लेखाची संकल्पना मिपावरील एका लेखावरून...पण शेवट थोडसा बदलून
शनिवार दि. ७ सप्टेंबर २०१३ वेळ दुपारची.
मी आपला मस्त पैकी भरतेट जेवून झोपलो होतो.आमची वामकुक्षीचीच वेळ ती. त्या प्रगाढ झोपेच्या काळात आम्हाला कूणीही त्रास देत नाही.(अगदी मोबाईल वाले पण..त्यांना एकदा हिसका दाखवला आहे)तरी पण त्या दिवशी रिंग वाजली ती वाजलीच.आता कोणाची तरी शामत आली असणारच.जशी पहिली रिंग वाजली तशी बायको लगेच(अक्षरश: धावत पळत) मोबाईल घेवून जवळ आली.
अशा भांडाभांडीची संधी ती कधीच सोडत नाही.स्वतः त्यात सामील होणार नसली तरी भांडण ऐकायला आणि हमरातुमरी पहायला तिची कधीच ना नसते.कधी कधी कंटाळा आला तर ती लोकलचा प्रवास करते,ते केवळ भांडण ऐकण्यासाठीच.बर्याच बायका ह्यासाठीच लोकलने प्रवास करतात असा हिचा तर्क आहे.फु़कटचा टाईमपास कुणाला नको असतो?नाही म्हटले तरी चाळीतली सवय जाणार अहे थोडीच.
मागच्याच तपात (हो, हो तपातच म्हण्जे १२ वर्षे झाली) ह्या अशाच वेळी (अवेळी) हिच्या काकांचा फोन आला होता.त्या वेळी त्यांच्याशी मी काय बोललो ते आता आठवत नाही पण ते बिचारे अजून पण मी दिसलो की रस्ता बदलतात.तेंव्हा पासून ही दुपारी मी झोपलो की. मोबाईल स्वतः कडे ठेवते. "तुम्हाला त्रास नको" असे म्हणते... पण कदाचीत तिला विषाची परीक्षा घ्यायची नसेल... मी पण तिच्या प्रस्तावाला होकार देतो आणि झोपेच्या अधिन होतो.
दुसर्या रिंगच्या वेळी हिने नांव बघितले.मि.पा. आणि पुढे काहीतरी प्र पासून होते.मि.पा. वर हिचा गेल्या १५/१६ महिन्यांपासुन जाम राग.(बाय द वे... ही मिपा ला सवतच समजते) आता कुठला तरी मिपा सदस्य माझ्या रागाला बळी पडणार आणि मग ती आग अशीच भडकत भडकत जावून आपला नवरा मिपाला सोडणार अशी अंधूकशी आशा तिला दिसायला लागली....शिवाय हिच्या माहेरच्या माणसांचा मी केलेला अपमान ती अद्याप विसरलेली नाही. आणि मग हिने मुद्दामच ३/४ रिंगा होवू दिल्या. (आपण कसे एखादा पदार्थ नीट शिजला नसेल तर परत कूकरला शिजायला ठेवतो आणि २ च्या जागी ४ शिट्ट्या काढून त्या पदार्थाची अजून वाट लावतो) अगदी तशाच प्रकारे हिने ४/५ रिंगा होवू दिल्या.
मी जरी प्रगाढ झोपेत असलो तरी, पहिल्या रिंग लाच मला जाग आली.दुसर्या रिंगला मी जरा कूस वळवली आणि बघितले तर आमची ही मोबाईल घेवून येत होती.तिसर्या ते पाचव्या रिंग पर्यंत हिचा चेहरा थोडसा हसरा ते जास्तच आनंदी झाला.बायकोला आनंदी अवस्थेत बघून माझ्यातला नवरा जागा झाला.
पुढचा संवाद असा
मी : कोणे ( अर्धवट झोप + बायकोचा आनंदी झालेला चेहरा बहून आलेला संताप + कंटाळले पण , असतांना मुखातून जे काही स्वर. व्यंजन येतील त्या सुरात)
बायको : आता तुम्हीच बघा ( आनंदी चेहरा + नवरा भांडतांना बघायला मिळणारा आनंद + सूड उगवल्याचे मिळणारे समाधान + त्या नंतर मिपा सुटल्यामुळे तिला मिळणारी शांती...अशावेळी जे काही शांतीचे सूर येतात त्याच सुरांत)
मी : दे ईकडे.धड वाचता पण येत नाही का?
