आमच्या १० वी ची पंचविशी..

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
23 Jul 2008 - 4:16 pm

आपल्याला क्रिकेटचा विश्वचषक जिंकून जितकी वर्षे झाली ना तितकीच वर्षं आम्हाला १० वीचा चषक जिंकून(की हारून?)झाली.
त्यामुळे पेपराततल्या रौप्यमहोत्सवाच्या बातम्या वाचून आमच्या मित्रमंडळींना आठवण झाली की आपल्या १०वीने पंचविशी गाठली की! मग एकेकाचे विरोप यायला सुरूवात झाली.मागच्या २ ,३ बॅचनी १० वीची पंचविशी कशी कशी साजरी केली त्याची वर्णनं समजायला लागली. 'हे विश्वची माझे घर'असल्याप्रमाणे आमची मित्रमंडळीही अशी जगभर सगळीकडे पसरली आहेत ,त्यांची एकत्र मोट बांधली जाईल तेव्हा जाईल पण विरोपाविरोपीला तर सुरूवात झाली.
१० वी नंतरही आत्ता आत्तापर्यंत आम्ही काही मित्रमैत्रिणी आवर्जून भेटतो.पण आता वाढत्या भौतिक अंतरांमुळे घाऊक प्रमाणातल्या प्रत्यक्ष भेटी फार कमी झाल्यात. भारतात गेल्या गेल्या एकेकाचा फोन फिरवू लागले.मनसोक्त गप्पा,हाहाहा,हुहुहु... सुरू झाले.संजू म्हणाला,"तुला एक मस्त न्यूज देतो.तुझी डार्लिंग मैत्रिण सुध्दा सध्या भारतात आहे." "काय? मनीषा? ?व्वॉऑऑऑऑऑऑव".. मी किंचाळलेली पाहताना दिनेशच्या चेहर्‍यावर बायको कामातून गेली.. असे भाव होते.युरोपातून मी आणि अमेरिकेतून मनिषा दोघीही चक्क एकाच वेळी भारतात! असं ठरवून सुध्दा झालं नसतं.त्रिखंडातल्या आम्हा मित्रमंडळींची मृदुला आणि गीताने मोट बांधली आणि दुसर्‍या दिवशी माझ्या आईकडे आणि बहिणीच्या मोबाईलवर समस आणि फोनांचा पाऊस सुरू झाला.त्यात मी मोबाईल जवळ न बाळगल्याबद्द्ल शिव्याही होत्या!संध्याकाळी ५ वाजता गीताच्या घरी जमायचे ठरल्याचे कळेस्तोवर ५ वाजून गेले होते.पण तरीही मी तिथे जाणारी शेवटची नव्हते,:)
जिना चढतानाच खिदळणे ऐकायला यायला लागले होते. वैद्यबाईंना पाहून आनंदाचा धक्काच बसला.बाईंनी कवेतच घेतले एकदम! सगळ्यांनी आपापल्या मुलांना दुसर्‍या खोलीत पिटाळले आणि नुसता दंगा सुरु झाला!संजयने एक कागुद दिला हातात.त्यात वर्गातल्या मुलांची नावं होती आठवतील तेवढी. बाकीच्यांनी आपापली स्मरणशक्ती ताणून त्यात भर घातली. बाईंना म्हटलं,बाई आता हजेरी घ्या..कोण कुठे कोणाच्या शेजारी बसायचं? कोणत्या तासाला जास्त दंगा करायचो? गॅदरिंगच्या गमती, ट्रीपची धमाल सगळ्या सगळ्याची उजळणी सुरू झाली.
आमची गणित आणि सायन्सची सेमीइंग्रजी माध्यमाची पहिली बॅच! शाळेतल्या काही शिक्षकांचा त्याला टोकाचा विरोध पण आमच्या वैद्यबाई आणि गोडबोलेबाईंनी मात्र खिंड लढवली!गणित आणि सायन्स शिकवणार्‍या त्या दोघी असल्याने इतरांचे काही चालले नाही आणि आजतागायत सेमी इंग्लिश माध्यम आमच्या शाळेत चालू आहे.
