गुरुर्बह्मा आणि संशोधनक्षेत्रातील निगरगट्टपणा

Atul Thakur's picture
Atul Thakur in जनातलं, मनातलं
14 Jan 2014 - 9:48 pm

आपल्याकडे आपल्या पुर्वजांनी गुरुचं माहात्म्य सांगताना कसल्याही मर्यादा पाळलेल्या नाहीत त्यामुळे गुरु हा प्रकार सोकावलेला असुन त्याची फळं आपल्याला भोगावी लागत आहेत. अगदी पुर्वापारपासुन कुणी आपल्या आवडत्या शिष्यापेक्षा दुसरा पुढे जाऊ नये म्हणुन अंगठा कापुन घेतं, तर कुणी मुलाला जास्त विद्या मिळावी म्हणुन कपट करतं. गुरुची झोपमोड होऊ नये म्हणुन शिष्याने भुंग्याला आपली मांडी पोखरु दिली तर त्याला काय फळ मिळाले? विद्या वापरायच्या ऐनवेळी विसरशील हा गुरुचा शाप. आणि अशा गुरुंच्या नावे गळे काढणारी, त्यांच्या नावाने पारितोषिके देणारी मंडळी नंतर अवतरली. अध्यात्मात आणि कला क्षेत्रात तर गुरुचं नाव घेतल्यावर कान चिमटीत जाणे आणि सद्गदीत होणे हे नेहेमीचेच. कुणी गाणं शिकायला गुरुकडे पाणी भरलं, लाकडं फोडली आणि या कथा कौतुकाने सांगितल्या गेल्या. किंबहुना त्याचमुळे अभ्यास आणि शिक्षण ही अत्यंत कष्टाने, परिश्रमाने साध्य होणारी बाब आहे असे सर्वसामान्यांच्या मनी बिंबले. मात्र हे कष्ट आणि परिश्रम हे अभ्यासावर घ्यावे लागत नसुन गुरुचा बेजबाबदार लहरीपणा सांभाळण्यासाठी घ्यावे लागतात हे संशोधन क्षेत्रात गेल्याशिवाय कुणाला फारसं कळण्याची शक्यता नाही.

सामाजिक शास्त्रे या विषयात हा त्रास वेगळ्या प्रकारचा असतो. विज्ञान विषयात कमीत कमी दोन अधिक दोन चार असं जर शिष्याने म्हटलं तर मनात नसलं तरी गुरुला होकार हा द्यावाच लागतो. मात्र सामाजिक शास्त्राची गोष्ट तशी नाही. इथे मार्क्सचे चाहते आणि विरोधी यांच्यात जुंपलेली असते. त्यामुळे तुमच्या कुठल्याही विधानाला गुरुकडे प्रत्युत्तर असतेच आणि त्याला आवश्यक असा सर्वे देखिल असतो त्यामुळे “चित भी मेरी पट भी मेरा” असा प्रकार असतो. यामुळे होतं काय की साधं सिनॉप्सीस दाखल करायचं झाल्यास गुरुकडे घालाव्या लागण्यार्‍या हेलपाट्यांना कसलाच घरबंध नसतो. गुरु वाटेल तितका वे़ळ शिष्याला छळु शकतो. त्यानंतर अठरा ड्राफ्टनंतर गाईडने सिनॉप्सीस मान्य केला वगैरे गोष्टी फुशारकीने सांगितल्या जातात, आणि काही महामुर्ख शिष्यांना यातदेखिल अभिमान वाटतो.

विभागातले वातावरण राजकारणाने बुजबुजलेले असते. त्यात ज्याच्याकडे जास्त विद्यार्थी त्याची तंगडी वर असा प्रकार असल्याने चांगल्या विद्यार्थ्यांना कळपात ओढण्याचे प्रकार सुरु असतात. गावाकडुन आलेल्या हुशार परंतु इंग्रजीत कमकुवत असलेल्या विद्यार्थ्याचे हाल कुत्रादेखिल खात नाही. नवीन नियमाप्रमाणे अनेक चाचण्यांमधुन पार पड्ण्याचे दिव्य करावे लागते. त्यात मुलाखत नावाचा अत्यंन हिन दर्जाचा प्रकार असतो. तेथुन रडत परत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या हकिकती ऐकु येतात. पुढे कोर्सवर्क नावाचा प्रकार सुरु होणार असतो. तो सुरु झाल्यास विद्यार्थ्याने स्वतःला नशिबवान समजावे. कारण हे सहा महिने सक्तीचे असतात. ते सुरु न झाल्यास तुमचा बराच वेळ वाया जाण्याची शक्यता असते. प्राध्यापक मंडळींना स्वतःच्या राजकारणातुन, पुस्तके लिहिण्यातुन, देशोदेशी सेमिनारमध्ये हिंडण्यातुन फुरसत मिळाली तर ते आपला वेळ शिकवण्यास देतात. त्यातुन कोर्स वर्क साठी वेळ काढणे म्हणजे फारच झाले. त्यामुळे जास्त पीएचडी विद्यार्थी जमल्यास वर्ग सुरु करु असा बनिया प्रकार सुरु होतो ज्यात विद्यार्थ्यांचा बराच वेळ, कदाचित एक वर्ष देखिल वाया जातं.

विद्यार्थ्याने स्वत:ला आवडेल तो विषय निवडावा म्हणजे त्याचा संशोधन करण्यातला रस शेवटपर्यंत टिकेल असा प्रेमळ सल्ला गुरुमाऊली देते मात्र विषयाची चर्चा करायला गेल्यावर आपले राहिलेले, अडगळीत पडलेले, प्रोजेक्ट चालु असलेले संशोधन विद्यार्थ्याच्या माथी मारण्याचा भरपुर खटाटोप केला जातो आणि बहुतेक विद्यार्थी त्याला बळी पडतात. कठीण संशोधनात पडुन उगीच डोक्याला ताप करण्यापेक्षा “बिकट वाट वहिवाट नसावी” हे सूत्र कसोशीने पाळले जाते. काही शिष्योत्तम मात्र सोपा विषय निवडण्याच्या मागेच असतात हे देखिल नमुद करायला हवं. हे उभयपक्षी बरे असते.

