तिसरी घटना भीम दुर्योधन गदायुद्धाची आहे. यात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणु स्पर्धाच लागल्यासारखी दिसते. परंपरेने सांगितलेल्या कथा लक्षात घेतल्या तर असं दिसुन येतं कि दुर्योधनाला कुठेतरी ही जाणीव होती कि शेवटी आपला सामना भीमाशी होणारच आहे. त्यामुळे त्याने अनेक वर्षे लोखंडी पुतळ्यावर गदायुद्धाचा सराव केला होता. गदायुद्धाचं शिक्षण प्रत्यक्ष बलरामाकडुन मिळवलं होतं. गदायुद्धात भीम वगळता दुर्योधनाच्या तोडीचा वीर त्याकाळी जवळपास नव्हताच म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. हे सारं काही असुनसुद्धा साध्वी गांधारीने त्याला आपल्या सामर्थ्याचं कवच घातलं. गांधारीने दुर्योधनाला युद्धापूर्वी भेटायला बोलावताना संपूर्ण नग्न होऊन बोलावले. ती क्षणभर डोळे उघडुन त्याच्याकडे पाहाणार होती ज्यामुळे त्याचं संपूर्ण शरीर लोखंडाचं होणार होतं. पण कृष्णाने हा प्रकार आधीच ओळखुन दुर्योधनाला मध्येच गाठुन मातेकडे जाताना नग्न कसा काय जातोस म्हणुन त्याची चेष्टा केली. तेव्हा दुर्योधन कमरेभोवती वस्त्र पांधरुन गेला आणि त्याच्या मांड्या तेवढ्या कमकुवत राहिल्या अशी कथा सांगितली जाते. एरवी गांधारीबद्दल आदराने बोलण्याची प्रथा आहे. धृतराष्ट्राच्या शारिरीक अंधत्वावर बोलताना तो पुत्रमोहाने आंधळा झाला होता याचा उल्लेख तर न चुकता होतो. पण नवर्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधुन घेतलेल्या गांधारीची गोष्ट तरी नवर्यापेक्षा काय वेगळी आहे? पांडवांची बाजु न्याय्य आहे असे जरी तिला वाटत असले तरी युद्धात दुर्योधनाचाच विजय व्हावा अशी तिची इच्छा दिसते. अन्यथा तिने दुर्योधनाला आपल्या तपःसामर्थ्याचं कवच घालुन लोखंडी बनवण्याचा घाट घातला नसता. दुर्योधनाचा विजय याचा दुसरा अर्थ पांडवांचा पराजय किंचा कुठल्यातरी पांडवाचा मृत्यु हे देखिल येथे लक्षात घ्यायला हवं. थोडक्यात धृतराष्ट्राप्रमाणेच गांधारीदेखिल पुत्रामोहाने आंधळीच झाली होती हे म्हणण्यास वाव आहे. आणि हे सर्वात प्रकर्षाने जाणवते ते शेवटी. युद्ध संपल्यानंतर कृष्णाची भेट झाल्यावर गांधारी त्याला शाप देते. नवर्याचा पुत्रमोह, मुलांचे प्रताप, त्यांनी पांडवांशी केलेली अन्याय्य वर्तणुक, प्रत्यक्ष सुनेचे राजसभेत केलेले वस्त्रहरण सारं काही विसरुन, अगदी शंभर पुत्र ठार मारलेल्या भीमालादेखिल बाजुला ठेऊन तिची न्याय बुद्धी दोषी कुणाला ठरवते तर श्रीकृष्णाला. वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचे इतके उत्कृष्ट उदाहरण दुसरे सापडणे कठीण. .
