जीवनगाणे - ३

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
14 Feb 2014 - 8:51 am

रोझलिंड फ्रॅंकलीन

विज्ञानातल्या काही शोधांमुळे विज्ञानाला नवे परिमाण लाभले, नवे वळण मिळालेले आहे. दृष्टीच्या, पंचेंद्रियांच्या क्षमतेच्या मर्यादा मानवाच्या बुद्धीने ओलांडल्या आणि अजोड अशा कल्पनाशक्तीच्या, सर्जनशीलतेच्या जोरावर काही शोध लावले. खरे तर काही वेळा वैज्ञानिक सत्याचा शोध हा आंधळा आणि हत्ती या कथेतल्या आंधळ्यांच्या तर्कासारखा असतो. तरी मानवाने आपल्या अथांग प्रज्ञेच्या जोरावर हे शोध लावलेले आहेत. सूर्यकेंद्री विश्वाचे प्रारूप, न्यूटनचे गतीविषयक नियम, आईनस्टाईनचा व्यापक सापेक्षतेचा नियम, अणूच्या रचनेचे प्रारूप, क्वॉंटम सिद्धांत, ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. डीएनएच्या अणुरचनेचा शोधही तेवढाच महत्त्वपूर्ण आणि वैज्ञानिक प्रगतीला नवे वळण, नवे परिमाण देणारा आहे.

कधी कधी जगातल्या अनेक ठिकाणचे शास्त्रज्ञ एखाद्या वैज्ञानिक सत्याच्या नजीक एकाच वेळी येऊन ठेपतात. मग त्यांच्यात सुरू होते ती एक वैश्विक गूढ उकलण्यासाठीची रोमांचक, थरारक, जीवघेणी स्पर्धा. दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान अनेक शास्त्रज्ञ अणुबॉंबच्या शोधाच्या जवळ येऊन पोहोचले होते. युद्धातल्या दोन्ही बाजूंच्या अनेक राष्ट्रांचे लाखो सैनिक आणि नागरिक मरूनही युद्ध थांबत नव्हते. शेवटी अमेरिकेने अणुबॉंबच्या शोधात बाजी मारली आणि युद्धाला निर्णायक वळण मिळाले.

प्रथिन स्फटीकचित्रणविज्ञान अर्थात प्रोटीन क्रिस्टलोग्राफी या विषयाचा पाया ‘डोरोथी क्रॉफूट हॉजकिन’ हिने घातला होता हे आपण यापूर्वी पाहिले आहे. या एक्स रे क्रिस्टलोग्राफीत असामान्य नैपुण्य मिळवून रोझलिंडने पेशीकेन्द्रकाम्लाच्या (यापुढे पेके म्हणूयात) - डीएनएच्या रेणूचे सुस्पष्ट छायाचित्र घेतले. या छायाचित्रामुळे निसर्गातले हे एक गूढ उकलण्यास मदत झाली. हे छायाचित्र हा त्या रेणूच्या रचनेला मिळालेला ठोस पुरावा ठरला आणि पेकेच्या रेण्वीय रचनेचे प्रस्तावित प्रारूप त्रिमिती चित्र निर्विवादपणे स्वीकारणे शास्त्रज्ञांना शक्य झाले.

पेकेच्या रेणूरचनेच्या अभ्यासामुळे आईबाबांकडून गुणवैशिष्ट्ये मुलांकडे कशी जातात हे समजण्यास मदत झाली. बरीच अनुवंशिक कोडी या शोधामुळे सुटली आहेत आणि अनेक सुटणार आहेत. अर्थातच नवी कोडी देखील नवे आव्हान घेऊन उभी राहातील. असे हे जीवशास्त्राला नवे वळण, नवे परिमाण देणारे संशोधन आहे.

केवळ जीवशास्त्रावरच नव्हे, वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र, आरोग्यशास्त्र, शेती, प्राणिशास्त्र, कुक्कुटपालन, दूधव्यवसाय, इ अनेक क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारे हे संशोधन होतांना वैज्ञानिक संशोधनक्षेत्रात एक विलक्षण नाट्य रंगले. दोन सूत्रधार असलेल्या या नाटकात एक सूत्रधार होते सर जॉन रॅंडल तर दुसरे सूत्रधार होते सर लॉरेन्स ब्रॅग. नाटकातली प्रमुख पात्रे होती रोझलिंड फ्रॅंकलीन, मॉरीस विल्कीन्स, फ्रॅन्सीस क्रीक आणि जेम्स वॉटसन आणि त्यांचे काही वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकारी.

