सकाळी सकाळी शेजारी राहणाऱ्या पाटीलकाकांचा फोन आला.
“अरे मुलीचे लग्न ठरलेय रे. तू पत्रिका छापतोस ना?”
“काका कामाचा ताण आहे हो खूप, वेळ लागेल.”
“ते लोकांना सांग रे. मला नको. उद्या मजकूर ऑफिसात आणून देतो. दोन दिवसात छापून दे लगेच.”
एकतर प्रिंटिंगचे कुठलेच काम टाळू वाटत नाही त्यात हे काम जवळ जवळ घरचे असल्यासारखेच, मी हो म्हणून टाकतो.
दुसरे दिवशी काका दोन फुलस्केप कागदावर लिहिलेला मजकूर घेऊन हजर होतात.
आतापर्यंत तीनचारशे पत्रिका टायपून सराईत झालेला डीटीपी आपरेटर भराभरा कीबोर्ड बडवत काकांनाच सल्ले देऊ लागतो.
“जावयांचे नांव कार्यवाहात टाका हो. ते स्वागतोत्सुक नसतात.”
“ गल्लीतल्या मंडळाचे नांव व्यवस्थापक म्हणून करतो“
“आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हं, जुनं झालं आता. बालनिमंत्रक नाहीतर किलबिल टाका.”
“प्रतापरावांना दोन बायका आहेत काय़? महिरपी कंस करतो मग.”
“गं. भा. करु का श्रीमती? ते सेंटरला घ्यावे लागेल.”
“सचिन नितीनचे लग्न झाले नाही ना अजून मग श्री. नको, चि. करतो. आगामी आकर्षण आहेत ना ते.”
या लग्नपत्रिकातील मजकुरांचे इतके संकेत आणि प्रकार आहेत की त्यावरसुध्दा एखादी पीएचडी व्हावी.
एकदाचे मजकुराचे प्रुफ पाहिल्यावर काकांचे माझ्याबरोबर हिशोब चालू होतात. “आज पत्रिका छाप, उद्या पाकीट मग परवा सकाळी येतो न्यायला.”
“अहो काका असे नसते हो. मी वेगळ्या प्रकारच्या पत्रिका छापतो. आणि अजून दोन महिने आहेत की लग्नाला.”
“तुमचे छापायचे काम म्हणजे महिनाभर थांब असेच असते रे. पण वेगळ्या म्हणजे अजून कसल्या करतोस बाबा?”
“अहो मी फोर कलरचे काम करतो फक्त. तुम्ही म्हणता त्या रेडीमेड पत्रिका असतात.”
परत काकांचे प्रश्नचिन्ह. “जरा सांग तरी डिटेलमध्ये रे. काय काय करता तुम्ही लोक?”
आता बघा तुम्हीच.
आता हा मजकूर टाइप झाल्यावर एकदा वाचून बघणार, मग डिझाइनसाठी घेतली जाते
म्हणजे पीसीवरील कोरलड्रॉ फोटोशॉप हि अॅप्लिकेशन वापरून, काही स्कॅनड इमेजेस, काही फोटोग्राफ वा क्लीपआर्टस वापरून एक जशी पत्रिका दिसते त्याप्रमाणे तयार होते.
या कामात डिझाइनिंगचे आणि व्हिज्युअलायझिंगचे कौशल्य लागते तसेच कागदांच्या साइज, प्रिंटिंगचे ज्ञान, मशीनच्या साइज आणि इतर तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे देखील गरजेचे असते. हे सर्व सीएमवायके फॉर्मॅटमध्ये होते. आऊटपुट फाइल्स tiff, pdf किंवा cdr फॉर्मॅटमध्ये सेव्ह केल्या जातात. यांचे रेझोल्युशन उच्च असते (३०० ते ६०० डीपीआय, सेम साइज)
हे काम पूर्ण झात्यानंतर त्याचा एक कलर प्रिंट काढून तो प्रुफरिडिंगसाठी ग्राहकाला दिला जातो. शक्यतो एका ग्राहकासाठी दोन अथवा तीन वेगवेगळी डिझाइन्स केली जातात. त्यातील मजकूरांच्या चुका, डिझाइनमधील इतर काही चुका दुरुस्त केल्या जातात. कधीकधी पूर्ण डिजाइन बदलले जाते. (माझ्यावर अशी वेळ आजपर्यंत तरी आली नाही, शक्यतो सुरुवातीला केलेलेच पसंत पडते असा अनुभव आहे.)