बर्‍याच गाईडसचा विशिष्ठ तत्वज्ञानाकडे कल असतो. काहींचे, खरं सांगायचं तर सर्वांचे छुपे अजेंडा असतात. दलित विषयाला वाहुन घेतलेले गाईडस तो विषय, विशिष्ठ जाती यांचे हित सांभाळण्यात गुंतलेले दिसुन येतात आणि विद्यार्थ्यांकडुनही तीच अपेक्षा ठेवतात. मार्क्सीस्ट गाईडना तर मार्क्सवर टिका केली कि कुंकु पुसल्याइतकं दु:खं होतं. फेमिनिस्ट प्राध्यापकांची वेगळी चुल असते. तेथे फर्ड्या इंग्रजीचे महत्व जास्त दिसुन येते. फेमिनिझम आणि डायसपोरा याकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या पेहराव, राहणीमान आणि भाषा यात वेगळेपणा जाणवतो. उच्च वर्णिय किंवा त्याकडे कल असलेल्या प्राध्यापकांची दलित विषयावर ठराविक मते असतात. त्यामुळे काही एक वेगळा विषय घेऊन काम करण्याची इच्छा असणार्‍या विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. मग काही चलाख विद्यार्थी निघतात. त्यांना अभ्यासात रस नसतो पण पीएचडीत असतो. ते प्राध्यापकांच्या ओल्यापार्ट्यांना बाटल्या आणण्यापासुन ते अगदी गाड्यांची सर्विसिंग करण्यापर्यंत सेवा पुरवणं सुरु करतात. ही मंडळी खुप पुढे जातात, परदेशी दौरे काय मग सर्वच वाटा सुलभ होऊ लागतात.

गाईडचा कडकपणा हा विकृत वाटावा या थराला गेल्याची देखिल उदाहरणे आहेत. खाजगीत झालेल्या गोष्टींचा राग गरीब विद्यार्थ्यांवर काढणे तर नेहेमीचेच. काहीएक उद्देशाने उच्चशिक्षणाकडे वळणार्‍यांना बाहेर चारचौघांना ऐकु जाईल इतक्या जोरात अंगावर खेकसुन ओरडण्यात आपण काही गैर करत आहोत हे या वयाने वाढलेल्या गुरुमाऊलींच्या गावीही नसते. यात अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही की हे सर्व रास्त आहे. संशोधन ही अशीच कठीण बाब असते, हे सर्व सहन करावेच लागते असे मानणारी एक षंढ पिढी जन्माला आली आहे. त्यामुळे याबाबत कुठे काहीही बोलता येत नाही. मला माझ्या जेष्ठ स्नेह्यानेअनुभवी आणि प्रेमळ सल्ला दिला होता. तो म्हणाला” तुला पीएचडी करायचंय? मग जर तुझा गाईड म्हणाला अरे माझी पँट फाटलीय. तर तत्काळ सुईदोरा घेऊन, आत्ता शिवुन देतो साहेब असं तु म्ह्णु शकलास तरच तुला पीएचडी करता येईल”.

अर्थात याला सन्माननीय अपवाद आहेतच. विद्यार्थ्याला चहा बनवुन देणारे, त्याच्या पायाची जखम स्वतः औषध लावुन बांधुन देणारे, इंग्रजी न आल्यास त्याला मदत करणारे, स्वतःच्या संगणकावर विद्यार्थ्याचे सिनॉप्सीस डीझाईन करणारे, संशोधनाच्या दरम्यान अडचण आल्यास विद्यार्थ्याला सर्व प्रकारची मदत करणारे, वैयक्तीक बाबीत सल्ला देण्याइतकी जवळीक साधणारे, थोडक्यात प्रेमळ पित्याची भुमिका निभवणारे देखिल गाईड सुदैवाने पाहायला मिळाले आहेत. पुलंचे चितळे मास्तर हे मला पुलंच्या बटाट्याच्या चाळीइतकेच अपवादात्मक वाटतात. मात्र पुलंचेच एक विधान संशोधन क्षेत्रात बरेचदा चपखल लागु पडते. गुरुबीन कौन बतावे वाट्…गुरुशिवाय कोण वाट लावणार????

अतुल ठाकुर

शिक्षणअनुभव

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

14 Jan 2014 - 10:36 pm | आयुर्हित

नमस्कार,
PHD मिळवायची trik दिल्याबद्दल धन्यवाद.
आजकाल होणारा छळ मान्य आहे,नाइलाज आहे त्याला! (नाइलाज को क्या इलाज ???)

गुरुची झोपमोड होऊ नये म्हणुन शिष्याने भुंग्याला आपली मांडी पोखरु दिली तर त्याला काय फळ मिळाले? विद्या वापरायच्या ऐनवेळी विसरशील हा गुरुचा शाप.

याबाबतची खरी गोष्ट अशी आहे:
परशुराम केवळ ब्राह्मणांनाच शस्त्रास्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाने असत्य बोलून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला, आणि ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून घेतली. परंतु त्यानंतर एकदा परशुराम त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना, एका भुंगा किड्याने त्याची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. गुरूंची झोपमोड होऊ नये म्हणून कर्णाने त्या वेदना सहन केल्या, परंतु रक्ताचा ओघळ लागून परशुराम जागे झाले. एक ब्राह्मण एवढ्या वेदना सहन करू शकत नाही, हे लक्षात येताच त्यांनी कर्णाचे खरे कूळ विचारले. सत्य कळताच त्यांनी कर्णाला शाप दिला, की ऐन युद्धप्रसंगी त्याला ब्रह्मास्त्राचे स्मरण होणार नाही.

चु.भु.दे.घे.
आपला मिपास्नेही : आयुर्हीत

आदिजोशी's picture

15 Jan 2014 - 6:26 pm | आदिजोशी

कर्णावरील तथाकथीत अन्याय दाखवण्यासाठी कर्णाचा मुळातला खोटारडेपणा नेहेमीच सोयीस्कररित्या नजरेआड केला जातो.

