तसे एखाद्या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण होणे आता विशेष वाटत नाही. अनेक संस्थांनी शंभर किंवा दीडशे वर्षे पूर्ण केल्याचे आपण वाचत असतो. इतकेच काय आता आयटी कंपन्या पण रौप्य महोत्सव करू लागल्यात. पण हा कालखंड खरे तर सापेक्ष असतो. कुठल्या परिस्थितीत ती संस्था सुरु झाली, कशी चालविली आणि आता कशी आहे, यावर बरेच अवलंबून असावे.
आमचे पहिले-वहिले महाविद्यालय म्हणजे लातूरचे शासकीय तंत्रनिकेतन. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन (पी. एल. जी. पी. एल .) १९६२ साली सुरु झाले. ते सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. खरे तर ते आधी पाच वर्षे सुरु झाले होते, पण सरकारने व्यवस्थापन घेऊन मान्यता प्राप्त शासकीय संस्था झाले ते १९६२ ला. याच वर्षी महाराष्ट्रातल्या सर्व तंत्रनिकेतनात पहिली मेकानिकल ची विद्यार्थिनी लातूर ला शिकली. तेव्हा लातूर हे छोटे तालुक्याचे आणि दुर्लक्षित गाव होते. मराठवाड्यातली मोठी बाजारपेठ म्हणून ओळख होती. आणि लोकांचा जास्त संपर्क पुण्या मुंबई पेक्षा जवळ असलेल्या हैदराबाद शी होता. लातूर म्हणजे म्हणे ला-तूर होते, त्यामुळे आजही सर्वत्र डाळीच्या मिल्स आणि त्यांची धुराडी दिसतात.
डिग्री-डिप्लोमा- आय टी आय यांचे प्रमाण उद्योगांना पूरक म्हणजे १:३:८ असे हवे असे अ.भा. तंत्र शिक्षण समिती चे निर्देश आहेत म्हणून सरकारने खूप तंत्रनिकेतने सुरु केली. पुढे खासगी पण उदंड झाली. पण मूळ उद्देश पूर्ण झालाच नाही. कारण बहुतेक जणांनी पुढे पदवी आणि त्याही पुढे शिकले. जे पुढे शिकले नाहीत ते व्यावसायिक झाले आणि पदविका धारकांची ही पोकळी अद्याप तशीच आहे. असमतोल वाढत आहे.
आमचे तंत्रनिकेतन म्हणजे त्या वेळच्या लातूरच्या लोकांना अभिमानास्पद वाटे. पुण्या मुंबईकडून मुले शिकायला येतात याचे कौतुक वाटे. लातूर नुकताच जिल्हा झाला होता आणि शहर सुनियोजित पणे वाढत होते. एकूण मस्त गाव होते तेव्हा. मला पश्चिम महाराष्ट्रातून जाण्यासाठी पांडुरंग एक्स्प्रेस म्हणजेच छोटी झुक झुक गाडी होती.
एप्रिल १९८७ ला आम्ही विद्यार्थी असताना रौप्यमहोत्सव साजरा केला होता. त्यावेळी विलासराव हे उगवते नेतृत्व वगैरे होते. मुख्य कार्यक्रमाला त्यांच्या ऐवजी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद महाजन याना बोलवावे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. कारण विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये अ.भा.वि. प. चे प्रमाण अधिक होते. सरकारी संस्था असल्याने नवे आमदार म्हणून विलासराव हे व्यवस्थापनाची नैसर्गिक निवड होती. मग त्यासाठी बरेच वाद विवाद करावे लागले, पण शेवटी महाजन आले. नुकतेच भारत भर प्रवास करून राष्ट्रीय एकात्मता हा विषय त्यांनी मांडला होता. तोच विषय त्यांनी अतिशय सुंदर रित्या मांडला. मुळात निवडणुकी व्यतिरिक्त भाषण ऐकायची वेळच आली नव्हती म्हणून ते मस्त वाटले. त्यांच्या हस्ते बक्षीस मिळाले हे आता विशेष करून आठवते आहे.