पुढे दुर्योधन कसा मारला गेला हा इतिहास सर्वश्रुत आहे. मात्र त्यात कृष्णाची गदेने मांडीवर प्रहार करण्याची सुचना आणि त्याबरहुकुम भीमाचे वागणे या सर्व प्रकारानेच हा प्रसंग पूर्णपणे झाकोळला आहे. या सार्या गोष्टी झाल्या केव्हा तर दुर्योधन गदायुद्धासाठी बाहेर आल्यावर. तोपर्यंत तो पाण्याखाली लपुन बसला होता. तो बाहेर आलाच नसता तर हे गदायुद्ध घडलेच नसते. त्याला डिवचुन बाहेर काढ्ण्याचे श्रेय युधिष्ठीराचे. इरावती कर्वेंनी “युगान्त” मध्ये असा उल्लेख केला आहे कि धॄतराष्ट्राकडुन जर दुर्योधनाला जीवदान देण्याचा निरोप आला असता तर पांडवांचा नाईलाज झाला असता त्यामुळे असा काही निरोप येण्याआधी दुर्योधनाला मारणे आवश्यक होते. एकाचढ एक शस्त्रास्त्रे माहित असलेल्या अर्जुनालादेखिल एखादे अस्त्र वापरुन दुर्योधनाला बाहेर काढता आलं नाही आणि तसा काही उल्लेखही महाभारतात नाही याचा अर्थ दुर्योधन पाण्याखाली संपूर्ण सुरक्षीत होता आणि तो स्वतःहुन बाहेर येइपर्यंत पांडवांकडे वाट पाह्ण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वाघाच्या गुहेबाहेर उभे राहुन वाट पाहण्याचाच हा प्रकार होता. दुर्योधनाला बाहेर काढणे जरुरी होते. अवघड प्रसंगी युक्त्याप्रयुक्त्या सुचविणार्या श्रीकृष्णानेसुद्धा काही उपाय यावेळी सांगितलेला दिसत नाही याचा अर्थ त्यालाही मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी पुढे सरसावला तो जुगारी युधिष्ठीर. यावेळी त्याने फेकलेले फासे बरोबर त्याच्या बाजुने पडले आणि दुर्योधन अलगत जाळ्यात सापडला. याप्रसंगी धर्म-दुर्योधनामध्ये जो संवाद झाला तो अभ्यासल्यास युधिष्ठीर किती “चलाख” माणुस होता हेच सिद्ध होतं.
युधिष्ठीर हसत हसत म्हणतो,” सुयोधना हे पाण्यात तु अशासाठी अनुष्ठान आरंभलं आहेस? आपल्या कुलाचा नाश करुन स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तु पाण्यात दडला आहेस काय? येथे येऊन लपुन बसला आहेस तेव्हा तुझा तो पुर्वीचा दर्प आणि अभिमान कोठे गेला? राज्यसभेत सर्वजण तुला शूर म्हणतात पण आता जेव्हा तु पाण्यात दडला आहेस तेव्हा मला तुझे सारे शौर्य व्यर्थ वाटत आहे. कोठे गेलं तुझं पौरुष? कोठे गेला तुझा अभिमान? कोठे गेली तुझी वज्रसमान गर्जना? कोठे गेलं तुझं अस्त्रविद्येचं सारं ज्ञान? उठ आणि क्षत्रिय धर्मानुसार आमच्याशी युद्ध कर. आमचा पराभव करुन पृथ्वीचं राज्य मिळव अन्यथा आमच्या हातुन वीरगतीला प्राप्त हो.” युधिष्ठीराचा प्रत्येक शब्द खोचक आणि वर्मी लागणारा आहे. मात्र त्याचा तत्काळ परिणाम झालेला दिसत नाही. दुर्योधन म्हणतो,” मी प्राणांची रक्षा करण्यासाठी किंवा घाबरुन येथे बसलेलो नाही. मला जरा विश्रांती हवी आहे. तुम्हीही विश्रांती घ्या. मी त्यानंतर तुमच्याशी युद्ध करेन.” युधिष्ठीराला मात्र जराही वेळ दवडण्याची इच्छा नव्हती. तो लगेच म्हणाला.” आमची विश्रांती घेऊन झाली आहे आणि आम्ही बर्याच वेळापसुन तुला शोधत आहोत. तेव्हा चल आमच्याशी युद्ध कर.” यानंतर दुर्योधनाने वेगळाच सूर लावला आहे. पांडवांना विजयाचा आनंद धड उपभोगायला मिळु नये यादृष्टीने त्याने उत्तर दिलं असावं. तो म्हणतो,” ज्यांच्यासाठी मला राज्य हवं होतं ते माझे सारे बांधव मारले गेले आहेत. पृथ्वीवरील समस्त शूर क्षत्रियांचा नाश झाला आहे. ही भूमी आता विधवा स्त्रीसमान संपत्तीहीन झाली आहे. म्हणुन तिचा उपभोग घेण्यात मला जराही रस नाही. जेव्हा कर्ण, द्रोण, पितामह भीष्म मारले गेले आहेत तेव्हा माझ्या दृष्टीने आता या युद्धाची काही आवश्यकता उरलेली नाही. आजपासुन ही सारी पृथ्वी तुझी होवो, मला ती नको. मी मॄगचर्म धारण करुन आजपासून वनात जाऊन राहीन. माझे म्हटले जातील असे कुणीच जीवीत नाही तेव्हा मलाही आता जिवंत राहाण्याची इच्छा नाही. आता तु जा आणि जिचा राजा मारला गेला, योद्धे नष्ट झाले, जी संपत्तीहीन झाली अशा पृथ्वीचा उपभोग घे.”
