आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का ?

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
1 Jun 2013 - 1:11 am

हि १९९९ च्या मी महिन्यातील गोष्ट आहे.मी विशाखापटणमच्या नौदलाच्या कल्याणी या रुग्णालयात काम करीत होतो. कारगिलचे युद्ध ऐन जोरात होते. त्यावेळेला काश्मीरच्या लष्करी रुग्णालयात युद्धात जखमी झालेले जवान मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत होते त्यामुळे ती रुग्णालये(श्रीनगर, उधमपूर आणि जम्मू येथील) भरून गेली होती.त्यातून त्या जखमी रुग्णांचे नातेवाईक तेथे येऊ लागले होते. या सर्व गर्दीमुळे तेथील व्यवस्थेवर ताण पडू लागला होता. म्हणून आता नंतर येणाऱ्या रुग्णांवर जलदगतीने उपचार करण्यासाठी वैद्यकीय प्रशासनाने एक निर्णय घेतला कि जे जे जवान प्रवास करू शकणार होते आणि ज्यांची जायची तयारी होती. त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्या त्यांच्या मूळ राज्यातील लष्करी रुग्णालयात स्थानांतरीत करण्यात यावे. या प्रणालीत एक हवालदार श्रीनिवास राव म्हणून एक जवानाला (तेलुगु असल्याने) विशाखापटणमच्या नौदलाच्या कल्याणी या रुग्णालयात स्थानांतरीत(trasnfer) केले होते. हा श्रीनिवास राव पोटात गोळी लागल्याने श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात शल्यक्रिया करण्यासाठी आला होता. सुदैवाने त्याची जखम वरवरचीच होती त्यामुळे शल्यक्रियेत आत मध्ये फारशी हानी झालेली नाही असे आढळले होते.त्यामुळे त्याला फारसा त्रास न होता तो आमच्या रुग्णालयात आला होता. त्याच्या शल्य क्रियेला ७ दिवस झाल्यावर त्याची जखम भरत आल्यावर आमच्या सरांनी(सर्जन कमांडर ओबेरॉय) यांनी त्याला ४ आठवड्याची विश्रांती(sickleave) देण्याचा निर्णय घेतला.पण श्रीनिवास राव त्यावर अजिबात आनंदी नव्हता. त्याचा मावस (का मामे) भाऊ (cousin) वेंकट राव आमच्या रुग्णालयात माझा वैद्यकीय सहाय्यक म्हणून होता. त्यामुळे वेंकट माझ्या कडे श्रीनिवास रावला घेऊन आला.श्रीनिवास चे घर काकिनाडा च्या जवळ कुठल्या तरी गावात होते पण तो घरी जाण्यास मुळीच तयार नव्हता. त्याचे म्हणणे असे होते कि माझी रेजिमेंट तिथे युद्धात रत असताना मी घरी जाऊन आराम कसा करू शकतो?
मी त्याला विचारले कि तू तर आताच शल्यक्रियेतून उठला आहेस तर तू युद्ध कसा करणार आहेस? त्यावर त्याचे म्हणणे हे होते कि युद्ध सामग्रीचे हिशेब आणि लेखाजोखा ठेवायला माणूस लागतोच. हे काम मी करू शकेन म्हणजे रेजिमेंटचा एक सैनिक युद्धासाठी मोकळा होईल. मला मुळात असा नुकताच शल्यक्रियेतून उठलेल्या माणसाला परत युदधावर पाठवणे पटत नव्हते पण श्रीनिवास इतक्या निग्रहाने सांगत होता कि मी ओबेरॉय सरांशी रदबदली करायला तयार झालो. ओबेरॉय सरांची अवस्था सुद्धा माझ्यासारखीच होती त्यामुळे ते पण तयार नव्हते पण केवळ श्रीनिवासच्या निग्रही बोलण्याने ते अतिशय अनिच्छेने तयार झाले. त्यावर श्रीनिवास अतिशय आनंदात होता.श्रीनिवास मला परत परत धन्यवाद देत होता आणी मला अतिशय शरम वाटत होती कि युद्धावर तो जाणार होता आणी तो मला धन्यवाद देत होता त्याला ओबेरॉय सरांनि रुग्णालयाच्या ऑफिसातून वार्रंट घेऊन आपले जम्मू पर्यंत आरक्षण करायला सांगितले. त्याप्रमाणे त्याने आपले वार्रंट घेतले पण मुळात मी महिना असल्याने लष्करी कोटा आधीच फुल होता. त्याची विनाआरक्षण जायची तयारी होती पण मी त्याला निक्षून सांगितले कि विनाआरक्षण मी तुला पाठवणार नाही. आपले आरक्षण दाखव आणि मगच तुला डिसचार्ज देईन. त्यावर मी त्याला एक सरकारी कागदावर रेल्वे च्या आरक्षण पर्यवेक्षकाला आरक्षण देण्यास विनंती करणारी चिट्ठी लिहून दिली कि हा सैनिक कारगिलला जात आहे त्याला आरक्षण देण्यात यवे.श्रीनिवास वेंकटला घेऊन विशाखापटणम रेल्वे स्टेशन वर गेला. दुर्दैवाने तो आरक्षण पर्यवेक्षक सुट्टीवर होता. त्यावर वेंकट त्याला घेऊन एका TTE कडे गेला. त्या TTE ने त्यांच्या कडे दोनशे रुपये मागितले. वेंकट ने त्याला वारंट आणि मी दिलेली चिट्ठी दाखवली आणि सांगितले कि हा युद्धासाठी चालला आहे सुट्टीवर मजेसाठी नाही त्यावर त्या TTE ने त्याल हे सांगितले कि तुला आरक्षण हवे असेल तर दोनशे रुपये दे आतातर आमचा पैसे कमावण्याचा काळ आहे(मी महिन्याच्या सुट्टीचा काळ) तर उगाच जास्त वाद घालू नकोस. मला वेळ नाही. दोनशे रुपये काढ आणि परवाचे आरक्षण घेऊन जा.
यावर ते दोघे दोनशे रुपये देऊन ते आरक्षण घेऊन आले. श्रीनिवास नाही नाही म्हणत असतानाही वेंकट ने मला हि गोष्ट सांगितली. संतापाने माझ्या अंगाची अतिशय लाही लाही झाली. पण माझा संताप नपुंसक होता. माझ्या मनात श्रीनिवासला दोनशे रुपये द्यावे असे आले. पण एकतर त्याने ते घेतले नसते आणि त्याचा अपमानही झाला असता. अधिकारी असूनही मी एका सैनिकाला मदत करू शकलो नाही याची लाजही वाटत होती.याच वेळी माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला कि सर्वसामान्य भारतीय म्हणुन आपले चारित्र्य काय आहे?