रोझलिंड फ्रॅंकलीन ही एक ब्रिटीश जैवभौतिकी शास्त्रज्ञ अर्थात एक बायोफिजिसिस्ट तसेच एक्स रे क्रिस्टलोग्राफर. डीएनए, आरएनए, कोळसा, ग्राफाईट, विषाणू, इत्यादी स्फटीकांच्या अणुरचनेवर रोझलिंडने संशोधन केलेले आहे. यात सर्वात गाजले आहे ते तिचे पेशीकेंद्रकाम्ल = डीएनए = पेके च्या अणुरचनेवरचे संशोधन. पेकेच्या अणूची रचना कशी असेल यावरच्या विचारमंथनाला आणि त्यामुळे त्यावरच्या संशोधनाला दुसर्‍या महायुद्धानंतर वेग आला.

फोटोग्राफी वा छायाचित्रण हे एक तंत्र आहे तसेच ते एक कसब किंवा कौशल्य देखील आहे. रोझलिंड फ्रॅंकलीनने एक्सरे क्रिस्टलोग्राफीने छायाचित्रण काढणे किंवा प्रतिमा घेणे या तंत्रात किंवा कौशल्यात उच्च प्रतीचे नैपुण्य मिळवले होते. तिने घेतलेले पेकेच्या अणूचे ‘फोटो १९५१’ हे छायाचित्र प्रसिद्धी पावले. कसे ते पुढे पाहूच. पेकेच्या रचनेच्या शोधामागे या प्रतिमेने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचप्रमाणे रोझलिंडचा एक सहकारी मॉरीस ह्यूज फ्रेड्रीक विल्कीन्स याचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. रोझलिंड आणि विल्कीन्स यांचे स्वभावविशेष आणि त्यांचे सामाजिक स्तर, त्यामुळे स्वभावात निर्माण होणारी वैशिष्ट्ये वगैरे गोष्टी जाणून घेतल्या तर पेकेच्या रचनेच्या शोधाच्या शर्यतीच्या या नाट्यामधली रंगत मस्त अनुभवता येईल. तेव्हा आपण प्रथम रोझलिंडचा जीवनपट पाहू.

रोझलिंड फ्रॅंकलीन. जन्म नॉटींग हिल, लंडन इथे दि. २५ जुलै १९२० रोजी. वडील एलिस ऑर्थर फ्रॅंकलीन हे लंडनमधील एक श्रीमंत सावकार. त्यांच्या पाच अपत्यापैकी रोझलिंड हे दुसरे अपत्य तर सर्वांत मोठी कन्या.

नंतर व्हायकाउंट सॅम्युएल म्हणून समाजात ओळखले गेलेले हर्बर्ट सॅम्युएल हे तिच्या वडिलांचे काका. यांनी गृह सचिव म्हणून काम केले आणि ब्रिटीश मंत्रालयात काम करणारे पहिले ज्य़ू धर्मीय. पॅलेस्टाईनमधले ब्रिटीशांचे पहिले राजदूत म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

हेलन कॅरोलीन फ्रॅंकलीन या तिच्या आत्याचे ब्रिटीशांचे पॅलेस्टाईनमधले ऍटर्नी जनरल नॉर्मन द मॅट्टोस बेंटविच यांच्याशी लग्न झाले. ती कामगार संघटनांमधली (ट्रेड युनियन) एक सक्रीय कार्यकरी होती. वीमेन सफरेज चळवळीत देखील तिचा सहभाग होता. नंतर बहुमानाचे असे लंडन काउंटी कौन्सिलचे सदस्यत्व तिला प्राप्त झाले. अशी ही कर्तृत्ववान आत्या रोझलिंडला लाभली होती.

