योग – प्रतिबंधात्मक उपाय
शाळेत असताना विज्ञानात शिकलो होतो कि उत्क्रांतीतून मर्कटाचा मानव झाला.मनुष्य प्राणी हा जरी जात्याच बुद्धिमान असला तरी त्यास पडलेले एक कोडे उलगडत नव्हते, ते म्हणजे या जीवनाचे ध्येय काय ? महामुनी पतंजलींनी हे कोडे उलगडले - नश्वर जीवनास योगरूपी संजीवनी देऊन ! योग हा शब्द संस्कृत धातू 'युज' पासून बनलेला आहे.युज म्हणजे संयोग पावणे वा एकत्र जुळून येणे. आत्म्याचा परमात्म्याशी संयोग म्हणजेच योग होय !
योगमध्ये प्रामुख्याने चार प्रवाह मानले जातात – कर्म योग, भक्ती योग, ज्ञान योग आणि राजयोग .राजयोग हा महामुनी पतंजली प्रणीत अष्टांग योगाचाच एक भाग आहे. अष्टांग योगमध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम,प्रत्याहार,धारणा,ध्यान आणि समाधी या अंगांचा समावेश होतो.सद्य परीस्थितीत आसन आणि प्राणायाम या अंगांना विशेष महत्व्व प्राप्त झाले आहे.आसन आणि प्राणायामाच्या अभ्यासाने मनुष्यास सु-तन आणि सु-मन प्राप्त होते.व्याधींचे मूळ कारण मनोकायिक दुर्बलतेत असल्यामुळे आसन आणि प्राणायामाचा सराव हा रोगप्रतिबंधास उपयुक्त ठरतो.
“उपायापेक्षा प्रतिबंध हा श्रेयस्कर असतो” अशी जुनी म्हण आहे.आजकालच्या धकाधकीच्या जीवनात,ज्याप्रमाणे सुखी माणसाचा सदरा सापडणे दुर्मिळ आहे त्याचप्रमाणे पूर्णतः निरोगी माणूस सापडणे दुरापास्त झाले आहे.घड्याळ्याच्या काट्यामागे धावण्याच्या शर्यतीत आपल्या शारीरिक घड्याळाची (Biological Clock) स्प्रिंग कुठेतरी किरकिर करू लागते.अशावेळेस शरीररूपी घड्याळाची योगरूपी चावी दररोज फिरवली तर घड्याळ कधी बंद पडणार नाही.
व्याधी यांस योगमध्ये चित्तविक्षेप असे समजले जाते.व्याधींची 4 प्रकारात विभागणी होते.अधिदैविक ,अधिभौतिक,अध्यात्मिक आणि चौथा प्रकार या तिन्हींचे मिश्रण.अधिदैविक व्याधी या जनुकीय (hereditary) असतात.उदाहरणच द्यायचे झाले तर Diabetes , Blood Pressure सारखे आजार हे आई - वडिलांस असतील तर त्यांच्या अपत्याससुद्धा हे आजार होण्याचा धोका असतो.अशावेळेस योगसाधनेचा अवलंब केल्याने ह्या आजारांचे निमंत्रण आपण पुढे ढकलू शकतो वा त्यांची तीव्रता कमी करू शकतो.अधिभौतिक व्याधी या मुख्यतः भौतिक म्हणजेच आजूबाजूची परिस्थिती वा आहार-विहारामुळे होतात.यामध्ये व्यवसायजन्य रोगांचाही (Occupational Disease) समावेश होतो.दमा आणि श्वसनासंबधित विकार हे मुख्यतः दुषित हवेमुळे होतात.प्राणायामाच्या योग्य सरावाने ह्या रोगांस अटकाव तर होतोच आणि या रोगांची तीव्रता हि कमी होते.अध्यात्मिक म्हणजे मानसिक व्याधी.चिंतामणी हे लाडक्या गणरायाचे नाव , परंतु आज या नावाचा अर्थ बदलेला आहे तो म्हणजे चिंता–Money.वृद्धांना त्यांच्या उतारवयाच्या काठीची चिंता, तरुणास भविष्याची चिंता, पालकास मुलांची चिंता आणि मुलांस अभ्यासाची चिंता.काहीवेळा या सर्व चिंतांचे तणावात रुपांतर होऊन नैराश्य येते.एक प्रकारची मनावरील हि मरगळच.अशावेळेस नियमित आसन आणि प्राणायामाचा अभ्यास केला असता मानसिक बळ वाढून तन-मन उत्साही राहते आणि मानसिक रोगांस चांगल्या प्रकारे प्रतिबंध घालता येतो.
व्याधी उत्त्पन होण्यासाठी पांच गोष्टी कारणीभूत असतात.1.जनुकीय 2. परिसर 3. आहार 4. विहार 5.विश्रांती.यातील प्रथम 2 गोष्टींवर आपले नियंत्रण नसते.परंतु , आहार ,विहार आणि विश्रांती या तीन गोष्टींवर आपण नियंत्रण वा बदल करू शकतो.थोडक्यात सांगायचे झाले तर योग हे शास्त्र न मानता त्यास आपली जीवनशैली मानली तर निश्चितच आपण व्याधीस प्रतिबंध करू शकू इतकेच नव्हे तर आपले आरोग्यही चांगले राखू शकू .
