- मु. पो. वाडे ४ –लायब्ररी
तेंव्हा कोंकणात कांही मोजक्याच गांवांत हायस्कुल असायचं. हायस्कुल असलेलं गांव प्रगत समजलं जायचं. वाड्याला तेंव्हा हायस्कुल होतं एवढंच आठवतंय. मी स्वतः तेंव्हा मराठी शाळेत म्हणजे नगरपालिकेच्या शाळेत बहुधा असणार आणि तेंव्हा हायस्कुल कडे पाहणं म्हणजे हायस्कुलवाल्यांनी कॉलेज कडे पाहण्यासारखं होतं. गेल्या वर्षी पाहिली ती हायस्कुल ची इमारत मात्र गोरी गोमटी-मध्यमवर्गीय वाटली—almost माझ्या लहानपणी पार्ले किंवा गिरगावातली एखादी शाळा असावी तशी. वाडयात शिक्षणाचं वारं बहुधा स्थानिक ब्राह्मण वर्गाकडून आलं व ते बरीच वर्षे त्याच वर्गाने टिकवुन धरलं. शाळेचं मला फारसं कौतुक नाहीं, ठीक आहे की इथं भिन्न भिन्न विषय शिकविले जातात, पण त्याला अकरा वर्षे घ्यावीत? शिवाय सर्व पाठ्य पुस्तकांना एक चौकट घातलेली असते. या उलट लायब्ररीतली पुस्तकं जास्त विस्तृत व मुक्त आणि स्वतंत्र.
वाचणं म्हणजे प्रथम स्वतःचीच स्वतःशी सुरु केलेली एक सांस्कृतिक चळवळ, नंतर तिची व्यापकता वाढत जाते.व तिचा रोख क्रमाक्रमाने शिक्षणव्यवस्था, नंतर समाजव्यवस्था, क्वचित साहित्य व्यवस्था नंतर सर्व कांही यान्च्या कडे वळतो. एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केलीत, की मग नंतर तुम्हाला स्वस्थ बसतां येत नाही. पण यातले बरेच जण शेवटी निष्क्रिय ‘मध्यमवर्गिय’च रहातात; पण कांही जण इतकं सारं वाचून बंडखोर होतात व विद्रोही साहित्य संम्मेलनात मोठ्या हिरीरीने भाग घेतात किंवा चक्क कम्युनिस्ट होतात. मी सुद्धा एक निष्क्रिय मध्यमवर्गीय म्हणजेच भांडवलशाहीचा पुरस्कर्ता. पण MPhil च्या Punjab Crisis वर माझ्या dissertation साठी जेंव्हा मी वाचत गेलो तेंव्हा लक्षात आलं की हे कम्युनिस्ट लोकंच ‘खरं’ लिहितात, बाकी सारे फक्त चकचकीत लिहून मोकळे होतात. तेंव्हा मला खरंच वाटलं होतं की बुद्धीप्रामाण्यवादी असण्याचं शेवटचं टोक म्हणजे कम्युनिस्ट होणं. बुद्धीला ते पटत होतं पण माझं भांडवलशाही सर्वस्व ते मानायला तयार नव्हतं. मला वाटतं प्रत्येक व्यक्तित एक विरोधाभास (contradiction) दडलेला असतो.
