मागच्या महिन्यात माझ्या मुलीचा वाढदिवस होता.म्हणून आम्ही मुलुंडलाच एका चिनी आणि थाय खाद्यसेवा देणारया हॉटेलात जायचे ठरविले होते.मुळात मधलाच वार असल्याने हॉटेलात गर्दी नसेल म्हणून आम्ही जायचे ठरविले होते.माझा दवाखाना साडेआठला बंद होतो. त्यादिवशी आठ पंचवीसला कोणी रुग्ण नाही म्हणून मी माझ्या स्वागत सहाय्यीकेला दवाखाना बंद करायला सांगून जिना उतरत होतो. आता शांतपणे हॉटेलात बसून छानपैकी जेवूया या विचारत होतो. एवढ्यात एक तरुण जोडपे पंचविशीच्या आत बाहेर ( बायको पंचविशीच्या आत आणि नवरा पंचविशीच्या बाहेर) चिंताक्रांत चेहेर्याने समोरून येताना दिसले. आता चिंताग्रस्त होण्याची पाळी माझी होती कारण मी बायकोला दवाखाना बंद करून घरी येत आहे आणि तुम्ही तयार व्हा असा फोन केला होता. त्या जोडप्याने सोनोग्राफी करायची आहे असे सांगितले. मी विचारले की तातडीचे आहे का? कारण माझी स्वागत सहाय्यीका आता घरी गेली आहे. त्यावर तो नवरा म्हणाला आमच्या स्त्रीरोगतज्ञाने लगेच सोनोग्राफी करायला सांगितले आहे. मी विचारले काय होते आहे तेंव्हा ती बायको म्हणली की मला दिवस गेले आहेत आणि आता रक्त स्त्राव होतो आहे.
असे म्हटल्यावर मला कुठलाच पर्याय नव्हता. मी मुकाटपणे उलटा फिरून जिना चढायला लागलो. वर जाउन दवाखान्याच्या दाराचे कुलुप काढू लागलो त्यावर त्या नवर्याला वरमल्यासारखे वाटू लागले तो म्हणाला डॉक्टर तुम्हाला त्रास देतो आहे पण काय करणार अशी परिस्थिती आहे. तिला( बायकोला) मागे पण असेच झाले होते आणि रक्तस्त्राव होऊन शेवटी गर्भपात झाला होता.मी त्याला म्हटले अहो तुमची काय चूक आहे तुम्ही कशाला माफी मागता आहात. मी त्या नवरा बायकोला आतल्या खोलीत घेतले सोनोग्राफीचे मशिन चालू केले माझा संगणक चालू केला. त्या जोडप्याचा चेहेर्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता.त्या बाईना मी झोपवले आणि आतून( ट्रान्स VAGINAL) सोनोग्राफी चालू केली. अर्थात प्रोब आत टाकल्यावर मुलाच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे दिसू लागले. त्या मुलाच्या हृदयाचे ठोके त्या होणारया आईबापाना ऐकविले सुद्धा. आता त्यांचा बंध फुटला. बायको हमसून हमसून रडू लागली. नवर्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याचा पहिला भर ओसरल्यावर मी त्याना मुलाचे नुकतेच तयार होणारे अवयव( मेंदू हृदय नाळ ई) दाखविले बाकी सर्व तपासणी केली रक्तस्त्राव का होतो आहे ते पाहिले. आतमध्ये असे कोणतेही कारण सापडले नाही. मी माझी तपासणी पुर्ण केली बाहेर आलो आणि त्यांचा रिपोर्टचे टंकन चालू केले. यावेळे पर्यंत आपल्याला बाहेर जायचे आहे हे मी पुर्ण विसरलो होतो.तेवढ्यात समोर फोन वाजला. आणि त्याबाजूने बायकोने सरबत्ती सुरु केली. आम्ही तू येतो आहेस म्हणून तयार होऊन बसलो आहोत आणि तू अजून दवाखान्यातच? इ इ . मी तिला झालेली परिस्थिती सांगितली आणि सांगितले की तुम्ही हॉटेलात जा आणि सूपची ओर्डर द्या,तोवर मी येतोच.सुदैवाने माझी बायको स्वतः डॉक्टर असल्याने ती हे समजून घेऊ शकत होती. आणि त्यामुळे ती ठीक आहे म्हणाली
ते जोडपे तोवर बाहेर आले होते.आतापर्यंत ते पुर्ण सावरले होते. तणाव नाहीसा झालेला स्पष्ट दिसत होता.त्यांनी माझे बोलणे ऐकले होते. आता त्या नवर्याने मला विचारले.डॉक्टर तुम्ही कुठे बाहेर जाणार होतात काय ? घरी काही समारंभ आहे काय?