समाजातल्या अतिउच्चभ्रू वर्गातल्या एका प्रतिष्ठित, उच्चपदस्थ कुटुंबात रोझलिंडचा जन्म झाला होता. एका कर्मठ ज्यू कुटुंबात जन्म होऊनही रोझलिंड पुढे निरीश्वरवादी - ऍग्नोस्टीक बनली. बालवयातच तिच्या बुद्धीची असामान्य चमक दिसून आली. स्वतःपाशी असलेल्या या असामान्य बुद्धिमत्तेचा सार्थ अभिमान तिला होता. ब्रिटनमधल्या धनवान, प्रतिष्ठित, अतिउच्चभ्रू स्तरातले तिचे कुटुंब असल्यामुळे या समाजात त्या काळी असलेला आत्मविश्वास, दिमाख, तोरा, बेधडक स्पष्टवक्तेपणा – काहीसा उद्धटपणा तिच्या ठायी होता. आपली ओळख करून देतांना ती स्वतःचे नाव ‘रॉस्सऽऽलिंड फ्रॅंकलीन’ असा ठसकेबाज उच्चार करून सांगत असे. या बिनधास्त स्वभावामुळे, बेधडक स्पष्टवक्तेपणामुळे बर्यायच वेळा समोरच्या माणसाला तुच्छ लेखले जात आहे असे चित्र निर्माण होते. तरीही अख्खे कुटुंबच समाजसेवेत असल्यामुळे माणसे जोडण्याची, लोकांशी संपर्क साधण्याची कलाही तिच्यात विकसित झाली होती.

पेके च्या अणूची दोन रूपे अभ्यासाठी निवडली गेली. निर्जलीकरण झाल्यामुळे (डीहायड्रेटेड) सुरकुत्या पडून आखडलेल्या रूपाला ‘फॉर्म ए’ तर ताणून इस्त्री केल्यासारख्या सजल रूपाला (हायड्रेटेड) ‘फॉर्म बी’ ही या दोन रूपांना दोन नावे मिळाली. साहजिकच ताणून इस्त्री केल्यासारखे सजल रूप क्षकिडीप्र = क्ष किरण डीफ्रॅक्शन प्रतिमा - विश्लेषण करण्यासाठी कोणत्याही शास्त्रज्ञाच्या पहिल्या पसंतीला जाईल हे वेगळे सांगायला नकोच.

सेंट पॉल गर्ल्स हायस्कूलमध्ये रोझलिंडचे शिक्षण झाले. इथे तिने विज्ञान, लॅटीन भाषा आणि खेळात प्राविण्य मिळवले. वर्किंग मेन्स कॉलेजमध्ये तिच्या कुटुंबाचा सक्रीय सहभाग होता. श्री. एलिस फ्रॅंकलीन हे तिचे वडील तिथे संध्याकाळी जाऊन वीजशास्त्र, चुंबकत्व आणि महायुद्धाचा इतिहास हे विषय शिकवीत. नंतर ते तिथे उपप्राचार्य झाले. युरोपमधून नाझींच्या तावडीतून पळून आलेल्या ज्यूंच्या पुनर्वसनासाठी फ्रॅंकलीन कुटुंबाने कार्य केले.

वयाच्या १५व्या वर्षीच रोझलिंडने वैज्ञानिक व्हायचे ठरवले. परंतु आयुष्य कसे वळण घेईल ते कुणाला सांगता आले आहे? स्त्रियांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास रोझलिंडच्या वडिलांचा विरोध होता. तिच्या उच्च शिक्षणाचा खर्च उचलण्यास त्यांनी नकारच दिला. शेवटी तिची (बहुधा) आत्या हा खर्च उचलण्यास पुढे आली आणि नंतर वडिलांनी माघार घेतली व तो खर्च केला. रोझलिंडच्या आत्याने आणि आईने तिच्या बाबांना चांगलेच फटकावलेले दिसते. मी वापरलेल्या संदर्भात ऑन्ट हा इंग्रजी शब्द आहे आणि नाव दिलेले नाही, त्यामुळे ही ऑन्ट बया मावशी, मामी, काकी कुणीही असू शकते, पण बहुधा भाचीचे लाड करणारी स्त्रीमुक्तीवादी आत्या असावी. लेखविषय वेगळा असल्यामुळे खोलात गेलो नाही.