प्रेमाची मीमांसा करता येत नाही असं म्हणतात पण ते मला फारसं पटत नाही. प्रेम अगदी आंधळेपणे किंव्हा फक्त हृदयाने केलं जात नाही, त्यात थोडासा डोळसपणा असतोच की. एकदा सुरुवात केलेलं प्रेम मात्र नंतर हृदय सांभाळत. माझ्या वाड्यावरच्या प्रेमांत तिथल्या लायब्ररीचाही भाग असणं हा तो डोळसपणा आहे. लायब्ररी च्या माझ्या पहिल्या आठवणी म्हणजे मुंबईहून तिसऱ्या दिवशी तिथे पोहोचणारी मराठी वर्तमानपत्रं. मुंबईहून येतांना कोंकणाच्या लाल मातीचा स्पर्श मात्र त्यांना टाळता येत नसावा. वर्तमानपत्रं वाचायचं माझं तेंव्हा वयही नव्हतं पण हे कांहीतरी आमच्या मुम्बईचं एवढं जरूर वाटायचं. समोरच्या कपाटांत पुस्तकं बंदिस्त. मी सभासद असण्याचा प्रश्नच नव्हता. नंतर कधीतरी मात्र एकदा तिथच बसून नाथमाधवांचं एक पुस्तक चाळल्याचं किंवा थोडं फार वाचल्याचं स्मरतंय.
बऱ्याच वर्षांनी मी कॉलेज मध्ये असतानांच माझी रवानगी खडकवासल्याच्या सैनिकी अकादमी मध्ये झाली व अकादमीत असताना मी वाड्याला गेलो होतो. तेंव्हा आमची आजी (आक्का) हयात होती कारण ती असेपर्यंतच वाड्याला जायचं प्रयोजन असायचं. दोन चार दिवसापेक्षा वाड्याला राहणं शक्य नव्हतं. पण या दोन चार दिवसांत लायब्ररीत जाण अपरिहार्य होतं शिवाय घरी आजीजवळ बसायचं म्हटलं तर मला सैन्यात घातलं म्हणून तिच्या आमच्या कुटुंबाबद्दलंच्या (कुर्लेकर) नेहमीच्याच शिव्यावजा तक्रारी ऐकायला लागल्या असत्या. पुस्तकांचं जग आता थोडं फार ओळखीचं व्हायला लागलं होतं. मी फक्त तिथं कुठली कुठली पुस्तकं आहेत एवढंच बघायचं ठरवलं. एका पुस्तकावर नजर गेली व मी अवाक झालो. पुस्तकाचं नांव होतं “पश्चिम आघाडीवर सामसूम”. Erich Maria Remarque नावाच्या जर्मन लेखकाचं पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचं All Quiet On the Western Front नावाच्या एका गाजलेल्या पुस्तकाचा तो अनुवाद होता. हे मूळचं जर्मन भाषेतील पुस्तक १९२८ मध्ये प्रकाशित झालं होतं व त्याचं इंग्रजी भाषांतर १९२९ मध्येच बाहेर आलं. मराठी पुस्तकाच्या अंतर्बाह्य रूपावरून ते ही प्रकाशित होऊन बरीच वर्ष झाल्याचं दिसत होतं. लष्कराचा गणवेश मी घालायला सुरुवात केली होती म्हणून मला युद्धाच्या पार्श्वभूमीवरच्या साहित्यात रुची असणं स्वाभाविक होतं तरी देखिल कुठल्या तरी मराठी माणसाने मूळ पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतर लगेचंच त्याचा अनुवाद करावा व ते पुस्तक कोंकणातील एका गावांत पोचावं देखिल. वाड्याच्या या लायब्ररीबद्दलचा माझा आदर लगेच दुप्पट झाला.
