ओदिशा - ७ : जगन्नाथपुरी

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in भटकंती
18 Oct 2013 - 5:42 pm

ओदिशा - १
ओदिशा - २
ओदिशा - ३
ओदिशा - ४
ओदिशा - ५
ओदिशा - ६

प्रथम महाजालावरून पुरी मंदिराबद्दल उचललेली माहिती. त्यात वैचित्र्यपूर्ण अशा मनोरंजक धार्मिक कथा देखील दिलेल्या आहेत. त्यात सत्याचा भाग किती ते आपणच ठरवायचे.

प्रवेशासाठी वेळ: फक्त हिंदूंना प्रवेश: पहाटे ०५.३० ते १५.०० आणि १६.०० ते २२.०० जाण्यासाठी सुयोग्य वेळ आहे सकाळी ०६.०० ते ०७.००
कॅमेरा, मोबाईल, टोप्या, कमरपट्टा, चामड्याची कोणतीही वस्तु निषिद्ध आहे.
अहिंदूंसाठी बाजूच्या इमारतीतील रघुनंदन ग्रंथालयाच्या गच्चीतून सोय केली जाते.
दूरध्वनी: ०६७५२-२२२००१-०२

मुख्य द्वाराचे नाव स्वर्गद्वार असे अर्थपूर्ण आहे. गर्दी होऊं नये म्हणून सावधगिरी म्हणून भक्तांना पटापट दर्शन देऊन ढकलून दूर केले जाते.

हे भारतातील एक महत्वाचे यात्रास्थान आहे. चारधाम यात्रेपैकी एक यात्रास्थान. गंगवंशीय राजा चोडगंगदेव याने दहाव्या शतकातील वास्तू पाडून तिथे बाराव्या शतकात हे मंदीर बांधले.

पुरी नगरीत जातांना अगोदरच आपल्याला २१४ फूट उंचावरचा कळस उठून दिसतो. कळसाचे डोळ्यात भरणारे ठळक दृश्य हे पुरीच्या जनजीवनातील प्रत्येक बाबीवर पडणार्‍या या मदिराच्या प्रभावाचे प्रतीकच आहे. मंदिराभोवतालची २० फूट उंच भिंत ६५० फूट लांब आणि तेवढीच रुंद आहे. भिंतीच्या आत अख्खे शहरच, नव्हे विश्वच वसले आहे. देवळात थेट काम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या ६,००० वर भरते. इथल्या मुदपाकखान्यात रोज १०,००० जणांचे जेवण शिजते. उत्सवाच्या दिवशी तर भोजन करणार्‍यांची ही संख्या २५,००० वर जाते. अखिल ओदिशातील धार्मिक जीवन या मुख्य देवतेकडे केंद्रित झाले आहे. संपूर्ण जगात असे हे एकमेव उदाहरण आहे.

अगदी अलीकडच्या काळापर्यंत संपूर्ण देवालय पांढर्‍या चुन्याने आच्छादित होते. युरोपियन दर्यावर्दी जसे कोणार्कला ब्लॅक पॅगोडा म्हणत तसे पुरीच्या देवालयाला व्हाईट पॅगोडा म्हणत. पवित्रातील पवित्र अशा या देवालयाला कोठलेच कोरीव काम वा चित्रे नसल्यामुळे उदिशातील कोरीवकामाच्या समृद्ध परंपरेचा स्पर्शही न झालेला साधा पृष्ठभाग पाहून दीर्घकाळपर्यंत संशोधक कोड्यात पडत असत. अखेर हे कोडे १९७५ मध्ये सुटले. जेव्हा पुराणवस्तु शास्त्रज्ञांनी पृष्ठभागावरचा पांढरा चुना काढून टाकायला सुरुवात केली तसतसे त्यांना उदिशातील कोरीवकामाच्या समृद्ध परंपरेतील सर्वोत्कृष्ट शिल्पकलेच्या मंदीरस्थापत्याला आव्हान देणारे कोरीवकाम केलेली कलाकृती दिसून आली.

