"म्हण्टलं, आहात का डॉक्टर?"
"अगं, ये ना. काय म्हणतेस? बर्याच दिवसांनी येणं केलंस. कशी आहेस?"
"खरं तर खूप आधीच येणार होते. क्लिनिक सुरू करतेय. म्हणजे जागा घेतलीय, भाड्यानेच; पण घेतलीय. गरजेपुरतं फर्निचर करतेय, होईल महिन्याभरात. एकदा येऊन जा. आणखी काय लागेल वगैरे, तुझ्या टिप्स महत्त्वाच्या..."
"अरे वा! अभिनंदन!! आहे कुठे ही जागा?"
"घराजवळच आहे माझ्या, ४-५ बिल्डिंगसोडूनच मिळाली. थोडी महाग आहे पण घेतलीय ३ वर्षांसाठी तरी..."
"छानच की! नक्की येईन २-४ दिवसात."
"अगं, आत्ता खरं तर माझ्या प्रकृतीनिमित्तानेच आलेले तुझ्याकडे."
"मग बोल ना, काय झालंय?"
"जन्म गेला इथं, लग्नानंतरची ६-७ वर्ष परदेशी जाऊन आले आणि आल्या आल्या माझ्याच शहरात मला सर्दी-पडशाने त्रस्त व्हायला झालंय. सुरूवातीला आपली साधी औषधं घेतली. मग अगदी अॅण्टीबायोटिक्सही झाली. ४ दिवस बरे जातात आणि त्रास पुन्हा सुरू. आधी असला काहीच त्रास नव्हता गं मला! आता काही कळेनासंच झालंय. शेवटी 'हा' म्हणालाच की तुझं सेल्फ मेडिकेशन आता बास झालं, कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखव. मग म्हण्टलं, तुझ्याइतकी चांगली डॉक्टर कोण आहे अजून? म्हणून तुझं दार ठोठावलंय."
"हो का? चल ये. जरा तपासून घेते...... अं..... श्वास घे. हं...... इथे दुखतंय का? नाही? बरं..... जरा पुन्हा एकदा दीर्घ श्वसन कर. हं...... मान वर कर. हं. खाली कर. हं.... असं केल्यावर डोकं दुखतं का? दुखतं? इथे? का इथे? का इथे? बरं...."
"काय वाटतंय?"
"क्रॉनिक र्हायनायटीस सारखंच वाटतंय. अॅलर्जीक आहे. सध्या आपल्या शहरालाही प्रदूषणाचा इतका विळखा बसलाय नं, पेशन्ट्स वाढलेत या प्रकारचे फार. पण तू काळजी करू नकोस. मी माझ्याकडची काही औषधं देते आणि ही दोन लिहून देतेय, ती फार्मसीतून घे. आजच सुरू कर. जरा व्यायाम सुरू कर. योगा वगैरे. प्राणायाम वगैरेनी यात फार उपयोग होतो."
हो गं. वजन जरा वाढलेलंच आहे माझं. व्यायाम करायलाच हवाय. औषधं आजच सुरू करते."
"बस थोडा वेळ. कंपाऊण्डर बांधेल औषध तोवर. नाहीतरी सध्या हेल्दी सिझन सुरू होतोय, आज निवांतच आहे. मारु गप्पा थोड्या. तशीही बर्याच दिवसांनी भेट होतेय, नाही का?"
"हो ना, सध्या 'ह्या'ची नवी नोकरी आहे इथे, छोटीची शाळाही सुरू झालीय. आजकाल नर्सरीतसुद्धा अभ्यास वगैरे देतात. या सगळ्यात येवढा वेळ जातो की आता पुन्हा शहरात येऊन वर्ष होईल पण कुणाकडे अगदी सगळ्या मित्र-मैत्रिणी नि नातेवाईकांकडेही जाणं झालेलं नाही."
"या निमित्ताने का होईना, माझ्याकडे तर आलीस."
"हो नं. अगं, तुझा छोकरा काय म्हणतोय? मोठा झाला असेल नं आता?"