१९३८ मध्ये रोझलिंडने केंब्रिजच्या न्यूहॅम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि नॅचरल सायन्स ट्रायपॉसमधून रसायनशास्त्राचे अध्ययन केले. वर्णपटतज्ञ म्हणजे स्प्रेक्टोस्कोपिस्ट डब्लू. सी. प्राईस हे तिला शिकवणार्‍या डेमॉन्स्ट्रेटर्सपैकी एक. नंतर किंग्ज कॉलेजमध्ये ते तिचे वरिष्ठ सहकारी देखील होते. काही काळाने ‘केमिकल कायनेटीक्स’मधील संशोधनाबदल या श्री. प्राईस यांना नोबेलने गौरवले गेले. १९४१ मध्ये रोझलिंडला फायनल्समध्ये सेकंड क्लास ऑनर्स मिळाला. नोकरीसाठी ही फायनल्स पदवी म्हणून ग्राह्य धरली जात होती. लिंगभेदी, स्त्रीला दुय्यम मानणारा जमाना असूनही १९४७ मध्ये केंब्रिजने महिलांना बी. ए. आणि एम. ए. या पदव्या देणे सुरू केले. अगोदर शिकून गेलेल्या महिलांना पण केंब्रिजने पदव्या दिल्या. रोझलिंडला ‘रिसर्च फेलोशिप’ दिली. आर. जी. डब्ल्यू नॉरिश’स लॅबमध्ये तिने फारशी चमक न दाखवता एक वर्ष व्यतीत केले.

दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान इंग्लंडमध्ये युद्धकाळातील एक प्रमुख गरज म्हणून वापरल्या जाणार्‍या खनिज कोळशाची गुणवत्ता राखण्याबाबात अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली. ‘नॅशनल सर्वीस ऍक्ट’च्या तरतुदीखाली रोझलिंडने ‘ब्रिटीश कोल युटीलायझेशन रीसर्च असोसिएशन’ (BCURA) या कोळसाविषयक संस्थेमध्ये ‘असिस्टंट रीसर्च ऑफिसर’ म्हणून काम सुरू केले. लंडनच्या नैऋत्य सीमेजवळ ‘थेम्स’ नदीच्या किनार्‍यावरच्या किंग्स्टनजवळच्या ‘कूम्ब स्प्रिंग इस्टेट’ इथे ही संस्था होती. जॉन जी. बेनेट हे या संस्थेचे संचालक होते. रोझलिंड इथे असतांना मार्चेलो पिरानी आणि व्हिक्टर गोल्डस्मिड्ट हे नाझींच्या छळवादापासून पळालेले दोन निर्वासित या संस्थेचे विशेष सल्लागार – कन्सल्टंट आणि अधिव्याख्याते होते. रोझलिंडने इथे कोळशाच्या ‘सच्छिद्रते’वर संशोधन केले आणि काही महत्त्वाचे प्रबंध प्रसिद्ध केले. या संशोधनावर आधारित अशा तिच्या ‘द फिझिकल केमिस्ट्री ऑफ सॉलिड ऑरगॅनिक कॉलोईड्स विथ स्पेशल रेफरन्स टू कोल’ या प्रबंधाला केंब्रिजने पुढे १९४५ मध्ये डॉक्टरेट दिली. नंतरच्या कैक संशोधन प्रबंधांना आधारभूत असा हा प्रबंध होता.

न्यूहॅममध्ये फ्रॅंकलीनला शिकवणार्‍या काही प्राध्यापकांपैकी एक होते फ्रेंच वैज्ञानिक ऍड्रीएन वेईल्ल. भौतिकरसायनाबद्दल फारशी माहिती नसलेल्यांना पण कोळशाच्या सच्छिद्रतेबद्दल बरीच माहिती असलेल्यांसाठी भौतिकरसायनात उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधीबद्दल या वेईलसाहेबांकडे रोझलिंडने विचारणा केली असे सायरने म्हटले आहे. १९४६ अखेरीस एका परिषदेत वेईलसाहेबांनी रोझलिंडची ‘Centre National de la Recherche Scientifique (CNRS)’ , चे संचालक ‘मार्चेल मॅथ्यू’ यांच्याशी ओळख करून दिली. CNRS ही फ्रेंच सरकारने चालवलेल्या विज्ञानसंशोधन करणार्याल अनेक संस्थांची मध्यवर्ती संस्था होती. या ओळखीमुळे रोझलिंडला पॅरिसमधल्या Laboratoire Central des Services Chimiques de l'Etat च्या जॉक मेरिंग यांच्याकडून मुलाखतीचे बोलावणे आले.