असं काही काही बोलत असताना जोरात वीजा कडाडल्या..आणि ती आठवण सगळ्यांनाच आली. ७वीत असतानाची गोष्ट.आमच्या लाडक्या गाडगीळबाईंचा इंग्लिशचा तास चालू होता. सगळे एकदम तल्लीन झाले होते.एकदम विजा कडाडायला लागल्या आणि सगळेच दचकले.माझ्या शेजारच्या बाकावर बसलेल्या मंजूने एकदम उडी मारली आणि मला मिठीच मारली तिने.सगळे एकदम हसायला लागलो,बाई तर सगळ्यात जास्त.. लग्गेच तिला पुण्याला फोन लावून सगळा दंगा ऐकवला,एवढ्यात नरेंद्र आला.अजून अमूल कसा नाही आला म्हणून शेवटी बाईंनीच त्याला फोन लावला.
१० वीच्या सुटीत आमच्या खास ट्रीपसाठी आलेल्या जोशीबाई आणि गुप्तेबाई आठवल्या. गुप्तेबाईंनी म्हटलेलं गाणंही.. १२ वीच्या सुटीतली बारवी डॅमची ती सहल आणि त्यातूनच पुढे आजपर्यंत टिकलेला आमचा ग्रुप.. वैद्यबाईंच्या घरी जमून केलेला दंगा.. विकास एम एस करायला अमेरिकेला निघाला तेव्हा त्याला दिलेला निरोप,संजूने केलेली झक्कास पावभाजी,फक्त सगळ्या मुलींनीच एकदा रात्री बाईंकडे जमून पाहिलेला इजाजत,सुजाताचं म्युरल पहायला मुलुंडला गेलेल्या मी आणि वैद्यबाई,मनीषाकडे गोरेगावला केलेली धमाल,आमच्या घराच्या गच्चीत रात्रभर जागवलेली कोजागरी,पावसाळ्यातली माथेरान सहल आणि ऍमब्युलन्स मधून केलेली दिवेआगरची ट्रीप..सगळं सगळं ताजं, आत्ता घडल्यासारखं वाटत होतं..
१०वीत असताना गॅदरिंगसाठी गोडबोले बाईंनी आमचं नाटुकलं बसवलं,पुलंच रविवारची कहाणी! खरं तर आमच्या क्लासटीचर वैद्यबाई पण त्यांची सख्खी मैत्रिण असलेल्या गोडबोलेबाईंनी स्वत:हून आमचं नाटुकलं गॅदरिंगसाठी बसवलं होतं.पुढे किती तरी वर्षांनी शंतनुच्या कॉलेजमध्ये आम्ही ते नाटक सादर करणार होतो म्हणून खास ते पहायला ठाण्याहून बाई 'नायर मेडिकल'ला आल्या होत्या त्याचीही आठवण झाली. गोडबोलेबाईंना जाऊन आता वर्ष होईल..सगळेच उदासलो.
संदीप आणि गीतूने केक आणला होता,भला मोठ्ठा! १९८३ ते २००८ असं झोकदार अक्षरांत लिहिलेला..बाईंना केक कापायला लावला.प्रत्येकाला बाईंनी केक भरवला. फोटोंचा धमाका उडाला.गीताने तिच्या दवाखाना आणि ऑपरेशन्स मधून वेळ काढून कधी तयारी केली होती तिलाच माहित! मस्त मिसळ,ढोकळा आणि जोडीला रशोगुल्ले..अर्थात संजयनेही मदत केली होतीच की..
प्रसादने आता नवी आयडीया काढली.सगळे जण मिळून एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीबरोबर कुठेतरी ट्रीपला जाऊ..म्हणजे मस्त एकत्र चार आठ दिवस राहता येईल!शेखचिल्लीचे पुलाव परत शिजायला लागले.गिरसप्प्यापासून नायाग्रापर्यंतची सगळी ठिकाणं जमेस धरून आणि बादही करून झाली. घड्याळ पुढे धावत होतं तरीही मनातून कोणालाच घरी जायचं नव्हतं.पूर्वीचे दिवस असते तर नक्कीच रात्र जागली असती पण "वक्त की दिमतने" सगळ्यांनाच मर्यादा घातल्या गेल्या होत्या.८३च्या सगळ्या बॅचचे,मोठ्ठे संमेलन डिसेंबरमध्ये कधी भरेल तेव्हा जाऊ शकेनच हे सांगता येत नाही पण अचानक ओंजळीत आलेले हे आनंदक्षण म्हणजे ह्या भारतवारीत मिळालेला मोठ्ठा बोनस!