तेथेच काम करीत असताना आमच्याकडे समुद्रावरील चांदीपूर आणी गोपालपूर(chandipur on sea आणी GOPALPUR on sea) येथून सैनिक रुग्ण म्हणून येत असत. हा भाग ITR (INTERIM TEST RANGE) म्हणून अग्नी पृथ्वी इत्यादी क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यासाठी होता. हा भाग समुद्राच्या जवळ असल्याने दलदलीचा होता त्यामुळे तेथे डास खूप होते आणी पूर्ण काळजी घेऊनही थोडे फार सैनिक मलेरियाची शिकार होत. दुर्दैवाने तेथे FALCIPARUM मलेरिया फार होता आणी मधून मधून एखादा सैनिक मेंदूत मलेरिया झाल्याने किंवा मलेरियाचा मूत्रपिंडावर प्रभाव झाल्यानेBlackwater fever( http://en.wikipedia.org/wiki/Blackwater_fever) तेथील रूग्णालयातून आमच्या कडे अतीव दक्षता विभागात स्थानांतरीत होऊन येत असे. असा तातडीचा रुग्ण येत असे तेंव्हा तो रुग्णवाहिकेतून येत असे त्यावेळेला बहुतांशी त्याची पत्नी त्याच्या बरोबर येत असे. आता हा माणूस अतिदक्षता विभागात भरती झाला कि त्याच्या बायकोला त्या विभागातील रुग्णाच्या नातेवाईकांना असलेल्या विश्रामगृहात खोली दिली जात असे या खोल्यांचा प्रभारी अधिकारी मी होतो. बर्याच वेळेला या स्त्रीया नेसत्या वस्त्रानिशी आलेल्या असत आणी काही दिवसात त्यांचे पैसे संपत. नवरा अतिदक्षता विभागात खिशात पैसे नाहीत रूग्णालयात ओळख नाही अशा बिकट परिस्थितीत मी पाच सहा स्त्रियांना तीनशे चारशे रुपये खिशातून काढून दिले होते. १९९९ साली हि रक्कम मला पण कमी नव्हती परंतु एकाही स्त्रीने माझे पैसे बुडवले नाहीत. महिन्या दोन महिन्यांनी का होईना पण कोणातरी सैनिकाच्या हाती हे पैसे येत असत( हे अंतर सहाशे ते साडे सहाशे किमी असावे).
गेली तीन वर्षे मी मुंबईत व्यवसाय करीत आहे. २०१० मध्ये माझ्याकडे एक निम्न स्तरातील माणूस आपल्या मुलाबरोबर आला. मुलाला एकशे चार ताप होता. त्याची सोनोग्राफी केली तर त्याला डेंग्यू आहे असे मला जाणवले. त्याच्या यकृताला सूज आली होती छातीत आणी पोटात पाणी झाले होते.मी त्या बापाला सांगितले कि मुलाला ताबडतोब महानगरपालिकेच्या रुग्णालयात घेऊन जा मुलगा गंभीर आहे. त्याच्या जवळ सहाशे रुपयेच होते माझे बिल नउशे होते. तो म्हणू लागला कि माझा मोबाईल ठेवून घ्या. मी त्याला सांगितले कि माझे पैसे महत्त्वाचे नाहीत मुलाला ताबडतोब घेऊन जा सहाशे रुपये तुला आत्ता लागतील आणी मोबाईल पण घेऊन जा त्याची पण गरज पडेल.माझे पैसे तुला सवड होईल तेंव्हा तुझ्या फामिली डॉक्टर कडे दे यावर हा माणूस गायब झाला तो आजतागायत दिसलेला नाही. त्याच्या मोबाईल वर फोन केला तर उचलत नाही. एवढेच नव्हे तर ते पैसे द्यायला लागू नयेत फामिली डॉक्टर कडे पण गेलेला नाही. आणी माझ्यामूळे आपला रुग्ण गेला म्हणून फामिली डॉक्टरने मला दुषणे दिली ती वेगळीच.
असाच एक बांधकाम क्षेत्रातील एक मजूर माझ्याकडे आला होता डॉक्टर मित्राच्या सांगण्यावरून मी बाराशे रुपयाचा कलर डॉपलर मी त्याला दोनशे पन्नास रुपयात करून दिला तर जाताजाता तो मला विचारात होता कि एक हजार रुपयाचे बिल करून देता का? साहेबांकडून परतावा घेता येईल
भरपूर पैसे मिळवणाऱ्या कित्येक रुग्णांनी दोनशे रुपये कमी, तीनशे रुपये कमी आहेत उद्या आणून देतो म्हणून दिलेच नाहीत.सभ्य आणी सुसंस्कृत दिसणाऱ्या लोकांनी हजार रुपये सुद्धा बुडवले आहेत. अशाच उच्चभ्रू लोकांकडून बिल दुसर्याच्या नावावर करून देण्याची " विनंती" केली जाते. सर्रास सगळे वरिष्ठ नागरिक सवलत मागतात आणी नंतर आमच्या मुलाला बिलाचा परतावा आहे म्हणून बिल मागतात. ( मी शंभर टक्के लोकांना जेवढ्याचे आहे त्याचेच बिल देतो).
मी रुग्णांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे बरीच सवलत देत असे.(फमिली डॉक्टर ने सांगितले तर फुकट सुद्धा) पण माझे अनुभव फारसे चांगले आलेले नाहीत. लोक सवलतीसाठी फमिली डॉक्टरशी सर्रास खोटे बोलतात असा अनुभव आहे
एक पाटील साहेब मला बायकोचे बिल सुनेच्या नावावर करून देण्याची विनंती करीत होते कारण सुनेला वैद्यकीय खर्चाचा परतावा आहे. मी नकार दिल्यावर वैतागून कमीत कमी श्रीमती पाटील असे बिल द्या म्हणून मागे लागले. ते मी अनिच्छेने का होईना पण दिले (कारण त्यात बेकायदेशीर काही नव्हते).
पहिली दोन वर्षे मी नवा होतो (तिसर्या वर्षी) २०१२ साली हिशेब केला तर माझे वीस हजार रुपये असे बुडाले आहेत.त्यांची एक फुलस्केप भरेल अशी यादी केली आहे आता २०१३ मध्ये मी न लाजता पैसे घेऊन या आणी रिपोर्ट घेऊन जा असे सांगतो. आमच्यावर विश्वास नाही का असे विचारणाऱ्या रुग्णांना हि यादी दाखवतो आणी सरळ सांगतो कि माझा विश्वास आता राहिला नाही.
असो. माझ्या मूळ प्रश्नांचे उत्तर मला अजून मिळालेले नाही.
आताशा माझी समाजसेवा करण्याची आंतरिक उर्मी बरीचशी कमी झाली आहे