दुर्योधनाने जे चित्र उभे केले ते बर्याच प्रमाणात सत्याच्या जवळ जाणारे होते. एखादा ऐरागैरा बावचळुन गेला असता. पण युधिष्ठीर लेचापेचा नव्हता. त्याने दुर्योधनाला लागलीच फटकारले,” मला ही पृथ्वी तुझ्याकडुन दान म्हणुन नको. मी तुला युद्धात जिंकुनच तिचा उपभोग घेइन. तु स्वतःच ज्या पृथ्वीचा राजा राहीलेला नाहीस तिचं दान कसं काय करायला निघालास?” यानंतर त्याने दुर्योधनाच्या सार्या पापांचा पाढा वाचुन दाखवला आणि पुन्हा त्याला डिवचले.” चल उठ आणि युद्ध कर. त्यातच तुझं भलं आहे.” हे बोलणे मात्र दुर्योधनाच्या वर्मी लागले. त्याला पांडवांचा संताप येऊ लागला. युधिष्ठीराने बिनतोड उत्तरे देऊन त्याला निरुत्तर केले होते. आता युद्धाशिवाय पर्याय नव्हता. त्याने आता युद्धाच्या दृष्टीने बोलणे सुरु केले,” मी एकटा आणि निशस्त्र आहे तेव्हा मी तुम्हा सार्यांशी एकाचवेळी युद्ध असे काय करणार?” युधिष्ठीर पहिली बाजी जिंकला होता. दुर्योधनाला युद्धासाठी त्याने उद्युक्त केले होते. आता त्याने बाहेर येणे आवश्यक होते. युधिष्ठीर पुढे बोलतो,” तुला हवं ते शस्त्र निवड आणि आमच्याशी एकेकट्याने युद्ध कर. आमच्यापैकी एकाला जरी मारलंस तरी सारं राज्य तुझं होईल.” दुर्योधनाने हा प्रकार आता आपल्या बाजुने होत असल्याचा कयास बांधला असावा. कुणाही एकाशी युद्ध आणि त्यातही हव्या त्या शस्त्राने. त्याने अर्थातच ज्यात तो अजिंक्य गणला गेला होता ती गदा निवडली. यानंतर मात्र त्याची जीभ सैल सुटली. मी इंद्राला देखिल घाबरत नाही तर तुम्हाला कशाला घाबरेन अशा वल्गना सुरु केल्या. इथे मात्र युधिष्ठीराने त्याच्या अहंकाराला बरोबर डिवचले. स्वतःच्या शौर्याचा गर्व वाहणार्या व्यक्तीला तुल्यबळ प्रतिस्पर्धी हवा असतो. दुबळ्या व्यक्तीला पराभूत करुन त्यांना स्वतःच्या शौर्याचा अपमान करायचा असतो. युधिष्ठीराने पुन्हा फटकारले,” अरे उठ तर खरा. एकेकाशीच युद्ध करुन आपल्या पौरुषाचा परीचय दे. चल ये माझ्याशीच लढ. आज खुद्द इन्द्राने जरी तुझी साहाय्यता केली तरी तु जिवंत राहु शकणार नाहीस.”