१८व्या शतकातील शासकानीं असे चुनालेपन करण्यामागे तर्काला अनुसरून एकच कारण दिसते ते म्हणजे समुद्राच्या खार्‍या हवेपासून मंदिराच्या कोरीवकामाचे रक्षण करणे. त्यानंतरच्या शासकांनी तीच प्रथा चालू ठेवली असावी. जुना चुन्याचा लेप काढण्याचे काम चालू असतांनाच पुराणवस्तूशास्त्रज्ञ बांधकामातील गंजलेल्या लोखंडी सळया देखील बदलत आहेत आणि तुटकेफुटके दगडी भागही बदलत आहेत. शेवटी हे मंदीर यानंतर शतकानुशतके टिकावे यासाठी एक पातळ पारदर्शक थर चढवण्यात येत आहे.

प्रतिमाग्राहक नेण्यास मनाई असल्यामुळे जालावरून उचललेल्या प्रकाशचित्रांवर समाधान मानावे लागते आहे.

जगन्नाथपुरी मंदीर

जगन्नाथपुरी मंदीर

पुन्हा महाजालावरची माहिती: मंदिराचे पावित्र्य राखण्य़ासाठी तसेच पवित्र परंपरा जपण्यासाठी अहिंदूंना मंदिरात प्रवेश नाही. मंदीर आणि आवार नीट पाहाता यावे म्हणून इतर पर्यटकांसाठी रस्त्यासमोरील रघुनंदन ग्रंथालयाच्या छपरावरून पाहाण्याची सोय केलेली आहे.

मदिराभोवतालच्या बाजार विभागातील शेकडो दुकानातून जगन्नाथाचा बंधू बलभद्र म्हणजे बलराम आणि भगिनी सुभद्रा यांच्या समवेत जगन्नाथ असलेल्या त्रिमूर्ती विकत मिळतात. वैशिष्ट्यपूर्ण ओदिशी शैलीतले टप्पोरे डोळे असलेल्या त्रिमूर्ती. जगन्नाथ संप्रदायाचे प्राबल्य ओदिशातील इतर भागातून पर्यटन करतांना देखील जाणवते. पाहावे तिथे जगन्नाथाची मूर्ती दिसते. मोहक आकार आणि दृष्टी खिळवणारे सामर्थ्य यांच्या संयोगामुळे असेल कदाचित पण अगदी धार्मिक नसणार्‍या नजरेला देखील जगन्नाथाची मूर्ती आकर्षक वाटते.

अगदी हिंदू नसणार्‍या पर्यटकाला देखील या अलोट गर्दीच्या यात्रास्थानाचे सामर्थ्य जाणवते. मंदिराभोवतालची दुकाने गर्दीने फुलून गेलेली असतात. पण या अलोट गर्दीतही जाणवते ते सौजन्य आणि पावित्र्य. दिवेलागण होताहोताच बाजारात एक फेरफटका मारा. घाबरू नका, तुमच्या टॅक्सीच्या किंवा रिक्षाच्या चालकाची नजर तुमच्यावर असेल आणि तुम्ही निघतांना तो जादू केल्यासारखा बरोब्बर अवतीर्ण होईल. विष्णुदेवतेचा ध्वज वार्‍यावर फडकत असलेल्या भव्य आणि सुंदर कळसाकडे एक नजर टाका. मंदिरात प्रवेश करणार्‍या आणि मंदिरातून बाहेर येणार्‍या भाविकांचे चेहरे जरा न्याहाळून पाहा. तळल्या जाणार्‍या खाऊचा, मिठाईचा, अगरबत्त्यांचा, फुलांचा आणि धुपाचा संमिश्र गंध श्वासात भरून घ्या आणि पावले वळतील तिथे जा. अगदी निधर्मी व्यक्तीला पण वाटेल की आपण वैशिष्ट्यपूर्ण अशा एकमेवाद्वितीय यात्रास्थानी आलेलो आहोत.

