चला व्हिएतनामला ०६ : हो ची मिन् शहराची सफर - २

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
2 Dec 2013 - 12:51 am

==================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

...हे संग्रहालय पाहणे हा एक वेगळाच अनुभव होता. भारतीय संस्कृती कंबोडियात खोलवर रुजली होती हे माहीत होते. पण तिचा इतका मोठा प्रभाव व्हिएतनाममध्ये पहायला मिळेल असे वाटले नव्हते ! असे अनपेक्षित आश्चर्य कधीकधी सहलीचा आनंद एका वेगळ्याच उंचीवर नेऊन सोडते ! पाय निघत नव्हता पण अजून एक खास मोठे आकर्षण, "व्हिएतनाम युद्धावशेष संग्रहालय" बघायचे बाकी होते तेव्हा तिकडे निघालो.

व्हिएतनाम युद्धावशेष संग्रहालय ( Vietnam War Remnants Museum किंवा Bảo tàng chứng tích chiến tranh)

नावाप्रमाणेच हे व्हिएतनाम युद्धाला, विशेषतः त्या युद्धाच्या अमेरिकन हस्तक्षेपाच्या कालखंडाला, वाहिलेले संग्रहालय आहे. त्या युद्धात वापरलेली आयुधे, यंत्रसामुग्री आणि त्यात झालेली हानी याचे अगदी विस्तारपूर्वक पाश्चिमात्य फोटोग्राफर्सच्या छायाचित्रांसह दर्शन येथे होते. १९७५ मध्ये त्याचे "अमेरिकन आणि कठपुतळीच्या (दक्षिण व्हिएतनामी सरकारच्या) युद्ध अपराधांचे संग्रहालय" या नावाने उद्घाटन झाले. १९९० त्याचे नाव बदलून "युद्ध अपराध आणि आक्रमणाचे संग्रहालय" असे नामकरण केले गेले. त्यानंतर १९९५ मध्ये अमेरिकेशी राजनैतिक संबद्ध सुधारल्यावर त्याचे नाव परत बदलून आताचे "व्हिएतनाम युद्धावशेष संग्रहालय" हे नाव ठेवले गेले...

पहिले लक्ष पटांगणात मांडलेल्या अमेरिकेच्या पकडलेल्या मोठ्या लष्करी आयुधांकडे आणि वाहनांकडे आकर्षिले गेले. तेव्हा अर्थातच तेथूनच आम्ही सुरुवात केली.

गनबोट आणि M79 ट्रायपॉडवर ठेवलेली M40 (१०६ मिमी) रायफल...

२०१ किलो वजनाची आणि १०० मीटरपर्यंत अचूक मारा करू शकणार्‍या M40 (१०६ मिमी) रायफलच्या गोळ्या चिलखती गाड्यांचे आवरण भेदू शकतात. XM546 नावाच्या गोळ्या वापरून ही गन पायदळाविरुद्धही वापरली गेली. ही गोळी झाडल्यानंतर तिच्यातून ८००० तीक्ष्ण छर्रे बाहेर पडून ते एकाच वेळेस अनेक सैनिकांना जायबंदी करू शकतात.

M107 (175mm) तोफ...

२८००० किलो वजनाची ही तोफ ३२ किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. हिचा गोळा जेथे पडतो तेथे ९५ मीटर रुंद आणि ३५ मीटर खोल खड्डा पडतो आणि साधारण पणे ५०० मीटरच्या व्यासाच्या परिसराची नासधूस होते. असल्या एकूण १५२ तोफा व्हिएतनाम युद्धात वापरल्या गेल्या.

CH47 Chinook हेलिकॉप्टर...

दोन इंजिने असलेले हे महाकाय हेलिकॉप्टर मुख्यतः सैनिकांची, तोफांची आणि त्याच्या गोळ्यांची दुर्गम भागातली वाहतूक करण्यासाठी वापरले गेले. साडेपंधरा मीटर लांबीचे हे हेलिकॉप्टर जास्तीत जास्त २९८ किलोमीटर प्रतितास वेगाने ५०० किमी दूरवर जाऊ शकते.