"अगं ही पोरं फार भरभर मोठी होतात. चौथीत गेलाय आता. नुसता खेळत असतोय. फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिण्टन. त्याच्या बाबाने जिमखान्याची मेंबरशिप काय घेतली, साहेब घरात टिकतंच नाहीत. आज ही मॅच, उद्या ती. आज ही स्पर्धा उद्या ती. बरं, आता स्पर्धाही कुठे आपल्या शहरातच होतात? कधी इथे तर कधी तिथे. दर रविवारी आमची आजूबाजूच्या शहरांमध्ये भटकंती चालू असते. मी 'ह्या'ला सांगूनच ठेवलंय. गावात असेल तर मी आहे पण बाहेरगावी कुठे मॅचसाठी न्यायचं असेल तर बाबा, तुझी जबाबदारी. मग जातात बाप-लेक. अर्थात मग दोघांच्या खाण्या-पिण्याचं आपल्यालाच करून द्यावं लागतं नं. चाल्लंय बरं सध्या. तू सांग...."
"छोटीला आता थोडा वेळ सासूबाई बघतात. संध्याकाळी आईकडे ठेवते मग आता दवाखान्याच्या कामाकडेही लक्ष द्यावं लागतंय नं. नवरा आणि सासूबाई करतात मदत, पण आई जवळच असल्याने क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतलाय."
"हे बाकी बरं केलंस. जितकं लवकर बस्तान बसेल तितकं बरंय. पण तुमच्या 'अहो'जींचा पुन्हा कुठेतरी मुक्काम हलवायचा प्लान वगैरे नाही ना?
"सध्या तरी नाही दिसत. तसं ठरवूनच पुन्हा आपल्या गावात आलोय नं."
"ते खरं गं पण या इंजिनियरांचं काही सांगता येत नाही. बाहेर कुठे चांगली ऑफर आली की निघाले हे. मग नळाबरोबर गाड्यासारखी आपलीही यात्रा..... आपलं जास्त त्रासदायक होतं. क्लिनिक सोडा, प्रॅक्टीस सोडा, आपले मित्र-मैत्रीणी सोडा. गेलेय ना मी यातून...."
"हं, खरंय. लग्न करून गेले तेव्हा मी हे अनुभवलंयच की, फक्त क्लिनिक तेवढं सुरू करायचा मौकाच दिला नाही बाबांनी. इण्टर्नशिप झाल्या झाल्याच बोहल्यावर चढवलं आणि उडवून टाकला आमचा बार!"
"हो गं. तसं लवकरच केलंस तू लग्नं. मग, आता जुन्या मित्र-मैत्रीणींच्या गाठी-भेटी झाल्या की नाही सुरू?"
"कसलं गं काय? खूपशा आता लग्नं करून लांब लांब गेल्यात. संसाराला लागल्यावर कुणाला जमतंय इथे गाठी-भेटी घ्यायला?"
"हो. हे बाकी खरंय."
"बाय द वे, तुमचे मित्रवर्य भेटतात की नाही हल्ली?"
"अग्गं बाई, विसरलेच की! माझी पण कमाल आहे. अगं गेल्या महिन्यातच भेटलेला. आमच्या गावतच माझ्या छोकर्याची मॅच होती. आईच्या घराजवळच्या स्टेडीयममध्ये. मग २-३ दिवस राहण्याच्या तयारीने मीपण गेले. येतेय म्हणून त्याला फोन केला तर हा वेडा मॅच बघायलाच हजर! माझ्या लेकाशी तर गट्टीच जमलीय त्याची. नवर्याबरोबर तर विचारूच नको. वर्षानुवर्षाची ओळख असल्यासारखे २ दिवस धिंगाणा घातला सगळ्यांनी. मॅचेस् संपल्या की यांची टूर निघायची. शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत. हे बघ, ते बघ, इथे हे छान मिळतं तिथे ते आणि खाबूगिरी करण्यात तर त्याचा कोण हात धरणार? माझ्या नवर्याला वेगवेगळ्या ठीकाणी खायला प्यायला नेऊन पार बिघडवून टाकला की गं त्याने! आता माझ्या नवर्याला तो त्याचाच मित्र वाटतो."
"पहिल्यापासून तसाच आहे ना तो..."
"अगं, शाळेपासून ओळखते मी त्याला. पठ्ठ्या कोणत्याही परीक्षेला गंभीर नसायचा. म्हणायचा की माझी कसली परीक्षा, माझे पेपर तपासणार्याची खरी परीक्षा आहे. टेन्शन त्याला, मला कशाला? नुसता धुडगूस घालायचा वर्गात. शाळेतच नाही तर पार मेडिकलपर्यंत हाच प्रकार. अजूनही तसाच आहे तो!"
