घरी चोरी झाली तर आपल्याला दु:ख होते. चोरी का झाली? चोरी टाळता आली असती का? आपली लापरवाही अथवा लापरवाहीचे खापर घरातल्या कुणाच्या तरी डोक्यावर आपण फोडतोच. घरच्या सर्वाना चोरीपेक्षा चोरीचमुळे वाव-विवादांचा त्रास जास्त होतो. शिवाय पोलीस, शेजारी, मित्र-मंडळी इत्यादीचा ही त्रास होतोच. शेजार-पाजार्यांना फालतू चर्चे साठी एक विषय मिळतो.
पण कधी-कधी असे ही होते, घरी चोरी झाल्याचा त्रास होण्याऐवजी, त्याचा आनंद होतो. असाच, चोरीचा एक किस्सा आहे. गुप्ताजी आणि शर्माजी दोघांचे घरलागून होते. तो महिन्याचा शेवटचा दिवस होता, नेहमीप्रमाणे सकाळी गुप्ताजी आपल्या दुकानात आणि शर्माजी आपल्या ऑफिसात वं त्यांची मुले शाळेत गेलेली होती. वर्माजींच्या घरी पूजा आणि पाठ होता, दोघांच्या ही घरच्या स्त्रियातिथे गेल्या होत्या. दिल्लीत कुठे ही पूजा-पाठ असेल लाउडस्पीकर हा जोरात वाजविला जातो. पूजेपेक्षा, घरात पूजा-पाठ आहे, हे सर्वांना कळणे महत्वाचे. (दिल्लीकरांची दिखाऊ प्रवृत्ती). भुरट्या चोरांना ही याचा फायदा मिळतो. अशीच संधी-साधून एक भुरटा चोर गुप्ताजींच्या घरी शिरला. हा चोर फक्त नगदी चोरायचा. त्यास गुप्ताजींच्या घरी वीस-पंचवीस हजार रुपये भेटले. तिथून तो गच्ची वर गेला. शर्माजींचा गच्चीवरचा दरवाजा उघडा होता. चोर उडी मारून शर्माजींचा घरात शिरला. आता आपले शर्माजी सरकारी कारकून त्यात ही केंद्र सरकारच्या कार्यालयात काम करणारे (दुसर्या शब्दात मजबूरीने इमानदार असलेले). त्यांचा एक तृतीयांश पगार (१/३) पोरांच्या शिक्षणात खर्च होता. (दिल्लीत अधिकांश शाळा निजी मालीकीच्या आहे, पहिलीची फीस ही दोन हजाराचा खाली नसते). उरलेल्या पगारात कसे-बसे घरचा खर्च चालविणारे. महिना अखेरी “ठणठण गोपाल” ही परिस्थिती त्यांच्या घरी नेहमीचीच. चोराला घरात काही चिल्लर नोटां शिवाय काहीच सापडले नाही. उगाच वेळ व्यर्थ गेला म्हणून त्यांने वैतागून एका कागदावर खरडले ‘ओय कंगले, इमरजेंसी वास्ते हजार- दो हजार तो घर में रख्खा कर’ (भिकारडया, घरात कमीत-कमी इमरजेंसी साठी हजार-दोन हजार तर ठेवत जा) आणि एक हजाराची नोट त्या सोबत ठेउन तो निघून गेला अर्थातच गुप्ताजींच्या घरून चोरलेली.
चोरानी एका रीतीने शर्माजींच्या थोबडातच मारली होती. साहजिकच आहे, ही चोरी गल्लीत चर्चेचा विषय झाली. शर्माजी सरकारी बाबू आहेत, ते इमानदार आहेत. कदाचित शर्माजींची बायको खर्चिक असावी. तसे शर्माजी सीधे-साधे सरळमार्गी दिसतात पण कदाचित त्यांना कसलंतरी व्यसन असावं. त्यातच त्यांचा पगार खर्च होत असेल अन्यथा हजार-दोन हजार घरात असतातच. लोक शंकेच्या दृष्टीने त्यांच्याकडे बघू लागले. काही ही म्हणा, लोक व्यवहारी असतात. असल्या कंगल्या माणसाकडून आपल्याला काहीच फायदा नाही. उलटपक्षी काही मागण्याची भीती. शर्माजींचा दुआ-सलाम ही कमी झाला. दुसऱ्या शब्दांत त्यांची इज्जत कमी झाली.
