आपल्याला आजवरच्या आयुष्यात अनेक विविध प्रसंगांत वेळोवेळी कधी न कधी तरी "नाही" म्हणण्याचे राहून गेले असे झाले असेल. आपले नातेवाईक, शेजार पाजारी समाज काय म्हणेल या भीतीने वेळोवेळी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागत असतील.
तसे बघा यला गेले तर त्याची सुरुवात आपल्या घरातल्या माणसांपासूनच होते असे म्हटले तरी चालेल.
पालक आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादतो. मुलगा/ मुलगी १ ० पास झाली कि कला, वाणिज्य आणि शास्त्र यापैकी शास्त्र हा विषय घेवून त्याने डॉक्टर किवा इंजिनियर व्हावे असे वाटते. भले मग तो विषय त्याला आवडो अगर न आवडो किवा त्याला अभ्यास झेपेल/ नाही झेपेल या विषयी त्याचे मत विचारात घेतले जात नाही.जर तो मुलगा/ मुलगी ठामपणे वेळीच नकार देवू शकला, तर आपल्या हव्या त्या विषयात निपुण होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो.<--break--> आज अशी बरीच उदाहरणे आपल्याला अभिनय क्षेत्रात दिसतील कि जे पेशाने डॉक्टर/इंजिनियर असून सुद्धा अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. उदा. डॉक्टर काशिनाथ घाणेकर , डॉक्टर सलिल कुलकर्णी, डॉक्टर गिरीश ओक तर मेडिसीन मध्ये उच्च शिक्षण घेता घेता ते अर्धवट सोडून समाजकारणात शिरलेल्या मृणाल गोरे हे एक वेगळे उदाहरण.
जे गोष्ट शिक्षणाची तीच लग्नाची. मुले उपवर झाली कि त्यांचे लग्न ठरवताना कित्येकदा पालक मुलांच्या मनाचा विचारच करीत नाही. काही वेळा धाकाने तर काही वेळा कौटुंबिक परिस्थिती जाण असल्याने मुले/मुली लग्न उरकून घेतात पण मग पुढे संसारात त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागतात. काही जण मग मन मारून नमते घेतात आणि आलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेतात हे जुळवून घेणे म्हणजे काय तर पुढे आयुष्य भर ते "नाही" हा शब्दच कधी उच्चारात नाहीत. तर काहींनी नंतर नाही म्हटल्या मुळे त्यांचा संसार सुखाचा होत नाही. हे सर्व वेळीच "नाही" म्हटले असते तर टाळता आले असते.
<--break-->
या गोष्टीत तर मुलीना तर ती फक्त मुलगी आहे हे मनावर बिंबवून "तू हे करू नको, ते करु नको"असे वारंवार बजावले जाते. आणि मग ती मुलगी पुढे कुठल्याच गोष्टीला विरोध करित नाही.
हिच गोष्ट आपल्या शेजारीपाजारी, नातेवाईक यांच्या विषयी बोलता येईल. आमच्या बिल्डींग मध्ये शेजारी म्हणजे एकास एक नग होते. संध्या. ७ च्या नंतर कोणी दही (विराजाणकरिता ), सुई, तस्तम वस्तू मागायला आले कि आईला नाही म्हणायला जीवावर यायचे, आणि जर आपण तसे बोलून दाखवलेच तर, " अहो एवढे कुठे रीतीरिवाज पाळताय आपण आता शहरात राहतो." अशी आमचीच समजूत घालत असत.<--break-->
आमच्या समोरील दुसरे एक शेजारी यांनी तर एक कुत्रा पाळला होता. एके दिवशी दु. ३ वाजत आम्ही झोपले असताना त्यांच्या धाकट्या मुलाने घराची बेल वाजवली व दुध पाहिजे होते म्हणून पेला पुढे केला. आम्हाला वाटले कि त्यांचे दुध संपले असेल व दुपारचा चहा करायचा असेल म्हणून मागितले असेल. मी त्यांना दुध दिले पण मागाहून समजले त्यांनी ते दुध त्यांच्या कुत्र्यासाठी नेले होते.
या आणि अशा अनेक लहानसहान गोष्टीना आपण नाही म्हणायला आपण संकोच करतो.
१)बँकेत गेलो कि हमखास कोणीतरी पेन आणायला विसरलेला असतो आणि आपण रांगेत उभे असताना "पेन प्लीज " असे म्हणून एक उपटसुम्भ नेमके आपल्याकडूनच पेन घेतो. मग आपले काम झाले कि गडबडीत ते त्याच्या कडून घ्यायचे राहून जाते किंवा तो तरी आपल्या खिशाला अडकवून लवकर निघून जातो.
२)आपले मित्र आपली बाईक किवा कार हक्काने "जरा महत्वाचे काम आहे १ तासात येतो सांगून घेवून जातात" ते तासभर उलटून गेला तरी येत नाही आणि आपला खोळंबा करतात. बरे गाडी सही सलामत परत आपल्या ताब्यात आली म्हणजे मिळवलं नाही तर तोंड फाकवत "हेSSSSSSहीSSSSSSहीSSSSSS अरे तुला सांगतो काय झाले मी असा जात असताना नां वाटेत....... झाले रामायण/ महाभारत सांगायला सुरवात.