आदर्शरीत्या ,योग शरीराकडून मनाकडे आणि मनाकडून चित्ताकडे असा प्रवास आहे.परंतु सद्य परिस्थितीत तरी शरीर ते मन हा प्रवास अधिक व्यवहार्य ठरतो.हि व्यवहार्यता जाणूनच गुरुवर्य निंबाळकर गुरुजींनी त्यांच्या योगवरील पुस्तकाससुद्धा “आरोग्यासाठी योग” असे समर्पक नाव दिले.डॉक्टरांनीसुद्धा योगचे महत्त्व जाणून औषधाप्रमाणेच रोग्याच्या प्रकृतीस पूरक अश्या आसन आणि प्राणायामाची शिफारस करतात.वैद्यक शास्त्रातील आयुर्वेद हि शाखा तर योगास पूरक नव्हे तर एक उप-अंगच आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.कारण योग आणि आयुर्वेदात व्याधीवर नव्हे तर रोग्याची प्रकृती सुधारण्यावर विशेष महत्त्व दिले जाते.प्रकृती पाहूनच पथ्थ्य वा प्रतिबंधात्मक उपाय सुचवले जातात.आयुर्वेदात त्रिदोषास विशेष महत्त्व आहे.कफ,पित्त आणि वात यांस त्रिदोष असे समजले जाते आणि योगमध्ये निर्देशित केलेल्या शुद्धीक्रियांच्या नियमित सरावामुळे त्रिदोषांचे संतुलन तर टिकून राहतेच आणि अनेक कफ - पित्त - वात संबधित रोगांस अटकाव होतो.Occupational Disease म्हणजेच व्यवसायाशी संबधित रोगांचे प्रमाण आजच्या काळात अधिक वाढलेले आहे.खाण कामगार , बांधकाम कामगार आणि स्वास्थ्यसेवा इतर तत्सम व्यवसायाशी निगडीत लोकांना नानाप्रकारचे रोगांनी त्रासलेले असते.उदाहरणार्थ खाण कामगार साधारणतः श्वसनासंबंधी रोगांनी त्रस्त असतात.अशावेळेस योगचा दैनंदिन जीवनात अवलंब केला असता आपली रोग प्रतिकार शक्ती वाढतेच त्याचबरोबर अशा रोगांस काही प्रमाणात प्रतिबंधहि घालता येतो.
स्वास्थ्यसेवेची पाच टप्यात विभागणी केलेली आहे.ती म्हणजे 1. स्वास्थ्य-वृद्धी वा प्रसार 2. रोगप्रतिबंध 3.शीघ्र आणि अचूक निदान 4. योग्य आणि पूर्ण उपचार 5. स्वास्थ्यलाभ वा स्वास्थ्य-पुनर्वसन.योग हा प्रामुख्याने पहिल्या ,दुसऱ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी विशेष उपयोगी आहे . AIDS आणि Cancer यांसारख्या दुर्धर रोगांवर निदान आणि उपचार यापेक्षा रोग प्रतिबंधच अधिक उपयुक्त ठरू शकते. इंग्रजीत तर म्हणच आहे कि, “ Better Safe Than Sorry “. रोग प्रतिबंधासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे जीवनशैलीत बदल.आपल्या जीवनशैलीत योगसाधनेचा समावेश केल्यास आपण काही प्रमाणात या दुर्धर रोगांस प्रतिबंध करू शकतो.
योग हा शाश्वत आहे त्याचप्रमाणे वृद्धत्व हेसुद्धा शाश्वत आहे आणि ते कोणीही चुकवू शकत नाही .अशावेळेस तरुणपणीच योगिक जीवनशैलीचा अवलंब केल्यास वृद्धापकाळातील पिडा आणि व्याधी विलंबित होतात वा सुसह्य होतात. आपण मानसिक सामर्थ्य आणि रोगप्रतिकारक शक्तीने कोणत्याही रोगास अटकाव वा प्रतिबंध करू शकतो आणि या दोहोंची वृद्धी हि योगमुळे होते.
ज्याप्रमाणे समुद्रासही किनाऱ्याची मर्यादा असते. त्याचप्रमाणे योगाशास्त्रास सुद्धा मर्यादा आहेत.योग हा जुनाट (Chronic Disease) रोगांशी लढण्या वा प्रतिबंध करण्यास समर्थ आहे.परंतु, अपघात , ह्रिदयविकाराचा झटका वा तीव्र नि अचानक (Acute disease) उद्भवलेल्या रोगाशी सामना वा अटकाव करू शकत नाही .परंतु अशा रोग्यांस Rehabilitation म्हणजेच त्यांचे स्वास्थ्य पूर्ववत आणण्यास योग हा निश्चितच फलदायी ठरतो.