(कलरप्रिंटसाठी व शॉर्टरन प्रिंटिंगसाठी हा कलर प्रिंटर)
हा मसुदा एकदा पक्का झाला की ग्राहकाचे काम पैसे देऊन तयार पत्रिका ताब्यात घेणे एवढेच उरते.
आता आमचे खरे काम सुरु होते.
ग्राहकाच्या अपरोक्ष कामाच्या सुरुवातीलाच बराच विचार केलेला असतो, जसे की पेपर साईज, कटींग, लॅमिनेशन, एन्हवलप आदी.
कारण कागद आणि कार्ड ठराविक साईजमध्येच बाजारात उपलब्ध असतात.
उदा. कार्ड २२x२८, कागद १८x२३, १५x२०, १७x२७ ह्या इतर आकारात पण काही खास पेपर्स उपलब्ध असतात. १८x२३ इंच ह्या आकारालाच डेमी म्हणले जाते. सर्वांना माहीत असलेला ए४ हा १८x२३ चा साधारणपणे एक चतुर्थांश असतो. त्यामुळे हा विचार करुनच पत्रिकेची साईज ठरवली जाते. पत्रिकेसाठी किंवा ब्रोशर्ससाठी २५० जीएसएम(ग्रॅम/स्क्वेअर मीटर) आर्टकार्ड म्हणजे दोन्ही बाजूने चमक असणारा जाड कागद वापरला जातो.
कमीत कमी कागदात, कमीत कमी प्रिंटींग मध्ये आणि कमीत कमी कागदाचा तुकडा वाया घालवून अपेक्षित काम करणे हेच यशस्वी प्रिंटरचे ध्येय असते.
पीसीवर केलेले डिझाइन सीटीपी (कम्प्युटर टू प्लेट) यंत्रावर घेतले जाते. मूळ डिझाइनचे चार रंगात (स्यान, मॅजेण्टा, यलो, ब्लॅक) विभाजन केले जाते. पाचसहा वर्षापूर्वी हेच काम इमेजसेटरने फिल्म काढून त्या फोटोसेन्सिटिव्ह केमिकलने पत्र्याच्या प्लेट बनवून केले जाई. आता सीटीपी ने आपल्या लेसर प्रिंटरसारख्या डायरेक्ट चार प्लेटस मिळतात. इथपर्यंतच्या प्रक्रीयेला प्रीप्रेस म्हणले जाते.
(सीटीपी : कम्प्युटर टू प्लेट)
आता ह्या चार प्लेटस ऑफसेट मशीनच्या सिलिंडर्सवर चढविल्या जातात. हि भलीमोठी मशीन्स एकाच वेळी चार रंगी छपाई करणारी असतात. शक्यतो जर्मन, झेक अथवा जापनीज मेकची हि मशीन्स ताशी १०००ते ३००० प्रति छापू शकतात. या क्षेत्रात हायडेलबर्ग, अॅडॅस्ट, रोलंड, कोमोरी लिथ्रॉन, मित्सुबिशी हि विदेशी मशीन्स जास्त आहेत. ऑटोप्रिंट सारख्या भारतीय कंपन्या कमी आहेत. एकरंगी छपाईत मल्टिलिथ आणि फरिदाबादच्या मशीन्स बर्याच ठिकाणी आहेत. मोठ्या मशीनवर एका वेळी तीन चार ऑपरेटर्स आणि हेल्पर्स काम करतात.
(कोमोरी ४ रंगी ऑफसेट मशीन)
आता वेळ येते पोस्टप्रेसची. एकदा प्रिंटिंग झाले की त्यावर लॅमिनेशन (प्लास्टिकच्या पातळ फिल्म चा थर) केले जाते. हे थर्मल अथवा गमिंग अशा दोन प्रकारे वेगळ्या मशीनवर केले जाते. यात सुध्दा मॅट अथवा ग्लॉस फिनीश असे पर्याय असतात.
(लॅमिनेशन मशीन)
काही वेळा स्पॉट लमिनेशन (डिझाइनचा विवक्षित भाग लॅमिनेशन) केले जाते. हि प्रक्रिया रासायनिक थर चढवून वेगळ्या मशीनवर अथवा स्क्रीन प्रिंटिंग पध्दतीने केली जाते. कधी कधी सोनेरी, चंदेरी, मोतिया रंगाची छपाई जी ऑफसेटवर होत नाही तीपण स्क्रीन प्रिंटिंग ने अथवा मेटॅलिक फिल्म वापरुन केली जाते. एम्बॉसिंग असेल तर त्याचा पण वेगळा डाय व मशीन असते.
