मेरे सामनेवाली खिडकी मे... २

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
8 Dec 2013 - 10:06 pm

मेरे सामनेवाली खिडकी मे

*****

ती बसली होती. मी तिच्या समोर बसलो होतो. ती माझ्याकडे बघून हसत होती. मी तिच्याकडे बघून हसत होतो. तिने माझ्याकडे बघत बघत मला हनुवटी खाली करून जवळ बोलावलं. मी हळूच सरकत तिकडे गेलो. माझी छाती धडधड करत होती. मी जवळ गेलो. ती लाजली. हसली. माझ्या छातीतली धडधड वाढली. मग तिनं एक हात माझ्या खांद्यावर ठेवला, आणि दाबला. मी त्यामुळे जरा खाली झालो. तिने माझ्या कानाजवळ दुस-या हाताचा कंस केला आणि तिचे ओठ माझ्या कानाच्या अगदी जवळ आणले. काय सांगेल ही आता मला? खरंच काहीतरी सांगणार आहे की दुसरंच काहीतरी करणार आहे? माझी छाती फाडून हृदय आता बाहेर येतं की काय असं मला वाटायला लागलं. मी मुठी गच्च आवळून धरल्या. आता कोणत्याही क्षणी ती तिच्या ओठांना कामाला लावेल.

काय करेल ती? तिच्या मनात उसळणा-या भावनांच्या त्सुनामी लाटांना माझ्या कानाच्या पडद्यावर जाऊन थडकायला वाट मोकळी करून देईल, की शरीराची अशी हालचाल आणि चलबिचलीमुळे अस्वस्थ झालेल्या मनात निर्माण झालेली उत्कटता खोडकरपणे माझ्या कानाचा चावा घेऊन व्यक्त करेल? माझा कान तिच्या ओठातून निघणा-या सुमधुर शब्दांना आणि त्याच वेळी तिच्या शुभ्र दातांना बिलगायला आतुर झाला होता... मी डोळे मिटून घेतले. आणि तिने... तिने तिच्या त्या गुलाबाच्या पाकळ्यांहूनही नाजूकशा ओठांचा चंबू करून माझ्या कानात फुर्रर्रर्र करून भरलेल्या चुळीचा फवारा मारला!!!! कानात कसंतरीच झालं. ओलं ओलं, गार गार वाटत होतं. हे काहीतरी नवीनच!! बहुधा शरद उपाध्येंनी सांगितलेले मिथुन राशीचे रोमँटिक चाळे आजमावत असावी. मला गम्मत वाटली. मी तसाच तिच्या अगदी जवळ डोळे मिटून बसून राहिलो. आता पुढे ती काय करेल याची वाट बघत. ती उठून माझ्या समोर येऊन उभी राहिली. माझ्या चेह-याच्या अगदी समोर तिचा चेहरा आला होता. मी डोळे बंद करूनच यासगळ्याचा अंदाज लावत होतो. तिचे ओठ माझ्या अगदी जवळ आलेले मला कळत होते. तिचा श्वासोच्छवास मला ऐकायलाही येत होता आणि जाणवतही होता. उत्कंठा वाढली. अंगावर शहारा आला. ती खूप जवळ आली, आता कोणत्याही क्षणी ती माझं चुंबन घेईल. मीही माझ्या ओठांचा चंबू केला. इतक्यात तिने माझ्या चेह-यावर पुन्हा चूळीचा फवारा केला. याचा मारा जास्तच होता. याची मजा नाही घेता आली. मी दचकलोच, वैतागलो आणि डोळे उघडले. बघतो तर समोर आई हातात तांब्या घेऊन उभी!! आणि तो पाण्याने अर्धा भरलेला होता. 'ए आई काये?' असं म्हणून मी दुस-या कुशीवर वळलो. मला काहीही करून त्या स्वप्नाचा पूर्ण आस्वाद घ्यायचा होता. आईने उरलेला तांब्यासुद्धा माझ्यावर रिकामा केला. मी नाईलाजाने, पण जरा घुश्श्यातच उठलो. आता कानात गेलेल्या पाण्यामुळे जरा विचित्रच वाटत होतं. आईने माझ्या स्वप्नांवर असं पाणी पाडलं.

