एसीचा एकसुरी आवाज, आणि हॉटेलच्या खोलीचा पिवळा पंडूरोगी प्रकाश, सेकांदामागून सेकंद, तासामागून तास चालूच..
एकटेपणा शरीरावर चढत जातो शेवाळासारखा. मनावर अंधाराचे थरच्याथर चढत रहातात बुळबुळीत बुरशीसारखे. आतल्याआत आक्रसून जायला होतं, खोल अंधाऱ्या गढूळ पाण्यातल्या कोशातल्या किड्यासारखं.
त्या कोशातल्या अंधारातून बाहेरचं रंगीत जग दिसतं, पण कोश सोडता येत नाही, अनामिक आदिम भीती वाटत रहाते...
एखादा जरी रंगीत कवडसा पडला तरी, एखादा नवखा जीव उत्सुकतेने पाहू लागला तरी, जीव घाबरतो, अजून आक्रसून घेतो आतल्याआत.
तशी हालचाल चालू असतेच, जिवंतपणा असतो, पण तो असतो अतिशय भौतिक, जनावराच्या पातळीवरचा. जवळून जाणारा एखादा भरकटलेला जीव हळूच पटकन कोशाबाहेर येऊन मटकावण्याचा पराक्रमी जिवंतपणा.
दोनच आदिम अवस्था, लाखो वर्षे चालत आलेल्या, दुसऱ्या लहान अशक्त जीवाला पाहून भूक लागणे किंवा मोठ्या बुलीइंग जीवाला पाहून घाबरून जाणे. या दोनच शाश्वत अवस्था, बाकी उत्क्रांती, बुद्धी वगैरे सब झूठ.. जगाचं गाडं चालू या दोन चाकांवरच.
बाकी सगळा हवेतला पसारा, सगळे रंग, सगळा नाद सगळे आकार अत्यंत मायावी, अशाश्वत, पोकळ... आणि केव्हातरी आयुष्यात एकदा तिसरी तडफड.... मैथुन. संपला कोट्यावधी जीवांचा सारांश.. आहार भय आणि मैथुन..
निसर्गाने घालून दिलेल्या तीन रेषा.. तीन मर्यादा... अब्जावधी वर्षे लागली एका पेशीपासून माणूस बनायला पण तीन रेषा अजूनही त्याच आहेत. या अब्जावधी वर्षात कोट्यावधी जमाती जन्मल्या आणि मेल्या, या तीन बिदुंच्या आजूबाजूने रंगांचे, आकारांचे आणि आवाजांचे खेळ करत.
आपण काय वेगळे आहोत? मासे रंग रचतात, किडे आवाज काढतात, प्राणी आकार फुगवतात तसेच आपण..
टीचभर आयुष्यात काहीही केलं, अगदी काहीही, एकट्याने अथवा समूहात, तरी मूळ प्रेरणा तीनच. सुटका नाही..
मारे बडेजाव कराल तत्वज्ञानाचा, कलेचा... या तीन ठसठसणार्या अंधार्या बिदुंपासून कसे सुटाल, तुमच्या आतच आहेत ते, आणि तुमचा घास घेत आहेत आणि पुढे सरकत आहेत, तुमच्याच पेशींमधून निघालेल्या पुढच्या पेशीसमुहाकडे सतत ठामपणे..
तुमचं एक व्हेइकल केलं आहे निसर्गाने, काळाच्या अनंत रेषेवर सरपटायला वापरण्यासाठी. तुम्ही मोडून पडाल, मग पुढचं व्हेइकल, मग त्या पुढचं.. मागील पानावरून पुढे चालू, अनंत वर्षे, व्हेइकलला महत्व नाहीच, काळाच्या रेषेवर पुढे सरकण्याला महत्व...
इतकं नागडं निर्घृण सत्य समजल्यावरही रंग, आकार, आवाज, गोंगाट चालूच, काळाच्या अनंत रेषेवर कोण जास्त वाजतगाजत जातो याचीच किळसवाणी मिरवणूक सतत चालू....
प्रतिक्रिया
4 May 2013 - 1:26 pm | विसोबा खेचर
जबरदस्त मुक्तक! शाश्वत सत्य एकदम ऑफ द ट्रॅक आणि भन्नाट पद्धतीने लिहिलं आहे. जियो बॉस...!
4 May 2013 - 1:47 pm | प्यारे१
आह्ह्ह्ह्ह्!
का मुखवटे काढायला भाग पाडताय राव? चाललंय तसंच चालू द्या की.
नशेचा अम्मल जवळ करावासा वाटतो तो ह्याच कारणानं.
नशेचे अनंत प्रकार.... सगळंच आलं त्यात.
अवांतरः थोडा ब्रेक घ्यावा माणसानं.
4 May 2013 - 1:50 pm | पैसा
आम्हाला निद्रेत राहू दे रे!
4 May 2013 - 1:55 pm | वेल्लाभट
क्लास लिहिलंय !!!
4 May 2013 - 2:05 pm | संजय क्षीरसागर
निराशेच्या गर्तेत चालल्याची लक्षणं. वेळीच सावरा.
4 May 2013 - 2:09 pm | तिमा
आमचं दु:ख हेच की आमच्या व्हेइकलमधे बसायला कोणीच नाही. आमचा हॉर्नही वाजत नाही आताशा!
