मंतरलेले ते दिवस आता फिरून परत येतील का ?

psajid's picture
psajid in जनातलं, मनातलं
30 Oct 2013 - 12:49 pm

दूरचित्रवाणीवर मोती साबणाची जाहिरात पाहीली ? तीच ती "उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली… " म्हणत पळणाऱ्या मुलाची ! किती छान ना ? जाहिरात फक्त १५ ते २० सेकंदाची मात्र संस्कृतीची आठवण देणारी… आजची दिवाळी बदललेची जाणीव करून देणारी !
किती छान वाटतं नाही सोनेरी इतिहासात पहाण्याला ? आता ते दिवस नाही म्हणून दुःख व्यक्त करत रडत नाही कारण आताचे आधुनिकतेने नटलेले, विज्ञानाचा साज चढवलेले हे दिवस ही वाईट नाहीत मात्र या दिवसांचे एकेक क्षण पकडताना होणारी दमछाक आणि येणारा थकवा मनाला आनंद देण्याकामी एकदम तोकडा पडतो. म्हणून कुणी आपल्या लहानपणची एखादी गोष्ट पुन्हा एकवार समोर ठेवली तर त्यातील आनंद आपण त्यातील आत्मीयता, गोडवा अनुभवत घेत राहतो. ही जाहिरात पाहिल्यानंतर माझ्या मनात नेमक्या याच भावना निर्माण होतात आणि मला पुन्हा त्या विश्वात फेरफटका मारायला घेऊन जातात. त्याकाळची दिवाळी (आताची दीपावली) आल्हाददायक असायची ते दिवाळीचे फराळ, नवीन कपडे, सुगंधी उटणे, डोक्याला सुगंधी तेल किंवा फटाके यामुळे नव्हे तर या सर्वांबरोबरच आत्मीयतेने ओसंडून वाहणारी मने आणि एकमेकांच्या सुख - दुःखाचा विचार करून साजरा केला जाणारा एक सामाजिक उत्सव म्हणून त्याला एक अनन्यसाधारण महत्व यायचे.
पहिले पाणी (पहिली अंघोळ) किंवा अभ्यंगस्नान याच्या अगोदरच्या रात्री काका आम्हा भावंडाना फटाक्यांचे समान हिस्से करून वाटून द्यायचे आणि आम्हीही ते लक्ष्मी तोटे, लाल मिरची, कावळा, त्रिकोणी फटाके पुरवून पुरवून वाजवायचे. फराळाचे करताना आई - आज्जी ला मदत करताना जो आनंद व्हायचा तो शब्दातीत आहे. त्यातील स्वाद आज आता कुठं जमतंय, खूपच धावपळ आहे किंवा वेळच नाही असे म्हणून दुकानातून उसने पदार्थ किंवा तयार दिवाळी आणणाऱ्या लोकांना काय कळणार ? त्यावेळी पाडवा असो कि भाऊबीज या एका दिवसाचाही सोहळा व्हायचा. हे हरवलेले क्षण मनाला खूप हळवं करून जातात.
मंतरलेले ते दिवस आता फिरून परत येतील का ?

मला तर असं वाटतंय कि -

आजच्या पिढीची रोजच दिवाळी,
आम्हांला कौतुक दिवाळीचे त्याकाळी !

ताई - आईच्या उटण्यानं अंघोळ पहाटे व्हायची ,
नवीन कपड्याबरोबर मनं सुगंधानं नहायची !

जात्यावरच्या ओवीसंगे कानी भूपाळी यायची,
एकच माळ फटक्याची सोडून दिवसभर वाजवायची !

सत चारित्र्याचा, प्रेमाचा दिवा दारी लागायचा,
बहिणीकडे भाऊ सुरक्षा घेऊन जायचा !

पुन्हा एकदा फिरुनी तो काळ परत यावा,
थरथरता हात पाठीवर आणि मनापासून आशिर्वाद असावा !
- साजीद पठाण
(मनावर खोलवर कोरलेल्या त्या दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! )

शुभेच्छूक :- साजीद पठाण आणि परिवार

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

बाबा पाटील's picture

30 Oct 2013 - 1:18 pm | बाबा पाटील

खर आहे ते.पण आजही निदान काही प्रमाणात हे पाळलच जातय.

पियुशा's picture

30 Oct 2013 - 1:18 pm | पियुशा

अरे वा !!! तुम्ही मुस्लिम असुनही दिवाळी साजरी करता ? याच आश्चर्य मिश्रीत कौतुक वाटले :)
खुप छान वाटले वाचुन :)
तुम्हालाही दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा !:)

दिवाळी,ख्रिसमस झालच तर शिरखुर्मा साठी ईद साजरी करण्यात धर्म कुठे मध्ये येतो अस वाटत नाही.
मस्त खाणे आणि धमाल करणे महत्वाचे सण कोणताही असो.

दिपक.कुवेत's picture

30 Oct 2013 - 2:09 pm | दिपक.कुवेत

दिवाळि बरोबर ख्रिसमस आणि ईद पण तितक्याच उत्साहाने साजरी करतो. बायदवे लेखातील भावना आणि कविता मनाला भिडल्या.

पठाणसाहेब तुम्हाला दिवाळिच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

अग्निकोल्हा's picture

30 Oct 2013 - 2:10 pm | अग्निकोल्हा

त्यावेळी पाडवा असो कि भाऊबीज
या एका दिवसाचाही सोहळा व्हायचा. हे हरवलेले क्षण
मनाला खूप हळवं करून जातात.

:)

आम्ही दिवाळी साजरी करतो यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण आम्ही स्वतःला प्रथम भारतीय मानतो. प्राथमिक शाळेत असताना पाठ्यपुस्तकातील पहिल्या पानावरील प्रतिज्ञेचा जयघोष आम्ही मनापासून केलेला आहे. त्यामुळे भारतातील परंपरेचा आदर करण्याची शपथ किंवा वचन त्यावेळीपासून मनामध्ये आहेच. दुसरी गोष्ट अशी कि, माझे बालपण ज्या लहान खेडेगावामध्ये गेले त्याची जेमतेम लोकसंख्या ३००० (तीन हजार) इतकी असेल आणि त्यामुळे एकमेकांचे सण साजरे करणे किंवा एकमेकांच्या सुख- दुःखात सामील होणे हे गावातील प्रत्येकजण अगदी एका कुठुंबातील कर्तव्य समजून करतात आणि म्हणून मला जसे तुमच्या (?) गुढीपाडवा, दिवाळी, विजयादशमी यांची माहिती आहे तशीच रमजान ईद, बकर-ए-ईद किंवा मोहरमची माहिती आमच्या गावातील कोणतीही मराठी व्यक्ती देईल.
मी तर मिर्झा बेग (हास्यसम्राट फेम) यांच्या कवितेसारखे म्हणेन कि "कात अन चुना जसे असते पानात, हिंदू आणि मुस्लिम तसा हिंदुस्तानात"

खरच बालपण आठवल हो

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2013 - 11:50 am | टवाळ कार्टा

+१०००००००००००

पियुशा's picture

31 Oct 2013 - 2:40 pm | पियुशा

क्या बात है :)

साजिद भाई तुम्हाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.

पाषाणभेद's picture

2 Nov 2013 - 9:38 pm | पाषाणभेद

फारच छान लेख अन लेखन! खर्‍या अर्थाने तुम्ही भारतीय आहात.