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

1 Jun 2013 - 2:01 am | प्रभाकर पेठकर

असंच होतं. आपला हेतू शुद्ध असून आणि आपण संवेदनशील असून भागत नाही. आपल्या आजूबाजूचा समाज आपल्याला मनाविरुद्ध निर्णय घ्यायला भाग पाडतो शिवाय ह्या हतबलतेचीही रुखरुख आपल्याला लागते.

एखाद्या मोठ्या यंत्रात मोठी चक्रे फिरतात तेंव्हा लहान चक्रांनाही फिरावे लागते नाहीतर मोडून तुटून पडावे लागते.

तरी पण सत्पात्री दान करण्याची वृत्ती सोडू नये. करमण्ये वाधिकारस्ते मा फलेशु कदाचन. हाच, मनाला लागणारी रुखरुख टाळण्याचा, मार्ग आहे.

स्पंदना's picture

1 Jun 2013 - 8:14 am | स्पंदना

नका डॉक्टर मनाचा पिंड नका भ्रष्ट करु.
तुम्ही,तुम्ही रहा. निदान औषधाला तरी तुमच्यासारखी माणस या जगात राहु देत. आम्हीही आहोत या जगात! त्या सैनिकांच्या बायका आहेत! स्वतःला युद्धात लोटुन देणारा तो सैनिक आहे! कुठेमुठे एक दोन कोंब आहेत अजुन फुटणारे, वृक्षांनी धीर सोडु नये म्हणेन मी.

शिल्पा ब's picture

1 Jun 2013 - 10:38 am | शिल्पा ब

way too filmy !!

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2013 - 12:05 pm | परिकथेतील राजकुमार

Shock me, say something intelligent.

शिल्पा ब's picture

1 Jun 2013 - 8:30 pm | शिल्पा ब

I could but you might not understand so keepin' it real .

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2013 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार

माझा प्रतिसाद तुम्हाला उद्देश्यून नव्हता.

काय वेळ आलीये च्यायला .. ह्यापुढे प्रतिसादाआधी तो कुणाला दिलाय हे पण लिहावे लागणार का काय.

परा ढ

जरा वर बघ की कुणाला प्रतिसाद दिलाय ते!! प्रतिसाद दिल्यावर ज्याला दिलाय त्याला तिरका जातो. आता हे तुला पण सांगाव लागेल का?

स्पंदना's picture

2 Jun 2013 - 3:17 pm | स्पंदना

तरीही माझे तेच मत अजुनही. निदान एखादा कुणी चांगला, न भ्रष्ट होता राहु शकत असेल राहु दे.
कितीही तिरक बोललं तरी सरळ जाणार्‍याला त्रास नसतो. मला नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2013 - 3:29 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय सुरेख आणि संतुलित प्रतिसाद.

ह्या प्रतिसादामधून निदान मिपाला तरी राष्ट्रीय चारित्र्य आहे हे स्पष्ट दिसून येते.

नाही परा. एव्हढी महान गोष्ट नाही पेलायची मला.
माझ सरळ साध मत स्वतःला आरशात बघताना लाज वाटली नाही पाहिजे.
बाकि मिपाची, महाराष्ट्राची अन भारताची जबाबदारी घ्यायला तुम्ही आहातच.

मनिम्याऊ's picture

7 Aug 2013 - 8:41 pm | मनिम्याऊ

डॉक्टर साहेबानसारखे लोक बघितले की मर्ढेकरान्च्या या ओळी पटतात

अजून येतो वास फुलांना
अजून माती लाल चमकते
अजून फुटक्या बांधावरती
चढून बकरी पाला खाते

मराठीप्रेमी's picture

1 Jun 2013 - 8:50 am | मराठीप्रेमी

तुमचे अनुभव वाचून वाईट वाटले. दुर्दैवाची बाब अशी की एकदा ताकही फुंकून प्यायला लागलो की ज्यांना खरच मदतीची गरज असते ते उगाच भरडले जातात आणी नंतर आपल्यालाच त्याचा त्रास होतो.

टवाळ कार्टा's picture

1 Jun 2013 - 9:20 am | टवाळ कार्टा

त्या TTE ने त्यांच्या कडे दोनशे रुपये मागितले. वेंकट ने त्याला वारंट आणि मी दिलेली चिट्ठी दाखवली आणि सांगितले कि हा युद्धासाठी चालला आहे सुट्टीवर मजेसाठी नाही त्यावर त्या TTE ने त्याल हे सांगितले कि तुला आरक्षण हवे असेल तर दोनशे रुपये दे आतातर आमचा पैसे कमावण्याचा काळ आहे(मी महिन्याच्या सुट्टीचा काळ) तर उगाच जास्त वाद घालू नकोस. मला वेळ नाही. दोनशे रुपये काढ आणि परवाचे आरक्षण घेऊन जा.

साल्य असल्या मा****ना भर चौकात चाबकाने फोडले पाहिजे

मदनबाण's picture

1 Jun 2013 - 9:35 am | मदनबाण

अनुभव वाचुन वाईट वाचले ! चांगुलपणाचा फायदा घेणे ही हल्ली सवय झाली आहे ! लोक सामान्य आयुष्यात सुद्धा माज करताना दिसु लागले आहे,आणि उत्तम चारित्र्य असणे हा अनेक दुर्मिळ गुणांमधे समाविष्ठ झाला आहे.

कट ने त्याला वारंट आणि मी दिलेली चिट्ठी दाखवली आणि सांगितले कि हा युद्धासाठी चालला आहे सुट्टीवर मजेसाठी नाही त्यावर त्या TTE ने त्याल हे सांगितले कि तुला आरक्षण हवे असेल तर दोनशे रुपये दे आतातर आमचा पैसे कमावण्याचा काळ आहे(मी महिन्याच्या सुट्टीचा काळ) तर उगाच जास्त वाद घालू नकोस. मला वेळ नाही. दोनशे रुपये काढ आणि परवाचे आरक्षण घेऊन जा.
खरं सांगु याचे मला नवल वाटले नाही,रोज बाईक वरुन पोलिसांना / जकात अधिकार्‍यांच्या टट्टुंना पैसा खाताना पाहुन माझ मन अगदी निबर झालं आहे की काय असं वाटु लागलं आहे. आधी रोज असे सर्रास पैसे घेतले जातात ते पाहुन चीड चीड व्ह्यायची, ट्रक वाल्या़कडुन १०-२०रु. चे अविरत चालणारे कलेक्शन रोज पाहत होतो, पाहत आहे... हल्ली फक्त डोळ्यांना पैसा देणारे आणि घेणारे हात दिसतात... त्यामुळे रस्त्यात ट्रॅफिक लागो,किंवा अपघात होण्याची शक्यता निर्माण होवो,यांना त्याने काहीच वाटत नाही !
भारतीय लोक पैशासाठी कोणत्याही थराला जाउ शकतात असे हळु हळु माझे ठाम मत बनत चालले आहे.
भ्रष्टाचार आणि लाचारी करण्यात ज्यांना गैर वाटत नाही त्यांना चारित्र्याची कसली चाड असणार ? अगदी साधे उदाहरण देतो जे मी अनेक वर्ष पाहतो आहे,आता पावसाळा जवळ आला आहे,थोड्या पावसाची सर पडली की लगेच सर्व शहरात डांबरीकरण सुरु होते...वर्षभर ज्या रस्त्यांवर काहीही डागडुजी होत नाही तेथे पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम सुरु होते,पाउस पडतो डांबराच्या रस्त्यांना खड्डे पडतात ,मग खडी,दगड विटा यांच्या तुकड्यांनी भरलेले ट्रक आणले जातात आणि हे खड्डे बुजवण्याच्या नावाखाली रस्त्यात ओतले जातात. दर वर्षी हे मी पाहतो या वर्षी सुद्धा याची सुरुवात झाली आहे. भ्रष्टाचार या देशातल्या रक्त्तात पार मुरला आहे. :)

जाता जाता :---
आपल्या सैनिकांच्या शौर्‍याबद्दल बोलावे तितके कमीच आहे,पण सरकारला आणि सामान्य जनतेला त्यांच्या या त्यागाची किंमत आहे का ?
अवांतर :--- सैनिक मग तो कोणत्याही देशाचा असो तो born to be wasted असतो का ?