दुर्योधनाच्या पराक्रमाची युधिष्ठीराने ही सरळ सरळ खिल्ली उडवली होती. दुर्योधनासारखा मानी पुरुष हे सहन करणे शक्यच नव्हते. तो त्वेषाने पाण्यातुन बाहेर आला. युधिष्ठीराने दुसरी बाजी जिंकली होती. यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे. दुर्योधन भीमाशिवाय इतर कुणाशीही लढणे शक्यच नव्हते. तो कसाही असता तरी वीर पुरुष होता. त्याला तुल्यबळ प्रतिस्पर्धीच लढण्यासाठी लागला असता. युधिष्ठीराच्या “आमच्यापैकी कुणाशीही लढ” हे आततायीपणाने वचन देण्याबद्दल कॄष्णाने त्याला दोष दिला आहे. मात्र युधिष्ठीराने ही अत्यंत चलाखपणे दुर्योधनाने बाहेर यावे म्हणुन खेळलेली चाल होती असे म्हणण्यास वाव आहे. खुद्द भगवंताला युधिष्ठीराचा कावा यावेळी कळला नाही. तिसरी बाजी अर्थातच भीमाने जिंकली. पांडवांच्या सुदैवाने “मांडीवर गदेचा प्रहार कसा काय करु” असे म्हणुन भीम अडखळला नाही आणि श्रीकृष्णाला दुसरी गीता सांगावी लागली नाही. दुर्योधन मारला गेला. शारिरीक युद्ध भीमाने जिंकले असले तरी या विजयाचा खरा शिल्पकार युधिष्ठीरच.
महाभारतातील चर्चिलेल्या या घटनांमुळे काही प्रश्न मनात डोकावले आहेत. ते या लेखाच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न आहे. युद्धाचे नियम दोन्हीकडुन मोडले गेले. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडुन सातत्याने झाले. त्यासाठी त्यावेळी जो योग्य वाटेल तो उपाय योजला गेला. महाज्ञानी आणि महापराक्रमी भीष्माने मृत्युशय्येवर युधिष्ठीरासारख्या ज्ञानी माणसाला शांतीपर्वात तत्वज्ञान सांगितले पण स्वयंवरातुन बळजबरीने काशीराजाच्या कन्या हरण करताना हे तत्वज्ञान आड आलेले दिसत नाही. द्रोणासारखा योद्धा पराभूत होत नाही म्हणुन त्याजवर मुलाच्या मृत्युची खोटी बातमी सांगुन दबाव आणताना श्रीकृष्ण नि:शंक असतो. पुढे हा बनाव यशस्वी होत नाही हे पाहिल्यावर भीम द्रोणाची स्वधर्माची दुखरी नस दाबतो आणि त्याला शस्त्रत्याग करायला भाग पाडतो. शस्त्रत्याग करुन स्वस्थ बसलेल्या माणसाला धरुन आणावे असे अर्जुनाचे मत असताना धृष्टद्युम्न त्याचे डोके उडवतो. पुढे युधिष्ठीर चलाखिने दुर्योधनाला पाण्याबाहेर काढुन अधर्माने भीमाकडुन मारवतो. या सार्या घटना नीट पाहिल्या तर हा प्रश्न पडतो को महाभारतात सांगितलेलं तत्वज्ञान आहे तरी नक्की कुणासाठी? कारण कुणीही ते पाळलेले दिसत नाही. शेवटी तत्वज्ञान हा दुबळ्यांचा धर्म आहे काय? श्रीकृष्णाने प्रत्येकवेळी तत्वज्ञानाचा सोयीस्कर अर्थ लावलेला दिसतो. याचा अर्थ आपदधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे काय? जीव वाचविण्यासाठी खोटे बोलावे, विजय मिळविण्यासाठी युद्धाचे नियम मोडावे, बाहुंत बळ असेल तर सारे तत्वज्ञान काखोटीला बांधुन मुली पळवाव्यात. म्हणजे शारीर बळ हेच शेवटी वरचढ ठरते काय? वरवर पाहता असे वाटते कि “बळी तो कान पिळी” हा नियम प्राचिन काळापासुन चालत आलेला दिसतो.
