" कल्पना सर्व्हीसमध्ये आपलं स्वागत आहे सर, मी आपली काय सेवा करू शकतो ? "
" माझी सेवा नका करू हो, तुम्ही समाजसेवक नाही आहात, माझ्या तक्रारीचं काय झालं ? "
" कोणती तक्रार सर ? "
" मी गेले तीन दिवस फोन करून सांगतोय माझ्या नेटसेटरचा स्पिड कमी झालाय म्हणून"
" सर कृपया आपण शेवटचा रिचार्ज कधी केला हे सांगू शकाल का ? "
" ही तुमच्या नेटवर्क बद्दलची खात्री आहे की माझ्या जिवनरेषेबद्दल संशय ? "
" मी समजलो नाही सर"
" नाही, शेवटचा रिचार्ज असं विचारताय म्हणून म्हंटलं "
" त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो सर, पण मला पुन्हा एकदा आपला प्रॉब्लेम सांगू शकाल का ? "
" माझा नेटसेटर गेले तीन दिवस अत्यंत सावकाश चालतोय"
" सर आपण आपला पिसी चेक केला आहात का ? त्यात व्हायरस असेल तरी नेट स्लो होऊ शकतं "
" मी माझा पिसी तर चेक केलाच आहे पण तुमच्या नेटसेटरची दोन्ही बाजूची कव्हरही भिंगातून तपासलीत कुठे तुटली वगैरे नाहीत "
" सर नेटसेटरच्या कव्हर तुटण्याचा संबंध त्याच्या स्पिडशी नसतो "
" असं कसं ? समजा तुमच्या पायातली चप्पल तुटली तर तुम्ही धावाल की आहे त्यापेक्षा हळू चालाल ? "
" सर तुमच्या जवळपास तीन किलोमीटरच्या परीसरात कल्पनाचा टॉवर आहे का ? "
" आहे पण तुम्ही कितीही म्हणालात तरी आख्खा पिसी घेऊन मी त्या टॉवरवर चढू शकणार नाही"
" नाही सर, आपला नेटसेटर थ्रीजी आहे "
" म्हणजे तीन गावं फिरून येतं का नेटवर्क माझ्याकडे ? "
" सर, थ्रीजी म्हणजे थर्ड जनरेशन "
" मागच्या की पुढच्या ? मागच्या तीसर्या पिढीतला नेटसेटर असेल तर परत घेऊन जा, अचानक एक्सपायर झाला तर .."
" तसं नाही, कधी कधी वातावरणामुळे थ्रीजीच्या स्पिडवर परिणाम होतो, पाऊस वगैरे पडत असला तर.. "
" खरंच की, पाऊस पडत असताना नेट चांगलं चालतं हो, पण घेताना हे नाही सांगितलं की थ्रीजीची कनेक्टीव्हीटी पावसाच्या थेंबांनी मिळते "
" तसं नाही सर, वातावरण ढगाळ असलं की नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो कधी कधी "
" मग तर नाहीच चालणार, घरात पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून माझ्या घरातलं वातावरण कायम ढगाळच असतं "
" घरातलं नाही सर, मी ओव्हर ऑल वातावरणाबद्दल बोलतोय "
" अच्छा म्हणजे देशातल्या वातावरणाबद्दल, ते तरी कुठे धड आहे सध्या ? सगळं ढगाळ हो "
" सर देशातलं नाही हो, प्रत्यक्ष वातावरण जे तुमच्या खिडकीतून दिसतं ते "
" माझ्या खिडकीतून समोरच्या आज्जींचं घर दिसतं, पण त्याचं नांव साईकृपा आहे, `वातावरण' नाही काय "
" सर तुम्ही माझी चेष्टा करत आहात का ? "
" मी नाही तुम्हीच चेष्टा लावलेय माझी, नेटसेटर घेताना जाहिरात अशी केलीत की जणू याच्या सहाय्यानं मी भविष्य पाहू शकेन, पण इथे आजचं इमेल पहाता येईल की नाही याची खात्री नसते मला "