आनंदी गोपाळ's picture

1 Jun 2013 - 1:19 pm | आनंदी गोपाळ

भारतीय लोक पैशासाठी कोणत्याही थराला जाउ शकतात असे हळु हळु माझे ठाम मत बनत चालले आहे.

भारतीय लोक विनाकष्टाने/लाच म्हणून मिळणार्‍या पैशासाठी कोणत्याही थराला जाउ शकतात असे हळु हळु माझे ठाम मत बनत चालले आहे.

असे हवे का ते?

मदनबाण's picture

2 Jun 2013 - 9:36 am | मदनबाण

गोपाळराव हो ते तसच हव आहे.

सैनिक मग तो कोणत्याही देशाचा असो तो born to be wasted असतो का ?
बाकीच्या देशांचे ठावुक नाही, पण आपल्या देशाचे सैनिक मात्र आता born to be wasted आहेत असेच वाटु लागले आहे.

लुंग्या अँटोन्या अरे तू या बलशाली राष्ट्राचा संरक्षण मंत्री आहेस ना ? इथे सैनिकांची मुंडकी तोडली जातात आणि वेळोवेळी ठार केले जाते आहेस तर तू काय करतो आहेस ? आपल्या सैनिकांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण पाकडे आणि चीन करत आहेस त्यावर तू काय केलेस ? चीन आणि पाकिस्तान यांची अभद्र युती आपल्या देशाचे लचके तोडत आहेत,जवानांना ठार करत आहेत तू काय करतोयस ? किती सैनिकांचे बळी तुम्ही देणार आणि मग तुम्हाला जाग येणार ?

लुंग्या अँटोन्याची शाब्दिक जुळवा जुळव :-कालचे निवेदन उपलब्ध माहितीवर आधारित - संरक्षणमंत्री

विरोधी पक्ष :- 'पाकिस्तानला क्लिन चीट देणाऱया अ‍ॅंटनींनी देशाची माफी मागावी'

महाराष्ट्राचा पाकिड्यांनी घेतलेला बळी :- कुंडलिक मानेंच्या वीरमरणाने पिंपळगाववर शोककळा

माझ्या पहिल्या प्रतिसादातल्या भ्रष्टाचाराचे जे उदाहरण मी दरवर्षी पाहतो असे म्हंटले आहे त्यावर :-
हे मारेकरीच..

५० फक्त's picture

1 Jun 2013 - 10:19 am | ५० फक्त

चारित्र्य आणि भ्रष्टाचार याबाबत थोडंसं अंडं आधी की कोंबडी आधी असा प्रकार आहे,

तुमचं चारित्र्य वाईट म्हणुन तुम्ही भ्रष्टाचारी आहात की तुम्ही भ्रष्टाचारी आहात म्हणुन तुमचं चारित्र्य वाईट आहे, हा संशोधनाचा विषय आहे. मुळात कोणता आचार चांगला अन कोणता वाईट हे कोण ठरवणार हाच मोठा प्रश्न आहे. अर्थात पैसे खाणं किंवा खाउ घालणं, हे आपण टाळु शकत असलो तर टाळावं नाहीतर गुमान तो रस्ता पकडावा.

चिगो's picture

2 Jun 2013 - 12:36 am | चिगो

मुळात कोणता आचार चांगला अन कोणता वाईट हे कोण ठरवणार हाच मोठा प्रश्न आहे. अर्थात पैसे खाणं किंवा खाउ घालणं, हे आपण टाळु शकत असलो तर टाळावं नाहीतर गुमान तो रस्ता पकडावा.

अगदी सहमत.. आजकाल लोकांचे "फंडे" खुप क्लियर असतात, म्हणे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jun 2013 - 11:58 am | डॉ सुहास म्हात्रे

फार सुंदर लेख, डॉक्टर.

चांगुलपणाला बावळटपणा समजून त्याचा गैरफायदा घेणे ही प्रवृत्ती समाजात चांगलीच बळ धरून आहे. पण त्याबरोबरच माणसातल्या कर्तव्यानिष्ठेची आणि चांगुलपणाचीही उदाहरणे तुमच्याच लेखात आहेत की. या जगात १००% चांगले किंवा १००% वाईट अशी परिस्थिती केव्हाच नसते. तर मग प्रश्न असे आहे की:

१. "ग्लास अर्धा भरला आहे असे म्हणावे की अर्धा रिकामा आहे असे म्हणावे?" किंवा
२. "मी जखमेतून सावरणार्‍या सैनिकाच्या युद्धावर जाण्याच्या कृतीतून काही बोध घेउ की माझे पैसे बुडवणार्‍या फसव्या माणसांच्या कृतीमुळे माझा चांगले काम करणारा हात आखडता घेऊ?"

मला जेव्हा वरचा दुसरा प्रश्न पडतो (आणि हा प्रश्न प्रत्येकालाच कमी जास्त प्रमाणात पडतो) तेव्हा मला एक गोष्ट आठवते:

एकदा एक गुरू शिष्याबरोबर दुसर्‍या गावी चालला होता. रस्त्यात एक नदी लागली आणि गुरु-शिष्य पाणी प्यायला पाण्यात उतरले. त्या पाण्यातून एक विंचू वाहताना गुरूने पाहिला. त्याने भूतदयेने त्याला ओंजळित उचलून काठावर न्यायला सुरुवात केली. अर्थातच विंचवाने गुरुच्या हाताला दंश केला आणि तो परत पाण्यात पडला. गुरूने त्याला परत उचलले, परत विचवाने दंश केला आणि तो पाण्यात पडला. असे तीन चारदा झाल्यावर गुरू त्या विंचवाला काठावर आणण्यात यशस्वी झाला.

शिष्य हे सगळे विस्मयाने पाहात होता. तो गुरूला म्हणाला, "गुरुजी, एका क्षुद्र जीवाकरिता तुम्ही हे काय करत होता? हा वेडेपणा नाही का?"

गुरु म्हणाला, "एक क्षुद्र जीव जर त्याचा नांगी मारण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही तर सर्वोत्तम जीव समजल्या जाण्यार्‍या माझ्यासारख्या माणसाने माझा मदत करण्याचा चांगला गुणधर्म का सोडावा?"