लेखकाचा व्यासंग बघता ही पूर्ण गोष्ट मुळातून माहिती नसेल ह्यावर विश्वास बसत नाही आणि त्या सोबतच लेखकाची थोडी फार आंतरजालीय ओळख असल्याने माहिती असूनही ते मुद्दाम असं लिहितील ह्यावरही विश्वास बसत नाही.

महागुरूंना फोन करायला हवा.

परशुराम केवळ ब्राह्मणांनाच शस्त्रास्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाने असत्य बोलून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला,

परशुराम हा ब्राह्मण आणि क्षत्रियांनाही शस्त्रास्त्रविद्या शिकवीत होता. आदिपर्व आणि उद्योगपर्वातील अंबोपाख्यान्यात भीष्माने भार्गव परशुरामकडून अस्त्रविद्येचे शिक्षण घेतल्याचे उल्लेख आलेत.
स्वतः कर्णसुद्धा भार्गवरामाला सफाई देतांना मी ब्राह्मण अथवा क्षत्रिय नसून सूत असल्याचे सांगतो तर परशुरामसुद्धा कर्णाला शाप देतांना तू (ब्राह्मण असल्याचे) असत्यकथन केलेस इतकेच म्हणतो.

बॅटमॅन's picture

16 Jan 2014 - 1:03 pm | बॅटमॅन

हे रोचक आहे. माहितीकरिता धन्यवाद!!!

च्यायला कमालच आहे. महाभारत गुरुंच्या अनेक चमत्कारीक आणि भन्नाट गोष्टींनी भरलेलं आहे. व्यासांनी लिहिलेल्या किती आणि नंतर घुसवण्यात आलेल्या किती ते माहिती नाही.

नक्कीच!!!! दु र्दैवाने पूर्ण महाभारत वाचन झालेले नाही अजूनही. इलियड वैग्रेचा साईझ चिंधी आहे त्या तुलनेत सबब वाचायला टेन्शन नै.

अर्धवटराव's picture

14 Jan 2014 - 11:33 pm | अर्धवटराव

क्रांती करणारा सत्ताधीश झाल्यावर मदांध होतो. स्वतः सासुरवास सहन केलेली बाई आपल्या सुनेला छळते. अनिच्छेने बापाच्या जबाबदारीचे ओझे वाहणारा मुलगा आपल्या मुलाकडुन तिच अपेक्षा करतो. ज्ञानक्षेत्र त्याला कसं वर्जीत असेल.

बर्फाळलांडगा's picture

15 Jan 2014 - 2:35 am | बर्फाळलांडगा

आनंददायी लिखाण....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2014 - 7:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सविस्तर प्रतिसादाला जागा राखून ठेवतो.

-दिलीप बिरुटे

क्षमा करा मी या गावचा (अभ्यासक) नाही.आपण समोरून अनुभव घेता तेव्हा त्यात काही एक तथ्य असावयाचेच.माझा इथे उद्देश विकिपीडियावर ज्ञानकोशीय लेखनात संपादन करताना मराठी (लोकांच्या) लेखनाच्या तृटी लगेच लक्षात येतात या संदर्भाने आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ.केशव देशमुख यांच्या मतानुसार, ज्ञानोपासनेत विश्लेषण हे संदर्भसंपन्न असणे महत्वपूर्ण असते आणि या बाबीचा मराठीभाषेच्या विद्यार्थ्यांत अभाव दिसून येतो.

संदर्भ अवतरणांचा दर्जा आणि अचूकता हि विद्वतपूर्ण लेखन अभ्यासक/प्रकाशनां समोरील महत्वपूर्ण आव्हाने असतात.[३] शैक्षणिक लेखकाच लक्ष सहसा संदर्भांपेक्षा संकल्पना केंद्रीत असत.परिणामी अनेक संदर्भ चुकीचे,सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत ठरण्याची शक्यता असते.

भारतीय संशोधन जागतीक स्तरावर न दिसण्याची अनेक कारणे आहेत.काही अपवाद सोडता शास्त्रीय मांडणीकरून लेखन करण्याबाबत भारतीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कमी पडतो.[४] केवळ जिथे Phd च्या अभ्यासकाचे मार्गदर्शक गाईड शास्त्रीय मांडणी बाबत उत्साही असतात तिथे शास्त्रीय मांडणीचे कौशल्य विद्यार्थी आत्मसात करतात पण हे भारतात अभावानेच दिसते.

संदर्भयादी

शालेय जीवानात संदर्भासहीत प्रकल्प लेखन आपल्याकडे तेवढे करून घेतले जात नाही.त्यामुळे एकदम पिएचडीला पोहोचल्या नंतर समोर सवय नसलेल्या अपेक्षा अचानक येत नसाव्यात ना अशी शंका वाटते.केवळ प्रचार करतो आहे असे नाही पण विकिपीडिया सारख्या ज्ञानकोशात लेखन आवश्यक लेखन कौशल्य विकसित करण्यास उपयोगी ठरू शकते असे मला वाटते.

श्रद्धा हि अंशतः आंधळीच असते.शिरडीच्या साईबाबांना गुरू चांगला की वाईट कसे ठरवावे असा काही एक प्रश्न विचारला गेला तर निवडल्या नंतर गुरू चांगला हि श्रद्धा ठेऊनच रहावे. गुरूनानकांच्या चरीत्रात शिष्याकडून एकच भिंत तीनदा पाडून पुन्हा पुन्हा बांढून घेतल्याची कथा येते.काही वेळा हा छळ अथवा लहरीपणा वाटतो.पण यात क्वालिटीचा दृष्टीकोण असण्याची शक्यता असते शीस्त आणि टिम वर्क सुद्धा.त्यामुळे आपण विनोदात चिडवतो पण पंजाबातील शीख धर्मीयांचे काही गुण आणि यश वाखाणण्या सारखे वाटते.