"सध्या काय करतायत महाशय? गेल्या ६-७ वर्षात काही कॉन्टॅक्ट नाही."
"काही धड करेल तर शप्पत! पास झाल्या झाल्या क्लिनिक सुरू केलं. पेशन्ट्स वाढले तसं हॉस्पिटल घातलं. मग स्वतःला लागतात तशी औषधं बनवण्यासाठी फार्मास्युटीकल कंपनी काढली. सगळं छान चाललेलं तर या महाभागाने ते आपल्या पार्टनरला चालवायला दिलं आणि ५-६ वर्षांपूर्वी आपल्याला हवी तशी मशीन्स बनवण्यासाठी चक्क एका इंजिनियरबरोबर नवी कंपनी काढली. आता साहेब, नवी मशीन्स डिझाईन करतात, फार्मास्युटिकल प्रोसेस डेवलपमेण्टसाठी. डॉक्टरचा इंजिनियरच झालाय त्याचा"
"काय सांगतेस काय? असा काय तो?"
"बघ नं, काही तरी खूळ घेतो डोक्यात आणि लागतो मागे त्याच्या. लहानपणापासूनच तसा गं. एका जागी जास्त टिकतच नाही. चंचल आहे फार. काय काय डोक्यात यायचं त्याच्या, सांगायचा तो पण आम्ही त्यातलं कधी सिरियसली घेतलंच नाही. मागे त्याने त्याचं काम दाखवलं तेव्हा आठवलं याबद्दल तो बोललेला आधीही, म्हणून."
"काकू काय म्हणतायत?"
"त्या आहेत म्हणून तो घरी तरी जातोय. त्या मागे लागून लागून थकल्यात पण याच्या पायात लग्नाची बेडी अडकवल्याशिवाय हा एका जागी स्वस्थ बसणार नाही, हे नक्की!"
"म्हणजे? लग्न नाही केलंय अजून?"
"बघ ना, वेळच्यावेळी केलं असतं तर या असल्या गोष्टी करत नसता बसला. चांगलं हॉस्पिटल चालवलं असतं, पेशन्ट्स बघितले असते."
"हो नं!"
"मी पण बघ कशी आहे? तुझी-माझी ओळखपण त्यानेच तर करून दिलीय. बरेच दिवस विचारेन म्हणत होते, तुला कुठे भेटलेला गं हा?"
"अगं ती गंमतच आहे. आम्ही इन्टरनेटवर चॅट-रूममध्ये भेटलो. माझं मेडिकलचं पहिलंच वर्ष, १७-१८चं वय. नवं नवं इन्टरनेट घरात आलेलं. बंडखोरीचे हार्मोन्स आणि अॅडवेन्चरचं आकर्षण. मी एका चॅटींग साईटला लॉग इन झाले. तिथे अनोळखी व्यक्तींबरोबर चॅट करायचा अनुभव घ्यायचा होता. तिथे एकाला बाकीचे डॉक्, डॉक् असं संबोधत होते. त्याला प्रायवेट मेसेज टाकला. विचारलं कसला डॉक् तू? तर म्हणाला की फायनल इयरला आहे. मी म्हण्टलं की प्रूव्ह कर, तू डॉक्टरकी शिकतो आहेस, अगदी गंमत म्हणून, तर त्याने चक्क माझं बौद्धिक घेतलं. जणू अगदी मेडिसिनचं क्लिनिक घ्यावं तसं. मग मीही त्याला सांगितलं की मी पहिल्या वर्षाला आहे. त्याने त्याचं नाव सांगितलं. मी माझं. अशी आमची ओळख झाली. याला हौस तर हा माझ्या कॉलेजच्या पत्त्यावर पत्र पाठवायचा. मग मी पत्रोत्तर. आमच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत हा सिलसिला चालू होता. काय काय लिहायचा. कॉलेजमधली धमाल, प्रोफेसरांच्या गमती, याच्या स्वतःच्या खोड्या नि काय काय. वाचायला जाम मजा यायची."
"काय सांगतेस? मला हे काही माहितीच नव्हतं. याचं काहीतरी असंच कॉलेजमध्ये चालायचं. याची टिंगल, त्याची टवाळी, गंभीर व्हायला कधी जमलंच नाही त्याला. जाऊ दे अजूनही तसाच आहे तो. बरं, हे घे तुझं औषध आणि हे प्रिस्क्रिप्शन. ४ दिवसांचा कोर्स आहे नि औषधंही तितक्याच दिवसांची दिलीयेत. संपली की फोन कर. कसं वाटतंय ते सांग. ठीक?"