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

23 Jul 2008 - 6:04 pm | प्रमोद देव

मजा वाटली वाचून!
शालांत परीक्षा (आमच्या वेळी ११वी होते.) मार्च १९६८ ला पास झाल्याला मला ह्यावर्षी ४० वर्षे पूर्ण झाली. पण हे असले एकत्र भेटणे वगैरे आमच्या नशिबात नाही बॉ. अधून मधून कुणी तरी एखाद दुसरा भेटतो.चार सुखदु:खाच्या गोष्टी बोलतो आणि आपापल्या वाटेने निघून जातो. पण स्वाती तू सांगितलेली मजा वाचून मनात विचार आला की आम्ही का बरे असे नाही भेटलो?
असो. छान आठवण लिहिलेस.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मनस्वी's picture

23 Jul 2008 - 6:05 pm | मनस्वी

मस्त लिहिलंय स्वातीताई. खूप आवडलं.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

वरदा's picture

23 Jul 2008 - 6:06 pm | वरदा

लकी आहेस की तुझे सगळे फ्रेंडस आहेत अजुन तिथेच्...माझ्या ग्रुप चं कुण्णीच नाही भारतात :(
प्रत्येकाला बाईंनी केक भरवला. फोटोंचा धमाका उडाला
आम्हालाही पाहू ना थोडे फोटो
अचानक ओंजळीत आलेले हे आनंदक्षण म्हणजे ह्या भारतवारीत मिळालेला मोठ्ठा बोनस!

खरच गं सगळे जण नुसते ओर्कुटवर भेटले तरी खूप वाट्टं मला तर प्रत्यक्ष भेटल्यावर किती छान वाटलं असेल्.....सॉल्लीड
मस्तच लिहिलयस एकदम सहज.....

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jul 2008 - 9:08 am | बिपिन कार्यकर्ते

स्वाती, सद्ध्या सगळ्यांनाच 'नॉस्टॅल्जिया' झालेला दिसतो आहे. काल परवा १-२ छान कविताही आल्या आहेत मिपा वर.

मला १० वी पास झाल्याला पुढच्या वर्षी २५ (२५!!!!!!) वर्षे पूर्ण होतील. आम्हीही काही मित्र जमवाजमवी करतो आहोत. बघु तुमच्या सारखी धमाल करत येते का?

बिपिन.

संदीप चित्रे's picture

24 Jul 2008 - 8:06 am | संदीप चित्रे

मला २०११ साली दहावी पास होऊन २५ वर्षे होतील :)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

भाग्यश्री's picture

23 Jul 2008 - 10:52 pm | भाग्यश्री

वा...मस्तच जमलाय लेख! मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा आनंद लेखातल्या अगदी ओळी-ओळीतून दिसतोय!
खूप आवडलं तुमचं गेट-टुगेदर..! अशा अनपेक्षीतच गाठी-भेटी जास्त छान होतात का..! :) आम्ही इतक्या वेळा ठरवलं पण कधी जमलंच नाही..बहुधा, २५ वर्षांनीच जमेल! :)

केशवसुमार's picture

23 Jul 2008 - 10:59 pm | केशवसुमार

स्वातीताई,
मस्त लेख.. आवडला..
मी लगेच हिशेब केला.. २४ वर्षे झाली..काळ कसा भर्रकन जातो..
(नॉस्टॅल्जिक)केशवसुमार

विकास's picture

23 Jul 2008 - 11:20 pm | विकास

अजून मजा येऊ शकली असती, पण वेळे अभावी तेंव्हा तेथे नव्हतो :-(

तेंव्हा असले लेख लिहून माझ्या सारख्या पामराला त्रागा करण्यास लावल्याबद्दल आभार! ~X(

बाकी आता फोटोची लिंक व्यनिने पाठव. :W

आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद! :-)

प्राजु's picture

23 Jul 2008 - 11:34 pm | प्राजु

स्वातीताई,
माझ्याही सगळ्या आठवणी जाग्या केल्यास... खूप छान वाटलं सगळं वाचून.
अभिनंदन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

23 Jul 2008 - 11:34 pm | सर्किट (not verified)

वर्णन आवडले.

(काही गुप्तहेर सर्वांच्या वयाच्या नोंदी करण्यात गुंतलेले आहेत, असे दिसते ;-))

(स्वगतः मिसळपावावर चाळिशी च्या आसपास असणार्‍यांची संख्या लक्षात घेता येथे चष्मे विकण्याचा धंदा सुरू करावा का?)

