वाटणारा पाऊस अंगावर कोसळू लागला. त्या गारव्याने नाम्याला विठ्ठल मूर्तीच्या अंगसंगाचीच आठवण झाली. आतापर्यंत न दिसलेले मोर माना उंच करून, पिसारा फुलवून नाचत आहेत हे पाहून त्याचे मनही त्यांच्या पिसार्यासारखे मोहरले. आतापर्यंत मनात असलेला गोकुळातला गोपाळ आता उत्स्फुर्तपणे बाहेर आला. आणि .... आणि गुरूने उपदशलेला व मनांत ठसलेला विश्वातील एकात्मतेचा प्रत्यय त्याच्या काव्यात उतरला.
मल्हार महुडे गगनी दाटले, विजु खळे गर्जिंनले, गर्जिनले गे माये !
गोविंद पहाया, पहाया लवकरी, कैसे वरुषताहे, मधुधारी गे माये !
आनंदे मयुरे, नाचती आपैसे, प्रेमे नीळकंठ झाले, नीळकंठ झाले माये !
नामया स्वामी दृष्टी,स्वामी दृष्टी सोज्वळ, जीव लागला गोपाळे,गोपाळे गे माये !
महुडा---मेघ, , आपैसे --- आपोआप, नैसर्गीक रित्या ,
मी व हे मोर, मोरच कशाला निर्जीव मेघसुद्धा, जर एकच आहोत तर मला जशी गोविंदाला पाहवयाची आर्त आहे तशी ती यांच्याही मनात असलीच पाहिजे. मेघही घननीळ गोपाळ लवकर दिसावा, त्यातही उशीर नको म्हणून घाई करणार, कोसळणारच. पण ते आकाशात दाटल्यामुळे काळोखी पडणारच मग सावळा गोविंद दिसला नाही तर ? पण त्यांच्याकडे त्याची सोय आहेच ही विद्युल्लता प्रकाश पाडीलच की.. विजनातील शांतता तपीमुनींना ठीक, आपण साधी संसारिक माणसे आपला आनंद सर्व जगाला कळला पाहिजे, त्यासाठी हा कडकडात. आणि हे मोर... जर नाम्या किर्तन करतांना नाचतो, कोणी सांगितले म्हणून नव्हे, तर आंतरिक उमाळ्याने, तसे हे मोर नाचत आहेत कसे ? आपैसे . आणि तेही नीळकंठ कसे झाले हो ? शंकर हलाहल प्याला, तो नीळकंठ झाले हे ठीक पण मोरांचे काय ? साधे उत्तर. ते नजरेने "निळिया" गोविंद पीत आहेत, आकंठ पीत आहेत,परत परत पीत आहेतच. मग कंठ नीळा होणारच.
ही ओढ चराचराला कां लागली बरे? नामयाचे उत्तर आहे स्वामीची सोज्वळ दृष्टी. प्रेमळ आणि सोज्वळ यामध्ये फरक आहे बरे का ! खरे म्हणजे सेनापतीची सैनिकांवर करडी नजर असते तशी जगत्चालकाची जगावर करडीच नजर पाहिजे पण नाही, नामयाचा स्वामी सगळ्यांकडे सोज्वळतेने पहात आहे व म्हणूनच सगळ्यांचा गोपाळावर जीव जडला आहे.
शरद
.
.
प्रतिक्रिया
12 Apr 2014 - 2:43 pm | कवितानागेश
वाचनखूण साठवलीये. आज फीस्ट आहे.
आधी वीणा.... आता मोर. :)
12 Apr 2014 - 3:20 pm | बालगंधर्व
सुनदर मनदनी अहे शरदराव्व, नामयाचे खापर विथुनमाय्चा चईतनियात पुरनपने पकके झले. यपुरवे एकआ पिकचराआत दोके पोहोदने पहिले होते. पन हा परसग्न कुह्प बहावपुर्ना अहे.
12 Apr 2014 - 5:58 pm | शुचि
अतिशय रसाळ निरुपण!!!!
12 Apr 2014 - 3:24 pm | यशोधरा
काय सुरेख लिहिले आहे! फार आवडले!
12 Apr 2014 - 3:27 pm | प्यारे१
अहाहा! सुंदरच.
12 Apr 2014 - 6:30 pm | पैसा
काय सुंदर लिहिलं आहे! नामदेवाचा हा अभंग फार सुंदर वाटला!
14 Apr 2014 - 6:54 am | स्पंदना
__/\__!!