इथे आजकाल 'फॉल' (पानगळ) वर खूप कविता येत आहेत. म्हणून वाटले आपणही ही कविता प्रकाशित करावी. ही पूर्वी मनोगतावर प्रकाशित झालेली आहे..
मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना ऋतू पेलताना..
बेभान वाऱ्यासवे शहारणारी तनू
एकेक कळी, पानं, फुलं जपत
त्याचा धसमुसळेपणा सांभाळताना...
मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना धुंद होताना..
बोचऱ्या थंडीच्या चाहुलीने
नव रंगांच्या निर्मितीने
पानगळीसाठी सज्ज होताना...
मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना रंग बदलताना..
केशरी, पिवळा, अबोली, डाळिंबी
असंख्य रंगांची झालर लेऊन
तेज:पुंज झळाळी दिमाखात मिरवताना..
मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना असवताना...
कडाक्याच्या थंडीत पर्णीसाठी झुरत
पांढऱ्याशुभ्र हिमाच्या गालिच्यावर
असहायपणे आसवे गाळताना..
मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना बहरताना..
वसंताच्या चाहुलीने आनंदून जात
नव्या निर्मितीचा ध्यास घेऊन
नवे रूप लेण्यास अधीर होताना..
मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना हसताना..
पल्लवित होऊन असंख्य रंग
अंगावर लेऊन, फुलांमध्ये पानांमध्ये
रमत प्रेमगीत गाताना...
मी पाहिलंय त्यांना... ऋतू बदलताना...!
- प्राजु.
प्रतिक्रिया
4 Nov 2007 - 8:40 pm | इस्कुट
मी पहिलय त्याना, माझ्याच गाडीवरुन मिरवताना
माझ्याच समोरुन, देखण्या पोरी फिरवताना . . .
4 Nov 2007 - 9:47 pm | स्वाती राजेश
प्राजु,
नेहमी प्रमाणे सुंदर ओळी.......
मी पाहिलंय त्यांना रंग बदलताना..
केशरी, पिवळा, अबोली, डाळिंबी
असंख्य रंगांची झालर लेऊन
तेज:पुंज झळाळी दिमाखात मिरवताना..
ज्या इकडे आम्ही खरेच पाहतो आहे, अनुभवतो आहे.
तुझी मैत्रिण,
स्वाती.
7 Nov 2007 - 12:54 am | विसोबा खेचर
प्राजु,
कविता छानच आहे..
आवडली..
तात्या.
अवांतर -
इथे आजकाल 'फॉल' (पानगळ) वर खूप कविता येत आहेत. म्हणून वाटले आपणही ही कविता प्रकाशित करावी. ही पूर्वी मनोगतावर प्रकाशित झालेली आहे..
मिसळपाववर प्रकाशित झालेल्या पानगळ या कवितेच्या प्रतिसादातच 'मी पाहिलंय' या मनोगतावर पूर्वी प्रकाशित झालेल्या कवितेचा दुवा दिला असता तरी चालले असते असे वाटते. कृपया इथे पूर्वप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचे शक्यतोवर टा़ळावे असे माझे वैयक्तिक मत आहे!
तात्या.
7 Nov 2007 - 9:05 am | सर्किट (not verified)
कृपया इथे पूर्वप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचे शक्यतोवर टा़ळावे असे माझे वैयक्तिक मत आहे!
चालेल रे तात्या !
"तिथे" पण नाही का लोक "माझा हा लेख अमक्या ढमक्या इवल्याशा पेप्रात प्रकाशित झाला होता, तो इथे देत आहे" म्हणतात, आणि मग इतर वाचक "वा ! क्या बात है ! पुढल्या ओकारीबद्दल शुभेच्छा!" असं म्हणतात ? तसंच कुठल्याही संस्थवर चालायला हवं ? नाही का ?
- सर्किट
7 Nov 2007 - 9:11 am | सर्किट (not verified)
एकेक कळी, पानं, फुलं जपत
त्याचा धसमुसळेपणा सांभाळताना...
शब्द भाषिकदृष्ट्या छान आहेत, पण फिजिकल ऍब्यूझचे (बलात्काराचे) समर्थन करणारे वाटतात.