मात्र दुसर्या बाजुने पाहीले तर तत्वज्ञानाची बाजुदेखिल वरचढ दिसते. मी शाल्वाला मनाने वरले आहे म्हटल्यावर भीष्म अंबेला शाल्वाकडे परत पाठवतो. येथे त्याने शक्य असुनदेखिल बळजबरी केलेली नाही. भीमाने ब्रह्मणधर्म न पाळल्याबद्दल द्रोणाला दोष दिला त्यावेळी शस्त्र त्याग करण्याइतका त्याच्या बोलण्याचा परिणाम झाला. याचा अर्थ स्वधर्माने वागण्याला त्या काळात नक्कीच खुप किंमत होती. आपापला धर्म पाळावा, धर्माने सांगितलेली नीतीत्त्वे पाळावीत असा विचार समाजात प्रभावी होता. युधिष्ठीर खोटं बोलला असेल मात्र समाजात सत्यवचनी माणसे असतात. काहींचा त्यांच्यावर विश्वास असतो अशी परिस्थीती होती. द्रोण युधिष्ठीराकडुन अश्वत्थाम्याच्या मृत्युबद्दल खात्री करुन घेणार याची कृष्णाला कल्पना होती, इतका युधिष्ठीर सत्यवचनी होता आणि खरं बोलण्याला इतका मान होता. दुर्बलाशी लढुन निसटलेला विजय पुन्हा मिळण्याची शक्यता असताना तुल्यबळाशीच लढायचं हे नीतीतत्व समोर विनाश दिसतानाही दुर्योधनाने पाळलेलं दिसतं. हे सारं काय दर्शवतं? शारीरबळापेक्षा नीतीतत्वे आणि तत्वज्ञान महत्वाचे नाही काय? कारण या प्रत्येक माणसाने, तो भीष्म असो कि द्रोण कि दुर्योधन, नीतीतत्वाचं पालन करुन जीव गमावला आहे. मग तत्वज्ञान महत्वाचे नाही काय?
कि शारिरीक बल, तत्वज्ञान यापेक्षा बुद्धीबलाचा विजय झाला आहे? तत्वज्ञान पाळण्यापेक्षा तत्वज्ञानाचा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ लावण्यात श्रीकृष्णापेक्षा वरचढ महाभारतात कुणीही नाही. तत्वज्ञानाचा आपद्धर्म म्हणुन वेगळा अर्थ लावणे याला बुद्धीबलच आवश्यक आहे. द्रोणवधात आणि दुर्योधनाला भीमाकडुन मारवताना कृष्णाने नेम़कं हेच केलं. भीमाने तर तत्वज्ञानाचा वापरच द्रोणाला नेस्तनाबुत करण्यासाठी केला. युधिष्ठीरानेही दुर्योधनाला पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी बुद्धीचाच वापर केला. याचा अर्थ शारीर बलापेक्षा आणि नीतीत्वापेक्षा बुद्धीच वरचढ असते काय?
शेवटी कुठल्याही परिस्थीतीत विजय मिळविण्यासाठी, जीव वाचविण्यासाठी जे काही करावे लागेल ते योग्यच असा सरधोपट अर्थ यातुन काढला तर तो आततायिपणा ठरेल. मात्र माणसाने संकटात करावे तरी काय? कुठलाही उपाय योजुन जीव वाचवावा? कि तत्वपालन करुन मरावे? हा प्रश्न मला आजच्या काळाला लावावासा वाटतो. आजच्या संघर्षात टिकुन राहावे कि तत्व पालन करुन बाजुला फेकले जाणे पसंत करावे? कि महाभारतानंतरच्या शेकडो वर्षाच्या काळात जगाने काही वेगळा उपाय या समस्येवर शोधला आहे? महाभारताकडे पाहताना “तत्व कि अस्तित्व” हा मला पडलेला गहन प्रश्न आहे.
अतुल ठाकुर
प्रतिक्रिया
5 Jan 2014 - 4:02 pm | जेपी
छान झाली लेखमालिका .
महाभारत म्हंजे हत्ती आणी सात आंधळे यासारख , प्रत्येकाला वेगळा द्रुष्टिकोन देणारी .
5 Jan 2014 - 6:28 pm | उगा काहितरीच
+1
5 Jan 2014 - 4:17 pm | बर्फाळलांडगा
तत्व गोष्टीत व अस्तित्व व्यवहारात पाळावे. मी आज तागायत जरा कठीण परिस्थिती निर्माण होता तत्वाला चिकटून राहिलेला एकही मनुष्य पाहिलेला नाही मग तो कितीही साधा सरळ भासवत असो.
तत्वद्न्यान हे शायनिंग मारायला उपयोगी पडते , व्यवहार(अस्तित्व) दन्यान हे शाइन व्हायला उपयोगी पड़ते.... तत्व्द्न्यानामुळे अमुक कसा योग्य अथवा अयोग्य याचे फंडे मारत हुच्च गनता येटे, अस्तित्व द्न्यान योग्याचे योग्य अथवा वाइस वर्सा करायला उपयोगी येते
मला वैयक्तिक पातळिवर तत्वाची सांगड अस्तित्वा सोबात घालायला लिमिट स्ट्रेच होई पर्यन्त आवडते
5 Jan 2014 - 4:53 pm | महायोग
छान लेख वाचायला मिळाला.