आमच्या आईचं निधन झाल्यानंतर तिच्या नावाने आम्ही या लायब्ररीला देणगी दिली शिवाय बरीचशी पुस्तकं देखिल. त्या नंतर मी एक दोनदा वाड्याला धावती भेट देऊन आलो पण लायब्ररी उघडी नसायची. मी जाईनही या एक दोन वर्षांत. लायब्ररीत सांप्रत असलेल्या पुस्तकांचा आढावा मला घ्यायचाय व त्या अनुषंगाने अजून कांही पुस्तकं त्यांना घेऊन द्यायची आहेत—मौज प्रकाशनाची मराठी व Penguin ची इंग्रजी शिवाय एखाद दुसरा Encyclopedia. पाहूया. -5-
माणसं–
कुठेतरी वाचल्याचं आठवतंय—सैतान (Devil) म्हणतो “God is the biggest underachiever”. हा अगदी typical आक्रमक सैतानी पवित्रा असेल पण बऱ्याचदा माझ्याहि मनांत विचार डोकावून गेलाय की तो, –देव-, सर्व कांही अपूर्ण ठेवतो, मुद्दामहून. कारण तसं केल्यानेच आपली मानवजात त्याच्या नियंत्रणात राहील नाहींतर या जातीच्या उत्क्रांतीची घोडदौड त्याच्या जवळपास येऊन पोहोचेल. महात्मा गांधी, आईनस्टाईन, बेथोवन, दोस्तोव्हयस्की, मायकेलेन्जलो सारखी माणसं जवळजवळ पूर्णत्वापर्यंत पोहोचली होती-मग यांना तिथंच रोखलं पाहिजे, या उत्क्रांतीला ब्रेक लावला पाहिजे. या असामान्य व्यक्तींबद्दल त्याला कांहीच करता येत नाहीं पण या सर्वांची पुढची पिढी मात्र त्याच्या हातांत असते; तिला slow down करता येणं शक्य असतं –या असामान्य व्यक्तींच्या दुसऱ्या पिढीच्या बुद्धीची, प्रतिभेची, कलेची झेप देवाला खाली आणता येते व तो तसंच करतो. देवाकडे असलेल्या या अनुवंशिकतेच्या पुस्तकांत अक्षरशः असंख्य पाने आहेत, त्यातलं कुठलही पान तो उघडून पुढची पिढी ठरवू शकतो; हे पान त्या कुटुंबाच्या chapter मधलं असलं की झालं, पण तसाहि कांही नियम नाहीं. पण वाईट वाटतं जेंव्हा तो फक्त व्याकरण वापरतो. या पिढीनंतर पूर्ण विराम म्हणजे नंतरच्या पिढीचा प्रश्नच उद्भभवत नाहीं. हे दुष्ट व्याकरण त्याने पु ल साठी वापरलं तसंच आमच्या आजीच्या घरातदेखील.
अप्पा म्हणजे आमच्या आईचे तिसरे काका व आमच्या या आजीला इतरांप्रमाणे आम्ही देखील हंसा काकी म्हणून सम्बोधायचो. आम्ही वाड्याला जायचो तेंव्हा अप्पा तिथं असायचे. आईचे दुसरे दोन्ही काका मुंबईत असायचे. या सर्व काकांचं आमच्या आईवर भयंकर प्रेम. मुंबईतून कोंकणात तेंव्हा यायचं म्हणजे बोटीने. एक दोनदा ‘वरच्या वाटेने’ म्हणजे कोल्हापूर मार्गे आल्याचं ही मला स्मरतंय. बोट विजयदुर्ग बंदराच्या बाहेर उभी रहायची व पडावातून आम्ही बंदरावर यायचो. आमची आई (बायो) हे तिच्या माहेरच्या संदर्भात किती बडं प्रस्थ हे वाड्याला आल्यावर आमच्या लक्षांत यायचं. एकदा तर आमच्या आईचे हे अप्पा काका तिला घ्यायला पडावाने थेट बोटीपर्यंत आले होते, आपल्या पावण्याना (पाहुण्यांना) घ्यायला आलेली बाकी सर्व माणसं बंदरावर पडावाची वाट बघत उभी. अप्पांना काळजी ही की बायो (आमची आई) मुलांना घेऊन बोटीतून पडावात नीट उतरेल की नाही याचं कारण पडाव लाटांबरोबर सारखं हलत असतं. काळजी चा जन्म प्रेमाच्या पोटातूनच होतो नाहीं का?