मी त्याला सांगितले कि आम्ही आज हॉटेलात जाणार आहोत. त्यावर त्याने विचारले कि आज असे मधल्याच दिवशी कसे काय? त्यावर मी त्याला शेवटी सांगितले कि आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे त्यामुळे तिच्या आवडीच्या हॉटेलात जायचे ठरविले होते. त्यावर तो म्हणाला कि डॉक्टर आमच्या मुळे तुम्हाला खूप उशीर झाला. तो परत परत माफी मागत होता.
तुम्हाला आम्ही खूप उशीर केला आता तुमची पत्नी तुमच्याशी भांडण सुद्धा करेल. मला थोडेसे हसू आले आणि मी त्याला म्हटले कि तुम्ही चिंता करू नका. तुमचे सगळे व्यवस्थित आहे न मग आनंदात रहा काळजी करू नका. मी त्यांच्या पाठोपाठ दवाखाना बंद केला त्याला कुलूप लावले आणि त्यांच्या बरोबर जिना उतरलो. तो नवरा परत परत म्हणत होता कि डॉक्टर तुम्हाला आज मी खूप त्रास दिला. मी हसून त्याला निरोप दिला आणि हॉटेलात पोहोचलो तोवर माझ्या बायकोने आणि मुलांनी सूप संपवले होते आणि मुख्य जेवणाची ऑर्डर दिली होती. अर्थात मी झाला प्रकार माझ्या कुटुंबाला सांगितला तेंव्हा कोणीच काहीही बोलले नाही कारण डॉक्टर म्हटल्या वर कधी कधी असे होणारच हे त्यांनी गृहीत धरलेले आहे.
"त्रास" हा शब्द ऐकून माझे मन खूप वर्षे मागे गेले. मी तेंव्हा नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात काम करीत होतो आणि मी सैनिकांच्या कुटुंबाच्या वार्डचा प्रमुख होतो. एक दिवस माझ्याकडे एक दहिवडी (बहुधा फलटण तालुका सातारा जिल्हा) च्या जवळ काकडे कि सापळे वस्ती अशा कोणत्या तरी वस्तीवर राहणारी एका सैनिकाची( आर्मीतील) आई भरती झाली. त्याचे नाव संभाजी भोसले असे होते. सैनिक रुग्णालयात नातेवाईक रुग्ण हे सैनिकांच्या नावाने भरती होतात त्यामुळे त्यांचे कागदोपत्री नाव संभाजी भोसले ची आई ( MOTHER OF SEP BHOSALE). (त्यांचे नाव बहुधा यशोदा होते). त्या भरती झाल्या ते शौचाला नीट होत नाही म्हणून. हा संभाजी बडोद्याला कुठल्यातरी युनिट मध्ये काम करीत होता. त्याचे दोन भाऊ त्या सापळे वस्तीवर राहत होते आणी तेथे त्यांची वडिलोपार्जित शेती होती. गावी उपचार करून फायदा न झाल्याने संभाजी म्हणाला कि मी आईला लष्करी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जातो. तो तिला बडोद्याला घेऊन गेला असताना तेथे तिला गुद द्वाराचा कर्करोग झाला असल्याचे निदान झाले. तिला पुढच्या इलाजासाठी त्यांनी अश्विनी रुग्णालयात हलविले होते. इथे तिची शल्यक्रिया झाली होती परंतु तिचा आजार बेसुमार वाढला होता त्यामुळे केवळ शौचाचा मार्ग मोकळ करण्याची शल्यक्रिया केली होती. यानंतरतिला रेडियो थेरपीचे १८ डोस दिले होते आता ती एक महिना सुट्टीवर जाऊन परत तपासणी साठी आली होती. या काळात तिची शौचाची तक्रार पूर्ण पणे संपली होती आणि भूक लागू लागल्यामुळे तिचे खाणे(आहार) आणि तब्येत सुधारली होती. पण तिला थोडी थोडी पाठदुखी सुरु झाली