इंग्लिश मिडियम!! कशाला??

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
8 Oct 2013 - 3:05 am

गेल्या आठवड्यात एकदा रस्त्यावरून चाल्लो होतो तेव्हा रस्त्याच्या पलिकडच्या बाजुने एक हत्ती जात होता(लोकांकडून त्याच्या माहुतासाठी पैसे आणि स्वत:साठी खायला जे काय मिळेल ते मिळवत...). माझ्या समोरुन मला एक आई तिच्या लहान मुलीला घेऊन येताना दिसत होती. ती आपल्या मुलीचं लक्ष त्या हत्तीकडे वेधत होती. तेवढ्यात त्या गजराजाने भर रस्त्यात भलामोठ्ठा प्रसाद दिला. तशी ती बाई मोठ्ठ्याने आपल्या मुलीला म्हणाली, ‘‘ते बघ शर्वरी, एलिफंटने शीऽऽ केली!!’’ मला त्या हत्तीचा ताजा पो बघून वाटली नसेल एवढी किळस त्या बाईचं वाक्य ऐकून वाटली. ही कसली पद्धत मुलांना इंग्लिश शिकवायची? आणि नाहीतरी त्यांना इंग्लिश मिडियमात घातलंच आहे तर मग शाळेत शिकतील की ती इंग्रजी. निदान एरव्ही बोलताना तरी सरळ मातृभाषेत बोला. आमच्या इथल्या एका काकूबाईंना आपल्या मुलीला, ‘‘हे बघ स्टडी कर नाहीतर गॉड तुला पनिश करेल हा!’’ असा दम भरतानासुद्धा ऐकलंय मी. हे सगळं ऐकल्यावर आधी पोट धरुन हसायला येतं खरं, पण नंतर त्याबद्दल विचार केला की तितकंच वाईटही वाटायला लागतं.

माझी आजी नेहमी म्हणते, की माणसाने बोलताना एकाच कोणत्यातरी भाषेत बोलावं. मराठीत बोलताना मराठीत, इंग्रजीत बोलताना इंग्रजीत. एका भाषेत बोलताना उगाच दुसऱ्या भाषेचे शब्द वापरू नयेत. मला ते नेहमीच पटत आलेलं आहे.

इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही, पुढे आयुष्यात सुद्धा त्याला काही त्रास होणार नाही, तेव्हा आपण त्याला इंग्लिश मिडियममध्येच घालूया... आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण करुया!! असं ठरवून आजचे आई-बाबा मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतायत. त्यात आपल्या धन्य सरकारच्या शिक्षणविषयक धन्य धोरणांमुळे मराठी माध्यमाच्या शाळांची धुळधाण उडत चाल्लीये, आणि परिणामी मराठी माध्यमात घालायची ईच्छा असूनही केवळ मराठी शाळांमध्ये नीट शिकवलं जात नाही, अशा समजूतीमुळे नाईलाजास्तव(किंवा ते निमित्त पुढे करून) आई-बाबा आपल्या प्रिय पाल्याला इंग्लिश मिडियममध्ये टाकतात.
मग मुलाच्या कल्याणाची सुरुवात होते. सुरुवात केजीपासून(आजकाल खरं तर प्ले ग्रूपपासून...) होते. मराठी माध्यमातला, शिशुवर्गातला, जुनाट वाटणाऱ्या साध्या रंगसंगतीच्या गणवेशातला शेंबडा मुलगा फुकटात किंवा नगण्य किंमतीत शिक्षण घेत असतो. आणि इंग्रजी माध्यमातला, पॉश युनिफॉर्ममधला, केजीतला, स्मार्ट दिसणारा(त्याला शेंबूड येत नाही वाटतं) मुलगा शिक्षण घेण्यासाठी वर्षाचे किती रुपये मोजत असतो? जास्त नाही, फक्त 60-70 हजार!! हो, फक्त केजीसाठी साठ-सत्तर हजार मोजणारे पालक आहेत आज, इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपल्या मुलाने शिकावं अशी ईच्छा असते ना त्यांची! त्याने त्यांची किंवा त्यांच्या मुलाची कुली सोन्याची होत असावीत, त्याशिवाय केजीसाठी एवढे पैसे मोजण्यात काय अर्थ आहे, हे मला कळत नाही. इतकंच नाही, या केजीतल्या मुलांना होमवर्क सुद्धा असतो म्हणे!! अहो, तिसरीपर्यंत मला गृहपाठ या शब्दाचा अर्थच माहिती नव्हता, आणि या मुलांना सरळ केजीपासून होमवर्क?? काय? तर अक्षरं गिरवा वगैरे... त्यासाठी या मुलांची ट्युशन्स घेणारी मंडळीसुद्धा आहेत बरं का! केजीत शिकवण्या?? एक काळ असा होता की शिकवणीला जावं लागलं, की मुलं लाजेने ओशाळून जायची. बरं या शिकवण्यासुद्धा शाळेचे शिक्षक फुकटात घेत असतील. आणि आता केजीसाठी ट्युशन्स?? वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी, मुलांच्या बोटांच्या हाडांची रचना/वाढ तरी पूर्ण झालेली असते का? अशा स्थितीत त्यांना गाढवासारखी गिरवागिरवी करायला लाऊन त्यांच्या बोटांच्या रचनेची वाट नाही का लागणार?
मला आठवतंय तेवढं शिशुवर्गात मी असताना आम्हांला नुसती अक्षरओळख करुन दिली होती. चित्रं दाखवून प्राण्यांची ओळख करुन दिली जायची. आणि असाच काहीतरी साधा-सोपा, शिशुवर्गाला साजेलसा अभ्यासक्रम असायचा. अभ्यास कसला, नुसती धम्माल होती सोमवार ते शुक्रवार रोज दोन तास फक्त. केजीत कुणी नापास व्हायचं नाही, आणि कोणी करुही नये.