हे मेरिंग होते कोण? मेरिंग हे एक क्ष किरण स्फटीकशास्त्री - एक्सरे क्रिस्टलोग्राफर होते. रेयॉन आणि इतर ऍमॉर्फस पदार्थांचा ते एक्सरे डीफ्रॅक्शन वापरून अभ्यास करीत. त्यामुळे आणखी प्रयोग करून त्यातून मिळणार्‍या परिणामांचे विश्लेषण करण्याला चालना मिळाली. या प्रयोगांतील निष्कर्षांचा रोझलिंडने कोळशाच्या समस्यांवर उपाय शोधायला वापर केला. खासकरून कोळशाचे ग्राफाईटमध्ये रूपांतर होतांना अणुरचनेत होणारे बदल यावर. या संशोधनावर रोझलिंडने अनेक शोधप्रबंध प्रसिद्ध केले. हा अभ्यासविषय ही कोळसाभौतिकी आणि कोळसारसायन या शास्त्रातील तत्कालीन वार्षिके आणि इतर नियतकालिकातील मुख्यधारेचा एक भागच ठरला. क्ष किरण डीफ्रॅक्शन पद्धत वापरून विविध रूपातील कार्बनचा अभ्यास मेरिंगने चालूच ठेवला. हे संशोधन आणखी पुढे गेले असते आणि योग्य तो इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक तिच्या हाती लागला असता तर कदाचित बकी बॉल आणि नॅनोट्यूब ही कार्बनची रूपे लौकर उजेडात आली असती व नॅनो तंत्र देखील कदाचित लौकर उदयास आले असते. परंतु असे होणार नव्हते.

काही असले तरी रोझलिंड फ्रॅंकलीन जगाला ठाऊक आहे ती पेकेच्या क्ष किरण प्रतिमा घेतांना तिने केलेल्या अथक परिश्रमांसाठी. या प्रतिमांमुळेच पुढे पेकेच्या दुहेरी दंडसर्पिलाकाराचा - ‘डबल हेलिक्स’चा (‘हेलिक्स’ ला दंडसर्पिलाकार असेच म्हणूयात. म्हणून डबल हेलिक्स = दुहेरी दंडसर्पिलाकार.) शोध लागला. हा आकार कसा असतो याची कल्पना दुहेरी दंडसर्पिल

इथे येऊ शकेल

फ्रॅन्सिस क्रीक म्हणतो की तिच्याजवळची माहिती आम्ही पेकेच्या अणुरचनेसंबंधातल्या ‘क्रीक ऍंड वॉटसन हायपोथेसिस’साठी खरोखरच वापरली. फ्रॅंकलीनने घेतलेली दुहेरी दंडसर्पिलाकार अणुरचनेचा एक पुरावा किंवा आधार ठरावा अशी प्रतिमा क्रीक-वॉटसनना दाखवतांना ना कोणी तिची संमती घेतली ना तशी ती दाखवणार म्हणून तिला कोणी कळवले.

तरीही ती प्रतिमा आणि त्यातून निघणारी माहिती यामुळे डीएनएची अणुरचना समजण्यासाठी एक अमूल्य अशी नवी दृष्टी मिळाली. या एका प्रतिमेमुळेच पेकेरचना उलगडण्याचे संशोधन नक्की पुढे गेले असे तिचे चरित्रकार म्हणतात. पेकेच्या अणुरचनेसंबंधातल्या रोझलिंड फ्रॅंकलीनच्या या योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आले असा एक मतप्रवाह आहे. ब्रेंडा मॅडॉक्स – एक अमेरिकन पत्रकार चरित्रकार लेखिका - हिने तर क्रीक वॉटसन यांच्या नेचर मधील प्रबंधावर रोझलिंड फ्रॅंकलीनचे देखील सहलेखिका म्हणून नाव असायला हवे होते असे म्हटलेले आहे.