पुरीची पंचतीर्थे
१. रोहिणी कुंड हे मंदिराच्या आवारातच आहे. पंचतीर्थांपैकी हे एक तीर्थ आहे. बनारसप्रमाणे पुरीला देखील पंचतीर्थे आहेत. रोहिणी कुंड हे मंदिराच्या आवारातच विमला मंदिरासमोर आहे. पुरीच्या पंचतीर्थांपैकी हे एक तीर्थ आहे. श्वेतगंगा, नरेंद्र सरोवर, इंद्रद्युम्न सरोवर, मार्कंडेय सरोवर आणि तीर्थराज महानदी म्हणजे पुरीचा समुद्रकिनारा यापैकी इतर चार तीर्थे आहेत. या पंचतीर्थांत स्नान केल्यामुळे पापक्षालन होते असे भाविक मानतात. साहाजिकच इथे येण्यापूर्वी मनसोक्त पापे करण्यास हरकत नाही. या सरोवरांची प्रकाशचित्रे महाजालावर आहेत. त्यापैकी नरेंद्र सरोवर प्रकाशचित्रात अतिशय देखणे दिसते.

रोहिणी कुंडातील जल हे करण जल म्हणजे पापक्षालन करून आपल्याला पावन करणारे आहे असे मानतात.

पवित्र अशा शंख क्षेत्रात हे कुंड वसलेले आहे. या पवित्र अशा रोहिणी कुंडात एकदा एक देवदाराचा लाकडी ओंडका तरंगतांना मिळाला. या ओंडक्यातूनच मूळची जगन्नाथाची मूर्ती कोरून तिची प्रतिष्ठापना पुरीच्या मुख्य मंदिरात केली होती. त्या मूळ मूर्तीबरहुकूमच सध्याची मूर्ती कोरली आहे.

विमला, कमला सर्वमंगला आणि उत्तराई अशा चार देवींनी प्रणितोदक कुंड, दोन वृक्ष स्थळे गरुड आणि निलगिरी पर्वताचे शिखर या ठिकाणांबरोबरच रोहिणी कुंडापाशी वास्तव्य केले.

मूळचे रोहिणी कुंड विमलादेवी मंदिराच्या प्रवेशापाशी आहे. त्या कुंडात निर्माणजल आहे असे म्हणतात. कैक वर्षापूर्वी ते कुंड जराजर्जर झाले. परंतु सन २००७ मध्ये दीन बंधु दास या श्री प्रभुपादस्वामींच्या शिष्याने एक लेख सन या नियतकालिकामध्ये लिहिला आणि कुंडाच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.

सध्या जगन्नाथ मंदिरात रोहिणी कुंड म्हणून एका छोट्याशा पात्रात पवित्र जल ठेवलेले आहे. पात्राच्या तळाशी भुशुंडी काक याची मूर्ती ठेवलेली आहे. एका पुराणकथेनुसार एक कावळा रोहिणी कुंडात पडला आणि अचानक त्याचे रूपांतर विष्णूनारायणाच्या शंखचक्रगदापद्मधारी अशा चतुर्भुज भक्तात झाले. तो हा भुशुंडी काक = कावळा.

स्कंदपुराणात देखील ‘भुशुंडी काक’ची कथा सांगितली आहे. मोमस ऋषींनी भुशुंडीला एक शाप दिला. मरणासन्न अवस्थेत उडत उडत तो कावळा शंखक्षेत्री पोहोचला. रोहिणी कुंडातील पवित्र जलाने स्नान करून तो जगन्नाथाचे दर्शन घ्यायला मंदिराजवळ आला. योगायोगाने तो एका कल्पवटवृक्षाच्या शाखेवर बसला. आपल्याला ठाऊकच आहे की कल्पवृक्षाखाली मनांत धरलेली इच्छा पूर्ण होते. त्या कावळ्याच्या मनांत शापमुक्त व्हावे अशी इच्छा सतत तेवत होतीच. अचानक कावळ्याच्या रूपातील भुशुंडी मरून रोहिणी कुंडात पडला आणि त्याचे रूपांतर चतुर्भुज अशा दिव्य रूपात झाले. तेव्हापासून त्याची वटनारायण म्हणून पूजा करतात.