आपले पुस्तक, शेजार्यांनी नेलेला पेपर गेला बाजार आपले भारीतले कपडे,बूट त्याहुन काही जण तर कहर करतात सोन्याचे दागिने मागायला पण त्यांना काहीच वाटत नहि.
वरिल अनुभव तुम्हाला आले असतील किवा यायचे असतील आणि या पेक्षा काही वेगळे असतील तर जरूर प्रतिक्रिया लिहा.
ता.क- पण माझ्या जुन्या धाग्याला "मि.पा.च्या संमेलनाच्या आवाहनाच्या" मात्र "नाही" म्हणू नका आणि सर्वांनी होकर देवुन उपस्थित रहायचय बरं (जर ते भरले तर)."
प्रतिक्रिया
25 Oct 2013 - 1:06 pm | नानबा
हे नाही म्हणणं जमण्यासाठी या पुस्तकाची फार मदत होते. (स्वानुभव)
25 Oct 2013 - 9:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अश्याच विषयाशी संबंधित पुस्तकं दोन दिवसात परत देतो म्हणुन एका महाभागानी नेलयं. ३ वर्षं झाली अजुन देतोय परत ते.
आयरनी आयरनी म्हणायची ती हिचं ;).
25 Oct 2013 - 1:31 pm | त्रिवेणी
मी माझ्या शेजारणीला नाही म्हणायला शिकले आणि माझी बरीच डोकेदुखी कमी झाली. (पेपरची रद्दी मागणे, शेवेचा साचा, पाट,चौरंग,कपडे,घरातील लव बर्ड्सचा पिंजरा तिच्या मुलीसाठी खेळायला नेणे, पैसे मागणे ई. आणि ते परत न करणे)आणि हे सर्व मागताना वेळेचे भानही न ठेवणे.
सो एकदा तिला स्पष्ट नाही संगितले, तू तुझे विकत आण नाहीतर दुसर्या शेजर्यांकडून माग.
25 Oct 2013 - 1:53 pm | प्रकाश घाटपांडे
नाही म्हणताना नम्रपणे म्हणताय कि उद्धटपणे यावर बरच काही ठरत असते.
25 Oct 2013 - 9:01 pm | मितान
+१ सहमत.
25 Oct 2013 - 2:05 pm | सविता००१
शिकायलाच हवं. फुक्कट्चा मनस्ताप! जेव्हा आपली पुस्तकं येत नाहीत ना परत तेव्हा फार जाणवत येत नाही आपल्याला नाही म्हणायला म्हणून :(
25 Oct 2013 - 2:23 pm | वेल्लाभट
हेहे. नाही म्हणायला जमणं इसेन्शियल स्किल आहे बरं का. जमलंच पाहिजे. शिकणं जरूरी आहे.... असे अनेक अनुभव येतात. ऐकून, बघून, अनुभवून, शिकलोय आता थोडं थोडं नाही म्हणायला.
25 Oct 2013 - 2:41 pm | उद्दाम
मी अजिब्बात प्रतिसाद देणार नाही.
25 Oct 2013 - 2:48 pm | जेपी
नाही म्हणणे जमत नाही . पण काही तोडगे आहेत ज्यामुळे नुकसान नाही. उदा-बँकेत कुणी पेन मागितला तर पेनच टोपण स्वत:जवळ ठेवणे जेनेकरुन पेन वापसघेणे विसरणार
नाही आणी समोरचा ही खिशाला अडकवुन जाणार नाही .
25 Oct 2013 - 4:33 pm | वेल्लाभट
माफ करा; 'तो' पेन नाही तर 'ते' पेन असतं. तथास्तु !
25 Oct 2013 - 5:11 pm | बॅटमॅन
माझ्या माहितीप्रमाणे निर्जीव वस्तूंचे लिंग ठरवायचा कोणताही नियम अस्तित्वात नाही मराठीत. तो/ती/ते असे तीनही लिंगांतून पेनसंबोधन ऐकले आहे.
अर्थात मी स्वतः 'ते पेन' असेच म्हणतो हा भाग वेगळा.
25 Oct 2013 - 2:51 pm | मराठी कथालेखक
मग एरवी नाही म्हणून कसं चालेल..एकमेंका सहाय्य करु. अर्थात अतिरेक मात्र नको.
दूध माणसाला न देता कुत्र्यासाठी नेले म्हणून का वाईट वाटावं. कुत्रा जास्त त्रासदायक/भुंकणारा होता का ? :)
25 Oct 2013 - 4:34 pm | वेल्लाभट
हाहाहाहाहाहाअह!