खरे तर केवळ क्षकिडी प्रतिमा घेणे म्हणजे सगळे गूढ उकलले असे नाही. ही केवळ एक पायरी आहे. या रेणूतच जैविक माहितीचा साठा का व कसा असतो, ऍडोनीन, सायटोसीन, ग्वानीन वगैरे रेणू एकमेकांना कसे जोडले जाऊन साखळ्या जोडलेल्या असतात वगैरे अनेक तपशीलासह संपूर्ण पेके रेणूचे प्रारूप उभे करणे वगैरे पायर्‍या या संशोधनात येतात. त्यामुळे या दाव्यात तसा अर्थ नाही. असो.

तिच्या अप्रकाशित शोधनिबंधांच्या मसुद्यांवरून ध्यानात येते की तिने स्वतंत्रपणे दुहेरी दंडसर्पिलाकृतीचा सजल (हायड्रेटेड) असा ‘बी – फॉर्म’ तसेच रचनेच्या बाहेरच्या बाजूकडच्या फॉस्फेटांची स्थाने निश्चित केली होती. एवढेच नव्हे तर फ्रॅंकलीनने क्रीक आणि वॉटसन यांना व्यक्तिशः सांगितले होते की या जलाकर्षक साखळ्या बाहेरच्याच बाजूला असायला हव्यात. तरच ग्लुकोजसारखी जलविद्राव्य इंधने तसेच क्षार व रसायने पाण्यात विरघळलेल्या स्थितीत पेशीमध्ये आतबाहेर जाऊयेऊ शकतील. हे फारच महत्त्वाचे होते कारण त्यापूर्वी त्या दोघांनी आणि लीनस पाऊलिंग यांनी स्वतंत्रपणे जी प्रारूपे बनवली होती त्या प्रारूपात जलाकर्षक साखळ्या आतील बाजूला आणि बेसेस (अल्कली) बाहेरच्या बाजूला ठेवल्या होत्या. रसायनशास्त्रातले तिचे हे ज्ञान या नाट्यातील इतर पात्रांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे ठरले हे मात्र वादातीत आहे.

तिचे संशोधन ‘नेचर’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तीन लेखांच्या मालिकेत तिसर्‍या क्रमांकावर प्रसिद्ध झाले. पहिल्या क्रमांकावर होता क्रीक आणि वॉटसन यांचा लेख आणि या लेखात त्यांनी मांडलेल्या उपपत्तील रोझलिंड फ्रॅंकलीनच्या योगदानाचा केवळ निसटता उल्लेख होता अशी तिच्या चरित्रकारांची कैफियत आहे. असे का घडले? हे हेतुपुरस्सर घडले होते कां? यामध्ये लबाडी, वैयक्तीक हेवेदावे होते कां? का आणखी काही कारण होते?

जानेवारी १९५१ मध्ये किंग्ज कॉलेज, लंडन इथे रोझलिंड रिसर्च असोसिएट म्हणून काम करू लागली. ‘लंडन मेडिकल कौन्सिल’चे (MRC) हे एक ‘जीवभौतिकी’चे केंद्र होते. याचे संचालक होते जॉन रॅंडल. सुरुवातीला तिला दिलेले संशोधनविषय होता ‘प्रथिनांचे आणि मेदांचे क्ष किरण डीफ्रॅक्शन पद्धतीने पृथक्करण. परंतु १९५१ साली या केंद्रातली अनुभवी अशी ती सर्वोत्कृष्ट ‘क्ष किरण डीफ्रॅक्शन’ तज्ञ असल्यामुळे रॅंडलसाहेबांनी तिचा संशोधनविषय बदलून ‘पेके तंतूचे क्ष किरण डीफ्रॅक्शन पृथक्करण’ असा दिला. म्हणजे प्रथिने आणि मेद याऐवजी तिने आता पेकेवर काम सुरू केले. तंत्र मात्र क्ष किरण डीफ्रॅक्शनचेच. तिने किंग्ज कॉलेजमध्ये काम सुरू करण्यापूर्वीच हा बदल केला होता. मॉरीस विल्कीन्स याने सुरू केलेल्या मार्गदर्शक संशोधनाचे काम तिला पूर्णत्वाला न्यायचे होते. पीएचडीचा एक विद्यार्थी रेमंड गॉसलिंग हा या संशोधनातला अगोदर विल्कीन्सचा सहाय्यक होता. या दोघांनी अतिशय सामान्य दर्जाची उपकरणे वापरून डीएनए तंतूचे बर्याहपैकी क्ष किरण डीफ्रॅक्शन चित्रण केले होते. त्यामुळे तिच्या मनांत या विषयाविषयी कुतूहल जागृत झाले.