होती. सुरुवातीला आम्हाला वाटले कि शल्यक्रिया झाल्याने किंवा भूल द्यायचे इंजेक्शन पाठीत दिल्याने तिला पाठ दुखी होत असावी. पण पुढच्या आठवड्याभरात तिची पाठदुखी फारच बळावली. म्हणून तिचा CT स्कॅन केला तर कर्करोग तिच्या पाठीच्या कण्यात शिरला असल्याचे लक्षात आले. हि शक्यता अगोदरच गृहीत धरलेली होती कि कर्करोग सगळीकडे पसरला असेल परंतु तो विचित्रपणे माकड हाडात शिरून तेथून बाहेर पडणार्या नसांवर दाब देत होता त्यामुळे तिला पाठदुखी चालू झाली होती. आमच्या सरांनी संभाजीला शल्यक्रियेनंतर अशी कल्पना दिलेली होतीच कि रोग बराच पसरला आहे आणि तो पूर्ण बरा होण्याच्या पलीकडे गेलेला आहे. सरांनी मला सांगितले कि आता आपल्याला फार काही करत येईल असे वाटत नाही फक्त एवढेच पहा कि तिचे दुखणे तेवढे कमी होईल आणि जेवढे दिवस तिचे आहेत ते आनंदात जातील. पण दुर्दैवाने त्यांचे दुखणे पुढच्या चार दिवसात इतके वाढले कि नेहेमीच्या दुःख नाशक गोळ्या निकामी झाल्या होत्या. मी सरांना विचारले कि सर तिला आता केवळ मोर्फिनच द्यावे लागेल असे वाटते. त्यावर सर शांतपणे म्हणाले. तुला जे ठीक वाटते ते कर मोर्फिन द्यायचे तर दे पण तिचे दुःख नाहीसे झाले पाहिजे.यावर मी तिला दुखायला लागले तेंव्हा मोर्फिन चे एक इंजेक्शन दिले. त्यावर तिला इतक्या दिवसांनी पूर्ण वेदनारहित पाठीचा अनुभव मिळाला. पण दुर्दैवाने त्या इंजेक्शनचा प्रभाव कमी झाल्यावर तिची पाठदुखी परत चालू झाली. मोर्फिन इंजेक्शन हे अतिशय निर्बंधित असल्यामुळे ते फक्त डॉक्टर च्या सहीनेच दिले जात असे. पुढच्या दोन दिवसात तिचे दुखणे एवढे वाढले कि दर सात आठ तासांनी ती मोर्फिनचे इंजेक्शन द्या म्हणून रडू लागे. या काळात संभाजी दोन तीनदा मला शोधत आमच्या मेस मध्ये आला. साहेब काहीही करा पण आईला इंजेक्शन द्या. मला एकीकडे असे वाटे कि त्याच्या आईला मोर्फिन चे व्यसन लागेलतेंव्हा तिला थोडेसे दुःख सहन करायला शिकले पाहिजे. पण असे हि वाटे कि तिचे किती दिवस बाकी आहेत ते आपल्याला माहित नाही. मग आपण कशाला ती चिंता करावी? एके दिवशी संध्याकाळी संभाजी परत आमच्या मेसजवळ येउन मला इंजेक्शन द्यायला सांगू लागला. मला तेंव्हा सिनेमाला जायचे होते. मी थोडासा वैतागलो परंतु ते चेहऱ्यावर न दाखवता मी वार्डात गेलो तीला द्यायच्या इंजेक्शन वर सही केली. तिला इंजेक्शन दिले तोवर थांबलो. त्यानंतर आतल्या खोलीत आमच्या वरिष्ठ मेट्रन होत्या त्यांना म्हटले कि मैडम मी तीन चार इंजेक्शन वर सही करून तुमच्या जवळ देऊन ठेवतो. फक्त तुम्ही स्वतः त्याची जबाबदारी घ्या. मेट्रन म्हणाल्या कि डॉक्टर मी तुम्हाला सांगणार होते कि असे वेळी अवेळी तुम्हाला यायला लागते आहे परंतु मोर्फिन बद्दल तुम्ही तयार व्हाल का ते मला कळत नव्हते म्हणून मी बोलले नाही.पण तुम्ही नसताना त्या फार रडारड करतात आणि इतर रुग्णांना त्याचा फार त्रास होतो.