परशुरामाच्या कर्ण विषयक कथे पेक्षा दत्तचरित्रातील परशुराम कथा एकदम वेगळी आहे. परशुराम त्याचा इश्वरी आवतार संपवून मनःशांतीकरता दत्तात्रेयाला शरण जातो. दत्तात्रेय पुढच काही मार्गदर्शन करण्यापुर्वी असंख्य वेळा श्रीदेवीच्या महात्म्याची पारायणे असंख्य वेळा पुन्हा पुन्हा करवतात त्यात उद्देश एकाच गोष्टीवर काँसंट्रेशन मिळवण्याचा असू शकतो.मला वाटते विवेकानंदांच्या चरित्रात त्यांच्या गुरूंनी अचानक खोलीतील सामान लावण्या संदर्भातील गोष्ट आहे त्यात उद्देश शिष्याला काही एक पैलू लक्षात आणून देण्याचा आहे.

अर्थात वर अंशतः गुरूंच समर्थन झाल तरी शिष्याचे हित न पाहता स्वहिता करता अयोग्य वागणारे सन्मानिय सन्माननिय किती हा प्रश्न पडतोच.कितीही केल तरी एकलव्याचा आंगठा कापला जाण सूतपुत्र म्हणून शिक्षण न देण ह्या वृत्ती मनाला पटत नाहीत हे खरेच

मारकुटे's picture

15 Jan 2014 - 11:26 am | मारकुटे

इंग्लंड अमेरीकेतील संशोधन क्षेत्रात असली बजबजपूरी नाही. तिकडे जाऊन पिएच्ड्या घेणे.

गुरु हा विषयाचं लेखकाला समजला नाही हे इथं स्पष्ट होता. गुरु आणि शिक्षक ह्यात फार मोठी गफलत केली आहे . शाळा , college मध्ये शिकवणार्यांना आपण सर्रास गुरु म्हणतो. ते अत्यंत चुकीचं आहे. ते फक्त शिक्षक असतात गुरु नावेत. माहिती देणारा तो शिक्षक. ज्ञान देणारा तो गुरु. द्रोणाचार्य हे शिक्षक आणि भगवान कृष्ण हे गुरु.

मारकुटे's picture

15 Jan 2014 - 12:26 pm | मारकुटे

माहिती आणि ज्ञानात काय फरक?

पुस्तकात असते ती माहिती, आणि डोक्यात झिरपते ते ज्ञान..

मारकुटे's picture

15 Jan 2014 - 12:35 pm | मारकुटे

बरोबर. मग शिक्षक आणि गुरु दोघे पुस्तकाप्रमाणे सांगतात ना?

माहिती आणि ज्ञानात काय फरक?

माहिती म्हणजे पूर्वी कोणालातरी माहित असलेलं पुन्हा सांगणं. पूर्वीच कोणीतरी सांगितलेल्या गोष्टी नव्याने सांगणं.
उदाहरणार्थ : शिक्षक फक्त पुस्तकातली माहिती वाचून दाखवतो. प्रत्येक शिक्षकाची पुस्तकी माहिती सांगण्याची पद्धत वेगळी असेल पण ते त्याचं स्वतःच ज्ञान नसतं. पुस्तके, wikepedia , google हे सुधा आपले शिक्षकच आहेत. शिक्षक कोणत्याही गोष्टीची जाणीव करून देत नाहीत कि प्रत्यक्ष अनुभव देत नाहीत.
परंतु गुरु मात्र अगदी नवीन गोष्ट शिकवतो जी इतर कोणाकडून हि समजणार नाही. तसाच जी पूर्वी कधी कोणी सांगितलेली नाही कि दाखवलेली नाही. संपूर्णता नवीन गोष्ट जी प्रत्येकासाठी unique आहे. ते ज्ञान . गुरु हि पूर्णता अध्यात्मिक सौज्ञा आहे.
जसा कि ईश्वर आहे हे आपल्या सगळ्यांना माहित असतं. पण त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग गुरु दाखवतो. म्हणून ईश्वर आणि गुरु दोघे एकत्र समोर आले तर पहिला नमस्कार गुरुला करावा असं सांगितलं आहे.

थॉर माणूस's picture

15 Jan 2014 - 6:40 pm | थॉर माणूस

जी इतर कोणाकडून हि समजणार नाही. तसाच जी पूर्वी कधी कोणी सांगितलेली नाही कि दाखवलेली नाही

काय? मग त्या हिशोबाने आपल्या इतिहासातील आणि ग्रंथातील कित्येक "गुरू" शिक्षकपदावर आणावे लागतील. आणि काही बाबतीत तर आईबाप सुद्धा गुरूंच्या पातळीवरून खाली आणावे लागतील हो...

म्हणून ईश्वर आणि गुरु दोघे एकत्र समोर आले तर पहिला नमस्कार गुरुला करावा असं सांगितलं आहे.

तुम्ही प्रतिसादात या आधी जे लिहीलं आहे त्या हिशोबाने गुरूच्या व्याख्येत बसणार्‍यांची संख्या प्रत्यक्ष ईश्वरी अवतारांपेक्षाही कमी भरत असेल बहुदा, म्हणून दुर्मिळतेच्या हिशोबाने गुरूला पहिला नमस्कार असेल.

मारकुटे's picture

16 Jan 2014 - 9:32 am | मारकुटे

>>>जसा कि ईश्वर आहे हे आपल्या सगळ्यांना माहित असतं. पण त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग गुरु दाखवतो.

प्रत्येक गुरु वेगळा मार्ग दाखवतो की तोच मार्ग असतो?
शिष्य जेव्हा गुरु होतो तेव्हा तो त्याच्या गुरुने सांगितलेला मार्ग दाखवतो की अजून वेगळा मार्ग दाखवतो?
जर तोच मार्ग दा़हवत असेल तर गुरु केवळ एकच ज्याने पहिल्यांदा काही दशके, शतके, सहस्त्रके पूर्वी मार्ग शोधला. नंतरचे केवळ शिक्षकच. नाही का?
आणी जर शिष्य जो आता गुरु झाला आहे तो त्याच्या गुरुचा मार्ग न सांगता नवा मार्ग सांगत असेल तर गुरुची गरजच काय?

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Jan 2014 - 8:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

जसपाल भट्टीच्या मालिकेत एक भाग याविषयी होता तो आठवला.

