निवडणुकीचा बिगुल देशभर वाजला
कालचा तो 'आम आदमी', आज एकदम खास झाला
कॉलर पकडणारे हात, नमन करू लागले
ओळख विसरलेल्या चेहेऱ्यावरती, भुलवणारे हसू खुलू लागले
झोपड्यातलं ते फाटक पातळ, नव्या साडीत बदलून गेलं
व्हरांड्यातल्या गांजलेल्या नळांना, ५ वर्षांनी परत पाणी आलं
रस्त्यामधले काल परवाचे खड्डे, अचानकच हरवून गेले
पल्याड गावच्या दुष्काळग्रस्तांना, एका रात्रीत अनुदान मिळाले
शेकडो पोकळ आश्वासनांचा, रोजचा रतीब चालू झाला
सफेद सदरेवाल्यांचा घोळका, दारोदारी फिरू लागला
चार महिन्यांचा सारा खेळ, पुन्हा सगळं तसंच घडणार
पुन्हा पदरी तीच निराशा, आमचा शेतकरी पुन्हा रडणार
रस्त्यांवरती तसेच खड्डे, पुन्हा रस्ते जाम होणार
चार दिवसांचा हा खास आदमी, पुन्हा एकदा 'आम' होणार . . .