काही अतिशयोक्ती (जी बर्‍याच बोधकथांमधे असते) सोडली तरी ही गोष्ट मला एका गोष्टीची जाणीव नक्कीच देते ती अशी: वाईट माणसे माझ्याशी वाईट वागली म्हणून मी सावध होणे योग्यच आहे पण माझा चांगलेपणा सोडणे बरे नाही. कारण पैश्यांच्या नुकसानापेक्षा जास्त फसवणूकीने झालेल्या इगोच्या दुखापतीमुळे आपण नाराज होतो. मी अशी मदत जर मला झेपेल इतकाच आर्थिक भार उचलून "केवळ मदत" (म्हणजे ते पैसे परत येणार नाहीत अशा अपेक्षेने केलेली मदत) म्हणून केली तर; (१) जर ते पैसे परत आले नाही तर भले ! आणि (२) पैसे परत आले तर ते मी खूष होतो आणि ते माझ्या पुढच्या मदतीच्या खात्यात जमा करतो (कारण मुळात ते मी माझा अधिकार सोडलेले पैसे होते). दोन्ही प्रसंगात मदत केली म्हणून मी खूष आणि माझ्या इगोला दुखापत होण्याचीही शक्यता नाही.

अर्थात, हे शहाणपण मी पूर्वी बर्‍याचदा बोटांना (कधी कधी तर दोन्ही हातांना) चटके खावून डोक्यावरचे बरेचसे केस उपटून झाल्यावर मगच शिकलेलो आहे :).

सुबोध खरे's picture

1 Jun 2013 - 9:12 pm | सुबोध खरे

इस्पीकचा एक्का साहेब
तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण यात मला एक आपली वीट लावावीशी वाटते. विंचवाचा गुणधर्म नांगी मारणे आहे पण म्हणून तुम्ही विंचवाचा जीव वाचवताना आपल्याला चावून घ्यावे असे कुठे म्हटले आहे. मी इतका गांधीवादी नाही. लष्करात असल्याने अहिंसा परमो धर्मः असे म्हणणा र्यातील नाहीच नाही. मी विंचवाचा जीव वाचवेन पण त्याला चिमट्यात पकडून. स्वतःच्या हाताला चावून घेण्यात काही हशील नाही . मला सोसंल तेवढीच सोशल सर्विस मी करतो.
माझ्याकडे एक NGO कडून साठी पासष्टीची बाई आली आणि माझ्या दवाखान्यात खुर्ची वर बसून ष्टाईल मध्ये विचारू लागली कि तुम्ही वरिष्ठ नागरिकांना किती सवलत देता? मी म्हटले एक पैसाहि नाही. त्यावर ती जबाब विचारू लागली कि का?. मी तिला शांत पणे म्हटले जो माणूस महाराष्ट्र सेवा संघाला पाच लाख देणगी देतो त्याला मी काय म्हणून सवलत द्यायची? किंवा खाली होंडा सिटी गाडी उभी असते आणि चालकाला दहा हजार पगार देणाऱ्या माणसाला मी काय म्हणून सवलत द्यायची? त्यांनी विचारले कि ज्यांना खरंच परवडत नाही त्यांनी काय करायचे? मी त्यांना सांगितले कि माझे वडील वरिष्ठ नागरिक संघाचे सचिव आहेत तिथे पण मी हेच सांगितले आहे कि मी सरसकट सवलत देत नाही पण जो वरिष्ठ नागरिक संघाच्या कोणत्याही पदाधीकार्याकडून लिहून आणेल त्याची सोनोग्राफी मी फुकट करून देईन. ( अशा काही सोनोग्राफी वडिलांनी सांगितल्यावर मी फुकट करून दिल्या आहेत) त्यावर तिने विचारले कि समाजसेवा म्हणून काही असते कि नाही? यावर माझे डोके भडकले मी तिला सरळ विचारले कि मादाम तुम्ही कधी आयुष्यात तीन दिवस मैगी नुडल्स वर काढले आहेत काय? किंवा कधी मिल्कमेड आणि पाव जेवण म्हणून खाल्ला आहे काय? मी खाल्ले आहे जहाजावर खवळलेल्या समुद्रात आचारी आजारी पडल्यावर केवळ मैगीवर तीन दिवस काढावे लागले आहेत. पंच तारांकित हॉटेलात पार्ट्या करून लोकांना सल्ले देणे सोपे असते. कधी खर्या पाण्याची चहा किंवा कॉफ्फी सलग पंधरा दिवस प्यायली आहे काय? मला मला सोसंल तेवढीच सोशल सर्विस मी करणार.तुम्ही जाब विचारणारे कोण? हा भडीमार ऐकून ती बाई सर्द झाली आणि तिने काढता पाय घेतला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jun 2013 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

निश्चितच उत्तम केलेत...

तुम्ही जी वीट लावलीत ती मी अशी व्यक्त केली होती. काही अतिशयोक्ती (जी बर्‍याच बोधकथांमधे असते) सोडली तरी...

मी तर तो विंचू असला तर कदाचित पाण्यातून काढण्याच्या भरीसही पडणार नाही. मी त्याला चिमट्याने वाचवले तरी तो नंतर इतर कुणा अनावधानी माणसाला चावू शकेल ना.

आणखी एक भर : "...मला झेपेल इतकाच आर्थिक भार उचलून ..." हे "...मला झेपेल इतका आर्थिक भार उचलून आणि माझ्या सारासार विवेक बुद्धीला पटेल त्यालाच..." असे लिहायला हवे होते, म्हणजे ते वाक्य जास्त योग्य झाले असते. गडबडीत प्रतिसाद लिहीताना राहून गेले.

सो कोल्ड हुच्च मंडळीच अरेरावीने बोलून पैसे न देणे हा आपला हक्क आहे असे समजतात आणि ते या बाईसारखे तडक अथवा "देउ नंतर" असे छुप्या पद्धतिने सांगतात. तेव्हा त्या बाईसाहेबांच्या बाबतीत योग्यच केलेत. कारण ते दान नक्कीच "अपात्री" झाले असते. माझ्यातर्फे +१११.

भारतीय चारित्र्याचे काय विचारता डॉक्टर ? आता आपला समाज खालपर्यंत सडलेला आहे. अपवादात्मकच कोणी प्रामाणिक माणूस भेटतो. गेल्या दहा वर्षांत एकही सरकारी काम पैसे दिल्याशिवाय झाले नाहीये.

अनिरुद्ध प's picture

1 Jun 2013 - 1:14 pm | अनिरुद्ध प

आपल्याला आलेले वाईट अनुभव हे बहुतेक सेवा क्षेत्रात येतात असा माझा सुद्धा अनुभव आहे,परन्तु मला श्री इस्पीकचा एक्का यान्चे दुसरे मत पटते आहे. बाकी लिखाण उत्तम अजुन येवु द्या.

आनंदी गोपाळ's picture

1 Jun 2013 - 1:27 pm | आनंदी गोपाळ

नमस्कार!

तुम्हाला आलेत तसे अनुभव मीही भरपूर घेऊन चुकलोय. पण एक वाक्य लक्षात ठेवलेय. "नेकी कर, कुवे में डाल."
जर कुणाला सवलत द्यावी वाटली, त्याचे भले करावे वाटले, करून मोकळे व्हावे. नंतर हळहळू नये, वा हिशोबही करू नये.