रोहिणीकुंडाच्या जरा पुढे गेले की सुदर्शनक्राच्या आकाराचे नाभिचक्र आहे. त्याच्या बाजूला चार फूट उंचीची कावळ्याची मूर्ती आहे. हा कावळा इंद्रद्युम्नाच्या काळी अस्तित्वात होता. जगन्नाथाचे मंदीर बांधून पूर्ण झाल्यावर त्याला त्याच्या पवित्र अशा गतकाळाचे फळ मिळाले. राजा गलमाधवाने दावा केला की मंदीर त्याचे आहे. मग ब्रह्माने तिथे येऊन तोडगा काढला. राजा इंद्रद्युम्नाशेजारी कावळा आणि चक्र हे साक्षीला ठेवले. गलमाधवाचा आत्मा अजूनही रोहिणी कुंडात वास्तव्य करतो आणि रोज जगन्नाथाची प्रार्थना करतो असे मानतात.

मूळ रोहिणी कुंड विशाल जलाशय होता. त्याच्या किनार्‍यावरून पाण्यात उतरायला स्फटिकाच्या पायर्‍या होत्या असा वेदांत उल्लेख आहे. स्कंदपुराणात विद्यापति नीलशैलहून परत आल्यानंतरचे संभाषण आहे. त्यात तो इंद्रद्युम्नाला म्हणतो,

नीलगिरीच्या शिखरावर एक सदाहरित असा वटवृक्ष आहे. त्या वृक्षाच्या पश्चिमेला रोहिणी कुंड आहे आणि कुंडाभोवती स्फटिक मणिमाला आहे. शंखचक्रगदापद्मधारी, नीलवर्णी इंद्रनीलमणिमाया, नीलमाधव हे वटवृक्षाच्या शीतल छायेखाली या वेदीवरील सोनेरी कमलावर आसनस्थ आहेत, नीलमाधव वेणुवादन करताहेत आणि अनंतनागाने त्यांच्या मागून आपल्या शरीराने छत्र धरले आहे. समोर सुदर्शन दृश्यमान आहे आणि त्यांच्या समोर गरूड हात जोडून बसलेला आहे.

नीलमाधव आणि इंद्रद्युम्न यांना या पवित्र जागी आलेले विद्यापतीने पाहिल्यानंतरच्या काळात नीलमाधवाची आणि रोहिणी कुंडाची ही प्रतिमा एका भयंकर अशा वादळात वाळूमध्ये आता नष्ट झाल्याचे मानतात. तथापि श्री नरसिंहाने एका अगुरू वृक्षाखाली या पवित्र स्थळी नीलशैलाचे मंदीर उभारले. नीलमाधव अंतर्धान पावल्यानंतर आता एवढेच राहिले आहे.

रोहिणीकुंडाच्या पूर्वेला आपल्याला थोर ऋषी मार्कंड यांच्या पावलाचे ठसे दिसतात. त्यावरून दुसर्‍या पंचतीर्थाचे नाव ठेवले, मार्कंडेय सरोवर.

जालावरच्या प्रकाशचित्रात अतिशय देखणे दिसणारे
नरेंद्र सरोवर

नरेंद्र सरोवर. तर पुन्हा आपल्या सफरीवर जाऊयात.

पुरीच्या वाटेवर आपल्या मार्गदर्शकाने बर्‍याच सूचना देऊन बसमधल्या सर्व पर्यटकांना सतर्क केले. कोणार्क मंदिराला दर्यावर्दी लोक ब्लॅक पॅगोडा म्हणत तर पुरीच्या मंदिराला म्हणत व्हाईट पॅगोडा. म्हणजे दोन्ही मंदिरे समुद्रातून आता दिसतात की नाही ठाऊक नाही. नसल्यास शेदोनशे वर्षापूर्वी निदान शिखरे तरी दिसत असावीत आणि परिसरातल्या दर्यावर्दींना त्यांचा दिशादर्शनासाठी उपयोग होत असावा.