F-5A fighter...

हे वजनाने हलके असलेले आवाजाच्या वेगापेक्षा जास्त जलद उडणारे फायटर आहे. अमेरिकेने परतताना मागे सोडलेल्या ८७७ विमानांपैकी ४१ या प्रकारची होती आणि त्यातली काही व्हिएतनामी वायुदलात काही वर्षे वापरात होती. नंतर सुट्या भागांच्या कमतरतेमुळे ती केवळा अशी देखाव्याच्या वस्तू बनली.

वरच्याच चित्रात F-5A च्या मागे वर नाक केलेले १४४८ आकडा असलेले विमान आहे A-1 Skyraider बॉम्बर. हे विमानही व्हिएतनाम युद्धात महत्त्वाचे आक्रमक बॉम्बर म्हणून वापरले गेले.

अगोदर अनेक प्रकारचे युद्धसाहित्य पाहिलेले असले तरीसुद्धा या युद्धात वापरलेल्या बाँब्जचे आकार पाहून चकीत व्हायला झाले...

या संग्रहालयात व्हिएतनाम युद्धाची व्याप्ती समजावून देताना अनेक प्रकारची आकडेवारीही दिलेली आहे.

युद्धात फ्रेंचांना अमेरिकेने पुरवलेल्या युध्दसाहित्याची यादी...

दक्षिण व्हिएतनामला अमेरिकेने पुरवलेल्या युध्दसाहित्याची यादी...

युद्धकाळात व्हिएतनाममध्ये तैनात केलेले विविध देशांचे सैन्य...

बाँबवर्षावाचे आकडे...

विमानहल्ले...

दुसरे महायुद्ध, कोरियन युद्ध आणि व्हिएतनाम युद्ध या तीन युद्धांची तुलना...

केवळ एका देशाबरोबर छेडलेल्या या युद्धात दुसर्‍या महायुद्धात टाकल्या गेलेल्या एकूण बाँबपेक्षा तीनपट जास्त बाँबवर्षाव केला गेला आणि त्याच्या खर्चाच्या जवळ जवळ निम्मा खर्च केला गेला !

व्हिएतनाम देशाचे झालेले नुकसान...

या युद्धात आता संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घातलेली अनेक विषारी रसायने (Agent Orange, napalm, phosphorus bombs) वापरली गेली. त्यांचा तत्कालिक परिणाम म्हणून मोठी मनुष्यहानी तर झालीच पण नंतर अनेक पिढ्यांमध्ये दिसणारे त्यांचे परिणाम पंगू आणि विकृत संततीच्या रूपात व्हिएतनामी जनता अजूनही भोगत आहे...

हे दालन पार करून एका बाजूला असलेल्या विभागात गेलो. तेथे दक्षिण व्हिएतनामी सरकार राजकीय कैद्यांची कशी "सोय" करायचे त्याची झलक दिसते.

फ्रेंचांकडून वारसाहक्काने मिळालेले गिलोटीन...

एका वेळेस दोन किंवा तीन कैद्यांना ठेवण्यासाठीच्या टायगर केजेस (१.८ मी X ०.७५ मी X ०.४ मी)...

यापेक्षा थोड्या मोठ्या (१.८ मी X ०.७५ मी X ०.६ मी) टायगर केज मध्ये ५ ते ७ माणसे कोंबली जात असत.

फारच भाग्यवान कैद्याला अश्या प्रकारे कोठडीत ठेवले जायचे...

हे सगळे बघताना माणसातले जनावर काय करू शकते याचा पुरेपूर प्रत्यय येतो.

अजून बरेच काही वस्तू आणि फोटोंच्या स्वरूपात तेथील अनेक दालनांत आहे. बरेच फोटो बघवत नाही इतके भयानक आहेत. तेथे असणार्‍या प्रवाशांत अमेरिकनच बहुसंख्य होते आणि हे सगळे बघून त्याची मोठी विचित्र परिस्थिती होत होती.