ह्या ओळी सोडल्या तर बाकी कविता आवडली.
- सर्किट
7 Nov 2007 - 10:12 am | विसोबा खेचर
शब्द भाषिकदृष्ट्या छान आहेत, पण फिजिकल ऍब्यूझचे (बलात्काराचे) समर्थन करणारे वाटतात.
छ्या! काहीतरीच काय रे मिलिंदा! तू सुद्धा कुठल्या गोष्टी कुठे नेऊन ठेवतोस! 'बलात्काराचं समर्थन' असं तुझं म्हणणं जरा अतीच होतंय असं मला वाटतं!
असो, मला काव्यातलं फारसं समजत नाही हे चित्तोबांचं म्हणणं मला मान्य आहे, पण तरीही..:)
तात्या.
7 Nov 2007 - 10:39 am | सर्किट (not verified)
अरे तात्या,
अरे ही कळी, पानं, फुल,असल्या नाजुक गोष्टी आल्यावर धसमुसळेपणा (चुरगाळणं?), हे आलं कुठून ?
नाही, म्हणजे कविता वगैरे मलाही कळत नाही, पण कळ्या आणि धसमुसळेपणा ह्यांचा परस्परसंबंध कसल्या कसल्या इतर कविता /लेख/ बातम्या वाचून कळतो की !
- सर्किट
7 Nov 2007 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना धुंद होताना..
बोचऱ्या थंडीच्या चाहुलीने
नव रंगांच्या निर्मितीने
पानगळीसाठी सज्ज होताना...
या ओळी विशेष आवडल्या !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
7 Nov 2007 - 11:15 am | ध्रुव
आवडली.
ध्रुव
7 Nov 2007 - 5:15 pm | शब्दवेडा
कविता मनापसून आवडली.असेच लेखन चालू ठेवावे...
7 Nov 2007 - 9:21 pm | प्राजु
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
सर्किटराव,
मी पाहिलंय त्यांना ऋतू पेलताना..
बेभान वाऱ्यासवे शहारणारी तनू
एकेक कळी, पानं, फुलं जपत
त्याचा धसमुसळेपणा सांभाळताना...
ही कविताच मुळी झाडांबद्दल आहे. आई जशी आपल्या तान्हूल्याला आपल्याच मोठ्या मुलांपासून सांभाळत असते.. त्याचप्रमाणे ही झाडे आपल्या छोट्यांना या वा-याच्या दंग्यापासून सांभाळतात.. असा अर्थ अपेक्षित आहे. ही कविता कोणत्याही सामाजिक घटनेशी संबंधित नाही आणि तसा अर्थही अपेक्षित नाही. ही निव्वळ एक निसर्ग कविता आहे. तुम्ही "बलात्काराचा "अर्थ लावून त्या वा-याला एखादा वासनेने पिसाटलेला नराधमच केलात.
असो... धन्यवाद तुमच्याही प्रतिसादाबद्दल. :)))
प्राजु.
7 Nov 2007 - 11:39 pm | सर्किट (not verified)
प्राजूताई,
माफ करा. अनेकदा कविता एकदा वाचल्यावर फक्त वरवरचा अर्थ कळतो, म्हणून कविता आवडली की पुन्हा अधिक खोलात शिरून वाचून आणखी काही कळते का, हा विचार करावासा वाटतो. मला आपली कविता आवडली, हे सांगणे न लगे. परंतु नंतर वाचताना पुन्हा तो "ऋतू.. पेलणे", "धसमुसळेपणा", "शहारणारी तनू", "कळ्या... जपणे" वगैरे वाचून उगाच काही तरी आभास जाणवले.
क्षमस्व.
- सर्किट
9 Nov 2007 - 9:40 am | प्राजु
अहो....माफी कसली मागता??? ती ही माझ्याकडून??
मला अभिप्रेत असलेला अर्थ तुम्हाला नाही कवितेतून जाणवला याचा अर्थ माझी कविता अजूनही स्पष्टपणे नाही येत.. मला एक चांगली कविता लिहीण्यासाठी अजून खूप खूप गोष्टी शिकायच्या आहेत. आणि त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न ही चालू राहील.
प्राजु.