महामानवाचं महानिर्वाण

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
6 Dec 2013 - 8:47 am

आज दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपिता श्री. नेल्सन मॅन्डेला यांचं निधन झालं....
परमेश्वर मृतात्म्यास सद्गती देवो....

नेल्सन मॅन्डेला यांची महानता मी वर्णन करावी इतकी माझी योग्यता नाही याची मला पुरेपूर जाणीव आहे....
आणि नेल्सन मॅन्डेला यांची योग्यता ठाऊक नाही असा कुणी सुशिक्षित मनुष्यही भेटणं कठीण आहे...
आणि जर खरंच कुणी तसा असेल तर त्याच्यासाठी विकिपिडिया आहेच!!!!

आमच्या पिढीला गांधी, नेहरू, पटेल बघायला मिळाले नाहीत. आमचं दुर्दैव, दुसरं काय!!!
आमचे नेते म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी आणि श्री. अटलबिहारी बाजपेयी...
नेते म्हणून दोघेही उत्तमच, पण त्यांना महामानव म्हणायला जीभ नाही म्हंटलं तरी जरा कचरतेच!!!

अशात अहिंसक सविनय कायदेभंग ही केवळ कविकल्पना असावी (किंवा आमचे बाप-आजे जरासे सटकलेले असावेत!!!)असं वाटत असतानाच नेल्सन मॅन्डेलाचं उदाहरण चक्षुर्वै सत्यं म्हणून डोळ्यासमोर दिसलं....

हे मात्र आमचं भाग्य!!!!!

श्री. नेल्सन मॅन्डेलांना श्रद्धांजली वहावी असा तर ह्या धाग्याचा हेतू आहेच....
पण
एक आठवण....

एक मराठी तरूण आणि त्याची पत्नी, बॉस्टनमध्ये रहात असतांना, एकदा नेल्सन मॅन्डेलांच्या व्याख्यानाला उपस्थित रहायचा योग लाभला त्यांना...
आता आठवत नाही कुठे ते, हारवर्ड असेल किंवा एमाय्टी किंवा बीयू....
रविवार होता, रविवारी ह्या सगळ्या स्कूल्समध्ये व्याख्याने असत आणि ती कुणासाठीही फ्री असंत....
अश्याच एका नेल्सन मॅन्डेलांच्या व्याख्यानाला ते जोडपं जाऊन बसलं...
व्याख्यान तर अप्रतिमच झालं, तो अतिशय खूष आणि तृप्त होता...
पण तिला चैन पडेना...
व्याख्यान संपल्यावर तिने सरळ जाऊन व्याख्यात्याला वंदन केलं...
त्यानेही अर्थातच तिचं अनुकरण केलं....
श्री. मॅन्डेला किंचित गोंधळले...
पण तिने स्पष्टीकरण दिलं, "मी आणि माझ्या नवर्‍याने गांधींना कधी पाहिलं नाही, पण त्या तोडीचा माणूस आज भेटला म्हणून वंदन केलं!!"
श्री. मॅन्डेला किंचित हसले...
म्हणाले,
"डू यू लेट युवर हजबंड ईट मीट?"
"ही ईट्स मीट ऑल द टाईम!!!", किंचित वैतागून ती.
"व्हेरी गुड!!", श्री. मॅन्डेला, "यू सी, यू डोन्ट नीड टू बी अ व्हेजेटेरियन टू फॉलो नॉन-व्हायोलंन्स!!! हा, हा, हा!!!!"
दोघेही मुलं आश्चर्यचकित!!!
त्यांना त्या महात्म्याच्या पातळीवर जाणं शक्य नव्हतं,
म्हणूनच कदाचित तो महात्मा त्यांच्या पातळीवर आला होता...

मॅन्डेला तर गेले, पण आम्ही हा प्रसंग कधीही विसरणं शक्य नाही...
त्या महात्म्याला वंदन करता आलं...
हेच आमचं भाग्य!!!!!

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2013 - 8:50 am | अत्रुप्त आत्मा

___/\___

आनन्दिता's picture

6 Dec 2013 - 9:00 am | आनन्दिता

भावपुर्ण श्रद्धांजली!!:(

सुनील's picture

6 Dec 2013 - 9:16 am | सुनील

भाग्यवान आहात!