आमचे फिजिक्सचे सर एक किस्सा सांगायचे..त्यांचे पी.एच्.डी.चे गाईड पान खायचे आणि थुंकदाणी पुढे करायला विद्यार्थी असायचे..ते बघुन ह्यांनी पी.एच्.डी.चा नाद सोडुन दिला
एक कुतूहल.. पी.एच्.डी. करुन असे काय मिळते की इतकी वर्षे तिच्यामागे (आणि गाईडमागे) घालवावी?

पी.एच्.डी. करुन असे काय मिळते की इतकी वर्षे तिच्यामागे (आणि गाईडमागे) घालवावी?

दौलत, शोहरत....बंगला, गाडी, बँक बॅलन्स... :)

विद्यापीठात एका विशिष्ट पदापलिकडे पोचायचं असेल (उदा. पुणे विद्यापीठात "असोसिएट प्रोफेसर") तर पीएचडी लागते. म्हणजे कागद, फ्रेम, चौकोनी टोपी वगैरे लागतं. (ज्ञान पाहिजेच अशी सक्ती नसते)

हा भाग सोडला, तर "मेरे मन को भाया, मैं कुत्ता काट के खाया" या भूमिकेतून पीएचडी करणारे - मोजके का होईना - पण असतात.

माझा पी एच डी चा अनुभव वेगळाच आहे. पुण्यातील एका महान विद्वान गृहस्थाना ( हे पी एच डी गाईड म्हणून काम करायचे) ज्यानी मॅनेजमेंट विषयावर बरीचशी पुस्तके ल्हिली आहेत. त्याना पी एच डी बद्दल विचारावयास गेलो तेंव्हा झक मारली आणि विचारले असे झाले. हे विद्वान गृहस्थ म्हणाले की आम्ही सध्या फक्त टीचिंग प्रोफेशन मध्ये ज्यांची प्रमोशन्स वगैरे राहीली आहेत अशांचा विचार करतोय पी एच्डी साठी करतोय. तुम्हाला कशाला हवय पी एच डी.? तुम्ही अर्ज केलात तर तुमच विचार होणार नाही. अभ्यास करायचा असेल तर पी एच डीला न करता देखील अभ्यास होउ शकतो की.
असे उत्तर मिळाल्यावर त्या महनीय व्यक्तीमत्वाला नमस्कार करुन बाहेर पडलो.
एनी वे. पी एच डी करताना संशोधन करावे लागते. ..त्या संशोधनाचे पुढे काय होते हो?

बॅटमॅन's picture

17 Jan 2014 - 2:25 pm | बॅटमॅन

एनी वे. पी एच डी करताना संशोधन करावे लागते. ..त्या संशोधनाचे पुढे काय होते हो?

कॉलेज अन गाईडवर अवलंबून आहे...सगळे चांगले असेल तर ते पब्लिश होते, अन नुस्ते पब्लिश होत नै तर त्याचे पुस्तकही होऊ शकते. नैतर प्रोजेक्ट रिपोर्ट बनून विद्यापीठाच्या लैब्रीत धूळ खात वाळवीची नवीन डिश बनून जाते. मग लोक त्याला कधीतरी रेफर करतात. तू मला रेफर कर मी तुला असा प्रकार करून एकमेकांच्या पेपरचे सायटेशन वाढवतात आणि सगळ्यांना चु* बनवतात.

वरती म्हणल्या प्रमाणे गुरु हि पूर्णता: अद्ध्यत्मिक संज्ञा आहे. मी कोण आहे ह्या शिष्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधून देणारा , एका द्रीष्टीक्षेपात , एका स्पर्शातच ब्रह्मज्ञान देण्याची क्षमता असलेला गुरु असतो

आईबाप सुद्धा गुरूंच्या पातळीवरून खाली आणावे लागतील

हो. आई बापांची तशी क्षमता नसेल तर त्यांना खाली आणावाच लागेल . छोट्या छोट्या गोष्टींवरून मुलांसमोर तावातावाने भांडणार्या, अहंकारी , मुलांना फक्त स्वताचा स्वार्थ साधून घ्यायला शिकवणाऱ्या, पैशाचा माज करण्याचे संस्कार करणाऱ्या, मुलींना गर्भातच मारणाऱ्या , स्वताच्याच मुलीकडे वायट दृष्टीने पाहणारे बाप हे मुलांचे गुरु कदापीही असू शकत नाहीत.

त्या हिशोबाने गुरूच्या व्याख्येत बसणार्‍यांची संख्या प्रत्यक्ष ईश्वरी अवतारांपेक्षाही कमी भरत असेल बहुदा, म्हणून दुर्मिळतेच्या हिशोबाने गुरूला पहिला नमस्कार असेल.

logic अजिबातच ना पटण्यासारखा आहे. ईश्वरी अवतारांची संख्या कितीही असली तरी ईश्वर एकाच आहे ह्या सत्याचा बोध गुरूच तर करून देत असतो .

थॉर माणूस's picture

16 Jan 2014 - 11:27 am | थॉर माणूस

वर माधवजींनी विचारलेलेच प्रश्न मलाही पडले आहेत. मुळात गुरूने सांगितलेला मार्ग सोडून नवे (पुर्वी कधीही न सांगितलेले वगैरे वगैरे) काहीतरी शिकवले तरच शिष्य गुरूपदाला पोहोचेल. या हिशोबाने एकतर लाखो गुरू आणि त्यांच्या शिकवणी असायला हव्यात किंवा मोजके गुरू आणि बाकी शिक्षक.

एका स्पर्शातच ब्रह्मज्ञान देण्याची क्षमता असलेला गुरु असतो

हे सुद्धा पहिल्या वेळेस ज्याने केले तोच गुरू ठरेल का हीच पद्धत पुन्हा वापरून आजही असे करू शकणारे सुद्धा गुरू ठरतील? तसं पाहिलं तर ते शिक्षक ठरायला हवेत ना, कारण ते सुद्धा एका स्पर्शात ब्रम्हज्ञान देणार जे त्यांच्या गुरूने केले. मग ते तर फक्त शिक्षकच ठरले की, गुरू कसे?

