२०१४ च्या निवडणूकीचे वेध आता सगळ्यांनाच लागले आहेत. तारखा निश्चित झाल्या नसल्या तरी निरनिराळया आघाड्यांवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत उत्सुकता आहे. पूर्वीच्या काळी देशात घडणार्या अनेक गोष्टींचे पुणे हे केंद्र असे. मागील काही काळात कलमाडी, प्रदीप रावत, विट्ठल तुपे, अण्णा जोशी असे खासदार पुण्याला मिळाले पण देशपातळीवर प्रभाव टाकेल असा खासदार पुण्याला मिळालेला नाही. भाईंचे नाव झाले तेही चांगल्या गोष्टींसाठी नाही. पण पुण्याची निवडणूक अनेक गोष्टींसाठी गाजते.
अण्णा जोशी विरुद्ध विट्ठलराव गाडगीळ अशी पहिली निवडणूक झाली. त्यात अण्णा ८००० मतांनी हरले.
पुण्यावर गाडगीळांचे वर्चस्व होते. पुढील निवडणूकीत पुन्हा अण्णा आणि गाडगीळ समोरासमोर आले.
यावेळी अण्णा १६००० मतांनी जिंकले. हा चमत्कार कसा झाला ?
काँग्रेस हाऊसवर कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यात पवार साहेबांनी नारा दिला 'गाडगीळ हटवा काँग्रेस वाचवा'. या घडामोडी मतदानाच्या अगदी काही दिवस आधीच्या. त्यावेळी 'सकाळ'चे सांज सकाळ नावाचे एक सायंदैनिक निघत असे. त्यात 'गाडगीळ हटवा काँग्रेस वाचवा' हे मोठ्या टायपात छापलेले होते. त्यादिवशी त्याच्या नेहमीपेक्षा जादा प्रती छापण्यात आल्या असाव्यात. त्या प्रती अण्णांच्या कार्यकर्त्यांना वाटण्यासाठी देण्यात आल्या होत्या. या सगळ्याचा निवडणूकीत अपेक्षित परीणाम झाला.
पवारांच्या पक्षाचे गाडगीळ पडले विरोधी उमेदवार जिंकला. पवारांपासून धोका त्यांच्या विरोधकांना नसून त्यांच्या मित्रांनाच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यानंतर पवारांनी याचा अनेकदा जाहीर इन्कार केला की आम्ही गाडगीळांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही.
(पवारांसारखा मुख्यमंत्रीपदावरचा माणूस अशा गोष्टी करतो त्याला आम्ही सामान्य लोक वजाबाकीचे राजकारण म्हणतो पवार त्याला बेरजेचे राजकारण म्हणतात)
पवार माढ्यात गेले आणि मोहीते पाटील पडले हाही एक योगायोग. पवारांचा धोका त्यांना आपले म्हणवणार्यांना.
असाच प्रकार २००९ च्या निवडणूकीतही झाला. पवारांचे कार्यकर्ते कलमाडींसाठी मनापासून काम करेनात. जाहीर भाषणात पवारांनी त्याबद्दल नाराजी प्रकट केली. पवारांनी कलमाडींसाठी पुण्यात सभा घेतल्या. "गरज पडली तर कलमाडींना निवडून आणण्यासाठी आपण पुण्यातच तळ ठोकू आपल्या मतदारसंघातही जाणार नाही" असेही पवार म्हणाले. एवढी मिट्ठास भाषा पाहून कलमाडी सावध झाले. आता गेम होणार हे नक्की. कारण गाडगीळांच्यावेळी कलमाडी पवारांबरोबरच होते. उघडपणे पाठींब्याची भाषा सुरू असली तरी मतदानाच्या आधी दोन दिवस एका वृत्तपत्रात पवारांचा नेमका उलट आदेश छापून आणला गेला. पण कलमाडींची डॅमेज कंट्रोल टीम तयारच होती. तिने या सगळ्या प्रती ताब्यात घेतल्या आणि दगाबाजीचा प्रयत्न हाणून पाडला. सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी हे परत एकदा सिद्ध झाले.