- सर्किट

प्रियाली's picture

23 Jul 2008 - 11:37 pm | प्रियाली

वर्णन आहे. यावेळेसही बरीच मजा केलेली दिसते.

काही गुप्तहेर सर्वांच्या वयाच्या नोंदी करण्यात गुंतलेले आहेत, असे दिसते.

सर्केश्वर वॅट्सन, ८३ बद्दल विशेष प्रेम दिसतंय. काही गुप्तहेर वयांच्या मागावर का असतात हो?

सर्किट's picture

23 Jul 2008 - 11:48 pm | सर्किट (not verified)

काही गुप्तहेर वयांच्या मागावर का असतात हो?

संबोधन कुठले वापरावे, ह्याचे योग्य निर्णय घेणे सोपे पडावेत म्हणून. बाळे/ताई/मावशी/आजी किंवा बाळ/भौ/काका/आजोबा.

मागे एकदा कुणाला तरी काका म्हटल्यावर ते यवढे उखडले, की मी हल्ली ताकही फुंकून पितो.

- सर्किट

धमाल मुलगा's picture

31 Jul 2008 - 5:25 pm | धमाल मुलगा

हा टोला मला तर नसावा ना? :?
;)
(शंकासुर) ध मा ल.

प्रियाली's picture

31 Jul 2008 - 5:29 pm | प्रियाली

सर्केश्वर तुलाही काका म्हणाले होते? =))

त्यांनी शाळेत वयाची गणिते सोडवली नव्हती का काय कोणास ठाऊक?

धमाल मुलगा's picture

31 Jul 2008 - 6:06 pm | धमाल मुलगा

गंडलो ना मी!!!

मी त्यांच्या पहिल्या वाक्यांबद्दल बोलत होतो.
मीच त्यांना काका म्हणतो. (आणि ते चिडत नाहीत हे माझं नशीब, नाहीतर काय काय ऐकावं लागलं असतं देव जाणे! )

विकास's picture

23 Jul 2008 - 11:52 pm | विकास

आम्ही कुण्णाला कुठल्याही चष्म्यातून पहात नाही. :-)

(स्वगतः मिसळपावावर चाळिशी च्या आसपास असणार्‍यांची संख्या लक्षात घेता येथे चष्मे विकण्याचा धंदा सुरू करावा का?)
ए ए आर पी कडून डिसकाउंटमधे मिळतात वाटते! =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jul 2008 - 9:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

(स्वगतः मिसळपावावर चाळिशी च्या आसपास असणार्‍यांची संख्या लक्षात घेता येथे चष्मे विकण्याचा धंदा सुरू करावा का?)
आम्ही तर दहावीपासूनच (हुशार दिसण्यासाठी) चष्मा लावायला सुरूवात केली ... १० वर्षांपूर्वी

:B अदिती

सुचेल तसं's picture

23 Jul 2008 - 11:47 pm | सुचेल तसं

वैद्यबाईंच्या घरी जमून केलेला दंगा.. विकास एम एस करायला अमेरिकेला निघाला तेव्हा त्याला दिलेला निरोप,संजूने केलेली झक्कास पावभाजी,फक्त सगळ्या मुलींनीच एकदा रात्री बाईंकडे जमून पाहिलेला इजाजत,सुजाताचं म्युरल पहायला मुलुंडला गेलेल्या मी आणि वैद्यबाई,मनीषाकडे गोरेगावला केलेली धमाल,आमच्या घराच्या गच्चीत रात्रभर जागवलेली कोजागरी,पावसाळ्यातली माथेरान सहल आणि ऍमब्युलन्स मधून केलेली दिवेआगरची ट्रीप

वा!!! भलताच active दिसतोय तुमचा ग्रुप. ग्रुपमधले काही लोक तरी असे उत्साही हवेत.

http://sucheltas.blogspot.com

शितल's picture

24 Jul 2008 - 1:53 am | शितल

स्वाती ताई,
तुम्हाला झालेला आनंद शब्दातुन व्यक्त होतो आहे, खुप छान वाटले असेल तुम्हाला खरंच खुप छान वाटते शाळेतील मित्र मैत्रीणी भेटल्याकी अगदी जवळचे नाते तयार झालेले असते कितीही काळ लोटला तरी त्यातील ओलावा टिकुन राहतो .