आधुनिक युगात योगचे महत्त्व पुन्हा वाढले आहे.परंतु , बहुतांशी लोक योगकडे एक उपचार पद्धती वा चिकित्सा म्हणून पाहतात. योग चिकित्सा हा योगचा एक भाग आहे, ते पूर्ण-अंग नव्हे. स्वास्थ्य या शब्दाची व्याप्ती केवळ शारीरिक नसून ती मानसिक आणि सामाजिक एवढी व्यापक आहे .आताच्या परिस्थितीत नीती-मुल्यांचा ऱ्हास होत चालला आहे . नैतिकता ढळत चालली असून, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक घटनांमुळे सामाजिक स्वाथ्य ढासळत चालले आहे .तात्विकदृष्ट्या विचार केला तर रोगांचे मूळ हे नियमांचे उल्लंघन आणि यमांचे पालन न केल्याने होते .यम-नियमांना अनुसरून जीवन व्यतीत केले तर निश्चितच समाजातील कु-प्रवृत्तीस आळा बसेल. कर्मयोगाचे पालन केल्यास निश्चितच समाजातील लोभी वृत्तींना प्रतिबंध होऊन सामाजिक स्वास्थ्य सुधारेल. भक्ती योगचा अवलंब केल्याने वासनारहित प्रपंचही परमार्थाकडे नेतो.ज्ञान योगने अधर्माच्या अन्धःकारास अटकाव होऊन ज्ञानाचे तेज सर्वत्र पसरते.
सद्य स्थितीत काम,क्रोध,लोभ,मद,मोह आणि मत्सर या षडरीपुंबरोबर चिंता आणि तणाव या द्वि-रीपुंचीसुद्धा भर पडली आहे. अशावेळेस योग रुपी संजीवनीचे मूर्च्छित पडेस्तो वाट न बघता दररोज प्राशन करणे हीच खरी काळाची गरज आहे.
प्रतिक्रिया
25 Dec 2013 - 7:15 am | मारकुटे
ओके!.
25 Dec 2013 - 10:52 am | सुबोध खरे
सर्वसाधारणपणे एखाद्या विचार/ जीवन पद्धतीवर लिहिणारा लेखक हा त्या पद्धतीचे अतिरंजित वर्णन करतो त्यामुळे बर्याच लोकांचे त्या लेखकाबद्दल किंवा पद्धतीबद्दल मत कलुषित होत जाते.
उदा. खेळ किंवा व्यायाम करणार्या लोकाना कर्करोग होत नाही. तसे असते तर युवराज सिंह यास कर्करोग झालाच नसता. आज आधुनिक उपचारणी त्याचा कर्करोग बरा होऊन तो पूर्णपणे क्रिकेटच्या संघात खेळू शकतो) येथे लेखकाने कोणताही अतिशयोक्ती युक्त दावा न करता यथा तथ्य वर्णन केले आहे. योगामुळे कोणताही रोग(कर्करोग किंवा एड्स वा तत्सम) बरा करता येतो किंवा प्रतिबंध करता येतो असा दावा करणारे लेख आपल्याला वारं वार आढळतात.त्यातील फोलपणा माहित असल्याने लोक त्या लेखातील चांगले मुद्दे पण दुर्लक्षित करतात. पण येथे असे कोणतेही दावे नसल्याने लेख अतिशय संतुलित आणि योग्य झाला आहे. लेखकाचे आवर्जून अभिनंदन.
बाकी योगाबद्दल काही लिहावे अशी माझी लायकी नाही.
25 Dec 2013 - 2:44 pm | मुक्त विहारि
आवडला...
26 Dec 2013 - 1:06 am | विअर्ड विक्स
धन्यवाद खरेजी... तुमच्या लेखांचा मी चाहता आहे. तुमच्या लेखांतून प्रेरणा घेऊनच लेख टकविला.... सवड मिळेल तसे परत लिहायचा प्रयत्न करीन...
मीही कोणी थोर योगसाधक नाही परंतु जी काही थोडीफार माहिती आहे ती SHARE केली इतकेच.....
26 Dec 2013 - 2:43 pm | साती
26 Dec 2013 - 6:20 pm | पैसा
योगाच्या फायद्यांबरोबर मर्यादासुद्धा लिहिल्याने लेख संतुलित झाला आहे. या विषयावर आणखी लिहा. स्वागतच आहे. प्रासनी सुरुवात केली होती. पण सध्या त्यांना वेळ नाही वाटतं. डॉ. बाबा पाटील आणि तुमचे लेख एकमेकांना पूरक होत आहेत. आणखी लेखांना शुभेच्छा!
(मी मुद्दामच 'योगाच्या' असं लिहिलंय. प्रथमा विभक्तीचं रूप 'योग' हे बरोबरच आहे. इंग्रजाळलेले लोक त्याला 'योगा' म्हणतात, ते जाऊ दे. पण त्याला इतर विभक्तीप्रत्यय लावताना त्याचा 'योगाला' 'योगाचा' अशीच रूपे होतात.)