हाच रेमंड गॉसलिंग रोझलिंडला सहाय्यक म्हणून दिला गेला. विल्कीन्स आणि गॉसलिंग यावर मे १९५० पासून संशोधन करीत होते. रोझलिंड फ्रॅकलीनने जानेवारी १९५१ पासून याच संशोधनाची धुरा सांभाळायची होती तसेच गॉसलिंगच्या संशोधनाचाही आधार घ्यायचा होता. परंतु दुर्दैवाने रॅंडलसाहेबांनी ही गोष्ट ना विल्कीन्सला सांगितली ना रेमंड गॉसलिंगला. त्यामुळे पुढे विल्कीन्स आणि रोझलिंडमध्ये अनेक वाद निर्माण झाले आणि संशोधनाचे श्रेय रोझलिंड फ्रॅंकलीनला मिळू शकले नाही. या वादाचे अनेक कागदपत्र, लिखित पुरावे, आजही उपलब्ध आहेत.

रोझलिंडचे तत्कालीन समाजातले स्थान, मॉरीस विल्कीन्सचे समाजातले स्थान, त्या दोघांच्या तथाकथित सामाजिक स्तरातली दरी, तिची स्वभाववैशिष्ट्ये, त्याची स्वभाववैशिष्ट्ये यामुळे दोघांतले मतभेद विकोपाला गेले.कसे आणि पेकेच्या संशोधनात तिचे योगदान किती ते पुढील लेखांक क्र. ४ मध्ये.

जाता जाता फ्रॅंकलीनकडे पुन्हा एकदा वळूयात. किंग्ज कॉलेजमधील कर्मठ लिंगभेदी वातावरण स्वाभिमानी रोझलिंडला मानवले नाही. तिथल्या भोजनकक्षात खाण्यास स्त्रियांना परवानगी नव्हती. विल्कीन्सबरोबरचे संबंध देखील विकोपाला गेल्यामुळे तिने बर्कबेक इथे जायचे ठरवले. परंतु पेकेवर पुढे संशोधन न करण्याच्या अटीवरच तिला किंग्ज कॉलेज सोडायची परवानगी मिळाली.

कोळशाबरोबरच तिथे रोझलिंडने ‘टोबॅको मोझॅईक व्हायरस’ आणि ‘पोलिओ व्हायरस’ यावर भविष्यात मार्गदर्शक ठरेल असे महत्त्वाचे संशोधन केले. पुढे तिला ओव्हरीअन कॅन्सर झाला. या कामातले तिचे स्वारस्य इतके होते की कॅन्सरने जवळजवळ विकलांग झाली तरीही काही काळ ती प्रयोगशाळेत येऊन काम करीत असे. वयाच्या अवघ्या ३७व्या वर्षी दि. १६ एप्रिल १९५८ रोजी चेल्सी, लंडन इथे तिचा ओव्हरीअन कॅन्सरने मृत्यू झाला.

क्रमशः

विज्ञान

प्रतिक्रिया

नरेंद्र गोळे's picture

14 Feb 2014 - 8:24 pm | नरेंद्र गोळे

नमस्कार कांदळकर साहेब,

सुरेख जीवनगाणे लिहीत आहात. चोखंदळ मराठी शब्दरचना आणि सुरस आख्यान ह्यामुळे ही मालिका उत्तरोत्तर वाचनीय होत आहे. चालू ठेवा. मीही तुमच्या लिखाणातून शिकत आहे!