बायको : तुम्ही कुणाच्या नावांने सेव्ह केला आहे ते मला काय माहित? नांव न टाकता कसे काय सेव्ह करता? मला लिहिता वाचता येतं म्हणून तर आपला संसार सुखाचा चालू आहे.नाहीतर तुम्ही लाखाचे १२ पैसे करायला तयार आहातच.
मी : दे इकडे.मीच बघतो.
बघितले तर मिपा कराचा फोन.आता मी फोन घेता घेता बायकोचा चेहरा बघायचा निर्णय घेतला. हे असे क्षण फार क्वचित येतात.मी मुद्दाम चेहरा गंभीर ठेवला आणि आवाजात भारदस्तपणा आणायचा प्रयत्न केला.हे नाटक वठवायला फार प्रयास पडले हो.एकमेव प्रेक्षक असतांना नटाला अभिनय करतांना जसे वाटत असेल तसेच वाटत होते.
मी : बोला
तो : हॅलो , काका मी प्रथम फडणीस
मी: अरे व्वा!!! बोल बोल... कसा आहेस? काय म्हणतोस?आज काल मिपावर का येत नाहीस?
ह्या पहिल्या ४ वाक्यांतच आमची ही चारी मुंड्या चीत झाली.
त्यावेळी झालेला हिचा चेहरा मी आजन्म विसरणार नाही. तुलना करायचीच झाली तर " अमर अकबर अँथनी " ह्या चित्रपटांत सगळ्यांत शेवटी जेंव्हा "जीवनला" समजते की हे तिन्ही भाऊ आहेत तेंव्हा झालेला त्याचा चेहरा + "जॉनी मेरा नाम" मधील देव आनंद आणि प्राण ह्यांच्या फायटिंगच्या वेळी (ऐन वेळी त्यांना समजते की आपण दोघे भाऊ आहोत.) त्या दोघांत झालेला समेट बघून "जीवनचा" चेहरा...आपुन तो वो सीन जिंदगीभर नही भुलेगा..वो सीन मतलब बायको के चहरे का रंग बदला ना वो सीन ...जीवन के सीन्स नहीं...
(मै खुष हुवा तो कभी-कभी हिंदी में बोलता है...हे मिपा के अॅडमिन मुझे माफ करदो...)
इथे बायकोची जरा पंचाईत झाली होती.ती आली होती भांडण बघायला आणि झाले भलतेच.पण मग तिने साळ्सूद पणाचा आव आणला आणि पुढील संभाषण ऐकू लागली.
प्रथम : अरे आज काल जास्त वेळ मिळत नाही.
मी : ठीक आहे.बोल काय काम काढले आहेस?
प्रथम : अहो काका. आपण परत एकदा जमणार आहोत.उद्या सकाळी.
मी : अरे व्वा !!! छान छान. कुठे आणि किती वाजता भेटायचे आहे?
ह्या तीन वाक्याने बायको तीन-ताड उडाली.तिचा चेहरा कसा झाला असेल ह्याची तुम्ही कल्पना केली असेलच...
प्रथम : उद्द्याच आणि १० वाजता.घरडा सर्कल जवळ.
मी : कोण कोण येत आहे? मी "भटक्या खेडवाला" ह्यांना पण बोलावु का?
प्रथम : मी नक्की येत आहे.तुम्ही पण या आणि येतांना "भटक्या खेडवाला" ह्यांना पण न विसरता घेवून या...
मग काय ... मी लगेच "भटक्या खेडवाला" ह्यांना फोन केला आणि मग दुसर्या दिवशी मी आणि त्यांनी कट्ट्याला जायचे ठरवले.तसेच घडले आणि कट्टा पार पडला.
मद्यपान न करता कट्टा झाल्याने बायकोच्या डोळ्यांतून आनंदाच्या जीवनधारा कोसळू लागल्या आणि त्यांत तो "अ अ अँ" वाला आणि "जॉ मे ना" मधला जीवनचा चेहरा वितळून गेला.
बाय द वे. मिपा हेच आता आमचे जीवन असल्याने बायकोने, मला पुढील कट्ट्यासाठी जायला आत्ताच परवानगी दिली आहे.
त्यामुळे लवकरांत लवकर पुढील कट्टा ठरवा.
प्रतिक्रिया
12 Sep 2013 - 11:01 pm | किसन शिंदे
आँ!! यात कट्ट्याचा वृत्तांता कमी, तुमच्या घरचाच वृत्तांत जास्त आहे. तो ही खुसखूशीत आहे म्हणा. ;)
बादवे कट्ट्याच्या वेळी मला डॉक्टरांनी केलेली तुफान फटकेबाजी जाम आवडली. :)
12 Sep 2013 - 11:06 pm | श्रीरंग_जोशी
मजा आली वाचताना.