गोष्ट २००० सालची. दक्षिण इंग्लंडातील ब्रायटन ह्या शहरी काही कामानिमित्ताने जायचे होते. त्याच सुमारास लेबर पक्षाचे वार्षिक अधिवेशन त्याच शहरात भरले होते. नुसतेच त्यांचे अधिवेशन असते तर फार काही फरक पडला नसता...

पण त्यांनी नेल्सन मंडेला यांनादेखिल आमंत्रीत केले होते आणि परिणामस्वरूप ब्रायटनमधील सगळी हॉटेले बूक झाली होती. कुठेही जागा उपलब्ध नव्हती! शेवटी ब्रायटनपासून काही अंतरावरील एका दुसर्‍या शहरी मुक्काम ठोकावा लागला. संध्याकाळी टीवीवर त्यांची मुलाखत पाहिली. मुलाखत आता काही आठवत नाही परंतु, यांच्यामुळे आपल्याला दूरवरच्या गावात मुक्काम करावा लागतोय याचा सुरुवातीला आलेला राग, मुलाखत संपताना गेलेला होता!

महामानवाला विनम्र अभिवादन!

vrushali n's picture

6 Dec 2013 - 9:22 am | vrushali n

आत्ताच कुठेतरी वाचल की जरी त्यांनी केलेली क्रान्ती अहिंसक होती तरिही सशस्त्र क्रान्ती हा ही एक मार्ग असल्याचे ते समजुन घेऊ शकत होते...

विकास's picture

6 Dec 2013 - 11:05 am | विकास

Mandela

निखळ हास्य सातत्याने चेहर्‍यावर ठेवत, अगदी सहज वाटावे अशा पद्धतीने विभागलेल्या समाजाला एकत्र करणार्‍या मंडेला यांना विनम्र अभिवादन.

आजच्या दिवशी आंबेडकरांचे देखील महानिर्वाण झाले आणि त्याच दिवशी मंडेलांचे पण हा एक विचित्र योगायोग आहे.

आत्ताच कुठेतरी वाचल की जरी त्यांनी केलेली क्रान्ती अहिंसक होती तरिही सशस्त्र क्रान्ती हा ही एक मार्ग असल्याचे ते समजुन घेऊ शकत होते...

मंडेला देखील पेशाने वकील होते आणि अफ्रिकन नॅशनल काँग्रेस (एएनसी) या चळवळीशी त्यांचे पहील्यापासूनचे (१९४४) नाते होते. पण एका खटल्यातून १९५८ च्या सुमारास बाहेर आल्यानंतर त्यांच्याबरोबरच्या इतरांना आणि मला वाटते त्यांना देखील केवळ नि:शस्त्र चळवळ पुरेशी होईल असे वाटले नाही आणि त्यातून एएनसीच्या सशस्त्र चळवळीच्या विभागाची Umkhonto weSizwe ("Spear of the Nation") सुरवात झाली. या विभागाच्या कडून मंडेला यांनी शस्त्रास्त्रांचे शिक्षण देखील घेतले होते. नंतर ते "David Motsamayi" या नावाने अफ्रिकाखंडात वंशवादाविरोधात पाठींबा मिळवायला म्हणून फिरले. काही अंशी मिळाला देखील मोरोक्को आणि इथियोपिआमधे सैनिकी शिक्षण देखील घेतले... पण नंतर ६४ साली देश(राज)द्रोहाच्या नावाखाली त्यांना २७ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झाली. तेथे त्यांना कृष्णवर्णीय जनतेने त्यांचा नेता केले.

द. अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ डब्ल्यू डे क्लर्क यांनी ३-४ वेळेस काही अटींवर सोडण्याची तयारी देखील दर्शवली पण मंडेलांनी वीनाशर्तच सुटका हवी असा आग्रह सोडला नाही. ९०साली सुटका झाल्यापासून वंशवाद संपण्याची चिन्हे दिसू लागली होती. पण त्याच बरोबर कृष्णवर्णीय आणि अफ्रिकानो गौरवर्णीय यांच्यातील दुहीतून देशाची फाळणी होण्याची शक्यता होती. त्यासाठी पुढची चार वर्षे दोन्ही बाजूंना मनाने पूर्णपणे नाही तरी समजूतीने एकीकरण मान्य करायला लावण्यात घालवली आणि फाळणी टाळली.