नंतर वेळ येते कटिंगची. सरळ रेषेत कटिंग असेल तर ते गिलोटीनने केले जाते. या मशीनला धारदार ब्लेड असते. हे मशीन मोटर पावरने, हायड्रॉलिक अथवा न्यूमॅटिक पावरने कागद कापते. आता कम्प्युटराइज्ड कंट्रोल्ड मशीनमुळे या कामातील धोके बरेच कमी झाले आहेत अन्यथा प्रत्येक प्रेसमध्ये एखादी दुर्दैवी कहाणी ऐकावयास मिळते. अजूनही येथे कटरशिवाय दुसर्या माणसाने येऊ नये असा संकेत आहे.
(गिलोटीन: पेपर कटिंग मशीन)
डिझाइननुसार जर गोल, कर्व असेल तर डाय तयार करावा लागतो. हे डाय पंच एका पंचिंग मशीनवर चढवून असे कटिंग होते. कार्डला घडी घालण्याचे काम (क्रिजिंग) पण याच वेळी होते. काही ठिकाणी जुन्या ट्रेडल मशीनमध्ये पण थोडे फेरफार करून पंचिंग मशीन म्हणून वापरले जाते.
(हा कर्व्ह कटिंगचा व दोन घड्यांचा डायपंच, जो मशीनवर बसवून काम केले जाते.)
पत्रिकेची पाकीटे एका डायमध्ये कापून ती हाताने बनवली जातात. सराईत माणसे ताशी २००० पाकीटे सुध्दा घड्या घालून व चिकटवून तयार करतात. कोर्या पाकीटावर छापून अथवा आधी कागदावर छापून त्याची पाकीटे तयार करतात.
नंतर हे पत्रिका, पाकीटे गठ्ठे बांधून ग्राहकांसाठी तयार असतात.
“आता सांगा काका, कधी येता डिझाइन बघायला आणि त्यानंतर पत्रिका न्यायला?”
“तूच हे सगळं झाल्यावर फोन करून सांग बाबा आणि हे घे अॅडव्हान्स.”
....................................................................................................................
(ह्यात रंगीबेरंगी दोरे, गोंडे, मणी, छोट्या मूर्ती, हातकागद, कापड वगैरे वापरून केलेल्या पत्रिका समाविष्ट नाहीत. तो एक स्वतंत्र उद्योग आहे. अशा रेडीमेड पत्रिका घेऊन त्यावर एकरंगी अथवा दुरंगी छपाई करणे हा पण आता सर्वमान्य प्रकार आहे. या प्रकारात बराचशी बंधने असतात. उदा. बहुरंगी छपाई वा फोटोग्राफ्स छापता येत नाहीत. तयार अल्बममधील डिझाइन निवडावे लागते, किंमतीत फरक आदि. सर्वसामान्यपणे प्रिटिंग तंत्राचा हा अगदी छोटासा उपयोग आहे. पुण्यामुंबईसारख्या शहरात हा उद्योग बराचसा प्रगत आहे. सोलापूरमध्ये उपलब्ध तंत्राने सर्वांच्या बघण्यातली लग्नपत्रिका प्रत्यक्षात कशी तयार होते हे सांगायचा माझ्या अल्पमतीने हा छोटासा प्रयत्न. बरेचसे शब्द प्रचलित असल्याने वापरले आहेत, तांत्रिक नांव कदाचित वेगळे असू शकते. काही चित्रे जालावरून साभार. पर्यावरणरक्षकांनो मला माफ करा.)
प्रतिक्रिया
27 Apr 2013 - 8:21 pm | इन्दुसुता
माहितीपूर्ण लेख, आवडला.
27 Apr 2013 - 8:31 pm | रेवती
अभ्याच्या लग्नाची चर्चा इतकी झालेली पाहून त्याला लगेच लग्न करून टाकावे (आणि प्रश्नोत्तरे बंद करावित)असे वाटल्यास नवल नाही. ;)
27 Apr 2013 - 8:35 pm | जेनी...
णकोरे अब्या :-/
असा लगेच लग्नाचा निर्नय नक्कू घ्युस :-/
इकडचे प्रश्न बंद करशिल ... पण तिक्कड्चे चालु होतिल :-/ :-/
27 Apr 2013 - 8:44 pm | रेवती
अभ्याने आत्ता लग्न करू देत नाहीतर चार सहा महिन्यांनी! प्रश्नोत्तरे कुठेतरी चालूच रहाणार ना पुजाजी! आत्ता पत्रिका स्वस्तात छापून होतील हा फायदा बघा ना! ;) पाहिजेतर मुलीकंडच्यांनाही डिस्काऊंट देवू, म्हणजे तेही खूष! इंप्रेशन जमेगा. ;)
27 Apr 2013 - 8:49 pm | अभ्या..
आता स्वस्तात छापून होतील म्हणजे कळले नाही ओ रेवतीतै.