१९९८ च्या निवडणूकीत पवार काँग्रेसमधे होते त्यांनी कलमाडींना पक्षाबाहेर काढले. कलमाडी आधाराच्या शोधात होते. वास्ताविक पवार कलमाडी भांडणाचा फायदा उठवून भाजपने आपला उमेदवार निवडून आणायला हवा होता. पण पुणे शहर भाजपाने कलमाडींना पाठिंबा दिला. कलमाडींच्या पाठिंब्याचे तत्त्वज्ञान तयार झाले." देशाला गरज आहे, आपद्धर्म आहे. अटलजींचीच इच्छा आहे" अशी भाषा होऊ लागली. पण यावर भाजपच्या पुण्यातल्या परंपरागत मतदाराने अजिबात विश्वास ठेवला नाही. 'भाजप चालेल पण कलमाडी नको' अशी भाजपच्या मतदारांची मनस्थिती झाली.
कितीही बौद्धिके दिली तरी कलमाडी पचनी पडले नाहीत. विट्ठल तुपेंसारखा उमेदवार ९१००० हजाराने निवडून आला. भाजपच्या परंपरागत मतदारांनीदेखील काँग्रेसच्या तुपेंनाच जवळ केले असा अंदाज आहे.
पुढच्या वेळी १९९९ मधे लोकसभा, विधानसभा निवडणूका एकत्र होत्या. अटलजी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. पुण्यात भाजपचे प्रदीप रावत खासदार झाले. विधानसभेला भाजपला मिळालेल्या मतांपेक्षा लोकसभेला ४५००० मते अधिक मते पडली. याचा अर्थ खाली इतर पक्षांना मत देणार्या ४५००० मतदारांनी लोकसभेला मात्र भाजप अर्थात अटलजींनाच पसंती दिली होती.
अशा काही इतिहासात घडलेल्या गोष्टी. येणार्या उद्यासाठी महत्त्वाच्या ...
प्रतिक्रिया
20 Jun 2013 - 1:16 pm | अनुप ढेरे
छान माहिती...
20 Jun 2013 - 9:03 pm | श्रीरंग_जोशी
बर्याच गोष्टी प्रथमच कळल्या.
वॄत्तपत्रांतली एखादी (आदेशवजा) बातमी मतदानाच्या दोन दिवस अगोदर प्रसिद्ध झाल्याने पुण्यासारख्या मतदारसंघात निर्णायक बदल घडत असेल यावर विश्वास ठेवणे अवघड वाटत आहे.
पुढल्या निवडणूकीत काय होते याची उत्सुकता आहे.
20 Jun 2013 - 9:32 pm | आशु जोग
वॄत्तपत्रांतली एखादी (आदेशवजा) बातमी मतदानाच्या दोन दिवस अगोदर प्रसिद्ध झाल्याने
आदेश कोण देतो त्याला महत्त्व आहे. इथे पाठिंबा देणार्या पक्षाचा पक्षप्रमुख आदेश देतो आहे.
21 Jun 2013 - 6:03 am | स्पंदना
एकूण पवार साहेब बाहेरच्यांशी न लढता घरातल्यांशीच लढत बसतात म्हणा की.
हे पवार साहेब पुढे आले ते आमच्या निप्पाणीच्या तंबाखु आंदोलनातुनच ना? आम्च्या गावातुन दिवस उगवायला गाडीभर भाकर्या गेल्या आंदोलकांसाठी. गोळीबार झाला तेंव्हा उसाच्या सरीतून दोन तीन दिवसांनंतर लहान बाळ रांगत बाहेर आली. मेलेल्या आईबरोबर राह्यली होती ती आत. हा माणूस मात्र आज शेतकर्यांचीच वाट लावायला निघालाय. आम्हालाच भाकर्या महाग करुन ठेवल्या याने.
21 Jun 2013 - 2:43 pm | आशु जोग
हो ना