१. कोणत्याही पुजार्‍याला जवळ येऊ देऊ नका. काही पुजारी देखील चोर आणि खिसेकापू आहेत तर काही चोर - खिसेकापू पुजार्‍यांच्या वेषात उपस्थित असतात. फक्त मंदीर-अधिकृत पुजार्‍यांशी व्यवहार करा. आपल्या वस्तूंची चोरीपासून काळजी घ्या.
२. प्रतिमाग्राहक,भ्रमणध्वनी आत न्यायला परवानगी नाही. तेव्हा ते बरोबर घेऊ नका.
३. फक्त हिंदूंना प्रवेश. इतर धर्मीयांना बाजूच्या इमारतीतून अवलोकन करायची सोय आहे.
४. दोन तासात बसमध्ये परत या.

पुरीच्या मंदिरातील कोरीवकाम निवांतपणे पाहणे अशक्यच दिसत होते. प्रकाशचित्रे देखील काढायची नाहीत तर आत कशाला जायचे. बरोबरच्या तिघांच्या वस्तू सांभाळायला घेतल्या आणि आजूबाजूला फेरफटका मारायचे ठरवले. नरेंद्र सरोवर पाहाणे हुकल्याची रुखरुख राहून गेलीच. तिन्ही सोबत्यांचे भ्रमणध्वनी संच माझ्याकडे असल्यामुळे एकटा जाऊन पाहून देखील येऊ शकत नव्हतो. असो.

मंदिरापासून बस तशी बरीच दूर, किमान साताठशे मीटर तरी, उभी होती. जवळजवळ बकाल शहर. रस्तारुंदीकरण वगैरे कामे चालू असल्यामुळे बकालपणात भर पडलेली. अर्धा तास फिरलो. मंदिराबाहेर पेढ्यांची, मिठाईची, शोभेच्या विविध वस्तूंच्या दुकानांची जत्रा होतीच. कृष्ण सुभद्रा बलराम यांच्या तीन मूर्तींचा संच, चित्रे सर्वत्र होती. घाईघाईने खिसापाकीट सांभाळत गर्दीपासून दूर बसकडे गेलो. उन्हात फिरून कंटाळा आला. एक चहा घेतला आणि बससमोरच रस्त्याकडेला एका बंद दुकानाच्या पायरीवर सावलीत बसलो. तेवढ्यात आमच्या बसमधले एक जोडपे बाजूला येऊन बसले. सौ. मुस्लीम व श्री. हिंदू होते म्हणून ते दोघंही आत गेले नव्हते. सौं.च्या कपाळाला कुंकू नव्हते. नवराबायको दोघंही तसे फाटकेच दिसत होते. कर्तृत्ववान मुलाने त्यांना पर्यटनाला पाठवले होते. खोलीला अडीच हजार दिवशी असलेले चकचकीत हॉटेल पण आरक्षित केले होते. हे सांगतांना मुलाबद्दलचे कौतुक दोघांच्याही चेहर्‍यावरून ओसंडत होते. सौं.ची हिंदू देवदेवतांवर श्रद्धा पण होती. मग टिकली कुंकू लावून मंदिरात का गेला नाहीत असे मी भोचकपणे विचारलेच. पकडले गेलो तर काय या भितीने गेले नाहीत म्हणाले. मला काही ते पटले नाही. पोकळ सबब वाटली. बोललो नाही पण चेहर्‍यावरचे भाव मी लपवले नाहीत. त्यांना नातवासाठी खेळणे घ्यायचे होते. मी फेरफटका मारतांना त्याच रस्त्यावर समोरच्या पदपथाशी जवळजवळ दहा मिनिटांवर एक दुकान पाहिले होते. त्यांना बसल्या जागेवरूनच दाखवले. ते खरेदीसाठी गेले. नातू देवळात जातो की नाही ते विचारावेसे वाटले पण विचारले नाही.