पुण्यात एक डॉ. जोग म्हणून पेडीअ‍ॅट्रिशियन आहेत. त्यांची पेशंट जज करायची सिस्टीम मला आवडते. "लुक अ‍ॅट अ मॅन्स' पॉकेट अँड अ वुमन्स लॉकेट." पुरुषाच्या खिशात काय आहे ते दिसते चट्कन. खिशात विडी/सिगारेट वाल्यांना नो कन्सेशन. अन त्याहीपेक्षा मोठा इंडीकेटर म्हणजे स्त्रीचे मंगळसूत्र. नुसतेच मणी अन लपवलेली वाटी असेल तर ती खरी गरीब आहे. माफ करून टाकावे.

यात कधी अंदाज चुकतातही. पण अनेकदा निकम्म्या राजकारण्यांना, ओळखीच्या लखपतींना, बोगस पत्रकारांना, लाचखाऊ पोलिसांना, आपण फुकट तपासतोच की!

त्यातल्या त्यात अनुभव असा की खेड्यातला, मजूर, लो सोशिओइकॉनॉमिक स्टेटमधला पेशंट सहसा पैसे बुडवत नाही. हप्त्याने का होईना आणून देतोच. बडे, मोठे मोबाईल, अन एस्यूव्ही गाड्या, अंगावर सोने घालून श्रीमंती दाखवणार्‍यांना मात्र १००% अ‍ॅडव्हान्स घेतल्याशिवाय मी ऑपरेशनला कधीही घेत नाही. अगदी अ‍ॅनास्थेटिस्ट येऊन बसलेला असला, तरीही कॅशियरकडे पैसे जमा झाले नाहीत, तर नो सर्जरी.

धन्यवाद!

प्यारे१'s picture

1 Jun 2013 - 1:57 pm | प्यारे१

भन्नाटच.

आनंद चित्रपटातला सुरुवातीचा रमेश देव नि अमिताभ ह्या चित्रपटातल्या दोन डॉक्टरांमधला संवाद आठवला.
अशा श्रीमंत लोकांकडून पैसे घेऊन गरीबांना मदत करण्यात काहीही अडचण नसावी.
मिलिटरीवाले थोडे जास्तच सरळमार्गी असतात हे खरं आहे तर! ;)

अवांतरः व्यवसायावेळी सचोटीनं व्यवसाय करुन एक ५२ व्या वर्षी नि एक ६० व्या वर्षी निवृत्त झालेले असे दोन डॉक्टर परिचयाचे आहेत ज्यांनी आपल्या उधारीच्या वह्या 'जाळल्या' नि नंतर त्या उधारीची कुठेही कधीही वाच्यता केली नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jun 2013 - 5:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यातल्या त्यात अनुभव असा की खेड्यातला, मजूर, लो सोशिओइकॉनॉमिक स्टेटमधला पेशंट सहसा पैसे बुडवत नाही. हप्त्याने का होईना आणून देतोच...

हा अगदी नियम असल्यासारखा आहे. आणि "पैसे कुठे चाललेत साहेब. आम्ही काय पैसे बुडवणार आहोत का?" असे अरेरावीने बोलणारे हुच्च स्तराचे लोक हमखास पैसे बुडवतात हाही नियमच असल्यासारखा आहे !

सुबोध खरे's picture

1 Jun 2013 - 8:25 pm | सुबोध खरे

सोशिओइकॉनॉमिक स्टेट आणि पैसे बुडवणे याचा काही ताळमेळ मला जाणवला नाही. दोन्ही स्तरातील लोकांनी पैसे बुडवायचा प्रयत्न केला. माझ्याकडे प्रत्येक रुग्णाचा मोबाईल क्रमांक असतो त्यामुळे उच्च वर्गातील लोकांना फोन केल्यावर त्यांनी पैसे आणून दिले निम्न स्तर लोकांनी आणून देतो सांगूनही दिले नाहीत.
राहिली गोष्ट राजकारणी, पोलिस, पत्रकार किंवा सक्खे शेजारी यातील कोणालाही तीन वर्षात मी एकदाही फुकट तपासले नाही.ज्याची अपेक्षा आहे असे दिसले त्याच्याशी लंब्याचवड्या गप्पा मारून सवलत मागणाऱ्या लोकांना हमखास शिव्या देतो त्यामुळे फारसे कोणी माझ्याकडे सवलत मागायला धजावले नाही.
माझ्या दवाखान्याच्या उदघाटनाला यातील कोणालाही बोलावले नाही. दवाखान्याचे उद घाटन माझ्या वडिलांच्या हस्ते झाले.
राहिली गोष्ट पुरुषांचे खिसे आणि बायकांचे गळे. मुंबईत यावरून कोणताही अंदाज बांधता येत नाही. साधा पांढरा लेंगा आणि झब्बा घातलेला माणूस कोट्याधीश गुजराती शेट्या असतो पण हमखास(१००%) सवलत मागतो. आणि चकाचक कपडे घातलेला माणूस आगरी असतो आणि खिशात पैसे नसतात.
एक किस्सा सांगतो- एका मराठी माणसाने आपल्या बायकोची स्त्री रोगासाठी सोनोग्राफी घरी करण्यासाठी मला बोलावले( हि कोर्टाने त्यावर बंदी घालण्या पूर्वीची गोष्ट आहे). त्यांना मानेखाली पक्षघात झाल्याने दोन्ही हात आणि पाय काम करीत नव्हते आणि पाळीचा अतिशय रक्तस्त्राव होत होता. मि त्याला सांगितले कि घरी आल्याचे २ हजार होतील तुम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन या म्हणजे आठशे रुपये होतील. हा माणूस पत्नीला घेऊन आला. त्याच्या बरोबर दोन बायका त्याचा मुलगा असे चार जण आले होते. त्याच्या पत्नीला उचलून अनन्यास मी हात लावला होता कारण तो मुलगा काही काम करत नव्हता. या माणसाने सवलतीसाठी आपले रडगाणे चालू केले कि बायकोला पक्षा घात झाला आहे.काही सवलत मिळेल काय. मी जेंव्हा बोलणे सुरु केले तेंव्हा खालील गोष्टी कळल्या.
त्याची पत्नी MTNL मध्ये होती तिला निवृत्तीवेतन होते. हा माणूस स्वतः महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्यात नोकरीला होता. पत्नीला परत पोचविण्यासाठी गेलो तर त्याने भाड्याची इंडिका आणली होती. मी त्या पत्नीला विचारले कि येथे आणण्यासाठी तुम्हाला गाडी करावी लागली का?
त्यावर पत्नी म्हणाली कि नाही आमच्या दोन इंडिका आहेत आणि त्या शासनाला भाड्याने दिलेल्या आहेत. यानंतर मी दवाखान्यात परत आलो तर माझी स्वागत सहायिकेने सांगितले कि त्या दोन बायका आहेत त्यातील एक या पत्नीला दिवसभर सांभाळण्यासाठी असते आणि दुसरी बाई आहे तिच्याशी या माणसाने लग्न(?) केले आहे. इतके सगळे असूनही हा माणूस माझ्या आठशे रुपयात सवलत मागत होता.
निम्न स्तरातील कितीतरी लोक काहीही काम करीत नाहीत आणि सवलत मात्र हक्क म्हणून मागताना आढळले. माझ्या डॉक्टर मित्राची सहाय्यिका हिचा बाप नोकरी करतो घरात फक्त २ हजार रुपये देतो बाकीच्याचे काय करतो माहित नाही. दोन्ही मुलीना सांगितले आहे लग्न तुमचे तुम्ही स्वतः करायचे अहे. मी मुलगा शोधणार नाही कि खर्च करणार नाही. या बिचार्या मुली कुठे नवरा शोधायला जाणार. एकदा ती आपल्या बापाला सोनोग्राफी साठी घेऊन आलीहोती. मी सोनोग्राफी केली तिची अपेक्षा सवलतीची होति. मी एक छदाम सवलत दिली नाही. ती नाराज होऊन गेली.
महिनाअखेरीस मी तिला पूर्ण बाराशे रुपये (मित्राच्या दवखान्यात जाऊन) हातात ठेवले आणि सांगितले बापाला यातले एक अवाक्षर कळता कामा नये.
मी याहून जास्त काहीही करू शकत नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Jun 2013 - 4:29 pm | निनाद मुक्काम प...