वाड्याला सुट्टी घालवायची म्हणजे कधी कधी कांही प्रश्न उभे रहायचे. मुंबईत सुट्टी म्हणजे दिवसभर क्रिकेट आणि तेव्हढ पुरेसं असतं. कधीतरी एकदा मला वाचायला कांहीतरी हवं असा मी हट्ट धरून बसलो. लहान होतो तेंव्हा. वाड्याच्या लायब्ररीत जाण्याइतका मी मोठा नव्हतो. शिवाय वाचण्याचं range देखील तेंव्हा ताम्हणकरांचा गोट्या किंवा चांदोबा इथपर्यंत मर्यादित. अप्पा बिचारे देवगड पर्यंत चालत गेले व त्यांनी एक दोन पुस्तकं आणली. यात अप्पांचं आमच्या आईवरचं प्रेम आलंच शिवाय एक जबदस्त स्वभावाचा चांगुलपणा सुद्धा होताच.
ही दोघंही दिसायला खूप देखणी; अगदी गोरेपान नाहीं पण गोरे, हंसा काकीचं नाक तरतरीत, दोघांकडे त्या घराचा प्रेमळपणा. हंसा काकी कडे एक अजून प्लस point म्हणजे या बाईचा sense of humour. या दोघांची मुलं मात्र जगली नाहींत. पण हे त्यांचं स्वतःचं दुःख त्या दोघांनी कधीच मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ढकलून दिलेलं कारण त्यांच्या बोलण्यात किंवा इतर कशातही ते दिसत नव्हतं.
बुद्धी, देखणेपण व सुस्वभाव या घरांत लपत छपत आलेला; मी पाहिलेल्या या घरातील सर्व पिढ्यांबरोबर या सर्वांचा लपंडाव, आज डाव बुद्धीवर तर उद्या तो देखणेपणावर. कुणास ठाऊक अप्पा व हंसा काकीची मुलं जगली असती तर क्वचीत या सर्वांचा त्रिवेणी संगम पहायला मिळाला असता. पण देवाजीच्या मनात कांहीतरी वेगळंच असावं..
प्रतिक्रिया
21 Mar 2014 - 1:32 am | आयुर्हित
काळजी चा जन्म प्रेमाच्या पोटातूनच होतो :-
व्वा! फार छान.
देव-, सर्व कांही अपूर्ण ठेवतो, मुद्दामहून:-
असेल कदाचित, हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे.
पण त्यामुळेच मी तरी पूर्णत्वाचा शोध घेत घेत ह्या अथांग विश्वाचाच वेध घेऊ लागलो आहे.
या असामान्य व्यक्तींच्या दुसऱ्या पिढीच्या बुद्धीची, प्रतिभेची, कलेची झेप देवाला खाली आणता येते व तो तसंच करतो:-
हे काही गळी उतरणार नाही अजून!
मी सुद्धा एक निष्क्रिय मध्यमवर्गीय म्हणजेच भांडवलशाहीचा पुरस्कर्ता.-
हे एक बरे आहे आपले,
नाही तर आज सर्व निष्क्रिय मध्यमवर्गीय व त्यांचे तथाकथित नेते(?) भांडवलशाहीला नावे ठेवण्यातच धन्यता मानतात!
मला वाटतं प्रत्येक व्यक्तित एक विरोधाभास (contradiction) दडलेला असतो.:-
हे मात्र एकदम खरे आहे. एक निदा फाजली यांची गझल आठवली: दो चार गम राह को हमवार देखना
हर आदमी मे होते है दस बीस आदमी| जिसको भी देखना हो कई बार देखना|
21 Mar 2014 - 1:38 am | बॅटमॅन
लेखातले वाक्यनवाक्य अतिशय सुंदर आहे. आवडले.
21 Mar 2014 - 5:08 am | खटपट्या
छान लेख
21 Mar 2014 - 3:20 pm | राही
हा लेख सुद्धा छान आहे. 'वरची वाट' या वाक्प्रचाराची गंमत वाटली.