'झोपू द्यायचं ना यार काये!!!!'
'बराच वेळ झोपलास... बघ साडे अकरा वाजलेत. आता उठा. मला खालून साबूदाणा आणून दे. आज संकष्टी आहे. मला खिचडी करायचीय. घरातला साबुदाणा कमी पडतोय. चल ऊठ. आणि नारळ सुद्धा आण एक. चटणी करायचीय. ऊठ, ऊठ लवकर...'

मी वैतागून उठलो. धार टाकून बाहेर आलो, हात धुतले आणि आईकडून पिशवी आणि पैसे घेऊन तसाच निघालो. माझे केस विस्कटलेले होते, डोळ्यांवर अजुनही झोप रेंगाळत होती. सारख्या जांभया येत होत्या. एकाच काखेला दोन छोटी भोकं पडलेला, पुढे वरणाचे सुकलेले डाग पडलेला, स्वतःचा गडद निळा रंग वर्षानुवर्षांच्या वापरामुळे आता फिका पडलेला, पण एकेकाळचा माझा एकदम आवडता असा टी-शर्ट मी घातला होता. खाली मॅनचेस्टर युनायटेडचा शिक्का असलेली, इलॅस्टिक गेल्यामुळे आणि माझ्या कंबरेचा घेरही विशेष नसल्यामुळे नाडी अगदी बाहेर ताणून गाठ मारून घेतलेली काळी हाफ-चड्डी घातली होती. नाडी इतकी ताणली होती, की ती आतून त्या चड्डीच्या बाहेर येऊन गुडघ्याजवळ लोंबत होती. मोबाईल पिशवीत ठेवला होता, कारण खिसे नव्हते. तर अशा अवतारात दाढी खाजवत मी बाहेर पडलो, आणि आमच्या सोसायटीखालच्या किराणामालाच्या दुकानाकडे प्रयाण केलं. मी सोसायटीत तसा अगदी आतल्या बिल्डींगीत राहतो, त्यामुळे काहीही थातुरमातुर आणायचं असलं तरी बरंच चालावं लागतं. वाटेत आमच्या सोसायटीतले 'डेंजर आजोबा' भेटले. ते सुद्धा हाफ चड्डीत होते. करडी नजर, धारदार नाक, ऐशीव्या वयातही मजबूत आणि काटक व्यक्तिमत्त्व - एकदम शिस्तप्रिय माणूस!! त्यांनी मला अडवलं. बापरे!! म्हणजे आता हा आपला अर्धा तास खाणार!! मेलो.

'कुठे चाल्लायस?'
'इथेच खाली जरा दुकानात...'
'आज लवकर उठलास की रे खूप...'
'हॅ हॅ हॅ हॅ... हो आईने उठवलं.'
'आंघोळ केलेली दिसत्येस...'
'छे हो!! असाच आलोय...'
'हो? अरे पण मग परवा भेटला होतास तेव्हापेक्षा बराच स्वच्छ दिसतोयस की आत्ता!!'
'अहो आजोबा पण मी परवा आंघोळ केली होती.'
'ते कळलं मला मी सरकॅस्टिकली बोलत होतो. उपहास कळतो की नाही तुला?' आता दगडी पुतळ्यासारखा चेहरा आहे या आजोबांचा. बोलतानासुद्धा चेह-यावरचे स्नायू हलत नाहीत. अगदी तरूण तुर्क म्हातारे अर्क मधल्या देशपांडेबाईंसारखे हे. बोलणं सुद्धा एकसुरी. त्यात मी अर्धवट झोपेत. उपहास वगैरे कसला कळणार आहे डोंबलाचा? असो.
'आणि आज आंघोळ करण्याआधी ती दाढी उडवून टाक.'
'मी आज आंघोळच करणार नाहीये'
'ती नाही केलीस तरी हरकत नाही पण दाढी उडवून टाक. अतिरेकी दिसतोयस. लोक मारतील धरून.'
'काही नाही होत हो आजकाल सगळेच दाढी वाढवतात. त्यांना कोणी मारतं का?'
'त्यांना दाढी शोभते तुला शोभत नाही तू अतिरेकी दिसतोस. काढ ती दाढी आजच्या आज.'
(मी का वाद घालतोय?) 'बरं... येऊ मी?'
'काय रे कटवतोयस काय म्हाता-याला?'
'नाही हो असं कुठे? आईने लवकर आणायला सांगितलंय सामान म्हणून.'
'काय आणायचंय?'
(तुम्हांला काय करायचंय?) 'साबुदाणा आणि नारळ'
'अरे हो आज संकष्टी नाहीका!! तू उपास करतोस?'
'नाही मी नाही करत. आई करते.'
'चांगलंय. तू नको करूस उपास आहेस त्याहून जास्त बारीक होशील. बरं ये...'
(थँक्यू) 'हो येतो.'
'आणि ते दाढीचं विसरू नकोस.'
'हो हो'