"बरं. कळवते तुला पण तू क्लिनिक बघायला येतेयस नक्की."
"हो, हो. तुला फोन करूनच येईन."
औषधं घेऊन बाहेर पडलेल्या तिच्या मनात त्यांची शेवटची भेट तरळत होती.
त्याच्या एका बेडरीडन पेशन्टच्या व्हिजीटसाठी तो तिच्या शहरात आलेला. ती इन्टर्नशिपवरून घरी परतताना बस-स्टॅण्डवर त्याला भेटलेली. भेटल्या भेटल्याच त्याने तिच्यावर बाँबगोळा टाकलेला. त्याने तिला चक्क लग्नाची मागणी घातलेली. तो म्हणालेला....
"अगं, माझं स्वतःचं क्लिनिक आहे, हॉस्पिटल आहे, आता फार्मास्युटिकल फर्म सुरू करतोय. कोणताही व्यवसाय उत्तम प्रकारे करण्याची मला खात्री आहे. मला किती वर्ष ओळखतेयस तू? कधीतरी मी वावगं वागलोय का? तुझ्याशी? कुणाशी? माझा आग्रह नाही की लगेच मला उत्तर द्यावंस. तू व्यवस्थित विचार कर २-३ दिवस आणि मग मला सांग. मला नाही घाई पण मी तुला खात्री देतो की तुला नक्की सुखात ठेवेन."
"काय बोलतोयस? फिरकी ताणायला तुला काय आज मीच भेटले? नि ती ही अशी? या विषयावर?"
"आयुष्यात पहिल्यांदाच गंभीरपणे मी आज तुझ्याजवळ माझं मन मोकळं केलंय. मला माझ्या मित्र-मैत्रीणींनी कधीच फारसं गंभीरपणे घेतलं नाही. पण आज मी खरंच खूप गंभीर आहे. तू विचार करून निर्णय घे."
"तू खरंच सिरियस आहेस? मनापासून सांगू? मला खात्री आहे की तू जिच्याशी लग्न करशील तिला सुखातच ठेवशील, पण तुझा प्रस्ताव मी नाही स्विकारू शकत. मी डॉक्टर होतेय म्हणून माझ्या बाबांना जावई इंजिनियर हवाय. मी त्यांच्या मनाविरुद्ध नाही जाऊ शकत. त्यांना दुखावून मला आपलं लग्न सुखी होईलसं नाही रे वाटत. मला मात्र तू माफ कर."
"अगं पण बुद्धीमत्ता शेवटी बुद्धीमत्ता असते. ठरवलं तर मला काहीही होता आलं असतं. माझा कल मेडिकलकडे आहे हा का माझा दोष? हवं तर, तुझ्या बाबांना मी भेटायला येतो. मी समजावेन त्यांना. घेतील समजून ते ही."
"नाही रे, माझ्या बाबांना मी जास्त ओळखते. त्यांच्याकडून तुझा अपमान झाला तर ते मला सहन होणार नाही पण त्यावर मला काहीही करणं शक्य होणार नाही. या कात्रीत सापडून उध्वस्त होईन मी! तुझं प्रेम कळतंय रे मला, पण त्याचा मी स्वीकार नाही रे करू शकणार. तू खरंच मला माफ कर. एखाद्या छानशा मुलीशी लग्न कर. आनंदात रहा."
"हॅ! हॅ! हॅ! कसली सिरियस झालीस गं? आत्ता माझ्याकडे कॅमेरा असता ना तर कसला झकास फोटो निघाला असता. बाबांना इंजिनियर जावई हवाय, ते तुझा अपमान करतील, मी कात्रीत सापडेन, उध्वस्त होईन आणि काय! कसले जबरदस्त एक्स्प्रेशन्स! मजा आली बुवा! ए वेडाबाई, फार मनावर वगैरे घेतलेयस की काय? अगं, तुझ्या बाबांनी निवडलेल्या मुलाशी लग्न कर मग तो इंजिनियर असो किंवा कुणीही. आई-बाबांच्या मनाविरुद्ध कशाला जायचं? तुला चांगलाच नवरा मिळेल गं, का काळजी करतेस? आयला, तरी सांगतोय, माझ्या कुठल्याच मित्र-मैत्रीणींनी मला सिरियसली घेतलेलं नाही, तरी मला सिरियसली घेतेस? अशी कशी गं तू वेडाबाई?"