5 Jan 2014 - 5:15 pm | बॅटमॅन
या मालिकेतील बाकीचे लेख आवडलेच परंतु हा विशेष आवडला.
शेवटी तत्त्व की अस्तित्व या प्रश्नाला एकच एक असे उत्तर मिळणे अशक्य आहे. पण शेवटी अस्तित्वासाठी तत्त्व हे मान्य करावेसे वाटते. तत्त्वासाठी अस्तित्व वगैरे ठीक आहे पण अंतिमतः आधीचेच बरोबर वाटू लागते.
5 Jan 2014 - 5:34 pm | किसन शिंदे
आधीचे दोन्ही भाग आवडले होतेच, हा पण खुप आवडला.
श्रीकृष्णानेही महाभारतात तत्त्वांपेक्षा अस्तित्वाला जास्त प्राधान्य देत प्रत्येक वेळी सोयीनुसार तत्त्वज्ञानाचा अर्थ लावल्याचं दिसून येतं.
6 Jan 2014 - 8:28 pm | बर्फाळलांडगा
आपली बाजू जिंकावी म्हणुन विविध यत्न करणे वेगळे अन कर्मयोग विषदत स्व अन स्वकुलनाश करवने वेग्ळे... आय वुड गिव अ सेकंड थोट बिफोर इम्पोसिंग एनिथिंग एल्स एक्सेप्ट कर्मयोगा ऑन प्रभू कृष्णा
7 Jan 2014 - 4:14 am | बर्फाळलांडगा
कशाचेही सिलेक्टिव रिडींग मग मी असेन अथवा साक्षात श्रीकृष्ण, तुम्हाला सगुणेच्या कथेतील हिशोबनिस/लेखपाल/जोकपाल बनवू शकते. और तूम जोकपाल नहीं हो, तुम उनसे बेहतर हो.
5 Jan 2014 - 10:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
महाभारताचा इतका बारकाईने अभ्यास केलेल्या मिपाकर रथीमहारथींचे (खरे आदरार्थी संबोधन) दाखले आणि विवेचन वाचून थक्क झालेलो आहे ! अजून काय बोलावे? ह्या मालिकेतले सर्व धागे वाचनखूण म्हणून राखून ठेवले आहेत.
5 Jan 2014 - 10:46 pm | पैसा
महाभारतातल्या सगळ्याच पात्रांमधे दैवी गुण दिसतात आणि फार वेळ होण्यापूर्वीच त्यांचे मातीचे पायही दिसतात. काहीजण इतिहास घडवतात, तर काहीजण प्रवाहपतित होऊन घडणार्या इतिहासाचा भाग बनून जातात.
जुन्या लोकांच्या सामुदायिक शहाणपणातून आलेली म्हण आहे. "शीर सलामत तो पगडी पचास!" तत्त्वासाठी मरणारे वगैरे लोक अजूनही आहेत. नाही असं नाही. त्याचप्रमाणे तत्त्वं लवचिक तर्हेने वापरणारे लोकही कमी नाहीत. हे द्वंद्व जगाच्या शेवटापर्यंत संपेल असं वाटत नाही.
6 Jan 2014 - 12:34 am | विनोद१८
अतुल ठाकूर,
सगळे भाग अप्रतिमच होते, त्यावर अधिक काही बोलायची / लिहायची गरज नाही. पण थोडक्यात आटोपलेत हो. चान्गली ८ ते १० भागाची तरी करायची होती ही मालिका, हल्ली इतके सकस व अभ्यासपूर्ण वाचायला मिळणे दुर्मिळ झाले आहे, विषेशतः महाभारतासारख्या विषयावर.
धन्यवाद.
विनोद१८
6 Jan 2014 - 1:25 am | बर्फाळलांडगा
लैच थोडक्यात उरकलं.... मुळ महाभारत वाचलं नसेल तर डाटा कमी पडतो हेच खरे :(
6 Jan 2014 - 8:41 pm | विनोद१८
..व्हय ते अख्क महभारत चलाखिनेच भरलय व हह्यान्नी लैच थोडक्यात उरकलं....[ The more you look closely, the less you will actually see! ] सारख. तवा अत्ता तुमिच उरलेल उरका महाराजा मुळ महाभारत वाचुन दाटा कमी पडायला नको, कस ??? वाट पातू.
ढ्न्यवाद.