माझं टाळकंच फिरलं. एकतर एवढ्या चांगल्या स्वप्नातनं आईनं उठवलं. त्यात ही स्वारी भेटली. आणि आता त्या तुसड्या स्वभावाच्या किराणामालवाल्याच्या दुकानात जायचं होतं. दुकान चिक्कार मोठं होतं. दिमतीला भरपूर माणसं होती. धंदा जोरात चालायचा. दिवसभर गि-हाईकांची वर्दळ असायची. त्यामुळेच माज आला होता - दुकानदारालाही, आणि त्याच्या हाताखाली काम करणा-या पो-यांनाही. माझा नेहमीचा अनुभव होता, साले मला बराच वेळ ताटकळत उभे ठेवायचे आणि नंतर आलेल्या पोरी-बायांना काय हवं नको ते आधी आणून द्यायचे. 'मै पेहले आया हू, मुझे जो चाहिये वो पहले लाओ' असा वाद घालणं मला पसंत नाही, आणि तसंही मला सहसा कसलीच घाई नसते, म्हणून मी कोणाचं तरी माझ्याकडे लक्ष जाईपर्यंत तसाच ताटकळत उभा राहतो. आजही उभं राहावं लागलं. शेवटी एका पो-याला माझी दया आली असावी, त्याने मला 'शूक शूक' केलं आणि 'क्या चाहिये?' असं तुसड्या स्वरात विचारलं. एरियात जवळ जवळ सगळे वाणी स्वतः गुजराती मारवाडी असले तरी मराठी ग्राहकांशी मराठीतच बोलतात. इथे असं काही चालत नाही. मी म्हटलं 'साबुदाणा'. 'कितना?' आता आली का पंचाईत?? किती आणायचा होता ते लक्षातच नाही माझ्या. किती न्यावा? आई कढई भरून खिचडी करते. म्हणजे दोन-तीन किलो सहज असावा. पण कमी पडला तर?

'अरे कितना चाहिये??'
'अम्म... चार माणसो को कितना लागेगा?'
'आधा किलो!!'
'ओये!! मेरी साईज पे मत जाओ, बहौत खाता हु मै.'
'हां तो ठीक है ना आधा किलो बहौत हो गया. छेसों ग्राम लो चलो.'
'हा छेसो देओ' मी दरडावलंच त्याला. त्याने साबुदाणा पिशवीत भरून दिला, आणि 'और कुछ?' मी म्हटलं 'नारळ दो एक... उसमे पानी होना चाहिये' त्याने दुकानाच्या दाराशी ठेवलेल्या एका गोणीकडे बोट दाखवलं. त्या दुकानात नारळ, बटाटा आणि कांदा घ्यायचा झाला तर सेल्फ सर्विसचा अलिखित नियम होता. तसं लिहून ठेवलं असतं तर मी पुण्यातल्या एखाद्या दुकानात आलोय असंच वाटलं असतं मला. असो. मी नारळ घ्यायला गेलो. लहानपणी आजीबरोबर एका फक्त नारळ विकणा-या दुकानात जायचो ते आठवलं. तो नारळवाला नारळावर स्वतःची बोटं उलटी वाजवायचा आणि मग 'टिक टिक' असा आवाज यायचा. माझी सगळी बोटं दुखायला लागली पण टिक टिक असा आवाज एकाही नारळातून आला नाही. मग आजी प्रत्येक नारळ हलवून पाहायची ते आठवून मी एक नारळ हलवून पाहिला. आतून पाण्याचा आवाज आला. बरा वाटला. आता मी तो नारळ माझ्या पिशवीत घालणार इतक्यात पाठून एक गोड आवाज आला -

'भय्या एक नारियल देना.'