वसतिगृहाच्या मैदानात हेली पॅड होते . एका माजी मुख्यमंत्र्याने सहज म्हणून बांधलेले. बहुतेक वेळा क्रिकेट खेळायला कामी आलेले. समोरच्या अजून एका भव्य मैदानात १९८४ च्या निवडणूकीत मिथून दा आणि राजीव गांधीना बघायला लाखोंची गर्दी झाली होती. इथेच पहिल्यांदा पॅड बांधून क्रिकेट खेळायला मिळाले. लातुरात विविध स्पर्धा सतत होत असत ..मो.रफी गायन स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, स्लो सायकलिंग स्पर्धा वगैरे..शिवाय भरपूर चित्रपट गृहे.एकूण विकांताला करमणूक बरीच असे. दिवसातून चार वेळा के.टी/गोल्डन (चहाचे प्रकार) आणि महाराष्ट्र भरातून आलेल्या मित्रांची टोळी. कसे सुंदर दिवस होते.
आता सुवर्ण महोत्सवी वर्षात मात्र संस्थेची अवस्था चांगली नक्कीच नाही म्हणता येणार. दोन वर्षांपूर्वी एकदा गेलो होतो. माजी विद्यार्थी म्हटल्यावर सुटीचा दिवस असून ही शिपायाने आमचा विभाग उघडून दाखवला.
फार काही सुधारणा नाही. प्रवेश क्षमता दुप्पट झालेली. पण सुविधा मात्र तेवढ्याच. इमारतीचा उडालेला रंग आणि परिसरात वाढलेली झुडुपे पाहून वाईट वाटले. सरकारी संस्था अशाच असायला हव्यात का? नकळत ‘ आमच्या वेळी असे नव्हते ’ असे वाटले. आज च्या काळातही पूर्णवेळ पात्र शिक्षक नसणे, प्रभारी प्राचार्य आणि एम. पी. एस. सी. कडे सर्व काळ नजर लावून बसलेले हंगामी शिक्षक, त्याचा फायदा घेणारे राजकारणी यातले काहीच बदलू नये?
तरीही विद्यार्थ्याना मात्र आपले पहिले कॉलेज म्हणून फार आपलेपणा आहे.
आता माजी विद्यार्थी तिथे फारसे नसल्यामुळे सुवर्ण महोत्सवी समारंभ काही विशेष होणार नाही. मात्र आमचा ज्युनियर असलेला मित्र चित्रपट अभिनेता गिरीश कुलकर्णी याच्या सहकार्याने इतर काही जुने मित्र पुन्हा एकत्र आले आहेत. दर वर्षी पुण्यात एकत्र भेटतात. जालावर संपर्कात आहेत. आय बी एम सह इतर अनेक कंपन्यात काम करत असलेल्या अनेकाना आपले पहिले कॉलेज म्हणून सांगावेसे वाटते. याला कारण म्हणजे लातूर करांचा दिलखुलास स्वभाव आणि प्रेम हेही असावे.
अश्या आमच्या या कॉलेजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
(पूर्वप्रकाशित)
आता इथे ठेवण्याचं कारण की बावीस डिसेंबर ला माजी विद्यार्थ्यांचा एक दिवसाचा मेळावा लातुरात आमच्या कॉलेजात ठरला आहे. बरेच लावून धरल्यावर व्यवस्थापनाने (एक्कावन्नाव्या वर्धापन दिना साठी)पुढाकार घेतला आहे. इथे कुणी माजी विद्यार्थी जाऊ इच्छित असतील तर पुण्यामुंबई तून एकगठ्ठा रेल्वे आरक्षण केले जात आहे. माहिती साठी क्रुपया व्य.नि. करावा.
प्रतिक्रिया
7 Dec 2013 - 8:59 pm | पैसा
कार्यक्रमाला शुभेच्छा! अत्यंत आपुलकीने, जिव्हाळ्याने करून दिलेली संस्थेची ओळख आवडली.
7 Dec 2013 - 10:41 pm | मुक्त विहारि
आणि हो,,,,
न विसरता कार्यक्रमाचा व्रुत्तांत इथे लिहीलात तर फार उत्तम....