दुसरी कडे, गुप्ताजींची इज्जत वाढली. वेळी-अवेळी हा माणूस आपल्या कामी येऊ शकतो, आपल्याला मदत करू शकतो, असे शेजारी-पाजार्याना वाटणे साहजिकच होते. त्याची दुआ-सलाम ही वाढली, मोहल्यातील सर्व लोक गुप्ताजींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागले. ते ही चोरीची घटना गर्वाने छाती फुलवून रंगवून-रंगवून सांगू लागले. “अरे, उस दिन घर में लाख-डेढ़ लाख पड़ा था, भला हो उस मूर्ख चोर का, जिसे पडौसी शर्मा के घर जाने की जल्दी थी. अरे, उसका पूरा का पुरा घर खोद डालता तब भी उस कंगले के यहाँ कुछ नहीं मिलता. भगवान जो करता है, अच्छा ही करता है. हा! हा! हा!”
मला ही आत्ता असाच अनुभव आला. दोन-तीन दिवसांपूर्वी मला कळले माझ्या ब्लाग वर लेख छापण्या पूर्वीच दोन महाभागांनी तो लेख आपापल्या ब्लागांवर त्यांचा नावाने प्रकाशित केला. मला आश्चर्य वाटले. सौभाग्याने तो लेख आधी मराठीसृष्टी या वेबसाईट मी टाकलेला होता. त्याची लिंक सापडली. पण मानसिक त्रास हा झालाच. काल ऑफिसात गेलो होतो. आमच्या कार्यालयात सर्वाना इंटरनेट उपलब्ध नाही आहे. भविष्यात त्रास होऊ नये म्हणून त्या वेबसाईट वर ‘माझे लेख’ या जागेवर जाऊन आपल्या सर्व लेखनाची डिटेल (पाच-सहा पाने) कापी करून घेण्याचे ठरविले.
माझ्या मित्र सुनीलच्या सेक्शन मध्ये इंटरनेट सुविधा होती. लंच टाईमला त्याचा कडे गेलो. तसा सुनील ही ऐक वेगळाच औलिया आहे. मुक्ताफळे तर त्याच्या तोंडावर खेळत असतातच. सुनील, काही प्रिंट घ्यायचे आहे. तो म्हणाला ‘भाई कविता हो तो चुपचाप लेके पिछली गली से खिसक जा. आज कान में रखने के लिए रुई नहीं है, सुनाएगा तो खूप मारूंगा’(कवितेचे प्रिंट घेउन चुपचाप खिसक, ऐकविण्याचा प्रयत्न केला तर खूप मारीन). मी त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्या वर तो उद्गारला ‘तेरे जैसे टुच्चों को कोई छापने वाला मिलता नहीं है, बस वेबसाइट लिखकर अपनी खुरक मिटाकर खुद को लेखक समझ रहे हैं(तुझ्यासारखे फालतू लोक, वेबसाइट वर लिहून, आपली खाज मिटवितात आणि स्वत:ला लेखकु समजतात). अरे, पण आता तुला खुश व्हायला पाहिजे. मी म्हणालो, यात खुश होण्यासारखे काय आहे. सुनील म्हणाला, अरे ज्या वस्तूला काही किंमत असते त्याची चोरी होऊ शकते. भले ही किंमत चार आणा-आठाना का असेना. सॅारी, या पेक्षा छोटा सिक्का आजकाल मिळत नाही, तशी कविता इत्यादींची किंमत त्या पेक्षा निश्चित कमी असेल. हा! हा! हा!