4 May 2013 - 2:33 pm | संजय क्षीरसागर
हॉर्न वाजवण्यासाठी नसतो.
4 May 2013 - 3:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
हॉर्न बिघडण्याच्या वेळेपर्यंत बहुतेक गाडी खूप खडखडाट करायला लागते आणि मग हॉर्न वाजवायची गरज नाही... कान ठीक असलेले लोक आपोआप बाजूला होतात ;)
4 May 2013 - 2:12 pm | मराठमोळा
एक मुक्तक म्हणून वाचायला चांगलं, वेगळं, जबरजस्त. पण भावना खरच तशा असतील तर मग ते सत्य असलं तरी असहमत.
4 May 2013 - 3:28 pm | lakhu risbud
मुळात सगळे धर्म तत्वज्ञाने हे बरोबर (=) चिन्हाच्या उजवीकडील समीकरण (Equation ) सोडवण्याचा प्रयत्न करतात का असा प्रश्न येतो ? जन्माला येताना हे चिन्ह ओलांडून मी जन्मतो.या चिन्हाच्या डावीकडे काय आहे ?
मला माझाच जन्म का मिळाला ? मी आत्ता आहे त्यापेक्षा गरीब,आजारी म्हणून का नाही जन्मलो? किवा अजून एखादा श्रीमंत ,देखणी व्यक्ती म्हणून का नाही?
मी आयुष्य जगतो म्हणजे काय करतो आहे ?
हे प्रश्न विचारले तरी चिल यार ! हे वय आहे का तुझ असला विचार करायचा अशी उत्तरे येतात ? मिळणाऱ्या / मिळालेल्या भौतिक सुखांपुढे डोळे दिपून हे प्रश्न जरी मनाच्या, विचारांच्या खोल डोहात बुडवून टाकले ,संसाराच्या ठरलेल्या मार्गाने प्रवास करून जवळचे सगळे सुहृद अपरिहार्य सत्याला सामोरे जात असताना हा प्रश्न गलितगात्र अवस्थेत म्हातारपणी भयंकर वेगाने उचंबळून येणार, मी आयुष्य जगलो म्हणजे काय ?
असच एक विचार येतो मग हे पुनर्जन्म,कर्मविपाक वगैरे या बरोबर चिन्हाच्या डावीकडील समीकरण (Equation ) शोधण्याचा प्रकार आहे काय? हत्ती आणि सात आंधळ्याच्या गोष्टी प्रमाणे प्रत्येकाला जे जाणवते त्याप्रमाणे तो त्याला नाव देतो.
4 May 2013 - 6:22 pm | स्पंदना
हेच,हेच व्हेइकल सुंदरसुद्धा असु शकत.
नजरिया हवा बस.
5 May 2013 - 6:54 am | ढालगज भवानी
नाही पटलं, पण शैली खासच.
5 May 2013 - 6:56 am | यशोधरा
इतके निराशाजनक विचार का?
5 May 2013 - 11:09 am | अग्निकोल्हा
सत्याला दिगंबर जरुर म्हणावे पण ते कधिही निर्घृण वा सुंदर वगैरे वगैरे अजिबात नसतं. अस्थिर मनाची भौतिक सुखसोयिबद्दलची आगतिकता वा त्तृप्ति त्याचे रुपांतर निर्घृणतेमधे अथवा सहज सुंदरतेमधे करते. The Truth is neither good nor bad.
@lakhu risbud
मी आयुष्य जगलो म्हणजे काय ? दादा, हा प्रश्न फक्त तेव्हांच (व निराशादायकपणे) आ वासुन उभा असतो जेव्हां ते प्रत्याक्षात जगुन झालेलंच नसतं (कारणं काहिही असोत), तर केवळ काल्पनिक मनोर्यातुन जर तर च्या माध्यमातुन आयुष्याला एका क्षणात इंटेलेक्चुअली इंटर्प्रिट करायचा प्रयत्न जेव्हां झालेला असतो. आयुष्य जो प्रांजळपणे जगतो त्याला जगण्याचा हा अनुभव अंतर्यामी अतिशय सहज व स्थिर बनवत न्हेतो. हिच तर खरी गंम्मत आहे नैराश्य व विरक्तिमधल्या अतिशय बारिक धुसर सिमारेषेची. जर का आयुष्य जगलो म्हणजे कायचे खरोखर उत्तर सोडवायचे आहे तर पहिलं प्रश्न निर्माण करणं थांबवायच... व केवळ जगायला सुरुवात करायची. उरलेली सर्व सुत्रे आपोआप गवसत जातात.
11 May 2013 - 6:29 pm | इनिगोय
+१
11 May 2013 - 10:23 pm | कवितानागेश
:)
बिन विडाउट डोकं खाल्ल्याशिवाय प्रतिसाद! गुड वन.
6 May 2013 - 11:51 am | चाणक्य
'बुरखाफाड' लिखाण एकदम
6 May 2013 - 1:18 pm | मन१
जबराट....
12 May 2013 - 8:19 am | पिवळा डांबिस
काही पटलं नाही!!!!
... पण व्हॉटेव्हर....