मी आवाज काढणारी कोण हे पाहायला मागे वळलो तर माझ्या हातातला नारळ अगदी अलगद उचलून स्वतःच्या पिशवीत घातला. 'हा ये ठीक है. अभी दो किलो आलू देना' असं ती मला म्हणाली. मला तिचा किंचितसा राग आला. मान्य की मी गबाळ्या अवतारात होतो, पण म्हणून काय त्या दुकानातला पो-या वाटण्याएवढा गलिच्छ दिसत नव्हतो काय अगदीच. पण त्या मुलीवर रागवू कसं? केवढी गोड दिसत होती ती. आयचा घो. ही तर तीच होती!! आज केवढी वेगळी दिसत होती. केशरी रंगाची कुडती, खाली जिन्स, हातात फॅशनेबल बांगड्या, कानाला काळे दगड(म्हणजे ते तसंच दिसत होतं; पण शोभत होतं तिला), आणि मुख्य म्हणजे केस मोकळे सोडले होते. मी तिच्याकडे बघतच राहिलो. तिने माझ्याकडे संशयी नजरेनं बघितलं.

'आलू चाहिये मुझे. दो किलो.'
'अं?? हा देता हू ना देता हू...'

मी गपचूप दुकानाच्या दुस-या टोकाला गेलो. ती माझ्या पाठोपाठ आली. मी तिला बटाटे भरून दिले. वजन करून तिच्या पिशवीत सुद्धा टाकले. बटाट्यांच्या खोक्यात दराची पाटी खुपसलेली होती. त्यामुळे त्याचे पैसे सांगतानाही अडचण आली नाही.

'और नारिअल का कितना? और हा मुझे ना क्लिनिक ऑल क्लिअर का शॅम्पू सॅशे चाहिये. तीन देना'

आता आली का पंचाईत? तेवढ्यात पिशवी वायब्रेट व्हायला लागली. माझा सेल वाजत होता. माझ्या हातातल्या पिशवीकडे तिचं आत्ता लक्ष गेलं. मी त्यातून सॅमसंग गॅलॅक्सी ग्रँड काढलेला बघून ती चाटच पडली. मी फोन घेतला. आईचा होता -

'हा आई बोल. हो अगं साबुदाणा घेतला. सहाशे ग्रॅम घेतला. हा?? बटाटे सुद्धा आणु?? बरं ठीक आहे. हो आणतो. हो... अच्छा चल, बाय!'

मी फोन परत पिशवीत ठेवला आणि तिच्याकडे बघितलं. ती डोळे विस्फारून मला आपादमस्तक न्याहाळत होती.

'तू इथे काम करतोस ना??'
'नाही... मी कस्टमर आहे' मी हसत हसत सांगितलं.
'ओ माय गॉड आय अ‍ॅम सो सॉरी... आय अ‍ॅम रिअली सॉरी. मी चुकून तुला...'
'इट्झ टोटली फाईन... नो इश्यूज..'
'पण मग तू मला बटाटे का भरून दिलेस?? आणि तो नारळ?'
'अगं मी नारळ स्वत:साठी बघत होतो. आणि कांदे-बटाटे इथे आपले-आपण निवडायचे असतात. तू नवीन दिसतेस.'
'हो...'
'म्हणून मी मदत केली तुला. या दुकानातली माणसं खूप तुसडेपणाने बोलतात गं.'
'ओह... ओके. थँक्यू आणि सॉरी हं..'
'अगं मी म्हटलं ना इट्झ फाईन.'

मग मी उरलेली काय ती खरेदी केली. तिनेही तिला काय सॅशे वगैरे घ्यायचे होते ते घेतले, आणि मी बरोब्बर टायमिंग साधून तिला काऊंटर वर जाऊन भेटलो. तिने स्माईल दिली.

