उद्या दि. ०९ ऑक्टोबर ला जागतिक टपाल दिवस आहे. त्यानिमित्त पूर्वी आपला समाज संदेश दळण- वळण कामी ज्याची मदत घ्यायचा त्या दूरसंचार अर्थात POST खात्याची आठवण आली. नुकतेच पोस्ट खात्यातून तार ही संदेशांची देवाण घेवाण करणारी १८३८ मध्ये सुरु झालेली सेवाही बंद झाली. त्यावेळी अतिशय वाईट वाटले. आज सगळीकडे इलेक्ट्रिक मिडियामध्ये झालेल्या क्रांतीमुळे मोबाईल, फेसबुक, इंटरनेट मुळे होणारा तातडीचा संपर्क आणि या सर्वांमुळे मिळणाऱ्या सुविधा आपल्याला हव्याहव्याश्या वाटतात परंतु या सर्व संपर्क सुविधांमध्ये कालबाह्य होत चाललेला आणि आपल्या हळव्या आठवणीतला - पोस्टातून रोज त्याच्या अचूक वेळेवर येणारा पोस्टमन, त्याची ती पत्रांची खाकी पिशवी, त्याच्या सायकल च्या दांडीस अडकवलेली खाकी दांड्याची मोठी छत्री, ते १५ पैश्याला मिळणारं साधं पत्र, अंतर्देशीय पत्र, बंद पाकीट, कर्र कट… कर्र कटक…. ह्या सांकेतिक भाषेत पाठवलेली अणि अचूक वेळेवर तातडीने मिळणारी तार, वेळेवर पोहोचणारी मनीओर्डर यांची आवर्जून आठवण या तारखेला झाली. गावामध्ये पोस्टमन येण्याच्या वेळेनुसार किती वाजले असतील हे पारावर बसलेले लोक सांगायचे. पूर्वी सरकारी कार्यालयाबाहेर किंवा डाक घराबाहेर पत्र लिहून देणारे सुशिक्षित बेरोजगार लोक बसून लोकांची पत्र लिहून देत असत. त्या कुणीतरी पाठवलेल्या पत्रातून येणारा त्याच्या सहवासाचा सुगंध आजच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये हरवलेला दिसतो. आज फेसबुक वरून आपल्या मुलाचा किंवा अप्ताचा फोटो पाहून त्या फोटोला आपण "लाईक" करतो, किंवा त्याच्याशी ऑनलाईन च्यटींग करतो, मात्र पत्रातील मजकूर वाचून, त्यातील अक्षर पाहून मुलाचे मस्तक चुम्बल्याची जाणीव कोणे एके काळी हे टपाल किंवा पत्र करायचे हे कदाचित आता सांगून पटणार नाही. "हं… खरंच गेले ते दिवस… राहिल्या त्या आठवणी… !"
पण मला तुम्हाला एक आवाहन करायचं आहे "संस्कृती हरवली" किंवा "गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी" म्हणण्यापेक्षा उचला पुन्हा दौत / टाक किंवा पेन आणि आपण ज्याच्यावर आपुलकी, माया किंवा प्रेम करतो त्या आपल्या हक्काच्या माणसाला आपल्या गावी असणाऱ्या आपल्या मित्राला, नातेवाईकास, आपल्या परिवाराला एक साधं किंवा आन्तर्देशीय पत्र लिहा !
(मी स्वतः वरील सर्वांना पत्र लिहणार आहेच मात्र हे करूनही मी उद्या माझ्या नोकरीच्या ठिकाणापासून जवळ जे पोस्ट कार्यालय असेल तिथे जाऊन पोस्ट कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यास एक गुलाब पुष्प द्यायचा संकल्प केला आहे. )
- साजीद पठाण
दह्यारी (सांगली)
प्रतिक्रिया
8 Oct 2013 - 3:22 pm | कपिलमुनी
बर्याच वर्षात पत्र लिहिला नचाच्या, उद्या प्रयत्न करतो !
8 Oct 2013 - 3:49 pm | अनिरुद्ध प
आठवण तसेच उच्च सन्कल्प ,शुभेच्छा.
8 Oct 2013 - 3:59 pm | आतिवास
संकल्प चांगला आहे; तो पूर्ण व्हावा यासाठी शुभेच्छा.
किंचित अवांतरः मध्यंतरी काही कामानिमित्त पोस्टकार्ड लिहिली. तेव्हा आधी पोस्ट ऑफिस शोधताशोधता नाकी नऊ आले. एका मैत्रिणीने तिच्या घराजवळच्या पोस्ट ऑफिसातून कार्ड तर खरेदी करुन दिली; पण नंतर ती टाकायला माझ्या परिसरात पोस्टाची पेटी शोधायलाही श्रम करावे लागले. किती कमी लोक (माझ्यासह) आता पोस्ट खात्याच्या सेवेचा उपयोग करत आहेत हे त्यानिमित्ताने लक्षात आलं.
अजून चार पोस्टकार्ड पडून आहेत घरात. पण आता ती ज्यांना लिहायची त्यांना फोन करुन अथवा ई-मेलवरुन आधी त्यांचा 'पोस्टल अॅड्रेस' विचारावा लागेल आता :-)
8 Oct 2013 - 8:34 pm | मुक्त विहारि
परिवर्तन हा स्रुष्टीचा नियम आहे.
मी तरी ह्या नव्या आणि वेगवान सेवेवर जास्त खूष आहे.
9 Oct 2013 - 2:13 pm | विजुभाऊ
साजिद भाउ पोस्टमनला फुल द्यायचा उपक्रम स्तुत्य आहे.
टपाल खाते आता कात टाकतय्.भारतीय टपाल खाते आता ब्यांकेची भूमिका साकारणार आहे. तसे झाल्यास प्रत्येक पोस्ट ऑफिसात बँकेची सेवा मिळेल. यामुळे शहरी भागात फार फरक पडेल असे नाही मात्र ग्रामीण भागात क्रांती येईल हे नक्की.
9 Oct 2013 - 2:31 pm | प्रसाद गोडबोले
अतिषय स्तुत्य उपक्रम !!
अभिनंदन !!
खरच पत्र लेखनाच्या इतक्या आठवणी आहेत की काय सांगु ?आजच्या मुहुर्तावर ह्यावर एक लेख पाडावा म्हणतो
9 Oct 2013 - 8:34 pm | पैसा
दिलीत का फुलं? चांगला नॉस्टॅल्जिक लेख. मात्र अजून खेडेगावात पोस्टाची सेवा तेवढीच आवश्यक आहे. याची आपल्याला शहरात बसून कल्पना येणार नाही. पण मोबाईल नेटवर्कसुद्धा चालत नाही. लँडलाईन फोन महिन्याचे २० दिवस बंद असतो, अशी खेडेगावे अजून बरीच आहेत.
9 Oct 2023 - 7:46 pm | अनिकेत वैद्य
जागतिक टपाल दिनाच्या हर्दिक शुभेच्छा
11 Oct 2023 - 9:41 pm | चौथा कोनाडा
लेख आवडला.... छान लिहिलंय !
अश्या जुन्या गोष्टी आठवल्या की हळवं व्ह्यायला होतं !
तुमच्या स्तुत्य उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा !
जागतिक टपाल दिनाच्या हर्दिक शुभेच्छा