खरे काकांनी त्यांच्या अनुभवाद्वारे कटू सत्य निर्भीडपणे मांडले आहे.
लष्करी माणसाला सिविलीयन माणसांच्या दुनियेत असे अनुभव येतात त्याला इलाज नाही.
प्रहार सिनेमाची आठवण झाली.
देशासाठी पांगळा झालेला कमांडो गावगुंडांकडून मारला जातो तेही हफ्ता देण्यास नकार दिला म्हणून.

काही गोष्टी सोडुन देण्याशिवाय पर्यायच नसतो, दरवर्षी लाखभर रुपये मी असेच मिळणार नाहीत म्हणुन मी गृहीत धरले आहेत.काही लोक चुकीचे आहेत म्हणुन सगळेच तसे असतील असे नाही आपण आपले काम करत राहायचे, आणी खरोखरचा गरजु पेशंट असाही आपल्या लक्षात येतोच की. सर्,माझा तर एकच वसुल आहे जे गोरगरिब आहेत्,त्यांना शक्य होइल तेव्हडी मदत करायची आणी त्याची वसुली ज्यांनी समाज लुटालय त्यांच्या कडुन करायची.
खरतर तुम्ही आर्मीवाले सरळ रेषेत चालणारे पन जर जमेत असेल तर हा उपाय करुन पहा. पण काही झाले तरी तुमचा चांगुलपणा सोडु नका....

लेख आणि बाकी तिन्ही डॉक्टर लोकांचे प्रतिसाद आवडले. सगळे प्रकार याच जगात आहेत!

श्रीरंग_जोशी's picture

2 Jun 2013 - 7:39 am | श्रीरंग_जोशी

लेखन आवडले पण ही सर्व परिस्थिती ठाऊक असूनही हे वाचून पुन्हा एकदा वाईट वाटले.

हया लेखामधील डॉ.सुबोध यांच्या अनुभवावरून आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का ? हया प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. सर्वसाधारण पणे पैसे बुडवण्याचा कल वाढीस लागला आहे हे मान्य आहे. पण असे अनुभव हे प्रातिनिधिक असतात. जगाचा विचार करता - आपली एकंदर वैद्यक व्यवस्था (सत्ता ?) अत्यंत तकलादू आहे.
एखाद्या औषध विक्रेत्या प्रतिनिधीस गाठले तर तो तथाकथित यशस्वी डॉक्टरांच्या व्यावसाईक गैर वर्तणुकीच्या सुरस आणि चमत्कारिक कथा सांगेल. अगदी प्रिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी "बाई" ची सोय करण्यापर्यंत ही मजल पोहोचली आहे. औषध कंपन्या ह्याही असली आमिषे पुरवण्यात अग्रेसर आहेत. तेंव्हा असे अनुभव सर्व क्षेत्रात येतात. त्या उलट एकदा वनवासी कल्याण आश्रमाला भेट दिली की जग किती उदार आहे - याची कल्पना येते.

मला वाटते आपण व्यवसाय आणि समाजसेवा याची गल्लत करतो म्हणून अश्या अनुभवातून टोकाचे निष्कर्ष काढायचे धारिष्ट्य करतो. व्यवसाय करताना आपली फी किती असावी / ती कशी द्यावी ह्याचे पूर्ण स्वातंत्र्य व्यावसाइकला असावे. त्याने ते घेताना मुळीच भावनिक होवू नये.

जर दान करणे , आर्थिक मदत करणे ही "करणाऱ्याची " भावनिक गरज असेल - तर त्याने एस. आय. पी. प्रमाणे नियमित एखाद्या संस्थेला / व्यक्तीला मदत करावी.

मग व्यावसाईक फी मागताना गल्लत होत नाही आणि रु.२०० चा डोसा खाताना "गरिबांच्या" घरच्या थाळी चे दैन्य आठवून वाईट ही वाटत नाही.

हल्ली चांगल्या संस्था सापडणे मुश्कील झाले आहे. माझा पिंड हा रा.स्व.संघाचा आहे. वनवासी कल्याण आश्रम आणि वात्सल्य ट्रस्ट हया दोन संस्था ना दिलेली मदत समाधान देते . दिवसाच्या कन्सल्टन्सीची फी रु.१०,००० सांगायला मला कोणाच्या बापाची भीती वाटत नाही.

अप्पा जोगळेकर's picture

2 Jun 2013 - 1:15 pm | अप्पा जोगळेकर

इतके दिवस डॉक्टर मंडळींचा लुटारुपणा पाहात्/ऐकत /अनुभवत होतो. आज दुसरी बाजूसुद्दा कळली.

डॉ.प्रसाद दाढे's picture

2 Jun 2013 - 2:43 pm | डॉ.प्रसाद दाढे

मलाही असे अनुभव सर्रास आलेले आहेत. विशेषतः ओळखीच्या लोकांकडुन जास्तच! नशिबाला दोष देत पुढील कामास लागणे हेच मी करीत आलोय. प्राप्त परिस्थितीत एक डॉक्टर दुसरे काय करू शकतो? वसुली एजन्ट तर नाही पाठवू शकत उधारी बुडविलेल्यांकडे..?

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2013 - 2:45 pm | परिकथेतील राजकुमार

कोण हो कोण तो ?

बिका का बिका? ;)

बरं, ते असो... ह्या महिन्यात मी येतो आहे पुण्याला, तेव्हा खरच हजेरी लावतो आहे. यायच्या आधी फोनवतो.