" सर, तुम्ही आमच्या सेवेबद्दल नाराज आहात का ? "
" नाही हो, उलट तुमच्यामुळे माझ्या नावावर थोडंफार पुण्य जमा होत असेल वरती, रोज `देवा आज तरी नेट सुरू असू दे' चा धावा केल्यानं "
" सर याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो "
" देवाचा धावा केल्याबद्दल तुम्ही दिलगीरी व्यक्त कशाला करताय ? ऑलरेडी माझ्या अकाऊंट मधे देवाचं दिलगिरीचं इमेल येऊन पडलंय, `इथे मी काही मदत करू शकत नाही' असं "
" सर, मी आपली अडचण समजू शकतो, मी ताबडतोब आपल्या तक्रारीची नोंद घेतो "
" पुढे ?? "
" पुढे काय ? सर ? "
" नुसती नोंद घेणार ? आणि नेटवर्क मिळत नसेल तर नंतर काय निषेध व्यक्त करणार आहात का ? "
" सर आपल्या माहितीसाठी सांगतो, आपला कॉल रेकॉर्ड होत आहे "
" काय सांगता ? एक काम करा, आपलं संभाषण मला ताबडतोब पाठवा, त्याचं काय आहे मी अजूनपर्यंत माझा आवाज फोनवर कसा येतो हे ऐकलेलंच नाहीये "
" या व्यतिरीक्त मी आपली काही मदत करू शकतो का सर ? "
" आहे हा प्रॉब्लेम न सोडवताच अजून एखादा प्रॉब्लेम यायची अपेक्षा करताय का ? "
" कल्पनामधे कॉल केल्याबद्दल धन्यवाद सर, आपला दिवस शुभ जावो "
शप्पत सांगतो त्यानं शुभ ऐवजी अशुभ म्हंटलेलं मला स्पष्ट ऐकू आलं. बरं आता आणखी कुठली वायरलेस इंटरनेट सेवा महाराष्ट्रात आहे हे सांगितलंत तर बरं होईल, कारण पुढची पोष्ट कदाचित दुसर्या कंपनीच्या नेट वरून टाकायची वेळ येईल माझ्यावर.
प्रतिक्रिया
28 Aug 2013 - 5:39 am | स्पंदना
किती तो संयम!
अगदी फ्रीझरमध्ये बसुन बोलत होता राव तो.
:)) :))
28 Aug 2013 - 9:26 am | लॉरी टांगटूंगकर
%) %) :| :| =] =]
28 Aug 2013 - 9:47 am | मनीषा
आयडियाची कल्पना भारी आहे.
:D
28 Aug 2013 - 10:02 am | माझीही शॅम्पेन
हा हा हा , आयडियचया कल्पना खुपच खुमसदार , मज्जा आली वाचून
28 Aug 2013 - 10:07 am | Mrunalini
हाहाहा... आवडेश... भारतात असताना नेट साठी नेहमी फोन करायला लागायचा... तेव्हा सुद्धा हे लोक माझ्या जाम डोक्यात जायचे.
28 Aug 2013 - 10:17 am | नानबा
भन्नाट लेखनशैली, खुसखुशीत विनोद... धमाल आली वाचायला.. :)) :)) :))
28 Aug 2013 - 10:21 am | कोमल
मस्त..
अगदी खुसखुशीत..
एक शंका -
बोलत होतं ते पाव्हनं पुन्याचं ए का वो?
28 Aug 2013 - 10:25 am | नानबा
कसलं करेक्ट वळखिलंस गं.... :))
31 Aug 2013 - 7:28 pm | चाफा
दोनपैकी एक पन पाव्हनं पुन्याचं नाहीत, कस्टमर केअर वाले असंच मराठी बोलतात आणि मी फारचं वैतागून फोन केलेला :)
28 Aug 2013 - 11:38 am | नित्य नुतन
Got an idea sirji...
एकदम खुसखुशीत .... दिवसाची सुरुवात चांगली झाली ..