आता प्रायमरीत जाऊया. पहिलीत आल्यानंतर माझ्या हातात आधी पाटी-पेन्सिल आली. त्या पाटीवर अर्धा-एक महिना सराव केल्यानंतर वही-पेन्सिलशी ओळख झाली. तेव्हा आधी आम्हांला, //??!’()+-<

अशी चिन्हं काढायला शिकवलं. त्यानंतर बाराखडी, मग पुढचं सगळं. प्राथमिक शाळेत अगदी पहिल्यापासून हात व्यवस्थित जोडून (अंगठे सुद्धा बोटांच्या रेषेत सरळ ठेऊन) याकुंदेंदुतुषारहारधवला चालीत म्हणायची सवय लावली गेली. स्तोत्रांना वार दिले गेले होते. मंगळवारी प्रणम्यशिरसादेवं, शनिवारी भीमरूपी महारुद्रा; दहा मनाचे श्लोक आणि सगळी रामरक्षा हे आम्ही रोज म्हणत असू. त्यामुळे उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि शुद्ध व्हायला मदत झाली. दुसरीत गेलो तेव्हा पहिलीपासूनच मराठी माध्यमाच्या शाळांमधून इंग्रजी विषय सुद्धा शिकवण्याची योजना अंमलात (काळाची गरज नाही का!) आली. तेव्हा चौथीपर्यंत इंग्रजीची फक्त तोंडी परीक्षा घेतली जाऊ लागली. लेखी माध्यमिकमध्ये गेल्यावर. मी म्हणे आधी जरा बोबडा होतो. पण प्राथमिक शाळेत आल्यानंतर माझी वाणी, माझे उच्चार व्यवस्थित सुधारले. सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही, पण इंग्रजी माध्यमात गेलेल्या आणि तोतल्या राहिलेल्या बऱ्याच मुलांना पाहिलंय मी. त्यांच्या घरी कोणी तोतरं नाही किंवा त्यांची जीभही मुळात जड नाही. तरीही ही बोबडेपणाची अडचण! कशामुळे? कारण ज्या वयात शुद्ध-स्पष्ट बोलायची सवय लावायला हवी, त्या वयात हाय-फाय आणि स्टायलीश शैलीची इंग्रजीच फक्त काय ती शिकवली गेल्याचा हा परिणाम!

माध्यमिक शाळेत गेल्यानंतर तर आनंदीआनंद होता. तरी मराठी माध्यमात आल्यामुळे कधीही अभ्यासात पाठी पडायची वेळ आली नाही. इंग्रजी हा तर माझा सर्वात लाडका विषय होता. पण मी माझी ही इंग्रजीविषयीची आवड अभ्यासापुरतीच मर्यादित ठेवली. कोणी म्हणालं, तुझं ठीक आहे रे, तू हुशार आहेस म्हणून निभावून नेलं. म्हणजे?? मूल मूळातच हुशार असलं, तर मराठी काय आणि इंग्लिश मिडियम काय, ते अभ्यासात चमकेलच... त्यावर भाषेच्या माध्यमाचा फारसा परिणाम होत नाही. उलट जर एखाद्या मुलाची बौद्धिक पातळी कमी असली, तर त्याला तो स्मार्ट होईल, या आशेने इंग्लिश मिडियममध्ये घालणं घोडचूक ठरतं. उलट त्यांना मराठी माध्यमातून शिक्षण घेणं सोप्पं जातं. याचा अर्थ मराठी इंग्रजीच्या तुलनेत सोप्पी आणि म्हणून थुकरट आहे असा होत नसून, त्यामागचं कारण ‘कोणत्याही व्यक्तिला कधीही कोणतीही गोष्ट आपल्या घरी बोल्ल्या जाणाऱ्या आपल्या मातृभाषेतून समजावली, की लवकर लक्षात येते; तीच गोष्ट परकीय भाषेतून समजावणं अवघड जातं’, हे आहे. त्यामुळे बौद्धिक पातळी कमी असणारी मुलं जर इंग्लिश माध्यमात गेली, तर मराठीत राहून पडली नसती एवढी मागे पडतात, लहानपणातच ताणतणावाने हैराण होतात, प्रसंगी त्यांचं मानसिक संतुलनही बिघडण्याचा संभव असतो. आणि याची जिवंत उदाहरणंसुद्धा मी पाहिलीयत. पण आपल्या मुलाची बौद्धिक पातळी कमी आहे, हे कोणता पालक म्हणायला तयार होईल? तेही तो मुलगा अवघा चार वर्षांचा असताना? अशावेळी आपल्या बौद्धिक पातळीवरून मुलाच्या बुद्ध्यांकाचा अंदाज बांधून निर्णय घेतला, तर तो मुलाच्याच हिताचा ठरतो नाहीका?