मला त्यांच्या आजाराच्या गांभीर्याची कल्पना आली
हा सर्व प्रकार मी सरांना सांगितलं आणि म्हटले कि सर आपल्याला तिच्यासाठी(संभाजीच्या आईसाठी) काहीतरी केले पाहिजे. कारण ज्यातर्हेने तिला मोर्फिन लागते आहे त्या वेगाने काही दिवसांनी तिच्यावर त्याचा हि परिणाम होणार नाही असे मला वाटते. सरांनी दुसर्या दिवशी कर्करोगतज्ञांच्या मिटिंग मध्ये या विषयी चर्चा केली आणि तिला केमोथेरपी चा एक प्रयोग करु या असे ठरविले. तिला झालेला कर्करोग हा केमोथेरपिला दाद न देणारा असा होता त्यामुळे सुरुवातीला तो पर्याय वापरला नव्हता आत्ता सुद्धा केमोथेरपी काम करेल असे कुणाला वाटत नव्हते. परंतु शक्य तितके सर्व उपचार करूया असे ठरवले गेले. आणि यशोदा बाईना (संभाजीच्या आईला) केमोथेरपी चालू केलि.
आणि काय आश्चर्य दोन डोस नंतर तिची पाठदुखी पूर्ण थांबली. तिला अजून दोन डोस दिले गेले. अर्थात त्यानंतर परत CT स्कॅन केला तर कर्करोग आहे तेवढाच दिसत होता. एवढेच झाले होते कि माकड हाडात नसांवर येणारा दाब गेला होता. संभाजी ला सांगितले कि जेवढे दिवस जातील तेवढे आपले. यावर संभाजी म्हणू लागला कि साहेब आई म्हणते आहे कि मला आपल्या गावी आपल्या माणसांमध्ये जाऊ द्या तेंव्हा तिला डिस चार्ज द्या. माझे दोन्ही भाऊ सुद्धा तेच म्हणत आहेत. त्यावर सर त्याला म्हणाले कि तिला तू खुशाल घेऊन जा पण जर दुखणे वाढले तर घेऊन ये म्हणजे शेवटचे दिवस रुग्णालयात सुखात जातील.