पुढील कट्ट्याकरता शुभेच्छा!!
12 Sep 2013 - 11:07 pm | पैसा
सौ मुक्तविहारी मिपा मेंबर असल्या तर तो आणखी एक कट्टा झाला ना?
12 Sep 2013 - 11:22 pm | श्रीरंग_जोशी
सहज सुचलं, सौ मुक्तविहारी काय सदस्यनाम घेतील? कदाचित मुक्तिवाहिनी ;-).
13 Sep 2013 - 10:16 am | भ ट क्या खे ड वा ला
हे मुक्त विहरतात म्हणून..........
बद्ध बिचारी
12 Sep 2013 - 11:04 pm | पैसा
=))
12 Sep 2013 - 11:11 pm | अत्रुप्त आत्मा
कट्-ट्टा!
12 Sep 2013 - 11:35 pm | भ ट क्या खे ड वा ला
शत प्रतिशत सहमत
13 Sep 2013 - 6:08 am | स्पंदना
वरील राग तुम्ही कट्टा केलात म्हणुन, म्हणजे हमरेकु मिळ्या न्हय म्हणुन.
फार छान! बरे दुपारी घोरता तुम्ही?
लेखातली फटकेबाजी आवडली.
13 Sep 2013 - 6:39 am | मुक्त विहारि
कारण ज्यांना विचारावे त्या सगळ्या व्यक्ती, माझ्या आधीच गाढ झोपतात.
13 Sep 2013 - 7:02 am | मुक्त विहारि
तुम्ही भारतात आलात की डोंबिवलीला नक्की या.
आपण नक्की कट्टा करु..
13 Sep 2013 - 6:58 am | प्रचेतस
कट्टा नमन भारीच. आता इतर कट्टेकर्यांकडून इतरही किस्से येऊ द्यात.
13 Sep 2013 - 7:00 am | मुक्त विहारि
की,
मी थोडी सुरुवात करून देणार आणि इतर जमलीली मंडळी आपापले अनूभव लिहिणार, जेणे करून क्ट्ट्याला हजर असलेला प्रत्येक्जण व्रुत्तांतात थोडी फार भर घालेल.
13 Sep 2013 - 8:52 am | चौकटराजा
यावरून का कुणास ठाउक " पुन्हा प्रपंच " मधील मिसेस टेकाडे यांची आठवण झाली. मिसेस मुवि कदाचित कधीच कट्ट्याला येणार नाहीत पण मुविंच्या शब्द कौशल्यामुळे त्या लक्षांत रहातील . बाकी गुंडया भाउचा कोचा झाल्याने चिमण जसा विशिष्ट आवाजात हसतो तशी बायकोचा " जीवन" चेहरा पाहून मुवि हसताहेत "चिमण स्टाईलने" असे दृष्य दिसत आहे. !!
13 Sep 2013 - 9:32 am | नानबा
जसा मुविंना मी अचानक फोन केला, तसेच मलाही त्याच्या काही वेळ आधी कट्टा संयोजक आदरणीय स्पा साहेबांनी फोन करून या कट्ट्याची पूर्वकल्पना दिली. त्यांच्या गंभीर सूचनेनुसार मी मुविंना आणि इतर काही जणांना फोन केला, आणि रविवार कट्टा जुळून आला.
ठरलेल्या वेळेसाठी आवरा आवर चालू असताना डॉ. सुबोध खरेंचा फोन आला, आणि ते या कट्ट्याला येत असल्याचं सांगून त्यांनी कट्ट्याआधीच आमचा आनंद द्विगुणित केला.
मिपाचे अजून एक ज्येष्ठ सदस्य आदरणीय सूडसाहेबांनी इच्छित स्थानकात उतरण्यात काहीसा घोळ घातल्यामुळे त्यांच्या प्रतिक्षेत थांबलेले किसनराव आणि स्पा यांना पोहोचण्यास उशीर झाला हे सांगायला नकोच.
तो पर्यंत कट्ट्याच्या ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच एम.आय.डी.सी. मधल्या सेलिब्रेशन हॉटेलात डॉ. खरे, मुवि, भटक्या खेडवाला, लीलाधर, निम आणि मी पोहोचलो. आखाती देश, डॉलरची स्थिती अशा गंभीर विषयांवर चर्चासत्र चालू असतानाच सूड, किसन आणि स्पा येऊन थडकले आणि ऑफिशीयली कट्टा जमला.