मी काय मिपासाठी स्कीम बिम नाय काढलेली. हा माझा कायमसाठीचा धंदा आहे छपाईचा.
कागदाचे रेट दरवर्षी वाढतेत हे खरं म्हणून काय आधीच छापून ठेवू की काय पत्रिका?
बाकी प्रश्नांचे म्हणताल तर हर सवाल का जवाब है अपने पास ;)
28 Apr 2013 - 12:40 am | रेवती
हर सवाल का जवाब है अपने पास
आता तर लग्न करायलाच हवस तू!
27 Apr 2013 - 8:44 pm | अभ्या..
बघ पूजा, आसं हाल असतेत बग एखांद्या होतकरु, हुश्शार, हॅन्डसम तरुणाचे ;)
मीच एकटा बिनलग्नाचा हाय काय हितं.
त्या बॅट्याला, स्पावड्याला, वल्लीला, गुर्जींना पण ओढा की रिंगणात. ;)
28 Apr 2013 - 12:49 am | प्यारे१
लग्नाला यायचं हं असं उत्साहात कोण म्हणायलंय?
होतकरु, हुश्शार, हॅन्डसम तरुण कोण?
म्हणून इतर बिनलग्नाचे असले तरी सुपरमार्केट (हे ब्याम्या कडून) उठवायचं कुणाचं???????????
होतात ना गुदगुल्या? ;)
28 Apr 2013 - 12:51 am | अभ्या..
मागो नेणे दे रे राम| मज न कळे ते दे रे राम|| :D
28 Apr 2013 - 12:55 am | प्यारे१
अवघड आहे.
कृ शि सा न वि वि.
तंगड्या ठिवा कौन्टरवर. दर्शन घितो.
28 Apr 2013 - 1:03 am | जेनी...
=))
कुणाच्या काकु?? =))
28 Apr 2013 - 1:02 am | बॅटमॅन
म्हणून म्हणून म्हण्णार कोण?
अभ्याशिवाय हायेच कोण?
28 Apr 2013 - 1:05 am | अभ्या..
गपरे वशाडमेल्या.
तुझं पण नाव टाकतो पत्रिकेत. गप्प बस जरा ;)
ओ गुर्जी या की आताSSSSS
28 Apr 2013 - 1:11 am | बॅटमॅन
हीहीही ओक्के :)
28 Apr 2013 - 1:07 am | जेनी...
हिहिहि .. अब्या आता तु म्हण्ला म्हुन मी आपलं मांजं एक निरिक्षाण नोंदवती बर्का ;)
म्म्म्म ह्यातल्या वरच्यातल्या क्वालिटीचं वर्गीकरण केलं तं बर्का ..
गुर्जि = होतकरु
वल्ली = हुशार
अब्या = हँडसम ;)
बाकीचे गडी बाद :D
राग्वु नको बर्का अब्या पण हे माझं निरिक्षणे :-/
28 Apr 2013 - 1:22 am | अभ्या..
=)) =)) =))
हितं काय मिस्टर मिपा चाललेय काय?
तू बी आपलं मार्कासहीत जजमेंट सुनवायलीय.
28 Apr 2013 - 1:23 am | जेनी...
हिहिहि =))
28 Apr 2013 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा
गुर्जि = होतकरु>>> =))
वल्ली = हुशार>>>खिक्क...
अब्या = हँडसम smiley>>> ह्हे ह्हे ह्हे...
बाकीचे गडी बाद smiley>>>
28 Apr 2013 - 12:24 pm | मेघनाद
अतिशय सुंदर माहिती कथेद्वारे छान सांगितलीत साहेब …
29 Apr 2013 - 10:50 pm | अभ्या..
माझ्या आमंत्रणाला प्रतिसाद देणार्यांचे सर्वांचे अगदी मनापासून आभार.
माझ्या लग्नाची वाट बघणार्यांना सुध्दा लवकरच खरे आमंत्रण मिळेल.
बाकी हा व्यवसाय जितका लिहिलाय तेवढाही सरळ नाही. एका साध्या पत्रिकेच्या तयार होण्याचा हा मार्ग आहे. हे अगदी सुरळीत होईल असेही नाही. कधी कागदांचा हिशोब चुकतो तर कधी प्लेट प्रिंटींगचा. कधी ऑपरेटर दांडी मारतात तर वीज गुल होते. कामगारांचे आणि मशीनचे मेंटेनन्स बघता बघता एक डोळा रिकव्हरीवर ठेवावा लागतो. एकदा लग्न लागले की कुठलाही ग्राहक पैसे आणून देत नाही. त्याची गरज भागलेली असते. डीझाइनसाठी चार चार दिवस पीडणारे लोक प्रिंटींगसाठी एकही ज्यादा दिवस वाट पहायला तयार नसतात.