हॉटेलवर पोहोचून थोडा आराम करून शॉवर घेतल्यावर बरे वाटले. संग्रहालयातल्या भूतकाळातून वर्तमानात यायला जरा मदत झाली. संध्याकाळचे जेवण आमच्यावरच होते. एका व्हिएतनामी रेस्तराँचा पत्ता मार्गदर्शकाकडून घेतला होता, तिकडे निघालो. चिनी नववर्षोत्सव "टेट" सुरू झाला होता. रस्ते रोषणाईने खुलून गेले होते...

.

.

.

(क्रमशः )

==================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

मी पैला.. प्यारे बाजूला हो!!

नेहमीप्रमाणे भारी!!! आता चवीने एकेक फोटो बघेन! ;)

प्यारे१'s picture

2 Dec 2013 - 3:14 am | प्यारे१

मोदकनं 'माझा नंबर पैला' करुन चव घेतलेले फोटो बघितले.
आत्यंतिक विरोधाभास असलेलं अमेरिकेचं वर्तन अधोरेखित झालं.
तो सैन्यांचा तक्ता सैनिकांना 'पपेट्स' म्हणतोय. खरंच आहे.
नेमकं काय मिळवतात लोकं असं करुन कुणास ठाऊक?
अवांतरः थोडी माहिती म्हणून व्हिएतनाम युद्ध नेमकं कशामुळं सुरु झालेलं ते सांगता येईल का?
उगाच्च : ह्या वर्षी किती टन धान्य/ किती पाऊस सारखं 'ह्यावर्षी किती टन बॉम्ब' ? असं व्हिएतनामी लोक म्हणत असतील काय? अर्थात म्हणण्याइतपत शिल्लक असतील तर! :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Dec 2013 - 1:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो 'पपेट्स' हा शब्द केवळ फ्रेंच आणि अमेरिकन पैश्यावर, सैन्य मदतिवर अणि पाठिंब्यावर टिकून राहिलेल्या दक्षिण व्हिएतनामच्या सेनेला उद्देशून आहे. हा पाठीबा काढून घेताच काही दिवसात त्यांचा पराभव झाला.

स्पंदना's picture

2 Dec 2013 - 4:25 am | स्पंदना

तेथे असणार्‍या प्रवाशांत अमेरिकनच बहुसंख्य होते आणि हे सगळे बघून त्याची मोठी विचित्र परिस्थिती होत होती.

अहो एक्कासाहेब तुम्हे ऑस्ट्रेलियातले अ‍ॅबोरिजनल्सची वस्तू संग्रहालये पाह्य्ला पाहिजेत. तेथे या ब्रिटीशांनी केलेल्या शिरकाणांचे अन अनन्वित अत्याचारची चित्रणे आहेत. पहाणारे सारे ऑस्सीच गप पहात असतात.
मला फार राग आहे या महासत्तावाल्यांचा. असो.
टींग! टींग!! लवकर लवकर बघुन घ्या. पुढं निघायच आहे पॅसेंजर लोक्स!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Dec 2013 - 2:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

ऑस्ट्रेलियात मूलनिवासींची जमीन बळकावण्यासाठी केलेल्या तीनशेच्यावर मोठ्या कत्तली इतिहासात नोंदल्या गेल्या आहेत. युरोपियनांनी पाय ठेवल्यापासून ऑस्ट्रेलियाच्या ६०% मूलनिवासी लोकसंखेची आणि टास्मानियाच्या ९५% मूलनिवासी लोकसंखेची कत्तल करण्यात आली हे ऐतिहासिक सत्य तेथिल सरकारला मानून माफी मागायला लागली आहे. तरीसुद्धा अजूनही ऑस्ट्रेलियन लोकांचा वंशविव्देष जगप्रसिद्ध आहेच आणि तेथिल मूलनिवासिंच्या परिस्थितित काही फारसा फरक दिसत नाही.