मुक्तसुनीत's picture

24 Jul 2008 - 1:56 am | मुक्तसुनीत

तुमच्या ग्रुपचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे ! लेख खूप आवडला ..

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Jul 2008 - 2:00 am | llपुण्याचे पेशवेll

अरेच्चा तुमच्या पंचविशी मुळे मला पण आठवले की मला पण १०वी होऊन ९ वर्षे झाली. बाकी ग्रुप भलताच ऍक्टिव आहे. :)

पुण्याचे पेशवे

भाग्यश्री's picture

24 Jul 2008 - 2:40 am | भाग्यश्री

पेशवे साहेब १६ वर्षांनी ठरवूया आपण पण गेट-टुगेदर.. लक्षात ठेवा.. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Jul 2008 - 2:43 am | llपुण्याचे पेशवेll

ऑर्कुट कृपेमुळे का होईना पण अजूनतरी शाळेतले बरेच जण संपर्कात आहेत.
अवांतरः बाकी वर्गातले बरेच जण सध्या अमेरीकेतच आहेत. कदाचित हा गेट टुगेदर अमेरीकेतच करता येईल. काय म्हणतेस? बराबर का नाही.

पुण्याचे पेशवे

चतुरंग's picture

24 Jul 2008 - 2:01 am | चतुरंग

लिखाणातून ओसंडून वाहणारा तुमचा उत्साहच सांगून गेला की तुम्ही किती अन काय काय मजा केलीत!:)

आमच्या १० वी च्या बॅचचे स्नेहसम्मेलन मागल्यावर्षी झाले आमच्या शाळेत. मी जाऊ शकलो नव्हतो पण नंतर मित्रांकडून साद्यंत वृत्तांत कथन करुन घेतला होता त्याची आठवण झाली!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

24 Jul 2008 - 1:14 pm | विसोबा खेचर

लिखाणातून ओसंडून वाहणारा तुमचा उत्साहच सांगून गेला की तुम्ही किती अन काय काय मजा केलीत!

असेच म्हणतो..!

स्वाती, इतक्या वर्षांनंतर तुम्ही सगळे एकत्र भेटलात, धमाल-मजा केलीत याचं हे खरंच कौतुकास्पद आहे! :)

आपला,
(दहावी पास - १९८४ - ६७.२८ %) तात्या.
:)

बेसनलाडू's picture

24 Jul 2008 - 4:23 am | बेसनलाडू

साधासोपा लेख आवडला.
(वाचक)बेसनलाडू

मेघना भुस्कुटे's picture

24 Jul 2008 - 7:48 am | मेघना भुस्कुटे

मस्त लेख! शाळेची आठवण झाली.
बाय दी वे, आम्हांला गेट टुगेदर करायची गरज नाही पडलीय अजून. ९७ ची ब्याच अजुनी भेटतेय बरं का रेग्युलरली! :P
सॉरी, जळवण्याचा थोडा मोह आवरला नाही! हघ्याहेसांनल!

संदीप चित्रे's picture

24 Jul 2008 - 8:03 am | संदीप चित्रे

स्वाती ..
खूप भाग्यवान आहात दहावीच्या पंचविशीला इतका दंगा करता आला म्हणून :)
आता दहावीवच्या चाळिशी आणि पन्नाशीलाही असेच काही करता यावे ह्या शुभेच्छा !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

यशोधरा's picture

24 Jul 2008 - 8:09 am | यशोधरा

मस्तच लिहिलेस स्वातीताई, खूप आवडले!

ऍडीजोशी's picture

24 Jul 2008 - 2:54 pm | ऍडीजोशी (not verified)

नशिबवान आहात स्वाती ताई. आमच्या नशिबी हे सूख नाही. म्हणजे शाळू सोबती न भेटल्याचं दु:ख नाहिये. त्यांना बरीच वर्ष मिस करून नंतर भेटल्याची मजा अम्हाला नाही. ते सगळे नालाकय जाता येता कायम, कुठेही भेटत असतात :) माझी शाळा घराजवळच असल्याने आजूबाजूला रहाणार्‍या सगळी डांबरट कर्ट्यांना आई-बाबांनी लक्ष ठेवता यावं म्हणून त्याच शाळेत घातलं होतं. त्यामुळे अजूनही घराबाहेर पडलं की कुणी ना कुणी जोश्या XXXXXX म्हणून हाक मारतच :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jul 2008 - 9:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यामुळे अजूनही घराबाहेर पडलं की कुणी ना कुणी जोश्या XXXXXX म्हणून हाक मारतच
आणि ४-५ लोकं वळून पहातात?