अर्थात संभाजीच्या एकूण बोलण्यावरून असे वाटत नव्हते कि त्यची आई परत येईल. शेवटी डिस चार्ज च्या दिवशी त्या छान साडी नेसून तयार झाल्या होत्या. मी त्यांच्या डिसचार्जचे कागद पत्र तयार करत होतो. तेंव्हा त्या माझ्या खोलीत आल्या आणी म्हणाल्या साहेब तुम्हाला फार त्रास दिला हो पण काय करू माझ्याने दुःख सहनच होत नसे. वेळी अवेळी तुम्हाला इंजेक्शन द्यायला यावे लागले. देव तुमचे भले करो. तेवढ्यात संभाजी आला आणी टोपण डोळ्यात पाणी आणून म्हणाला सर मी इतक्या वेळेस वेली अवेळी तुमच्या मेस मध्ये येऊन तुम्हाला फार त्रास दिला. मी कानकोंडा झालो. एखादा माणूस सारखी तुमची माफी मागतो किंवा तुम्हाला धन्यवाद देतो तेंव्हा तुम्हाला कसे वागावे कळत नाही. शेवटी त्यांचे कागद पत्र त्यांच्या हातात दिले आणी त्यांना निरोप दिला. त्यावेळी माझ्या मनात एक विचार आला कि कदाचित आता यशोदाबाई मला परत कधीच दिसणार नाहीत. इतर वेळेस एखदा रुग्ण घरी जातो तेंव्हा तुम्हाला वाईट वाटत नाही पण इथे त्यांचे किती दिवस बाकी आहेत ते माहित नाही. मी पटकन गणवेशातच त्यांना नमस्कार केला. एवढा मोठा अधिकारी पाया पडतो ते पाहून त्य एकदम मायेने मला म्हणाल्या "बाबा माझ्या, गोरागोमटा आहेस माझा न नात्याचा न गोत्याचा पण मुला सारखीच काळजी घेतलीस तुझ्या आई वडिलांना देव उदंड आयुष्य देवो. त्यांची आणि स्वतःची काळजी घे. माझे किती दिवस आहेत ते पांडुरंगाला ठाऊक. एकदा गावाला जाऊन पडले कि झाले. तुला परत त्रास द्यायला येणार नाही.
मी पण म्हटले मावशी अहो त्यात त्रास कसला मला सरकार त्याचा पगार देतंय. तुम्ही कशाला जीवाला लावून घेताय.
संभाजीने मला सलाम ठोकला आणि तो यशोदा बाईबरोबर बाहेर चालत गेला. मला काळजात गलबलले आणि असे वाटले कि यशोदाबाई एका बाजूला मुलगा आणि एका बाजूला मृत्यू बरोबर घेऊन जात होत्या.
आज असलेले माणूस उद्या दिसणार नाही हा विचार भयानक असतो.
प्रतिक्रिया
24 Dec 2013 - 12:45 am | पाषाणभेद
फारच हृदयस्पर्शॉ अनुभव. मागीलप्रमाणेच सुंदर लेखन.
24 Dec 2013 - 12:55 am | रुस्तम
सहमत...
24 Dec 2013 - 1:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
24 Dec 2013 - 12:50 am | खटपट्या
सुन्न !!!
24 Dec 2013 - 1:01 am | अमित खोजे
अतिशय सुंदर. तुमचे सर्वच अनुभव छान असतात. बर्याच वेळेला डोळ्यात पाणीच आणतात
1 Nov 2023 - 5:47 pm | एकनाथ जाधव
+१
24 Dec 2013 - 1:28 am | विकास
सुंदर अनुभव आणि लेखन...
24 Dec 2013 - 4:36 pm | चाणक्य
असेच म्हणतो.
24 Dec 2013 - 1:39 am | इंद्रधनुष्य
खुपच मनाला लागणार कधीकधी असे वाट्ते कि तुमचि मने निर्दय झालेलि असतात. सन्वेदना रहातच नसाव्या. पण तसे नसते.हे पटले.
24 Dec 2013 - 1:29 pm | अनिरुद्ध प
सहमत.
24 Dec 2013 - 1:44 am | प्रभाकर पेठकर
यशोदाबाईंबद्दलचा अनुभव फार भयानक आहे. अंगावर काटा आला.
24 Dec 2013 - 4:21 am | अर्धवटराव
नुसत्या कल्पनेने कसंतरी होतं.