डॉ. खरे असल्यामुळे भन्नाट गप्पा होणार हे नक्की होतंच, आणि झालंही तसंच. अनेक विषयांवर डॉ. खरेंच्या तुफान फटकेबाजीचा आणि सोबत ६ पहाडी ग्रिल सँडविचेस, २ पाव भाजी, २ कोल्ड ड्रिंक्स, एक कॉफी, एक कोक फ्लोट आणि एका बटरस्कॉच मिल्कशेकचा आस्वाद घेता घेता १.५-२ तास कसे गेले कळलंच नाही.
त्यानंतर बाहेर पडून पुन्हा असाच एखादा अचानक कट्टा जमवायचा प्लॅन झाला, आणि कट्टेकरी मंडळी आपापल्या घरांकडे परतली.
कट्टेकरी (समोरील रांगेत डावीकडून) - स्पा, मुक्त विहारी, भटक्या खेडवाला, डॉ. सुबोध खरे
कट्टेकरी (डावीकडून) - सूड, किसन शिंदे, लीलाधर, मी, स्पा.
पेटपूजेसाठी मागवलेल्यांपैकी (सुदैवाने फोटो काढण्यापुरते)शिल्लक राहिलेले पदार्थ..
गप्पा नाष्ट्याचा आस्वाद घेताना कट्टेकरी (डावीकडून) - मुक्त विहारी, भटक्या खेडवाला, डॉ. सुबोध खरे, निम, सूड.
13 Sep 2013 - 9:43 am | लीलाधर
डॉक्टर फ्रंटफुटवर येउन जी काही खेळी करुन गेले आहेत की अजून थांबलो असतो एखाद तास तर आणखी त्यांची फटकेबाजी पहायला आणि ऐकायला मिळाली असती... असो पुढील कट्टयाच्या प्रतिक्षेत असलेला...
प्रतिक्षित (लीलाधर)
13 Sep 2013 - 10:03 am | नानबा
+११११११११११
13 Sep 2013 - 11:24 am | भाते
डोंबिवलीकर मिपाहो, असे अचानक कुठेही जाहीर वाच्चता न करता कट्टा उरकल्यापद्दल तीव्र निषेध.
गेल्या वेळी डोंबिवली कट्टा झाला त्यावेळी मला मिपाचे सदस्यत्व मिळाले नव्हते. त्यामुळे तेव्हा फक्त एक वाचक म्हणुन त्या कट्टयाला येणे मला शक्य झाले नाही. त्यावेळी त्या कट्टयाचा सविस्तर वृतांत वाचून मनाचे समाधान करून घेतले होते आणि पुढील कट्टयाला नक्की जायचे असे ठरवुन सदस्यत्व मिळवण्यासाठी मालकांना (मा. नीलकांत) गळ घातली होती. पण नशिबाने यावेळीसुद्धा दगाच दिला. तुम्ही आपसात कट्टा ठरवुन जरासुद्धा खबरबात न लागु देता तो उरकुनदेखील टाकलात.
घरडा सर्कलपासून माझे घर अवघ्या दहा मिनिटांवर आहे. रविवारी ८ सप्टेंबरला सकाळी १० वाजता मला तेथे येणे सहज जमले असते. सर्व मिपाकरांना भेटण्यास ऊत्सुक असल्याने हा वृतांत वाचुन हळहळ झाली.
तेव्हा पुढील कट्टयाआधी जाहीर आमंत्रण देऊन आपणा सर्वांना भेटण्याची संधी द्यावी हि विनंती.
14 Sep 2013 - 9:04 am | नानबा
आम्हांला आधी कल्पना असती तर तुम्हांला नक्की बोलावले असते. असो, पुढल्या कट्ट्याला नक्की..
मु.विं.नी तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक मला व्यनि केलाय. त्यामुळे आता संपर्कात राहूच... :)
13 Sep 2013 - 5:08 pm | निनाद मुक्काम प...
भारत भेटीत डोंबिवली येणे होतेच तेव्हा कट्टा नक्की
लेख खुसखुशीत झाला आहे
मुक्तिवाहिनी हे खरेच चांगले नाव आहे
14 Sep 2013 - 1:16 pm | मुक्त विहारि
तुम्ही आलात की लगेच कट्टा करू..
13 Sep 2013 - 5:54 pm | सूड
वृत्तांत अगदी खुसखुशीत बरं का!! अचानक बोलवून चक्क दहा जण जमतील असं अजिबात वाटलं नव्हतं.