'सॉरी हं...'
'अगं पुरे आता... कितींदा म्हणशील??'

तिने दोन चॉकलेटं विकत घेतली आणि एक मला ऑफर करायला लागली. साहजिकच मी नकार दिला (दात घासले नव्हते)

'अरे घे ना प्लीज तेवढीच माझी गिल्ट कमी...'
'गिल्ट काय वाटायचीय त्यात!!'

तिने बळेबळे चॉकलेट माझ्या हातात कोंबलं आणि पैसे देऊन चालू पडली. मी सुद्धा पैसे भरून तिच्या मागोमाग सोसायटीत घुसलो. तिनं वळून पाहिलं. मी दिसलो, थांबली.

'आय अ‍ॅम रिअली सॉरी'
'हा इट्झ ओके'

ती पुन्हा चालायला लागली. मी सुद्धा चालायला लागलो. थोड्या वेळानं पुन्हा वळून -

'आय अ‍ॅम खरंच सॉरी अरे मला माहित नव्हतं'
'अगं हो हो होतं असं... इट्झ ओके.'
'इट्झ ओके ना?'
'या'
'बरं मग??'
'मग.. काय?'
'तेच... काय?
'कुठं काय?'
'आता काय हवंय?'
'मला काही नकोय.' मग माझी पेटली. 'मी तुझा पाठलाग करत नाहीये. मी माझ्या घरी चाल्लोय.'

तिने पुन्हा मला आपादमस्तक न्याहाळलं. खरं तर माझा फोन बघून तिला कळायला हरकत नव्हती, पण महागडे फोन्स आजकाल कोणाकडेही असतात. त्यामुळे माझ्यासारखं गबाळं ध्यान एवढ्या चांगल्या तथाकथित हाय क्लास सोसायटीत राहात असेल हे तिला खरं वाटलं नसावं.

'तू याच सोसायटीत राहतोस?'
'हो... तू नवी दिसतेस.'
'हो दोन आठवड्यांपूर्वीच आलो आम्ही इथे.'
'मग? कशी वाटली सोसायटी आमची?'
'जागा छान आहे...' या वाक्यात काहीतरी सबटेक्स्ट दडला होता.
'पण...???'
'पण लोक तितकेसे चांगले वाटत नाहीत.'
'म्हणजे??'
'म्हणजे बघ ना... गेले कित्येक दिवस मी घरी अभ्यास करत बसलेले असते ना, तेव्हा समोरच्या बिल्डींगमधला एक माणूस खिडकीतून येता जाता माझ्याकडे बघत असतो.'

मी चमकलो. म्हणजे मी हिला बघतो हे हिला कळतं. तरी नशीब चेहरा ओळखता आला नाहीये.

'एकदा दोनदा ठीक आहे रे... शेवटी तुम्ही जेंट्स सगळे असेच असता. पण हा आपला सततच बघत असतो. म्हणजे, थोडं तरी जरा लिमिटमध्ये राहावं ना...'
'नाही तुझं बरोबर आहे. आजकाल हे लोक जाम सोकावल्येत. या अशा लोकांना ना अद्दलच घडवली पाहिजे.'

या मुलीसमोर आपण आपल्या बिल्डींगमध्ये न शिरता पुढच्या बिल्डींगमध्ये शिरायचं आणि ती घरी गेली की गपचूप आपल्या बिल्डींगमध्ये जायचं असं मी ठरवून टाकलं. मग तो विषयच बदलून मी नाव-गाव-इयत्ता-कॉलेज अशा चौकशा केल्या. तिनंही माझ्याबद्दल विचारलं. मुलगी गोड होती. दिसायलाही, अन वागायलाही. तिचा बंगला आणि माझी बिल्डींग जशी जवळ आली तशी माझ्या छातीतली धडधड वाढायला लागली. एकतर 'तोच मी' हे गुपित उघडं पडेल याची भिती वाटत होती, आणि दुसरं म्हणजे मला इतक्यात तिला निरोप देणं जीवावर आलं होतं. बिल्डींगखालीच थोडा वेळ उभं राहून बोलता आलं असतं. पण आमची ओळख नुकतीच झाली होती. तेव्हा ती जास्त वेळ थांबणार नाही हे माहित होतं. तिच्या बंगल्याजवळ येऊन आम्ही थांबलो.

