केस

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जनातलं, मनातलं
13 Jul 2013 - 7:11 pm

' केस '
10 April 2013 तारखेला 11:58 AM वाजता

डोक्यावरचे केस हा प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा भाग असतो. काही लोक निव्वळ केसांमुळे ओळखले जातात आणि प्रसिद्ध होतात. काही निव्वळ केस नाहीत म्हणून ओळखले जातात. अनेक सेलिब्रिटींचे केस हीच त्यांची ओळख असते. उदा. बच्चन, अनुपम खेर वगैरे. एपीजे अब्दुल कलाम आणि तत्सम महान लोक यांचा आपण इथे अपवाद करुयात. कारण हे लोक त्यांच्या कर्तृत्वाने जेवढे ओळखले जातात, तेवढेच त्यांच्या केसांमुळे ! समजा अनुपम खेर यांच्या डोक्यावर शोले चित्रपटातील बच्चनच्या केसांचे रोपण केल्यास कसे वाटेल ? आता आपल्याला पडलेला गहन प्रश्न असा आहे की ज्यांच्या डोक्यावर मनमुराद केस आहेत असे लोक झोपेतून उठल्यावर कसे दिसत असतील ???

पूर्वीच्या लोकांनी शिरस्त्राण वापरण्याची पद्धत डोक्याच्या रक्षणापेक्षा आपल्या झोपीव अवस्थेतली भयावहता आणि पारोसेपणा लपवण्यासाठीच सुरु केली असावी असा आपला दाट संशय आहे. एकतर पूर्वीचे लोक लांब केस राखत त्यात पुन्हा दाढीमिश्या वाढवत. ते किती भयंकर दिसत असतील, याचा कल्पनेनेच अंदाज करणे सुद्धा भयावह वाटते. म्हणजे एखाद्या राज्याची महाराणी जिने दासिंच्या मदतीने चांगले प्रहरभर केशसंभार केला आणि राणीला दुपारी झोपायची सवय असली तर त्या केसांची कशी वाट लागेल ? समजा ते केस वेगवेगळ्या कोनांतून मांजरासारखे ताठ झाले आणि इनबिटवीन एखादा गुप्तहेर परराज्यातून महत्वाची खबर घेऊन आला असता राणी याच म्हणजे रामसे बंधू फेम अवतारात समोर आली तर त्याची बोबडी अर्थातच वळेल.

ज्यांचा अत्यावश्यक सेवांमध्ये अंतर्भाव होतो असे लोक उदा. डॉक्टर्स , शास्त्रज्ञ, पुढारी वगैरे लोकांची मात्र केसांच्यामुळे भयंकर अडचण होते यात शंका नाही. म्हणजे बघा की रात्री पावणेचार वाजेला लांबलचक केस असणाऱ्या पुढाऱ्याला एखाद्या अत्यायिक मिटींगसाठी जावे लागले तर त्याचा अवतार कसा असेल ? केस लवचिक असणाऱ्या लोकांचे ठीक आहे. नुसता कंगवा फिरवला की भागते. पण ज्यांचे केस राजकारणात मुरून पार निबर झाले आहेत, त्यांचे बिचार्यांचे काय ? तरीही अजून एकदा सुद्धा कोणत्याच पंतप्रधान वा राष्ट्रपती किंवा तत्सम अतिमहत्वाच्या व्यक्तीचा भयावह फोटो आपण कधी पाहिला नाही, ही एकंदरीत फार मोठी गोष्ट आहे. याच कारणास्तव आपण असेही भविष्य वर्तवायला हरकत नाही, की ज्यांचे केस वेड्यावाकड्या अवस्थेत झोपूनही व्यवस्थित राहतात, अशा लोकांना राजयोग असतो !

खुद्द आपल्याबद्दल बोलावयाचे झाल्यास थोडक्यात सांगू का ? हं, ठीक आहे ! तर आपले स्वतःचे केस चांगले काळेभोर दाट आहेत पण झोपेत त्यांची अवस्था फार वाईट होते. अचानक रात्री दोन वाजेला मोबाईलची रिंग वाजली की समजावे पेशंट आला आहे. अशा वेळी केसांच्या आहे त्या स्थितीत जाणे म्हणजे आधीच आजारी असलेला पेशंट बेशुद्ध पडण्याचीच शक्यता जास्त. एकदोनदा आपण तसेच पेशंटला सामोरे गेलो असताना पेशंटचे नातेवाईक जाम घाबरले होते. असे प्रकार दोन चार वेळा घडल्यानंतर सदर पेशंटसनी आपल्याकडे बरेच दिवस येणे बंद केले होते. आपण त्यामुळे नंतर पेशंटचा फोन आला की सर्वात आधी केसांवर पाणी ओतून आणि व्यवस्थित भांग पाडून जात असतो. हिवाळ्यात मात्र ही अडचण येत नाही म्हणजे पेशंटचा फोन आला की आपण लगेच डोक्यावर माकडटोपी घालून पेशंटला तत्पर सेवा देऊ शकतो.पावसाळ्यात पाऊस सुरु असला की मग सुद्धा रेनकोटचा आणि क्यापचा फॉर्म्युला उपयोगी पडू शकतो ! आल्हाददायी वातावरण असताना, इमर्जन्सी असताना आणि वेळेचा अभाव असताना किंवा टोपी घालण्याचे प्रथमदर्शनी कोणतेच कारण नसताना आपल्याला कोणतेच शिरस्त्राण उपयोगी पडत नाही , तेव्हा काय करावे ? अशा वेळी आपल्याला आपल्या तमाम टकलू दोस्तांचा फार हेवा वाटतो ! ;-)

- डॉ. सुनील अहिरराव

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

पैसा's picture

13 Jul 2013 - 9:53 pm | पैसा

टक्कल करून घ्या! बाकी हा लेख भारी "रोमहर्षक" आहे खरा!

einstein

सस्नेह's picture

13 Jul 2013 - 9:57 pm | सस्नेह

केस अवघड आहे....!