डीएनएच्या अणुरचनेचा शोधही तेवढाच महत्त्वपूर्ण आणि वैज्ञानिक प्रगतीला नवे वळण, नवे परिमाण देणारा आहे.>>>
डीएनए हा रेणू असतो. म्हणून अणुरचना म्हणू नका. ती रेणूरचना आहे. कारण ऍटम आणि मॉलिक्यूल ह्यांना मराठीत अनुक्रमे अणू आणि रेणू म्हणतात तर हिंदीत अनुक्रमे परमाणू आणि अणू. त्यामुळे कदाचित तुमची गल्लत झाली असावी.

ऍटम = अणू (मराठी) = परमाणु (हिंदी)
मॉलिक्यूल = रेणू (मराठी) = अणु (हिंदी)

अणुबाँब = अणुध्वम, अणुस्फोटक

एक्स रे क्रिस्टलोग्राफी = क्ष-किरण-स्फटिकालेखन
प्रोटीन क्रिस्टलोग्राफी = प्रथिन स्फटिकालेखन

डीएनए = डिऑक्सि-रायबो-न्युक्लिक-ऍसिड = अपान-शर्करा-पेशीकेंद्रकाम्ल = अपान-शर्करा-गर्भकाम्ल = अशपे
आरएनए = रायबो-न्युक्लिक-ऍसिड = शर्करा-पेशीकेंद्रकाम्ल = शर्करा-गर्भकाम्ल = शपे

डीफ्रॅक्शन = विवर्तन
स्प्रेक्टोस्कोपिस्ट = वर्णपटतज्ञ
डेमॉन्स्ट्रेटर = प्रात्यक्षिककार = सादरकर्ता
केमिकल कायनेटीक्स = रासायनिक गतीशास्त्र
रिसर्च फेलोशिप = संशोधक सदस्य
असिस्टंट रीसर्च ऑफिसर = सहाय्यक-संशोधन-अधिकारी
पोरॅसिटी = सच्छिद्रता
फिझिकल केमिस्ट्री = भौतिक-रसायनशास्त्र
सॉलिड ऑरगॅनिक कॉलोईड्स विथ स्पेशल रेफरन्स टू कोल = विशेषतः कोळशासंदर्भातील घन-सेंद्रिय-अविद्राव्य-साखा
डॉक्टरेट = विद्यावाचस्पती पदवी
ऍमॉर्फस पदार्थ = निर्जल पदार्थ
नॅनोट्यूब = अब्जांशनलिका
नॅनोटेक्नॉलॉजी = अब्जांश तंत्रज्ञान
डबल हेलिक्स = दंडसर्पिलाकार
हायपोथेसिस = गृहितक
हायड्रेटेड = सजल
हायग्रोस्कोपिक = जलाकर्षक
ग्लुकोज = शर्करा
बेस (अल्कली) = विम्ल, आम्लारी
ऍसिड = आम्ल
अनॅलिसिस = पृथक्करण
कॅन्सर = कर्करोग

व्हायरस = विषाणू
बॅक्टेरिया = जीवाणू

सुधीर कांदळकर's picture

15 Feb 2014 - 8:55 am | सुधीर कांदळकर

@गोळेसाहेब. माझा ढिसाळपणा खरा. मी शाळेत असतांना अ‍ॅटम = अणु आणि मोलेक्यूल = परमाणू असे प्रतिशब्द होते. लेख चढवतांना अणु चे रेणू करायचे ठरवले होते. काही ठिकाणी केले पण काही ठिकाणू राहून गेले. लेख चढवल्यावर त्यात बर्‍याच त्रुटी निर्माण झाल्या. र्‍य चा र्य वगैरे. ते निस्तरतांना काही ठिकाणी अणु राहून गेले. तरी मेंदूला बराच ताण देऊन आपण लेख वाचला आणि आपुलकीने मार्गदर्शन केले ते माझ्यासाठी नक्कीच मोलाचे आहे.

@संपादक मंडळः शक्य असेल तर कृपया अणु जिथे असेल तिथे रेणू करावे ही नम्र विनंती. काम किचकट आणि कंटाळवाणे आहे खरे, पण शक्य असेल तर करावे. तसदीबद्दल माफी असावी.