बाय द वे, हे वाडे गाव म्हणजे जिथे श्रीपाद जोशी नावाचे लेखक रहात असत ते वाडा तर नव्हे? कोंकणात वाडा, वाडे नावाची अनेक गावे असावीत बहुधा. श्रीपाद जोशी आणि त्यांच्या वाड्याविषयी रवींद्र पिंगे यांनी अगदी भरभरून लिहिले आहे.
21 Mar 2014 - 5:16 pm | kurlekaar
होय. रविंद्र पिंगे यांचं लिखाण मी वाचलंय खरं पण श्रीपाद जोशिन्बद्दलचा हा लेख मी वाचलेला नाहीं. क्वचित वाचला देखिल असेल पण आत्ता इतर बऱ्याच गोष्टींप्रमाणे ते आठवत नाहीं. वाडा नावाचं तालुक्याचं गांव ठाणे जिल्ह्यात येतं. माझं आजोळ --वाडे हे गांव देवगड व विजयदुर्ग यांच्या मध्ये येतं. इथलं विमलेश्वराचं देऊळ पांडवांनी एका रात्रीत बांधायचा प्रयत्न केला अशी आख्यायिका आहे, देवळाच्या बाजूला कांही अर्धपूर्ण शिल्प देखिल आहे म्हणूनच या परिसराला पांडव लेणी देखिल म्हणतात. गम्मत म्हणजे देशांत एक दोन ठिकाणी मी पांडवांनी एका रात्रीत बांधायचा अयशस्वी प्रयत्न केलेल्या बांधकामाबद्दल मी ऐकलंय/पाह्यलंय पण कुठे वगैरे तपशील आठवंत नाही. भीम असला म्हणून काय झालं पण तेवढं देखिल बांधकाम/शिल्प एका रात्रीत करणं मला तरी असंभव वाटलं होतं. मला तेंव्हा वाटलं की या आख्यायीकेच्या मुळाशी गेलं पाहिजे पण मी सुद्धां पांडवांसारखं ते तसंच अर्धवट सोडून दिलं.
21 Mar 2014 - 6:14 pm | kurlekaar
थोडसं चुकलंय. कौन बनेगा करोडपती मध्ये जसं तुम्हांला कुणाकडून मदत घेतली जाऊ शकते तसं मी माझ्या मामाला text केलं व त्याचं उत्तर आत्ताच आलंय. श्रीपाद काळे. हा मामा माझ्यापेक्षा लहान व त्याने बरीच वर्षे वाड्यात घालविली आहेत व तो वाचणारा देखिल आहे त्यापूर्वी मी श्रीपाद जोशींना गुगल केलं होतं व त्यांचा जन्म कोल्हापूर चा असल्याचा उल्लेख होता.
22 Mar 2014 - 12:55 pm | राही
प्रदीर्घकाळ वाडे नावाच्या गावात राहून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असा उल्लेख पिंग्यांच्या लेखात होता. यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत. ग्रंथालयात जाऊन आडनाव पुन्हा एकदा बघितले पाहिजे. अर्थात तुम्ही प्रत्यक्ष खात्री करूनच लिहिले आहे, पण आपण दोघे ज्या लेखकाविषयी बोलतो आहोत ती एकच व्यक्ती आहे की कसे ते ग्रंथालयात गेल्यावर समजू शकेल.
21 Mar 2014 - 4:25 pm | जयंत कुलकर्णी
मस्त.........
21 Mar 2014 - 5:47 pm | मुक्त विहारि
आवडला....
21 Mar 2014 - 6:09 pm | राजो
का कोणास ठाऊक पण कोकणाबद्दल पहिल्यापासूनच एक आपुलकी वाटत आली आहे. साहित्यातदेखील कोकणचे वर्णन विशेष प्रभावी वाटते. आपले लेख ही तसेच वाटतात.
28 Mar 2014 - 5:43 pm | पैसा
हा पण लेख आवडला.