"म्हणजे? तू माझी खेचतोयस? मस्करी करतोयस? तुला काही लाज लज्जा? कसलं धडधडतंय मला!"
"चल, मी पळतो. तुझं लग्न ठरलं की कळव. आनंदात रहा."
बस निघता निघता पटकन उडी मारून तो आत चढला. बस दृष्टीआड होईपर्यंत तो तिला नि ती त्याला निरोप देत हात हलवत होते. पुढे तिचं लग्न गडबडीतच ठरलं आणि गडबडीतच पार पडलं. त्याला बोलवायचं तिच्याकडून राहूनच गेलं. आज त्याच्या मैत्रीणीकडून त्याच्याबद्दल कळलेलं पुन्हा पुन्हा तिच्या कानात वाजत होतं,
"डॉक्टरचा इंजिनियरच झालाय त्याचा."
"डॉक्टरचा इंजिनियरच झालाय त्याचा."
"डॉक्टरचा इंजिनियरच झालाय त्याचा."
आणि ती विचार करत होती, तो खरंच त्या दिवशी मस्करी करत होता?
विशेष सूचना - (कथावस्तु आणि व्यक्तिरेखांचे वास्तविक जीवनात कुणाशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
प्रतिक्रिया
17 Nov 2013 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
आवडली कथा !
17 Nov 2013 - 10:25 pm | बहुगुणी
लेखन आवडलं.
17 Nov 2013 - 10:26 pm | सूड
आवडलं हे वे सां न ल.
17 Nov 2013 - 10:33 pm | अग्निकोल्हा
विसू मजेशीर आहे, आय मीन वास्तववादी.
18 Nov 2013 - 3:27 am | स्पंदना
मस्तीखोर माणसांच असच होतं. कुणीच सिरीयसली घेत नाहीत.
कथा आवडली.
18 Nov 2013 - 9:16 am | जेनी...
मस्त .
18 Nov 2013 - 9:45 am | खबो जाप
मस्तच लिहले आहे,एक नंबर कुठेतरी भिडून गेले ………
18 Nov 2013 - 10:12 am | प्रभाकर पेठकर
सुंदर कथानक. शेवटची कलाटणीही मनाला भिडणारी. अभिनंदन.
18 Nov 2013 - 10:15 am | त्रिवेणी
कथा आवडली.
18 Nov 2013 - 11:13 am | शैलेन्द्र
सुंदर, शेवटचा डिस्केमर हाही लिखाणाचाच भाग :)
18 Nov 2013 - 11:33 am | जेपी
*****
18 Nov 2013 - 11:35 am | सुहास..
आवडले
18 Nov 2013 - 11:40 am | मृत्युन्जय
मस्त कथा एकदम. आव्डेश.
18 Nov 2013 - 1:16 pm | दिपक.कुवेत
आवडली.....विषेशत शेवटची कलाटणी.
18 Nov 2013 - 1:21 pm | यशोधरा
सुरेख कथा.
18 Nov 2013 - 1:26 pm | प्यारे१
आवडलं कथानक.
18 Nov 2013 - 1:34 pm | हरिप्रिया_
मस्त!!!
आवडेश
18 Nov 2013 - 2:04 pm | इरसाल
मस्करी सोडुन मला १८ वर्षे झालीत.
18 Nov 2013 - 8:31 pm | हरवलेला
:)
18 Nov 2013 - 8:41 pm | धन्या
मस्त कथा. आवडली.
डॉक्टरची होमिओपाथीची प्रॅक्टीस आहे का? ;)
बरं. :)
19 Nov 2013 - 12:50 am | रेवती
कथा आवडली.
19 Nov 2013 - 2:53 pm | लव उ
मस्त ...
19 Nov 2013 - 3:15 pm | मी_आहे_ना
मस्त कथा, आवडली.
19 Nov 2013 - 3:34 pm | पैसा
मस्करी करणार्या जोकरचे अश्रू कोणालाच दिसत नाहीत.
19 Nov 2013 - 3:52 pm | अमेय६३७७
छान कथा आहे.