माझ्या डोक्यात प्रकाश पडला, आपण उगीचच दुखी होतोय. गुप्ताजींची आठवण झाली. ते कसे गर्वाने छाती फुलवून रंगवून-रंगवून चोरीची कहाणी ऐकवितात. आपली नसलेली छाती फुलते आहे, असा भास मला झाला. सुनीलने माझ्या चेहऱ्यावरचे भाव पटकन ओळखले. पक्का बाबू असल्या मुळे मुर्गा पटकन कसा कापला पाहिजे ह्या कलेत तो पारंगत होताच, लगेच म्हणाला, तो इस ख़ुशी के मौके पर एक-एक कप काफी हो जाय. अश्या रीतीने साउथ ब्लॉकच्या काफी हाउस मध्ये कॉफी पीत-पीत चोरी झाल्याचा आनंद आम्ही साजरा केला.
प्रतिक्रिया
31 Dec 2013 - 3:12 pm | अनिरुद्ध प
पण नक्की काय म्हणायचे आहे याचे आकलन झाले नाही.(त्यामुळे आम्ही मतिमन्द आहोत यावर शिक्कामोर्तब झाले आहे)
31 Dec 2013 - 3:14 pm | अनिरुद्ध प
वरिल कंसातिल प्रतिसादातील आम्ही=मी असा वाचावा.
1 Jan 2014 - 2:04 pm | आनंदी गोपाळ
नै. बरोबरे तुमचं
31 Dec 2013 - 7:09 pm | हाडक्या
काय वो अनिरुद्धभौ, आता काय कवितांसारके गोष्टींचे पन रसग्रहण पायजे काय.. वरनं कोणी काही म्हणू नये म्हणून डिस्केमर आहेच (मतिमंद असल्याचा)..!! असो.. ;)
छान मुद्दा मांडलाय विवेकभौ.. फक्त गोष्ट आणि प्रसंगातील सांगड हिंदी लहेजावाल्या मराठीमुळे थोडे अवघडात पडले आहे.. बाकी यवस्थित..
31 Dec 2013 - 7:26 pm | उपास
खरं आहे सकारात्मक दृष्टीकोन जोपासला की बरं पडतं.. चोरी करणारा निर्लज्जपणे करुन जातो, आपण कशाला त्रास करुन घ्या..
अवांतर -
'चोरी झाल्याचा आनंद' म्हणजे हिंदी पिक्चर /गाण्यांनधे दाखवतात तसं 'दिल की चोरी' तून आनंद झालाय की क्कॉय असं वाटलं शिर्षक वाचून.. ;)
1 Jan 2014 - 10:18 am | मृत्युन्जय
हाहाहा. मजा आली. आमचे लेख कोणीच चोरत नाही याचा आनंद मानावा की दु:ख काही कळेना ;)
1 Jan 2014 - 10:36 am | हतोळकरांचा प्रसाद
चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला च्या ऐवजी चोरीचा मामला आणि जोरजोराने बोंबला!!!… बाकी लेख काय होता हो कि दोन जणांना स्वत:च्या नावावर टाकण्याची हाव झाली ;)…वाचायला आवडेल तो लेख.
2 Jan 2014 - 2:46 am | राजेश घासकडवी
चोरीला गेलेला लेख आणि त्या चोरीबद्दलची चर्चा इथे वाचायला मिळेल.
2 Jan 2014 - 3:00 am | हतोळकरांचा प्रसाद
धन्यवाद! उत्तम लेख!! (चोरण्यासाराखा आहे, पर उचलेगिरी कवाबी वंगाळच बगा!)
1 Jan 2014 - 12:13 pm | ज्ञानोबाचे पैजार
कोणालातरी माझे लेख चोरण्याची सुपारी द्यावीका? असा विचार करतो आहे.
आपणहुन तर कोण चोरणार नाही याची खात्री आहे.
1 Jan 2014 - 12:34 pm | हतोळकरांचा प्रसाद
:))
1 Jan 2014 - 12:24 pm | नाखु
आपलं मिपावरचं लेखन चोरण्याईतकही नाही..
कंगाल (वाचक)
2 Jan 2014 - 11:36 am | नक्शत्त्रा
हाहाहा.