अवांतरः
सामान्य सैनिकाला एव्हढा खर्च पेलवत नसेल. या सगळ्या ट्रीटमेण्टचा खर्च सरकार करतं काय? टॅक्स भरल्याचा अभिमान वाटावा अशा फार कमि गोष्टी आहेत अदरवाइज ;)
24 Dec 2013 - 6:13 pm | सुबोध खरे
सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा पुर्ण वैद्यकीय इलाज मोफत होतो. ज्या गोष्टी लष्करी रुग्णालयात होऊ शकत नाहीत त्या गोष्टी जवळच्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयातून सरकारी खर्चाने करून घेतल्या जातात.यात कर्करोगचा इलाज बायपास ची शल्यक्रिया किंवा मूत्रपींड आरोपण याचा सुद्धा समावेश आहे. अन्यथा एखाद्या सैनिकाचे आई वडील किंवा बायको जर आजारी असेल आणि त्यांचा इलाज नीट होत नसेल तर तो घरापासून दूर त्रयस्थ ठिकाणी आपले काम मन लावून करू शकणार नाही हा त्या मागचा विचार आहे.
24 Dec 2013 - 4:43 am | निनाद मुक्काम प...
निबद्ध करणारा अनुभव
24 Dec 2013 - 1:12 pm | प्यारे१
:( वाईट.
24 Dec 2013 - 1:35 pm | मदनबाण
:(
मी बर्याचदा विचार करतो, की जे डॉक्टर हार्ट सर्जरी किंवा अजुन कठीण सर्जरी करतात... ते रुग्णाला ऑपरेशनच्या आधी जिवंत पहातात,त्याच्याशी बोलतात...त्याला आधार देतात,अश्यां पैकी असे काही रुग्ण असे असु शकतात की जे ऑपरेशनला दाद न-देता हा इहलोक सोडुन जात असतील. अश्या वेळी डॉक्टर मंडळी त्यांच्या मनाला कसे आवरत असतील ? याचा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर ताण येत असेल का ?
24 Dec 2013 - 8:24 pm | सुबोध खरे
साहेब,
काही वेळा अज्ञानात आनंद असतो. किती वेळा मी सोनोग्राफी किंवा CT स्कॅन करताना असे जाणवले आहे की या माणसाजवळ आता काही महिनेच शिल्लक आहेत.
एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये काम करीत असताना माझ्या सख्ख्या काकांची बायपास शल्यक्रिया झाली होती. तेंव्हा त्याना शल्यक्रिया गृहात घेऊन जाण्या अगोदर त्यांच्या हृदयाचे काम एकदम मंद झाले आणि त्याना तातडीने शल्यक्रिया गृहात न्यावे लागले मी स्वतः त्या शल्यक्रियेसाठी उपस्थित होतो. पण त्याना आत घेऊन जाताना मी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितले की मी शल्यक्रियेला आत येतो आहे तुम्ही काळजी करू नका. पण त्याक्षणी मला असे जाणवले की कदाचित ते यातून उठतील की नाही? आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारता येतील की नाही? आणि मी हात धुवून गाउन घातला आणि आत गेलो. त्याना हार्ट लंग मशिनवर घेईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता कारण कोणत्याही क्षणी त्याना मोठा हृदय विकाराचा झटका येऊ शकला असता.खाली माझी काकू आणि चुलत भाउ आरामात गप्पा मारत बसलेले होते. कारण सुबोध थेट ओप्रेशन थिएटर मध्ये आहे तेंव्हा काळजी नाही. या गोष्टीला आज सात वर्षे पुर्ण झाली आणि देवदयेने त्यांची तब्येत उत्तम आहे. आजही ते चित्र माझ्या डोळ्यापुढे स्पष्ट पणे उभे राहते. ही गोष्ट मी माझ्या वडीलानासुद्धा तीन वर्षानी सांगितली.
25 Dec 2013 - 1:47 am | प्रभाकर पेठकर
डॉक्टर साहेब,
सर्व खरं खरं लिहू नका, ही विनंती.
उद्या आम्ही, रुग्ण म्हणून, ऑपरेशन थिएटरबाहेर असताना आपली ही अवस्था आठवली तर, कदाचित आमचे तकलादू हृदय, डॉक्टरांनी आम्हाला टेबलावर घेण्याअगोदरच बंद पडायचं.