'हे माझं घर..' मी गप्प. माझं घर कोणतं हे मी तिला दाखवणार नव्हतो. 'आणि इथून तो माणूस मला बघत असतो.'
माझं तोंड उघडंच पडलं. माझी बिल्डींग तिच्या बंगल्याच्या समोर, पूर्वेला होती. आणि ती बोट दाखवत होती तिच्या बंगल्याच्या बाजुच्या बंगल्यातल्या वरच्या खिडकीत, उत्तरेला. म्हणजे तिला न्याहाळणारा मी एकटा नव्हतो तर... माझी द्विधा मनस्थिती झाली. एकतर मला 'तो खरोखर मी नव्हेच' हे कळल्याने हायसं वाटलं(आता माझं खरं घर दाखवायला मी मोकळा), आणि दुसरं म्हणजे आपल्याला स्पर्धक असल्याची जाणीव होऊन, त्यात तो तिच्या नजरेत आधी आला, मी नव्हे, या कल्पनेने माझा प्रचंड जळफळाट झाला. असो. चला भट्टी लाउया.

'अगं तो रितेश असणार... नालायक मुलगा आहे एक नंबरचा. मुलगी दिसली की चालू होतो. एकदम वाया गेलेला आहे. आई-बापांनी लाडावून ठेवलाय ना नको तेवढा.'
'ह्म्म्म...'
'बरं, मी इथे राहतो. टॉप फ्लोअर' मी आता जरा अधिकच अभिमानाने सांगत होतो.
'अरे... म्हणजे आमच्या समोरच' ती हसत हसत म्हणाली.
'हो ना...' मी जरा अधिकच खुश होऊन म्हटलं.
'ओके... बाय!!'
'बाय... भेटुया...'
'हो... नक्की'

ती वळली, मी वळलो. घराकडे जायला निघालो. ती गेट मध्ये शिरतच होती. एवढ्यात मी पुन्हा वळलो आणि तिला थांबवलं.

'अम्म... आय नो धिस इज वेरी फास्ट... बट... अं... तुझा नंबर देतेस??'
'ओ शुअर... उलट मला एक फ्रेंड हवाच होता. मी कोणालाच ओळखत नाही अजुन इथे.' चला बरं झालं.

मी नंबर घेतला, स्माईल दिली, स्माईल घेतली, आणि धडधडती छाती घेऊन माझ्या बिल्डिंगमध्ये शिरलो.

(अजुनही क्रमशः
चालेल ना?? :) )

कथामौजमजा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Dec 2013 - 10:11 pm | बिपिन कार्यकर्ते

चालेल!

खटपट्या's picture

9 Dec 2013 - 12:27 am | खटपट्या

चालेल, मस्त चाललंय तुमचं

प्यारे१'s picture

9 Dec 2013 - 1:34 am | प्यारे१

चालतंय की! त्यात्कायेव्ढं! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2013 - 10:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालेल.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Dec 2013 - 10:48 am | ज्ञानोबाचे पैजार

या अर्धार्धोरुकधारीणीनीही तुमचा रक्ततुण्ड करु नये इतकीच देवा कडे प्रार्थना
त्या उपवनसुंदरीच्या कथे सारखे नेमस्पृष्ट चित्तप्रमाथिन् होउ नये असे मना पासुन वाटते आहे.

( विगतज्वर )

बॅटमॅन's picture

9 Dec 2013 - 10:46 pm | बॅटमॅन

दंडवत स्वीकारा देवा. _/\_

विजुभाऊ's picture

9 Dec 2013 - 10:58 am | विजुभाऊ

(अजुनही क्रमशः
चालेल ना?? Smile )

वेल्कम टू क्लब........

पियुशा's picture

9 Dec 2013 - 11:09 am | पियुशा

आउअर आन दो फटाफट !