याचा अर्थ सगळ्या ढ मुलांनी मराठीत जावं, आणि हुशार मुलांनी इंग्रजीत, असा अजिबात होत नाही. हुशार मुलांनी सुद्धा मराठीतच जायला हवं. कारण तेच, सवयीच्या भाषेतून शिक्षण घेतल्याने त्यांना इंग्रजी माध्यमात मिळाला नसता एवढा वाव मराठीतून शिक्षण घेतल्याने मिळू शकतो. आणि मराठीला कैवारी हवाच नाहीका?

वाचनाची आवड सगळ्यानाच नसली, तरी बऱ्याच मुलांना असते. वाचणारी मुलं वाचतातच. वाचनाच्या सवयीत इंग्लिश-मराठी माध्यम हा मुद्दा येत नाही. पण मराठीतून शालेय शिक्षण घेतलेली, आणि मराठीबरोबरच इंग्लिश पुस्तकं वाचणारी मुलं बरीच दिसतात. त्याउलट, इंग्लिशमधून शालेय शिक्षण घेतलेली, आणि वाचनाची आवड असलेली मुलं, ही मराठी पुस्तकं वाचताना कमीच आढळून येतात. अर्थात, ठरावीक घरांच्या इतर संस्कारांमुळे यात अपवाद आढळून येऊ शकतात, पण तरीही ते कमीच...

‘अहो पण पुढे कॉलेजात गेल्यावर इंग्लिश फाडफाड बोलणाऱ्या मुलांमध्ये आमच्या मुलाला कॉम्प्लेक्स येईल त्याचं काय?’ काही होत नाही. कॉम्प्लेक्स येत नाही असं माझं म्हणणं नाही, मलाही आला होता. पण साता-समुद्रापार राहणाऱ्या गोऱ्या चामडीच्या ज्या डुकरांनी माझ्या देशाला सतत दिडशे वर्षं लुबाडलं, त्या लोकांची भाषा फाडायला मला जमत नाही, याविषयी यत्किंचितही लाज बाळगावी असं मला वाटत नाही. याउलट इंग्रजीतून शिक्षण घेणाऱ्या मुलांची अवस्था, निदान सांस्कृतिकदृष्ट्या तरी खूप वाईट असते असं माझं स्पष्ट मत आहे. ङ म्हणजे ड वर डॉट, आणि ञ हे ज सारखं काहीतरी अक्षर आहे असा समज; ळ, ण चे चुकीचे उच्चार; स्त्रीलिंगी-पुल्लिंगी असा काही भेदभाव न करता सगळ्या शब्दांना सरळ नपुंसक करुन टाकणे; सामान्यरूप, विभक्तीप्रत्यय कशाशी खातात हे माहिती नसल्याने गहूची पोळी, विज्ञानची वही असे शब्दप्रयोग हे या मुलांमध्ये हमखास दिसून येतात आणि ही मुलं स्वत:चं यामुळे वेळोवेळी हसं करून घेतात. अर्थात अशा मुलांची संख्या आज हसणाऱ्यांपेक्षा जास्त असल्याने त्यांना काही फरक पडत नसावा.

उदाहरण दिल्याशिवाय माझंच समाधान होणार नाही म्हणून एक किस्सा सांगतो. एकदा शाळेच्या मधल्या सुट्टीत आमच्या इंग्रजी माध्यमाच्या मित्रांबरोबर आम्ही मराठी मिडियममधली मुलं गप्पा मारत उभी होतो. एक इंग्रजीचा मुलगा सारखं, ‘माझी चुकी नाही, तुझी चुकी आहे’ असं म्हणत होता. शेवटी मला न राहवून मी म्हटलं, ‘अरे, चुकी नाही रे, चूक! चुकी हे सामान्यरूप झालं!’ तर तो मुलगा ‘तेच रे ते! काय फरक पडतो?’ असं म्हणाला. मी म्हटलं, ‘सॉरी बाबा, तुला समजवायला गेलो ही माझीच मिस्टूक झाली!’ तसे सगळेजण एकसुरात ‘मिस्टेक!!!’ असं ओरडले. मी लगेच ‘तेच रे ते! काय फरक पडतो?’ असं म्हटल्यावर हशा पिकला.