तरीही कुठे म्यापलिथो, क्रोमो, सिनारमास. डबल्डेमी अशी नावे ऐकली की वेगवेगळ्या आकाराचे, जाडीचे कागद दिसायला लागतात. शेजारी फोनवर कुणी प्लेटा, मास्टर आणि रिमांचा हिशोब सांगू लागला की मन आनंदाने भरुन येते. कागदांच्या गट्ठ्यात आणि शाईच्या वासात जीव अगदी हरखून जातो. स्क्रीन, लिथो, ऑफसेट, रोटो, फ्लेक्सो, ग्रेव्हीअर, डी़जीटल प्रिंटिंग असे कुठलेही प्रिंटिंग नाही की ज्याचे आर्टवर्क मी अजून केलेले नाही. कधी ऑपरेटरांना मस्का लावून तर कधी त्यांच्या शिव्या खाऊन मी बर्याच मशीनरी ऑपरेट केल्या आहेत. जरी हा व्यवसाय आयटीइतका ग्लॅमरस नसला तरी नक्कीच क्रीयेटीव्ह आहे.
घरात या व्यवसायाची काहीही पार्श्वभूमी नसली तरी लहानपणापासून प्रेस हा प्रकार आवडणारा मी आज त्याच व्यवसायात आहे याचाच मला आनंद आहे.
म्हणून पुनःश्च एकदा धन्यवाद सार्यांनाच :)
29 Apr 2013 - 10:59 pm | बॅटमॅन
ग्लॅमरबिमर सोडा ओ, क्रिएटिव्हिटीला वाव अन च्यालेंज महत्वाचे.
है शाब्बास!! :)
29 Apr 2013 - 11:02 pm | श्रिया
लेख आवडला. माहीती रंजक वाटली. लवकरच तुमच्या लग्नाच्या आमंत्रणाचाही धागा येऊ दे!
30 Apr 2013 - 1:48 pm | दिपक
लगीनसराईच्या मोसमात समयोचीत आणि माहीतीपुर्ण लेख आवडला ! :-)
शिर्षकाने चकवल होतं.
10 Dec 2013 - 9:26 pm | यसवायजी
भारीच हां अभ्या..
तसं म्याबी ४-५ वरीस स्क्रीन्प्रिंटींग केलंय. बारका हुतो तवा थपाक्-थपाक वर काम बी केलय..
ऑफसेट प्रिंटिंग मचिने मावशीकडे असल्याने या उद्योग सुद्दा जवळुन पाह्यलाय..
10 Dec 2013 - 9:40 pm | अभ्या..
भारीच रे.
आता जर्मनीला जातोयास तर आल्यावर एकदा भेट बाबा.
वारीला जाउन आलेल्यान्च्या बी पाया पडताव् आम्ही :)
10 Dec 2013 - 9:55 pm | यसवायजी
@ आता जर्मनीला जातोयास तर आल्यावर एकदा भेट बाबा.
अरे वारी कधीच झालीय. आता फक्त वरनन चाल्लय. तेवढंच जीके वाढतंय.. टिपी होतुय.. आनी आठवनीतबी र्हातया..
@वारीला जाउन आलेल्यान्च्या बी पाया पडताव् आम्ही
भेटुयाच कवातर.. पर पाया बिया सोडुन सोडा ओ..
12 Dec 2013 - 8:12 pm | पाषाणभेद
फारच छान माहीती!
12 Dec 2013 - 10:03 pm | चित्रगुप्त
मस्त माहितीपर लेख.
सर्वांप्रमाणे आधी स्वतःच्या लग्नाबद्दल आहे, असेच वाटले होते.
गेल्या शतकातील पोस्टरे, डब्या-बाटल्यांची-धोत्रांची लेबले, कॅलेंडरे, इ.इ. बद्दल एकादा लेख लिहिता आल्यास बघा.
13 Dec 2013 - 11:27 am | देशपांडे विनायक
" माझ्या लग्नाची वाट बघणार्यांना सुध्दा लवकरच खरे आमंत्रण मिळेल."
येण्याच्या तयारीला लागू ?
जाहीर आमंत्रण वाचून कधी गेलो नाही पण मिपावरचे आमंत्रण ओले वाटते
त्यातून सोलापूरचा उल्लेख हळवे करून जातो