सुधीर कांदळकर's picture

2 Dec 2013 - 6:31 am | सुधीर कांदळकर

पूर्वी वाचलेले असूनही मनावर भयंकर परिणाम झाला. खरे तर जॉन्सन, दोन्ही बुश वगैरेंवर न्यूरेंबर्गसारखे खटले भरून नाहीतर आईकमनसारखे फाशी द्यायला हवे होते. पण गोर्‍या इझरेलींना काही झाले नाही हेही खरेच. जर्मनांचा अपवाद सोडला तर सर्व गोर्‍यांना सगळे गुन्हे माफ हाच गोर्‍यांच्या जगाचा न्याय आहे.

तरी `दिएन बिएन फू'ला फ्रेंचाचा सपशेल पराभव करणार्‍या आणि नंतर एवढ्या पाशवी संहार करणार्‍या सामुग्रीनिशी लढणार्‍या अमेरिकनांचा नमवणार्‍या व्हिएतनामींना सलाम.

हा भाग जास्त प्रभावशाली आणि परिणामकारक ठसा उमटवणारा वाटला.

पुभाप्र

जेपी's picture

2 Dec 2013 - 7:00 am | जेपी

अहो रेटारेटी करु नका भरपुर जागा आहे ईथे
. :-)

हा भाग ही आवडले .

प्रचेतस's picture

2 Dec 2013 - 8:46 am | प्रचेतस

हाही भाग मस्तच.

सुरुवातीचे युद्धावशेष संग्रहालय आणि नंतरची नववर्षोत्सवाची रोषणाई यांच्यातील प्रचंड विरोधाभास पाहून इतिहास किती भीषण असू शकतो हे जाणवून गेले.

दिपक.कुवेत's picture

2 Dec 2013 - 10:52 am | दिपक.कुवेत

फोटो पण छान

बापरे! युद्धाशी संबंधित फोटो पाहवत नाहीत! :(

अनिरुद्ध प's picture

2 Dec 2013 - 12:33 pm | अनिरुद्ध प

मानवातील राक्षसीप्रव्रुत्ती पाहुन मन विशण्ण झालं,पु भा प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Dec 2013 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोदक, सुधीर कांदळकर, तथास्तु, वल्ली, दिपक्.कुवेत, यशोधरा आणि अनिरुद्ध प : अनेक धन्यवाद !

हे असं काही पाहिलं की भकास वाटत राहतं. भीती वाटते. किती तो क्रूरपणा! काय मिळतं असं करून देवजाणे! असो. ही म्युझीयमे पाहणे हा अनेक सहलींचा अविभाज्य भाग असू शकतो हे मान्य करावे लागते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Dec 2013 - 8:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही म्युझीयमे पाहणे हा अनेक सहलींचा अविभाज्य भाग असू शकतो हे मान्य करावे लागते. सहमत !

जगात चांगल्याबरोबर वाईट गोष्टीही भरपूर आहेत. ते गालिच्याखाली न सरकवता त्याचा सामना करून त्यापासून काही शिकलो तरच भविष्यकाळ चांगला बनवायला मदत होईल. वाईटाकडे डोळेझाक केली तर त्याचे मूक समर्थन केल्यासारखे होईल.

असो. माझ्या भटकंतीचा मूळ उद्देश मजेशीर गोष्टींबरोबर "खरे जग" पाहणे हाही असतो.