नुकत्याच आई झालेल्या माझ्या काही मावश्यांना मी 'काय? मराठी मिडियम ना?' असं विचारलं, की 'शीऽऽऽऽऽ मराठी काय??' असं ब-याचदा ऐकावं लागतं. मराठी शाळांचा दर्जा खालवतोय, तेव्हा मराठीसाठी असलेल्या कळवळ्यापोटी आपल्या मुलांचं आयुष्य का बर्बाद करु, असा विचार करुन जर इंग्रजीत घालत असाल, तर विचार जरा बदला. आज तुम्ही मुलांना मराठीत घालून एक उत्तम उदाहरण लोकांसमोर ठेवलंत, तर आणि तरंच उद्या मराठी शाळांसाठी मागणी वाढेल. तुमच्या मुलांना मराठीचे कैवारी करा, तुमची मुलं चमकतीलच, मराठीही चमकू लागेल.

भाषामत

प्रतिक्रिया

हुप्प्या's picture

9 Oct 2013 - 10:48 pm | हुप्प्या

भाषेचे रुप कसे बदलते आहे ह्यावर दोन घटकांतील संघर्षाचा परिणाम होत असतो. एक जुन्या वळणाचे, भाषा टिकवण्याचा प्रयत्न करणारे, आपल्याच भाषेतील प्रतिशब्द बनवायचा प्रयत्न करणारे आणि दुसरे सर्रास नव्या शब्दांची आयात करणारे.
मला तरी सर्रास परक्या शब्दांची आळसापोटी वा अज्ञानापोटी केलेली आयात भयंकर वाटते.
डिफिकल्ट, एलिफंट, एक्झाम, गॉड तुला पनिश करेल अशा शब्दांची रेलचेल असलेली मराठी जास्त समृद्ध आहे का?
इंग्रजीने आपले असलेले शब्द सोडून परके शब्द आयात केले आणि आता तेच रुळले आहेत अशी किती उदाहरणे आहेत?

इंग्रजी शब्दांचा भरमसाठ वापर मराठीची प्रकृती बिघडवतो आहे हा मूळ मुद्दा होता हे आणि तो मुद्दाही मान्य. पण काही प्रतिसादांतून (भाषेच्या शुद्धाशुद्धतेचा?) एक वेगळा अंतःप्रवाह जाणवला. मराठी शाळांमधून दिले जाणारे शिक्षण हे दर्जेदार नसते आणि शिकवणार्‍यांचे मराठीही दिव्य असते असा काहीसा कल दिसला, त्याचा प्रतिवाद करायचा होता. आपण किंवा आपले आईवडील जी भाषा शिकलो ती त्याच रूपात पुढल्या पिढीपर्यंत पोचणे कठिण आहे. पन्नास वर्षांपूर्वी मराठीत मोर थुई-थुई नाचत असे, आता तो तकथैयाथैया नाचतो. कारंजे आता थुईथुई उडत नाही. जे शब्द किंवा संस्कृती आसमंतातून सतत आपल्यापर्यंत पोचत असतात तेच डोक्यात दृढ होतात. आता पंचवीस वर्षांपूर्वीचे शब्द, संस्कृती यांचा मारा आज आपल्यावर का होत नाही हा प्रश्न आहे. आजची पिढी वेगवेगळ्या भवतालांना फार वेगाने सामोरी जाते आहे. पूर्वी जे अवकाश १०० % मराठी आणि आपल्या संस्कृतीने व्यापलेले असे तसे आज नाही. आपल्या परिघामध्ये इतर अनेक गोष्टींचा शिरकाव झाला आहे आणि त्या प्रमाणात मूळ भाषा,संस्कृती बाहेर फेकली जात (डिस्प्लेस?) आहे. पेल्यात पाणी ओतले की त्यातली हवा बाहेर पडावी, तशी. त्यामुळे सध्याचे युग हे सरमिसळीचे युग बनले आहे आणि काही काळतरी ते तसेच राहील.

आशु जोग's picture

9 Oct 2013 - 9:10 pm | आशु जोग

मात्र हेही नमूद करण्यासारखे आहे की २० व्या क्रमांकावर असलेल्या आणि ७ कोटींची (१.०६ % ) मातृभाषा असलेल्या तमिळच्या भाषिकांएवढा भाषाभिमान मराठी भाषिकांत नाही.