अनोळखी रस्त्यावर मला तसा कधी कंटाळा येत नाही. वाहनांचे, वाहने कशी चालवतात त्याचे, पादचार्‍यांचे, दुकानदारांचे, टपर्‍यांवरच्या गिर्‍हाईकांचे निरीक्षण करीत बसलो. तासभर कसा गेला कळले नाही. उन्हे उतरायला सुरूवात झाली. नंतर तासदीडतास बसमध्ये बसायचे म्हणून पाय मोकळे करायला उठलो. काही पावले चालतो न चालतो तोच आमच्या बसमधले मार्गदर्शक, चालक आले. तेवढ्यात मंदिरात गेलेले बसमधले इतर लोक पण परत येऊ लागले. मंदिराता पूर्वी असायची ती घाण दुर्गंधी आता नाही असे कळले.

तिथून पुरीचा सोनेरी समुद्रकिनारा अर्थात गोल्डन बीच. भल्यामोठ्या फेसाळणार्‍या लाटांनी वातावरण जिवंत केलेले.
पुरी गोल्डन बीच

पुरी गोल्डन बीच

किनारा तसा बर्‍यापैकी प्रशस्त रुंद. पण तुलना केली तर तसा अनाकर्षकच. असे दिसते की समुद्र जमिनीत घुसून किनारा चंद्राकृती झाला की दोन्ही बाजूंना जमिनीची माडांची भरगच्च गर्दी असलेली टोके आत घुसलेली असली, थोडेफार खडक समुद्रात दिसत असले तरच तो सुंदर दिसत असावा. तसे दृश्य पाहायची मला कोकण्याला सवय. इथे विविध कोनातून पाहिले तरी किनार्‍याचे सौंदर्य काही दृष्टीस पडेना. कोकण, गोवा, केरळ वगैरे किनार्‍यापुढे हा अगदीच फिका वाटला. मग उन्हे उतरल्यावर मावळतीच्या गहिरंगात हा किनारा कसा दिसेल त्याची कल्पना करू लागलो. विक्रेत्यांची गर्दी, कोलाहल अजिबात नसल्यामुळे स्वप्नरंजन मस्त झाले. एका चित्रवाणी वाहिनीवरचा एक कार्यक्रम आठवला. या किनार्‍यावर एक कलाकार असतो. बहुधा नाईक आडनाव त्याचे. पहिले नाव विसरलो. तो वाळूत मस्त शिल्पे बनवतो. मोठ्ठी मोठ्ठी प्रचंड आकाराची. लार्जर दॅन लाईफ. रंगसंगती साधून बसवलेल्या देखण्या, विविधरंगी शंखशिंपल्यांनी सालंकृत. शंकराचे एक शिल्प त्या कार्यक्रमात दाखवले होते. वेगवेगळ्या छटांच्या शंखशिंपल्यांनी सजलेले ते शिल्प डोळ्यासमोर उभे राहिले. शंकराच्या गळ्यातील सर्पाच्या अंगावरचे खवले शिंपल्यांनी बनवले होते. त्या सर्पाच्या शरीराची वळणे, तो जिवंतपणा, असे वाटावे की आत्ता शंकर पापण्यांची हालचाल करेल आणि तो सर्प वळवळ करेल. चित्रवाणीच्या त्या कुशल, सराईत कॅमेर्‍याने सफाईदारपणे सारे काही अचूक मनसोक्त टिपून दाखवले होते. तो कार्यक्रमच नजरेसमोरून सरकला. मलिष्का नावाची संचालिका होती त्या कार्यक्रमाची. स्वतःची शिल्पकला विकसित करायला, कसबात अधिकाधिक सफाई आणायला, विविधरंगी विविध आकारांचे आकर्षक शंखशिंपले गोळा करायला त्या शिल्पकाराने किती कष्ट घेतले असतील. त्याची शिल्पकलेची आसक्ती किती तीव्र असेल! केरळ्कोकणगोव्याशी तुलना न करता निर्लेप मनाने असेल त्या वेगळ्या निसर्गसौंदर्याची नजरलूट करावी हे खरे. ते शिल्प, तो शिल्पकार किनार्‍यावर कुठे दिसतो का ते पाहायला थोडा इकडेतिकडे भटकलो. पण काहीच दिसले नाही. सुदैवाने सहपर्यटक आपसात गप्पा मारत होते. त्यामुळे माझी तंद्री मोडायला कोणी आले नाही. स्वप्नरंजनात मश्गुल असतांनाच बसकडून बोलावणे आले. एकदोन अनुत्साही वीरांचे तर सागरतीरी न येता बसमधेच निद्रादेवीशी प्रणयाराधन सुरू होते. त्या अपरिचितांचे प्रकाशचित्र काढावेसे वाटले पण शिष्टाचार आडवे आले.