25 Oct 2013 - 3:32 pm | क्रेझी
मी लहान असतांना आमच्या घरासमोर एक मामीजी राहायच्या. त्यांना सुध्दा असंच उठ-सूट काहीही मागायची सवय होती. माझ्या भावाची मौंज झाल्याच्या दुस-या दिवशी येऊन त्या म्हटल्या,'मला जरा ती चांदीची पळी दे गं!' आई घरात नव्हती त्यामुळे ताईने त्यांना 'सरळ' शब्दात 'समजावलं' त्यानंतर त्या कधी काही मागायला आल्याच नाही :p
25 Oct 2013 - 5:36 pm | शिद
मला पैसे मागणारे नातेवाईकांना नाही कसे बोलावे ते शिकायचे आहे. साला पैसे दिले तरी नातेसंबध खराब अणि दिले तरी अशी परिस्थिती आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
इंजिनीयरींगला माझा रूममेट स्व:त ची चड्डी सोडुन सगळे असेच दुसऱ्यांचे वस्तू फुकट मागुन घालायचा पण कसे कोणास ठाउक त्याला कोणी नाही म्हणाले नाही. या सवयी बद्दल त्याला फुकट@दू ही उपाधी मात्र नाही नाही म्हणत असताना फुकटमध्ये मिळाली. ;)
25 Oct 2013 - 8:00 pm | पैसा
ही एक कलाच आहे आणि प्रत्येकाने ती शिकलीच पाहिजे तर बर्याच मनस्तापातून सुटका होईल.
25 Oct 2013 - 8:35 pm | चित्रगुप्त
"नाही म्हणायला शिका".
........"नाही नाही नाही".
25 Oct 2013 - 9:02 pm | मितान
छान लेखन !
25 Oct 2013 - 9:13 pm | आनंदी गोपाळ
किंबहुना मुद्दा अर्धाच आहे.
नम्रपणे, वा उद्धटपणे नव्हे, तर खंबीर नकार देता यायला हवा. पण,
नाही म्हणायला शिकतानाच, कधी मलाही कुणी नाही म्हणू शकतो, ते कसे पचवावे, हे देखिल शिकलेच पाहिजे.
*
आज किसीने दिल तोडा तो, हमको जैसे ध्यान आया..
जिसका दिल हमने तोडा था, वो जाने कैसा होगा..
25 Oct 2013 - 9:35 pm | रेवती
एकदा एक शेजारीण सोन्याचा नेकलेस जर देतेस का असं विचारत होती ते आठवले. अर्थातच नाही म्हटले.
कॉलेजमधील एका मुलीने तिच्या शेजारणीची सोन्याची अंगठी मागून आणली, मग ती हरवली, नंतर कॉलेजात सगळ्यांकडे वर्गणी मागत होती. आम्ही आवाक्! असं कधी तोपर्यंत पाहिलं नव्हतं.
25 Oct 2013 - 9:54 pm | मालोजीराव
पूर्ण वाचली नाही…पण केट विन्सलेट चा 'द रीडर' आठवला
25 Oct 2013 - 9:58 pm | मालोजीराव
चुकून इकडे आला प्रतिसाद
26 Oct 2013 - 10:45 am | चित्रगुप्त
कित्येक लोक प्रत्येक वाक्याची सुरुवातच 'नाही' वा 'नो' ने करतात. म्हणजे आधी समोरच्याचे म्हणणे खोडून काढायचे, मग आपले सांगायचे. अश्या व्यक्ती इतरांना अप्रिय होत जातात.
याउलट परिचयातील एक हिंदीभाषिक स्त्री 'आप बिल्कुल ठीक कह रहे है भाईसाहब ( वा भाभीजी वगैरे) असे म्हणून मग नम्रपणे आपली भूमिका मांडते. ही स्त्री सर्वांना आवडते, आणि लोकही त्या कुटुंबाला केंव्हाही मदत करायला तत्पर असतात.
नाही म्हणण्याची सवय लागली, की जिथे खरेतर हो म्हणायला हवे, तिथेही नाही म्हटले जाते, आणी माणसे दुरावत जातात.
सरकारी ऑफिसातील लोकांना तर आज हे काम होणार नाही, वगैरे म्हणण्याची सवयच लागलेली असते. नाही म्हणून आपली जबाबदारी झटकून टाकणे फार सोपे, पण हो म्हणून ती निभवणे कठीण वाटले, तरी त्यातून समाधान मिळत असते.
अर्थात केंव्हा नाही म्हणायचे आणि केंव्हा हो, हा विवेक सतत बाळगणे आवश्यक.
मी स्वतः जवळजवळ प्रत्येक गोष्टीला 'हो' म्हणण्याच्या बाजूचा आहे, कधीकधी किरकोळ नुकसान होते खरे, पण एकंदरित फायदा जास्त.
मनुष्याने कसे वागावे, याविषयी समर्थांनी दासबोधात उत्तम विवेचन केलेले आहे.
28 Oct 2013 - 2:21 pm | आंबट चिंच
रेवती ताईंना प्रसंग लेखात उल्लेखलेल्या प्रमाणे बोलका आहे.
बक्क्ळ प्रयत्न करुनही आम्हाला ते जमत नाहि.