पैसा's picture

3 Dec 2013 - 1:38 pm | पैसा

रोषणाईची चित्रं सुरेख आहेतच. ती तोफ आणि बॉम्ब बघून छाती दडपून गेली. जास्त, आणखी जास्त संहार कसा करता येईल याचं संशोधन करण्यातच माणूस जास्त वेळ घालवतो का? डॉग केज मधे कुत्रा आरामात बसू शकतो आणि पाय मोकळे करण्यासाठी गोल फिरू शकतो किंवा उभा राहू शकतो. पण त्या पिंजर्‍यात २/३ माणसं ठेवली जात होती? केवळ भयानक. :( आणि हे सगळं करणारे जगात सर्वात संपन्न आणि सुसंस्कृत लोक?? रासायनिक शस्त्रं काय, महायुद्धापेक्षा जास्त बॉम्ब वापरणे काय आणि ते महाभयानक भूसुरुंग. अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी देश आहे हेच खरं. मात्र ते बारीकसारीक देशांच्या वाटेलाच जातात आणि चीनसारख्यांपुढे मात्र गप्प.

प्यारे१'s picture

3 Dec 2013 - 1:43 pm | प्यारे१

>>>डॉग केज मधे कुत्रा आरामात बसू शकतो आणि पाय मोकळे करण्यासाठी गोल फिरू शकतो किंवा उभा राहू शकतो.
पण त्या पिंजर्‍यात २/३ माणसं ठेवली जात होती? केवळ भयानक.

कशाची बनवलीये बघा की. बार्ब्ड वायर आहे. ३ माणसातला एखादा हलला तरी...
बघूनच रक्ताळायला होतंय. :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Dec 2013 - 3:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ पैसा आणि प्यारे : व्हिएतनाम युद्धाबद्दल अगोदर वाचले आणि (सिनेमात) पाहिले होते... त्यामुळे हे युद्ध इतर युद्धांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे लढले गेले हे माहिती होते. त्यात आपल्या मोठेपणाची चमक झाकळू नये (आणि तिही एका पिटुकल्या कम्युनिस्ट देशाबरोबरच्या द्वंदात तर नकोच) यासाठी अमेरिकेने आकांताने प्रयत्न केल्याचे जगजाहीरच होते. पण त्या युद्धाची ही झलक... तीही सबळ पुरावे आणि आकडेवारीसह... काही वेगळीच होती. अनुभवांची मर्यादा वाढवणारी होती !

अमेरिकेबरोबर मैत्रीचे संबद्ध प्रस्थापित झाल्यावर बरीच काही चित्रे संगहालयातून हलवली गेली. परंतू आताही त्या संग्रहालयात अनेक अशी चित्रे आहेत की त्यांचे फोटो बरोबर आणणे मला बरे वाटले नाही. इच्छा असल्यास त्यातली काही येथे स्वतःच्या जबाबदारीवर पाहू शकाल.

हरवलेला's picture

3 Dec 2013 - 4:43 pm | हरवलेला

तुम्ही दिलेल्या लिंक वरचे फोटो पाहिले :(
बाकी तुमचे प्रवास वर्णन आणि फोटो छान !

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Dec 2013 - 4:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

भयानक हा शब्द खूप तोकडा पडतो.

प्रवासवर्णन आवडल्याबद्दल धन्यवाद !

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2013 - 5:35 pm | अत्रुप्त आत्मा

..............

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Dec 2013 - 10:34 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

जेपी's picture

4 Dec 2013 - 5:49 pm | जेपी

व्हियतनाम चे सैनीक जास्तीत जास्त प्रवास जमीनीखालील तयार केलेल्या भुयारातुन करायचे .
भुयारात हवा खेळती राहण्यासाठी ससा असलेला पिंजर छताल अडकवत असत . काही वेळातच तो ससा बाहेर पडण्यासाठी -क्र .

छतात बीळ खोदायचा . त्यातुन एक हवा खेळते राहणारे बीळ तयार व्हायचा . ते सैनीक एक तोफ गोळा घेऊन शेकडे मैल प्रवास करायचे .कारण जमीनीवर बॉम्ब वर्षावाची भिती असे .

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Dec 2013 - 5:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या भुयारांची भेट पुढच्याच भागात आहे. लिहून संपला की लगेच टाकेन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Dec 2013 - 6:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

ती सश्याची गोष्ट बहुतेक दंतकथा असावी कारण तिचा उल्लेख तेथे कोणीच केला नाही.