पोहोचेपर्यंत अंधार पडला. अर्धा तास आराम करून ताजेतवाने होऊन भोजनार्थ बाहेर पडलो. पण त्याआधी चिल्काचे आरक्षण करायचे होते. स्थानकाकडे गेलो. फलाटाच्या तिकीटाला बरीच गर्दी. तिकीट न घेताच रेलवे स्थानकावर गेलो. उत्साही कार्यतत्पर कृष्णाने हसतमुखाने स्वागत केले. चिल्कासाठी आलेले आम्ही पहिलेच होतो. पर्यटक जमले नाहीत तर महामंडळाची फेरी रद्द होईल. पण आरक्षणाचे पैसे ताबडतोब रोख परत मिळतील. मी योग्य दरात टॅक्सी वगैरे पाहून देईन, काळजी करू नका म्हणाला. चौघांचेही जीव भांड्यात पडले. भांडे बरेच मोठे असणार नाहीतर जीवतरी चिंटे असणार. पैसे घेऊन पावती दिली. पण भरपूर खाऊन जा म्हणाला. चिल्काला काही मिळेल न मिळेल. मोतीबिती अजिबात घेऊ नका. हमखास फसवणूक होते म्हणाला.

आता भोजन. काल संध्याकाळच्या हॉटेलात मला जायचे होते. तसे मी बोललो पण. पण तिथे गर्दी नसल्यामुळे आजही अन्न ताजे मिळेल याची खात्री नाही असे मत बाळ्याने व्यक्त केले आणि काल दुपारच्या गुजराती मालक असलेल्या उडुप्याकडे नेले. बाळीने पण त्या दिशेने निघतांना नाक मुरडले. इडलीडोसे वगैरे पदार्थच खाल्ले. गोड गाभ्याचा केकसदृश पदार्थ कालचाच दिसत होता. कापून विकला गेल्यामुळे आकार थोडा कमी झालेला. कालचा असल्यामुळे मागवला नाही. रस्त्यात आईसक्रीम खायचे ठरले. पाण्याच्या बाटल्या घेतल्या पण दोघे पुढे दोघे मागे असे झाल्यामुळे आईसक्रीम राहूनच गेले. आईसक्रीमची दुकाने मागे पडली खरी पण आता चौघे एकत्र आल्यावर चेष्टामस्करीला ऊत आला होता. पाच मिनिटांचे अंतर रमतगमत अर्ध्या तासात चालून खोलीवर येऊन चिल्काच्या जालावरून साभार उचललेल्या माहितीची उजळणी केली आणि झोपी गेलो.

क्रमशः

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

18 Oct 2013 - 6:12 pm | अनिरुद्ध प

वर्णन नेहमीप्रमाणेच!!!!!!!!!!!!

खरं म्हणजे तुम्ही देवळात जायला हवे होते .त्याचे वर्णन हुकले ना !पुजा न होणारी देवळे (बदामि ,ऐहोळे )असली की मला बरे वाटते शांतपणे पाहाता येते .पौराणिक कथा इथे लिहिल्यात ते फारच छान .मलिष्काच्या It happens only in India ,Discovery channel कार्यक्रमात ती छेनाची मिठाई दाखवली होती तोच तुमचा गोड केक असावा .

सुधीर कांदळकर's picture

19 Oct 2013 - 6:38 am | सुधीर कांदळकर

प्रतिसादकांस धन्यवाद.
@कंजूसः या देवळात पूजा होते. सध्या रांग असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव इतरत्र रेंगाळता येत नाही. सुरक्षा रक्षक लगेच हाकलून देतात. त्यामुळे न जायचे ठरवले. पुन्हा जाणार आहे. मनसोक्त फिरण्याचा व्यवस्थित परवाना काढूनच. धन्यवाद.