मारकुटे's picture

16 Jan 2014 - 2:47 pm | मारकुटे

>>मी कोण आहे ह्या शिष्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधून देणारा , एका द्रीष्टीक्षेपात , एका स्पर्शातच ब्रह्मज्ञान देण्याची क्षमता असलेला गुरु असतो

असं काही ज्ञान होतं हा पूर्णपणे भ्रम आहे. शंकराचार्यांच्या सर्व भाष्यामधे असे कुठेही म्हटलेले नाही.
ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्माचे ज्ञान. सर्व काही अद्वैत असल्याची जाणीव. ती जाणीव केवळ ज्ञानाने येते. हात ठेवून चमत्काराने नाही. ज्ञानात कृते मोक्षः अशी संज्ञा तर्कसंग्रहात सुद्धा दिली आहे. बाकी ब्रम्हज्ञान झालं वगैरे केवळ शारिरिक अवस्था असतात ज्यामधे शरीर सुखावून आनंद मिळतो. तसा आनंद मग भरपूर कश्ट करुन झोपल्यावर सुद्धा मिळतो. त्यामुळे गुरु कृपा वगैरे केवळ दुकानांच्या पाट्या आहेत.
असो.

म्हैस's picture

16 Jan 2014 - 1:49 pm | म्हैस

हे सुद्धा पहिल्या वेळेस ज्याने केले तोच गुरू ठरेल का हीच पद्धत पुन्हा वापरून आजही असे करू शकणारे सुद्धा गुरू ठरतील?

हीच पद्धत पुन्हा वापरून आजही असे करू शकणारे सुद्धा गुरू ठरतील. परंतु त्यासाठी मूळ गुरूंची परवानगी असणं आवश्यक आहे. त्याने गुरु पदाची दीक्षा घेणं आवश्यक आहे.

तसं पाहिलं तर ते शिक्षक ठरायला हवेत ना, कारण ते सुद्धा एका स्पर्शात ब्रम्हज्ञान देणार जे त्यांच्या गुरूने केले

हे ज्ञान प्रत्येक शिष्याला त्याच्या पात्रतेनुसार वेगवेगळा दिलेला असू शकता. आणि ते त्या perticular शिष्यासाठी unique असतं. शाळेत जसा एकाच धडा १०० विद्यार्थ्यांना शिकवला जातो तश्या पद्धतीचं हे ज्ञान नसतं.

मुळात गुरूने सांगितलेला मार्ग सोडून नवे (पुर्वी कधीही न सांगितलेले वगैरे वगैरे) काहीतरी शिकवले तरच शिष्य गुरूपदाला पोहोचेल. या हिशोबाने एकतर लाखो गुरू आणि त्यांच्या शिकवणी असायला हव्यात किंवा मोजके गुरू आणि बाकी शिक्षक.

पहिली गोष्ट म्हणजे गुरूने सांगितलेला मार्ग सोडला तर तो त्या गुरूचा शिष्य राहत नाही.
महाराज कोणाही शिष्याला असं स्वताच्या मनाने गुरु पदाला पोहचता येत नाही. सद्गुरु होण्याचे नियम फार कडक आहेत. आपल्या पार्थिव देहत्यागानंतर कोणाला गुरुपद द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्या गुरु ला असतो. त्यांच्या आज्ञेशिवाय इतर कोणीही गुरु होऊ शकत नाही. णि हा अधिकार सद्गुरु लाखातून एखाद्याच पात्र शिष्याला देतात. त्या विरोधात जावून जर कोणी स्वताला गुरु वगेरे म्हणवून घेवू लागला तर त्यासाठी मोठी शिक्षा सांगितलेली आहे. तुम्ही 'शक्तिपात योग ऱ्हासाची कारणी मीमांसा ' हे पुस्तक वाचलं असेल तर त्यात सद्गुरु आणि सत्शिष्य ह्यांच्यावर detail माहिती आहे

प्यारे१'s picture

16 Jan 2014 - 2:08 pm | प्यारे१

+१.

दासबोधातला सद्गुरु स्तवन हा समास, गुरुलक्षण, शिष्यलक्षण हे समास ह्या संदर्भात अत्यंत उपयुक्त आहेत. नेमकेपण नि नेटकेपण असलं की बरंचसं काम भागतं. नंतर करायचं ते करता येतंच.

वीज मुळात कुठून येते? आली तिथून आली. पण तिथून ती ट्रान्सफॉर्मर ला, तिथून मेन लाईनची तार, तिथून सेकंडरी मग कधीतरी घरात!
श्रीगुरु स्वत:ला त्या तारेसारखं समजतात . तारेतून वीजप्रवाह येतो मात्र तारेशिवाय येऊ शकत नाही तसं.
तारेनं मी वीज पुरवली असा अभिमान बाळगण्यापलिकडं 'तार' (श्रीगुरु) गेलेली असते. त्या तारेला दुसरी तार जोडली की ती सुद्धा प्रवाह वाहून नेऊ शकते.

रुपक इथे संपावं.

थॉर माणूस's picture

16 Jan 2014 - 2:14 pm | थॉर माणूस

सहमत... म्हणूनच मी म्हैस यांच्या "जी इतर कोणाकडून हि समजणार नाही. तसाच जी पूर्वी कधी कोणी सांगितलेली नाही कि दाखवलेली नाही" या विधानाला आक्षेप घेतला होता.

मारकुटे's picture

16 Jan 2014 - 2:48 pm | मारकुटे

>>>आपल्या पार्थिव देहत्यागानंतर कोणाला गुरुपद द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्या गुरु ला असतो. त्यांच्या आज्ञेशिवाय इतर कोणीही गुरु होऊ शकत नाही. णि हा अधिकार सद्गुरु लाखातून एखाद्याच पात्र शिष्याला देतात. त्या विरोधात जावून जर कोणी स्वताला गुरु वगेरे म्हणवून घेवू लागला तर त्यासाठी मोठी शिक्षा सांगितलेली आहे.

हे केवळ मठाचा वारसा हक्क कुणाला जावा याचा विचार आहे.

बॅटमॅन's picture

16 Jan 2014 - 4:56 pm | बॅटमॅन

कौल्दन्त अग्री मोरे!!!!