अपूर्व कात्रे's picture

9 Dec 2013 - 11:22 am | अपूर्व कात्रे

तिने तुला जे chocolate दिले ते Dairy milk होते का Eclairs होते?

जेपी's picture

9 Dec 2013 - 11:31 am | जेपी

आंदे आंदे

रुमानी's picture

9 Dec 2013 - 11:51 am | रुमानी

चालेल...

सस्नेह's picture

9 Dec 2013 - 3:55 pm | सस्नेह

कोण बरं ओरडले ते 'दुनियादारी' म्हणून ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Dec 2013 - 6:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

ईष्टोरीत रंग भरत चाल्लाय...युंद्या अजुन

विशाल चंदाले's picture

9 Dec 2013 - 7:14 pm | विशाल चंदाले

लगे रहो वडापाव भाई :)

सूड's picture

9 Dec 2013 - 8:09 pm | सूड

>>(अजुनही क्रमशः
चालेल ना?? )

लै वेळा !! लवकर लिवा मंजी झालं. लिंक तुटून दिव नगासा, कसं?

आनंदराव's picture

9 Dec 2013 - 10:29 pm | आनंदराव

ज्ञानोबाचे पैजार - Mon, 09/12/2013 - 10:48 नवीन
या अर्धार्धोरुकधारीणीनीही तुमचा रक्ततुण्ड करु नये इतकीच देवा कडे प्रार्थना
त्या उपवनसुंदरीच्या कथे सारखे नेमस्पृष्ट चित्तप्रमाथिन् होउ नये असे मना पासुन वाटते आहे.

।हिलाच अस्खलित मराथी म्हनतात का?

अर्धार्धोरुकधारीणीनी = म्हणजे हाफ चड्डी
हे बरोबर असेल तर पैजार बुवांच्या मराठीच्या परीक्षेत पास अपुन

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Dec 2013 - 3:13 pm | ज्ञानोबाचे पैजार

खटपट करुन बरेच जवळ पोचलात तुम्ही. *good*

वप्याच्या या लेखाचा पहिला भाग वाचा म्हणजे नक्की अर्थ समजेल.

बाकी आनंदयात्रींचा

।हिलाच अस्खलित मराथी म्हनतात का

हा प्रश्र्ण न समजल्या मुळे त्याला सविनय पास. *nea*

कुणी कशाला काय म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्र्ण आहे. *smile*

तो भाग वाचलाय, पण अजूनही अर्थ कळला नाही
हरलोबुवा तुमच्या प्रतिभेपुढे !!!

वडापाव's picture

11 Dec 2013 - 11:06 pm | वडापाव

पाव चड्डी

खटपट्या's picture

14 Dec 2013 - 6:08 am | खटपट्या

ओह, पाव च्या ऐवजी हाफ लिवलय… धन्स

बुडबुडा's picture

10 Dec 2013 - 5:16 pm | बुडबुडा

लगे रहो... ;)

मस्त चालली आहे गोष्ट.. वाचतेय..

शिद's picture

10 Dec 2013 - 11:38 pm | शिद

वाचतोय... :)

शिद's picture

10 Dec 2013 - 11:39 pm | शिद

पु.भा.प्र. असे वाचावे

उपास's picture

11 Dec 2013 - 1:13 am | उपास

घरोघरी मातीच्या चुली.. :)
चालूंद्या.. !

मस्त चालु आहे कथा... पुभाप्र.

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Dec 2013 - 4:09 am | हतोळकरांचा प्रसाद

(अजुनही क्रमशः
चालेल ना?? Smile)

पळेल की!! पण काहीही म्हणा मला "क्रमश:" बघितल्यावर अजूनही तेवढाच राग येतो जेवढा लहानपणी चांदोबा वाचताना यायचा!! लवकर येउंद्या!!

संजय क्षीरसागर's picture

14 Dec 2013 - 11:57 pm | संजय क्षीरसागर

एकदम फर्मास! असाच लिहीत राहा.

पैसा's picture

15 Dec 2013 - 9:46 am | पैसा

झक्कास! टाका पटापट पुढचा भाग!

मुक्त विहारि's picture

15 Dec 2013 - 9:53 am | मुक्त विहारि

झक्कास.....

उत्तम...