"अमुक अमुक असा,असा,होता.तसा,तसा होता. पण मात्र तो माणूसही होता"असं काही व्यक्तिना श्रद्धांजली देताना म्हणतात ते उगाच नाही.
त्याचं असं झालं,अलीकडे मला जरा थकल्या थकल्या सारखं वाटू लागलं होत.माझ्या डॉक्टरांकडे ही माझी तक्रार मी गेले कित्येक दिवस करीत होतो.ह्यावेळी परत तेच माझं रडगाणं ऐकून डॉक्टर मला म्हणाले आपण तुमचं पुर्ण चेकअप करून घेवूया.पण त्यासाठी मी सांगतो त्या नर्सिंग होम मधे तुम्हाला कमीत कमी एक आठवडा ऑबझरव्हेशन खाली राहवं लागेल.मी मनात म्हणालो ’बापरे! काय बुद्धि मला झाली आणि ही नर्सिंग होंम मधे राहण्याची बला मी माझीच मला करून घेतली.
माझी जी बेड होती तिच्या बाजूच्याच बेडवर एक सदगृहस्थ कसल्या तरी ट्रिटमेंटसाठी माझ्या अगोदर एक दोन दिवस आले होते.
सहाजीकच दिवस जाता जाता त्यांच्याशी ओळख झाली.बोलता बोलता मला कळलं की ते एक डॉक्टरच होते हे त्यानी मला नंतर सांगितल्यावर कळलं. ते जनरल चेकअपसाठी आले होते.एक दोन दिवसात परिचय वाढत गेल्यावर गप्पा गोष्टी करता करता ते मला एक दिवस म्हणाले,
"तुम्हाला मी एक गम्मत सांगतो. मी पण एक डॉक्टरच आहे.आपलं तनमन,शक्ति,आणि आपली आध्यात्मिक श्रद्धा ह्या बद्दल जागृत न राहिल्यास आपल्या डॉक्टरी उपचार करण्याच्या क्षमतेची आपल्या आपण मर्यादा घालून घेतो.मला वाटतं आपली विचारशक्ति पण तसं करायला कारणीभूत असते.
मला वाटतं,आपल्या मनातले उद्देश आपण काबूत ठेवू शकतो.आणि ही एक फार महत्वाची बाब आहे. डॉक्टरी उपचार करायला जर का मला कुणाचं सहाय्य करायचं असेल तर प्रथम माझा उद्देश पडताळून पाहिला पाहिजे असं मला वाटतं पाश्चिमात्य औषध पद्धती बाबत मी जसा असमाधानी होवू लागलो तसा मी दुसऱ्या उपचाराच्या पद्धतीचा अभ्यास करू लागलो. शरिराच्या शक्तिकडे निराळ्या दृष्टिकोनातून पाहून त्याचा अभ्यास करू लागलो. एक बाई माझ्या क्लिनीक मधे आली.
माझी तिची नजरा नजर झाल्यावर मला ती जरा साशंक वृत्तीची दिसली.तिची मेडिकल हिस्ट्री कळण्यासाठी मी तिला नेहमी प्रमाणे प्रश्नाचा भडीमार केला.काही वेळाने माझ्या लक्षात आलं की तिच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. मी जरा मनात चलबिचल झालो.कारण हिच्या उपचारावर माझा बराच वेळ जाणार होता. डॉक्टरी उपचारासाठी आपला उद्देश कसा पडताळून पाह्यचा ह्याचा जो मी अभ्यास करीत होतो,तो विचार माझ्या एकसारखा मनात येवू लागला.ती बाई माझी पेशंट असल्याने तिला काय होतंय ह्या बद्दलचा उपचाराचा विचार मला मनात आणणं भाग होतं.मी ठरवलं की तिला माझ्याकडून जास्तीत
जास्त आदर देणं,तिच्याकडे सतत लक्ष देणं,आणि तिच्याबरोबर प्रेमळपणाची वागणूक ठेवणं ह्याची जरूरी होती.तसं केल्यानंतर ती बाई माझ्याकडे आता त्या नजरेनी न पाहता एखादी बारा वर्षाच्या अल्लड मुली सारखी बोलू लागली.मी पण तिच्याशी हसंत खेळत रहिलो.
तिची खरीतर पाठ दुखत होती.आणि त्याच्यासाठी मी तिला फिझीकल थेरपीसाठी एका डॉक्टरकडे पाठवलं.आणि नंतर काही दिवसानी मला येवून भेट म्हणून सांगितलं होतं.काही आठवड्यानंतर मला तिच्या मुलीचा कॉल आला,की खूपच पाठीत दुखत
असल्याने सध्या ती एमरजन्सी म्हणून एका हॉस्पिटलात ऍडमिट झाली आहे.तिच्या पाठीच्या मणक्यात ट्युमर असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती.त्यानंतर ती फक्त एकच आठवडा जगली.
मला तिची मुलगी म्हणाली,
"आपल्याला कॉल करून आपण जगणार नाही हे कळवायला सांगितलं होतं.त्यामुळे आपली भेट होणार नाही.असंही पुढे म्हणाली होती."
तिने आपल्या जाण्यापुर्वीच्या शेवटच्या दिवसात पण माझी आठवण काढली ह्याचा विचार येवून मला दुःख असह्य झालं.तिच्या शेवटच्या दिवसात सुद्धा ती माझी आठवण ठेवून होती ह्याचा विचार येवून मी सद्गदीत झालो.
त्या घटनेचा विचार येवून मी अजून गर्भगळीत होतो.त्या घटनेनेच माझ्यात बदल आला.माझ्या मनातल्या विचाराना कसलीच कारणमीमांसा नसते असं मनात आणण्याचं मी सोडून दिलं.माझा आता जगाकडे पाहताना ते जग माझ्या भोवती
मीच निर्माण करतो असं दिसूं लागलं.मला आता असं वाटू लागलं,की जेव्हा मी आनंदी किंवा रागाचे विचार मनात आणतो तेव्हा एकप्रकारचं केमिकल माझ्या शरिरातल्या प्रत्येक सेलमधे जावून पोहोचत असावं आणि त्यांना समजत असावं की मी आनंदात तरी आहे किंवा रागात आहे. माझं शरिर माझ्या भावना प्रत्येक सेलला नुसतंच कळवत नसून माझ्या शरिरातल्या शक्तिची क्षमता माझ्या त्या भावनेप्रमाणे बदलते आणि माझ्या बद्दल इतराना माझ्या भावनापण कळत असाव्यात.
काही लोक ह्या सहज न कळणाऱ्या भावने विषयी फार जागृत असतात तर काही त्यातून विलग व्हायला शिकत असतात."
हे त्या डॉक्टरचं सगळं बोलणं ऐकून झाल्यावर माझ्या मनात विचार आला किती दूरवर हे डॉक्टर लोक विचार करीत असतात.मशिन रिपेअर करणं आणि माणूस रिपेअर करणं ह्या मधे यांत्रीक बाब वगळल्या नंतर माणसाचं मन,भावना, आनंद,राग असल्या बाबी देवाने किंवा निसर्गाने केल्या नसत्या तर माणूस मन नसलेला कंप्युटर म्हणून सहज काम करू
शकला असता आणि कंप्युटर मन नसलेला माणूस म्हणून काम करू शकला असता.
एखादा माणूस निर्वतल्यावर
"अमुक अमुक असा,असा,होता.तसा,तसा होता. पण मात्र तो माणूसही होता"असं त्याला
श्रद्धांजली देताना म्हणतात ते उगाच नाही हे लक्षात येतं.
श्रीकृष्ण सामंत