अशी दुर्दैवी नि चुकीची परंपरा निर्माण झालेली आहे. मात्र त्याला मूळ हेतू कारणीभूत नाही.
सत्ताकांक्षा निर्माण झाल्यावर अशा गोष्टी निर्माण होतातच.

गुरुपदी 'अधिकारी' व्यक्तीच असावी लागते नि तिची निवड आधीचे श्रीगुरुच करत असतात.
अनेक शिष्यांमध्ये अनुग्रह देण्याचा अधिकार एखाद्यालाच असतो. ते निव्वळ अधिकारावर ठरते.

(मी आयडीअल केस बद्दल बोलत आहे)

मारकुटे's picture

16 Jan 2014 - 6:01 pm | मारकुटे

>>>(मी आयडीअल केस बद्दल बोलत आहे)
अशा केसेस फक्त पुस्तकात असतात.

प्यारे१'s picture

16 Jan 2014 - 6:10 pm | प्यारे१

वास्तवात आहेत. :)

भ्रम दूर झाल्यास मनाला संभाळा.

प्यारे१'s picture

16 Jan 2014 - 6:49 pm | प्यारे१

काळजीबद्दल आभार! :)

कवितानागेश's picture

16 Jan 2014 - 11:38 pm | कवितानागेश

विद्यापीठातल्या पीएच्डीबद्दल चर्चा करायची सोडून परत परत लोक abstract अध्यात्माकडे का जातात?
जाउ दे!
मला कुठी पीएच्डी करायचीये आता?! :)
पण गेल्या काही वर्षात ४वर्षात डीग्री पूर्ण करायचा नियम झाला आहे. तसे झाले नाही तर 'का नाही?' याचे उत्तर गाईडला द्यावं लागतं. फार तर १ वर्षाचे extension मिळतं.
त्यामुळे पूर्वीइतके त्रासदायक नाही राहिलं पीएच्डी.

अर्धवटराव's picture

17 Jan 2014 - 2:32 pm | अर्धवटराव

आयला म्याऊ.. तसंही तुला कुठल्या पीएचडीची काय गरज? असलं कुठलं ज्ञानक्षेत्रं आहे कि ज्यात इव्हन तुला शिकण्यासारखं काहि उरलय? मी किती आशेने बघतो तुझ्याकडे कि तु एक शंभर-दोनशे पिएचड्या मला एखाद्या मिपा कट्ट्यावर मुखशुद्धी करता म्हणुन भेट देशील :D (एक... चल एखाद-दोन म्हणुया, अपवाद आहेत म्हणा जे तुझ्यापेक्षा लायनीत पुढे आहेत... पण तेव्हढा विचार करायला फुरसत कोणाला आहे? )

विद्यापीठातल्या पीएच्डीबद्दल चर्चा करायची सोडून परत परत लोक abstract अध्यात्माकडे का जातात?

उठसुठ प्रत्येक गोष्टीत अध्यात्म शोधायची आपली ही खोड जूनीच आहे.

बॅटमॅन's picture

17 Jan 2014 - 3:48 pm | बॅटमॅन

आणि त्याचे उदात्तीकरण करण्याची खोडही तितकीच जुनी. ही किळसवाणी प्रवृत्ती कमी होईल तो सुदिन!!!

विशेषतः जिज्ञासा मारणारी अन काल्पनिक विचारमैथुनात रमणारी ढोंगी जमात.

मारकुटे's picture

17 Jan 2014 - 4:37 pm | मारकुटे

सहमत आहे. .

मिपा चालू केलं की अध्यात्मात रमणार्‍या दोन जणांचे फोटो उजव्या बाजूला समोर येतात.

ते दोघे भलते निरुपद्रवी. अ‍ॅटलीस्ट दे टॉक सम सेन्स.

त्यांच्या नावाने पुड्या सोडणार्‍यांची लागण फार आहे अन असली धोका त्यातच आहे.

मारकुटे's picture

18 Jan 2014 - 9:22 am | मारकुटे

निरुपद्रवी?

पण काही संशोधकांच्या मते त्यांचा उपद्रव सहन न होऊन तत्कालीन समाज मुखंडांनी त्यांचा खून केला आणि अनुक्रमे समाधी घेतली आणि सदेह वैकुंठाला गेले अशी वावडी उठवली.

टवाळ कार्टा's picture

18 Jan 2014 - 9:33 am | टवाळ कार्टा

काही संशोधकांच्या मते

बीरीगेडी???

मारकुटे's picture

18 Jan 2014 - 9:36 am | मारकुटे

ते तर आहेतच. पण मुख्य प्रवाहातील सुद्धा काही जण असे मानतात.

काही जण ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी लिहिलेली असून त्यांनी विठ्ठल पंत, रुक्मिणी आणि त्यांची चार मुले निवृत्ती, ज्ञान्देव, सोपान मुक्ताबाई ही सर्व एकनाथांनी निर्मिलेली पात्रे असून त्यांच्या सहाय्याने वारकरी संप्रदायात ब्राह्मणी वृत्ती घुसवली असा दावा करतात.

असं असेल तर एकनाथ महाराजांना साष्टांग नमस्कार! स्वतःचं नाव कुठंही न घेता चार जणांच्या रचना करणं, त्या व्यवस्थित मांडणं वगैरे फारच क्लिष्ट काम आहे.

असंच असेल तर आम्हाला व्यक्तीशी काय घेणं देणं असावं? विचार बघा. संपला विषय. काय?

बाकी ब्राह्मणी वृत्ती वगैरे एकनाथ महाराजांनी घुसवल्या म्हणणार्‍या लोकांच्या अभ्यासाचं 'कवतुक'.

आदूबाळ's picture

18 Jan 2014 - 2:39 pm | आदूबाळ

काही जण??

काही सोर्स वगैरे आहे का मनाचे श्लोक?