तमिळ लोकांना हिंदी शिकवलीच जात नसल्याने झक मारत त्यांना तमिळ भाषाभिमान वगैरे गोष्टी कराव्या लागतात. हिंदी येत नसल्याने बाहेरच्या राज्यात त्यांची मानसिक कोंडी होते. आता तर तमिळ भाषाभिमान वगैरे मागे पडलाय. हे लोक हिंदीचे क्लास बिस लावतात. बंगळूरात हाफिसांमधेही या लोकांच्या आग्रहाखातर हिंदीच्या शिकवण्या चालतात.

आशु जोग's picture

9 Oct 2013 - 11:26 pm | आशु जोग

इंग्लिश पोटापाण्यासाठी आवश्यक हॅ हॅ हॅ.

पुण्यातल्या कोणता आय टी वाला हापिसात इंग्लिशमधे बोलतो. मीटींगचे टेबल असो नाहीतर जेवणाचे कुणीही आपले मराठी सोडत नाही. पुण्यात आय टी ची अधिकृत भाषा मराठी आहे.

कपिलमुनी's picture

10 Oct 2013 - 12:51 pm | कपिलमुनी

_/\_

मराठी आय टी माणूस

पैसा's picture

10 Oct 2013 - 12:42 am | पैसा

माझे २ पैसे. मी १० वी पर्यंत मराठी माध्यमात आणि पुढे इंग्लिश माध्यमात शिकले. कुठेही काहीही प्रॉब्ळम आला नाही. कॉन्व्हेंटमधे शिकलेल्या पोरांचे दिव्य व्याकरण पाहून आमच्या इंग्लिशच्या सरांनी त्यांची कशी बिनपाण्याने केली ते अजूनही लक्षात आहे. आम्ही भावंडे साधारण ५ वीत गेल्यानंतर म्हणजे इंग्लिश, हिंदी शिकायची सुरुवात झाल्यानंतर माझ्या आईवडिलांनी मुलांसाठी असलेली इंग्लिश पुस्तके, मासिके आमच्यासाठी आवर्जून आणायला सुरुवात केली. तशीच चांगल्या हिंदी लेखकांची पुस्तकेही आम्हाला वाचायची गोडी लावली. परिणामी कोणतीही भाषा कमी किंवा जास्त महत्त्वाची वगैरे आम्हाला कधीच वाटली नाही.

इंग्लिश बोलण्याबद्दल अजिबात न्यूनगंड बाळगू नका. गोव्यात रस्त्यावर फिरून शाली विकणार्‍या बायका पण फॉरीनर्सबरोबर इंग्लिशमधे बोलून शाली विकतात. महाराष्ट्रातून गोव्यात आल्यानंतर आम्हाला समोरचा माणूस ज्या भाषेत बोलतोय त्या भाषेत बोलायला काही त्रास झाला नाही. गोव्यात आणि बेळगाव भागात उलट काही मंडळी मराठीच्या "आक्रमणाला" भितात. तरी माझ्या मुलांना गोव्यात असलेली प्राथमिक शिक्षण मराठीत, तेव्हा एक विषय इंग्रजी आणि ५ वी पासून इंग्लिश माध्यम ही पद्धत मला सर्वात योग्य वाटते. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत घ्यावे याबद्दल कोणत्याही तज्ञाचे दुमत असू शकणार नाही. अर्थात ज्यांची मातृभाषा इंग्लिश आहे त्यांनी त्या भाषेत प्राथमिक शिक्षण घ्यावे हीही ठीक.

गोव्यात जेव्हा शिक्षणाचे माध्यम इंग्लिश असावे की की मराठी की कोंकणी असे पालकांकडून लिहून घेतले तेव्हा ६०% लोकांनी मराठी माध्यम पाहिजे असे लिहून दिले. त्यात सर्व थरातले आणि घरांत कोंकणी बोलणारेही लोक होते. मात्र कोकणी भाषा पाहिजे म्हणणार्‍यांची संख्या अगदी थोडी होती.

मराठी भाषा अशी मरणार वगैरे नाही. ती भीती कोंकणीसारख्या अगदी थोडे लोक बोलतात त्या भाषांना आहे. मात्र आधी इंग्लिश शिकायचे आणि मग त्यातले शिकायचे हे मुलांना नक्कीच कठीण जाईल. उदा. गवत म्हटलं की ५ वर्षाच्या मुलाला माहित असतं. ते कसं लिहिलंय एवढंच त्याला पुस्तकात शिकावं लागेल. मात्र मराठी घरातल्या इंग्लिश माध्यमाला गेलेल्या मुलाला अधी ग्रास हा शब्द म्हणजे गवत हे शिकावं लागेल आणि मग ग्रास कसं लिहायचं हे शिकावं लागेल. आपल्याला जे सोयिस्कर वाटेल ते करावं. पण त्यात मुलांना जड जातंय का याचाही विचार करावा. घरात आईबाप दोघांनाही इंग्लिश येत नाही, पण मुले मात्र हौसेने इंग्लिश माध्यमात घातली आहेत, मग त्यांचा होमवर्क करून घेण्यासाठी त्यांना नर्सरीपासून शिकवणीला पाठवायचे हा हास्यास्पद प्रकार पुण्यात पाहिला. त्या पालकांना साष्टांग नमस्कार!