विनोद१८
7 Jan 2014 - 12:18 am | बर्फाळलांडगा
पण सेफ बेट माझा प्रांत नाही. उगा प्रसिध्द पात्रे निवडाय्चि अन भोवती मनोवांछित क्लुप्ती गुंफायची व लोकांचे मनोरंजन करायचे मला शक्य नाही.
त्यापेक्षा असे करून लोकांचे मनोरंजन होते हे बघणे जास्त हास्यदायी आहे म्हणून लिहणार नाही.
माझ्या इतका शहाणा कोणी नाही व माझ्यापेक्षा शहाणा कोणी नाही परिणामी मी लिहलेले तुम्हाला आकलन होइल असेही नाही असे माझे वैयक्तिक मत आहे
7 Jan 2014 - 12:54 am | विनोद१८
बरे झाले, फार लौकर समजले आपल्या प्रान्ताबद्दल आपल्याला, आमचे मात्र मनोरन्जन झाले. हा लेख कित्ती कित्ती मनोरन्जक नाही ??
आपण लिहाच हो कोणी नाही हसणार पण मनोरन्जन मात्र जरुर करुन घेउ.
हे मात्र १०१% खरे हो.. तुम्च्या इतका शहाणा कोणी नाही व तुमच्यापेक्षा शहाणा कोणी नाही परिणामी तुम्ही लिहलेले आम्हाला आकलन होइल असेही नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.
The less you look closely, the more you will likely to see !!!
7 Jan 2014 - 1:11 am | बर्फाळलांडगा
फुकटचे अथवा कसलेही सल्ल्ले देऊ नयेत. :)
वाज नाइस टाकिंग विद यु
6 Jan 2014 - 12:42 pm | स्वाती दिनेश
तिन्ही भाग आवडले, पण थोडक्यात आटोपले याच्याशी सहमत,
स्वाती
6 Jan 2014 - 8:31 pm | विकास
युधिष्ठीर हे व्यक्तिमत्व वाचल्यावर मला तो काँग्रेसचा मूळपुरूष असावा असे वाटते. ;)
7 Jan 2014 - 2:46 am | अर्धवटराव
महाभारत काव्यातल्या काहि पात्रांच्या वागणुकीवर एका वेगळ्या दृष्टीने विचार करण्याचा, व ते नीट मांडण्याचा उत्तम उपक्रम झाला या लेखमालेत.
महाभारतातलं सगळं राजकारण, युद्ध, नैतीक-अनैतीकाचा लेखाजोखा मानवी फायदा-नुकसानीच्या तराजुने तोलताना एक उणीव मला प्रकर्षाने जाणावते. ति म्हणजे, हे सगळं ज्या एका साध्याकरता झालं त्या सत्ता किंवा राजसिंहासन नामक वस्तुचा मला किती गंध आहे. राजा कालस्य कारणम् असं (बहुदा) भीष्म म्हणतो. या वचनाची प्रगल्भता स्वतः भीष्माला, श्रीकृष्णाला, युधिष्ठीराला नक्की उमगली असावी. प्रशासनव्यवस्था व लोकांच्या दैनंदीन आणि दीर्घकालीन जीवनावर तिचा प्रभाव, भावी पिढ्यांसमोर ठेवायची उद्दीष्टे आणि आदर्श, भूतकाळाने लादलेल्या किंवा स्वतः स्विकारलेल्ल्या जबाबदार्या, जनतेचे ऐहीक आणि पारलौकीक उत्कर्ष, समाज रचनेतील बदल किंवा अभिसरण, निसर्गाची इतर प्राणि मात्रांवर चालणारी पण माणसाची स्वकृत न्यायमिमांसा इ. अनेक धागेदोरे एका राज्यशासन नामक वस्त्रात विणलेले असतात. हे वस्त्र अंगावर चढवलेल्या व्यक्तीचे भले-बुरे व्यवहार दिसायला जरी सामान्य माणसाच्या पातळीचे आसतील तरी त्याच्या संदर्भाचे योग्य आकलन करणं मला कठीण जातं. म्हणुनच महाभारत युद्ध हे केवळ इस्टेटीवरुन झालेली वादावादी नसुन ते राज्यव्यवस्थेचे कुस बदलणे वाटतं. त्यातील पात्रं केवळ खटल्यातील वादी-प्रतिवादी नसुन लॅण्डस्लायडींगमुळे कोसळणार्या पर्वत कड्यांना अंगावर घेणारे वृक्षवल्ली वाटतात.