रुग्णाचा डॉक्टरवर, त्याच्या कौशल्यावर अपरंपार विश्वास असतो. तो विश्वासच त्याला कठीण प्रसंगी बळ देत असतो. कांही कांही 'सत्य' ही लपवून ठेवण्यातच रुग्णाचं भलं असतं.
25 Dec 2013 - 11:13 pm | सुबोध खरे
साहेब हेच मी एका लेखात लिहिले होते http://www.misalpav.com/node/24347. पण त्याबद्दल भरपूर लोकानी माझ्यावर राळ उडवली होती तेंव्हा सत्य लपवावे कि सांगावे हे कळेनासेच झाले आहे.
26 Dec 2013 - 2:35 am | प्रभाकर पेठकर
दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. रुग्णाशी खरे बोलावे किंवा नाही हे रुग्णाची मानसिक अवस्था आणि इच्छा पाहून योग्य ते तारतम्य बाळगून ठरवावे असे वाटते.
माझ्या वरील प्रतिसादात मी म्हंटले आहे ते आपल्या केसेसच्या तपशिलांबाबत आहे. इथे त्या केसेस चर्चा करताना तुमच्या दोलायमान अवस्थेचे तपशिल आले तर इथल्या वाचकवर्गावर कधी रुग्ण म्हणून ऑपरेशन थेटरात जाताना 'अरे, मागे डॉ. खरे असं असं म्हणाले होते. माझं काय होणार आहे? हे डॉक्टर माझ्याशी खरं बोलताहेत की खोटं बोलत आहेत?' असा विचार येऊन मानसिक खच्चीकरण होऊ शकेल असे वाटते. त्याचा/तिचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकेल.
जर तो/ती मनाने खंबीर असेल आणि त्याने/तिने डॉक्टरांशी चर्चाकरून सत्य जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली तर ती वेगळी गोष्ट आहे. पण डॉक्टरांशी बोलून सत्य परिस्थिती जाणून न घेता स्वतःच्या विचारांमध्येच गुरफटून नकारात्मक विचारांचा स्नो-बॉल झाला तर त्या रुग्णाने अर्धी लढाई आधीच हरलेली असेल.
24 Dec 2013 - 1:43 pm | मुक्त विहारि
सुन्न....
24 Dec 2013 - 3:00 pm | परिंदा
खुपच छान लिहीलेय.
असाच "त्रास" आम्ही डॉक्टरांना दिला होता. त्याची आठवण झाली.
माझ्या बाबांशी रात्री बोलताना जाणवले की त्यांचे काही शब्द बोबडे येत आहेत. रात्रीचे ११ वाजले होते. आमच्या घराजवळचे क्लिनीक १० ला बंद होते. कधीकधी १०.३० पर्यंत देखील उघडे असते म्हणून रिक्शाने तिथे गेलो. दवाखाना बंद होता. आम्ही परत फिरुन घराकडे जाणार तेवढ्यात डॉक्टर येताना दिसले.
ते त्यांच्या मित्राबरोबर दवाखान्याजवळील नाक्यावर एका टपरीवर चहा घेत होते. त्यांचे मित्र त्यांना घेऊन टूरला जाणार होते. आम्हाला दवाखान्याकडे जाताना पाहून त्यांना वाटले नक्कीच काहीतरी भानगड आहे.
आम्हाला थांबवून त्यांनी दवाखान्याचे शटर उघडायला सुरुवात केली. त्यांचा एक मित्र म्हणाला "काहीतरी औषध देऊन पाठव त्यांना नाहीतर जवळच्या रुग्णालयात अॅडमिट व्हायला सांग." पण डॉ नी त्याला सांगितले की काहीतरी गंभीर आहे. मला नीट तपासायला हवे.
त्यांनी बाबांना तपासून पक्षाघाताची सुरुवात झाल्याचे सांगितले आणि तातडीने एका हॉस्पीटल मध्ये दाखल व्हायला सांगितले आणि त्या हॉस्पीटलच्या प्रमुखांना फोन करुन कल्पनादेखील दिली. एव्हाना आमची रिक्षा निघून गेली होती म्हणून त्यांच्या मित्राच्या कारमधुन त्यांनी हॉस्पीटलमध्ये सोडले. नीट उपचार सुरु झाल्याची खात्री झाल्यावरच ते तिथून निघाले.
