जी ए कुलकर्णी ह्यांच्या 'स्वामी' कथेतील एका प्रसंगाचे कवितेत रुपांतर.
काळकोठडी मध्ये टाकला एक बंदिवान
काळ्या दगडात विसरला काळाचे भान
आहे ठाऊक पक्के त्याला, नशीब ह्या जन्मीचे
सुटण्यासाठी सहाय्य, केवळ मिळेल मरणाचे
किती खोल अन् कुणास ठाऊक, खोली तुरूंगाची
तसूभरही ना दुसरे जीवन, न चाहुल कोणाची
भिंतीमधली झडप उघडुनी, ताट येतसे आत
तोच एक आवाज जगाचा, बाकी सारी मयत
आंधाराहून कृष्ण छाया, स्वतःचीच पाहतो
नीरव अश्रू विना हुंदके, अंतरीच दाबतो
बाह्यजगाशी एकच नाते, नलीका हवेसाठी
तिच्याच योगे जगते आहे, शरीराची काठी
क्षीण कवडसा कधी उतरतो, नलीकेतून खाली
मित्रची जणू येई भेटाया, दुर्गम बंदीशाली
एकलकोंड्या जगती हा अंकूर कुठून आला?
नवलाने अन् महा कौतुके रोज पाहतो त्याला
वाढवितो मग कैदी त्याला थेंबे थेंबे पाणी घालून
तरारता तो, बंदीही हर्षीत वाटे लाभे मलाच जीवन
दिवसामागून काळ जातसे अंकुराया वेलीवरूनी
बघता बघता नलीकेमार्गे, चढे वेल ती उम्मेदीनी
बंदी पाही कौतुके प्रथम, परी जाणवते घुसमट काही
श्वासही घेणे दुष्कर झाले, धापा टाकित सारे साही
वेलीने नलीकामार्गातून, जीवनवायू शोषून नेला
मोदभरे अधीक पुष्टली, दुषीत वायू निस्सारलेला
सार उमगता, बंदी क्रोधीत, नलीकेमधून वेला बघतो
हिरवाकंच पसरला आणि जोशे वरती वरती जातो
चोरून जीवनवायू माझा, कसा जातशी आकाशासी?
थांब तुला उपटूनी टाकतो, जीव माझा वाचवण्यासी
हात सरसावूनी धरीले घट्ट, वेलाच्या मग बुंध्याला
हिसका थोडा देता, हिरवी पाने जणू सांगती त्याला
जाऊदे मज ऊंच नभी, होईन मोदभरे दिवाणा
वाढवीन मी वंश माझा, पक्षांनाही देईन दाणा
ऐकुनी दीन वचन वेलाचे, बंदीवान पाझरला
उगम होउदे जीवन ह्याचे, मृत्यु देऊन मज कैद्याला
गोंजारून वेलाला, घेऊन खोल श्वास शेवटचा
प्राणपाखरू त्याचे चढले, डोलारा वेलाचा.
प्रतिक्रिया
21 Jul 2008 - 10:26 am | namdev narkar
काव्य छान आहे. सावरकरा॑चे स॑दर्भात आहे का?
21 Jul 2008 - 1:12 pm | पक्या
काव्य चांगले जमले आहे.