अदिती जोशी

नंदन's picture

26 Jul 2008 - 7:34 am | नंदन

लेख. वाचून छान वाटलं. यंदा जमवू या, म्हणत म्हणत राहून गेलेलं आमच्या शाळेतल्या दहावीच्या बॅचच्या गेट-टुगेदरची आठवण झाली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

28 Jul 2008 - 12:34 pm | स्वाती दिनेश

सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद,
स्वाती

चित्तरंजन भट's picture

30 Jul 2008 - 12:47 am | चित्तरंजन भट

रौप्यमहोत्सवी आठवणींचा सुरेख लेख फारफार आवडला. वैद्यबाई, गोडेबोलेबाई, जोशीबाई आणि गुप्तेबाईंसारख्या शिक्षिका तुम्हाला लाभल्या. तुम्ही फार भाग्यवान आहात.

सखी's picture

30 Jul 2008 - 2:04 am | सखी

असेच म्हणते गं स्वाती - भाग्यवान तर आहातच, पण इतके वर्षे तुम्ही संपर्कात राहणे हे सुद्धा मला कौतुकास्पद वाटते.

स्वाती दिनेश's picture

31 Jul 2008 - 2:35 pm | स्वाती दिनेश

चित्त आणि सखी,
अभिप्रायाबद्दल धन्यु.
स्वाती

लबाड मुलगा's picture

31 Jul 2008 - 3:10 pm | लबाड मुलगा

छान लेख आहे

पक्या (एम ए बी एफ)

आमच्या १० वीच्या वर्गाची सुद्धा २५शी साजरी करण्याचा माझा विचार होता.

त्याप्रमाणे मी एक/दोघांना भेटलो होतो, परंतु दैनदिन जीवनातच ते इतके त्रस्त आणि व्यस्त होते की काळाचे बंधन अथवा अप्रुप असते हेच मला त्यांच्या कडे बघुन समजु शकले नाही. ( मी उपजिवेकेसाठी ८०० किमी दुर राहत होतो.)

माझ्या बर्‍यापैकी वर्गमैत्रिणींच्या मुला/मुलीचे लग्न झाले होते याचेही मला अप्रुप वाटत होते.

मात्र आजही गावाकडे गेल्यावर शाळा बघुन येतो. काळ कसा पुढे जात असतो याची जाणिव होत असतो.

एकाच बाकावर बसणार्‍या लोकांचे जग इतके बदलु शकते अथवा विभिन्न असु शकते यावर विश्वास बसु शकत नाही.

१० वीची आठवण झाली म्हणजे खेड्यात राहण्याचा बराच तोटा असतो हेही मनाला वाटत असते.

आज बर्‍यापैकी शिक्षक काळाच्या पडद्याआड गेले आहे, काही वर्गमित्रही दगावले आहे आणि काहीची वाताहत झाली आहे.

तरीपण, कोई लौटादे मुझे बिते हुये दिन असे म्हणावेसे वाटते....

ऋषिकेश's picture

2 Aug 2008 - 5:12 pm | ऋषिकेश

वा वा वा!
लै मजा केलेली दिसते.. :)
वर म्हटल्याप्रमाणे तुमच्या लिखाणातच इतका उत्साह आणि आनंद जाणवतो आहे की बस्स!
बाय द वे, इतक्या वर्षांनंतर प्रत्येकाला ओळखलंत का? ;)

एक विचारू का? तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं का? (नाहि नाहि ते प्रश्न विचारू नकोस) ;) ;)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2008 - 1:20 pm | स्वाती दिनेश

पक्याराव्,कलंत्रीजी,ऋषीकेश
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
कोई लौटादे मुझे बिते हुये दिन असे म्हणावेसे वाटते....
अगदी खरं..
बाय द वे, इतक्या वर्षांनंतर प्रत्येकाला ओळखलंत का? एक विचारू का? तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं का?
:) हो.. न ओळखायला काय झालं? सगळे एकमेकांना अगदी ओळखून आहेत,;)
स्वाती