पाणी लाऊन हजामत
गुदस्ता पाऊस आलाच नव्हता
कुठं पडला, कुठं पडलाच नव्हता
पीक उगवलंच नव्हतं
जे उगवलं ते जगलंच नव्हतं
जे जगलं ते वाढलंच नव्हतं
जे वाढलं ते फ़ळलंच नव्हतं
निसर्गानंच केली होती! हजामत केली होती!! बिनापाण्यानं केली होती!!!
सरकार आलं होतं, मुठभर घेऊन आलं होतं
आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं होतं
घेन्न! आता कसं वाटsssssते?
आम्ही म्हणालो होतो
मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!
पण एक येडं होतं, सर्वांच्या पुढं होतं
मात्र ते मख्ख होतं, ते बोल्लंच नव्हतं
हात काही त्यानं पसरलाच नव्हता....!
औंदा मात्र पाऊस आला
जिकडेतिकडे कहर झाला
डोंगर-दर्या हुदडत गेला
छाती फोडून दरवाजा केला
उभं पीक वाहून गेलं
जे वाहवलं नाही ते दबून गेलं
जे दबलं नाही ते कुजून गेलं
जे कुजलं नाही ते सडून गेलं
जे सडलं नाही ते मरून गेलं
निसर्गानंच केली! हजामत केली!! पाणी लाऊन केली!!!
सरकार आलं, मुठभर घेऊन आलं,
आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं,
घेन्न! आता कसं वाटsssssते?
आम्ही म्हणालो,
मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!
पण एक येडं होतं, सर्वांच्या मागं होतं
हात काही त्यानं पसरलाच नाही....!
मात्र ते मख्ख नव्हतं, आता ते बडबडत होतं
स्वत:शीच पुटपुटत होतं
"च्यामारी! आयला!! च्यामायला!!
जवा-जवा पिकलं, भरमसाठ पिकलं
तवा-तवा ह्यांनी, सस्त्यामधी लुटलं
रुपयाचा शेतमाल चार आण्यात नेला
म्हून माहा धंदा घाट्यामंधी गेला
ह्यांच्यापायी लक्षुमीवर अवदसा आली
गावासंग ग्रामदेवता पुरी भकास झाली"
"हक्काचं टनभर सरकारवर लुटणं
कणभर मदतीची भीक मागत सुटणं"
"अरे छी! अरे थू!! असल्या जिंदगीवर
भिकंपरिस उपास बरा हक्क मिळेपावतर"
येडा असेल तो-तो, ’अभय’ बडबडत असतो
मात्र आम्हा शहाण्यांना फ़रक पडत नसतो
- गंगाधर मुटे
---------------------------------------------------