मंडेला यांच्या संदर्भात अजून एक मह्त्वाचे: त्यांनी ठरवले असते तर ते किमान दोन टर्मस तरी राष्ट्राध्यक्ष होऊ शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. १९९४ साली राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी ते एकच टर्म राहतील असे जाहीर केले आणि तसेच वागले. पहीला कृष्णवर्णीय अध्यक्ष ज्याने स्वतः आयुष्यातील २७ वर्षे तुरूंगात घालवली, स्वतःच्या लोकांचे हाल झालेले पाहीले त्याने अध्यक्ष झाल्यावर कुठलेच डोक्यात न ठेवता सत्यशोधन आणि समरसता आणण्याला प्राधान्य दिले..

Truth and reconcillation

खेळ हा माणसास एकत्र आणू शकतो हे डोक्यात ठेवून खेळास महत्व दिले आणि त्याच्यातला (क्रिडा मंडळाचे अध्यक्ष न होता) एक दर्शक म्हणून भाग झाले...

Mandela sports

कदाचीत पिडां म्हणले तसे भारतातील महामानवांचा काळ तुम्ही-आम्ही पाहीला नसेल, पण ग्लोबल व्हिलेजच्या जमान्यात भले भेटलो नसलो तरी मंडेलाचे इतिहास घडवणे पाहू-वाचू शकलो यात आपण सगळ्यांनीच थोडे का होईना पण समाधान मानायला हवे असे वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2013 - 11:22 am | प्रभाकर पेठकर

पुरक आणि मार्गदर्शक माहिती. धन्यवाद.

उद्दाम's picture

6 Dec 2013 - 9:49 am | उद्दाम

अभिवादन

चौकटराजा's picture

6 Dec 2013 - 10:09 am | चौकटराजा

नेल्सन मंडेला यांच्या बद्द्ल अनेक करणांसाठी आदर आहे. त्यानी दीर्घकाळ तुरूंगवास भोगला. सुटका झाल्यानंतर
देशसेवेत आणखी सक्रीय भाग घेतला. देशोदेशांशी चांगले संबंध त्यानी वाढीस लावले. पंचाण्णव वर्षाचे दीर्घ आयुष्य क्लेशकारी व फलदायी अशा संमिश्र स्वरूपात जगले. हसत हसत जगले.
मस्तक झुकवून प्रणाम, सर !

ग्रेटथिन्कर's picture

6 Dec 2013 - 10:17 am | ग्रेटथिन्कर

अभिवादन.
गांधीजींच्या विचाराने मार्टीन ल्युथर आणि मंडेला घडले, जग बदलले .महात्म्याचे विचार कालातीत आहेत ..जय महात्मा गांधीजी..

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2013 - 10:25 am | प्रभाकर पेठकर

अशा थोरामोठ्यांची प्रत्यक्ष भेट होणे आणि त्यांच्या भाषणातून आपल्याला कांही प्रेरणा मिळणे ही खरोखर भाग्याचीच गोष्ट आहे.
नेल्सन मंडेला ह्यांना आदरांजली.

अनिरुद्ध प's picture

6 Dec 2013 - 11:39 am | अनिरुद्ध प

आदरांजली

झकासराव's picture

6 Dec 2013 - 2:06 pm | झकासराव

तंतोतंत भावना आहेत.
आदरांजली..

पांथस्थ's picture

6 Dec 2013 - 2:25 pm | पांथस्थ

__/\__

विनम्र आदरांजली. मंडेलांचा सहवास थोड्या वेळासाठी घडला हे महान भाग्य म्हटले पाहिजे.

सांजसंध्या's picture

8 Dec 2013 - 8:17 am | सांजसंध्या

लिहा ना मग. वाचायला आवडेल.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Dec 2013 - 3:55 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आदरांजली.

प्यारे१'s picture

6 Dec 2013 - 4:03 pm | प्यारे१

विनम्र आदरांजली.