अनिरुद्ध प's picture

10 Oct 2013 - 11:24 am | अनिरुद्ध प

माझ्या माहिती प्रमाणे कोकणी हि बोली भाषा आहे लिपी मात्र देवनागरी आहे.(चु भु दे घे )

पैसा's picture

10 Oct 2013 - 11:46 am | पैसा

याबद्दल खूप वाद झाले आणि होतील. पण केन्द्रीय साहित्य अकादमीने कोंकणीला १९७५ साली स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता दिली आणि केन्द्र सरकारने २० ऑगस्ट १९९२ ला पास केलेल्या घटनादुरुस्तीप्रमाणे कोंकणी ही स्वतंत्र आणि अधिकृत भाषा म्हणून ८ व्या परिशिष्टात समाविष्ट केली.

कोंकणीला स्वतःची अशी लिपी नाही. मात्र प्रामुख्याने देवनागरी आणि रोमी या २ लिप्या वापरल्या जातात. त्याशिवाय कन्नड, मल्याळम आणि अरेबिक लिपीही तुरळक प्रमाणात कोंकणीसाठी वापरल्या जातात.

सुनील's picture

10 Oct 2013 - 12:10 pm | सुनील

तसे पाहिले तर, मराठीलातरी स्वतःची अशी लिपी कुठे आहे?

एक मोडी होती ती बाद केली. आता संस्कृतची देवनागरी - थोडा बदल करून - वापरतो झालं!! नै का?

:)

जरा जास्त माहिती मिळाली तर आवडेल्,म्हणजे कि प्राक्रुत भाषा म्हणजे काय्?ज्ञानेश्वरी हा ग्रन्थ मोडी लिपित लिहिला आहे का? तत्सम माहिती दिलीत तर उत्तम.

सुनील's picture

11 Oct 2013 - 6:06 am | सुनील

प्राक्रुत भाषा म्हणजे काय्?

माहीत नाही बॉ!

ज्ञानेश्वरी हा ग्रन्थ मोडी लिपित लिहिला आहे का?

साक्षात ज्ञानेश्वरांच्या हस्ताक्षरातील ग्रंथ पाहिल्याचे भाग्य लाभले नाही आजून!

बाकी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मल्याळम, गुजराती, बांग्ला किंवा उडिया ह्या भाषांना जशी खास स्वतःची म्हणता येईल अशी स्वतंत्र लिपी आहे, तशी मराठीची कोणती, ते सांगितलेत तर आमच्या ज्ञानात थोडी भर पडेल!!

असो.

तशी शक्यताच नाही कारण हल्लीच धनाजीराव यान्च्या धाग्यात ती श्री ज्ञानेश्वरानी सान्गितली आणि सच्चिदानन्द बाबानी लिहिली असे जाणवते.

पिशी अबोली's picture

10 Oct 2013 - 11:18 pm | पिशी अबोली

+१
बोली आणि भाषा यांच्यातील सीमारेषा ठरवणारे कोणतेही ठोस शास्त्रीय निकष नाहीत.. जे काही ढोबळ स्वरुपातील आहेत, त्यावरुन सध्याच्या स्वरुपातील कोंकणी मला नक्कीच 'भाषा' वाटते. पण तिला हट्टाने बोलीच म्हणायचे असेल तर दाखवण्यापुरते पुरावे मिळवणे काही अवघड जाणार नाही. आणि त्यांचा प्रतिवाद करणेही तितकेच सोपे असेल. थोडक्यात, हा वाद घटनेच्या आधाराने सोडवणं सोयीस्कर आहे...

आणि पैसाताई म्हणतात त्याप्रमाणे, मराठी मृत्युपंथाला लागली म्हणून जी ओरड चालू असते ती अनाठायी आहे. खरी भीती कोंकणीसारख्या छोट्या भाषांना आहे. एकीकडून इतिहासाने लादलेलं पोर्तुगीजचं आक्रमण, दुसरीकडून जागतिकीकरणाची इंग्रजी , आणि तिसरीकडून शेजारच्या मोठ्या राज्याची मराठी अशा स्थितीत सापडलेल्या कोंकणीला आणि तशाच लहान-सहान भाषांना टिकवण्याची खरी गरज आहे...

प्रभाकर पेठकर's picture

10 Oct 2013 - 9:56 am | प्रभाकर पेठकर

लेखकाची भावना तळमळीची आहे पण मांडणी जरा आततायीपणे झाली आहे असे वाटते.