28 Aug 2013 - 11:53 am | विटेकर
चान्गली आहे लेखन शैली आप्ली. पुलेशु
28 Aug 2013 - 12:16 pm | बासून्दी
कल्पनाचा ओपरेत्अरः थेवला एक्दाचा फोन!!!!! सदाशीव पेथेत्ला दिस्तोय
28 Aug 2013 - 12:34 pm | आदिजोशी
चांगला कल्पनाविलास
30 Aug 2013 - 12:07 pm | चिगो
कल्पनाविलास झक्कास.. पण तुमचा 'बीएसएनएल'वाला धागा जबराट होता.. त्याला तोड नाही.
5 Sep 2013 - 2:22 pm | मी-सौरभ
सहमत
30 Aug 2013 - 2:09 pm | कपिलमुनी
आत्म्या..
इथे तुझ्या हसून लोळण्याच्या स्मायल्या मिसतोय
31 Aug 2013 - 7:31 pm | चाफा
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद,
ही आमच्याकडची आयडियाची खरोखरची आवस्था आहे हो ! :(
31 Aug 2013 - 7:38 pm | यसवायजी
@ माझ्या खिडकीतून समोरच्या आज्जींचं घर दिसतं
लै हसलो.. :))
भारी लिवलय राव..
31 Aug 2013 - 7:47 pm | अग्निकोल्हा
हे साले सगळे असेच असतात. मध्यंतरी वायरफ्रि नेटचा चांगलाच खराब अनुभव घेतल्याने आपल्या दुखात सहभागी. अन संभाषणाला पुरेपुर दाद.
5 Sep 2013 - 2:10 pm | पैसा
लै भारी! पण माझ्याकडे संचारी ध्वनीयंत्रांच्या गलबल्यात "कल्पनाशक्ती" च फक्त चालते हो! "हवापुच्छ" तर कायम "कल्पने"वरच भटकत असतं! आता "बटाटा" चालतोय का बघा. मी मध्यंतरी त्यांना वैतागून तुमचा नंबर दुसर्या कंपनीकडे नेते म्हटलं तर मला ६ महिन्यांसाठी कॉल रेट्स कमी करून दिले. तेवढं सोडलं तर सगळे मेले इथून तिथून सारखेच!! आमच्या घरात "विश्वास" आणि "वडापाव" यांचेही नंबर्स घरातल्या सदस्यांकडे आहेत आणि कोणत्याही कॉल सेंटरला कॉल केल्यास यापेक्षा वेगळे संभाषण आजपर्यंत मला ऐकायला मिळालेले नाही हे इथे नमूद करते. तसंच त्या "तारामुक्त" जोडण्यांपेक्षा सर्कारी दूरसंचार ची तारायुक्त जोडणी बरीच बरी चालते हा अनुभव.
5 Sep 2013 - 5:40 pm | अनिरुद्ध प
+१ सहमत्,मुम्बैत म टे नि ली ची तारा जोडणी खरच उत्तम (स्वस्त आणि मस्त)
5 Sep 2013 - 2:16 pm | उद्दाम
माझ्याकडेही हेच असते. असेच सगळे संभाषण आमचेही झाले होते. शेवटी कंटाळून बी एस एन एल घेतले.
5 Sep 2013 - 5:13 pm | चाफा
ब्येसेनेल ला वैतागुन त्याचा पत्ता कट केला आणि एम टी एस घेतलं, पण ते अल्पायुषी निघालं नाईलाजास्तव कल्पनाकडे वळावं लागलं, परत बिएसएनएल कडे जावं तर ऑफीसात भिंतीवर ते उंदिरवालं मुक्तक चिकटवून ठेवलंय त्यांनी..गंमत म्हणून असेल पण लाज वाटते हो :(
5 Sep 2013 - 5:41 pm | अनिरुद्ध प
खुमासदार लेख पुलेशु.
5 Sep 2013 - 8:27 pm | गणपा
समोरचा मणुक्ष तुझं ईतकं बोलणं (सहन करत) ऐकत होता, त्या बद्दल त्याचा जाहीर सत्कारच करायला हवा. :)
6 Sep 2013 - 9:14 am | पाषाणभेद
खतरनाक. जाम मजा आली वाचतांना.