विजुभाऊ's picture

6 Dec 2013 - 9:06 pm | विजुभाऊ

मन्डेलांनी नक्की काय केले याची जाणीव इथे दक्षीण अफ्रिकेत आल्यानंतर झाली.
तो एक खर्‍या अर्थाने द्रष्टा माणूस होता.
जेंव्हा द्.अफ्रीकेला स्वातन्त्र्य मिळाले त्यावेळेस लोकभावना भडकावून किं न भडकवता देखील मंडेलांना गोर्‍या लोकाना देशाबाहेर हाकलणे सहज शक्य होते. त्यांच्याशी द्वेशाच्या भावनेतुन वागणे शक्य होएत. एखादा सामान्य माणूस असता तर त्याने या गोष्टी केल्या असत्या. जनक्षोभ करवुन आणणे सोपे असते. पण मंडेलाना त्याच्या दुष्परीणांची पूर्ण जाणीव होती. देशातील बहुतेक संस्था गोर्‍यांच्या हातात होत्या. काळ्याना संस्था चालवण्याचा अजिबात अनुभव नव्हता.
मंदेलानी देशाच्या प्रगतीला स्थैर्याला महत्व दिले गोर्‍या लोकांच्या उद्योगाना त्यानी संरक्षन दिले. आज द अफ्रीका त्याची फळे चाखतोय. देशात गोर्‍यांच्या बरोबरेने काळे देखील संस्था चालवण्यात आघाडीवर आहेत. देशात उद्योग धंदे अबाधीत आहेत. हे समजणे केवळ एखाद्या द्रष्ट्यालाच शक्य आहे. गोर्‍यांच्या ताब्यातुन देहा काढून घेतला. गोर्‍याना हाकलून दिले आणि संस्थात्मक कारभार अननुभवी लोकाम्च्या हाती गेल्यावर काय होते हे आज आपण युगांडा , झिम्बब्वे यांच्यावरुन पाहू शकतो

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Dec 2013 - 9:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

विनम्र आदरांजली.

मैत्र's picture

6 Dec 2013 - 9:42 pm | मैत्र

मंडेला यांच्या स्मृतीस अभिवादन...
जेव्हा मी मंडेला आणि आफ्रिकेचा इतिहास वाचला तेव्हा त्यांच्या उत्तुंग प्रयत्नांची जाणीव झाली..
नाही तर ठराविक साच्यातली मिडियामधली माहिती आणि ठोकळेवजा शब्द कानावर पडत राहतात.

पण त्यांच्याबद्दलचा आदर प्रचंड वाढला तो एक उत्तम सिनेमा पाहिल्यावर --
Reconciliation and Forgiveness... त्यांच्या ठाम विश्वासाच्या शब्दांचं यथायोग्य भाषांतर करण्याचं सामर्थ्य माझ्याजवळ नाही. पण थोडा समजून घेण्याचा प्रयत्न केला.
मयिबुये आफ्रिका च्या घोषापासून ते रेनबो नेशन पर्यंत देशाला नेणारा मोठे द्रष्टे व्यक्तिमत्व होतेच पण फार मोठे लोकनेतेही होते...
देशाची गरज, परिस्थिती, भविष्याची समज - vision आणि समाजाच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटकांची मानसिकता समजून त्यांनी देश पुन्हा उभा केला. खरोखर महामानव..

पिडां काका फार फार भाग्यवान आहात तुम्ही..

मैत्र's picture

6 Dec 2013 - 9:49 pm | मैत्र

Invictus

वरच्या प्रतिसादात सिनेमाचं नाव आलं नाही.. Invictus ह्या कवितेने त्यांना रॉबेन आयलंडच्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ काळाच्या तुरुंगवासात Inspiration आणि मानसिक बळ दिलं असं त्यांनी नंतर अध्यक्ष झाल्यावर आणि आपल्या आत्मचरित्रात सांगितलं होतं...

दक्षिण अफ्रिकेचे गांधी नेल्सन मंडेला ह्यांना आदरांजली.

पैसा's picture

6 Dec 2013 - 11:00 pm | पैसा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेल्सन मंडेला या दोन्ही महान मानवतावाद्यांचे स्मृतीदिन एकाच दिवशी यावेत हा विलक्षण योगायोग. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

प्रास's picture

6 Dec 2013 - 11:15 pm | प्रास

नेल्सन मंडेलांना विनम्र अभिवादन.

पिडांकाका, अगदी थोडक्यात पण फारच सुंदर नि हृद्य आठवण सांगितलीत.

आभारी आहे.

अर्धवटराव's picture

6 Dec 2013 - 11:57 pm | अर्धवटराव

खरोखर महामानव. विनम्र श्रद्धांजली.

सांजसंध्या's picture

8 Dec 2013 - 8:20 am | सांजसंध्या

विनम्र श्रद्धांजली.!!

चिगो's picture

8 Dec 2013 - 9:39 am | चिगो

महामानवाला विनम्र श्रद्धांजली.. भाग्यवान आहात, पिडांकाका..