हेही वाचा: http://en.wikipedia.org/wiki/Weasel_word

मारकुटे's picture

19 Jan 2014 - 10:19 am | मारकुटे

महाराष्ट्रातील नामवंत विद्यापीठांमधील १९८० नंतरचे पीचडीचे प्रबंध, याच कालावधीत प्रसिद्ध झालेली विविध पुस्तके, मासिके आणि दिवाळी अंक यामधे विस्तृत पद्धतीने अनेक लेखकांनी पुराव्यासह (त्यांच्या दृष्टीने) मांडणी केलेली आहे. वानगी दाखल काही शीर्षके येणेप्रमाणे:
१) ज्ञानदेव की ज्ञानेश्वर : एक शोध
२) ज्ञानदेव एक की दोन : मागोवा
३) एकनाथांची ज्ञानेश्वरी संपादन प्रक्रिया की प्रक्षिप्तीकरण
४) पाया कुणी रचला ? ज्ञानदेव की नामदेव
५) चांगदेव कोण होता? योगी की महानुभाव पंथाचा प्रवर्तक
६) महानुभाव पंथ का बदनाम झाला?
७) नामदेवाचे कार्य आणि विस्तार

अशी अनेक लेखांमधील मध्यवर्ती भुमिका ही वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर हे उपरे व्यक्तीमत्व असल्याचे मानते. आणि ब्राह्मणांच्या हातून कर्मकांडावरची पकड वारकरी संप्रदायामुळे ढीली पडली होती, त्याला परत घट्ट करण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे असे दाखवले जात आहे.

* वैयक्तिकरीत्या मी ही किंवा ती किंवा कोणतीही थिअरी मानत नाही.
ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी रचलेली नसेल तरी मला फरक पडत नाही. तिच्या वाचनात जो आनंद आहे तो कर्त्याचा शोध घेण्यात नाही.

असे कोण मानतात, त्यांची एकूण विश्वासार्हता किती, इ.इ. साधकबाधक विचार केल्यास बरे होईल. तसा थेसिस काही असेल तर कमीत कमी मांडावा तरी. भावनिक प्रतिक्रियांना स्वहस्ते आमंत्रण करण्यापेक्षा काहीएक मांडणी मांडा. कशी आहे मांडणी ते पब्लिकला कळू तरी दे. अन मग होऊदे काय व्हायचं ते.

प्यारे१'s picture

17 Jan 2014 - 4:52 pm | प्यारे१

खिक्क्क्क!

प्यारे१'s picture

18 Jan 2014 - 12:34 am | प्यारे१

प्रतिसाद का उडाला?

मारकुटे's picture

18 Jan 2014 - 1:23 pm | मारकुटे

यावर पीएचडी होऊ शकते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Jan 2014 - 1:50 am | विश्वनाथ मेहेंदळे

योग्य गुरु नसल्याकारणाने ;-)

सस्नेह's picture

17 Jan 2014 - 12:13 pm | सस्नेह

बाकी पूर्वीचे अन आताचे गुरू एकाच लायनीत बसवलेले पाहून बरे नाही वाटले.

मी एम.डी.ला अ‍ॅडमिशन घ्यायलाअ गेलो,तर माझे मास्तर म्ह्टले,बाबा,तु आहे तिथेच ठिक आहेस ? कशाला कॉलेजचा आणी माझा ताप वाढवतोय.आधीच कॉलेज मध्ये काय कमी संकटे आहेत ? आता तु इथे यायच म्हणतोय.आणी माझ अ‍ॅडमिशन चक्क संस्थाचालकाच्या बिनडोक पोराला देउन टाकल.जाउ द्या होत अस कधी कधी.(अवांतर:- आता मीच कॉलेजच्या जवळच एक हॉस्पिटल आणी अ‍ॅकडमी चालु करायचा विचार करतो.मास्तरच्याच सहकार्याने)

म्हैस's picture

20 Jan 2014 - 4:12 pm | म्हैस

@मारकुटे -
सद्गुरु आणि मठ चालवणारे भोंदू बाबा,महंत ह्याच्यात फरक आहे महाराज. भगवद्गीतेत गुरूची १६ लक्षणं सांगितलेली आहेत .. ती लक्षणं एकदा वाचा. वरती एका पुस्तकाचा नाव सुधा मी दिलंय ते पुस्तक वाचा. कारण मठ चालवणारे बाबा, महंत आणि सद्गुरु ह्यांच्या तुम्ही मोठीच गफलत करताय .प्यारे१ चा प्रतिसाद बरोबर आहे. असे स्वघोषित गुरु आणि त्यांचे मुर्ख शिष्य, गुरु शिष्याच्या परंपरेला बदनाम करत असल्यामुळे ह्यांना फार मोठी शिक्षा सांगितलेली आहे ..
गुरु शिष्याला स्पर्श करतात तो कुठलाही चमत्कार करण्यासाठी नाही . हे ब्रह्मज्ञान देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यात स्पर्शाचा सुधा समावेश होतो. पण हे तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही. कारण ब्रह्मज्ञान , गुरुकृपा हे तुम्हाला भ्रम वाटतात तेव्हा विषयच संपला. इथेच तुम्ही तुमची ज्ञान मिळवण्याची कक्षा बंद केलीत .

पैसा's picture

23 Jan 2014 - 3:23 pm | पैसा

पी एच डी करताना आलेल्या आणि ऐकलेल्या अनुभवांचं सार दिसतं आहे. हे गाईड सुद्धा भलीबुरी माणसंच असतात. त्यामुळे त्यांची फ्रस्ट्रेशन्स, दया जे काही असेल ते हातात असलेल्या विद्यार्थ्यांवर निघणारच. थोडाफार त्रास झाला तर अभ्यास पक्का होतो अशी आपल्याकडची जुनी समजूत. तेव्हा काही कष्ट पडले तर त्या कष्टाचं फळ अधिक महत्त्वाचं वाटेल. मात्र नोकरी पक्की होण्यासाठी प्राध्यापक लोकांना पी एच डी कम्पल्सरी केल्यामुळे अनेक मंडळीनी एकच प्रबंध आपल्या नावावर खपवून डॉक्टरेट मिळवल्याच्या कहाण्या इथेच वाचल्या आहेत. तशाच विद्यार्थिनीकडून लैंगिक "गुरुदक्षिणेची" अपेक्षा केल्याच्या बातम्याही वाचल्या आहेत. असले प्रकार गाईड आणि विद्यार्थ्यांकडून नक्कीच होऊ नयेत.