24 Dec 2013 - 3:06 pm | सूड
.
24 Dec 2013 - 3:19 pm | ऋषिकेश
भयाण!
24 Dec 2013 - 3:20 pm | सुहास..
सेम हियर
24 Dec 2013 - 3:53 pm | चिर्कुट
काटाच आला अंगावर्..भयानक.
24 Dec 2013 - 4:22 pm | आदूबाळ
डॉक्टरसाहेब इन ओल्ड फॉर्म! आवडलं लेखन...
24 Dec 2013 - 4:58 pm | जेपी
सुन्न करणारा अनुभव .
24 Dec 2013 - 7:48 pm | मंगेश खैरनार
काय बोलणार :(
24 Dec 2013 - 8:01 pm | पैसा
तुमचं लिखाण नेहमीप्रमाणे हृदयस्पर्शी. पेशंटसाठी स्वतःचा अनुभव हाच एकमेव अनुभव असतो. डॉक्टर किती लोकांची दु:खं एकावेळी जगत असतात ते डॉक्टरच जाणोत!
24 Dec 2013 - 8:19 pm | प्रकाश घाटपांडे
तुमचे लिखाण नेहमीच आवडते. बर्याचदा आत्मपरिक्षण करायला लावते.
24 Dec 2013 - 11:00 pm | कवितानागेश
हम्म...
24 Dec 2013 - 11:23 pm | तुमचा अभिषेक
लिखाणावर वेगळे काय बोलणार, नेहमीसारखेच एक कसला ना कसला अनुभव देऊन जाणारे, मात्र तुमच्यासारखे डॉक्टर त्रास घेण्यास सदैव तत्पर आहेत म्हणून एखाद्या आजारपणात हे हि दिवस जातील म्हणत स्वताला धीर देता येतो..
26 Dec 2013 - 9:13 am | आनंदराव
सुन्न !
तुमच्या व्यवसायात तुम्हाला असे अनुभव येत असतात, आणि तुमचे आयुश्य सम्रुद्ध करुन जातात.
असे अजुन चांगले /वाईट अनुभव लिहा .
26 Dec 2013 - 10:54 am | उदय
छान लिहिले आहे. तुमचे लेखन खूप सुंदर असते. नेहमीप्रमाणे आवडले.
26 Dec 2013 - 11:05 am | रेवती
बापरे! हे असं वाचून भीती वाटते.
27 Dec 2013 - 2:44 am | समीरसूर
क्षमस्व, खूप दिवसांनी मिपावर आलोय. बर्याच काही कारणांमुळे मिपावर निवांत यायला मिळत नाही. मन उदास होते आणि मिपावर येणे ५-१० मिनीटांचे काम खचितच नाही. बघू, लवकरात लवकर नियमित येण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.
लेख अतिशय सुंदर आणि प्रभावी आहे. आवडला. विशेषतः पहिल्या प्रसंगाशी, त्यांच्या घालमेलीशी स्वानुभवामुळे रिलेट करु शकलो.
डॉक्टरसाहेब, तुम्ही खूप लोकांच्या दुआ घेत आहात; आणि त्या इतक्या सहजपणे घेणे हे सोपे काम नाही. तुमचे अभिनंदन!
मिपाने अशा देवमाणसांना एकत्र आणले त्याबद्दल मिपाचे शतशः आभार!
--समीर
2 Nov 2023 - 3:37 pm | कॉमी
उत्तम लेख.
2 Nov 2023 - 5:36 pm | चौथा कोनाडा
खुपच हृदयस्पर्शी !
हे वाचून तर डोळ्यात अश्रु उभे राहिले.
2 Nov 2023 - 6:19 pm | Bhakti
संवेदनशील तरीही तत्पर असतात डॉक्टर!