मातृभाषेचा अभिमान असावा, प्राथमिक शिक्षण, अवांतर वाचन, घरातील संभाषण मातृभाषेतच असावे. हिन्दी आणि इंग्रजी ह्या सुद्धा महत्त्वाच्या भाषा आहेत. जगात बहुसंख्य देशांमध्ये इंग्रजी चालते. उच्च शिक्षणात इंग्रजी भाषेचे ज्ञान नक्कीच उपयोगी ठरते. भाषेच्या ज्ञानात ती लिहीता, वाचता, बोलता येणे आवश्यक असते. प्रभावीपणे व्यक्त होण्यासाठी त्या भाषेचे ज्ञान अत्यंत गरजेचे असते. उच्च शिक्षणात म्हणूनच इंग्रजी भाषेचे महत्त्व आहे. असो.

आजकाल, दूरचित्रवाणींच्या मराठी वाहिन्यांवर बोलले - लिहीले जाणारे, मराठी कधी कधी अंगावर काटा आणणारे असते. 'आम्ही अमुक अमुक प्रकरणाचा 'भांडाफोड' केला', 'आजची ब्रेकींग न्यूज अशी आहे' वगैरे वगैरे मराठी (?) वाक्यांचा सर्रास उपयोग केला जातो. हळू हळू नव्याने मराठी शिकणार्‍या मुलांना तेच खरे मराठी वाटू लागते.

दूसर्‍या भाषेतील शब्द स्विकारल्याने भाषा संमृद्ध होत जाते असा प्रतिवादही केला जातो. पण आपल्या भाषेत चपखल शब्द असताना दूसर्‍या भाषेतील शब्द वापरण्याचा करंटेपणा का करावा? आपल्या भाषेत आधीच रुळलेले शब्द जसे स्टेशन, पेन, बॉलपेन इ.इ.इ. वापरू नका असे माझे म्हणणे नाही. पण विस्मृतीत जाणारे चांगले शब्द वापरात ठेवून भाषा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सतत करीत राहावा असे मला वाटते.

मराठीत आधीच अनेक उर्दू, फारसी, अरबी शब्द आहेत, बोलीभाषा - प्रमाणभाषा इ.इ. वादात न पडता जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे मराठीचाच आग्रह प्रत्येक मराठी माणसाने धरावा.

तात्पर्य, इंग्रजी ही अनेक कारणांनी महत्त्वाची भाषा आहे तेंव्हा ती शिकाच त्याच बरोबर मातृभाषेची कासही सोडू नका. दोन किंवा अधिक भाषांवर प्रभुत्व असणे अशक्य नसते.

त्यांच्या घरी कोणी तोतरं नाही किंवा त्यांची जीभही मुळात जड नाही. तरीही ही बोबडेपणाची अडचण! कशामुळे? कारण ज्या वयात शुद्ध-स्पष्ट बोलायची सवय लावायला हवी, त्या वयात हाय-फाय आणि स्टायलीश शैलीची इंग्रजीच फक्त काय ती शिकवली गेल्याचा हा परिणाम!

हे जरा जास्तच झालं. याचा अर्थ आंग्ल भाषा हि "शुद्ध-स्पष्ट" नाही वाटतं. आपल्या तर्का नुसार सगळे ईंग्रज हे बोबडे असायला हवेत. संभाषण सफल होत असल्यास भाषेचा अट्टहास का? आज किती लोकांना ज्ञानेश्वरी मधली मराठी समजते? जसं नदीला अनेक नद्या येउन मिळतात आणी ती मोठी होत जाते तसंच भाषेचं ही आहे. शुद्धतेचा टेंभा मिरवुन आपण आपली दारे इतरांसाठी बंद करायची आणी मग ती कुणी बोलत नाही म्हणुन कांगावा करायचा.

मराठीला विरोध नाही माझा पण तसाच इंग्रजीला किंवा इतर कुठ्ल्या भाषेला ही नाही कारण भाषेचं दळणवळण हेच एकमेव उद्दीष्ट आहे असं माझं शुद्ध-स्पष्ट मत आहे.

खरे सान्गायचे तर मला आलेले अनुभव असेच आहेत्,खास करुन जे गोरे लोक भारतात येतात त्यान्चे उच्चार खरेच समजत नाहीत ईतके कधी कधी अस्पष्ट असतात्,तेव्हा आम्ही बर्याचदा pardon please असे म्हणावे लागते,नाहीतर शेवटी notepad चा उपयोग करावा लागतो.

ग्रेटथिन्कर's picture

10 Oct 2013 - 11:55 am | ग्रेटथिन्कर

भाषा ही प्रवाही असते, सोइचे असेल तर मी मिंग्लिशही बोलु शकतो .सर्व भाषांचे कॉकटेल होउन नवीन भाषा तयार झाली तरी चालल. काहीजण संस्कृत भाषा आम्हाला येते असे छातीबडवून नेटवर सांगत फिरतात ,प्रत्क्षतात संस्कृत मृतभाषेकडे वाटचाल करत आहे.