अमोल खरे's picture

15 Jun 2013 - 11:18 am | अमोल खरे

माझे बाबा कोचिंग क्लासेस घ्यायचे तेव्हा अनेक पालकांनी फीचे पैसे बुडवले आहेत. चांगले टाटा, महिंद्रा मधे काम करणारे लोकं सर आत्ता पैसे नाहीत, दोन आठवड्यांनी नक्की देतो असं म्हणुन निघुन जात असत. त्यातल्या एकाने मुलगा बारावी झाल्यावर इंजिनिअरिंग ला डोनेशन देऊन अ‍ॅडमिशन घेतली आणि नवी मुंबईत कॉलेजपर्यंत जायला म्हणुन मुलाला करिझ्मा बाईक घेऊन दिली. माझ्या बाबांचे ट्युशनचे पैसे द्यायला मात्र ह्यांच्याकडे पैसे नव्हते. हे सर्व लहान वयात पाहिल्यामुळे असेल कदाचित, मी आज पर्यंत एकाही माणसाला देणगी दिली नाही. आमच्या ऑफिसातही गरिब मुलांना शाळेची दप्तरं स्पॉन्सर करा म्हणुन येतात. एका दप्तराचे चारशे रुपये मागतात. माझ्या कलिग्सनी चार चार पाच पाच दप्तरं स्पॉन्सर केली. वर तु का नाही पैसे देतं असं मला विचारलं. मी म्हणालो की त्यांना महानगरपालिकेच्या शाळेत जायला सांगा. दप्तरेच नाहीत, तर युनिफॉर्म, कंपास बॉक्स, शुज, वॉटर बॅग, ब्रेकफास्ट, लंच सर्व काही उत्तम प्रतिचे मिळेल, पण ब-याच लोकांना आपण अशा ठिकाणी पैसे दिले हे सांगण्यात खुप अभिमान वाटतो. त्यामुळे अनेकजण, विशेषतः २५-३५ वयातील आयटीमधील नवश्रीमंत तरुण ह्यात अग्रेसर असतात.

जाता जाता- त्या गरिब सैनिकासारखी थोडीफार लोकं आहेत म्हणुन देश चाललाय असं वाटायला लागलं आहे.

शिल्पा ब's picture

15 Jun 2013 - 12:10 pm | शिल्पा ब

त्यांना महानगरपालिकेच्या शाळेत जायला सांगा. दप्तरेच नाहीत, तर युनिफॉर्म, कंपास बॉक्स, शुज, वॉटर बॅग, ब्रेकफास्ट, लंच सर्व काही उत्तम प्रतिचे मिळेल

खरंच?

अमोल खरे's picture

15 Jun 2013 - 7:42 pm | अमोल खरे

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये हे नक्की असतं. बहुदा इस्कॉन मधुन ब्रेकफास्ट आणि दुध मिळतं. मध्यंतरी बाकी महापालिकेच्या शाळांमध्येही असं सुंदर वातावरण असतं असं ऐकलं होतं. मुंबईबाहेरचे मिपाकर ह्यावर प्रकाश टाकु शकतील.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Aug 2013 - 9:45 pm | प्रकाश घाटपांडे

डॉ संजीव मंगरुळकरांच्या ब्लॉग वर काही अनुभव आहेत त्यात विम्याच्या मानसिकतेवर अनुभव मस्त आहेत. उत्तम ब्लॉग आहे त्यांचा. http://svmangrulkar.blogspot.in/2012/11/blog-post_24.html

सुधीर मुतालीक's picture

6 Aug 2013 - 10:07 pm | सुधीर मुतालीक

तुम्ही सांगितलेले प्रसंग एकत्रित वाचताना एकूणच कुणालाही नाउमेद करणारे आहेतच. पण नाउमेद न होण्याची क्षमता आपण म्हणजे किमान काही लोकांनी बाळगली पाहिजे असे माझे ठाम मत आहे. कुठल्या समाजात इतिहासातल्या कोणत्या काळी आपल्या व्याख्येतली तथाकथित आदर्श माणसे बहुसंख्येने सापडतात ? याचा प्रयत्न पूर्वक अभ्यास केल्यास जाणवेल की बहुसंख्येने अशी माणसे कधीच नव्हती आणि नसतात. पण समाज रसातळाला गेल्याचे नक्की दिसेल जेव्हा त्या अल्पसंख्य संवेदनाशील लोकांनी त्या समाजाकडे पाठ फिरवली. आख्खा देश अशावेळी कोलमडून पडतो, याची उत्तम उदाहरणे पाकिस्तान, इथिओपिया, सोमालिया, काही अंशी इराक ही आहेत. १९२० पर्यंत भारत कधी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभा राहील याचे स्वप्न सुद्धा जगाला वा मुख्य म्हणजे इंग्रजाला पडले नव्हते. पण एक माणूस उभा राहिला आणि घरादारात लपून बसलेला भारतीय रस्त्यावर आला. मुद्दा असा आहे की एक मनुष्य ही इतिहास घडवू शकतो. आणि इतिहास घडवू शकणा-या अनेकांनी नाउमेद होऊन कसे चालेल, सुबोधराव ? लष्कराशी मी व्यवसाय करतो गेली चौदा वर्षे. नॉरदन कमांड बरोबरही व्यवसाय करतो. त्यासाठी उधमपुरच्या चकरा मी मारल्यात. कारगिल प्रसंगी मी एक सिविलियन असूनही सियाचेन मध्ये एका लष्करी कामासाठी लष्कराच्या विनंती वरून मी चक्क पंचेचाळीस दिवस राहिलोय. नाउमेद होण्याचे किती प्रसंग एका उद्योजकाला येऊ शकतात याची कल्पना आपल्याला येऊ शकते, आपणच ती कल्पना करू शकता. पण मी लष्कराचा पाठलाग आजही सोडला नाही ते धंदा वाचवा आणि मला चार पैसे मिळावेत म्हणून नव्हे - आई शप्पत-. मी इतरही ब-याच ठिकाणी धंदा करतो - तो सोपा सरळ सज्जन आणि प्रसंगी जादा किफायती असतो. पण लष्कराशी धंदा करताना मला डायरेक्ट देशाची सेवा केल्याचे समाधान मिळते. दुसरे मी नाउमेद झालो तर आणखी वेगळी गडबड होईल हे दिसतंय मला. आपण नाही नाउमेद व्हायचं. एवढे कच्चे आहोत का आपण ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Aug 2013 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपण नाही नाउमेद व्हायचं. एवढे कच्चे आहोत का आपण ?

राही's picture

7 Aug 2013 - 8:02 pm | राही

प्रतिसाद अतिशय आवडला. या नाउमेद करणार्‍या घटना कुठल्याही व्यवसायात, नोकरीत घडू शकतात. अगदी लष्करातही. कामामध्ये टंगळमंगळ करणे, दुसर्‍याने केलेल्या कामाचे/संशोधनाचे श्रेय ढापणे, बिले/टेंडरे मंजूर करताना अथवा मोठी खरेदी करताना टक्केवारी मागणे हे नेहमीचेच. उलटबाजूनेसुद्धा मंजूर करणारा/ खरेदीदार नेक असला तरी लबाडीने कमी दर्जाचा माल गळ्यात बांधणे, वजनात, मापात, गट्ठ्यात खोट ठेवणे, हे सररास चालतेच. ह्याला साधारणपणे भ्रष्टाचार म्हटले जाते. पण वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ही चारित्र्यहीनताच नव्हे काय?
रस्ता घाणीने बरबटलेला असेल तर एक तर ती घाण साफ करणे अथवा नवा रस्ता तयार करणे हा योग्य उपाय ठरेल पण असे मार्गप्रवर्तक अगदी विरळा. त्यापेक्षा आपल्या पायांना योग्य पादत्राणांनी आच्छादून मार्गक्रमण सुरू ठेवणे हा त्यातल्या त्यात सोपा उपाय.