घरातली म्हातारी खपत नाही म्हणून सांभाळायची ,असे या भाषांचे व जुन्या गोष्टींच्या बाबतीत चालले आहे.

उद्दाम's picture

10 Oct 2013 - 3:58 pm | उद्दाम

प्रत्क्षतात संस्कृत मृतभाषेकडे वाटचाल करत आहे.

संस्कृत मृतभाषाच आहे. आता अजुन कसली वाटचाल करणार?

गृहपाठ : आमच्या घराबाहेरच्या गटारी तुंबलेल्या आहेत, त्या स्वच्च करण्यासाठी नगरपालिकेला संस्कृतात पत्र लिहून दाखवा.

मुक्त विहारि's picture

12 Oct 2013 - 12:55 pm | मुक्त विहारि

अरे व्वा!!!!

हे असे कसे काय करतो गड्या तू?

जरा आमच्या संदेशाला पण उत्तर दे ना....गड्या...

उपास's picture

10 Oct 2013 - 7:23 pm | उपास

पेठकर काका म्हणतायतत तसंच, हे लिखाण थोडं भावनेच्या आहारी जाऊन/ आततायिपणे झाल्यासारखं वाटतय. अशी चर्चा चालू असते तेव्हा माझ्या मनात संस्कृतविषयी कायम येतं, ते असं - "माझी आजी/ आजोबा म्हणायचे, संस्कृत देवांची भाषा आपलं बरचसं धार्मिक लिखाण संस्कृत मध्ये आहे ती भाषा आलीच पाहिजे. सुदैवाने मी संस्कृत वाचता येईल, बाहेरच्या श्लोकांचा अन्वय लावता येईल इतपत्(च) शिकलो. इतर व्यवधानांमध्ये वेळच नव्हता शिवाय संस्कृत्ला स्कोरिंग करता येते असा ठ्पका.. त्यामुळे शालेय जिवनात संस्कृतकडे बघण्याचा माझा, बरोबरीच्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा 'स्कोरिंग' हाच साचेबद्ध दृष्टीकोन. सुदैवाने आम्हाला शिक्षक चांगले मिळाले, गिरगावात दाजी भाटवडेकर तेव्हा संस्कृतमधून नाटकं करायचे, ते वातावरण मिळालं. पण पुढे पुढे संस्कृती संपर्क तुटलाच. जगाच्या पाठीवर जी अनेक पुस्तक घेऊन फिरतो त्यात ती हंसाचं चित्र असलेली धातुरुपावली असते तेवढीच काय ती. अर्थात संस्कृतवरच्या प्रेमाखातरच! उतारवयात पुन्हा नव्या उमेदीने संस्कृत शिकण्याचा विचार आहेच, बघूया......

आता ह्या पार्श्वभूमीवर, मी मुलास मराठी पकडून ठेवायला सांगायची, की संस्कृत की मग मोडी. त्याला जगात स्वतःच्या पायावर उभं राहायला (सुतारकामासरख्या गोष्टी करुन नव्हे तर तंत्रज्ञाम, सशोधन वगैरे करुन) तर विकेपिडिया, गुगल सर्च लहान वयात वापरता येऊन त्यातील माहितीचा फायदा घेण्यासाठी इंग्लिश अपरिहार्य आहेच, मग अशात, प्रेमापोटी मराठीही शिकवणारच त्याला पण संस्कृतला जागा आणि वेळच कुठाय! जशी मी मोडी लिपी लिहू शकलो नाही तसा तो किंवा त्याची पुढची पिढी, संस्कृतपासून लांब जात राहील आणि ते आपल्याला स्विकारायलाच हवं. पण तरिही जोपर्यंत मराठि ही महाराष्ट्र राज्याची भाषा आहे तोपर्यंत तरी तिला मरण नाही हे नक्की! आता तिचं वळण इतर भाषांच्या आक्रमणात बदलेल पण त्यात काही नविन नाही, अगदी इंग्रजी सुद्धा स्थल कालापरत्वे बदलतच आहे की. असो!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Oct 2013 - 10:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

मराठी भाषेवर होणार्‍या इतर भाषांच्या, विशेषतः इंग्रजीच्या आक्रमणाची भिती वाटणार्‍यांनी हा इंग्रजीचा इतिहास जरूर वाचावा.

मुक्त विहारि's picture

10 Oct 2013 - 10:48 pm | मुक्त विहारि

मस्त लिंक

ठांकू...

उपास's picture

15 Oct 2013 - 2:16 am | उपास

मातृभाषा आणि तीन पिढ्या विचारात घेउण मंगला गोडबोलेंनी ह्यावेळच्या चतुरंग मध्ये लिहिलेय, त्याची लिंक
जुनी विट नवं राज्य..

प्यारे१'s picture

15 Oct 2013 - 7:39 pm | प्यारे१

काय ठरलं मग?
मुळात काही ठरलं का?